दत्तू किटे

Primary tabs

गुल्लू दादा's picture
गुल्लू दादा in दिवाळी अंक
17 Oct 2017 - 12:00 am

Header2

२३ जुलै २०१७, वार रविवार. रविवारी रात्री आमच्या मेस (खानावळ) बंद असायच्या. नाइलाजाने (नाइलाजाने कसलं हो! आम्ही तर चातकासारखी वाट बघायचो रविवारची) आम्ही बाहेर जेवायला जायचो. खिसे भरलेले असले की सतत बाहेर जेवायला जाता येतं. पण घरचे बरोबर दुखती नस पकडत, महिन्यात येणाऱ्या ४ रविवारी बाहेर जेवता येईल इतकाच चंदा पाठवला जायचा. अध्येमध्ये बाहेर जेवायला गेलं की मित्रांकडे उधारी व्हायची. कधीना कधी द्याव्या लागणाऱ्या उधारीमुळे पुढील सगळेच दिवस तंगीत जायचे. त्यापेक्षा फक्त रविवारीच जिभेचे चोचले पुरवले जायचे. तशा आमच्या मेस ह्या अव्वल दर्जाच्या सहकारी (co-operative) मेस होत्या. आम्ही, आमच्यासाठी, आमच्या पोटाच्या कल्याणासाठी चालवलेली खानावळ म्हणजे ह्या सहकारी मेस ('लोकशाही'च्या व्याख्येच्या सुरात वाचावे. याविषयी नंतर कधीतरी). तर आठवाड्यातले ६ दिवस अगदी घरच्यासारखं जेवल्यानंतर रविवारी जीव चटपटीत खायला अगदी असुसला जायचा. पावलं आपोआप ढाब्याकडे वळायची. औरंगाबाद शहरापासून १४-१५ कि.मी. अंतरावर दौलताबाद रोडवर डोंगरे मामांच्या 'साईकृपा' ढाब्यावर आमची मैफल रंगायची. नेहमीचे सदस्य म्हणजे गोपी, किसना, जब्या, पक्या, पिऱ्या आणि गुल्लू दादा (म्हणजे मी). त्या दिवशी रविवार असल्यामुळे या दिनचर्येला अपवाद नव्हताच.

महिला क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना मस्त रंगला असतानाच आमच्याही मैफलीला झिंग चढली होती. स्टार्टर म्हणून नागेली पापडाबरोबर मसाला (हा मसाला म्हणजे कांदा, टोमॅटो बारीक चिरून त्यावर लिंबाचा हलकासा छिडकारा. चवीला मीठ, चटपट मसाला आणि तिखट). बिना मसाल्याचा नागेली पापड म्हणजे झिरो आहे राव, झिरो. आख्ख्या संभाजीनगरात चरून झालंय, पण साईकृपाच्या नागेली पापडाची सर कुणालाच येत नाही. फक्त नागेलीसाठी औरंगाबाद १४-१५ कि.मी. बऱ्याचदा मागे टाकलंय आम्ही. चखणा म्हणून चिकन मसाला (हा कोण चिकन बनवण्याचा मसाला नाही बरं.. ही एक डिश आहे भारी) म्हणजे एकदम आहाहाहा....!
या सगळ्यांचा आस्वाद घेत हॉटस्टारवर आम्ही सामना बघत होतो. हरमनप्रीत खेळत असल्यामुळे भारताने एव्हाना जश्नाची तयारी सुरू केली होती. पक्याने सगळ्यांना मोबाईल बंद करण्यास सांगितले. फक्त सामना ज्या मोबाईलवर बघत आहोत तो सुरू ठेवू या, असं सुचवलं. आम्हाला कळत नव्हतं हा असं का म्हणतोय ते. जब्यानेही त्याला पुष्टी जोडताच आम्ही जास्त खोलात न जाता मोबाईल बंद करून सामना बघण्यात गुंग झालो. थोड्या वेळाने गोप्याला एक कॉल आला, (त्याच्याकडे दोन मोबाईल होते. त्याने एकच बंद केला होता) म्हणून तो थोडा बाहेर जाऊन बोलू लागला. अर्धा-एक तास बोलल्यावर तो परत येताच त्याला सगळ्या माहोलचा इचका झालेला दिसला. भारतीय महिला फलंदाज निराश होऊन मैदान सोडत होत्या. शेवटच्या पाच फलंदाजांना दोन अंकी धावाही जमवता आल्या नव्हत्या. हे इतकं अनपेक्षित होतं, जणू कुणाची नजर लागावी. इंग्रज महिला 'दुगना लगान' वसूल झाल्याच्या खुशीत नाचत होत्या. पुरणपोळीचा घास त्यांनी 'ते बघ विमान आलं' म्हणून पळवून नेला होता. इकडे आमची झिंग उतरून डोळे घुबडासारखे एकमेकांकडे बघत होते. एव्हाना गोप्याला त्याची चूक कळली होती. रडक्या सुरात तो म्हणाला, "कॉल दत्त्याचा होता." सगळ्यांनी डोक्यावर हात मारला. या महान हस्तीचा संपर्क होऊ नये म्हणूनच पक्याने सगळ्यांना फोन बंद करण्यास सांगितलं होतं. हा दत्त्या म्हणजे पराकोटीचा अपशकुनी माणूस. अर्थात सगळे योगायोगच म्हणा. पण या घटनेपासून त्याच्या अपशकुनीपणाच्या सगळ्या घटना डोळ्यासमोर स्लाईड शो करत निघून गेल्या आणि त्याच्या अपशकुनीपणावर नकळत विश्वास बसला.

