हे टाळता आले असते? वारिग फ्लाईट २५४

लाल टोपी's picture
लाल टोपी in दिवाळी अंक
21 Oct 2017 - 12:00 am


गेल्या काही वर्षांत मलेशियन एअरलाइन्सच्या, एअर एशियाच्या किंवा काही दिवसांपूर्वी कोलंबियात फुटबॉल संघाच्या विमानाला अपघात झाले आहेत. नॅशनल जिओग्राफिक आणि डिस्कव्हरी या वाहिन्यांवर 'एअरक्रॅश इन्व्हेस्टिगेशन' ही मालिका नियमित पाहत असे. विमान अपघाताच्या कारणांचा मागोवा घेण्याची प्रक्रिया अतिशय रोचक पद्धतीने या मालिकेत मांडली जात असे. अशाच काही अपघातांमध्ये उघड झालेली कारणे अनेकदा चकित करणारी आणि म्हणूनच 'अरे, इतक्या साध्या चुकांमुळे गंभीर अपघात झाले, मनुष्यहानी झाली किंवा गंभीर अपघात होता होता वाचला' असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. तर अशाच विषयावर हा लेख आधारित आहे. वर उल्लेख केलेल्या दूरदर्शन मालिका त्या विशिष्ट अपघातासाठी केवळ संदर्भ म्हणून उपयोगी पडल्या आहेत. या विषयातील माझा काही अभ्यास नाही, केवळ आवड म्हणून विविध अपघातांबद्दल त्या वेळेस वृत्तपत्रांत आलेल्या बातम्या, वेगवेगळे लेख, अहवाल, विकी या सर्वांचा अभ्यास करून लिहिला आहे.

-------------------------
३ सप्टेंबर, १९८९. वारिग एअरलाइन्सचे फ्लाईट-२५४ ब्राझीलमधील साओ पावलो ते बालेम या प्रवासासाठी सकाळी ९.४३ला निघाले. या प्रवासात सहा ठिकाणी थांबत संध्याकाळी नियोजित ठिकाणी - बालेमला पोहोचणार होते.
३ सप्टेंबर १९८९ हा दिवस ब्राझिलच्या फुटबॉल चाहत्यांसाठीदेखील अतिशय महत्त्वाचा होता. ब्राझिल चिलीबरोबर १९९०च्या विश्वकप फुटबॉलच्या पात्रता फेरीचा अंतिम सामना खेळणार होते. या सामन्यात विजय मिळाला, तरच ब्राझिल १९९०च्या विश्वकप स्पर्धेसाठी पात्र ठरणार होता. या देशाचे फुटबॉलप्रेम सार्‍या जगाला माहीत आहेच. त्यामुळे सम्पूर्ण देशाचे लक्ष या सामन्याकडे लागून राहिले होते.

.

सकाळी ९.४३ला साओ पावलोहून निघालेले वारिग-२५४ दिवसभरात पाच ठिकाणांचे थांबे घेत संध्याकाळी ५.३० वाजता माराबा येथून त्या दिवसाच्या अंतिम थांबा असणार्‍या बालेमच्या दिशेने निघण्याची वाट पाहत होते. साधारणत: त्याच वेळेस ब्राझिल-चिली फुटबॉलची लढतही सुरु झाली होती.

मराबा ते बालेम हे अंतर ३४६ कि.मी. आणि साधारणत: ४८ मिनिटांचे आहे. या प्रवासामध्ये ४७ प्रवासी आणि ७ कर्मचारी असे एकूण ५४ प्रवासी होते.

