जुळ्यांचं दुखणं!

Primary tabs

लई भारी's picture
लई भारी in जनातलं, मनातलं
10 Oct 2017 - 5:05 pm

'जुळ्यांचं दुखणं' हा शब्दप्रयोग आधी खूप वेळा ऐकला होता पण त्याचा अर्थ समजू लागला ते आमच्या जुळ्या मुलींच्या जन्मानंतर.
त्या अनुषंगाने मला लक्षात आलं की जुळ्या मुलांच्या बाबतीत आपल्याकडे बहुतांश लोकांना काही कल्पना नाही आहे, त्यामुळे आम्हाला आलेले अनुभव तुम्हा समोर मांडण्याचा प्रयत्न.

माझ्या मते, आजकाल जुळ्यांचं प्रमाण वाढलं आहे ते वंध्यत्व(infertility) साठी घेतल्या जाणाऱ्या थोड्या आक्रमक(!) उपचार पद्धतीमुळे. बऱ्याच डॉक्टर लोकांशी झालेल्या बोलण्यातून असं समजलं की हे उपचार चालू असतील तर २-३ गर्भ राहणं खूप कॉमन आहे. आमच्या बाबतीत तेच झालं असावं. मला असं वाटत की आम्ही सुरुवातीला काही कारणांमुळे स्त्री-रोगतज्ञाकडे गेलो आणि विनाकारण पुढचे उपचार घेतले. कदाचित थोडी वाट बघून थोडे इतर उपचार घेता आले असते. असो!

गरोदरपण
तर, आम्हाला तिसऱ्या महिन्याच्या आसपास सोनोग्राफी नंतर सांगितलं की जुळी गर्भ-धारणा आहे. त्यामुळे मग आमच्या दुसऱ्या डॉक्टर मित्राने सल्ला दिला की शक्यतो पूर्ण विश्रांती घ्या. नंतर मग खूप उत्साह, उत्कंठा, हुरहूर इ. सुरु झालं.
जुळ्या गरोदरपणाच्या काळात स्त्रियांना खूप सांभाळावं लागत, गर्भाशयाचा आकार साधारण एका पूर्ण वाढीच्या गर्भासाठीच पुरेसा असल्याने दोन्ही गर्भाचं मिळून वजन ३ किलोच्या वरती झालं की तिथून पुढे खरा कस लागतो. त्यामुळे सातव्या महिन्यापासून प्रसव-कळा सुरु होण्याची खूप शक्यता असते; आणि मग कमी दिवसाचे बाळ जन्माला आले तर साहजिकच अजून जास्त धोका! (हि माहिती मला एका डॉक्टरने सांगितली, चुभुद्याघ्या!)
नियमित तपासणीमध्ये प्रसव-कळा रोखण्यासाठी गोळ्या सुरु केल्या होत्या, तरीपण सातव्या महिन्यात ८ दिवस ऍडमिट करून घेतलं होत, कळा थांबवण्यासाठी. तेही पूर्ण वेळ डोके थोड्या खालच्या पातळीत ठेवून झोपलेल्या अवस्थेत.
ह्या दरम्यान पोट खूप वाढत त्यामुळे अगदी उठबस करणंसुद्धा जिकिरीचं झालं होत. शेवटी शेवटी तर रक्तदाब खूप वाढत होता, आणि मग ३७ आठवड्यानंतर रक्तदाबामुळेच तातडीची सिझेरियन डिलिव्हरी करण्यात आली आणि आमच्या दोन गोंडस पऱ्यांचा जन्म झाला :) सुदैवाने त्यांना नवजात अतिदक्षता विभागात ठेवावं लागलं नाही ही खूप मोठी गोष्ट आहे.
पण बायकोला प्रचंड रक्तस्त्राव झाला आणि त्याची गुंतागुंत पुढचे २ महिने राहिली. (ह्याबाबतीत त्या डॉक्टरांनी अक्षम्य निष्काळजीपणा केला होता असं आमचं मत आहे; अक्षरशः जीवावर बेतलं होत, जे दुसऱ्या डॉक्टरनी निस्तरलं. प्रथितयश, गोल्ड-मेडलिस्ट डॉक्टर कडून आम्हाला हि अपेक्षा नव्हती. त्या डॉक्टर/दवाखान्या विषयी तर मोठ्ठा लेख लिहिता येईल, पण ते नंतर बघू.)
बादवे, आमच्या पाहण्यात असं पण एक उदाहरण आहे की त्यांना पूर्ण दिवस भरून नैसर्गिक प्रसूती झाली, कमीत-कमी त्रासात. पण बहुधा असे अपवादच असावेत. प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेवर पण अवलंबून असेल.