तशी ह्या अपशकुनी विनोदी पात्राची पहिली गाठ कधी पडली हे जरी स्पष्ट आठवत नसलं, तरी पहिला किस्सा स्मरणात आहे. वसतिगृहात रॅगिंगची भीती असल्यामुळे प्रथम वर्षात बाहेर खोली घेऊन राहायचा शिरस्ता होता. खोलीसमोरला रस्ता ओलांडला की एक भलं मोठं अपार्टमेंट लागायचं. त्यात माझे काही वर्गमित्र राहायचे. पण अगदी सुरुवातीला कोणीच कोणाला ओळखत नव्हतं. नाही म्हटलं तरी गोप्या, किसना, जब्या यांची ओळख झाली होती आणि पक्या तर माझा खोली मित्रच होता. तर सर्वमताने पहिल्या श्रावण सोमवारी मंदिरात जाण्याचं ठरलं. मी मंदिराकडेच काम असल्यामुळे परस्पर बाकीच्यांना सामील होणार होतो. तर श्रावणातल्या पहिल्या सोमवारी खडकेश्वर येथील शिवमंदिरात आम्ही दर्शनासाठी रांगेत लागलो. पहिलाच श्रावण सोमवार असल्याकारणाने आमच्या सारखे हवशे-नवशे सगळेच रांगेत असल्यामुळे तुफान गर्दी होती.

"बाबो, इतकी गर्दी... महादेवाला ओव्हर टाईम करावा लागतो वाटते आज." मागून एक अपरिचित आवाज आला. हळूहळू रांग पुढे सरकत होती. स्पीकरवरून भक्तांसाठी सतत सूचना येत होत्या - रांगेत लागा, घाई करू नका, चांगल्या कामाला उशीरच लागतो, प्रशासनाला सहकार्य करा. याबरोबरच चपला कुठे काढाव्या, लहान मुलांना सांभाळा. पाकिटमार, खिसेकापूंपासून सावधान. सोनं, मोबाईल अशा किंमती वस्तू सांभाळा इ.इ.

"जे लोक फक्त श्रावण सोमवारसारख्या दिवशीच दर्शनाला येतात, त्यांच्या मनोकामना कधीच पूर्ण होत नाहीत." परत तोच आवाज. आवाज तर ओळखीचा वाटत नव्हता, म्हणून मागे वळून पाहिलं. सावळासा रंग, केस याने नीट लावले नव्हते की न्हाव्याने व्यवस्थित कापले नव्हते काय कळतं नव्हतं, पण त्यांची अवस्था गारपीटग्रस्त वा अतिवृष्टी झालेल्या पिकांसारखी होती. काही उभे, काही वाकडे अन काही एकदमच भुईसपाट. डाव्या हनुवटीवर ठळक उठून दिसणारा काळाकुट्ट मस. अंगात राखाडी रंगाचा शर्ट आणि पांढरी पँट (श्रावणात पांढरी पँट घालायला हिम्मत लागते भाऊ). पायात एकदम निकृष्ट दर्जाची स्लीपर (पावसाळ्यात पांढऱ्या पँटवर स्लीपर घालण्यासाठी पार्श्वभागात दम असावा लागतो भावड्या). तर या स्लीपरमुळे पायाचा अंगठा आणि पहिलं बोट यामध्ये आपण पिठाची पातळ लापशी करतो ना, अगदी तसंच द्रव खिदळत होतं. त्याच्या पँटची मागून काय हालत झाली असेल याची कल्पना मला आली. किसना मागून टपली मारून म्हणाला, "तुला काय करायचं बे लोकांच्या मनोकामनेशी? तू तुझं बघ ना."

प्रत्युत्तरात अनोळखी आवाज म्हणाला, "अरे, ही काळ्या जबानीच्या भटाची वाणी आहे, तू बघ नाही तर कोणाचीच मनोकामना पूर्ण होणार नाही." आजही या वाणीत दम असल्याचं जाणवतं. खरं सांगतो, आमच्या मनोकामना आटोकाट प्रयत्न करूनही आजवर पूर्ण झालेल्या नाहीत आणि पूर्ण होण्याची कुठलीही शक्यता अजूनतरी नजरेस पडत नाही.. :( असो. त्याला इतक्या वेळ माझ्याकडून अपेक्षित प्रतिसाद न आल्यामुळे, मी त्याला ओळखत नाही हे त्याने लगेचच ताडून म्हटलं, "तू असा अनोळख्यासारखा का वागतोस? मी तुझ्याच वर्गातला आहे, 'दत्तात्रय किटेकर'." हस्तांदोलनाचं आमंत्रण देत तो म्हणाला. म्हणजे अरेच्चा, ही मागची बडबडी व्यक्तीसुद्धा आमच्याच बरोबर होती. मी लगेचच त्याला 'दत्त्या' म्हणून आमच्यातील (खरं म्हणजे माझ्यातील) अवघडलेपणा दूर केला.

माझ्यापुढे दोन-तीन म्हातारे लोक होते. त्यांना उद्देशून दत्त्या म्हणाला, "या म्हाताऱ्यांची काय मनोकामना राहिली बापा आता? पिकलं पान गळायचा तेवढा अवधी." यावर समोरील म्हातारीने मागे बघून दत्त्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकला.
"पण काही म्हातारे लोकसुद्धा किती जवान दिसतात, नाही?" यावर दर्शन होईस्तोवर परत कधी म्हातारीने मागे वळून पाहिलं नाही. असेच दत्ताभाऊंचे टोमणे झेलत झेलत मुख्य गाभाऱ्यापाशी दर्शन घेत असता दत्ताचा आवाज आला, "प्रसाद". मागे वळून बघतो तर दत्ता चक्क पुजारीबाबांसमोर हात पसरत उभा होता. पुजारीने वाटीतली साखर देत असतानाच ,"साखर नको हो, नेहमीचा प्रसाद द्या ना, पेढा." विचित्र हसत अजून दत्ता त्याच अवस्थेत होता. त्या बिचाऱ्या भटाने आपल्या अखत्यारीतला पेढा काढून शिरजोर भटाच्या हातावर टेकवला. सुवर्णपदक मिळाल्याच्या विजयी मुद्रेने आम्ही बाहेर पडलो. असा हा दत्त्या कधी काय म्हणेल, काय करेल याचा नेम नसायचा.

