जेडी५८

Primary tabs

मकरंद घोडके's picture
मकरंद घोडके in दिवाळी अंक
17 Oct 2017 - 12:00 am

Header2

चार वर्षं झाली आता रिटायर होऊन. VRS! सध्या माझं वय ५८. मज्जानु लाईफ. झपाट्याने दिनक्रम बदलूनच टाकला. रात्रीची वेळ ड्यूटीची - रात्री ९ ते सकाळी ६. हवेत तरंगलेला वेळ - म्हणजे काम असूनही नसल्याचा आनंद जास्त.

Observation, calculation & study.

ही माझी लाडकी सायकल आणि ही आपली दोस्त JD! (काळ्या बॅगेला जास्त कवटाळून) खर्च तो कसला नाहीच.

सकाळी पुन्हा ६ ते २ मस्तपैकी ताणून निद्रादेवीची आराधना, रवंथ, आणि मग रात्री झालेल्या मंथनाचा निचरा. घरी जाणं येणं बरेच दिवस झालं बंदच केलंय. एखाद्या झाडाचा बुंधा, एखाद्या ATMच्या शटरचा आडोसा, हातगाडी, फूटपाथ, बेंच सगळं काही चालतं. रेल्वे स्टेशन लागलंच तर बेस्टच एकदम! स्वतः मी हरवू नये, म्हणून ही पाहा माझी बॅग - नावसुद्धा आहे त्यावर - J.D.
चलोss चलोsss ट्रिंगss ट्रिंगsss चलो JD sss

सौंदर्यस्थळं पाहिली की खूप बरं छान वाटतं - मग ते स्त्री असो वा निसर्ग. आतून अगदी रसरसून मस्त वाटतं. या बेसुमार छान वाटण्याच्या जागा लालभडक रक्तातून पलीकडे गेल्या की बेहिशोबी, बेढब डबकेदार सुस्त लाईफची प्रश्नचिन्हं आतड्यांमध्ये ढवळू लागतात, फेसाळू लागतात. नकोच ती पापड भाजल्यासारखी मध्येच करपलेली उन्हं, भकासवाणी दुपार आणि तेच तेच तासातासाला रंगवून सांगितल्या गेलेल्या टीव्हीवरच्या बातम्या, असाहाय्यतेचा फाटक्या दारुण कहाण्या. हे सुखवस्तू /दळिद्र मुखवटेदार कसं काय जगू शकतात माणसं??
नकोच होतं मला ते! तेव्हाही नाही आणि आता तर नाहीच नाही. नकोय मला ती सक्तीची रिटायरमेंट, नकोय पोटभरून जेवण. मला समाधान हवं, पैसे नको. प्रेम हवं, मला हाव नको. मनापासून कुणीतरी मारलेली हाक हवी...अर्ररss रss नकोच असलं काही! साहित्यिक चोर माणसासारखं व्हायला लागलं उगाच! अनुभव नाही, पण अनुभवसंपन्न प्लास्टिक बोलणं उगाच! 'य' ला 'ट' आणि 'म' ला 'ध' जोडा उगाच! -पावसाळी नवकवीसारखं! नकोच ते!!

चलो JD ssss

जाड भिंगाचा चश्मा त्याने हातरुमालाने पुसून नाकावर सरकवला. आता रस्त्याच्या दुतर्फा झाडं दिसू लागली. हिरवीगार रसरशीत छान छान. ५८ची बॅग जरा वेगळीच. दोन इनिशियल्स होत्या त्यावर - J.D. बहुतेक नाव आणि आडनाव. सायकलच्या कॅरेजला ऑक्टोपसने त्याने JD बांधून टाकली. टांग मारली आणि प्याडल हाणत दूरवर गेला.

