एका रात्रीचा थरार

Primary tabs

लाल गेंडा's picture
लाल गेंडा in जनातलं, मनातलं
11 Oct 2017 - 8:30 am

दिनेशने वडापावचा मोठ्ठा घास घेतला आणि समोर बसलेल्या दीनुकाकांकडे पाहिलं. साठीत पण म्हातारा चुणचुणीत होता. डोळ्यातलं तेज जरासं उतरल्यासारखं वाटत होतं पण खरं किती होत तेच जाणे. दिनेशला इथे येऊन दहाच दिवस झाले होते. या दहा दिवसांत दिनूकाकांनी त्याला नोकरीच्या सगळ्या खाचाखोचा समजवून दिल्या होत्या. त्यांचं अख्ख आयुष्य चौकीदारीत गेलं होतं. कोकण सुरू होतो घाटांनंतर तिथलं पहिलं गाव हे. एका बाजूला घनदाट जंगल, डोंगर, त्याच्या दर्या-खोऱ्या आणि दुसऱ्या बाजूला त्यातून वाहणारी ती छानशी सुबक पण छोटीशी नदी. दिनेशला पहिल्या फटक्यातच सगळं आवडलं होत. तीस वर्षांच्या त्याच्या आयुष्यातली त्याची ही दुसरीच नोकरी होती. म्हणजे तशी चौथी का पाचवी, पण आधीच्या धरण्यासारख्या नव्हत्या. दिनेश उठला आणि त्याने मोठा कपभरून कॉफी घेतली. जास्त जेवून पण चालणार नव्हते कारण हे सगळं संपल्यावर तासाभरातच त्याला ड्युटीवर यायचं होत. आजपासून काही दीनुकाका नव्हते सोबतीला. पण मागचे दहा दिवस फार मजेत गेले होते. त्याला वाटलं नव्हतं की चौकीदारीत पण इतकी मजा येऊ शकते हे. दीनुकाकांच्या पोतडीमध्ये इतक्या कथा होत्या ना की त्याला वाटलं अजून थोडे दिवस त्यांनी रहावं त्याच्या बरोबर. पण मालकाला तीन चौकीदार परवडणारे नव्हते. मालकांनी कम्पनी चालू केली त्यादिवसापासून दीनुकाका चौकीदार म्हणून होते, ते आजतागायत. सध्या त्यांना फार भुतं दिसू लागली होती असे म्हणतात, त्यामुळे मालकांनी त्याला निरोप द्यायचं ठरवलं होतं. "आणि त्यामुळेच मला इकडे यायला मिळालं", दिनेशने विचार केला. "असो", दिनेश उठला त्याने कप धुवायला टाकला आणि दीनुकाका कडे जायला निघाला. त्यांच्या भोवतीच कोंढाळ आता गायब झाल होत आणि ते एकटेच बसले होते.
"काका, येतो " दिनेशने त्यांना वाकून नमस्कार केला. " आयुष्यमान भव" काकांनी नेहमीसारखा त्याला तोंडभरून आशीर्वाद दिला. "येतो मी काका, थोड्यावेळाने यायचंय ड्युटीवर मला, तुम्ही सुटलात आता मी अडकलो" दिनेशने उगीचच जोक मारायचा प्रयत्न केला. काकांच्या ओठांवर उगीचच एक हास्याची लकेर उमटून गेली. ते वाकले आणि त्यांच्या पायापाशी असलेली त्यांची चौकीदारीची पिशवी त्यांनी दिनेशला दिली. त्याला खाली वाकायला सांगितलं आणि त्याच्या कानात ते पुटपुटले. दिनेशनी मान हलवली, त्यांना परत नमस्कार केला. आता मात्र काका तोंडभरून हसले. त्यांचा तो एकमेव सोन्याचा दात चमकला 'टिंग'.

रात्रीचा सव्वा वाजला होता. आज दिनेशला दीनुकाकांची फार आठवण येत होती. दहा दिवसांत त्यांची एवढी सवय लागली होती ना दिनेशला. रात्र काम करता करता कशी जायची कळायचंच नाही. दीनुकाकांच्या पोतडीतल्या गोष्टी त्याला आठवायला लागल्या. "मोरशी", "आडवाटेवरचा वेतोबा", "पाठलाग करणार भूत" वगैरे वगैरे. त्याला ते आठवून उगाच हसू आलं. दिनेशने परत एक नजर चारही बाजूस फिरवली. कंपनी जंगलाच्या कडेवर होती. गेट ओलांडून दहा फूट गेलं की रस्त्याच्या पलीकडे जंगल सुरू. ते पण उंच उंच झाडांनी चालू होणार. उंच झाडांच्या वर आज मृगाचा त्रिकोण दिसत होता, आकाश निरभ्र होत. त्यांने नजर मृगावरून हळू हळू वर सरकवली. सिंह, कन्या, स्वर्गाचे दार, लघु लुब्धक आणि पुढे नाव लक्षात न राहणारे तारे आणि परत झाडांची घनदाट वस्ती. दिनेशला फारच हे आवडलं होत. दिनेशनी परत नजर जमिनीवर आणली.
"काहीतरी गडबड आहे" त्याचा मनात शंकेची पाल चुकचुकली.