पहिले दिवस
मुलींच्या जन्मापर्यंत बायको दररोज म्हणायची की सांभाळणं कठीण होतंय, कधी एकदा डिलिव्हरी होतेय आणि सुटका होतेय. पण खरी कसरत तर जन्मा-नंतर सुरु झाली आणि वाटलं पोटात होत्या तोवर बरं होत :)
जुळी मुलं असतील तर मनुष्यबळ खूप लागत. एका मुलाला सांभाळताना लागणारे कष्ट हे फक्त दुप्पट नाही होत तर ते exponentially वाढतात :)
जर आईच दूध पुरत नसेल तर शक्यतो फॉर्मुला वालं दूध द्यायला लावतात, आणि त्यासाठी बाटल्या, गरम-पाणी यांची सोय करताना नाकी नऊ येतात.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे झोप - दोन बाळांना एकत्र झोपवायचं म्हटलं की कोणाचीच झोप होत नाही. त्यामुळे वेगळ्या ठिकाणी झोपवणे आलं, म्हणजे एका बाळाला आईपासून वेगळं करणं आलं. आम्हाला तरी त्याचा बॅलेन्स साधणं जमल नाही याची टोचणी नेहमी लागतेय.
पहिले ४-५ महिने आई आणि घरातील इतर मंडळींना जेमतेम २-३ तास झोप मिळाली तरी पुष्कळ म्हणायचं :) ह्या सगळ्याचा प्रचंड ताण येऊ शकतो आणि त्यावेळी त्यांना सांभाळून घेणं खूप गरजेचं आहे.

वाढणे - एक आनंददायी क्रिया
जुळ्या मुलींना एकत्र वाढताना बघणं हा एक वेगळा अनुभव आहे. सुरुवातीला त्रास होतो खूप, पण नंतर त्यांची इतकी सवय होते की एकटी झोपली असेल तर आम्हाला करमत नाही. दोन इतके भिन्न स्वभाव(दोघी non-identical आहेत), त्यांच्यात सुरुवातील काहीच नसणारे बंध, नंतर मग काहीतरी आपल्यासारखच दिसतंय याची जाणीव, मग बरीचशी भांडण आणि कधी-मधी समजूतदारपणे खेळणं! एकाच गोष्टीसाठी केला जाणारा हट्ट(आता ह्यात आई-बाबा पण आले :) ) - कदाचित लहान मोठ्या भावंडात मोट्ठ्याला समजावता येत असेल किंवा लहान भावंडं माघार घेत असेल, पण दोन्ही सारख्या वयाची असल्यामुळे बरीच तारांबळ उडते!

अजून एक मोठी गोष्ट म्हणजे, आर्थिक बाजू. बहुतेक प्रत्येक गोष्ट 'दोन' वेळा घ्यावी लागते. एकाचं दुसऱ्याला वापरता नाही येत. एकंदरीतच गरोदरपण आणि आमच्या अनुभव नुसार किमान पहिले काही वर्षे, आर्थिक बाजू थोडी भक्कम असावी लागते. मला तर '२-३ आठवडे' अति-दक्षता विभागात ठेवण्याची आर्थिक तरतूद/विमा याचा सल्ला दिला गेला होता, सुदैवाने तेवढी गरज नाही पडली. पण आजकालच्या शहरी, धकाधकीच्या जीवनात आधीच्या काळात ज्या गोष्टी सहज होऊन जायच्या त्या सगळ्यासाठी आता सपोर्ट लागतो. (म्हणजे दवाखाना, कामवाली बाई इ.च्या अनुषंगाने होणारे खर्च ह्या संदर्भात म्हणतोय मी). इथून पुढे पण शाळेसाठी वगैरे एकदम खर्चाची तरतूद करावी लागेल.

