अभिजन आणि बहुजन वर्गातल्या सीमारेषा पुसट करणारा कलावंत

पिंपातला उंदीर's picture
पिंपातला उंदीर in जनातलं, मनातलं
1 Oct 2017 - 7:43 pm

मी कॉलेजला असताना हॉस्टेलला राहायचो. त्या हॉस्टेलला बाहेरच्या राज्यांमधून आलेल्या हाय फाय मॉडर्न अशा मुलीही राहायच्या. 'जो जिता वोही सिकंदर'मधले मॉडेल कॉलेजचे 'पजामा छाप' पोरं रजपूत कॉलेजमधल्या मुलींकडे ज्या नजरेनं बघायचे, त्याच नजरेनं मी आणि माझे 'लुजर' मित्र त्यांच्याकडे बघायचो. लांबूनच. त्या वेळी आमच्यासाठी त्या अप्राप्य अप्सरा होत्या आणि आम्ही मर्त्य मानव. त्या मुली इंग्लिशमध्ये बोलत आणि इंग्लिश गाणी ऐकत. त्यांचा-आमचा आर्थिक स्तरच नव्हे तर अभिरूची आणि तत्सम स्तरही खूप वेगळा होता. पण एके वर्षी असं काही घडलं की, मला आणि माझ्यासारख्या अनेकांना त्या मुली आमच्यापेक्षा काही फार वेगळ्या नाहीत याचा साक्षात्कार झाला. शेवटच्या वर्षी हॉस्टेल गॅदरिंग डेला त्या मुलींनी एक परफॉर्मन्स केला. गोविंदाच्या गाण्यावरच्या नृत्यावरचा परफॉर्मन्स. त्याचं नाव होतं- 'आपला चिची'. हे गोविंदाचं टोपणनाव. त्या परफॉर्मन्सपुरती तरी आमच्यातली आणि त्या मुलींमधली आर्थिक-सामाजिक भिंत गळून पडली होती. गोविंदाच्या 'व्हॉट इज मोबाईल नंबर', 'मैं तो रस्ते से जा रहा था', 'अंखियों से जो गोली मारे' या गाण्यांवर त्या मुलींना नृत्य करताना पाहणं हा एक छान अनुभव होता. त्यात त्या मुलींच्या सौंदर्य आणि नृत्य कौशल्याइतकाच गोविंदा फॅक्टरचा मोठा भाग होता. अभिरूचीच्या बाबतीत अभिजन वर्ग आणि बहुजन वर्ग यांना एकत्र आणण्याची ताकद कायमच गोविंदाच्या सिनेमांत, त्याच्या गाण्यांमध्ये आणि नृत्यामध्ये होती.

गोविंदाचा जन्म एका कलाकार परिवारात झाला. त्याची आई निर्मला देवी या अभिनेत्री आणि गायिका होत्या. वडील अरुण कुमार आहुजा हेही अभिनेते. गोविंदाचं बालपण विरारमध्ये मराठी वस्तीत गेलं. गोविंदा जी अस्खलित मराठी बोलतो, त्याचं रहस्य या विरारमध्ये गेलेल्या बालपणात दडलेलं आहे. बच्चनला जसं 'छोरा गंगा किनारे वाला' असं संबोधलं जातं, तसं गोविंदाला 'विरार का छोरा' असं संबोधलं जातं.

गोविंदाचं बालपण काही फारसं चांगलं गेलं नाही. वडील अरुण कुमार यांनी चित्रपटनिर्मितीमध्ये नशीब आजमावलं, पण चित्रपट आपटला. आर्थिक हलाखीचे काळे ढग डोक्यावर घोंगावू लागले. अशातच अरुण कुमार आजारी पडले. कार्टर रोडवरच्या प्रशस्त बंगल्यात राहणारं आहुजा कुटुंब एका रात्रीत विस्थापित होऊन विरारच्या चाळीत राहायला आलं. उमादेवींनी घर चालवण्याची जबाबदारी अंगावर घेतली. ती त्यांनी उत्तमरीत्या पार पाडली. पण आर्थिक स्थैर्य आहुजाच्या घरातून हरवला. त्यामुळे गोविंदाला काम मिळवण्यासाठी घराबाहेर पडावं लागलं. त्याचा त्या वेळेसचा आदर्श होता मिथुन चक्रवर्ती. त्याच्या 'डिस्को डान्सर'ची गोविंदानं अक्षरशः पारायण केली होती. 'इल्जाम' हा गोविंदाचा पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट. साल १९८६. त्याच वर्षी आलेल्या 'लव्ह ८६'नंही दणदणीत व्यवसायिक यश मिळवलं. हा पोरगा जबरदस्त नाचतो आणि त्याच्यात प्रचंड आत्मविश्वास आहे, याची नोंद बॉलीवुडनं घेतली. त्यानंतर १९८८ साली आला 'हत्या'. या चित्रपटामुळे हा पोरगा काय प्रतीचा अभिनेता आहे, हे प्रेक्षकांच्या लक्षात आलं.

