बबन म्हात्रे

Primary tabs

वकील साहेब's picture
वकील साहेब in दिवाळी अंक
17 Oct 2017 - 12:00 am

Header2

काही व्यक्ती जन्मतःच विक्षिप्त असतात. विक्षिप्त म्हणजे काय की, त्यांचं नक्की काय चालू असतं त्यांचं त्यांनाच ठाऊक नसत. त्यांना जायचं असेल खुर्दला, तर बुद्रुकचा पत्ता विचारतील. एम.बी.ए. करायचं असेल, तर इंजीनियरिंगचा फॉर्म घेऊन येतील. विचार उजव्या विचारसरणीचे असतील, तर डाव्यांच्या सभांना गर्दी करतील. त्यांना एकाच वेळी सर्व काही हवं असतं. सर्व माहीत करून घ्यायची भूक. एकाच वेळी रस्त्यावर सायकलचं दुकान टाकण्यापासून आपल्याकडची द्राक्षे युरोपच्या बाजारपेठेत नेऊन विकण्यापर्यंत सर्वच गोष्टीत त्यांना इनसाईट असते. बबन म्हात्रे हा त्यातलाच एक आसामी. याचं वागणं नेहमी असं जरा विचित्रच होतं. त्याला आवडायची मधू कर्णिक आणि जेव्हा बघावं तेव्हा गप्पा मारत बसायचा त्या जाधवांच्या सुलूबरोबर. अशाने मधू कशी काय पटनार होती ते त्याच त्यालाच माहीत. बबनची आणि माझी खास अशी काही मैत्री होती असं काही नाही. पण कधी कधी बोलणं व्हायचं, इतकंच. साधारण पाच फुटाच्या आसपास उंची, पाणीदार डोळे, कधी फॉर्मल कपडे, गुळगुळीत दाढी, पॉलिश केलेले शूज असा जंटलमन दिसेल, तर कधी आठ आठ दिवस न बदललेली जीन्स, टी शर्ट, वाढलेली दाढी अशा गबाळ्या अवतारात दिसेल याचा काही नेम नाही. पण कुठेही दिसल्यावर दुरूनच एक हात खांद्यापासून पूर्ण वर हवेत उचलून अभिवादन करण्याची पद्धत आणि काही विनोद झाला तर लहान मुलासारखे गदागदा खांदे हलवत हसण्याची लकब यामुळे बबन कोणतेही कपडे आणि कोणत्याही अवतरात असला तरी चटकन ओळखू यायचा.