वैमानिकांनी त्या वेळेस वापरात असणार्‍या एअरक्राफ्ट परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टम (पीएमएस) या प्रणालीमध्ये मराबा ते बालेम या प्रवासाशी निगडित सर्व माहिती भरली. त्याच वेळेस विमानाच्या दिशादर्शनासाठी असलेल्या हॉरिझाँटल सिच्युएशन इंडिकेटरमध्ये २७० अंश ही माहिती भरून विमान उड्डाणासाठी तयार झाले. हे उपकरण भरलेल्या माहितीनुसार विमानाने संध्याकाळी ५.४५ला मराबा येथून उड्डाण केले. ऑटो पायलटने १५८ अंशाच्या कोनात वळत निर्धारित केलेली दिशा पकडली.

फ्लाईट प्लाननुसार वैमानिकांनी बालेमच्या आसपास पोहोचल्यावर नित्याच्या प्रक्रियेप्रमाणे नियमित ध्वनिलहरीवर बालेम नियंत्रण केंद्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यात यश आले नाही. त्यामुळे त्यांना उपलब्ध असणारा दुसरा पर्याय या विमानाच्या कर्मचार्‍यांनी अवलंबला. त्यांच्याकडे उच्च ध्वनिलहरी असलेला रेडिओ सेट वापरून बालेमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या वेळी मात्र बालेमशी त्यांचा संपर्क झाला. त्या वेळी आपण बालेमच्या जवळ असून विमानतळावर उतारण्याच्या तयारीचा भाग म्हणून कमी उंचीवर येण्याची परवानगी मागतली. बालेम विमानतळावर १९८९मध्ये रडार व्यवस्था उपलब्ध नव्हती. त्यामुळे नियंत्रण कक्षातील कर्मचारी वैमानिकाने सांगितलेल्या अंतराबाबत स्थानावरच अवलंबून होते. नियंत्रण कक्षाकडून त्यांना उतरण्याची परवानगी मिळाली.

आतापर्यंत ब्राझिल-चिली फुटबॉल सामन्यात ब्राझिलने १-० अशी आघाडी घेतली होती.

कमी उंचीवर आल्यानंतर बालेमशी निगडित भौगोलिक ओळखीच्या खुणा - उदा. मरझो आयलंड्स, अ‍ॅमेझॉन नदी दिसून येत नव्हत्या. बालेमच्या ओळखीच्या खुणा शोधत असतानाच पीएमएसने उणे अंतर दाखवायला सुरुवात केली - म्हणजेच निर्धारित मार्गानुसार विमान बालेमपासून पुढे निघाले होते. त्यामुळे कॅप्टन गोमेझने १८० अंशाच्या कोनात वळवून तो बालेमच्या ओळखीच्या खुणा शोधण्याचा प्रयत्न करू लागला. त्यासाठी त्याने कमी उंचीवरून आणि कमी वेगाने प्रवास सुरू केला. (४००० फूट आणि ३७० की.मी.) या प्रयत्नात त्याला नदी दिसली. ती अ‍ॅमेझॉनच आहे, असे समजून त्या नदीच्या प्रवाहाचा संदर्भ घेऊन पुढील प्रवास चालू ठेवला. आतापर्यंत नियोजित वेळेपेक्षा ३० मिनिटे जास्त लागली होती.

इकडे फुटबॉलचा सामना विचित्र स्थितीत पोहोचून ब्राझिल पराभूत झाले होते. सामना संपायला २० मिनिटे बाकी असताना ब्राझिल १-० असा आघाडीवर होता, त्याच वेळी चिलीच्या गोलरक्षकावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्यामुळे सामना मध्येच थांबवून चिलीचा विजय झाल्याचे जाहीर झाले होते. १९९०च्या विश्वकप स्पर्धेसाठी ब्राझिल पात्रही ठरले नव्हते. ही अभूतपूर्व घटना होती. ब्राझीलसाठी तर राष्ट्रीय शोक असल्याची घटना होती. (मात्र काही दिवसांनी नाट्यपूर्ण घटना घडून ब्राझिलला विजयी घोषित करण्यात येऊन विश्वकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले. हा घटनाक्रमदेखील अतिशय रोचक आहे. परंतु तो एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्याविषयी पुन्हा कधीतरी).

