सोनदऱ्यातली दिवाळी

Naval's picture
Naval in जनातलं, मनातलं
5 Oct 2017 - 9:25 pm

sonadara

दिवाळीचं वातावरण सुरु झालं कि आजही आठवते ती आम्ही साजरी केलेली एक आगळी वेगळी दिवाळी. ही बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझे आजोबा (आईचे वडील) शिक्षण उपसंचालक म्हणून रिटायर झाल्यानंतर एका आश्रमशाळेत जाऊन राहत होते. रिटायरमेंटनंतरच आयुष्य सामाजिक कामात वाहून द्यायचं त्यांनी ठरवलं होतं. डोमरी,कोठिंबा आणि यमगरवाडी या तीन गावातल्या आश्रमशाळांशी ते जोडले गेले. त्यांच्या कामात होईल तो वाटा ते उचलत होते. त्यांच्याकडून आम्ही नेहमी तिथले खूप किस्से ऐकायचो. ते आम्हाला म्हणायचे अरे ते आयुष्य येऊन बघा एकदा तरी. मग एकदा आम्ही तिथे दिवाळी साजरी करायची ठरवलं. डोमरीच्या सोनदरा गुरुकुलला जायचं असं ठरलं. माझ्या मामाचं कुटुंब आणि आमचं कुटुंब असे आठ जण आम्ही निघालो. औरंगाबादहून बीडकडे जातांना पाटोद्याजवळ डोमरी फाटा आहे. बसने आम्हाला साधारण तीन तास लागले. आम्ही निघतांना तिथले संचालक सुदाम भोंडवे यांना कळवलं होतं. डोमरी फाट्याजवळ उतरलो तर आम्हाला घेण्यासाठी तिथे आधीच आश्रमशाळेची दोन माणसं आलेली होती. सडसडीत बांध्याची, काटक आदिवासी माणसं.आमचं जमेल तेवढं सामान घेऊन ते चालू लागले आम्हीही त्यांच्या मागून निघालो. छोटीशी पायवाट, गुरुकुलचा रस्ता दाखवण्यासाठी रस्त्यातल्या दगडांना पांढरा रंग लावलेला होता. एकमेकांचा परिचय, विचारपूस झाली आणि पायाखालची वाट तुडवत आम्ही चालत राहिलो. एक दोन किमी झाल्यावर आम्ही पोरं कंटाळलो.मग त्यांनी आमच्यातल्या सगळ्यात छोट्या मेम्बरला माझ्या मामेभावाला खांद्यावर बसवले. तो आधी तयार होत नव्हता पण मग थोडंसं कुरकुरत तसाच बसून राहिला. आता आम्ही सारखे दगडांवर बसायला लागलो. अजून रस्ता अर्धा शिल्लक आहे कळल्यावर तर पायातलं त्राणच गेलं. मग आमचा उत्साह वाढवण्यासाठी त्या दोघांनी आपल्या भाषेतली लोकगीतं म्हणायला सुरुवात केली. अतिशय गोड आणि सोपी चाल, काही शब्द मधूनच कळत होते पण पूर्ण अर्थ लागत नव्हता.काबाड कष्ट करणाऱ्या या लोकांचा हि गाणी हाच विरंगुळा, त्यांच्या लयीत थकवा कसा विसरतो याचा आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला. गाण्यांच्या नादातच आम्ही शाळेजवळ पोहोचलो होतो. थोडीशी उंचावर दाट झाडीत एक इमारत दिसायला लागली तसा चालायलाही हुरूप आला. हि पायवाट डोंगर दऱ्यामधून एखाद्या सापासारखी नागमोडी वळणं घेत होती. सगळीकडे दाट झाडी, कित्येक प्रकारची फुलं. रानफुलांचा आणि पानांचाही एक वेगळाच उग्र असा दर्प असतो. तो सगळीकडे पसरलेला होता. माणसाच्या कुठल्याही हस्तक्षेपाशिवाय हा सुंदर परिसर अगदी मनसोक्त डवरला होता. कुठल्याही नीटनेटकेपणाचा याला गंध नव्हता. वाट्टेल तसे मुक्त वाढलेली झाडं,त्यावर चढलेल्या वेली, सगळीकडे मुक्त विहार करणारी फुलपाखरं,पशु पक्षी सारंच फार विलोभनीय ! आश्रमशाळेजवळची एक दरी तर रानमोगऱ्याने भरून गेली होती. त्याचा सगळीकडे पसरलेला वास, त्यावर घोंगावणाऱ्या माश्या एका वेगळ्याच दुनियेत आलो होतो आम्ही.