बबन हा तसा पक्का नास्तिक माणूस. म्हणजे त्याला सुधारण्यासाठी गेलेल्या कित्येक जणांना त्याने नास्तिक करून टाकलंय, इतका हाडाचा नास्तिक. देव, धर्म, कर्मकांड, पोथ्या, पुराणे सर्व कोळून प्यालेल्या या माणसासमोर कोणत्याही श्लोकाचा किंवा ओवीचा उच्चार करायचा अवकाश, याचा काही ना काही प्रतिवाद तयार असायचा. याच्या पाचवीला दाभोळकरांनीच याच्या डोक्यावर हात ठेवला होता की काय कोण जाणे? पण एवढं असूनही आमच्या पंचक्रोशीत जो कोणी बाबा, बुवा, साधू, संत, महंत, किंवा भगत येई, तेव्हा त्याच्या दरबारात हाच बहाद्दर सर्वात अगोदर हजर. आमच्या सर्व मित्रांच्या मते बबन म्हणजे फक्त टिंगल करण्याचा विषय होता. अगदी माझ्याही. पण एके दिवशी मला त्याच्याबद्दलचें हे मत बदलणं भाग भाग पडलं. त्याचं झालं असं, की आम्ही कॉलेजला असतानाचे दिवस होते, दसर्‍याचं सीमोल्लंघनाचं निमित्त म्हणून आणि नेहमीच्या रहाटगाडग्यातून थोडा बदल म्हणून आईबाबांना गावाबाहेरच्या देवाच्या दर्शनासाठी घेऊन जाण्याचा बेत मी आखला होता. आईची तयारी चालू होती, म्हणून तोपर्यंत मी घराबाहेर गाडी पुसत होतो. इतक्यात मागून आवाज आला,
"काय, कुठे निघाली स्वारी?" मी मागे वळून बघितलं, तर बबन आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे उजवा हात खांद्यापासून वर हवेत उचलून मला विचारात होता.
"काही खास नाही रे" मी म्हंटलं, "दसरा आहे म्हणून जरा घरच्यांना मंदिरात घेऊन जातोय. येतोस का?"
"हॅट, आपण कधी मंदिरात देवाच्या पाया पडायला जात नाही" बबनने आपण रस्त्यावरची पाणीपुरी खात नाही हे जितक्या तुच्छतेने म्हणावं तस म्हटलं. मग मलाही त्याची फिरकी घ्यायची हुक्की आली. मी त्याला म्हटलं,
"काय रे? भागवत कथा, हरिनाम सप्ताह आणि काय काय नको त्या सत्संगाला जाऊन बसतोस. तेव्हा कुठे जातो रे तुझ्यातला दाभोळकर?"
"ते काही आपण तिथलं पाणीदार लेक्चर ऐकायला जात नाही." बबन म्हणाला, तसा मी त्याला म्हणालो,
"मग काय तिथे वाटला जाणारा प्रसाद खायला जातोस?"
"नाही रे. तुम्ही लोक ना, खूप भाबडे आहात रे, खूप भाबडे!"
"म्हणजे?"
"अरे, वर्षानुवर्षे तेच भागवत अन तेच तेच हरिनाम अखंड जपत राहिल्याने आपल्या आयुष्यात काही फरक पडतो, यावर विश्वास तरी कसा बसतो रे तुमचा ?"
"आमचं सोड रे, तूच कशाला जातोस मग तिथे ऐकायला?"
"हे बघ, तुला सोप्पं करून सांगतो." समजावणीच्या सूरत बबन म्हणाला, "फार दिवसांपूर्वी मी एक इंग्लिश कथा वाचली होती, त्यात राज्य गमावलेल्या राजाच्या पाचव्या की सहाव्या वंशजाची कथा होती."
"बरंम मग?"
"त्यात त्या राजाने राज्य सोडून जाताना त्याचा शाही राजमुकुट एका गुप्त ठिकाणी जमिनीत पुरून ठेवलेला असतो. त्या राजाची अशी अपेक्षा होती की तो राजमुकुट त्याच्या वंशजानाच मिळावा. पण त्या ठिकाणाची माहिती ज्याच्याकडे विश्वासाने सोपवावी त्यानेच तो राजमुकुट हस्तगत करू नये म्हणून तो राजा एक शक्कल लढवतो. तो त्या गुप्त ठिकाणाच्या माहितीचा एक क्लिष्ट असा श्लोक बनवतो. आणि तो श्लोक त्या विश्वासू (?) सेवकाकडे देऊन सांगतो की हा आमच्या घराण्याचा पारंपरिक श्लोक आहे. आमच्या खानदानातील जो तरुण लग्न करतो, त्याने लग्नापूर्वी हा श्लोक एकदा तरी पठण करावा, असा नियम आहे. त्यामुळे बाकी काही झालं तरी चालेल, पण हा श्लोक माझ्या मुलाकडून त्याच्या विवाहप्रसंगी तू वदवून घे." त्याप्रमाणे त्या कोड वर्डला देवाचा पवित्र श्लोक समजून त्या राजाच्या चार पिढ्या डोळे झाकून त्याचं विवाहप्रसंगी पठण करतात आणि आयुष्य कंठतात. पण पाचवी पिढी हुशार असते. ती त्या श्लोकाच्या अर्थाची उकल करते, त्याप्रमाणे राजमुकुटाचा शोध घेते आणि शेवटी राजमुकुट त्यांना प्राप्त होतो."
"हो, ठीक आहे. पण त्याचा इथे काय संबंध?" माझा हा अज्ञानमुलक प्रश्न ऐकून बबनने असा काही चेहरा केला की बस.
"अरे मूर्ख माणसा, मला असं सांगायचं आहे की आपल्या सर्व ग्रंथ, पोथ्यापुराणात नाममाहात्म्याखेरीज एक गूढ पण तितकाच सोपा अर्थ दडलेला आहे, जो रूपकामध्ये मांडलेला आहे. त्याची कुठे उकल होते का, त्यासाठी मी प्रवचन-कीर्तंनांना जाऊन बसतो, समजलं?"
"छे, काहीतरीच काय? कशाचा संबंध कुठे जोडतो आहेस? असं कुठे असतं काय?" मी त्याला झटकत म्हटलं.
"हेच तर तुम्हाला कळत नाही." माझी कीव करत बबन म्हणाला, "सांगतो. हे बघ, आज दसरा आहे ना? नवरात्र नुकतंच संपलंय ना?"
मी हो म्हटलं, तसा बबन म्हणाला "आत्ताच्यासारखी पूर्वी मोठ मोठी धरण, बंधारे नसायची. तेव्हा चार महिने पडलेल्या पावसाचं जे पाणी विहीर, नद्या, तलावात असायचं, त्याच पाण्यावर पुढचे आठ महिने माणसांची, शेतीची अन गाई गुरांची तहान भागवणं भाग होत. बरोबर?"
"बरोबर."
"हेच पाणी काटकसरीने वापरण्यासाठी पूर्वजांनी तुम्हांला ठिबक सिंचनाचं एक प्रात्यक्षिक दर वर्षी करायला सांगितलं, जेणेकरून तुम्ही त्यातून बोध घेऊन पुढचे आठ महिने पाणी जपून वापराल."
"कोणतं प्रात्यक्षिक?" मी न उमजून विचारलं.
"अरे बाळा, नवरात्रात देवीच्या शेजारी मातीमध्ये धान्य पेरल होतं, ते छोट्या मडक्यातल्या ठिबक सिंचनामुळे उगवलं आणि मोठं झालं की नाही?"
बबनच्या म्हणण्याचा अचानक उलगडा झाल्याने मी म्हटलं, "अरे हो, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं?"
"तेच तर" चेव येऊन बबन म्हणाला, "याच प्रात्यक्षिकातून शिकून आपण पाणी जपून वापरावं असं आपल्या पूर्वजांना वाटत असेल. शिवाय दर वर्षी नियमित आपल्या शेतातल्या मातीच्या उगवण क्षमतेचं परीक्षण झालं, ते वेगळंच. पण आपण समजूनच घेत नाही. एकीकडे देवीची आरती करत दुसरीकडे पाण्याची नासधूस करणं काही सोडत नाही. ही 'अंध'श्रद्धा नाही का?"
बबन्याने मला बरोब्बर पेचात पकडलं होतं. ह्याला आस्तिक करायला गेलेले स्वतःच नास्तिक का झाले होते, ते आत्ता समजलं. त्याचा युक्तिवाद बिनतोड होता. मला कळत होतं, पण वळत नव्हतं. मोठा बाका प्रसंग होता. पण इतक्यात घरातून आईने आवाज देऊन माझी सुटका केली. मी म्हटलं, "आई आवाज देते आहे. ओके, चल बबन, भेटू या नंतर."