आपला देश म्हणावा तेवढा विकसित नाही. गरिबी, महागाई, भ्रष्टाचार डोक्याला वरताण झालाय. जीव विटलाय. पेटून उठावं, फाडून-फोडून टाकावं वाटतं सगळं... वगैरे वगैरे डिस्कशन म्हणून ठीक आहे. पण प्याडल मारलं की दम लागतो आणि जिवापल्याड डिस्कशन फोल वाटतं. मग JD उघडली जाते. एक कसलंतरी विचित्र इंजेक्शन बाहेर येतं. ५८ ते मांडीत टोचतो. JD बंद होते. मग हातानेच तो सायकल चालवत निघून जातो.
जमिनीला समतल ते रिकामं इंजेक्शन, ज्यावर स्टिकर चिटकवलंय - 'फूड इंजेक्शन.'

जाड भिंगाचा हा चश्मा चौकोनी चेहऱ्याला अगदीच सूट होतो. घालायला दोन सफारी - एक ग्रे, दुसरी ब्राऊन! केस अगदी बारीक चिंगुळे. उजव्या हाताचा अंगठा आणि मधल्या बोटाची चिमटी हरणासारखी हवेत नाचवायची अदब आणि जोडीला तोंडातल्या तोंडात असंबद्ध वाटावी अशी बडबड.
असा हा ५८चा गडी पाहताक्षणी बावळट वाटतो खरा, पण लक्ष वेधून घेतो आणि काही अंशी जिंकूनही!

कानात कसलेतरी विचित्र आवाज घुमत आहेत. पलीकडे कसलातरी दैवी जल्लोश चालूये आणि इकडे - असंबद्ध बडबड!
देवालयाच्या गाभाऱ्यासमोर पायरीवर JD अगदी शिथिल होऊन एकटक 'त्या' मूर्तीकडे पाहू लागतो.
हे देवा, ईश्वरा, तुला मनःपूर्वक नमस्कार आणि धन्यवाद. Observation calculation and study.

सगळ्या श्रद्धा-अंधश्रद्धा, विश्वास - या नारळाच्या कवटीतून फुटून अगरबत्ती, धूप यांच्या धुरकट वासातून हळूच देवाच्या मनात प्रवेश करत असतील का? की त्याला गोंडस असं कवच देऊन आपल्यासाठी आपण सकारात्मक ऊर्जा म्हणून अलौकिक ऊर्जेत रूपांतरित करू इच्छितो! Yes!! Law of energy transformation!!

पण या सगळ्या प्रेरणा बऱ्याचदा न कळत्या वयात कुणीतरी आजूबाजूने पसरवत बिंबवत लादत जातो. एक विशिष्ट वयातून संक्रमण करत असताना जे वैचारिक खाद्य आपण खातो, त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकून राहतो आणि हे संक्रमण न कळत्या वयात सर्वाधिक असतं! परंपरेच्या, संस्काराच्या, पुराणकथांच्या पोकळ्या अशी कितीतरी कोळीदार जळमटं या संक्रमणाने भरून जातात. सगळ्याच संकल्पना विज्ञानवादी तर्कवादी होऊ शकत नाहीत, तशाच त्या दैववादी आस्तिकतेनेही पाहता येत नाहीत!

जेवढे श्वास, तेवढे विचार - हरघडीला बदलणारे - जग जिंकणारे वा उद्ध्वस्त करणारे - प्रचंड ताकदवान! जेव्हा कुणीच नसतं आजूबाजूला, तेव्हा विचार हे अगदीच हल्ला चढवतात. शरीरावर कब्जा करतात. त्यांना हवं ते वदवून आणि करवून घेतात.
अगदी साधं गृहीतक - सगळे शोध ज्या कुणी शास्त्रज्ञांनी लावले, ते मुळात प्रचंड एकलकोंडेपणात, अस्वस्थेत, असाहाय्यतेत, अडचणीत!! त्यांच्या ईश्वरीय संकल्पनाही कधीकाळी कामात लुडबुडत आल्या असतीलच की! पण त्याकडे बघायचं कोणत्या दृष्टिकोनातून?? बऱ्याच जणांनी नव्या जमान्याबरोबर जाणं पसंत केलं! आणि इतरांनी अगदी विरोधी भूमिका घेत त्यांच्या काबाडकष्टाचं / यशाचं मूल्यांकन दैवी आभार मानून केलं!