'हत्या'मध्ये एक प्रसंग आहे. एका मुक्या मुलासमोर तो आपलं फ्रस्टरेशन व्यक्त करत आहे, असा तो प्रसंग आहे. कसला जबरी अभिनय केलाय त्यात गोविंदानं! १९८९ साली त्यानं 'ताकतवर' नावाचा चित्रपट केला. तो वैशिष्ट्यपूर्ण एवढ्यासाठी की, या चित्रपटाचा दिग्दर्शक होता डेव्हिड धवन. ही सुरुवात होती एका बॉलिवुडच्या इतिहासातल्या सगळ्यात यशस्वी व्यवसायिक भागीदारीची! पुढच्या काळात या दोघांनी 'शोला और शबनम', 'आँखे', 'राजाबाबू', 'कुली नंबर वन', 'हिरो नंबर वन', 'पार्टनर', 'साजन चले ससुराल' असे तब्बल वीसच्या आसपास चित्रपट केले. त्यातले तुरळक अपवाद वगळता बहुतेक चित्रपट तिकीट खिडकीवर तुफान चालले.

धवनचे चित्रपट मासेसला किंवा पिटातल्या प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून तयार केलेले होते. द्वयर्थी गाणी, टपोरी किंवा ग्रामीण लहेजातले संवाद, विशिष्ट प्रकारचं भारतीय वाद्यमेळ असणारं संगीत, प्रेक्षकांना सहज कळतील असे विनोद, नायकासोबत असणारी विनोदवीरांची फौज असं धवनच्या चित्रपटांचं एक ठरलेलं 'मॉडेल' होतं. प्रेक्षकांनी त्याला तुफान प्रतिसाद दिला.

दादा कोंडकेंनी मराठीमध्ये जे एक 'मॉडेल' तयार केलं होतं, त्याचा प्रभाव धवनवर होता. त्यानं हेच मॉडेल हिंदीमध्ये यशस्वीपणे राबवलं. पडद्यावर दादा कोंडकेंची पोकळी भरून काढण्यासाठी गोविंदापेक्षा दुसरा आदर्श नट असूच शकत नव्हता. दादा कोंडके आणि गोविंदा यांच्यात अभिनेता आश्चर्यकारक म्हणावीत इतकी साम्यस्थळं आहेत. गोविंदाला त्याचा खूप व्यावसायिक फायदाही झाला.

पण हे यश हीच गोविंदाची मर्यादा ठरत गेली. मराठीमध्ये दादा कोंडकेंचं जे झालं, तेच गोविंदाचं झालं. एक विशिष्ट अभिरूची असणारा ओपिनियन मेकर वर्ग त्यांच्याकडे पाहून नाक मुरडू लागला. गोविंदाचा चाहता वर्ग देशभरात मोठ्या प्रमाणावर असला तरी तो वर्ग ओपिनियन मेकर नव्हता. तो बहुतेक श्रमिक आणि मध्यमवर्गातला होता. शेवटी तुमचा चाहता वर्ग कुठल्या वर्गातला आहे, यावरून तुमची 'लिगसी' काय असणार, हे ठरतं, हे दुर्दैवी वास्तव आहे. त्यातूनच 'क्लासिकल' कलाकार आणि 'मासेस'चे कलाकार असे ठप्पे मारून कलाकाराला विशिष्ट वर्गात बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला जातो. यातून ‘पिटातल्या प्रेक्षकांचा नट’ अशी गोविंदाची इमेज बनली किंवा जाणीवपूर्वक बनवली गेली. त्याला एकाच छापाच्या भूमिका मिळत गेल्या. प्रेक्षकांनाही फक्त विनोदवीर गोविंदा हवा होता बहुतेक. 'शिकारी'सारख्या चित्रपटात त्यानं वेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा प्रेक्षकांनी त्याला नाकारलं. त्याच्यासारख्या नटाला ऐनभरात असतानाही कुठल्याही मोठ्या निर्मात्यानं (यशराज, धर्मा इ .) काम दिलं नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे.

