महत्वाची सूचना

नमस्कार,
मिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.

विचित्रगड - रोहिडा

Primary tabs

हकु's picture
हकु in भटकंती
12 Oct 2017 - 7:49 pm

एखाद्या भल्या थोरल्या किल्ल्याची लहानशी प्रतिकृती वाटावा असा आणि 'किल्ला' असण्याच्या सर्व अटी पूर्ण करणारा लहानसाच पण अतिशय सुबक, सुंदर आणि टुमदार असा किल्ला म्हणजे 'विचित्रगड', अर्थात रोहिडा. अश्या किल्ल्याला 'विचित्रगड' का म्हणालं गेलं असावं हे अजून तरी मला न सुटलेलं कोडं आहे.
रोहिडा, रायरेश्वर आणि केंजळगड असे ३ किल्ले २ दिवसात असा बेत ठरला. पण काही घरगुती कारणांमुळे मी मात्र फक्त रोहिडाच करण्याच्या उद्देशाने निघालो. कल्याणहून रात्री पुणे आणि पहाटे स्वारगेट गाठलं. ५.३० ला भोर कडे जाणारी पहिली एसटी आहे कळलं. ५.४५ ला ती निघाली आणि ६.५५ ला भोर एसटी स्थानकावर पोहोचली. लगेच ७.१५ ला बाजारवाडी ला जाणारी एसटी मिळाली. बाजारवाडी हे रोहिडा किल्ल्याच्या पायथ्याचं गाव. गावात गेल्यावर एका शिंद्यांच्या घरात चहा पोहे खाल्ले आणि गड चढायला सुरुवात केली.
गडाची उंची तशी काही फार नाही. पायथ्यापासूनच गडाचे दोन टोकांकडचे २ बुरुज आणि बरोब्बर मध्यभागी असलेला पहिला दरवाजा स्पष्ट दिसतो. सुरुवातीपासूनच वाट चांगली मळलेली आहे. वाटेत 'श्री शिवदुर्ग संवर्धन' संस्थेने लावलेले महितीदर्शक लोखंडी फलक दिसत राहतात. चढायला कठीण असं काहीच नाही. आश्चर्य म्हणजे थोडंसं चढून गेल्यावर आम्हाला चक्क एक चांगली जागा बघून टाकलेला लोखंडी बाक दिसला. अगदी आपल्या शहरातल्या बागांमध्ये असतो तसा. असे अनेक बाक नंतर वाटेत दिसत राहिले. तो एक वेगळाच मुद्दा. त्याच्यावर पुढे सविस्तर लिहिलंच आहे. असो.
bench
पायथ्यापासून चढणाची दिशा काही बदलत नाही. त्यामुळे सतत समोर आपल्याला गडाचा मुख्य दरवाजा दिसत राहतो. आपण एका डोंगर सोंडेवरूनच वर चढत राहतो. वाटेत जंगल बिंगल अजिबात नाही. काही मिनिटातच आपण मुख्य दरवाज्याशी येऊन पोहोचतो. इतर गडांप्रमाणेच गोमुखी रचनेचा दरवाजा समोर दिसतो. उजवीकडे उंच भिंत, डावीकडे चढत जाणाऱ्या पायऱ्या, मग डावीकडेच बुरुज आणि मग दरवाजा. दरवाजा तसा लहानसाच आहे. राजगड किंवा रायगडासारखा भव्य दिव्य नाही पण भक्कम मात्र अजूनही आहे. दरवाज्याच्या डावीकडचा बुरुजही तसाच, लहानसा पण भक्कम. या दरवाज्याला नुकताच श्री शिवदुर्ग संवर्धन च्या माध्यमातून लाकडी दिंडी-दरवाजा बसवण्यात आला आहे. एक फलक तसा तिथे लिहिलेला आहे.
rohida
दरवाज्यातून प्रवेश केल्यावर उजवीकडे वळत जाणाऱ्या काही दगडात खोदलेल्या अरुंद १५-२० पायऱ्या चढून आपण दुसऱ्या दरवाज्यासमोर येतो. हा ही असाच एक छोटासा दरवाजा. त्यातून आत गेल्यावर लगेच त्याला लागूनच डावीकडे एक देवडी आणि उजवीकडे एक पिण्याच्या पाण्याचं दगडांत खोदलेलं टाकं दिसतं. त्यावरून उजवीकडे बघितलं की तिसरा दरवाजा दिसतो. आपण त्याच्या दिशेने जायला निघतो, तोच २-३ पायऱ्या चढून झाल्यावर आपल्याला उजवीकडे एक बुरुज दिसतो. म्हणजे आपण त्या बुरुजाच्या वर असतो. छोटासा आणि वर्तुळाकार