एके दिवशी सकाळी ९च्या दरम्यान एक सद्गृहस्थ वसतिगृहात आले. "पुरुषोत्तम आंबिवडेकर कुठे राहतो?"
किसन्या माझ्याकडे बघून नकारार्थी मान हलवत त्यांना म्हणाला, "या नावाचं कुणीच राहत नाही या वसतिगृहात."
"शासकीय मुलांचे वसतिगृह ना हे?"
किसन्या खिदळत म्हणाला, "शासकीय मुलांचे नाही हो, मुलांचे शासकीय वसतिगृह आहे."
मी त्याला ढोपराने शांत करत म्हटलं, "पण काका, इथे पुरुषोत्तम आंबिवडेकर नावाचा कुणीच राहत नाही."
तेवढ्यात गोप्या आला. "काका, तुम्ही? या ना दत्तात्रयची खोली हवीय ना?"
गोप्या आणि दत्त्या बारावीला बरोबर शिकल्यामुळे यांचा परिचय होता. आम्ही मात्र दत्त्याच्या दुसऱ्या नावातच (पुरुषोत्तम आंबिवडेकर) गुरफटून गेलो होतो. एखाद्याची दोन नावं असू शकतात, पण इथे तर आडनावातही झोल होता. या हस्तीचं घरचं नाव-आडनाव हजेरीपटावरल्या नावापेक्षा वेगळं होतं. कुणाचे पालक वसतिगृहात आले की, आम्ही त्यांना त्यांच्या पाल्याच्या खोलीवर तडक नेत नसू. पहिले किसन्याच्या खोलीवर नेत असू. किसन्याची खोली नेहमी स्वच्छ असे आणि पाल्याला सिगारेटची थोटकं, अ‍ॅश ट्रे (हा पाण्याची बाटली कापून तयार केलेला असे), माचिस, बियरच्या बाटल्या यांची विल्हेवाट लावायला थोडा अवधी मिळावा, हे यामागचं प्रयोजन.

किसन्याच्या बेडवर बसून बिपाशाचं मादक चित्र न्याहाळताना काका म्हणाले, "ही पुरुषोत्तमची खोली नाही वाटतं."(आमच्या भुवया उंचावल्या. मनात म्हटलं, इथे तरी बिपाशाच्या अंगावर कपडे आहेत. मला दत्त्याच्या खोलीतलं मल्लिकाचं अतिमादक चित्र आठवलं.)
गोप्या म्हणाला, "हा त्याची खोली दुसरी आहे काका, तो आंघोळीला गेलाय. खोलीला कुलूप होतं. जाऊच आपण त्याची आंघोळ झाली की त्या खोलीवर."
"अरेरे, ९ वाजता आंघोळ! (जणू काही दत्त्याने धर्म भ्रष्ट केलाय, असा भाव काकांच्या चेहऱ्यावर होता.) घरी होता, तेव्हा ६ वाजता पूजा करायचा. वसतिगृहात मुलं बिघडतात हेच खरं." अत्यंत त्रासिक चेहरा करून गळ्यातील रुद्राक्षाची माळ कपाळाला टेकवत काका म्हणाले. मी तेथे बिना दात घासायचा उभा आहे हे जर काकांना कळलं असतं, तर त्यांनी मला नक्कीच गोमूत्राने गुळणा भरायला लावला असता. दत्त्याचे खरे कारनामे समजले असते, तर काकाला आत्ताच I.C.U.मध्ये दाखल करावं लागलं असतं.

तेवढ्यात दत्ता तेथे हजर झाला. जवळ जाऊनही हा दत्त्या आहे म्हणून ओळखू येत नव्हता. आज्ञाधारक मुलाप्रमाणे चपटा भांग, जीन्स-टी शर्ट, पायात adidasचा बूट (रोज संडासची चप्पल घालून फिरणाऱ्या दत्त्याकडे हे बूट आहेत, हे पाहून आम्ही सगळ्यांनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिलं.) आदिदासच्या बुटांवर तीन तिरप्या रेषा असतात, पण इथे चार होत्या. जवळ जाऊन पाहतो तर ते abidasचे बूट होते. (मनात म्हटलं - च्यायला, या माणसाचं सगळंच नकली असतं.) पावडर फासून सावळ्याचा सेमी-गोरा होण्याचा प्रयत्न झालेला दिसत होता.

दत्त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर, 'ये है मेरा शेर बाकी तुम सब भेडियां' हा भाव होता. थोड्या वेळ किसन्याच्या रूमवर बसून मग आमची वरात दत्त्याच्या खोलीकडे निघाली. खोलीमध्ये चहूकडे चंदन अगरबत्तीचा सुगंध दरवळला होता. (दत्त्याने पहिल्यांदा माचिसचा सदुपयोग केला असेल.) बाकी खोली होती तशीच होती. फक्त सिगारेटची थोटकं, अ‍ॅश ट्रे, बियर बाटली कुठे दिसत नव्हती. बेडवरची चादर तीच होती, फक्त पलटी मारून अंथरलेली होती. (एकाच चादरीचा एवढा सुरेख आणि पुरेपूर वापर फक्त दत्त्याच करू शकतो). फॉरेन्सिक मेडिसिनचं पुस्तक उघडून टेबलावर ठेवलं होतं. मल्लिकाची जागा श्री गणेशजींनी घेतली होती. (दत्त्या नेहमी खिळ्यालाच चित्र का टांगत असे, ते आत्ता समजलं होतं. बदलायला सोपं जातं म्हणून. त्याला बापाच्या धाडसत्राची पूर्वकल्पना असावी.) आता दत्त्याच्या खोलीपुढे किसन्याची खोली म्हणजे रविवारचा बाजार वाटत होता. अशा प्रकारे अचानक धाड टाकलेल्या बापाला त्यांच्याच 'सव्वाशेराने' खुबीने कटवलं होतं. दत्त्याची खोली परत जैसे थे व्हायला अवघे २४ तास भरपूर होते.

पुढच्या टाकलेल्या धाडीतही दत्त्या थोडक्यात वाचला होता. दत्त्या पहिल्या वर्षी नापास झाल्यानंतर काकांनी गोप्याला त्याला घेऊन अभ्यास कर अशी विनंती केली होती. गोप्यानेही ती उशिरा का होईना, स्वीकारत शेवटच्या वर्षी त्याच्याबरोबर अभ्यास केला. दत्त्या तर काही पास झाला नाही, गोप्याचा मात्र एक विषय गेला. मोसाद एजंटप्रमाणे अचानक टाकलेल्या पुढच्या वर्षाच्या धाडीत मात्र दत्त्या गारद झाला. बापाला खोली माहीत झाल्यामुळे कुठलीही संधी न देता धाड पडली. सिगारेट, बियर बाटल्यांसहित दत्त्या अगदी रेड हँड पकडला गेला. बाप त्याला १०-१५ दिवस घरी घेऊन गेला. मस्त 'झंडू बाम ट्रीटमेंट' दिली असणार. याआधीही त्याने पहिल्या वर्षी नापास झाल्यावर १०-१५ दिवसांच्या सुट्ट्यांचा आस्वाद घेतलेला होता.