gurukul

आम्ही शाळेत पोहचलो. दगडा-मातीची शेणाने सारवलेली साधीशी इमारत. एक मोठा हॉल आणि तीन छोटे वर्ग, फार टुमदार शाळा होती ती. हॉलसमोर एक ओसरी होती. काही मुलं तिथं खेळत होती. भोंडवे पती पत्नी आमच्या स्वागतासाठी हजरच होते. अगदी साधीशी माणसं ,खादीचे कपडे आणि चेहऱ्यावरचे निरागस भाव. सुदाम काका M.S.W. झालेले होते. शहरात एखादी गलेलठ्ठ पगाराची नोकरी करण्याऐवजी आदिवासी समाजासाठीच आयुष्यभर काम करायचं असं ठरवून त्यांनी या कार्याला वाहून घेतलं होतं . त्यांची पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार तिथंच एका मातीच्या घरात राहत होते. शाळेजवळच काही छोट्या झोपड्या बांधलेल्या होत्या. शेणाने सारवलेली हि घर फार उबदार आणि सुबक. त्यांच्या छपरांवर भाज्यांचे वेल चढवलेले होते. त्यामुळे ती घरही दाट झाडीत झाकून गेली होती. तिथल्याच एका रूममध्ये आमचं सामान नेऊन ठेवण्यात आलं. एक मुलगा पळत जाऊन पाणी घेऊन आला. इतकं चालण्याची सवय नसल्याने आम्ही तिथेच ओसरीवर थकून बसून राहिलो. एक मुलगी एका कडीच्या डब्ब्यात चहा घेऊन आली, सोबत चार पाच स्टीलचे ग्लास आणि पारले-जी बिस्किटांचा पुडा. मध्यभागी एक वर्तमानपत्र अंथरून त्यावर सगळी बिस्किटं ओतली. आम्ही चहा पिऊन संपवला तर लगेच अजून घ्या ना चहा म्हणून आग्रहाने पोटभर चहा पाजवला गेला. हि इतकी साबडी आपुलकी मोठमोठया घरातही विरळाच. थोड्या वेळाने आम्ही सगळे फ्रेश झालो. सुदाम काकांनी आम्हाला सगळीकडे फिरून शाळा दाखवली. तिथली मुलं फार कुतूहलाने आमच्याकडे बघत होती. मग गप्पाटप्पा,शाळेचा इतिहास , प्रगती अशा गप्पा झाल्या. रात्री भात आणि आमटी सोबत कांदा असा इथला नेहमीच बेत.

दुसऱ्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवस होता. लवकर उठायचं म्हणून आम्ही लवकरच झोपलो. शाळेच्या त्या मोठ्या हॉलमध्ये आमची झोपायची व्यवस्था केलेली होती. शेणाने सारवलेला नीटनेटका हॉल,सगळीकडे खूप स्वच्छता.इतक्या मोकळ्या जागेत थंडी खूपच जाणवत होती. रातकिड्यांची किरकिर इतकी स्पष्ट जाणवत होती. खरंतर दिवाळी म्हणजे सगळीकडे फटाके,रोषणाई अशी इतक्या वर्षांची सवय.त्यामुळे खूप सुनं सुनं वाटत होतं. पायही खूप दुखत होते त्यामुळे झोप येत नव्हती. पण तसच पडून राहण्याशिवाय काही पर्याय नव्हता. काय करावं हा प्रश्न रात्रीच्या वेळी फार सतावतो. टीव्ही आपलं किती आयुष्य व्यापून असतो हे त्या रात्री कळालं.

दुसऱ्या दिवशी सकाळी पाचलाच उठलो. बाहेरच एक भली मोठी चूल रचलेली होती. मोठमोठी लाकडं लावून त्यावर पाणी तापायला ठेवलेलं होतं. आम्ही सोबत आणलेलं उटणं तिथं सगळ्यांसाठी देऊ केलं. मुलांना हे लावून अंघोळ करायला सांगितलं. पोरं सारखं त्याचा वास घेऊन पाहत होती. सगळे फार खुश झाले. अभ्यंगस्नान उरकून सगळे तयार झालो. ६ वाजता आसपासचा परिसर बघायला बाहेर पडलो. थंडीतली रम्य पहाट,समोरच्या दरीत दाट धुकं दाटलं होतं. किड्यांचे आवाज आता बंद झाले होते आणि पाखरांच्या आवाजाने आता आसमंताचा ताबा घेतला होता. आपल्या नजरेच्या आड असणार हे विश्व खरंच किती अद्भुत. पशु पक्ष्यांची सकाळची आपलीच लगबग सुरु होती. आपल्यासारखच अन्न शोधण्यासाठी त्यांनाही घराबाहेर पडावं लागतं. लेकरांच्या पोटापाण्याची त्यांनाही काळजी. ज्या निसर्गाने आम्ही सगळे भारावून गेलो होतो तो या लोकांच्या आयुष्याचा नेहमीचा भाग.त्यांना मात्र आमचे कपडे ,आमचं शहरी आयुष्य याच कुतूहल.