बुरुज. अजूनही सुदैवाने त्याची पडझड झालेली नाही. आपण उभे असतो तिथे बुरुजाच्या आतल्या बाजूला साधारण फूटभर रुंदीची कड आहे. आणि आत साधारण पाच-साडेपाच फूट खोली आहे. आत उडी मारून उतरायचे पण वर यायला शिडी किंवा पायऱ्या नाहीत. जसं उडी मारून आत उतरलो तसंच उडी मारून वर यायचं. पुन्हा आपण दरवाज्याच्या दिशेने जायला निघतो. हा आकाराने इतर दोन दरवाज्यांपेक्षा मोठा आहे. साधारण ५० पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला या दरवाज्याच्या भिंतींवर दोन्ही बाजूला असलेली हत्ती शिल्पं आणि शिलालेख दिसतात. नवल म्हणजे दोन्ही शिलालेख अत्यंत स्पष्ट आणि हत्तीही सोंडेसाहित आहेत.
hatti1
hatti2
शिलालेखाच्या माहितीचा फलक शिवदुर्ग संवर्धन संस्थेने लावलेला आहे. दरवाजाला लागून उजवीकडच्या बाजूला तटबंदी असावी असं वाटतं. आता ती उरली नाही. दरवाजा दुहेरी आहे. बहुतांश किल्ल्यांवरच्या महादरवाज्यासारखा, आतल्या बाजूला थोडा रुंद आहे. इथून आपण गडाच्या मुख्य आवारात प्रवेशतो.
किल्ल्याचं क्षेत्रफळ फार नाही. त्यामुळे तासा-दीड तासात किल्ल्याचा संपूर्ण परीघ आरामात बघून होतो. किल्ल्याच्या या परिघावर एकूण ६ लहान मोठे बुरुज आहेत. सर्व वर्तुळाकार आणि अजूनही भक्कम. एका बुरुजाला तर आतल्या बाजूने मोठमोठे दगड इतक्या सुबकतेने वर्तुळाकार लावले आहेत की केवळ बघत बसावं.
buruj
बहुतांश किल्ले हे राजगडच्या सुवेळा माचीवरच्या चिलखती बुरुजाची आठवण करून देणारे. दोन बाजूंनी वर चढायला पायऱ्या असणारे. तटबंदी ही काही ठिकाणी अजून शाबूत आहे. आतल्या बाजूला एक भैरवनाथाचं मंदिर आहे. आम्ही गेलो तेव्हा ते कुलपात बंद होतं. थोडं फिरून आल्यावर शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या २ सेवकांनी ते उघडलेलं दिसलं. आत जाऊन दर्शन घेतलं. मंदिर तसं मोठं आहे. आत त्यांचं सामान ठेवलेलं होतं. शिवरायांच्या चरित्रावरची चित्रं ही लावलेली दिसली. एक वरकरणी दगडासारखा दिसणारा विटेएवढ्या आकाराचा शिशाचा गोळा ही ठेवलाय. त्या दोघांनी तिकडे आमचं लक्ष वेधलं. दोन हातांनी सुद्धा सहज उचलला जात नाही तो. ४०-५० किलो वजन सहज असावं. मंदिराच्या समोरच एक छोटासा तलाव आहे. टाकं म्हणावं तर मोठा आणि तलाव म्हणावं तर छोटा. किल्ल्याच्या परिसरात एका ठिकाणी अजून एक टाकं दिसलं. एका ठिकाणी धरणासारखी जोडटाकी दिसली. म्हणजे एक टाकं उंचीवर आणि दुसरं खाली. वरचं भरलं की पाणी वाहून खालच्या टाक्यात येणार असं. शिवदुर्ग संवर्धन च्या माध्यमातून पाण्याच्या सर्व स्रोतांना (दुसऱ्या दरवाज्याजवळचं टाकं सोडून) संरक्षक लोखंडी जाळ्या बसवल्या आहेत. किल्ल्याच्या मधल्या भागात बरंच रान माजलंय. त्यामुळे तिथे अजून काही जुन्या बांधकामाचे अवशेष सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. किल्ल्यावरून दिसणाऱ्या देखाव्याचं वर्णन काय करावं! आम्ही गेलो होतो तेव्हा आमच्यावर निसर्गाची कृपा होती. अजिबात ऊन नाही आणि पाऊस ही नाही. वातावरण अतिशय आल्हाददायक. आकाश निरभ्र. मधूनच काळ्या-पांढऱ्या ढगांची शिवाशिवी. लेखक कवींची अगदी परवली ची उपमा म्हणजे 'हिरवी शाल पांघरलेले डोंगर' ही यांच्यापैकी पहिल्या लेखकाला कशी सुचली असेल ते इथे आल्यावर कळतं. कारण खरंच ते तसंच दिसतं.