नियोजित वेळेपेक्षा ३० मिनिटे जास्त लागल्यामुळे आणि अजूनही बालेमच्या खुणा दिसत नसल्याने प्रवासीदेखील अस्वस्थ होऊ लागले. फर्स्ट ऑफिसर झिलेच्या मते त्यांच्या दिशादर्शनात चूक होऊन ते बालेमऐवजी सांतारेम विमानतळाच्या जवळ पोहोचले असावेत. त्यामुळे फर्स्ट ऑफिसर आणि कॅप्टनने नजीकच्या विमानतळावर पोहोचण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रेडिओवरून बालेमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही.

आता नवीनच आणि गंभीर समस्या उद्भवली होती. नजीकच्या विमानतळापर्यंत पोहोचण्याएवढे इंधन विमानात नव्हते. अखेर रात्री ०८.०५ला बालेम नियंत्रण कक्षाकडून 'तुमच्या निश्चित ठिकाणाविषयी माहिती द्या' असा संदेश मिळाल्यावर गोमेझ आणि झिले यांच्या समजाप्रमाणे ते करजान विमानतळाजवळ असल्याचे त्यांनी कळवले. मात्र आतापर्यंत गोमेझ आणि झिले दोघेही दिशा जाणून घेण्याबाबत एकंदरीतच गोंधळून गेले होते.

अखेर रात्री ८.३०च्या सुमारास, उपलब्ध असलेल्या इंधनात कोणत्याही नजीकच्या विमानतळावर पोहोचण्याची शक्यता नसल्यामुळे गोमेझ आणि झिले यांनी आपातकालीन स्थितीत रेन फॉरेस्टमध्येच विमान उतरवण्याचे ठरवले. वास्तविक ते नक्की कोठे आहेत हे त्यांना माहीत असते, तर अगदी याच वेळी ते सेरा दे कचिंबो या हवाईतळापासून गेले, तेथे बोइंग ७३७ सहज उतरू शकले असते.

त्या वेळी अशा स्वरूपाच्या स्थितीत निश्चित कोणती प्रक्रिया वापरावयाची याची कार्यप्रणाली तयार केलेली नव्हती, त्यामुळे या दोघांनीच त्यांच्या अनुभवानुसार योजना तयार केली. त्यानुसार इंधन संपूर्ण वापरले जाईपर्यंत योग्य ती उंची आणि किमान आवश्यक वेग (८००० फूट आणि ताशी २७८ कि.मी.) कायम ठेवून उडत राहायचे, त्यामुळे आपात स्थितीत जमिनीवर आपटल्याने स्फोट होऊन आग लागण्याची शक्यता टाळता येणार होती. दुसरे म्हणजे इंजीन सुरू असल्याने विमान उतरताना आवश्यक असणार्‍या इतर कार्यप्रणालीदेखील त्यांना सुरू ठेवता येणार होत्या. रात्री ८.४०ला मुख्य वैमानिकाने 'इंधन संपत आल्यामुळे आता जंगलात आपात स्थितीत उतरत आहोत' असा संदेश बालेम नियंत्रण केंद्राला दिला आणि १० मिनिटे पुरेल इतके इंधन शिल्लक असताना आपण अ‍ॅमेझॉनच्या जंगलात उतरत आहोत ही माहिती प्रवाशांना दिली.

अखेर उजवे इंजीन प्रथम आणि त्यानंतर दोन मिनिटांनी डावे बंद पडले आणि ९ वाजून ६ मिनिटांनी विमान जंगलात कोसळले. मात्र दोन्ही वैमानिकांनी आपले कौशल्य पणाला लावून, कोसळताना किमान नुकसान होईल याचा प्रयत्न केला.

५४पैकी सहा प्रवासी या वेळी मृत्यू पावले. सात प्रवासी गंभीर जखमी, तर बाकी सर्व प्रवासी किरकोळ जखमांसह सुखरूप होते. मात्र घनदाट जंगलात अन्नपाण्याशिवाय अडकून पडले होते. ही रविवारची रात्र होती.