दिनेश त्याच्या खुर्चीवर स्थिर झाला. त्याने काकांनी दिलेल्या पिशवीतून मोठी टॉर्च बाहेर काढली. पण त्याला नक्की कळेना की काय वेगळं आहे हे. क्षणभराने त्याला लक्षात आलं की जंगलाचे आवाज शांत झालेत. त्याच्या आजूबाजूला निरव शांतता पसरली. हाताने त्याने काठी चाचपली समोरची नजर न हटू देता. त्याच्या डाव्याबाजूला नजरेच्या थोडस बाहेर काहीतरी हलल. दिनेशनी टॉर्च लावली नि तिचा प्रखर प्रकाश त्यादिशेने मारला. प्रकाश बरोबर तिथे पडला जिथे झुडूप थोडस हलत होत. दिनेशने टॉर्च वर खाली इकडे तिकडे फिरवली आणि परत त्याच ठिकाणी रोखली. आता झुडूप हलायच थांबलं होत. मिनिटंभर तो तिथे रोखून पहात राहिला आणि मग त्याने टॉर्च आकाशाच्या दिशेने वळवला. जरा नजर अंधाराला सावरू दे हा विचार पूर्ण व्हायच्या आधीच उजव्याबाजूला नजरेच्या टप्प्याबाहेर काहीतरी हलल्याच त्याला जाणवलं. त्यांनी झरकन टॉर्च त्या बाजूला रोखली. तिथेपण त्याला लगेच काही जाणवलं नाही. दिनेशनी टॉर्च जरा वर खाली हलवली तेव्हा नजरेच्या टप्प्याबाहेर त्याला एक आकृती जाणवली. त्याने परत टॉर्च तिच्या दिशेने मारली पण तिथे काहीच नाही दिसलं. मग त्याने टॉर्च त्या दिशेपासून डाव्याबाजूला स्थिर केली. जरा डोळे सरावल्यावर त्याला त्या आकृतीची बाह्यरेषा सुध्दा जाणवायला लागली. दोन मिनिटं गेली असतील, दिनेशला वाटायला लागलं होतं की आपल्या नजरेचा खेळ तर चालू नाही झाला ना? तेवढ्यात ती आकृती हलली आणि झुडुपांच्या बाहेर आली. त्या आकृतीचा आकार आता स्पष्ट होत होता. हळू हळू ती पूर्णपणे रस्त्यावर आली. दिनेशने पटकन टॉर्चचा झोत त्या आकृतीवर मारला. आता त्या बाह्यरेषेची जागा टोपी घातलेल्या , सूट बूट घातलेल्या माणसानी घेतली होती. एकूणच त्या माणसावर प्रकाश हलत होता. मिनीटभरानन्तर ती आकृती, तो माणूस हलला. त्याने रस्त्यावर दिनेशच्या दिशेने यायला सुरुवात केली. टॉक टॉक, टॉक टॉक असे बुटाचे आणि त्याच्या हातातल्या काठीचे आवाज जवळ येऊ लागले.

दिनेशपासून ती आकृती दहा बारा फुटावर थांबली. त्या आकृती बद्दल, त्या माणसाबद्दल दिनेशच्या मनात फार चांगली भावना उत्पन्न होत नव्हती. आता काहीतरी वेगळंच दिसणार अस त्याला सतत वाटत होतं. त्या माणसाचा त्याला अजून चेहरा दिसला नव्हता. पण तो चेहरा जेव्हा दिसेल तेव्हा तो काही नैसर्गिक नसेल असच त्याला सतत वाटत होतं. त्या थांबलेल्या माणसावर अजून पण प्रकाश हलत होता. दिनेशला कळेना की अस का होतय, तेवढ्यात त्याच्या कपाळावरून एक घामाचा थेंब त्याच्या भुवई वर आला. मग त्याला जाणवलं की घामाने त्याची पाठ थबथबली आहे नि हातातला टॉर्च हलतो आहे. तो माणूस थोडासा हलला आणि त्याने मान वर केली.

दिनेशला स्वताची शंका खरी ठरल्याच बिलकुल समाधान नाही लाभलं. त्या माणसाच्या चेहर्यावर एक गॅस मास्क होता, पहिल्या महायुद्धात घालायचे तसा. डोळ्यांच्या जागी दोन मोठ्ठे गोल होते आणि नाक आणि तोंडावर मास्कचा पुढे आलेला भाग होता. डोक्यावरच्या टोपीवर आणि त्या गॅस मास्कवर टॉर्चचा प्रकाश हलत होता. एवढ्यात त्याच्या डाव्याबाजूने अस्फुट किंकाळी ऐकू आली आणि दिनेशने टॉर्च गर्रकन त्यादिशेला फिरवली. जरा इकडे तिकडे टॉर्च फिरवल्यावर झाडावर लटकलेल्या एका पांढऱ्या गोष्टीवर ती स्थिर केली दिनेशने. पुढच्या क्षणाला ती पांढरी गोष्ट जंगलाच्या दिशेने आत खेचली गेली आणि अदृश्य झाली. जणू प्रकाश पडलेला कळलं तिला. दिनेशने टॉर्च त्या माणसाच्या दिशेने फिरवली या आशेने की तो पण गायब झाला असेल, पण तो अजून तिथेच उभा होता. फक्त आता त्याचा हात त्याच्या कोटाच्या खिशात होता. त्याने हात काढला आणि दिनेशच्या दिशेने काहीतरी फेकलं.
जग हलल आणि दिनेशनी चौकीचं छत पाहिलं.

क्रमश:

लेखकथा

प्रतिक्रिया

एस's picture

11 Oct 2017 - 11:27 am | एस

पुभाप्र.

देशपांडेमामा's picture

11 Oct 2017 - 12:40 pm | देशपांडेमामा

पुढले भाग पटापट टाका. पुभाप्र

देश

पैलवान's picture

12 Oct 2017 - 7:49 am | पैलवान

आपण नाही घाबरत कुणाला,
चाकू, सूरी, बंदूक, तोफ... मास्क लावलेला माणूस.
आपण नाही घाबरत.

ता.क. पुढचे भाग दिवसा उजेडी काही तरी घडेल असे टाका.

लै शाना's picture

12 Oct 2017 - 7:14 pm | लै शाना

पुढचे भाग कधी टाकताय.