बऱ्याच वेळेला आम्ही त्रासून म्हणतो की एकचं बाळ असत तर बरं झालं असत, पण तो तात्पुरता त्रागा असतो.
आम्हाला जन्मा-नंतर काही लोकांनी विचारलं की तुम्ही जुळी गर्भ-धारणा आहे म्हटल्यावर लगेच एक गर्भ कमी का नाही केला??? बरेच डॉक्टर पेशंट ना असं सांगत असावेत.
पण मी सांगेन की आम्हाला जरी तसा पर्याय असतो हे माहित असत तरी आम्ही तो निर्णय कधीच घेतला नसता. कुठल्याच दृष्टीने मला ते पटत नाही. पण काही लोकांकडे त्यासाठी सबळ कारण असू शकत. असो!

एकंदरीत हा खूप आनंददायी अनुभव आहे. आता कुठे दीड वर्षाच्या झाल्यात, अजून बराच पल्ला गाठायचा आहे! पण हा कालावधी खूप छान आहे. हे दिवस परत अनुभवता येणार नाहीत. एक गंमत म्हणजे जुळी मुलं असली की कुठे जाल तिथे प्रचंड attention मिळत. मोठ्या झाल्या की ह्या पण आनंदाला मुकू! ;-)


(हे लिहावं की नाही असा विचार बरेच दिवस चालू होता, कारण बऱ्याचशा गोष्टी खाजगी आहेत आणि लोकांना कितपत रुचेल/उपयोगी पडेल माहित नव्हतं.
तरीपण काही गोष्टी इतरांना माहित असलेल्या बरं असं वाटल्यानं शेअर करतोय. यामधल्या वैद्यकीय बाबींमध्ये काही त्रुटी असल्या तर जाणकारांनी दुरुस्त कराव्यात आणि इतर काही सूचना असल्यास त्यांचही स्वागत. कृपया वैयक्तिक टिपण्णी टाळा.)

प्रकटनआरोग्यमांडणीजीवनमान

प्रतिक्रिया

हेमंत८२'s picture

10 Oct 2017 - 5:47 pm | हेमंत८२

खूप मस्त मला पण जुळी आहेत त्यामुळे या सर्वातून गेलो आहे.. खुपदा तर दोघांना एकच प्रकारचे ड्रेस आवडत ते घेताना तर खूप त्रास येतो.
आर्थिक बाजू काय ते तर चालायचे साहेब. जरा अड्जस्ट करायचे.
पण आजकाल डॉक लोक खूपच त्रास देतात.. प्रत्येक गोष्टीत काय त्रास होउ शकतो हे पहिल्यांदा सांगतात. ते ऐकूनच असे वाटते कि आपल्याला हा त्रास झाल्याचं आणि या वर आपण उपचार करायला हवे. खूप चांगले डॉक कमी भेटतात

सिरुसेरि's picture

10 Oct 2017 - 6:38 pm | सिरुसेरि

छान अनुभव . शुभेच्छा . पुभाप्र .

माझ्या जुळ्या मुली सध्या १ वर्ष ८ महिन्याच्या आहेत. त्यांना सोबत वाढताना बघणे खरंच खूप आनंददायी अनुभव आहे.