गोविंदानं तुरळक अपवाद वगळता छोट्या-मोठ्या निर्मात्या-दिग्दर्शकांकडे काम करून आपली कारकीर्द घडवली, हे विसरता कामा नये. अर्थात नट म्हणून तो हा किती महत्त्वाकांक्षी होता, हाही संशोधनाचा विषय आहे. आपण किती चांगले अभिनेते आहोत, हे त्याला तरी कधी कळलं का असा प्रश्न पडतो. गोविंदा नवाज, इरफान, मनोज वाजपेयी यांच्या तोडीचा अभिनेता आहे, असं मी जेव्हा जेव्हा बोलतो, तेव्हा तेव्हा लोक माझ्याकडे भूत बघितल्यासारखं बघतात! त्यांचंही काही चूक नाही. गोविंदा आयुष्यात कधी कलात्मक सिनेमाच्या वाट्यालाच गेला नाही. त्याचे जवळपास सगळेच चित्रपट मासेस श्रेणीत मोडणारे असल्यामुळे त्याला कधी समीक्षकांनी गंभीरपणे घेतलं नाही. अभिजन वर्ग त्याच्या भडक कपड्यांमुळे, काही डबल मिनिंग गाण्यांमुळे त्याच्याकडे बघून नाक मुरडतो. यात अभिनेता गोविंदा नेहमीच दुर्लक्षिला गेला.

'स्वर्ग' या चित्रपटात चोरीचा खोटा आळ घेऊन त्याला घराबाहेर काढलं जातं, तेव्हाचा त्याचा अभिनय काळजाला घरं पाडणारा आहे. 'राजाबाबू'मध्ये अरुणा इराणी आणि कादर खान हे आपले जन्मदाते नाहीत, हे कळाल्यावर त्यानं केलेला अभिनय हा सरळ अभिनयाच्या 'टेक्स्ट बुक'मध्ये जावा. 'हिरो नंबर वन'मध्ये एका घरात नौकर म्हणून काम करत असताना, त्याचा लक्षाधीश बाप (कादर खान) त्याला गुराख्याच्या वेशात चोरून भेटायला येतो, तेव्हा गोविंदानं हळवेपणाची काय जबरी एक्स्प्रेशन्स दिलीत! ‘दुल्हेराजा’मध्ये रविना टंडनला तिचा बाप कादर खान (जो की चित्रपटात याचा कट्टर शत्रू असतो ) कसा भारी आहे, हे तो ज्या खर्जात सांगतो, तो सीन असलाच भारी! त्याच्या प्रत्येक चित्रपटात हमखास एक इमोशनल सीन असतो आणि तो ज्या ताकदीनं करतो त्याला आपसूक दाद दिली जाते. तो जितका नॅचरल डान्सर आहे, तितकाच नॅचरल अभिनेता आहे. दुर्दैव एवढंच की, हे सगळं तुकड्या तुकड्यात आहे. सलग नाही.

