भाऊबीज

Primary tabs

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in दिवाळी अंक
21 Oct 2017 - 12:00 am


तुझ्या डोहडोळ्यात डोकावणारे
मला पाहवेनात ते चेहरे
गळाभेट होता स्वतःची स्वतःशी
किती व्हायचे कावरेबावरे

तुझा श्वास होई कुणाची रुबाई
उसासा गझल अन मिठी स्पंदने
कुणी ओठ ओठांत घ्यावेत अलगद
कुणी उतरवावीत आभूषणे

खुला केशसंभार रजनी कुणाची
कुणा चोरटा स्पर्श तो आवडो
कुणी फक्त यावे, कुस्करून जावे
कळ्या सापडो वा फुले सापडो

तुझी देहवीणा अशी कर्मयोगी
सुरांची तिच्या व्हायची साधना
मला सारखे हेच वाटायचे की
बघ्याचीच माझी असे भूमिका

ठरवले जरासे तुझे व्हायचे मी
पहाटे पहाटे तुला भेटतो
तुला ठेवतो चांदणे शुभ्र माझे
तुझे विश्व माझ्याकडे ठेवतो

प्रतिक्रिया

राघव's picture

21 Oct 2017 - 1:59 pm | राघव

कुणी फक्त यावे, कुस्करून जावे
कळ्या सापडो वा फुले सापडो

देवा... जोरात कळ आली वाचून..

अभ्या..'s picture

21 Oct 2017 - 2:12 pm | अभ्या..

अरर,
चटका बसतो हो असलं वाचताना.
कसला तो भाऊ नुसता बघ्या. :(

रेवती's picture

21 Oct 2017 - 3:41 pm | रेवती

अवघड आहे वाचायला.

नाखु's picture

21 Oct 2017 - 6:54 pm | नाखु

आणि एकदमच टोकदार

भारावलेला नाखु

यशोधरा's picture

21 Oct 2017 - 10:00 pm | यशोधरा

बेला, अत्यंत हृदयस्पर्शी कविता.

स्वाती दिनेश's picture

22 Oct 2017 - 3:32 pm | स्वाती दिनेश

बेला, अत्यंत हृदयस्पर्शी कविता.
यशो सारखेच म्हणते.
(अवांतर- लिहित जा रे.. गायबच झाला आहेस.)
स्वाती

निश्चितच भिडणारी कविता !

पैसा's picture

30 Oct 2017 - 6:26 pm | पैसा

हम्म

तुझ्या डोहडोळ्यात डोकावणारे
मला पाहवेनात ते चेहरे
गळाभेट होता स्वतःची स्वतःशी
किती व्हायचे कावरेबावरे

ह्यासाठी टाळ्या!!