मज्जा! सानिकास्वप्नीलची आठवण आली.
आमच्या समोर राहणार्‍यांना एका मुलानंतर सहा वर्षांनी जुळ्या मुली झाल्यात.
तीन वर्षांच्या होतील लवकरच! नुसती पळापळ चालू असते.
त्यांचे वडील पूर्वी दररोज जिमला जायचे, आई रोज अगदी टापटीप, नवे नवे कपडे घालून रहायची पण आता आला दिवस नीट पार पडला की झाले.
तरी पूर्वीपासून सांभाळायला एक बाई आहे. ती कायमची त्यांच्याकडे राहतिये.
मुलींचे स्वभाव अगदी भिन्न आहेत. एक अगदी शांत तर दुसरी म्हणजे व्रात्य!
फक्त बघणार्‍या आमच्यासारख्यांना एरवी मजा वाटते हे नक्की!

सुबोध खरे's picture

10 Oct 2017 - 11:22 pm | सुबोध खरे

काही गोष्टी लक्षात घ्या.
एक तर जुळी मुलं होणं हे अनैसर्गिक नाही. रामायण काळापासून जुळी मुलं होत आली आहेत. लव आणि कुश हे जुळे होते. साधारणपणे हे प्रमाण 250 मध्ये 1 असे आहे. वंध्यत्वावर उपचार करतो त्यात स्त्रीबीज निर्मिती जास्त व्हावी म्हणून औषधे दिली जातात त्यामुळे हे प्रमाण 5 पटीने वाढते म्हणजेच 50 मध्ये 1 असे प्रमाण येते.
आजकाल एक किंवा दोनच मुले असतात त्यातून लग्न उशिरा आणि मग मूळ होऊ देण्यास घेतलेला काळ यामुळे तिशीनंतर प्रसूतीची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यातून धारावाहिक मालिका मधून दिले जाणारे विकृत ज्ञान यामुळे मुलींचे आणि आईबापांच्या गैरसमजात वाढच झालेली दिसते. यावर विविध तर्हेच्या उत्पादनाच्या जाहिरातींचा भडिमार यामुळे साधी सुलभ प्रसूती आजकाल फार कठीण झाली आहे. त्यातून जर काही झालं की डॉक्टरांना दोष देणं इतकं वाढलं आहे की कोणताही खाजगी डॉक्टर जरासुद्धा धोका पत्करायला तयार होत नाही. यामुळे प्रसूती आणि बालसंगोपन हे बोटॅनिकल गार्डन मध्ये काटेकोर आकार दिलेल्या झाडासारखे मुद्दाम आकार दिलेले झाले आहेत. आजकाल झाडं आणि मुलं नैसर्गिक रित्या वाढतात का अशी शंका यावी अशी स्थिती आहे.
क्रमशः

लई भारी's picture

11 Oct 2017 - 8:14 am | लई भारी

डॉ. साहेब, आपल्या प्रतिसाद बद्दल धन्यवाद. आपण मांडलेल्या मुद्द्यांशी असहमत होण्याचा प्रश्नच नाही.

आणि विनाकारण पुढचे उपचार घेतले. कदाचित थोडी वाट बघून थोडे इतर उपचार घेता आले असते.

बहुधा ह्या वाक्यामुळे मी डॉक्टरांना जबाबदार धरतोय असं वाटतंय वाचताना म्हणून थोडं स्पष्टीकरण. मला असं म्हणायचं होत, की ह्या उपचारांमुळे आम्ही २५० मधून ५० मध्ये पोचलो. नाराजी आहे ती जुळ्या मुली झाल्या म्हणून नाही, तर त्या उपचारांदरम्यान आणि नंतर झालेल्या त्रासामुळे. इतर काही डॉक्टरनी आम्हाला एकंदरीत परिस्थिती बघून(वय, इतर वैद्यकीय बाबी) सांगितलं होत की तुम्ही अजून १-२ वर्ष वाट बघायला हरकत नाही, थोडे passive उपचार घेऊन, जसे की आहार/वजन सांभाळणे, ताण-तणाव टाळणे इ.
अर्थात ह्या सर्व गोष्टीत मत-मतांतर असू शकतात आणि मला निश्चितच दोषारोप करायचे नाहीत. स्त्री-रोगतज्ज्ञांनी योग्य विचार केला असेल की नंतर गुंतागुंत होऊन पस्तावण्यापेक्षा आताच उपचार करू किंवा आम्ही थांबलो असतो तर कदाचित नैसर्गिक गर्भ-धारणा झाली असती, पण अर्थातच याबाबतीत डॉक्टरांच्या सल्ल्याला महत्व आहे आणि त्याबद्दल दुमत नाही.