killa
वर म्हंटल्याप्रमाणे किल्ल्यावर आणि वाटेवर बऱ्याच ठिकाणी लोखंडी बाक ठेवलेले आहेत. असे एकूण १५ बाक आहेत अशी माहिती वर मंदिरात भेटलेल्या त्या शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या २ लोकांकडून कळली. त्याच्यावर सौजन्य म्हणून 'गोदरेज अँड बॉईज' चं नाव लिहिलं आहे पण ते म्हणे या वरच्या दोघांनी स्वतः च्या खांद्यावर उचलून आणले आहेत. म्हणजे गोदरेज कडून ते पायथ्यापर्यंतच आले होते आणि वर आणण्याची मेहनत यांची, ती सुद्धा फुकटात. (इति: ते दोघं जण)
खाली शिंद्यांच्या घरात डॅनियल नावाचा आपल्या वसई जवळच्या नायगाव चा एक मुलगा भेटला. तो गावातल्याच एका राहुल वाघ नावाच्या मुलासोबत तिथे आला होता. तो 'ग्रासरूट' कंपनी मध्ये कामाला आहे आणि गोदरेज अँड बॉईज च्या सीएसआर ऍक्टिव्हिटी तर्फे गावात काही प्रोजेक्ट चालवतो. गाव फिरवणे, शेतीची कामं दाखवणे ई. काही ऍक्टिव्हिटीज असलेले काही प्रोग्रॅम्स तो पैसे घेऊन करतो. त्याने आम्हाला गडावर जाण्याची फी पाच रुपये म्हणून सांगितली आणि एक कूपन सुद्धा देऊ केलं. पैसे ग्रामपंचायतीकडे जातात असं सांगितलं. आम्हीही फक्त ५ च रुपये आहेत हे बघून पैसे देऊन ही टाकले. वर गडावर गेल्यावर आम्हाला जी माणसं भेटली ती संस्थेतर्फे गडाची डागडुजी आणि साफसफाईचं काम बघतात. त्यांच्याकडून कळलं की आम्ही खाली ज्यांना पैसे दिले त्यांना ते गोळा करायचा काही अधिकार नाही. आम्ही आम्हाला दिलेलं छोटं कूपन तपासून बघितलं तर त्यावर काहीही लिहिलं नव्हतं. कुठलाही रजिस्ट्रेशन नंबर नाही की टोकन नंबर नाही. फक्त माणशी चार्जेस आणि पार्किंग चार्जेस लिहिले होते. गोदरेज अँड बॉईज कडून हे कूपन देण्यात आलं होतं. फक्त ५ रुपये आहेत म्हणून आम्ही तिकडे अजिबातच लक्ष दिलं नव्हतं. शिंद्यांच्या घरच्या चहा-पोह्यांचे पैसेही आम्ही त्या डॅनियल कडेच दिले होते. ते ही शिंद्यांच्या सांगण्यावरूनच. म्हणजे सध्याच्या तरुणाईचा ट्रेकिंगकडे आणि गाव परिसराकडे वाढत जाणार कल ह्या ग्रासरुट आणि गोदरेज अँड बॉईज कंपन्यांनी लक्षात घेऊन अश्या ठिकाणांवर आपलं बस्तान बसवण्याच्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केली असं मला वाटून गेलं. आता गावकऱ्यांना ही कंपनी आपल्या फायद्यातला किती वाटा देईल हा संशोधन करण्याचा विषय आहे.
असो. तर एकंदरीत सांगायचं झालं तर किल्ला कसा असावा याचं एक लहानसं मॉडेल म्हणून या किल्ल्याकडे बोट दाखवता येईल. किल्ला म्हंटलं की ज्या गोष्टी डोळ्यासमोर येतात त्या म्हणजे दरवाजे, बुरुज, तटबंदी, शिलालेख, शिल्प, मंदिर, तलाव, टाकी इ. सर्व गोष्टींनी युक्त असा आणि कमीत कमी वेळेत बघता येणारा आणि किल्लेभ्रमंती चा जास्तीत जास्त आनंद देणारा असा हा छोटासा सुबक आणि टुमदार किल्ला! लहान मुलांसाठी आणि 'नव-ट्रेकर्स' साठी तर अतिउत्तम!!
पण सर्वांनी निदान एकदा तरी पहावा असा!!!