.

बालेम विमानतळावरून रात्रीच शोधमोहिम सुरू करण्यात आली. आसपासच्या जंगलात कसून शोध घेण्यात आला. मात्र दोन दिवस उलटले, तरी विमानाचे अवशेष किंवा प्रवासी यांचा काहीही तपास लागला नाही.

इकडे दोन दिवस मदतीची वाट पाहून, जे चालू शकत होते आणि कमी जखमी झाले होते अशा चार प्रवाशांनी मदत शोधण्यासाठी स्वतःच जायचे ठरवले. जंगलात सुमारे ३ तास पायपीट केल्यानंतर त्यांना एक फार्म हाउस मिळाले. परंतु तेथे बाहेरच्या जगात संपर्क साधण्याची काहीही सुविधा नव्हती. अखेर मोटारीने दुसर्‍या फार्मवर पोहोचून नजीकच्या फ्रांका विमानतळावर संदेश पोहोचला आणि मंगळवारी दुपारी १२.३० वाजता वारिग फ्लाइट-२५४चा निश्चित ठावठिकाणा मिळाला. अपघाताचे ठिकाण घनदाट जंगलात असल्याने तेथे तत्काळ पोहोचणे सहज शक्य नव्हते, म्हणून हवाई दलाच्या विमानांनी दुपारी अन्नाची पाकिटे टाकली. दुसर्‍या दिवशी, म्हणजे बुधवारी दुपारी सर्व प्रवाशांची तेथून सुटका करण्यात आली. मात्र गंभीर जखमी झालेले ७ प्रवासी तोपर्यंत मरण पावले होते. ४१ प्रवासी या अपघातातून सुखरूप वाचले.

अपघाताची चौकशी लगेचच सुरू झाली. अपघाताचे ठिकाण चौकशी अधिकार्‍यांना बुचकळ्यात टाकणारे होते. मराबापासून बालेमच्या विरुद्ध दिशेला सुमारे ९६५ कि.मी.वर अपघात झाला होता. मूळ फ्लाईट प्लाननुसार विमान येथे पोहोचणे अजिबात अपेक्षित नव्हते. त्यामुळे विमानाचा शोध घेताना या भागाकडे अजिबात लक्ष दिले गेले नव्हते. अधिक तपास केल्यानंतर एका धक्कादायक गोष्टीचा उलगडा झाला.

.

प्रवासाचा अपेक्षित मार्ग

.
अपघाताचे ठिकाण

कॅप्टन गार्सेज नुकताच सुट्टी संपवून कामावर हजर झाला होता. दरम्यानच्या काळात फ्लाईट प्लानमध्ये विमानाच्या दिशेचा उल्लेख करण्याच्या पद्धतीत बदल झाला होता. पूर्वी तीन अंकांत केला जाणारा उल्लेख आता चार अंकांत केला जाऊ लागला होता, याची काहीच कल्पना नसलेल्या गॉर्सेजने मरीबा ते बालेम या प्रवासाठी दिशादर्शक माहिती भरताना प्लानमध्ये असलेली ०२७० ही माहिती २७०.० अशी भरली. प्रत्यक्षात ०२७.० उजवीकडचा शेवटचा अंक दशांश चिन्हाच्या नंतर असायला हवा होता. त्यामुळे २७ अंशाच्या कोनात वळण घेण्याऐवजी ते २७० अंशात घेतले गेले आणि सुरुवातीपासूनच विमान दिशा भरकटले होते. खरे तर साहाय्यक वैमानिकाने आपली माहिती भरताना ही चूक त्याच्या लक्षात यायला हवी होती. ती लक्षात आली नाही, कारण वैमानिकाने जी माहिती भरली होती, त्याचीच त्याने कॉपी केली. नियमाप्रमाणे असे करणे चुकीचे होते.