आम्ही फिरत असतांना पहिला मोर पहिला तेव्हा सगळे आनंदाने अक्षरशः ओरडलो होतो.नंतर तर मोर दिसणं आम्हालाही इतकं सवयीचं झालं. इतके मोर इथे अगदी सहजतेने फिरत होते. आपण नेहमी बघतो त्या मोरपंखी रंगाच्या मोराच्या बरोबरीने इथे तपकिरी भुरकट रंगाचे तनमोर ही खूप होते. माझा भाऊ त्या मोरांचे हुबेहूब आवाज काढत होता. एकदा तर त्याने काढलेल्या आवाजाला टेकडीच्या पलीकडून मोराने प्रतिसाद दिला तेव्हा तर सगळेच जाम खुश झाले. भाऊ तर एकदम ऐटीत मिरवत होता. इथे अजून एक गोष्ट खूपच मुबलक होती आणि ती म्हणजे सीताफळं...इतकी मनसोक्त सीताफळं खाल्ली या दिवसात आणि तीही झाडाला पिकलेली काय गोडी होती ती ! आमच्यासोबत कायमच आश्रमशाळेतली दोन तीन मुलं असायची . मदत करायला ते कायम तत्पर असायचे आणि पिंड काटक, काम करणं कधी त्यांना जीवावर आलेलं पाहिलं आम्ही. काम करायला बाहेर पडणाऱ्या आदिवासी लोकांना आपली मुलं कुठं ठेवायची असा प्रश्न असायचा. अगदी तान्ही मुलं ते सोबत घेऊन कामाला जायचे पण हि मोठी मुलं दिवसभर कुठे राहणार? त्यांच्या शिक्षणापेक्षाही या गरजेपोटी पालकांनी आपली मुलं इथं आणून सोडायला सुरुवात केली. काही मुलं तिथंच राहायची आणि काही रोज फक्त शाळेत यायची. आम्ही गेलो तेव्हा दिवाळीच्या सुट्ट्यात बरीच मुलं घरी गेलेली होती. तरी ६०-७० मुलं तिथं होती.

ranfule

दुपारचं जेवण बनवायचं काम झालं होतं.सकाळी आंघोळीचं पाणी ज्या चुलीवर तापत होतं तिथे आता भात शिजत होता. दोन्ही दिवसाचं जेवण आमच्याकडून होतं त्यामुळे नेहमीपेक्षा वेगळं म्हणजे पूर्ण स्वयंपाक होणार होता.पोळ्या करायला मी, आई,मामी मदतीला बसलो तर ते सगळे अवघडून गेले. आम्हाला काम करू देत नव्हते. आमच्या हातचं खाऊन तर बघा असा आग्रह करत आम्ही पोळ्या पूर्ण केल्या. आम्ही सोबत आणलेले लाडू, करंज्या हेच जेवणात गोड पदार्थ होते. तिथे आजूबाजूला वेलीवर खूप घोसाळे लागलेले होते पण का कुणास ठाऊक ते खाण्याची पद्धत तिथे नव्हती. माझे आजोबा त्यांना याचे भजे खूप छान होतात असं पटवत होते पण ते लोक ऐकत नव्हते. कुठलीही वस्तू आणायला पाच सहा किमी चालत जावं लागायचं. मग एका मुलाला गावात जाऊन हरभरा डाळ दळून आणायला सांगितली. आजोबांनी स्वतः सगळ्यांसाठी भजे बनवले. त्यांची शंका दूर होण्यासाठी स्वतः आधी खाऊन दाखवले तेव्हा ते खायला तयार झाले. स्वयंपाकात जमेल ती लुडबुड करणे नाहीतर चुलीत लाकडं पुढे सरकवत तिथेच शेकत बसणे हा माझा आवडता कार्यक्रम.