अभिनेता म्हणून गोविंदाबद्दल बोलत असताना एक अफलातून डान्सर असणाऱ्या गोविंदांबद्दल बोलणं आवश्यक आहे. शम्मी कपूर, मिथुन चक्रवर्ती, जावेद जाफरी, हृतिक रोशन, शाहिद कपूर, टायगर श्रॉफ अशी हिंदी चित्रपटसृष्टीतल्या नर्तक-अभिनेत्यांची जी प्रभावळ आहे, त्यात गोविंदाचं स्थान ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ आहे. त्याच्या डान्समध्ये मुद्राभिनयाला महत्त्वाचं स्थान आहे. डान्स करताना त्याचा मुद्राभिनय आणि हावभाव पाहणं ही एक ट्रीट असते. उदाहरणार्थ- 'हम तुमसे मोहोब्बत कर के' (चित्रपट - द गॅम्बलर ) या गाण्यातला त्याचा अभिनय पाहावा. लौकिकार्थानं हे नृत्यासाठी आदर्श गाणं नाहीये. पण शरीराच्या बारीक हालचाली आणि मुद्राभिनय यांचा आधार घेऊन गोविंदा त्यातही बहार उडवून देतो. 'अखियों से जो गोली मारे', 'इक लडकी चाहिये खास खास', 'खेत गये बाबा बाजार गयी मा' या गाण्यांमधला गोविंदाचा नृत्य परफॉर्मन्स जबरदस्त आहे. गोविंदाच्या कायिक आणि मुद्रिक अभिनयानं नटलेल्या गाण्यांशी माझे वैयक्तिक ऋणानुबंध आहेत. जेव्हा थोडं डाऊन किंवा थकल्यासारखं वाटतं, तेव्हा युट्युबवर मी गोविंदाची गाणी बघतो. ती माझ्यासाठी 'स्ट्रेसबस्टर' आहेत!

गोविंदा आणि खान मंडळींची आयुष्यं बरीचशी, थोडं अंतर ठेवून, पण समांतर जाताना दिसतात. गोविंदाचं जन्म वर्ष आहे १९६३. तर तिन्ही खान (आमिर, शाहरुख, सलमान ) जन्माला आले, ते १९६५ ला. गोविंदाचं व्यावसायिक पदार्पण झालं ते १९८६ ला. खानत्रयीचं दोन-तीन वर्षाच्या अंतरानं. पण समकालीन आणि समवयस्क असून खानत्रयीला जी समाजमान्यता व आदर मिळाला, तो गोविंदाला कधीच मिळाला नाही. खरं तर बॉक्स ऑफिसवर बराच काळ गोविंदानं खानांच्या तोडीस तोड यश मिळवलं आहे. एक काळ तर असा होता की, तो बॉक्स ऑफिसवरच्या यशात या तिघांच्याही खूप पुढे होता. (इथं खान मंडळींचा संदर्भ हा धार्मिक अंगानं केलेला नाहीये, हे कृपया समजून घ्या. खानत्रयी गेले तीन दशकं बॉलिवुडमध्ये वर्चस्व गाजवत आहे असं मानलं जातं. म्हणून त्यांच्या समकालीन असणाऱ्या एका हरहुन्नरी नटाची त्यांच्याशी केलेली तुलना आहे.)

याबाबत निरीक्षण असं आहे की, स्टुडियो कल्चर बॉलिवुडमध्ये आल्यावर खानत्रयीनं चित्रपटसृष्टीच्या बदलत्या मनुशी जुळवून घेतलं. जे गोविंदाला जमलं नाही. सिनेमा कसा असावा, त्याच्या तांत्रिक बाजू कशा असाव्यात, मार्केटिंग-प्रमोशन्स कस करावं या महत्त्वपूर्ण गोष्टींच्या बाबतीत तो जुन्याच संकल्पनांना कवटाळून बसला. त्याचं व्यावसायिक अभिनेता म्हणून पतन सुरू झालं ते इथून. विशेषतः २००० सालानंतर गोविंदाचा पडता काळ सुरू झाला. शिवाय सलमान खानचा काही प्रमाणात अपवाद सोडून इतर लोक अतिशय व्यावसायिक दृष्टिकोन बाळगून होती. गोविंदा हा सेटवर शूटिंगसाठी उशिरा येण्यासाठी कुप्रसिद्ध होता. शिवाय तापट आणि लहरी स्वभावाची जोड होतीच. असं म्हटल जातं की, गोविंदा अनेक वेडगळ अंधश्रद्धांवर विश्वास ठेवतो. मध्यंतरी एका सेटवर भुताचा वास आहे म्हणून त्यानं तिथं शूटिंग करण्यास दिलेला नकार दिल्याची बातमी वर्तमानपत्रांमध्ये आली होती!