प्रतिक्रिया

हकु's picture

12 Oct 2017 - 8:02 pm | हकु

लेखात दिसत नाहीयेत म्हणून पुन्हा प्रयत्न करतोय
killa

buruj

hatti1

hatti2

bench

killa

दुर्गविहारी's picture

13 Oct 2017 - 11:43 am | दुर्गविहारी

तुम्ही या पुर्वी मि.पा.वर धागे लिहीलेले आहेत तरी या धाग्यातच फोटो अपलोड करताना अडचण आली ते एकदा पहा.
एकुण किल्ल्याची लिहीलेली माहिती खुपच त्रोटक आहे. थोडे संदर्भ घेउन अधिक भर घालता आली असती. रोहिड्याच्या बुरुजांना दामगुडे, पाटणे, शिरवले, फत्ते, सदरेचा, वाघजाई बुरुज अशी नावे आहेत. गडाची उभारणी यादवकालीन आहे. तर तिसरा दरवाजा आदिलशहाने बांधला आहे. त्यावरचे फारसी, मराठी शिलालेखही महत्वाचे आहेत. चोर दरवाजा आणि शेजारचे टेकडीवरचे मंदिरही पहाण्यासारखे आहे.
मुख्य म्हणजे गडाचा मुख्य दर्शनी दरवाजा तुम्ही गोमुखी आहे असे लिहीलेले आहे. हा गोमुखी दरवाजा नाही, तो अगदी खालुनही स्पष्ट दिसतो.
raigad entrance
हा आहे रायगडाचा गोमुखी बांधणीचा दरवाजा
rohida entrance
आणि हा आहे रोहिड्याचा थेट समोरुन दिसणारा दरवाजा.
बाकी तो खाजगी कंपनीचा आलेला ( त्या कंपनीचे नाव धाग्यात थेट लिहीणे कितपत योग्य ? एक तर तुम्ही अपलोड केलेले फोटो दिसत नाहीत, त्यामुळे त्या कुपनाचा फोटो आहे कि नाही हे नक्की माहिती नाही. शिवाय खरेच ती कंपनी यात आहे कि आहे त्यांच्या नावाखाली दुसरे कोणी गैरफायदा घेतय हे पहायला हवे.) वाईट अनुभव मात्र खिन्न करणारा आहे. लोकांच्या भावनेचा हे लोक गैरफायदा घेतात. दुर्गवीर, सह्याद्री प्रतिष्ठाण, शिवाजी ट्रेल, ट्रेकक्षितीझ यासारख्या असंख्य संस्था कोणाकडूनही असे पैसे न उकळता, स्वताची पदरमोड करुन असे उपक्रम राबवत असताना याचा गैरफायदा घेउन अनिष्ट प्रवृत्ती या क्षेत्रात शिरल्यात. मग अनेक वाईट गोष्टि कानावर येतात, मग अंजनवेलच्या गोपाळगडाची परस्पर झालेली विक्री असो, थळजवळच्या उंदेरीची हॉटेल उभारण्यासाठीची विक्री, किंवा अगदी लोहगडच्या डांबरी रस्त्यावर भाजे गावच्या हद्दीत बेकायदा चाललेली टोल वसुली असो. बर सर्वसामान्य पर्यटक बाहेरून आलेला असतो, तो स्थानिकांना विरोध करु शकत नाही. थोडक्या पैशासाठी कशाला वाद घालायचा अशी भावना असते. शिवाय स्थानिक गुंड , पुढार्‍यांचे या गोष्टीना असणारा पाठींबा, आणी प्रशासनाचे दुर्लक्ष किंवा डोळेझाक यामुळे अश्या प्रवॄत्ती वाढू लागल्यात. अवघड आहे.

दर्शन वाघ's picture

14 Oct 2017 - 12:45 am | दर्शन वाघ

शिवदुर्ग संस्थाही कोणाकडून पैसे उकळण्याचे काम करीत नाही. पदरमोड आम्ही आमचीच करतो. सन २००९ पासून संस्था या गडावर कार्य करीत आहे. आणि राहीला प्रश्न रु ५ च्या कुपनचा तर त्यातील पाच पैसेही संस्था घेत नाही वा गडाकरता वाररलेसजात नाहीत.

