सांगायला हवं

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
14 Oct 2017 - 12:13 am

हाच लेख पूर्वी टाकला होता पण तो कुठे गेला कळेना, म्हणून आपल्यासाठी पुन्हा

उद्धव काळ

खूप लोक उद्धवराव आणि बाळासाहेब ठाकरे यांची तुलना करतात
पण
मला उद्धवरावांचे नेतृत्त्व बाळासाहेबांपेक्षा उजवे वाटते.

बाळासाहेबांची सेना मूळात तेव्हाच्या सत्ताधार्‍यांच्या आज्ञेवरून स्थापन झाली, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना सत्ताधारी पक्ष लोकलज्जेस्तव जी कामे स्वतः करू शकत नाही ते करण्यासाठी कुणीतरी मदतीला हवे होते.

नीट लक्षात घ्या, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन झाले ते काँग्रेसच्या विरोधात. शिवसेना स्थापन झाली काँग्रेसी मुख्यमंत्र्यांच्या मदतीसाठी. आणिबाणीच्या काळात सेनेने इंदिरा गांधींना साथ दिली. त्यावेळी शिवसेनेचे चिन्ह होते वाघ आणि काँग्रेसचे गाय वासरू. पण कोण कोणाच्या आज्ञेत ते पहा.

मुंबई महानगरपालिकेच्या सभेची सांगता वंदे मातरमने होत असे. त्यावेळी काही नगरसेवकांनी वंदे मातरमला विरोधाची भूमिका घेतली. मुंबईभर वातावरण पेटले. पुढे निवडणूका झाल्या. शिवसेना BMC मुंबई महानगरपालिकेत सत्तेवर बसली. पहीलाच प्रस्ताव पास करून घेतला वंदे मातरमला काही धर्माच्या नगरसेवकांनी बसून राहीले तरी चालेल. नंतर शोध लागला. शिवसेना मुस्लिम लीगच्या मदतीनेच सत्तेवर बसली होती आणि सत्तेसाठी हा प्रस्ताव पास झाला होता.

काँग्रेसचे मुख्यमंत्री अंतुले यांच्या काळात काय काय झाले आपण जाणता, भोंगे वगैरे. पण तेव्हाही बाळासाहेबांनी काँग्रेसच्या याही मुख्यमंत्र्याचा हात घट्ट पकडून ठेवला होता.

अर्थात पुढे भाजपाबरोबर युती झाल्यावर मात्र शिवसेना हिंदूत्त्वाच्या इमेजमधे अडकली. किंबहूना बाळासाहेबांनी स्वतःच आपण हिंदूत्त्वाच्या बाबतीत भाजपाच्याही पुढे दोन पावले आहोत हे दाखवायला सुरुवात केली. अयोध्येच्या आंदोलनानंतर देशात हिंदूत्त्वाचे वारे वाहू लागले. अडवाणींचा वेष तेव्हाही आणि आजही पांढरा सदरा आणि दुटांगी धोतर आहे. बाळासाहेबांनी मात्र वेष बदलला.
(भगवी वस्त्रे घालण्यासाठी गुरुची आज्ञा आवश्यक असते का ? की आपल्या इच्छेने ती परिधान करता येतात, भगवी वस्त्रे घातल्यावर श्रीमंती, ऐश्वर्य याचा त्याग करावा लागतो का ? यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा !)

वि पी सिंग सरकार गेल्यानंतरची लोकसभा निवडणूक आली त्यावेळी जनता दलाला पाठिंबा द्यावा यासाठी वि पी सिंग दिल्लीच्या शाही इमामांना भेटायला गेले.
दीड तास त्यांची बंद दाराआड चर्चा झाली. त्यावेळी ती खूप मोठी बातमी होती पण नेमके काय झाले ? इमामांनी पाठिंबा दिला का या गोष्टी बाहेर आल्याच नाहीत त्यामुळे त्याबद्दल उत्सुकता होती.

बाळासाहेब ठाकरे याबद्दल बोलताना म्हणाले, "मला माहिती आहे बंद दाराआड नेमके काय झाले.
वि पी सिंग शाही इमामांकडे गेले. त्यांनी त्यांचे पूर्ण टक्कल चाटून काढले. तरीही ते पाठिंबा जाहीर करेनात.
तेव्हा व्ही पी सिंग इमामांना म्हणू लागले जुम्मा चुम्मा दे दे"
पुढे बाळासाहेब म्हणाले, "मला घ्या ना विचारून काय काय झालं ते"

एरवी मोजक्या रेषांमधे बोलणारा हा जागतिक कीर्तीचा व्यंगचित्रकार तोंडाने बोलू लागला की असं काहीतरी बोलत असे.
पुढे सत्ता आल्यानंतर पु. ल. देशपांडे, अण्णा हजारे यांच्या अपमानाची परंपरा सुरुच ठेवली. एक लक्षात घ्या पु. ल. देशपांडे या व्यक्तीला सरकारने महाराष्ट्र भूषण देण्याने ते मोठे होणार नव्हते, ते मूळात महाराष्ट्र भूषण होतेच.