नेमकं याच दशकातच गोविंदा आणि डेव्हिड धवनच फाटलं. डेव्हिड सलमान, अक्षय यांच्यासारख्या स्टार्सकडे वळला. गोविंदाला धवनसारखा दुसरा दिग्दर्शक मिळाला नाही. शिवाय त्याची सिनेमाची निवड चुकत गेली. सुभाष घई 'ताल'मध्ये अनिल कपूरनं केलेली भूमिका घेऊन गोविंदाकडे गेला होता. पण मानधनावरून मतभेद झाले आणि गोविंदानं ती भूमिका करायला नकार दिला. 'गदर'साठी सरदार तारासिंगच्या मुख्य भूमिकेसाठी अनिल शर्मानं सनी देओलच्या अगोदर गोविंदाचं नाव निश्चित केलं होतं. पण त्यानं 'गदर'ही नाकारला. हे दोन्ही चित्रपट पुढे जाऊन सुपरहिट झाले. पडत्या काळात गोविंदाला या हिट्सचा नक्की फायदा झाला असता. पण या जर तरच्या गोष्टी झाल्या.

याच काळात गोविंदानं घेतलेला लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय, हा शवपेटिकेवरचा शेवटचा खिळा ठरला. त्यानं निवडणूक लढवून राम नाईक यांच्यासारख्या दिग्गजाचा पराभव केला, पण या काळात त्याचं चित्रपटांकडे दुर्लक्ष झालं. गोविंदा हा त्या मतदारसंघाच्या इतिहासातला सगळ्यात वाईट खासदार ठरला. त्याच्या कारकिर्दीतच मुंबई मुसळधार पावसामुळे पाण्यात गेली. पण आपल्या मतदारसंघाकडे या आणीबाणीच्या काळात गोविंदा फिरकलाही नाही. त्याच्याविरुद्ध मतदारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. आपण राजकारण करण्याचा निर्णय आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीसाठी आणि मतदारसंघातल्या जनतेसाठीही अतिशय चुकीचा ठरला, याची त्याला जाणीव झाली. पण बराच उशीर झाला होता. पुढची निवडणूक त्यानं लढवलीच नाही. त्यानंतर अभिनेता म्हणून त्याची कारकीर्द कधीच रुळावर आली नाही. नंतर त्याने 'मनी है तो मनी है', भागमभाग', 'किल दिल', 'हॅपी एंडिंग' असे चित्रपट केले. पण जुना सूर त्याला गवसलाच नाही. नंतर नंतर तर त्याला चित्रपट मिळणंच बंद झालं. शेवटी स्वतःच नायक, लेखक, निर्माता असा सबकुछ गोविंदाचं असणारा 'आ गया हिरो' नावाचा चित्रपट त्यानं केला. एखादा कलाकार किंवा अभिनेता आऊटडेटेड होतो आणि जुन्याच डोक्यात बसलेल्या कालबाह्य संकल्पनांना कवटाळून बसल्यावर त्याची जी शोकांतिका होते, त्याचं उदाहरण म्हणजे 'आ गया हिरो'मधला गोविंदा. चित्रपट अतिशय वाईट होता आणि तो दणकून आपटला, हे सांगायची गरज नाहीच.

'आंटी नंबर वन' या गोविंदाच्या फारशा न गाजलेल्या चित्रपटात एक प्रसंग आहे.अभिनयाच्या क्षेत्रात संघर्ष करून करून गांजलेला एक होतकरू अभिनेता (पक्षी : गोविंदा ) एका निर्मात्याच्या (सतीश कौशिक) ऑफिसमध्ये काम मागण्यासाठी घुसतो. तो निर्माता धक्के मारून त्याला ऑफिसमधून हाकलून द्यायला लागतो. तेव्हा भडकलेला गोविंदा त्याला बोलबच्चन देतो. स्वतःची तुलना समाजातल्या तळागाळातल्या लोकांशी करून त्या श्रीमंत निर्मात्यालाच स्वतःच्या परिस्थितीसाठी जबाबदार ठरवून त्याला भावनिकदृष्ट्या एक्स्प्लॉईट करतो. निर्माता त्या भाषणबाजीमुळे भारावून जाऊन म्हणतो, "मित्रा, इतकं सुंदर बोलताना तू जो परफॉर्मंस दिलास, त्याच्या दहा टक्के जरी तू अभिनय करू शकत असशील तरी मी तुला माझ्या चित्रपटामध्ये संधी देईल." गंभीर मूडमध्ये असणारा गोविंदा हे ऐकताच टुणकन उडी मारून म्हणतो, "सर, मग मी इतक्या वेळापासून काय करत होतो? अभिनयच तर करत होतो." हा प्रसंग तसा गोविंदाच्या कारकिर्दीचा गाळीव अर्क म्हणता येईल.