टणsss! घंटा घणाणली. देवालयाच्या कोपऱ्यात भगव्या वेषात ऋषितुल्य व्यक्ती काहीतरी बडबडत होती आणि भक्तगण त्या रसात अगदी चिंब न्हाऊन गेले.
ती केसाळ ऋषितुल्य व्यक्ती अगदी गोड आवाजात, भरल्या पोटाच्या अदबीने शांत नजरेने एकेक शब्द उच्चारीत होती.
Who am I? कोण आहे मी? माझ्या अस्तित्वाचं प्रयोजन? कशासाठी आलोय आपण इथे?
हा वारा का वाहतोय? ही सृष्टी धरा - ऊन-पाऊस-थंडी यांचा खेळ कशासाठी? त्याच्या प्रत्येक उच्चारागणिक त्याची लांबलेली/लोंबलेली दाढी काय झकास हलत होती! मग ठरलेल्या पठडीतली वाक्ये - संसार परमार्थ आणि सुख यांच्या व्याख्या परमेश्वराप्रती लीन होण्याचं महत्त्व! भक्तगण डोलत राहिला कितीतरी वेळ...

Observation calculation study

मोठमोठाली अविश्रांत शहरं, आलिशान जगणं, प्रसिद्धीचा हव्यास, मोठेपणाची हौस, हौसेने जपलेले गैरसमज, दुःख, जळजळ, भीती, मत्सर, हेवा आणि एक दिवस कुठलीही सांकेतिक पूर्वसूचना डावलून गोठून जाणारी निर्जीव देहयष्टी!
छान चित्र काढावं, बेसूर भेसूर का असेना गाणं गावं - ऐकावं, मनमुराद हसावं स्वतःशीच, वेडंवाकडं हवं तसं नाचावं, कधीतरी स्वतःच्या चश्म्यातून दुनियेकडे पाहून थुंकावं सगळ्यावर. मोडून टाकावीत सगळी बंधनं. व्हावं अगदी भिकार, वागावं अगदी टुकार. जगावं असं बेफाम घर्षणरहित - जडत्व येईपर्यंत. ज ss ड ss त्व ss ये - येईपर्यंत!

Yes! सगळ्या समस्यांची 'जड' आहे ‘भूक’! मग ती शरीराची असो, मनाची किंवा नावीन्याची असो, ती तुम्हाला हवं ते बनवते. त्यावर विजय म्हणजे पंचेंद्रियांवर विजय! हाहा ss हाहा ss हा s हा sss
आय गॉट इट JD! आय गॉट इट JD! 'फूड इंजेक्शन'!

JDच्या शेजारी तो दाढीवाला भिकारी बसलेला. दात विचकून का हसतोय हा भिकारडा? भुकेसाठी? तो भीक मागतोय, कारण त्याला जेवायचंय - मग त्याने जेवण मागायला हवं! पण तो पैसे मागतोय. पैशाने भूक मिटते? त्याच्यावर ही वेळ का यावी? हरणाची चिमटी हवेतल्या हवेत फिरते - आपलं सरकार का नाही यावर काही करत? हाहा ss हाहा ss हा s हा sss सगळं सरकारने करायचंय, मग आपण काय करायचंय?? सरकारवर मोर्चे - आंदोलने - निषेध!