अण्णा हजारे यांची वाकड्या तोंडाचा गांधी अशी त्यांनी संभावना केली. पण अण्णांच्या उपोषणामुळे युतीच्या काही मंत्र्यांना घरी बसावे लागले ही वस्तुस्थिती आहे. शशिकांत सुतार हे मंत्री होते. ते नंतर कधीही आमदार होऊ शकले नाहीत.

(शिवसेनेची वाटचाल निरीक्षणारा एक मराठी माणूस) आ जो

अण्णांचे दिल्लीत २०११ मधे मनमोहनसिंग सरकरविरुद्ध आंदोलन सुरु होते तेव्हा बाळासाहेबांनी आदित्यला त्यांची विचारपूस करायला पाठवले होते. अण्णांच्या आळंदीच्या उपोषणाची टर उडवणार्‍या बाळासाहेबांना आता भूमिका बदलावी लागली होती.

१९८९ चे शिवसेनेचे खासदार विद्याधर गोखले यांचे निवडणूक चिन्ह काय होते असे विचारले तरी अनेक शिवसैनिकांची तोंडे शिवली जातात एकतर अज्ञानामुळे किंवा गैरसोयीमुळे.

प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे असे स्वतः मोठे होवून पक्ष छोटा ठेवणारे लोक होते तोवर भाजपाबरोबर जागावाटपात शिवसेनेला झुकते माप मिळत राहीले. शिवसेनेला १७१ आणि भाजपाला ११७ जागा मिळत. यातल्या अनेक जागा शिवसेना जिंकत नसली तरी उबवण्यासाठी स्वतःकडे ठेवी. त्या जागा शिवसेना कुणासाठी हारत असे याचे संशोधन झाले पाहीजे. पुढे मुंडे, महाजन जोडगोळी राहीली नाही तेव्हा शिवसेनेची भाजपापुढे डाळ शिजेना. शिवसेनेने भाजपाला ११७ जागा आजवर दिल्या असल्या तरी युती तुटल्यावर भाजपा १२२ वर जाऊन पोचली.

उद्धवरावांचा काळ पाहता निवडणूकीनंतर का होइना त्यांनी भाजपाची साथ सोडलेली नाही. अनेक महानगरपालिकेतही सेना भाजपाबरोबर आहे.

बाळासाहेबांच्याप्रमाणे आज हा पक्ष उद्या तो पक्ष हे प्रकार आता होत नाहीत. भाषाही सौम्य आहे. लखोबा लोखंडे, देढफुट्या, मैद्याचं पोतं, बारामतीचा अल्पमतीचा म्हमद्या, वाकड्या तोंडाचा गांधी ही भाषा आता ऐकू येत नाही. शिवराळ भाषेमुळे त्या काळात शिवसैनिकांनाही संकोचल्यासारखे होत असणार. युतीची सत्ता होती तेव्हा एक लोकसभेची निवडणूक आली, सोनिया गांधींनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. बाळासाहेब त्यावेळी सोनिया गांधींच्या बोलण्याची, चालण्याची नक्कल करून दाखवत असत. स्टेजवर आपली शाल साडीसारखी डोक्यावर घेऊन चालून दाखवत.

त्यामानाने आजचे सेना नेतृत्व खूपच सौम्य आहे. ज्यामुळे अनुयायांनाही मान खाली घालावे लागेल अशी भाषा, असे निवडणूक सभेतले प्रकार आता होत नाहीत. आजच्या नेतृत्त्वामधे पूर्वीच्या नेतृत्वापेक्षा दोष तरी नक्कीच कमी आहेत. ही जमेची बाजू आहे आजच्या सेनेची

(शिवसेनेची वाटचाल निरीक्षणारा एक मराठी माणूस) आ जो

ashutoshjog@yahoo.com

मांडणीविचार

प्रतिक्रिया

बरेसचे मुददये पटण्यासारखे आहेत, मुळात मला माननीय बाळासाहेबांचे दूरदृष्टीने केलेले नियोजन (विशेषतः आर्थिक) फारसे जाणवले नाही. फक्त भावनांचा खेळ करत राहिले.