घरून आल्यावर दत्त्या 'दत्तात्रय' बनला होता. सकाळी ६ला आंघोळ करून तयार असायचा. पूजापाठही करत असेल कदाचित. एकूणच आमूलाग्र बदल दिसत होता. घरी बापाने त्याचा मेंदू धुऊन काढला होता (ब्रेन वॉशिंग). पण त्यावर लवकरच गंज चढणार याची आम्हाला खातरी होती. दत्त्या म्हणजे कुत्र्याची शेपूट होतं. नळीत घालता नळी वाकडी होईल, पण शेपूट सरळ होणार नाही.

दर महिन्याला घरून येणारे ५ हजार रुपये घसरून ३ हजार झाले होते. पैसे कमी पाठवले तर याचे षौक बंद होतील, असा बापाचा सरळ हिशोब. त्याला जेवणखाण्यासाहित आपले षौक पुरवणं अशक्य होऊ लागलं.
'संकटकाळी जो मदत करतो, तोच खरा मित्र' या उक्तीला जागून हळूहळू आम्ही त्याला सिगारेट शेयर करू लागलो. इतरही गोष्टींचं तसंच. दत्त्या परत माणसात आला. सिगारेट, बियर अगदी अगदी जैसे थे झालं. ३ हजारात षौक पूर्ण होत नाहीत, म्हणून दत्त्याने एका पान टपरीवाल्याशी सलगी वाढवून उधारी केली. नियमित त्याकडून सगळे सिगारेट घेत असल्यामुळे त्याचा दत्त्यावर विश्वास होताच. तुम्हाला खोटं वाटेल, पण वसतिगृह सोडण्याच्या आधीपर्यंत उधारीची थकबाकी होती तब्बल २५ हजार रुपये. यावर दत्त्याला छेडताच तो म्हणे, "एका पगाराची गोष्ट आहे ही फक्त." वैद्यकीय अधिकारी होऊन पहिल्या पगारात उधारी फेडतो, म्हणून आधार कार्डची एक प्रत टपरीवाल्यापाशी ओळख म्हणून ठेवली होती. वरून बापाचा फोन नंबरही दिला होता. रुजू झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत जर उधारी फेडली नाही, तर घंटी सरळ माधवराव किटेकरांच्या फोनची वाजणार होती. इतकं असूनही दत्त्या मात्र बिन्धास होता. त्याची उधारी ऐकून आमचे दात घशात जायची वेळ आली होती.

दुपारच्या जेवणानंतर आख्खं वसतिगृह अजगरावस्थेत पडलेलं असताना दत्त्या आणि मी चकाट्या पिटायचो. त्यात जागतिक दर्जाचे विषय चर्चिले जायचे. त्यापैकीच एक म्हणजे दत्त्याचं लग्न. म्हंटलं, "दत्त्या, तुझ्या लग्नात लय मजा येणार लेका."
"छ्या, आपण नाही करणार लग्न." दत्त्या म्हणाला.
याला मध्ये मध्ये असे झटके येतात हे माहीत होतं, पण तरी दुपारी असंही काय करणार, म्हणून मी चर्चा पुढे रेटत विचारलं, "का रे ?"
पलंगावरून उठून दत्त्याने खिडकीत ठेवलेली मधाची वाटी माझ्या हाती दिली. त्याला भरपूर माश्या बिलगलेल्या होत्या. दत्त्या म्हणाला, "यातली एकतरी माशी हाकलून लाव."
मी थोडा प्रयत्न केला, पण लगेच लक्षात आलं. म्हंटलं, "अरे, यांच्या पंखांना मध चिटकल्यामुळे त्यांना उडता येत नाही."
दत्त्या म्हणाला, "मोह, वासनासुद्धा अशाच असतात. त्यांच्या मागे लागलं की आपणही त्यात खोल खोल गुंतत जातो आणि कधी आपल्या पंखांना मध चिटकतो, कळतही नाही. आपल्याला होणारी पोरं, त्यांच्याबरोबर परत 'अबकड' शिकायचं म्हणजे अधोगतीच नाही का? सगळं सोडून त्यांच्याकडे लक्ष ठेवा, त्यांना मोठं करा. कशासाठी? तर आनंद मिळतो म्हणून, कशासाठी? तर म्हातारपणाच्या आधारासाठी. आज ज्यांना मुलं आहेत, ते सगळे सुखी आहेत का? काहींना तर मुलं वागवत नसल्यामुळे, मुलं नसती तर ती जास्त सुखी असती अशी परिस्थिती आहे. ही सगळी स्वप्नं सत्यात उतरली असती, तर वृद्धाश्रम स्थापन झाले असते का? त्यापेक्षा नको ते लग्न आणि नको ती पोरं-सोरं." असा हा आमचा दत्त्या कधी कधी टोकाची भूमिका घेई. पण पुढच्याला विचार मात्र करायला लावे. थोडा वाव मिळाला की समोरच्याला आपल्या तत्त्वज्ञानाचे डोस पाजी. रोज कॉलेजच्या पोरी खालून वरून न्याहाळणारा हा आणि याला अचानक इतकं ज्ञान कुठून प्राप्त झालं, तेच मला कळेना. त्याच्या लग्न संकल्पनेवर भरपूर वाद-विवाद घालावेसे वाटत. पण काही माणसांचं फक्त ऐकायचं असतं, अशी त्याची वर्गवारी होती.