तर असा हा आमचा मित्र बबन म्हात्रे. जो अगोदर चेष्टेचा अन टिंगल करण्याचा विषय होता, तो नंतर माझ्यापुरता तरी कुतूहलाचा विषय झाला होता. नंतर आमच्या वरच्यावर भेटी होत राहिल्या. तो मला जेवताना ताटाला पाणी फिरवण्यापासून तर चितेभोवती मडक्याने पाणी फिरवण्यापर्यंत सार्‍या रूढी-परंपरांमागचं विज्ञान सांगत राहायचा. वाद घालायचा, पटवून द्यायला झटायचा. नाही म्हटलं, तरी त्याचे युक्तिवाद पटण्यासारखेच असायचे. मला नक्की काय करू तेच कळायचं नाही. वर्षानुवर्षं मनावर खोलवर झालेले संस्कार त्याच्या विचारांना आचरणात आणू देत नव्हते. पण या सगळ्या गोष्टींमुळे एक मात्र झालं की बबनची आणि माझी एकमेकाशी एक विशेष अशी नाळ जोडली गेली. बाकी कोणीही त्याची कितीही टिंगल केलीम तरी तो त्याचे नवीन विचार, संशोधन माझ्याच जवळ मांडायचा. कारण मी जरी त्याचे विचार स्वीकारत नसलो, तरी नाकारतही नव्हतो. त्याची टिंगल करत नव्हतो. खरं तर मी त्याच्या साठी एक उत्तम श्रोता होतो. श्रवणभक्ती हाच माझा धर्म होता. त्यामुळे त्याचं माझ्याशीच फार चांगलं जमायचं.