पूर्ण माहितीविना चुकीचे बोलणे हे शहाणपणाचे लक्षण नाही.

दुर्गविहारी's picture

14 Oct 2017 - 9:55 am | दुर्गविहारी

मला वाटते माझा प्रतिसाद नीट न वाचताच आपण उपप्रतिसाद दिलेला दिसतो आहे. वर धागाकर्त्याची हि वाक्ये वाचा,

खाली शिंद्यांच्या घरात डॅनियल नावाचा आपल्या वसई जवळच्या नायगाव चा एक मुलगा भेटला. तो गावातल्याच एका राहुल वाघ नावाच्या मुलासोबत तिथे आला होता. तो 'ग्रासरूट' कंपनी मध्ये कामाला आहे आणि गोदरेज अँड बॉईज च्या सीएसआर ऍक्टिव्हिटी तर्फे गावात काही प्रोजेक्ट चालवतो. गाव फिरवणे, शेतीची कामं दाखवणे ई. काही ऍक्टिव्हिटीज असलेले काही प्रोग्रॅम्स तो पैसे घेऊन करतो. त्याने आम्हाला गडावर जाण्याची फी पाच रुपये म्हणून सांगितली आणि एक कूपन सुद्धा देऊ केलं. पैसे ग्रामपंचायतीकडे जातात असं सांगितलं. आम्हीही फक्त ५ च रुपये आहेत हे बघून पैसे देऊन ही टाकले. वर गडावर गेल्यावर आम्हाला जी माणसं भेटली ती संस्थेतर्फे गडाची डागडुजी आणि साफसफाईचं काम बघतात. त्यांच्याकडून कळलं की आम्ही खाली ज्यांना पैसे दिले त्यांना ते गोळा करायचा काही अधिकार नाही. आम्ही आम्हाला दिलेलं छोटं कूपन तपासून बघितलं तर त्यावर काहीही लिहिलं नव्हतं. कुठलाही रजिस्ट्रेशन नंबर नाही की टोकन नंबर नाही. फक्त माणशी चार्जेस आणि पार्किंग चार्जेस लिहिले होते. गोदरेज अँड बॉईज कडून हे कूपन देण्यात आलं होतं. फक्त ५ रुपये आहेत म्हणून आम्ही तिकडे अजिबातच लक्ष दिलं नव्हतं. शिंद्यांच्या घरच्या चहा-पोह्यांचे पैसेही आम्ही त्या डॅनियल कडेच दिले होते. ते ही शिंद्यांच्या सांगण्यावरूनच. म्हणजे सध्याच्या तरुणाईचा ट्रेकिंगकडे आणि गाव परिसराकडे वाढत जाणार कल ह्या ग्रासरुट आणि गोदरेज अँड बॉईज कंपन्यांनी लक्षात घेऊन अश्या ठिकाणांवर आपलं बस्तान बसवण्याच्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केली असं मला वाटून गेलं. आता गावकऱ्यांना ही कंपनी आपल्या फायद्यातला किती वाटा देईल हा संशोधन करण्याचा विषय आहे.

आणि यावर मी स्पष्ट मतप्रदर्शन केले आहे कि एक तर पुरेशी खात्री नसताना त्या कंपनीचे नाव धाग्यात लिहीले जाउ नये. एक तर अजुनही फोटो दिसत नाहीत. तेव्हा खरं काय आहे आहे तेच समजायला मार्ग नाही.
दुसरे तुम्ही म्हणता तसे "शिवदुर्ग संस्थेविषयी मी केव्हा टिकात्मक लिहीले. उलट असेच चांगले कार्य करणार्‍या ईतर संस्थाचीही नावे मी दिलेली आहेत, ज्यामुळे दुर्गसंवर्धनाचे कार्य करणार्‍या संस्था म्हणजे पैसे उकळणारे गट असा वाचकांचा गैरसमज होउ नये. असे असताना तुम्ही मलाच

पूर्ण माहितीविना चुकीचे बोलणे हे शहाणपणाचे लक्षण नाही.

हे लिहीता म्हणजे नक्की काय? असो.
यानंतर तरी तुम्ही मला समजून घ्याल अशी आशा.

