बकलावा

Primary tabs

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in दिवाळी अंक
19 Oct 2017 - 12:00 am

Header2बकलावा नाव ऐकलं, तर सर्वसाधारणपणे काय येते डोळ्यासमोर? पण हे मध्यपूर्वेतील एका मिठाईचे नाव असून ती अतिशय स्वादिष्ट असते, हे समजल्यावर तिचा शोध घेणे क्रमप्राप्त होते.

बकलावा म्हणजे मध्यपूर्वेतील एक पक्वान्न. हा खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो. म्हणजे मूळ कृती एकच, पण आकार वेगवेगळे. बकलावा ज्याने एकदा खाल्ले त्याला वेड लावते, अशी माहिती मिळाली. एका मैत्रिणीने तुर्कस्थानातून आणलेला बकलावा खाल्ल्यावर याचे प्रत्यंतर आले. मुंबईत बकलावा कुठे मिळतो हे गूगलबाबाच्या कृपेने समजले, तरी त्याच्या किमती पाहून देणाऱ्या असल्याने घरातच करता येईल का? याचा विचार मनात घोळू लागला.

तसे पाहिले, तर खटाटोप मोठाच आहे या पदार्थाचा, पण 'चवीचे खाणार तो शॉर्टकट शोधणार', या मी स्वतः बनवलेल्या म्हणीनुसार मी शोध घ्यायला सुरुवात केली. आणि आता बकलावा मी घरीच बनवते.

मैदा, लोणी, साखरेचा पाक, अक्रोड, बदाम, पिस्ते - विशेषतः पिस्तेच, यांची रेलचेल असलेला हा पदार्थ 'रिच' असतो. त्यामुळे कधीतरी खायला हरकत नाही, विशेषतः दिवाळीच्या सणाला करायलाही हरकत नाही.

मूळ पाककृतीत असलेल्या याच्या पेस्ट्रीशीट्स बनविण्यासाठी पीठ मळणे, आणि त्याचा शीट्स लाटणे या दोन्ही स्टेप्स कमी करून मी आता बकलावा करू लागले आहे. इच्छा झाली की तासाभरात खायला मिळतो आणि 'धन्य ती सुगरण किंवा बल्लवाचार्य ज्यांनी बकलावा बनवला असेल'असा विचार मनात येतो.

सांगते, सांगते, कृतीच सांगते आता.

साहित्य :-

  • स्प्रिंगरोल फिलोशीट्स किंवा तयार समोसापाती. (एका पॅकेटमध्ये भरपूर बकलावा तयार होतो.)
  • २ वाट्या साखर.
  • बोटभर दालचिनीचा तुकडा
  • १ वाटीभर बदाम, पिस्ता आणि अक्रोड यांची भरड पूड किंवा आवडीनुसाार कोण्या एकाची, किंवा दोघांची पूड (मी थोडेसे बदाम आणि जास्त पिस्तेच वापरते.)**
  • साधारण दीड ते २ वाट्या पातळ केलेले लोणी.

** ही पूड मिक्सरमधून करण्यापेक्षा भिजवून, साले काढून, बारीक चिरून घेतले तर दिसतेही छान आणि लागतेही छान. चिरल्यावर हा चूर एका ताटलीत ठेऊन उघडाच फ्रीजमध्ये ठेवून दिला की छान वाळतो. मग तो काचेच्या बाटलीत किंवा हवाबंद डब्यात घालून फ्रीजमध्येच ठेवायचा. हे काम निवांतपणे करून ठेवावे, म्हणजे आठवण आली की ही पूड तयार असली की चटकन काम होते.

कृती :-

१. साखरेचा दोनतारी पाक करून घ्यावा. पाक होत आला की त्यात दालचिनीचा तुकडा टाकावा.

२. ओव्हनप्रूफ डिशला ब्रशने लोणी लावून घ्यावे.

३. १ फिलोशीट त्यात अंथरावी. त्यावर पातळ केलेले लोणी ब्रशने लावावे. त्यावर दुसरी फिलोशीट अंथरून त्यावर पातळ केलेले लोणी ब्रशने लावावे. अशा रितीने सहा फिलोशीट लावून झाल्या की त्यावर सारण म्हणून तयार केलेला चुरा सढळ हाताने पसरावा. वर अंथरायच्या फिलोशीटला पातळ केलेले लोणी ब्रशने लावावे. लोणी लावलेली बाजू सारणावर ठेवून वरच्या बाजूलाही पातळ केलेले लोणी ब्रशने लावावे. वर आणखी ५ फिलोशीट्स ठेवून पुन्हा एकदा सारण घालून त्याच्यावर सहा फिलोशीट्स लोणी लावून अंथरावीत.