बालसंगोपन हे बोटॅनिकल गार्डन मध्ये काटेकोर आकार दिलेल्या झाडासारखे मुद्दाम आकार दिलेले झाले आहेत.

_/\_ नेमकं मांडलंय तुम्ही!

डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर आहेच, पण काही कटू अनुभवांमुळे त्या डॉक्टरांविषयी नाराजी आहे. काही गोष्टी मी व्य.नि. करेन, उगाच त्या डॉक्टरविषयी व्यक्तिगत चिखलफेक वाटायची.

सुबोध खरे's picture

11 Oct 2017 - 6:12 pm | सुबोध खरे

लई भारी साहेब
माझा प्रतिसाद आपल्या वैयक्तिक बाबतीत नव्हता तर एकंदर लोकांना होता कि जुळे होणे यात अनैसर्गिक काहीच नाही. कृपया गैरसमज नसावा --/\--
बाकी आपल्याला एखाद्या वैद्यक व्यवसायिकाबद्दल वाईट अनुभव आला त्याबद्दल मला काहीच माहित नाही म्हणून मी काहीच लिहू शकत नाही. तो एक वेगळा विषय आहे.

सुबोध खरे's picture

11 Oct 2017 - 6:25 pm | सुबोध खरे

पुढे चालू--
वंध्यत्वावर उपचार घेणे यामध्ये किती वेळ थांबायचे हा प्रश्न आपण बसची वाट पाहत स्थानकावर किती वेळ थांबायचे याइतकाच कठीण आहे. कारण आपण पाच दहा मिनिटे थांबून टॅक्सी केली आणि तिच्या मागूनच रिकामी बस अली अडचण आणि आपण थांबून तासभर बस आली नाही तर खोळंबा अशी स्थिती असते.
पंचविशीच्या स्त्रीला जितका वेळ असू शकतो तितका पस्तिशीच्या स्त्रीला असेल असे नाही आणि पंचेचाळीशी जवळ आलेल्या स्त्रीला तर नाहीच नाही.
अर्थात घरची परिस्थिती हा एक फार मोठा फरक असतो. १९ वर्षाची मुलगी सुद्धा वंध्यत्व उपचारासाठी येऊन घाई करत असते कारण लग्नाला वर्ष झालं तरी पाळणा हलत नाही म्हणून सासू सुनेवर संशय घेत असलेली सहज दिसते. तेच १०वर्षे लग्नाला झाली असतानाही समंजस नवरा धीर धरून असतो.
प्रत्येक माणसाची धीर धरण्याची / कळ काढण्याची क्षमता किती आहे हे ठरवणे डॉक्टरांना शक्य नसते. एखाद्या रुग्णाला सर्व व्यवस्थित असताना मी थोडा काळ थांबा सांगितले आणि त्या कालावधीत बायको गरोदर राहिली तर रुग्ण कृतज्ञ असतात. पण तेच ती एक वर्षात गर्भवती नाही राहिली तर आमचे एक वर्ष फुकट गेले अशा नजरेने पाहतात(क्वचित बोलूनहि दाखवतात). मी स्त्रीरोग तज्ञ/ वंध्यत्व तज्ञ नाही आणि मला त्यात कोणताही आर्थिक फायदा नाही तरीही हि स्थिती आहे त्यामुळे स्त्रीरोग तज्ञ लगेच उपचार सुरु करा असेच सांगतात याचे कारण (अर्थ कारण सोडले तरी) थांबून फायदा झाला नाही तर हा रुग्ण दुसऱ्या स्त्रीरोग तज्ज्ञाकडे फार पटकन जातो. यात विषयात व्यवसाय करणाऱ्या सर्वच डॉक्टरांना असे अनुभव येतात.
यात कोणीच चूक नाही किंवा कोणीच बरोबर नाही. प्रत्येकाने आपल्या कळ काढण्याच्या क्षमतेप्रमाणे निर्णय घ्यायचा असतो.