भारतीय पुरुष संघाचा कुठलातरी क्रिकेट सामना चालू होता. आपली फलंदाजी सुरू होती. सगळे उपाहारगृहात सामना बघत बसले होते. दत्त्या आला नि म्हणाला, "काय झाला रे स्कोअर?"
त्याच बॉलला विकेट पडली. सगळे दत्त्याकडे पाहायला लागले. त्याला कॉल आला, म्हणून सगळ्यांच्या नजरा चुकवत तो बाहेर निघून गेला. थोड्या वेळाने चुपचाप येऊन एकदम मागे माझ्या बाजूला बसला. दोन मिनिटांत परत दोन विकेट्स पडल्या. समोर बसलेल्या दिन्याने मागे वळून कुठे दत्त्या आहे का पाहिलं.
तेथूनच तो ओरडला, "दत्त्या, ऊठ, भो**च्या! ऑल आऊट करतो की काय आता?" सगळ्यांच्या रेट्यामुळे दत्त्याला तेथून उठावं लागलं. विकृत हसत दत्त्या बाहेर पडला.

दत्त्या गेल्यावर टीमची गाडी रुळावर आली. चांगली १००-१५० धावांची भागीदारी झाली. नाही म्हणायला मध्यात २-३ विकेट गेल्याच म्हणा. पण त्यांनीही थोडाफार हातभार लावल्यामुळे भागून गेलं. पण परत गळती लागली. २-३ विकेट्स सलग पडल्या. दिन्याने परत मागे वळून पाहिलं. पण दत्त्या कुठे सापडला नाही. अखेर शेवटचीही विकेट पडली. शेवटच्या ४ फलंदाजांना एकूण २० धावाही काढता आल्या नाहीत. म्हंटलं, "बघा बरं, दत्ता नसतानाही विकेट पडल्याच की नाही? उगाच आपण सगळे बिचाऱ्याला अपशकुनी म्हणून सहभागी करत नव्हतो." उठताना माझं लक्ष उपाहारगृहाच्या डाव्या खिडकीत गेलं. मला घेरी यायचीच बाकी होती फक्त, कारण दत्त्या खिडकीतून सामना बघत होता.

असा हा आमचा आवली दत्ता. त्याला चिडवल्याचंही काहीच वाटत नसे, राग तर अजिबात नाही. कुठे महत्त्वाच्या कामाला बाहेर जायचं असेल, तर कधी कधी आपणहूनच म्हणे, "मी राहतो इथेच. उगाच तुमचं काम अडायचं माझ्यामुळे." त्या वेळी मात्र त्याची खूप कीव येई. अशा वेळी आम्ही त्याला, "तू चल रे भावा, काम नाही झालं तरी चालेल. कोई दोस्त पनौती नहीं होता और दोस्त से बढकर कोई काम नहीं होता." असं म्हणत असू अन काम नाही झालं की त्यालाच शिव्यांची लाखोली वाहिली जाई. एकदा मित्रांसोबत गोव्याला जायला निघालो. निघायच्या आधी दत्त्याचा फोन. गोव्याला जाईपर्यंत इतक्या अडचणी आल्या की सांगता दम लागेल. अक्षरशः चश्मा तुटण्यापासून ते महामंडळाची बस पंक्चर होईपर्यंत. गोवाची हवा अर्ध्या रस्त्यातच गेली होती.

वसतिगृहात 'शनी लागणे'च्याऐवजी 'दत्तू किटेची सावली पडली की काय?' असा नवीन वाक्प्रचार उदयास आला होता. आपण सगळे विज्ञानाचे विद्यार्थी आहोत. आपल्याला अशा अपशकुनी, पनौती, शनी ह्या गोष्टी शोभत नाहीत... मान्य. पण असं खरंच घडत होतं. काही महत्त्वाच्या निर्णयात याला माणुसकीच्या नात्याने सामील करावं, तर ते काम अडून बसे. म्हणून सगळे याला महत्त्वाच्या वेळी टाळत. अगदी परीक्षेच्या आणि निकलाच्या दिवशी याच्या खोलीची बाहेरून कडी लावण्यात येई. याचं तोंड दिसू नये म्हणून. पास झाल्यानंतर मात्र पहिला पेढा दत्त्यालाच भरवण्यात येई. तोंड दाखवलं नाहीस म्हणून. अशा प्रकारे दत्त्याला जीवही तेवढाच लावला जाई. वसतिगृहातल्या बहुतांश पार्ट्यांना दत्त्या हजर असायचा. त्याच्याशिवाय पार्टी म्हणजे बिना विदूषकाची सर्कस. दत्त्यामुळे पार्टी एका वेगळ्याच कक्षात जाई. चखण्यासाठी खाली पेपर टाकण्यापासून ते पॅक भरण्यापर्यंत सगळी महत्त्वाची कामं त्याकडे असत. पॅक भरता भरता एखाद्या नवशिख्याला तो ज्ञानाचे दोन थेंब पाजूनच टाकी. खाली पेपर टाकताना दुहेरी टाकावा, तेलकट वा ओलसर पदार्थ पेपरवर कधीच ठेवू नयेत. चखणा खाताना गरम गरम पदार्थ आधी खावेत, बियर असल्यास पॅक भरताना ४५ अंशाच्या कोनात भरावा इ.इ. पार्टीत तो भडक लाईट नेहमी बंद करण्यास सांगे. त्याने दारू कमी चढते म्हणे. गाण्याची पसंतीही शांत, काळीज चिरत जाणाऱ्या दर्दी गाण्यांना असे. पार्टीचा माहोल एकदम मादक होई. न पिणाऱ्यांनाही झिंगल्यासारखे वाटे आणि पिणाऱ्यांची अवस्था तर आपण इंद्र दरबारात आहोत की काय अशी होई. इंद्र अर्थात 'दत्तात्रय किटेकर'. खिशात खडकू नसताना भावाच्या पार्ट्या कधी चुकल्या नाहीत. सगळे त्याला हातचा एक म्हणून बिनातिकीट सामील करून घेत.