४. आता सुरीने हव्या त्या आकाराचे काप द्यावेत.

५. साखरेचा पाक चिरांमध्ये चमच्याने घालावा.

६. ओव्हन 180 अंशावर प्रीहीट करून घ्यावा .

७. डिश ओव्हनमध्ये ठेवून १५ ते २० मिनिटे बकलावा भाजावा.

८. घरामध्ये दरवळणारा वास शेजाऱ्यांच्या घरात जाऊ देऊ नये. वाटेकरी वाढतात. (यासाठी ओला नॅपकिन किचनमध्ये टांगून ठेवावा.)

९. १५ मिनिटांनी सुरी घालून पाहावी. स्वच्छ निघाली, तर बकलावा झाला असे समजावे. नसेल तर आणखी ५ मिनिटे ठेवावे.

१०. बकलावा थंड होईपर्यंत धीर धरावा, कारण साखरेचा पाक आणि लोणी थंड व्हायला वेळ घेतात.

११. थंड झाला की कुणाचीही वाट न पहाता आस्वाद घ्यायला सुरुवात करावी.

.

Footer

कथा

प्रतिक्रिया

रुपी's picture

19 Oct 2017 - 12:14 am | रुपी

अहाहा! सुंदर पाकृ!
बकलावा फारच आवडतो आणि बर्‍याचदा अगदी उत्तम बकलावा खायलाही मिळतो पण घरी करुन बघायला पाहिजे आता.
फक्त मी खालेल्या बकलावामध्ये पिस्त्यांची पूड बरीच बारीक असते आणि फक्त वरुन घालण्याऐवजी फिलोशीट्सच्या थरांमध्येही होती.
पायरी नं ८ भारीच ;)

नूतन सावंत's picture

19 Oct 2017 - 8:47 am | नूतन सावंत

पायरी नं 3 मध्ये सहाव्या फिलोशीटनंतर पिस्तापूड घालून मग वर सहा फिलोशीट घातलेत,त्याऐवजी दोन दोन किंवा तीन तीन किंवा चार चार फिलोशीट नंतर पिस्तापूड घालून पाहायला हरकत नाही. बाजरी बकलावा मध्ये पिस्तापूड बारीक असते हे खरंय,आणि वरून थोडेसेच कप फक्त सजावटीपुरते वापरले आहेत,बाकी पिस्तापूडच वापरली आहे.

जुइ's picture

19 Oct 2017 - 12:18 am | जुइ

झकास पाकृ सुरन्गीतै! बकलावा अनेकदा बाहेर खाण्यात आला आहे. करून बघेन आता घरी.

पद्मावति's picture

19 Oct 2017 - 2:26 am | पद्मावति

आहाहा! बकलावा अनेकदा बाहेर खाण्यात आला आहे. करून बघेन आता घरी. +१

कौशिकी०२५'s picture

19 Oct 2017 - 8:50 am | कौशिकी०२५

वाह..अगदी आत्ता खावसा वाटतोय. फोटो आणि पाककृती दोन्ही सरस.

कविता१९७८'s picture

19 Oct 2017 - 10:30 am | कविता१९७८

छान पाककृती, फाॅक्स लाईफ चॅनलवर शंभरवेळा कृती पाहीलीये पण घरी कधीच बनवली नाही. आता करुन पाहीन

सविता००१'s picture

19 Oct 2017 - 1:57 pm | सविता००१

झकासच दिसतेय.

स्वाती दिनेश's picture

19 Oct 2017 - 4:49 pm | स्वाती दिनेश

बाकलावा भयंकर आवडतो आणि तुर्की दुकानात गेले की तो न घेता घरी येणं म्हणजे फाउल समजला जातो , ;)
तुझी पध्दत छान आणि सोपी वाटतेय, नक्की नक्की करून बघणार आणि देते केला की तुला रिपोर्ट..:)
(अवांतर- बाप्पाच्या नेवैद्याला असा बाकलावा करायला हरकत नाही,:) )
स्वाती

मनिमौ's picture

20 Oct 2017 - 11:45 am | मनिमौ

खूप भारी दिसतंय पण पुण्यात पेस्ट्री शीट कुठे मिळेल?