दर्शन वाघ's picture

14 Oct 2017 - 12:05 pm | दर्शन वाघ

आपण कंपनीच्या नावाबाबतीत जे वक्तव्य केले त्या बाबतीत मला काहीच म्हणायचे नाही.
तरी एकीकडे कंपनीचे नाव न यावे म्हणून आपण आग्रही दिसतात, तसेच काही संस्थांच्या नावांचा उल्लेख करुन, ( जी संस्था या गडावर काम करते त्याबाबतीतल मौनच बाळगले आहे) इतर अनिष्ट प्रवृत्तींचाही उल्लेख केला आहे. यातून वाचकाच्या मनात शिवदुर्ग संस्थेचे मत काय होणार हे एकदा तपासून पहा. अनिष्ट प्रवृत्तींचा अधोरेखीत पण हा गडशी / गडांच्या संदर्भात जोडला आहे (in comparison with other NGOs) याता अर्थ एकदा तपासून पहावा.

तसेच या संदर्तभात मुख्य पोस्ट मध्ये जी माहिती दिली आहे, ती ते माणसे तेथे जावून प्रत्यक्ष पाहून अनुभवून आली आहेत त्यातून लिहिली आहे.

यात मी फक्त वस्तूस्थिती मांडली आहे.

दर्शन वाघ's picture

14 Oct 2017 - 12:38 am | दर्शन वाघ

रोहिडा ह्या गडाची बरीच माहिती आहे. ती अजुनही चांगल्या प्राकारे देता आली असती.

शिवदुर्ग ही संस्था सन २००९ पासून रोहिड्यावर संवर्धन कार्य करीत आहे. मी स्वतः तेथे कार्यात सहभागी आहे. आपण जे कुपन चे म्हणालात आहात त्या मध्या संस्थेचा काहीही संबंध नाही. आम्ही आमचेच पैसे खर्च करुन हे कार्य करीत आहोत. गडावर ऐच्छिक देणगी मिळाली तरी संस्थेची स्वतंत्र पावती दिली जाते. त्यावर संस्थेचे नाव/नंबर तसेच देणगीदाराचे नाव असते.

बोलघेवडा's picture

14 Oct 2017 - 6:50 am | बोलघेवडा

एकदम मस्त वर्णन. फोटो मात्र दिसत नाहीयेत.

"चिलखती बुरुज" म्हणजे नक्की काय प्रकार आहे? त्याची बांधणी नक्की कशी असते?

प्रचेतस's picture

14 Oct 2017 - 10:25 am | प्रचेतस

चिलखती बुरुज म्हणजे बुरुजालाही तटाचं आवरण घातलेलं असतं म्हणजेच बुरुजाच्या बाहेरदेखील एक भिंत बांधून बुरुज बंदिस्त केलेला असतो जेणेकरुन शत्रूच्या मारगिरीत बुरुजाबाहेरची भिंत पडली तरी बुरुज लढता राहावा. ह्या चिलखताच्या (म्हणजे दोन भिंतींच्या मधून) एकावेळी एक ते दोन माणसे जाऊ शकतील इतकीच जागा असते. चिलखतातून मुख्य बुरुजात प्रवेश करायला एक लहानसा दरवाजा असतो. चिलखती बुरुज हे खास शिवकालीन स्थापत्याचे वैशिष्ट्य. राजगडाची संजीवनी माची हे चिलखती माची आणि चिलखती बुरुजांचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ही संपूर्ण माची आणि माचीत जागोजागी असणारे बुरुज चिलखताने बंदिस्त केलेले आहेत. लोहगड, राजमाची आणि उपरोक्त रोहिडा आदी किल्ल्यांवर देखील चिलखती बुरुज आहेत.

लोहगडाचा चिलखती बुरुज

a

a

राजमाचीचा चिलखती बुरुज

a

a

रोहिड्यावर चिलखती बुरुज नाहीत. सात बुरुजांपैकी वाघजाई आणि शिरवले हे मोठ्या आकाराचे बुरुज आहेत. बाकू मध्यम आकाराचे आहेत. पण एकही चिलखती बुरुज नाही.

रोहिड्यावर चिलखती बुरुज नाहीत. सात बुरुजांपैकी वाघजाई आणि शिरवले हे मोठ्या आकाराचे बुरुज आहेत. बाकू मध्यम आकाराचे आहेत. पण एकही चिलखती बुरुज नाही.

बोलघेवडा's picture

14 Oct 2017 - 2:49 pm | बोलघेवडा

प्रचेतस साहेब आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. फोटोतून नक्कीच काय प्रकार आहे ते स्पष्ट होत आहे. ते बांधणाऱ्या निर्मात्यांना दंडवत आहे.