पुढे यथावकाश आम्ही कॉलेज पूर्ण करून नोकरीला लागलो. जवळपास सर्व मित्रांची लग्नही झाली. पण बबनने मात्र काही लग्न केलं नाही. पत्रकारिता करायला लागला. कुठल्याशा एका वर्तमानपत्रात त्याचे लेख छापून यायचे. त्याचा लेख छापून आला की तो पहिले मला दाखवायला घेऊन यायचा. त्यामध्ये हेच सर्व असायचं - जुन्या रूढी-परंपरा, त्यांची तत्कालिक कारणं आणि आज त्याला आलेलं कर्मकांडाचं स्वरूप. बबन एक झपाटलेला कार्यकर्ता होता. फार पैसा जरी मिळत नसला, तरी एक विशेष असं आत्मिक समाधान त्याला या कार्यातून मिळत असावं.

एक दिवस असाच मी ऑफिसला जात असताना बबन लगबगीत कुठे तरी जाताना दिसला. हातात समानाची बॅग होती. कुठे तरी गावाला निघलेला असणार, म्हणून मी हटकून विचारलं, "काय बबनराव, एवढ्या घाईत कुठे?"
तसा बबन म्हणाला, "अरे, कुंभमेळा आहे ना. त्र्यंबकेश्वरला चाललोय."
"काय?" मी तर आश्चर्याने उडालोच. "अरे, काय संन्यास घ्यायचा विचार आहे की काय तुझा?"
"नाही रे!" मला झटकत बबन म्हणाला, " अरे, तुला म्हणून सांगतो, इकडे ये" असं म्हणून माझ्या हाताला धरून तो मला जवळच असलेल्या एका चहाच्या टपरीवर घेऊन गेला. जरा कोपर्‍यातली जागा बघून आम्ही दोघे स्टूलवर बसलो.
"हं, सांग आता, हे सर्व काय प्रकरण आहे?" मी बोलायला सुरुवात करत म्हटलं.
"अरे, त्याचं काय आहे, माझ्या डोक्यात ना एक भन्नाट आयडिया आली आहे." - बबन.
"कसली आयडिया?" - मी.
"अरे, मला सांग, लाखोच्या संख्येने हे सगळे लोक कुंभमेळ्यात का जातात, माहीत आहे का?" बबनने विचारलं.
"हो, माहीत आहे, पाप धुवायला..." मी सांगितलं.
"अरे, तेच तर या लोकांना कळत नाही. त्याच्यामागेही एक कारण आहे, पण ते कुणाच्या लक्षातच येत नाही. त्याचा शोध न घेता दर बारा वर्षांनी मेंढ्या जातात आणि पाण्यात डुबकी मारून येतात." बबन त्याला 'सत्य का ग्यान' झाल्याच्या सुरात म्हणाला.
"हो का? मग तुला कळलंय का त्याच्यामागचं कारण?"
"तेच तर सांगतोय ना, मी त्या कारणाच्या फार जवळ पोहोचलोय असं वाटतंय. आता फक्त पडताळा घ्यायचा तेवढा बाकी आहे, बस्स!"
"अच्छा, मग ते काय कारण आहे, मलाही कळू दे..." मी म्हणालो.
"हे बघ, तुला कुरींजी या फुलाचं नाव माहीत आहे?" बबनचा प्रश्न. बबनची ही नेहमीची खोड आहे. सरळ मुद्द्याला सुरुवात करण्याअगोदर काहीतरी प्रास्तविक करण्याची.
"नाही, मला नाही माहीत. पण त्याचा इथे काय संबंध?"
"सांगतो, ऐक. हे जे फूल आहे ना, ते बारा वर्षांतून एकदाच उमलतं." बबन सांगत होता.
"बरं, मग?" आश्चर्याने मी विचारलं.
"अरे, विचार कर, जर अशी फुलं असू शकतात, तर दर बारा वर्षांनी विशिष्ट तिथीलाच उमलणारीही फुलं असू शकतीलच ना?"
"होम असू शकतील, मग?"
"हे बघ, माझा असा तर्क आहे की, त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी पर्वतावर अशीच एक वनस्पती असू शकते, जी कुंभमेळ्यातल्या काही पर्वणीच्या तिथीलाच फुलत असेल. तिचं औषधी महत्त्वही अपार असू शकतं. पण आपल्या पूर्वजांनी सरळ सरळ त्या वनस्पतीचं नाव सांगितलं असतं, तर कासच्या पठारावरच्या फुलांची आपण जशी वाट लावली, तशीच या वनस्पतीचीही लावली असती. म्हणून आपल्या पूर्वजांनी त्या वनस्पतीचं नाव आपल्याला थेट न सांगता त्याचा स्पर्श होऊन आलेल्या पाण्यात स्नान करणं पवित्र असतं, असं मुद्दाम सांगितलं असेल. काय वाटतं तुला?"