ही मुख्य चूक लक्षात येण्याच्या अनेक संधी या दोघांनी गमावल्या. बालेमला मराहून पूर्वेला जाणे अपेक्षित होते. मात्र उड्डाणानंतर विमानाने मावळतीच्या सूर्याच्या दिशेने मार्ग धरला होता. अनुभवी वैमानिकांच्या हे सहज लक्षात आले असते. या मार्गावर नेहमी प्रवास करणार्‍या किमान तीन प्रवाशांनी आपण नेहमीच्या मार्गापेक्षा वेगळ्या दिशेने जात आहोत हे कर्मचार्‍यांच्या लक्षात आणून दिले होते. पण "कॅप्टनला आपल्यापेक्षा जास्त कळते" असे उत्तर देऊन त्यांना गप्प करण्यात आले.

बालेम नियंत्रण कक्षाबरोबर संपर्क साधताना नेहमीच्या फ्रिक्वेन्सीवर वैमानिक संपर्क साधू शकले नाहीत, कारण स्पष्ट होते - ते बालमपासून खूप दूर होते. त्यामुळे त्यांना उच्च फ्रिक्वेन्सी असणार्‍या रेडिओच्या वापर करावा लागला. ही बाब वैमानिक आणि नियंत्रण केंद्रातील कर्मचारी या दोघांच्याही लक्षात यायला हवी होती, परंतु लक्षात आली नाही.

लक्षात आले नाही, कारण...

या प्रकरणाशी असंबद्ध अशी वाटणारी फुटबॉल सामन्याची माहिती वर मध्ये मध्ये आली आहे. खरोखरी तसा संबंध नसायला हवा होता. मात्र प्रत्यक्षात तसा संबंध होता. वैमानिक, नियंत्रण केंद्रावरील कर्मचारी त्या वेळी रेडिओवरून प्रसारित होत असलेले फुटबॉल सामान्याचे वर्णन ऐकत होते. तसे पुरावे मिळाले आहेत. सामना रोमांचक आणि अनेक घडामोडींनी भरलेला होता. त्यामुळेच इतर साधारण परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी सहज लक्षात आल्या असत्या, त्या या ठिकाणी लक्षात आल्या नाहीत आणि हा अपघात घडला.

प्रतिक्रिया

उत्तम लेख. मुद्द्याला धरून नेमकी माहिती.

या केसमधे कामाचा एक वेगळाच महत्वाचा पैलू दिसतो. मोनोटोनी आणि त्यातून मग पाट्या टाकण्याची वृत्ती.

027 आणि 270 या पूर्ण वेगळ्या बाजूंच्या दिशा आहेत आणि नंबर कॉम्प्युटरला यांत्रिक मनोवृत्तीने फीड करणं इतकंच काम. बाकी आपण कुठून कुठे जातोय, त्या जागेची भौगोलिक दिशा काय आहे वगैरे अत्यंत कॉमनसेंसही वापरात आणायचाच नाही.

आपण चेन्नई ते दिल्ली जातोय आणि तरीही आकडेरूपात कॉम्प्युटरमधे दक्षिण दिशा भरतोय. पुढेही कुठे ती बदलून उत्तर बाजूलाही जात नाहीये. पण तसंच भरायचं. कारण त्या दक्षिण दिशेच्या आकडयाची मेंदूने नोंदच घेतलेली नाही.

ही वृत्ती सर्वच प्रकारच्या कामात धोकादायक आहे.

पुन्हा एकदा लेखाबद्दल आभार.

बाजीप्रभू's picture

21 Oct 2017 - 9:37 am | बाजीप्रभू

हवाई कथांसाठी तसं पहाता गवि माझे आवडे लेखक.. पण तुमचाही नंबर लवकरच लागेल असं वाटतंय.
उत्तम माहिती.. ज्ञानात भर पडली.

