दृकश्राव्य विभाग :- एका दुर्गवेड्या माणसाची मुलाखत!

Primary tabs

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in दिवाळी अंक
17 Oct 2017 - 12:00 am

Header2
श्री. मारुती गोळे हे एक सामान्यांच्या गर्दीतलं असामान्य नाव! नुकताच त्यांनी आग्रा ते राजगड केवळ ३४ दिवसांत पायी चालत जाण्याचा अभिनव उपक्रम केला आहे. त्यानिमित्ताने आपल्या बुवांनी घेतलेली ही मुलाखत. ही मुलाखत जुळवून आणण्यासाठी ज्ञानोबाचे पैजार ह्यांचे विशेष आभार!


१७ ऑगस्ट १६६६ रोजी राजे आग्र्यामधून गायब झाले. त्याला १७ ऑगस्ट २०१७ रोजी ३५१ वर्षे पूर्ण झाली, म्हणून या दिवशी, १४५० कि.मी. अंतराच्या या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. "३००व्या वर्षपूर्तीला मी जन्मलो नव्हतो आणि ४००व्या वर्षपूर्तीला मी नसेन, मग 'आहे तरुण तर घ्या चालून' असे मी व माझ्या सहकार्‍यांनी ठरवले व ही मोहीम हाती घेतली." असे श्री गोळे म्हणतात.

महाराजांनी हे अंतर २२ दिवसांत पार केले होते. सुरुवातीला श्री. गोळे यांनी या मोहिमेसाठी ६० दिवसांचे नियोजन केले होते. पण जशी मोहीम सुरू झाली, तसे या मावळ्यांचे बळ वाढत गेले व ह्या मोहिमेचे ३४ दिवसांमध्ये पुनर्नियोजन करण्यात आले.

आग्र्याहून सुटकेच्या प्रवासात शिवाजी महाराजांना कोणकोणत्या अग्निदिव्यांमधून जावे लागले असेल याची किमान एक टक्का तरी जाणीव व्हावी, तसेच महाराजांच्या या मोहिमेबद्दल कमालीची गुप्तता पाळली गेली असल्यामुळे याची फारशी माहिती कोठे उपलब्ध नाही, महाराज नक्की कोणत्या मार्गाने आले याबद्दलदेखील अनेक प्रवाद आहेत, त्यामुळे महाराजांच्या या धाडसी मोहिमेची अधिकाधिक माहिती मिळवणे, हे या अभ्यास मोहिमेचे उद्दिष्ट होते.

आग्र्याला महाराजांना जेथे नजरकैदेत ठेवले होते (सध्याचे जयसिंग हाउस), तेथील माती श्री. गोळे यांनी आग्र्याहून निघताना बरोबर घेतली आहे. ही माती ते राजगडावर नेणार आहेत व तेथे या मातीमध्ये वृक्षारोपण करणार आहेत.

वाटेवरच्या काही ठिकाणी त्यांची राहायची सोय झाली, काही मराठा सरदारांनी त्यांना मदत केली, पण काही वेळा स्वतःची सोय स्वतःच करावी लागली. मुक्कामाची जागा निश्चित नसल्यामुळे, आयत्या वेळी जिथे होईल तिकडे राहून त्यांनी नेटाने ही मोहीम अंतिम टप्यापर्यंत पोहोचवली.

२०१२ पासून सुरू केलेल्या भटकंतीमध्ये श्री गोळे यांनी आतापर्यंत भारतातले व भारताबाहेरचे एकूण ५१३ किल्ले पालथे घातले आहेत. सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा-रायगड असे एकूण पाच किल्ले एकाच दिवसात (१६ तास ५५ मिनिटात, साधारण ७२ किलोमीटर ) सर करण्याचा पराक्रम त्यांच्या नावावर आहे. आजपर्यंत त्यांनी २२९ वेळा सिंहगड सर केला आहे. चिरपरिचित किल्ल्यांव्यतिरिक्त अनेक अपरिचित गुहांची व मंदिरांची भटकंती श्री. गोळे यांनी केली आहे. यामध्ये सिंधुदुर्गमधील मनसंतोष गड, मनमाडमधील गोरखगड, कर्जतजवळील मच्छींद्रगड, गडचिरोलीमधला टिपागड यांचा समावेश आहे.

अशा ह्या दुर्गवेड्या माणसाची अत्रुप्त आत्मा ह्यांनी घेतलेली मुलाखत!

धागा जड होऊ नये म्हणून प्ले लिस्ट तयार करून पहिल्या भागाची लिंक दिली आहे. पुढचे भाग आपोआप प्ले होतील.

Footer

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

17 Oct 2017 - 2:07 pm | पद्मावति

मुलाखतकारांनी मुलाखत उत्तम घेतली आहे. मुलाखत न वाटता मनमोकळ्या गप्पा मारत आहोत असे वाटत होते. बाकी श्री गोळे यांच्या कार्याबद्दल काय बोलावे __/\__ त्यांच्या निस्वार्थी वृत्तीचे, परिश्रमाचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे. कार्याविषयीची त्यांची निष्ठा आणि तळमळ त्यांच्या बोलण्यातून जाणवते.

मुलाखतकारांनी मुलाखत उत्तम घेतली आहे. मुलाखत न वाटता मनमोकळ्या गप्पा मारत आहोत असे वाटत होते.

+१
खूप छान झाली आहे मुलाखत. आग्र्याच्या मोहिमेचे अनुभवही ऐकायला आवडलं असतं. श्री. गोळे यांना मिपावर लिहिण्याची विनंती करता येईल का?

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Oct 2017 - 10:46 am | ज्ञानोबाचे पैजार

तू नळीवर "छत्रपती शिवाजी महाराजांची जगप्रसिद्ध आग्र्याहून सुटका" असा सर्च केला तर श्री मारुती गोळे यांनी केलेला या मोहीमेच्या प्रत्येक दिवसाचा व्हिडीओ पहाता येईल.
पैजारबुवा,

गुल्लू दादा's picture

17 Oct 2017 - 7:23 pm | गुल्लू दादा

खूप सुंदर मुलाखत झाली आहे...मुलाखतकारांची मेहनत. श्री गोळे यांच्या कार्याला खरंच मानाचा मुजरा.

जुइ's picture

17 Oct 2017 - 11:50 pm | जुइ

श्री. गोळे यांचे हे कार्य अगदी स्पृहणीय आणि कौतुकास्पद आहे! त्यांची मुलाखत घेतल्याबद्दल बुवांचे आभार.

मित्रहो's picture

24 Oct 2017 - 10:21 pm | मित्रहो

गप्पा मारल्यासारखी झाली मुलाखत

अभ्या..'s picture

25 Oct 2017 - 12:54 am | अभ्या..

Guruji rocks

अतिशय उत्तम झाली आहे मुलाखत. श्री. मारुती गोळे यांचं करावं तेव्हढं कौतुक कमीच आहे.

स्नेहांकिता's picture

25 Oct 2017 - 3:46 pm | स्नेहांकिता

एक अनवट उपक्रम आणि त्याची वेगळीच माहिती मिळाली.

प्रचेतस's picture

29 Oct 2017 - 7:33 am | प्रचेतस

एका कसलेल्या मुलाखतकाराने घेतलेली एका ध्यासवेड्या माणसाची उत्कृष्ट मुलाखत.

सुचेता's picture

29 Oct 2017 - 8:24 am | सुचेता

उत्त्म

खटपट्या's picture

3 May 2018 - 1:34 pm | खटपट्या

छान मुलाखत. पण बुवांकडून शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख खटकला. :)