दत्त्याच्या भावांमध्येसुद्धा त्यासारखेच काहीना काही खट्याळ गुण होते. दत्त्या शेंडेफळ, मधला भाऊ खूप हुशार (असं ते म्हणतात), आणि मोठा भाऊ या सगळ्या खटाळ्यांचा विभागप्रमुख. मोठा महेश मुंबईला असे, तर मधला जयेश पुण्यात. घरी जाताना यांना औरंगाबादवरून जावं लागे. मग सुट्टयात नेहमी आमच्या वसतिगृहात दिसत. मधल्या हुशार भावाशी अशीच एकदा गाठ पडली. गोप्या त्याला म्हणाला, "चला सिनेमाला जाऊ."
"कोणत्या...?" जयेश तोऱ्यात म्हणाला. (हे साहेब नेहमी तोऱ्यातच असतात).
"सरबजीत..!" गोप्या.
"पाहिला आहे मी."अगदी त्याच तोऱ्यात. याचा तोरा पाहून मला खरं तर बोलायचा कंटाळा आला होता. पण तरी मित्राचा भाऊ काय नि आपला भाऊ काय, एकच... म्हणून मी म्हटलं, "थेटरात पाहिला का ?"
"नाही मोबाईलवर." जयेश.
"अरे, पण आजच आला ना सिनेमा? लगेचच मोबाईलवर कसा येणार?" गोप्या आश्चर्याने म्हणाला.
"पुण्यात त्याच दिवशी येतो मोबाईलवर प्रत्येक सिनेमा."
हा गमतीने बोलतोय का, तेही आम्ही तपासून पाहिलं, पण तो खरंच गंभीर होता. गोप्या आणि मी एकमेकांकडे पाहत काहीही न बोलता तेथून काढता पाय घेतला. हे म्हणजे सरळ सरळ आम्ही औरंगाबादमध्ये राहतो म्हणून मागास म्हणण्यासारखं होतं. माणसाने कुठपर्यंत पुड्या सोडाव्यात यालाही काही मर्यादा असावी. हा भाऊ B.A.M.S. होता. आयुर्वेदशास्त्राच्या प्रगतीचे अडथळे झटकन माझ्या लक्षात आले.

मोठा भाऊ महेश. आम्ही पहिल्या वर्षात असताना तो अंतिम वर्षात होता. आम्ही अंतिम वर्षात आलो, तरी त्याला अंतिम वर्ष सोडावंसं वाटत नव्हतं. कित्येक बॅच त्याला ज्युनिअरच्या सिनियर झाल्या असतील. पण पडलो तरी नाक वरच! वाढत्या वयात पोराचा आनंद हिरावून घेता कामा नये, म्हणून कंटाळून समजदार बापाने पोराचं लग्न लावून दिलं. काही दिवसांत बाप (महेश) कॉलेजात, तर लेकरं शाळेत बसून डब्बा खातील. पण हा भाऊ काय पास व्हायचा नाही. दत्त्याला सहजच एके दिवशी विचारलं, "तुझा मोठा भाऊ काय करतो रे ?"
तो निरागसपणे म्हणाला, "K.E.M.ला आहे अंतिम वर्षात." ऊर भरून आला. म्हटलं, बघा, भाऊ इतक्या सुप्रसिद्ध वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असतानासुद्धा चेहऱ्यावर थोडाही अहंभाव नाही. सगळ्या वसतिगृहात दत्त्याच्या सुशिक्षित परिवाराची जाहिरात आम्ही करून टाकली. जाहिरातीचा पहिला बकरा होता 'अन्या.'
मोठ्या भावाचं वसतिगृहात आगमन होताच, मार्गदर्शन घ्यायला अन्या हजर.
"सर, कोणतं पुस्तक वाचू? क्लास कोणते लावू? ठरावीक वाचू की सगळं वाचू?" इ. इ. असंख्य प्रश्न विचारले.
महेशनेही लगेचच प्रतिसाद न देता, एक सराईत डॉक्टरप्रमाणे पहिले हात-पाय, तोंड धुऊन आला. कपडे बदलले, आरशात बघून केस नीट लावून घेत म्हणाला, "त्याचं असं आहे ना, आमच्या मुंबईत मुलं अमकं अमकं पुस्तक वापरतात. क्लासचं विचाराल तर हेच छान आहेत. तशे तेही चांगले आहेत म्हणा, पण मला विचाराल तर मी हेच सुचवेन" इ. इ. अहो इतकंच काय, काय काय वाचायचं हेदेखील सांगितलं. वैद्यकीय क्षेत्राविषयी भरपूर मार्गदर्शन केलं. आम्ही सगळे भारावलो. म्हटलं, भाऊ असावा तर असा! आम्ही तेव्हा जेमतेम पहिल्या वर्षात असल्यामुळे आम्हाला वैद्यकीय क्षेत्र एवढं परिचयाचं नव्हतं. काही दिवसांनी डॉ. महेश किटेकर यांची मला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट (मराठीत काय म्हणतात बुवा?) आली. प्रोफाईल तपासताच मला धक्का बसला. भाऊ K.E.M. रुग्णालयात फिजिओथेरपी करत होते. हे तर चहावाल्याने यशस्वी उद्योगपती कसं व्हावं असं सांगण्यासारखं होतं. (फिजिओथेरपीवाल्यांना कमी लेखण्याचा उद्देश नाही. पण त्यांनी M.B.B.S.वाल्यांना मार्गदर्शन करणंसुद्धा पटत नाही ना. :)
वास्तविक त्यांच्या अभ्यासक्रमापेक्षा आमचा खूप सखोल असतो. तरी त्याने सगळं आत्मविश्वासाने आमच्या माथी मारलं होतं. यावर चिडून सगळे दत्त्याच्या खोलीवर जाताच बत्तिशी दाखवत तो म्हणाला, "मी कुठे म्हणालो तो M.B.B.S. आहे म्हणून? मी फक्त K.E.M.ला आहे म्हटलं." असे हे किटेकर म्हणजे जरा विचित्रच होते.

एकदा मोठा भाऊ आणि दत्त्या मुंबईला जात होते. रेल्वेत जागा आरक्षित केलेली होती. जागेवर बसताच थोड्या वेळाने एक जोडपं येऊन ही जागा आमची असल्याचा दावा करू लागलं. भरपूर वेळ यांची हुज्जत चालू होती. कोणीच नरमाईने घेईना. त्या जोडप्याचा जागा क्रमांक, बोगी क्रमांक सगळं बरोबर होतं. दत्त्याचंही बरोबर होतं. रेल्वे विभागाकडून अशी चूक कशी झाली याने सगळे अचंबित झाले. तरी त्यांची हुज्जत घालणं सुरूच होतं. एका भल्या गृहस्थाने मध्यस्थी करत दोघांची तिकिटं पुन्हा तपासली. दत्त्याकडे चश्म्याच्या वरून बघत जवळजवळ तो खेकसलाच, "कालच आहे हे तिकीट." जोडप्यातल्या पुरुषाने या दोघा भावांना अक्षरशः धक्के मारून बाहेर काढलं.