सर्वात आधी, तुम्हां उभयतांचे दोन जुळ्या मुलींचे आईबाबा झाल्याबद्दल अभिनंदन! या विषयावर डॉ. खरे आणि इतर वैद्यकीय तज्ज्ञांच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादांतून बरीच भर पडेल याची खात्री आहे.

पिलीयन रायडर's picture

11 Oct 2017 - 12:36 am | पिलीयन रायडर

मस्तच हो! एक लेकरू सांभाळताना धावपळ होतेय.. दोन दोन कसे काय मॅनेज करता?! पण चांगलंय, एकाला दुसरं असेल कायम त्यांना.

सौन्दर्य's picture

11 Oct 2017 - 4:23 am | सौन्दर्य

तुमचे अनुभव आवडले आणि पटले देखील. अभिनंदन.

मला दोन जुळ्या बहिणी आहेत, आहेत म्हणजे होत्या, कारण त्यातली एक आता नाही. अर्थात दोघींची लग्ने झाली त्यांना मुलं झाली आणि मग त्यातील एक वारली. त्या दोघींचे स्वभाव एकदम विरुध्द होते, दिसायला पण त्या दोघी जराही एकसारख्या नव्हत्या. पण त्यांचे लहानपणीचे एकाच टाईपचे फ्रॉक घालून, वेण्या बांधून काढलेले फोटो बघताना अजूनही मजा वाटते. लहान असताना कोणी विचारल्यावर 'मला दोन जुळ्या बहिणी आहेत' हे सांगताना आनंद व्हायचा कारण, विचारणारा न चुकता कौतुकाने , "हो का ? छान, छान" म्हणायचा, त्यांची नावे विचारायचा. आमच्या आसपास जुळ्या बहिणींच्या जोड्या राहायच्या. त्या 'आयडेंटीकल ट्विन्स' होत्या. त्या मोठ्या झाल्यातरी त्यातली 'सोनल' कोण व 'शीतल' कोण किंवा 'अंजू' कोणती व 'मंजू' कोणती हे ओळखता यायचे नाही.

सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद!
आमच्यासारखे अजून बरेच लोक इथे भेटल्यामुळे आनंद झाला :)
@सिरुसेरि: प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.
@हेमंत८२, , @सागर द. : चला, आपला कट्टा करूयात आता :)
@एस: धन्यवाद! मला अगदी हीच चर्चा अपेक्षित होती, जेणेकरून तज्ञांकडून अजून माहिती मिळेल.
@पिरा तै: हो धावपळ तर विचारू नका, पण परवाच मी बायकोला हे म्हटलं की दोघी आहेत सोबतीला ते किती बरं आहे; कारण बऱ्याच जवळच्या लोकांच्या बाबतीत बघतोय की वेगवेगळ्या कारणांमुळे दुसऱ्या अपत्याचा विचार होतच नाही!
@सौन्दर्य: हो जुळ्या मुलांचे जाम कौतुक असते सगळ्यांना. आमच्या मुली अगदी वेगळ्या दिसतात, पण नवीन माणसे ते मानायलाच तयार होत नाहीत :) कदाचित अजून लहान असल्यामुळे असेल, पण त्यांचं म्हणणं असत "एक-सारख्या तर आहेत! कुठे फरक आहे?" :)

पप्पुपेजर's picture

11 Oct 2017 - 1:52 pm | पप्पुपेजर

welcome to the club i have twins and its one boy and one girl 14 months old. we have faced whatever you have mentioned here we are enjoying the days now ,Delhi abhi dur hai lets see..