"अरे, तेथे गरुडाकडून ते अमृताचे चार थेंब पडले होते ना, म्हणून भरतो तेथे कुंभमेळा. तुझं आपलं काहीतरीच..."
"नाही रे! ती सत्यावरती बेमालूमपणे अच्छादलेली दंतकथेची शाल आहे रे!" - बबन.
"बरं, तसं तर तसं, पण एक विचार कर - आपल्या काही शे पिढ्या अगोदर ज्या तपस्वींना ही गोष्ट ठाऊक असेल, ते तरी अमर होऊन आज हयात असला हवे होते ना?" माझा प्रश्न.
"तेच तर तुला सांगतोय ना, की अमर असं कोणी नसतं रे. जो जन्माला आला, तो मरणारच आहे. ही वनस्पती कोणाला अमर करत नसेल. पण त्या पाण्याने आंघोळ केल्याने 'पापं' धुतली जात असतील, तर माझ्या मते ती अनेक आजारांवरची एकमेव रामबाण औषधी असेल. म्हणून जुन्या काळातल्या लोकांनी आजाराला 'पाप' असा कोड वर्ड वापरला असेल. आता मला सांग, 'दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी' या वाक्याचा तुझ्या मते अर्थ काय?" बबनचा प्रश्न.
"अरे, साधं आहे, जो एकदा ब्रह्मगिरीला भेट देतो, त्याला कधी नरकयातना भोगाव्या लागत नाहीत, एवढा साधा सोप्पा अर्थ तर आहे."
"नाही रे! मला वाटतं नरक, यमपुरी हे फक्त रूपक आहे. खरा अर्थ असा असेल की ज्याला ही ब्रह्मगिरी खर्‍या अर्थाने 'दिसेल' ना, त्याचं जीवन एकदम सुखकर होऊन जाईल. त्यात दु:खाला जागा राहणार नाही." बबन मला समजावत म्हणाला.
"चल रे, काहीतरीच काय? तुझ्या मनाला येईल तो काहीही अर्थ काढतोस तू." मी म्हणालो, तसा बबन म्हणाला,
"बरं, मला सांग, तू नवनाथांची पोथी ऐकली आहेस का?"
"हो, ऐकली आहे एकदा कधीतरी."
"त्यात एके ठिकाणी असं लिहिलेलं आहे की, सोन्याचा मोह पडलेल्या एका व्यक्तीचे डोळे उघडण्यासाठी त्याचे गुरू त्याला दिव्य दृष्टी बहाल करतात आणि त्यानंतर त्याला या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील ब्रह्मगिरीसहित सर्व पर्वत सोन्याचे दिसू लागतात." - बबन
"अरे, ती नाथांची पोथी आहे. त्यात नाथांच्या अशा अनेक लीला लिहिलेल्या आहेत."
तसा बबन उसळून म्हणाला, "अरे, हे सोनं वगैरे सर्व रूपक आहे रे. प्रत्यक्षात तिथलं सोनं म्हणजे ती वनस्पती, जिला समजून घेण्याची दृष्टी असेल त्यालाच दिसेल, असा अर्थ आहे की नाही?"
"मला काही कळत नाही बाबा" डोकं चक्रावून मी म्हणालो, "आणि मला सांग, एवढ्या मोठ्या डोंगरावर नेमकी तीच वनस्पती कशी शोधणार आहेस तू? की हनुमानासारखा द्रोणगिरीच उचलून आणणार आहेस?" माझा पुन्हा प्रश्न.
"त्यासाठीच तर दोन वर्षांपूर्वी मी तब्बल सहा महिने त्र्यंबकेश्वरला जाऊन राहिलो होतो. अनेक वेळा ब्रह्मगिरी पालथी घालून मी तेथे असलेल्या तब्बल तेवीसशे वनस्पतींची यादी तयार केली आहे."
"काय सांगतोस काय, तेवीसशे?" मी आश्चर्यचकित होऊन विचारलं.
"होय, तेवीसशे. त्यामुळे माझा तर्क जर खरा असेल, तर आता पर्वणी काळात जी एखादी नवीन वनस्पती फुललेली आढळेल, तीच ती जादुई वनस्पती असेल बघ." बबन स्पष्टीकरण देत म्हणाला.
त्याचा तो तर्क आणि त्यासाठी त्याने घेतलेली प्रचंड मेहनत बघून मला त्याचं मन मोडवेना. कोणत्यातरी अजब गजब तर्काच्या पाठीमागे लागून तो त्याला मूर्तस्वरूप देण्याची भोळी आशा बाळगून होता. मी त्याच्या कार्याला शुभेच्छा देऊन त्याचा निरोप घेतला.