या सगळ्या कुटुंबात वडील मात्र खूप हुशार आहेत. आपल्या मुलांची हुशारी लक्षात घेता त्यांनी सगळ्या भावांना अकरावी-बारावीत महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शिकण्यासाठी ठेवलं आणि mkb बॉर्डरचं आरक्षण घेऊन घेतलं. दोन भावांनी याचा यथोचित फायदा जरी घेतला नसला, तरी शेंडफळाने अडकेपार झेंडा फडकवला. अवघ्या १४६ गुणांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याचा नंबर लागला. या कुटुंबाची विना आरक्षण कल्पनाही करवत नाही...

--------------*--------------

पार्टीचं निमित्त होतं दत्ता M.B.B.S. पूर्ण झाल्याचं. नेहमीचेच वळू हजर असल्यामुळे गप्पांना ऊत आला होता. इथून पुढे सगळ्यांचे रस्ते वेगवेगळे असणार होते. भेट झालीच तर तो निव्वळ योगायोग असणार होता. आजवर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. पण पहिल्या श्रावण सोमवारी 'कोणाचीच मनोकामना पूर्ण होणार नाही' असं सांगणाऱ्या दस्तुरखुद्द दत्तूभाऊंची काय मनोकामना होती, याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. त्या अनुषंगाने जब्याने दत्त्याला छेडताच सगळ्यांच्या नजरा दत्त्यावर रोखल्या होत्या. दत्त्यानेही चोरटा कटाक्ष सगळ्यांकडे टाकत शांतपणे खाली मान घालून उत्तर दिलं, "देवा, ह्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे...!"

(त्यानंतर मात्र आम्ही आमच्या त्या मनोकामना कधीतरी पूर्ण होतील अशी भाबडी आशा सोडून दिली).

Footer

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

17 Oct 2017 - 9:18 am | जेम्स वांड

आवडलं व्यक्तिचित्रण! जबरी रंगवला तुम्ही दत्तू.

सुखीमाणूस's picture

17 Oct 2017 - 9:45 am | सुखीमाणूस

छान व्यक्तिचित्रण
पहिलाच लेख हा वाचला आणि खुप आवडला.
उरलेला अन्क वाचायची उत्सुकता वाढली.

पगला गजोधर's picture

17 Oct 2017 - 3:25 pm | पगला गजोधर

रिफ्रेशिंग !

बोका-ए-आझम's picture

17 Oct 2017 - 4:58 pm | बोका-ए-आझम

सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे यात स्वतःला तुम्ही मागेच ठेवलेलं आहे आणि सगळा फोकस दत्तूवर ठेवलेला आहे.

गुल्लू दादा's picture

22 Oct 2017 - 8:57 pm | गुल्लू दादा

तुमच्या निरीक्षण शक्तीला सलाम..:)

स्वाती दिनेश's picture

17 Oct 2017 - 5:02 pm | स्वाती दिनेश

दत्तू किटे आवडला,
स्वाती

गुल्लू दादा's picture

17 Oct 2017 - 11:11 pm | गुल्लू दादा

धन्यवाद जेम्स वांड, सुखीमाणूस, पगला गजोधर, बोका भाऊ, स्वाती दिनेश. इतक्या छान प्रतिसादांनी प्रसन्न वाटते आहे.

Naval's picture

17 Oct 2017 - 7:43 pm | Naval

खूप मस्त लिहिलंय... आमच्या कॉलेजच्या ग्रुप मधल्या मित्राची आठवण आली. रंगपंचमीला वापरलेला टी शर्ट ,झिजेलल्या स्लीपर्स आणि हातात एक पेन्सिल असं ध्यान... नित्या !! प्रखर बुद्धिमत्ता ,मेंटल फिक्स्डनेस नाहीच कशात. आता हा मित्र लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकून उत्तम नोकरी करतो.

गुल्लू दादा's picture

17 Oct 2017 - 11:01 pm | गुल्लू दादा

Naval तुमचा नित्या पण अजब रसायन दिसतं आहे आमच्या दत्त्या सारख. प्रतिक्रियेसाठी आभारी आहे.

अगदी !! इतिहास निर्माण करू शकतात हे नग... साबणाच्या वड्या होणं त्यांना जमतच नाही.

अभिजीत अवलिया's picture

17 Oct 2017 - 8:29 pm | अभिजीत अवलिया

आवडले.

राघवेंद्र's picture

17 Oct 2017 - 9:24 pm | राघवेंद्र

दत्या आवडला. कॉलेज मधले काही चेहरे आठवले.

जुइ's picture

17 Oct 2017 - 10:42 pm | जुइ

व्यक्तिचित्रण आवडले. अतिशय खुमासदार!

गुल्लू दादा's picture

17 Oct 2017 - 11:13 pm | गुल्लू दादा

धन्यवाद @अभिजीत अवलिया, राघवेंद्र, जुइ इ.

थॉर माणूस's picture

17 Oct 2017 - 11:48 pm | थॉर माणूस

छान रंगवले आहे व्यक्तीचित्र, दत्तूमूळे कॉलेज हॉस्टेलवरचे काही मित्र आठवले. :)

सविता००१'s picture

18 Oct 2017 - 10:09 am | सविता००१

खूप आवडलं.

टवाळ कार्टा's picture

18 Oct 2017 - 12:14 pm | टवाळ कार्टा

भारी

अमरप्रेम's picture

18 Oct 2017 - 2:51 pm | अमरप्रेम

दत्तू आवडला

नँक्स's picture

18 Oct 2017 - 3:23 pm | नँक्स

भारीच

मोदक's picture

18 Oct 2017 - 3:35 pm | मोदक

भारी...!! असे नग तीन चार वर्षे वगैरे थोडाच काळ सोबत असतात पण अक्षरश: स्वत:चा शिक्का मारून जातात.

व्यक्तीचित्र छान रंगवले आहे.. पुढील लिखाणाला शुभेच्छा..!!

अंतु बर्वा's picture

18 Oct 2017 - 8:43 pm | अंतु बर्वा

छान व्यक्तीचित्रण..!