सुबोध खरे's picture

11 Oct 2017 - 6:43 pm | सुबोध खरे

काही गैरसमज--
गर्भाशयाचा आकार साधारण एका पूर्ण वाढीच्या गर्भासाठीच पुरेसा असल्याने
गर्भाशयाचा आकार तिळ्या चौळ्या मुलांना सुद्धा पुरु शकतो तेंव्हा जुळ्या मुलांसाठी गर्भाशयाचा आकार कमी पडतो हे बरोबर नाही. गर्भाशयवाढण्यासाठी निसर्गाने सोयकेलेली आहे ज्यामध्ये छातीचा पिंजरा आणि कमरेचे हाड यामध्ये पोटाचा आकार वाढण्यासाठी कोणतेही हाड नसते आणि गर्भाशयाचा रक्त पुरवठा पण व्यवस्थित वाढू शकतो.
जर आईच दूध पुरत नसेल-- हा एक गेल्या दोन पिढ्यात बालाहार तयार करणाऱ्या कंपन्यांनी जाणून बुजून पसरवलेला गैरसमज आहे. आपल्या मुलाला दूध पुरत नाही हि शन्का आईच्या मनात आली कि त्याचे निरसन करणे हि जवळ जवळ अशक्य गोष्ट होऊन जाते. तीन किलो वजनाच्या नवजात बालकाच्या जठराची क्षमता फक्त २० मिली असते म्हणजे जुळ्या बाळाना मिळून फक्त ४० मिली दूध लागते. एवढे दूध कोणत्याही आईला सहज येते. फक्त दोन्ही मुलांना आळीपाळीने दूध पाजत राहणे हे आईच्या दृष्टीने श्रमाचे( जास्त करून मानसिक) काम आहे. त्यातून जुळी बालकं रात्री जागवत असतील तर हे फारच कठीण होते. बाटलीचे दूध दुसऱ्या कोणीही (आई किंवा सासू बाई) पाजू शकत असल्याने मुलीला/ सुनेला "विश्रांती" यामुळे बाटलीचे दूध देण्याची प्रवृत्ती वाढली आहे.
एक गर्भ कमी का नाही केला??? बरेच डॉक्टर पेशंट ना असं सांगत असावेत.
वंध्यत्व उपचारात एका वेळेस तीन किंवा चार भ्रूण रोपण केले जातात कारण त्यातील एक किंवा दोन तरी रुजावेत हा हेतू असतो. एक किंवा दोन रुजले असतील तर ते कमी करण्याचा सल्ला कधीच देत नाहीत. तीन किंवा चार असतील तर त्यातील एक किंवा दोन भ्रूण "कमी" केले जातात.
हिरानंदानी रुग्णालयात काम करत असताना एका जोडप्याला तीन गर्भ राहिले होते त्यावर त्यांनी त्यात दोन कमी करा असे सांगितले. त्यांना परत परत सांगितले कि दोन असू द्या एक कमी करू. आमचे आयुष्य आम्ही आखून घेतले आहे असेच चालले पाहिजे अशा मनोवृत्तीचे हे जोडपे होते. परंतु केवळ त्यांच्या आग्रहाखातर शेवटी दोन गर्भ कमी केले आणि दुर्दैवाने तिसऱ्या गर्भाचा तीन आठवड्याने गर्भपात झाला.

हे सर्व मान्य केलं तरी जुळे गर्भारपण हे आईला आणि नंतर दोन वर्षे पर्यंत कुटुंबाला जड जाते हि वस्तुस्थिती आहे.

सचिन काळे's picture

11 Oct 2017 - 8:52 pm | सचिन काळे

छान चर्चा!! बरीच माहिती कळली. खरे सरांचे विशेष आभार.

सिंथेटिक जिनियस's picture

12 Oct 2017 - 8:08 am | सिंथेटिक जिनियस

मी आणि माझा भाउ जुळे आहोत ,आयडेंटीकल ट्विन्स.स्वभावात बराच फरक आहे,थोडं twins and epigeneticsअसा सर्च देऊन बघा.

श्रीगुरुजी's picture

13 Oct 2017 - 2:59 pm | श्रीगुरुजी

छान अनुभव! मला दोन मुली आहेत (जुळ्या नाहीत). दोन्ही मुली असणे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.