गोविंदानं इतक्या ताकदीनं भूमिका केल्या की, आम्ही 'आंटी नंबर वन'मधल्या निर्मात्यासारखेच हरखून गेलो. तो तेच तेच पुन्हा करतो, वेगळे प्रयोग करत नाही, तो काही 'सिरियसली' घेण्यासारखा अभिनेता नाही, अशा सतत होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करून त्याचे झाडून सगळे चित्रपट बघितले. पण त्यानं जशी त्या निर्मात्याची फिरकी घेतली, तशी आमचीही घेतली. तो निवडणुका लढवण्यात, लोकांना झापड मारण्यात, भंगार चित्रपट करण्यात मग्न राहिला. तो तेव्हाही अभिनयच करत होता, अशी आम्ही मनाची समजूत घालून घेतली. 'गोविंदाचे चित्रपट बघायला जाताना डोकं थिएटरच्या बाहेर ठेवून जात जा, अशी हेटाळणीयुक्त सूचना आम्ही नजरेआड केली. डोकं एकवेळ बाहेर ठेवून जायला जमलं असतं, पण आमचं हृदय बाहेर ठेवणं मात्र शक्य नव्हतं, हे मात्र नक्की!

चित्रपटलेख

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

1 Oct 2017 - 9:14 pm | उगा काहितरीच

लेख आवडला.

गामा पैलवान's picture

1 Oct 2017 - 10:02 pm | गामा पैलवान

लेख आवडला आहे. पण नेमकं काय आवडलंय ते सांगता नाही येत.

-गा.पै.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

1 Oct 2017 - 11:57 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

लेख आवडला रे उंदरा. जवळपास प्रत्येक गाण्यात गोविण्दा नाचताना हसत का असतो हे कोडे कधी उलगडले नाही. अभिनयापेक्षा तो जास्त लक्षात राहतो तो त्याच्या गाण्यांमुळे. विशेष करून करिश्मे व रविनेबरोबरची अनेक गाणी अविसमरणीय नसली त्या काळात ती नक्कीच चालली. त्याचे श्रेय मुख्य आनंद-मिलिंदचे. पाचकळ
विनोद, भडक रंगीबेरंगी कपडे,प्रत्येक प्रसंगाकडे विनोदी नजरेने पाहून वेळ मारून नेण्याचा अभिनय तत्कालिन पिढीस आवडला नसता तर नवल.

पिलीयन रायडर's picture

2 Oct 2017 - 7:26 am | पिलीयन रायडर

तुमचा हा लेख वाचून ताबडतोब राजा बाबू बघितला होता आम्ही! अजूनही महिन्यातून एकदा तरी डोक्याला अति ताण झाला की स्ट्रेस बस्टर म्हणून काही तरी लावा राव असं होतं आणि गोविंदाचाच पिक्चर लावला जातो. आत्ता परवाच जोडी नंबर वन लावला होता. त्यात गोविंदाला कमोडवर बसवून खाली बॉम्ब लावलेला असतो तो सीन काय रंगवलाय गोविंदाने!!! घर किस का.. बाथरुम किस का.. बम किसका.. हम क्यों फूटे?? =))

मला अतिशय आवडतो गोविंदा! लेख आवडलाच.

जेम्स वांड's picture

2 Oct 2017 - 8:45 am | जेम्स वांड

गोंद्याबापू इज गोंद्याबापू, लैच मजेदार आहे तो. गोविंदाच्या सिनेमांत एक अंडरटोन कायम असते ती म्हणजे फॅमिली वातावरण, राजबाबू मध्ये भावकीत अडकलेली भोजपुरी फॅमिली. हिरो नंबर वन मध्ये विधुर बापाचा मुलगा गोंद्या, इतकंच काय परेश रावलची (करिश्माची) फॅमिली पण 'फॅमिली' वाटली आहे त्यात.