मी आणि माझा मामेभाऊ दिवाळीचा किल्ला बनवायचा प्लॅन करत होतो. तिथेच मुबलक असलेली माती दगड घेऊन आम्ही किल्ला बनवायला घेतला. पोरं तिथेच उत्सुकतेने उभी होती. आम्ही त्यांनाही मदतीला घेतलं आणि साधारणपणे प्रतापगड वाटेल असा एक किल्ला बनवला. तिथल्याच एका बाईने आम्हाला तो छान सारवून दिला. संध्याकाळी आम्ही सोबत आणलेल्या पणत्या आमच्या किल्ल्याच्या कोनाड्यात , बुरुजावर लावल्या तेव्हा पोरांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. मग आम्ही शाळेसमोर, घराच्या अंगणात काही पणत्या लावल्या. तिथे मिळाल्या त्या काड्या घेऊन आम्ही एक आकाशदिवा देखील बनवला. तिथे लाल पतंगी कागद मिळाला तो चिटकवून दिवा सजलादेखील. काही विकत आणण्यापेक्षा स्वतःच्या हाताने केलेल्या वस्तूची मजाच वेगळी. आता कशी दिवाळी वाटू लागली. मुलांची संध्याकाळच्या प्रार्थनेची वेळ झाली तेव्हा मुलं हॉलमध्ये जमली. त्यांनी फार सुरेख प्रार्थना म्हणली. वातावरण खूप छान झालं होत. सुदाम काकांनी मुलांना आमची ओळख करून दिली. तिथल्या काही मुलांना त्यांची लोकगीत म्हणायला सांगितलं. आम्ही पण त्यांना आमची काही गाणी ऐकवली. आता सगळ्यांमध्ये एक मोकळेपणा आला होता.

संध्याकाळी आम्ही सगळे जवळच्या पाझर तलावावर फिरायला गेलो.हा तलाव भोंडवे काकांनी इथलीच मुलं आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने बनवला होता. प्रकल्पाला लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न त्यामुळे स्वायत्त पद्धतीने सोडवला गेला. त्या तलावावर आम्ही कितीतरी नवीन प्रकारचे पक्षी पहिल्यांदा पहिले. खरंच एक पाणवठा सोबत किती मोठी जीवसृष्टी घेऊन येतो. रात्रीच जेवण झालं मग पुन्हा शाळेच्या ओसरीवर सगळे गप्पा मारत बसलो. दूरवर कधीतरी फक्त एखाद्या वाहनाचा आवाज येत होता इतकी नीरव शांतता. बाकी जगात चाललेल्या दिवाळीच्या जल्लोषाची इथे काहीही जाणीव नव्हती. अतिशय शांतपणे पहुडलेल्या त्या परिसरात आम्हीही आता थोडे स्थिरावलो होतो. कालच्या तुलनेत मन शांत होतं . कित्येक वर्षांपूर्वी विज्ञानाच्या प्रगतीच्या आधी आपल्या आजी आजोबांचं आयुष्य कसं असेल याची झलक मिळाली होती.

सुदाम काकांशी गप्पा मारताना आश्रमशाळेचं कामकाज कसं चालतं ,त्यांच्यासमोरच प्रश्न काय,आदिवासी पालकांची या प्रकल्पाबद्दलची आत्मीयता हे सगळं समजावून घेत होतो. आदिवासी मुलांच्या आयुष्यात या शाळेने फार मोठे बदल घडवून आणले होते. काबाडकष्ट,गरिबी यातून बाहेर पडून वेगळी क्षितिजं त्यांना आता खुणावत होती. आम्हाला इथे मिळालेलं प्रेम, आत्मीयता अगदी शब्दातीत . खरंच मनापासून एकमेकांशी वागण्याचे प्रसंग तसे दुर्मिळ ,त्यामुळे या सगळ्या निरागसतेने आम्ही फार भारावून गेलो होतो. तीन दिवसांनी तिथून निघतांना आमचा पाय निघत नव्हता. अजूनही आठवण आली कि आम्ही निघाल्यावर अंगणात येऊन आम्हाला टाटा करणारे ते सगळे आठवतात . डोमरीचा सोनदरा प्रकल्प आता खूप मोठा झाला आहे. मधे टीव्हीवर या प्रकल्पावरची DOCUMENTARY FILM पाहिली. तेव्हा त्याचा वाढलेला व्याप बघून थक्क झाले. भोंडवे पती पत्नींच्या कष्टाचं हे फळ आहे. आठवण अशी दाटून आली कि वाटतं परत एकदा जायला पाहिजे डोमरीला...