पगला गजोधर's picture

20 Oct 2017 - 7:22 pm | पगला गजोधर

छान रेसिपी...
अगदी मनातलं प्रश्न विचारला मनिमौ ....
बहुदा दोराबजी कॅम्प (SGS मॉल समोर) मधे मिळवा या अपेक्षेनं उद्या चक्कर टाकतो ....

नूतन सावंत's picture

21 Oct 2017 - 4:34 pm | नूतन सावंत

कुठल्याही मॉलमध्ये फूड सेक्शनमध्ये मिळतात ग

वा! सोपी आणि सुंदर पाकृ सुताई. आवडलिच.

रेवती's picture

20 Oct 2017 - 9:13 pm | रेवती

छान आहे पाकृ.
हा पदार्थ एकतर खायला सुरुवात करायची नाही किंवा सुरुवात केली तर आपल्याला थांबवण्यासाठी कोणी हितचिंतक जवळ ठेवायचा. ;)

नूतन सावंत's picture

21 Oct 2017 - 4:35 pm | नूतन सावंत

अगदी खरं रेवाक्का.

श्रीरंग_जोशी's picture

21 Oct 2017 - 11:30 am | श्रीरंग_जोशी

बकलावा या मिष्टान्नाचा आस्वाद काही वेळा ग्रीक उपहारगृहात घेतला आहे.
त्याची पाककृती प्रथमच वाचली. आकर्षक वाटली.

स्नेहांकिता's picture

21 Oct 2017 - 1:07 pm | स्नेहांकिता

भारी दिसतोय बकलावा !
करुन बघायव पाहिजे एकदा

गोड केलेल्या खारीत बदामपिस्ते?

प्रभाकर पेठकर's picture

22 Oct 2017 - 4:57 pm | प्रभाकर पेठकर

बकलावा एकादा खाल्ला की हात आणि मन आवरणं अशक्यच. पण त्यातील उष्मांकाचे गणित केले की त्या पासून (बकलाव्यापासून गणितापासून नाही) लांबच राहिलेले बरे.
अत्यंत महत्त्वाची सुचवणी अशी की मधाची शुद्धता (साखरे ऐवजी अरब वापरतात), आणि घरचे शुद्ध साजूक तुप ह्यावर चवीचे प्रमाण अवलंबून असते.

नूतन सावंत's picture

22 Oct 2017 - 5:30 pm | नूतन सावंत

बकलाव्यापासून लांबच रहावे हे उष्मांकच्या गणितामुळे कळते. बकलावा इतर मिठाईसारखा गल्लोगल्ली मिळत नाही हे किती बरे आहे.
म्हणूनच घरात केला की अगदी छोट्या प्रमाणात करून ईच्छा पुरवता येते आणि उष्मांकाचे गणित सांभाळता येते. आता मध आणि तूप वापरून करून पाहीन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Oct 2017 - 6:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

केवळ आठवणीनेच जीभ खवळून टाकाणारा पदार्थ ! चित्र तर जीवघेणे आहे !

८. घरामध्ये दरवळणारा वास शेजाऱ्यांच्या घरात जाऊ देऊ नये. वाटेकरी वाढतात. (यासाठी ओला नॅपकिन किचनमध्ये टांगून ठेवावा.) स्वतःलाच कधी पुरेसा न पडणार्‍या पदार्थाबद्दल हा मुद्दा कळीचा आहे =)) =))

: बकलाव्याचा डायहार्ड पंखा

***************

अवांतर : आता 'उम्म आली'च्या पाकृचा नंबर लागायला हरकत नाही :)

अत्रुप्त आत्मा's picture

22 Oct 2017 - 9:07 pm | अत्रुप्त आत्मा

वाचून वाट वागली, खाऊन काय होइल?

नूतन सावंत's picture

28 Oct 2017 - 4:19 pm | नूतन सावंत

गुरुजी,खाऊन पहाच एकदा.

सूड's picture

23 Oct 2017 - 5:07 pm | सूड

आता ओव्हन घेणे आले.

नूतन सावंत's picture

28 Oct 2017 - 4:20 pm | नूतन सावंत

घेऊन टाका सूड, हा का ना का.

पियुशा's picture

17 Nov 2017 - 2:59 pm | पियुशा

अग बाब्बो कसल भारी :)