Observation calculation study

साला सिस्टिमच सगळी करप्ट.मग करपवणारे एवढे पावरफुल झालेत. कळतंय आपल्याला, पण कुत्र्याच्या शेपटासारखं वागतोय - डुक्कर साले!! "कुछ देना मत - कुछ लेन मत” जनजागृती - करेक्ट वोटिंग फॉर करेक्ट लीडर - तेही मास वोटिंग - बदल - विकास - एवढं सोप्पंय - हाहा ss हाहा ss हा s हा sss
कुछ लोंग बने होते हैं सिस्टीम बनाने कें लिये और कुछ बिगाडनेके लिये और बहोत सारे बस सिस्टीम में उलझे रहतें हैं! हाहा ss हाहा ss हा s हा sss

टण ssss पुन्हा घंटा घणाणली, दैवी जल्लोश पुन्हा जोरजोरात सुरू होतो आणि एकटाच सामसूम हरवून गेलेला JD त्या जल्लोशात मुरत जातो. एकवार आकाशाकडे, एकवार गर्दीकडे आणि वारंवार स्वतःकडे पाहतो, देवालयाच्या आवारातून हळूहळू बाहेर पडू लागतो. दैवी जल्लोश दुपटीने वाढलेला असतो. हे एकसुरी कपडे घातलेले आणि झेंडे नाचवणारे लोक फक्त मनाची भूक मिटवत, गुंगवून टाकतायेत सगळ्या दिशा. चौबाजूला हा गुलाल, धुरकट वातावरण, घंटानाद आणि कसलीतरी शरीर तापवणारी विचित्र ऊर्जा - भूक मिटवणारी ऊर्जा. तहान-भूक विसरून त्याच अवस्थेत झिंगायला लावणारी ऊर्जाकेंद्रं. एस एनर्जी पॉईंट्स!! यू आर जीनियस. ती ऊर्जाकेंद्रं मला शोधायलाच हवीत.

९मध्ये कुठलाही अंक मिळवला की तोच अंक परत मिळतो. मग ९'मध्ये' आहे तरी काय? कॉन्स्टंट? कॅटॅलिस्ट? की..? कसलं शास्त्र - संख्याशास्त्र! ऊर्जा रूपांतरित होते, मग आत्माही ऊर्जाच... तीही ट्रान्सफॉर्म होतच असणार? ऊर्जा साठवली तर नंतर ती वापरता येते - मग जेवढे श्वास तेवढं जगणं, मग श्वास लांबवून घेतले, तर जगणं लांबवता येईल कासवांसारखं? आजूबाजूला ढोल-ताशांनी फेर धरला आणि तो चक्राकार लोंढा गुंगून गेला दैवी निनादात!
धंडाडा धंडाडा ss धन धन ss धंडाडा धंडाडा धन धन ssssss

Yes, JD, you are something special!! सायकल एका गजबजलेल्या बसस्टॉपवर मागे लावून JD तिथल्या बाकड्यावर येऊन बसला. एक मुलगी कानात हेडफोनवर मस्त गाणी ऐकतेय. तिला खरंच गाणी आवडतात की आजूबाजूचा पसारा तिला ऐकावासा वाटत नाहीये, किंवा त्या गाण्याचा अंमल - धुंदीच मुळात अशी आहे की ज्याने आजूबाजूचं वातावरण खास आपल्यासाठी आहे असा भास तयार होतो! Yes, भास!

अंमल - धुंदीचं असंही एक इंजेक्शन बनवता येईल, बरं का JD - तुम्हाला जाणीव देणारं - Yes, you are something very special!! म्हणजे जगाला प्रेमात पडायला लावणारं इंजेक्शन!! JD, यू आर जीनियस! ५८, JD (बॅग) उघडतो आणि एका पानावर सगळं नोट डाऊन करून घेतो. सायकल घेतो आणि तिथून सरकतो.