सिंहस्थ कुंभमेळा संपून बरेच दिवस लोटले आणि एक दिवस मला बबनचा फोन आला. फोनवर बबन अक्षरश: आनंदाने नाचतच होता. "काय रे, सापडली की काय तुला तुझी रामबाण औषधी?" मी विचारलं, तोवर तिकडून हर्षवायू होऊन जवळपास ओरडत बबन म्हणाला, "अरे, रोग बरे करणारी रामबाण औषधीच काय, त्याहीपेक्षा मोठा खजिना हाती लागला आहे माझ्या!"
"काय सांगतोस काय? मी म्हणालो.
"हो तर, माझा जसा तर्क होता त्यानुसार मला खरोखर एक नवीन वनस्पती तिथे सापडली, तिच्या गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी तिचे काही नमुने मी अभ्यासासाठी प्रयोगशाळांमध्ये पाठवले आणि तिथून आलेले निष्कर्ष केवळ भन्नाटच नाही, तर धक्कादायकसुद्धा होते."
"काय सांगतोस? असं काय होतं त्यात?" मी न राहवून विचारलं.
तसं बबन सांगू लागला, "मनुष्याचा वार्धक्याकडे झुकण्याचा वेग अत्यंत मंद, म्हणजे जवळपास शून्य करण्याची क्षमता या वनस्पतीत आहे."
"खरंच?"
"हो, खरंच. तुला सांगतो, या वनस्पतीची घाऊक प्रमाणात शेती केली ना, तर सर्व पृथ्वीवरची दु:ख, दैना अन विवंचनाच नष्ट होऊन जातील. जगाच्या पाठीवर कुठे वृद्धाश्रम राहणार नाही. थोर विभूतींचा हात आपल्या पाठीवर सदैव राहील. वृद्ध आणि त्यांची ससेहोलपट कुठे दिसणार नाही. सर्वत्र चैतन्याचे वारे वाहू लागतील. माणसाचं आयुष्यमान किती तरी वर्षांनी एकदम झपाट्याने वाढेल." बबन न थकता सांगत होता.
"तुझ्या अथक प्रयत्नांना अखेर यश आलं, यातच खरा आनंद आहे बघ." मी त्याचं तोंड भरून कौतुक केलं. फोन ठेवला अन माझ्या मनात बबनबद्दल अपार आदरभाव दाटून आला. त्याच्या जिद्दीला यश आलं याचा आनंद वाटला आणि त्याच्या या तपश्चर्येच्या फलितातून तो अखिल मानवजातीला सुखी करू पाहत होता, यामुळे त्याचा मित्र असल्याबद्दल अभिमानसुद्धा वाटला.