लाल टोपी's picture

21 Oct 2017 - 10:02 am | लाल टोपी

गवि आणि बाजीप्रभू धन्यवाद
गविंची प्रतिक्रिया काय असेल याचे दडपण होते. तुमचा प्रतिसाद वाचून खरंच ते उतरले.

चौकटराजा's picture

21 Oct 2017 - 7:11 pm | चौकटराजा

सद्या मला या विषयात भलताच रस निर्माण झाला आहे. तूनळीवर अनेक फिल्मा त्यासाठी पहात आहे. एकंदरीत आता फार चित्र बदलले आहे. पण यात तीन प्रवाशानी अतिशय गंभीरपणे सुचविले असताना मॅचमुळे गाम्भीर्य नसावे हे फारच भयानक आहे. मला असे वाटते की कित्येक वेळा एटीसी व वैमानिक यांचे संभाषण एकमेकाना नीट ऐकू गेले नाही तर ... तर का॑य होईल....? आपला लेख मस्त आहे.

पद्मावति's picture

22 Oct 2017 - 2:44 pm | पद्मावति

उत्तम लेख!

लेख आवडला. निश्चितच अतिशय क्षुल्लक मानवी चुकांमुळे जगातल्या अपघातांपैकी सुमारे सत्त्याण्णव टक्के अपघात होतात हे दाखवून देणारी घटना. लिहीत राहा.

इशा१२३'s picture

22 Oct 2017 - 3:17 pm | इशा१२३

छान माहितीपुर्ण लेख!

हसरी's picture

23 Oct 2017 - 12:30 pm | हसरी

मस्त अभ्यासपूर्ण लेख.
लेखाची लिंक व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर केली आहे.

पैसा's picture

23 Oct 2017 - 9:51 pm | पैसा

मानवी चुकीतून झालेला दुर्दैवी अपघात.

मोदक's picture

23 Oct 2017 - 11:38 pm | मोदक

उत्तम लेख... लिहिते रहा.

Northwest Airlines Flight 188 बद्दलही जरूर लिहा..!

श्रीरंग_जोशी's picture

24 Oct 2017 - 10:54 am | श्रीरंग_जोशी

एका दुर्दैवी विमान अपघाताबाबत थोडक्यात पण नेमके भाष्य करणारे हे लेखन आवडले.

मित्रहो's picture

24 Oct 2017 - 11:41 am | मित्रहो

धक्कादायक माहीती आहे. तांत्रिक चुक झाली कबूल आहे पण निव्वळ फुटबॉलच्या सामन्यामुळे कॉमन सेंस वापरला गेला नाही हे भयंकर आहे.

लाल टोपी's picture

26 Oct 2017 - 8:54 am | लाल टोपी

सर्वांचे मनःपूर्वक आभार.

जुइ's picture

27 Oct 2017 - 1:49 am | जुइ

अतिशय वेगळ्या आणि विलक्षण कारणामुळे घडलेल्या विमान अपघाताची माहिती देणारा लेख चांगला झाला आहे.

मारवा's picture

31 Oct 2017 - 8:40 am | मारवा

सुरेख लेख
आवडला.

निशाचर's picture

3 Nov 2017 - 3:20 am | निशाचर

उत्तम लेख. Helios Airways Flight 522 चा अपघात आठवला. त्यात केबिनमधील हवेचा दाब manual ऐवजी auto मोडवर न ठेवल्याने विमानातील सगळ्या क्रू आणि प्रवाश्यांनी प्राण गमावले होते.

पिशी अबोली's picture

12 Nov 2017 - 10:13 pm | पिशी अबोली

दुर्दैवी घटना, पण तुम्ही लिहिलंय खूपच छान..

उत्तम माहिती आणि अतिशय प्रभावी लेखन!

सौन्दर्य's picture

1 Dec 2017 - 4:37 am | सौन्दर्य

थोडक्यात आणि मुद्देसूद तरीही आवश्यक त्या सर्व माहितींनी परिपूर्ण असा लेख. खूप आवडला, असेच लिहित रहा.