रात्रीचे अकरा वाजून गेलेत. तरीसुद्धा या गाववस्तीवर माणसांची एवढी तोबा गर्दी! कुणाच्या लग्नाची पूजा तर नव्हे? मग काहीच संबंध नसलेली नवीकोरी बिनअर्थाची फेमस गाणी वाजत का नाहीयेत? माणसांचे, उगाच लुडबुड करणाऱ्या लहान पोरट्यांचे आवाज का नाहीत? ओहो ss हो ss हा तर अनुपम, अलौकिक माणूस गेल्यानंतरचा गम्मत सोहळा!! व्वा, छान, छान. नि:शब्द घोळक्यामध्ये ती बाई उद्ध्वस्त होऊन बसली होती. आता ती रडत नव्हती. नुसताच घशाचा आतल्या आत घरघर आवाज येत होता. तिच्या चिल्ल्यापिल्ल्यांना काहीच माहीत नव्हतं. भुकेने ते ताटकळून सुकून गेले होते. अत्यंत विचित्र आणि गंभीर मैतीचा माहोल. दिवट्या हातात घेऊन वस्तीवर माणसं एकदम गपगार. मध्येच एखादा हुंदका काळीज फाडत चिरत जायचा. या मेलेल्या माणसाचं आकस्मिक जाणं कुणालाच आवडलं नाही. काळजीत पडलेली बायको, सोन्यासारखी दोन मुलं. म्हातारे, जीर्ण आई-बाप. त्याने असं जायला नको होतं अशी कुजबुजत चर्चा. तरीपण माणसाची सवय काय जात नाही. बसतो आवळत पैसापाणी - दागदागिने. देवाज्ञा झाली की सगळं आहे तसं, आहे तिथं टाकून जावं लागतंय...

Observation calculation study

काय असेल बरं देवाज्ञा? काय असेल त्याच्या मनात? त्याला मन आहे? तो आहे, म्हणजे तो लक्ष ठेवतो प्रत्येकाकडे? काय योजना असेल ही! माणूस बनवण्याच्या फॅक्टरीमध्ये एक प्रॉडक्ट एक दिवस एक्स्पायर होतं. दुसऱ्या एखाद्या जगात या माणसाची आवश्यकता तर नसेल? असलं काही खरंच असेल का? पण सांगणार कोण आणि कसं? शरीर एक दिवस इथेच सोडून जावं लागतं म्हणजे? कुठे जाते त्यातली चेतना ऊर्जा? कोण सांगणार?

शरीराचं काम व्यवस्थित चालविण्याकरिता त्यात वेगवेगळे व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स, ऑक्सिजन, प्रोटीन, फॅट्स भरले तर ते चालत राहतं. न्यूटन म्हणतो - जोवर घर्षण होतं नाही तोवर चकती फिरत राहते - जडत्व येईपर्यंत! वर्षानुवर्षं घासल्याने इंजिन दमत जातं. मग घर्षण होणार नाही, बाहेरील बल (फोर्स) अटॅक करणार नाही - असं काही आहे का? हं, JD त्या मेलेल्या माणसासमोर जाऊन बसला.
त्या निर्जीव देहाची हळूच हळुवार पाहणी केली. अंगावर गुलाबाच्या पाकळ्या, नाकात कापूस, तोंडात तुळशीचं पान. कसलीच हालचाल नसल्याने बघवत नव्हता तो देह! ५८, JDला जास्तच कवटाळून बसला. पाण्याच्या बुडबुड्यांचे आवाज कानात गुदगुदू लागले. पुन्हा क्षीण होतं गेलेला ढोलाचा, घंटानादाचा आवाज... टणटण धडाड धडाड.... टणटण धडाड धडाड.... ५८ आणि ती 'उद्ध्वस्त बाई', दोघेच त्या देहाभोवती. बाकी सगळे हाताच्या घड्या बांधून दूरवर. कोण अंत्ययात्रेचं सामान आवरतंय, कोण मोबाईलवर दबक्या आवाजात निरोप देतंय...वेळ अचानक थांबली. टिकटिक वाजायचं बंद झालं...