स्नेहांकिता's picture

18 Oct 2017 - 10:11 pm | स्नेहांकिता

जबरी व्यक्तिचित्र !
शैली आवडली.

निशाचर's picture

19 Oct 2017 - 3:28 am | निशाचर

मस्त लिहिलंय!

गुल्लू दादा's picture

19 Oct 2017 - 7:37 am | गुल्लू दादा

धन्यवाद @ थॉर माणूस, सविता००१, टवाळ कार्टा, अमरप्रेम, नँक्स, मोदक, अंतु बर्वा, स्नेहांकिता आणि निशाचर. प्रतिक्रियेसाठी आभारी आहे.

mayu4u's picture

19 Oct 2017 - 10:55 am | mayu4u

दत्तू नजरेसमोर उभा राहिला.

अभ्या..'s picture

19 Oct 2017 - 1:41 pm | अभ्या..

भारीच की

मुक्त विहारि's picture

19 Oct 2017 - 5:06 pm | मुक्त विहारि

व्यक्तीचित्रण आवडले...

(आमच्या शैक्षणिक पर्वात पण एक असाच नाटेश्वर होता.)

इरसाल कार्टं's picture

19 Oct 2017 - 6:30 pm | इरसाल कार्टं

छान वाटलं वाचून

मित्रहो's picture

19 Oct 2017 - 11:07 pm | मित्रहो

दत्तू किटे, असे नग कॉलेजात सापडतात.
बाकी दोन आडनाव का ते फारसे कळले नाही.

गुल्लू दादा's picture

20 Oct 2017 - 7:46 am | गुल्लू दादा

आंबिवडेकर हे आडनाव कुळापासून चालत आलेलं. म्हणजे अगदी पूर्वजांपासून. आंबिवडेकर हे कागदोपत्री होतं का ते माहीत नाही. पण दत्ताच्या घराच्या वास्तुशांतीच्या पत्रिकेत 'किटेकर' आणि कंसात 'आंबिवडेकर' अस लिहिलेलं होतं. पूर्वी दत्तू आणि त्याच्या भावंडांनी ते बदलून किटेकर करून घेतलंय. एका मित्राचं आडनाव 'डुकरे' असता त्यांनी ते 'पाटील' करून घेतलं. बऱ्याच पाटील आडनाव असणाऱ्यांचं दुसरं कुळ आडनावही असतंच ना. तसंच हे पण प्रकरण आहे, प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.

मित्रहो's picture

23 Oct 2017 - 7:22 pm | मित्रहो

आल लक्षात
हो असे दोन आडनाव असनारे सुद्धा काही असतात.

लाल टोपी's picture

20 Oct 2017 - 2:32 am | लाल टोपी

चांगलं लिहिलं आहे आवडले.

गुल्लू दादा's picture

20 Oct 2017 - 7:49 am | गुल्लू दादा

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद @ mayu4u, अभ्या..भाऊ, मुक्त विहारि, इरसाल कार्टं, मित्रहो, लाल टोपी.

माम्लेदारचा पन्खा's picture

20 Oct 2017 - 1:19 pm | माम्लेदारचा पन्खा

असेल तर तो आत्ता कसा आहे ? बऱ्याच वेळा ही माणसं नंतर खूप बदलली आहेत असं दिसतं !

गुल्लू दादा's picture

21 Oct 2017 - 7:30 am | गुल्लू दादा

दत्ताचं MBBS पूर्ण होऊन जेमतेम 2 महिने लोटलेत. म्हणजे लेखात उल्लेख केलेली शेवटची पार्टी होऊन जास्त काळ लोटला नाहीये. पार्टी नंतर आजपर्यंत भेट झाली नाही अजून. पदवीत्तर समोरील शिक्षणाची दत्त्याची जोरदार तयारी सुरू आहे. त्याला अस्थिव्यंगोपचार शास्त्रामध्ये (orthopedics) भविष्य घडवायचे आहे. पण दत्त्याच्या स्वभावामध्ये काडीचाही फरक पडला नसेल याची पूर्ण खात्री आहे. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद...!

सिरुसेरि's picture

20 Oct 2017 - 7:39 pm | सिरुसेरि

मजेदार व्यक्तिचित्रण

एकच नंबर! भारी लिहिलंय. बरेच एकेक 'नग' आठवले. :-)

सौन्दर्य's picture

21 Oct 2017 - 12:45 am | सौन्दर्य

असे अनेक मित्र भेटतात जे आयुष्यभर त्यांची आठवण आपल्या सोबत सोडून जातात. छान लिहिलंत.

गुल्लू दादा's picture

21 Oct 2017 - 7:32 am | गुल्लू दादा

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद @सिरुसेरि, एस, सौन्दर्य.

बबन ताम्बे's picture

21 Oct 2017 - 9:40 am | बबन ताम्बे

व्यक्तिचित्र आवडले .

डॉ श्रीहास's picture

21 Oct 2017 - 11:09 am | डॉ श्रीहास

मस्त लिहीताय.... येऊ द्या अजून....

गुल्लू दादा's picture

22 Oct 2017 - 8:27 am | गुल्लू दादा

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद @बबन ताम्बे, डॉ श्रीहास सर.

नूतन सावंत's picture

22 Oct 2017 - 5:54 pm | नूतन सावंत

छान लिहिलं आहे.डोळ्यासमोर उभा केला किटेकरला.

पैसा's picture

22 Oct 2017 - 8:42 pm | पैसा

आवडले

गुल्लू दादा's picture

23 Oct 2017 - 7:21 am | गुल्लू दादा

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद @सुरन्गी, पैसा.

व्यक्तिचित्रण छानच रंगले आहे. आवडले.

गुल्लू दादा's picture

24 Oct 2017 - 7:08 pm | गुल्लू दादा

धन्यवाद जागु..!

दशानन's picture

24 Oct 2017 - 10:22 pm | दशानन

सुरेख लेखन अगदी सुरेखच!

जव्हेरगंज's picture

24 Oct 2017 - 11:46 pm | जव्हेरगंज

भारी लिहीलंय!!!

गुल्लू दादा's picture

25 Oct 2017 - 9:20 pm | गुल्लू दादा

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद@दशानन, जव्हेरगंज...:)