महत्वाचं म्हणजे

गोविंदाच्या सिनेमातले तुरळक का असेनात त्याकाळी जमान्याच्या पुढे असलेले 'रॅप' चे प्रयोग, देवांग पटेल (पटेल्सकोप फेम) सोबतची त्याची गडबडा लोळवणारी अन हसवणारी मेरी मर्जी अन स्टॉप डॅट ही गाणी अजूनही प्लेलिस्ट मध्ये असतात, आमच्या तरी.

हसीना मान जायेगी मधील चाचाची भूमिका. काय तुफान केलीये गोविंदाने. आणि खट्याळ मोनू सुद्धा लाजवाब. आजोबांच्या मृत्यूपत्राचा प्रसंग आणि वडिलांसाठी बिंदूला मागणी घालायला जातात तो प्रसंग !! हसून हसून मुरकुंडी वळते .
लेख आवडला .

पैसा's picture

2 Oct 2017 - 10:29 am | पैसा

काही काही वेळा गोविंदा खूप आवडला होता. निलम, रविना करिष्मा यांच्यासोबत त्याची जोडी छान जमत असे. त्याचे ते अमिताभ आणि भगवान style मधले डान्स मस्त वाटत. मात्र आमचा पहिला चॉईस नेहमीच मिथुन किंवा जावेद जाफरी असायचा. गोविंदा शेवट also ran मधेच जमा झाला, त्याला अर्थातच त्याच्याच चुका कारणीभूत आहेत. अमिताभसाठी म्हणून त्याच्या उतारवयातही सिनेमे तयार होऊ लागले. ऋषी कपूरनेही काळाची पावले ओळखून भूमिका स्वीकारणे सुरू केले. मात्र असा कोणता ट्रेंड तयार व्हावा या उंचीला गोविंदा पोचू शकला नाही.

मास्टरमाईन्ड's picture

2 Oct 2017 - 10:48 am | मास्टरमाईन्ड

पण नाचताना हसत असलेला गोविंदा बर्याच वेळेस तोंड उघडलेल्या घोड्यासारखा दिसतो (का?)

एमी's picture

2 Oct 2017 - 11:36 am | एमी

छान!

फक्त ते आईचे नाव निर्मलादेवी की उमादेवी??

धर्मराजमुटके's picture

2 Oct 2017 - 2:32 pm | धर्मराजमुटके

रविना टंडनवरही लेख येऊद्या. गोविंदाच्या बरोबरीनं नाचावं ते तिनेच. दुसर्‍यांचे काम नाही.

संजय पाटिल's picture

2 Oct 2017 - 4:45 pm | संजय पाटिल

जीस देशमे गंगा रेहता है चा उल्लेख राहिलाय ...

पगला गजोधर's picture

2 Oct 2017 - 7:56 pm | पगला गजोधर

लेख छान व वाचनीय...

मधल्या काळात त्याने राणी मुखर्जीला एक फ्लॅट गिफ्ट केलेला, घनिष्ठ मैत्री खातर,
पण नंतर वितुष्ट आल्यावर, फ्लॅट परत मागितला...
अश्या जीवनातील चढ उतारा मुळे, त्याचं अभिनयातील फोकस कमी झाला की काय ???

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

2 Oct 2017 - 11:02 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

कलाकारांचे पडद्यासमोरचे व पडद्यामागचे जीवन ह्यात खूप तफावत असते रे गजोधरा. त्यामुळे कलाकाराची फक्त कला पहावी असे म्हणतात. हिंदी चित्रपटात काम करणार्या अनेकांचे आयुष्य अनेक गोष्टींनी बरबटलेले असते.

गोविंदा हा अफलातून अभिनेता आहे. विनोदाचं टायमिंग जबरदस्त !
सैफ अली खानला मिळू शकतो तर गोविंदाला दुल्हेराजा किंवा बडे मिया छोटे मिया साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हरकत नव्हती.