कधीकधी एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात नुसतं वरवर वावरत असायचो मी! खरंच आपली आवश्यकता आहे का या प्रसंगाला? की नुसत्याच न हलणाऱ्या नेपथ्यासारखं फक्त इतरांच्या आयुष्याचे आपण बॅकग्राऊंड आहोत?
त्या निर्जीव देहाकडे पाहता पाहता सटासट कितीतरी फ्लॅशचे फटकारे बुबुळासमोर पुढे सरकले. माझ्या पंचेंद्रियांना हलवून हादरवून टाकलं त्यांनी. सगळं जगचं खिजवणारं वाटून गेलं. का जगत होतो शेळपटासारखा? सरळ VRS घेऊन टाकली. दोन वर्षं घरी बसून होतो. ’गरज' आणि 'चैन' याचं झणझणीत अंजन डोळ्यात पडलं. जेवढं गरजेचं होतं, ते फक्त JD भर होतं, बाकी मुलाबाळांना देऊन टाकलं. वेळ अजूनही थांबलेलीच. ‘बायको’! - हा अत्यंत संवेदनशील प्रकार माझ्या आयुष्यात होऊन गेला. त्याने मला आधार दिला. व्यावहारिक बळ दिलं, अशी कशी काय निसटून गेली ती रेतीसारखी! खूप रडलो, बिथरलो, घाबरलो, वैतागलो. पुन्हा पाहतो तर काय - एक उंच लाट अंगावरून निघून गेली होती. हाच का तो शांत समुद्र काही क्षणासाठी रुद्रावतार झालेला! बायको, लव्ह यू सो मच - नो कमेंट्स! सॉरी, आय नो, तू आहेसच इथे.

वेळ अचानक सुरू झाली!
टिक टिक टिक टिक sss हरणासारखी चिमटी पुन्हा आकाशभर फिरली. JD, यू कॅन डू इट!
शेवटी प्रेत जाळायची तयारी पूर्ण झाली. आजूबाजूच्या बायकांनी त्या बाईच्या दंडाला धरून बळेच उठवलं. ती बेशुद्धच होती जवळपास!!५८ने हळूच JD उघडली. एक इंजेक्शन बाहेर काढलं, कुणालाही कळू न देता प्रेताला टोचलं. तो निर्जीव देह - ताटीवर उठून बसला!!!
JD बंद करून ५८ कधीचाच सटकलेला. माणसं सैरावैरा धावू लागली. चर्चांना विषय मिळाले. गम्मत सोहळा फारच भयानक प्रकारे उरकला!

अपरात्रीची सुसह्य गारव्याची २ची वेळ. कुत्री भुंकून भुंकून कंटाळलेली - रस्त्याच्या बरोबर मध्ये पसरलेली. ५८ ने JD उघडली. सुंदर छोटासा आरसा काढून ५८ त्याकडे पाहू लागला - स्वतःला! आपण असे कसे दिसतो? रोज आपण वाढत राहतो, मग आरशाकडे रोज बघूनसुद्धा स्वतःला बदलताना आपण नोटीस का नाही केलं?
शरीर तर बाह्यावरण, मन-विचारसुद्धा वाढत्या वयात वाढले, बदलले. पण ते ध्यानात का नाही आलं? आपण एकमेव होतो स्वतःजवळ अगदी सुरुवातीपासून! जुन्या जवळच्या वस्तूंची दखल - किंमत समजत नसावी कदाचित! स्वतःबद्दल फार प्रेम ठेवू नये JD .मी बिघडेन अशाने .डार्विन म्हणतो - survival of fittest! जो सर्वात जास्त ताकदवान, तोच टिकतो. Not fit not good, very bad. हरणासारखी चिमटी हवेतल्या हवेत फिरली. फिटेस्ट राहायला पाहिजे आपण!

JDच्या तळाशी एक छोटीशी वस्तू दडवून ठेवलीये. त्यातून एक धून निघते. गुणगुणावीशी वाटते, धून परिचयाची नाही, पण हृदयाच्या कप्प्यामध्ये हलवून टाकते एकदम. Yes, विचार करण्याची अवस्थाच बदलवून टाकणारी धून! ज्यातून ही धून निघते अशी अनामिक शिट्टी लपवून ठेवलीये त्या तिथे JD च्या तळाशी!
मनाच्या गाभाऱ्यात प्रवेश करणारी यंत्रणा

तुमचे विचार एक कपात किंवा बशीत काढून ठेवा. अगदी चिकटून बसलेले 'नको त्या प्रकारचे 'विचार आणि काही 'तऱ्हेवाईक' पण आवडणारे विचार एकदम मिक्स करून इतर पब्लिकच्या मिक्सरमध्ये घुसळवा. आता हे एकजिनसी मिश्रण मस्तपैकी स्वडोक्यात टाका आणि एन्जॉय करा - एक जबराट पाककृती! नो नो JD, यू आर फूल ss! that इज नॉट करेक्ट वन!