वावरअनुभव

प्रतिक्रिया

समर्पक's picture

5 Oct 2017 - 10:58 pm | समर्पक

धन्यवाद ! अशा संस्था खरा विकास घडवून आणतात या भागात आणि समाजात.

एक छान अनुभव वाचायला मिळाला.

निशाचर's picture

6 Oct 2017 - 2:29 am | निशाचर

छान लिहिलंय. एका वेगळ्या दिवाळीबद्दल वाचायला आवडलं.

रुपी's picture

6 Oct 2017 - 3:45 am | रुपी

अरे वा.. छान अनुभव.

आणखी एक विशेष म्हणजे बीड, पाटोदा हा भाग बर्‍यापैकी दुष्काळी असूनही हा फोटोतला परिसर अगदी हिरवागार दिसत आहे.

सौन्दर्य's picture

6 Oct 2017 - 6:38 am | सौन्दर्य

अनुभव फार आवडला. खरंच एक अगदी वेगळी दिवाळी साजरी केलीत तुम्ही. त्या परिसरातील/आश्रम शाळेतील भाषेविषयी काही सांगू शकाल का/?

अभिजीत अवलिया's picture

6 Oct 2017 - 8:54 am | अभिजीत अवलिया

अनुभव आवडला.

कंजूस's picture

6 Oct 2017 - 9:27 am | कंजूस

अगदी योग्यवेळी आला लेख. गावातले लोक आदरातिथ्य फार करतात याचा बराच अनुभव घेतला आहे. आपण त्यांच्यासाठी काय करू अशी हुरहुर लागते. शहरी वस्तू दिल्या कागद पेनं तर पुन्हा सतत कोण पुरवणार? पाट्या दगडी पेन्सली दिल्या तर लहान मुलांची करमणूक होईल. आपल्या बॅगेतला एखादा प्लास्टिकचा डबा,कंगवा अथवा आरसा पाहून हरखून जातात. छत्रीबद्दल एवढं आकर्षण नसतं. आनंदी चेहरे हीच दिवाळी.

खूप धन्यवाद! तिथल्या इतर स्थानिक लोकांशी फार संपर्क न आल्याने तिथल्या भाषेविषयी फार सांगू शकणार नाही.

इरसाल's picture

6 Oct 2017 - 4:23 pm | इरसाल

कोठिंबे माहित आहे. माझ्या वर्गात ८/९/१० ला त्या आश्रम शाळेतुन येणारी मुले होती.

एकनाथ जाधव's picture

10 Oct 2017 - 12:39 pm | एकनाथ जाधव

अनुभव नक्की लिह इरसालजी

सिरुसेरि's picture

6 Oct 2017 - 6:15 pm | सिरुसेरि

खुप छान लेख आणी अनुभव .

पद्मावति's picture

7 Oct 2017 - 2:18 pm | पद्मावति

वाह, दिवाळीचा अगदी वेगळा अनुभव. उत्तम लेख.

छान अनुभव, जाऊन पाहण्याची इच्छा झाली.

श्रीगुरुजी's picture

7 Oct 2017 - 2:32 pm | श्रीगुरुजी

खूप छान अनुभव!

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Oct 2017 - 4:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

खुपच छान अनवट अनुभव ! त्याबद्दल इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद ! तिथे काम करणार्‍या सेवाभावी लोकांबद्दल आपण काय बोलणार ?!

शलभ's picture

10 Oct 2017 - 2:42 pm | शलभ

छान अनुभव..

Naval's picture

11 Oct 2017 - 7:50 pm | Naval

खूप आभार सगळ्यांचे... सोनदरा प्रकल्पाविषयी खूप सविस्तर माहिती त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आनंदी शिक्षण पद्धत,पालक शिक्षक पद्धती, स्वयंभू जीवन,शारीरिक शिक्षणाला अधिक महत्व अशा पद्धतीने फार उत्तम शिक्षणाचे काम इथे चालू आहे. माझ्या अनुभवाला आलेलं तेवढच आणि दिवाळीच्या अनुषंगाने लिहिल्याने तसा हा लेख सोनदरा प्रकल्पाचे परिपूर्ण वर्णन नाही. या प्रकल्पाविषयी माहिती सांगणारे हे संकेतस्थळ खाली दिले आहे-

https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=14&cad=r...

सूड's picture

12 Oct 2017 - 6:57 pm | सूड

सुंदर!!

पाटीलभाऊ's picture

13 Oct 2017 - 2:58 pm | पाटीलभाऊ

छान अनुभव