नंतर काही दिवस असेच गेले. कामाच्या धामधुमीत मी हे सर्व प्रकरण विसरूनच गेलो. आणि अचानक एक दिवस बबन रस्त्यात भेटला. अगदी नेहमीसारखाच होता. संशोधनाचा गर्व नाही की कसला अभिनिवेश नाही. मीच त्याला हटकून विचारलं. सुरुवातीला तर सांगतच नव्हता. पण शेवटी खूपच आग्रह केला, तेव्हा बोलला,
"मी त्या वनस्पतीचे सर्व नमुने आणि निष्कर्ष जाळून टाकलेत." बबनने एका दमात सर्व सांगून टाकलं.
"काय?" मला आश्चर्याचा धक्काच बसला. "असं का केलंस तू, बबन?"
"तुझ्यापासून काय लपवू रे? ते अमृत नव्हतं, विष होतं, विष!"
"म्हणजे? काय ते नीट सांग." काहीच उलगडा न झाल्याने मी विचारलं.
"हे बघ, मला वाटतम की, उत्पत्ती, स्थिती आणि लय या जीवनाच्या अटळ अवस्था आहेत. जो जन्माला आला, त्याचा मृत्यू अटळ आहे. हा सृष्टीचा नियम आहे. आपण त्यात उगाच ढवळाढवळ करू नये. ज्याला वार्धक्य येण्याची अन मरणाची चिंता आहे, तो आपलं तारुण्य भरभरून जगतो. त्याचा मनमुराद उपभोग घेतो. जर त्याची भीतीच नसेल, तर आयुष्य लांबलचक असूनसुद्धा किती नीरस आणि बेचव होऊन जाईल? फूलपाखरू फक्त सातच दिवस जगतं. पण ते सातही दिवस किती आनंदाने मनमुराद इकडे तिकडे स्वच्छंदीपणे बागडतं. आणि दुसरीकडे कासव तीनशे वर्षं जगतं, पण अत्यंत सुस्तावलेलं अन मरगळलेलं आयूष्य कंठत राहतं. तीनशे वर्षं सुस्तावलेलं आयुष्य जगण्यापेक्षा सात दिवस स्वच्छंदी आयुष्य जगणंच योग्य नाही का? शिवाय यातून पुण्यात्मेच दीर्घायुषी होतील, असं थोडीच आहे? मरणाची भीती न उरलेले अनेक रावणसुद्धा दीर्घायुष्याचा टिळा कपाळावर मिरवत जिकडे तिकडे बोकाळताना दिसले असते. तुला सांगतो, हे संशोधन मानवजातीला वरदान नाही, शाप ठरलं असतं, शाप. म्हणून मी त्याचा तत्काळ अंतच करून टाकला." बबनने सर्व मन मोकळं केलं. त्याचं तत्त्वज्ञान ऐकून मी पूर्णपणे निरुत्तर होतो.