वडाच्या झाडाच्या पारंब्या जमिनीत घुसून पुन्हा तिथे वडाचं झाड तयार होतं. काय निवांत सॉलिड झोप लागते तिथल्या मुळ्यांपाशी - विचारहीन झोप! आठवत नाही किती वेळ पडलो होतो तिथे.

Calculation observation study...

निसर्गनियमच तो! चक्राकार. बापरे sss सर्कलला जेवढे - तेवढेच नियम निसर्गाला लागू होणार मग!
मग कुठेतरी pi (π) हा पाय टाकून बसला असणार .कॉन्स्टंटली आणि अचूक एकदम ३.१४१६! येस, एका सेंटर पॉईंटवर थांबून एक चक्राकार गोल आखला, तर त्याची त्रिज्या म्हणजे जीवन जगण्याची सेल्फी स्टिक - जी वर्तुळाकार व्यास बनून डायरेक्ट आपल्याभोवती गुंफ़लीये. व्वा! जीवनसुद्धा वर्तुळाकार - हरणासारखी चिमटी अवकाशभर फिरली नाही!! जिथून आपण स्टार्ट केलं, तिथेच परत मरायला कुणी येत नाही - की मग पुनर्जन्म होतो मग - कॉन्स्टंटली!

जुन्या छपरांच्या पत्र्यांच्या घरात 'आठवण' म्हणून लटकवलेल्या फोटोंमध्ये 'जन्म-मृत्यू' यांची नोंद आहे, पण अंतरे सामान नाहीत. त्यांच्या शरीरगाड्या कमी-जास्त धावल्या आहेत. ओह्ह, I am not sure JD, पण सायंटिस्ट हा फॉर्म्युला शोधू शकले नाहीत - 'अमरत्व' शरीरावर नियंत्रण. Yes, I can do it JD. सूत्र साधं आहे - सायन्स प्लस मॅजिक! जिथे सायन्स संपलं, तिथे अद्वैत्वाचा खेळ - तो मॅजिकच! चलो JD ...सायकलला टांग - ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग sss

No calculation No Observation No Study

JD हा सरळ सरळ वाचता न येणारा कागदाचा पसारा. सगळं काही लिहून ठेवलंय तुझ्या उदरात. पुरातत्त्वशास्त्राच्या एखाद्या विद्यार्थ्याला कधीकाळी सापडलाच, तर एखादी PhD सहज होऊन जाईल त्याची. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला अतर्क्य वाटणारं संक्रमण सोपवतोय, सामावून घे सगळं त्यात. समुद्रकिनारी पाऊस कोसळतोय - सोसाट्याचा वारा - आभाळातून पाणी आणि खालीसुद्धा पाण्याने भरलेली जमीन - हे लपलेल्या सूर्यदेवा - तुझी तुलाच परत करतोय JD - सामावून घे.

आता रेतीत फक्त सायकल रुतून बसलीये. एक कोवळ्या वयाच्या पोराने ती कशीबशी ओढून वर काढली आणि चक्कर मरायला घेऊन गेला. बालचमूच्या टीमने समुद्रावर काही कागदी भिंगऱ्या बनवल्या, त्यातलीच एक सायकलच्या हॅण्डलला लावली. ती चक्राकार फिरू लागली वाऱ्याच्या जोराने! मुलांनी मनसोक्त आनंद घेतला त्या ऑक्टोपसवाल्या सायकलचा. कितीतरी वेळ समुद्राच्या लाटा खाली-वर होतं राहिल्या...

एक पेटीवजा काळा ठिपका लाटेवर स्वार होऊन निघून गेला - Bye Bye JD.

Footer

कथा

प्रतिक्रिया

बाजीप्रभू's picture

17 Oct 2017 - 5:13 am | बाजीप्रभू

काहीच समजलं नाही... परत वाचावं लागणार....

जेम्स वांड's picture

17 Oct 2017 - 8:42 am | जेम्स वांड

काहीच समजलं नाही...... :(

प्राची अश्विनी's picture

17 Oct 2017 - 9:04 am | प्राची अश्विनी

छान, असं जगायला काय मजा येईल!

कपिलमुनी's picture

17 Oct 2017 - 1:57 pm | कपिलमुनी

JD घेउन वाचला तर कळेल कदाचित !

विशाल वाघोले's picture

23 Oct 2017 - 11:43 pm | विशाल वाघोले

हाहाहाहाहा

अनन्त्_यात्री's picture

17 Oct 2017 - 3:49 pm | अनन्त्_यात्री

की हे वाचायला कुठूनही सुरुवात करून कोणत्याही दिशेने वाचलं तरी तितकंच अनाकलनीय आहे.

बोका-ए-आझम's picture

17 Oct 2017 - 4:49 pm | बोका-ए-आझम

अरेषीय कथा किंवा व्यक्तिचित्र (non - linear narrative) असं म्हणता येईल. यात लेखकाचं मन हीच व्यक्तिरेखा आहे आणि मनातल्या विचारांच्या आधारे व्यक्तिचित्रण केलेलं आहे - असं मला वाटतंय. पण भन्नाट आहे. एका ठराविक साच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न आहे. आवडलेला आहे.

गामा पैलवान's picture

17 Oct 2017 - 6:35 pm | गामा पैलवान

बो-ए-आ,

यांस संज्ञाप्रवाह म्हणावं का?

आ.न.,
-गा.पै.

आमोद's picture

17 Oct 2017 - 10:40 pm | आमोद

चायला, डोकयाला शाॅट

यशोधरा's picture

18 Oct 2017 - 12:23 pm | यशोधरा

आवडलं.

सुबोध खरे's picture

18 Oct 2017 - 12:27 pm | सुबोध खरे

काय?

टवाळ कार्टा's picture

18 Oct 2017 - 12:48 pm | टवाळ कार्टा

कोणी याच्यावर ज्ञानेश्वरी लिहिल का?

चांदणे संदीप's picture

19 Oct 2017 - 9:50 am | चांदणे संदीप

म्हणजे भाऊ लग्न करणारे आता.
(काहीच्या काही प्रतिसाद)

Sandy

जव्हेरगंज's picture

19 Oct 2017 - 12:53 pm | जव्हेरगंज

वा! चांगलं लिहीलंय.

पुन्हा वाचावे लागणार!!

इरसाल कार्टं's picture

19 Oct 2017 - 6:01 pm | इरसाल कार्टं

जवळ जवळ दीड वेळा वाचले, निराश झालो. आता प्रतिसाद वाचल्यावर जरा बरं वाटलं.
उगीच वाटत होतं की मलाच काळात नाहीय.

mayu4u's picture

23 Oct 2017 - 12:56 pm | mayu4u

आणि वाचन थांबवतो.

पी महेश००७'s picture

20 Oct 2017 - 1:16 am | पी महेश००७

जेडी खरंच अनाकलनीय...
वाचल्यानंतरही कळला नाही

अभ्या..'s picture

20 Oct 2017 - 8:31 am | अभ्या..

जबरदस्तच

रेवती's picture

20 Oct 2017 - 9:11 pm | रेवती

लेखन आवडलं.

नमकिन's picture

22 Oct 2017 - 7:55 pm | नमकिन

दिवाळी फराळ पुन्हा खावा लागणार!

लेखन चांगले आहे. पण ह्यात रिटायरमेंट का आणली आणि ते चितेवरून उठण जरा विचित्र वाटल.