बबनने जे काही केलं, ते योग्य होतं की नाही - माहीत नाही. कदाचित हाच विचार करून चरकसंहिता, भृगुसंहिता यासारखे मौल्यवन ग्रंथ लिहिणार्‍या आपल्या पूर्वजांनी दूरदृष्टीकोन ठेऊन आपल्या भावी पिढीपासून हे ज्ञान मुद्दाम दडवून ठेवलं असेल. बबननेही दूर दृष्टीकोन ठेवून तेच केलं. मी दुरूनच त्याला दंडवत घातला. फुटकळ गोष्टींचं पेटंट घेऊन त्याच्या जिवावर संपूर्ण आयुष्य चैनीत घालणारे अनेक जण या जगात आवतीभोवती दिसत असताना, केवळ मानवजातीच्या भल्यासाठी अथक परिश्रमांनंतर मिळालेल्या आपल्या अनमोल संशोधनाचा त्याग करणारा बबन हा त्या क्षणाला मला खूप खूप मोठा वाटला.

एक मात्र खरं, की काही व्यक्ती जन्मत:च अफाटच असतात. आणि बबन त्यातलाच एक होता.

Footer

कथा

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

17 Oct 2017 - 9:29 am | जेम्स वांड

छान आहे....

सुखीमाणूस's picture

17 Oct 2017 - 9:54 am | सुखीमाणूस

तर साष्टान्ग दन्ड्वत

प्राची अश्विनी's picture

17 Oct 2017 - 10:37 am | प्राची अश्विनी

+1

वकील साहेब's picture

17 Oct 2017 - 10:12 am | वकील साहेब

प्रतिक्रिये बद्दल आभार

मनिमौ's picture

17 Oct 2017 - 2:30 pm | मनिमौ

हो वकील साहेब. नवरात्रीचे रूपक खुलवून सांगितले ते विशेष आवडले

मनिमौ's picture

17 Oct 2017 - 2:30 pm | मनिमौ

हो वकील साहेब. नवरात्रीचे रूपक खुलवून सांगितले ते विशेष आवडले

स्वाती दिनेश's picture

17 Oct 2017 - 5:09 pm | स्वाती दिनेश

बबन ची व्यक्तिरेखा चांगली लिहिली आहे. छान!
स्वाती

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Oct 2017 - 6:03 pm | अमरेंद्र बाहुबली

लेख आवडला!
खासकरून सुरुवात
त्यांना जायचं असेल खुर्दला, तर बुद्रुकचा पत्ता विचारतील. एम.बी.ए. करायचं असेल, तर इंजीनियरिंगचा फॉर्म घेऊन येतील. विचार उजव्या विचारसरणीचे असतील, तर डाव्यांच्या सभांना गर्दी करतील.
हाहाहा

कपिलमुनी's picture

17 Oct 2017 - 6:11 pm | कपिलमुनी

कथा छान आहे , पण कुठेतरी रीलेट झाल्याने :'(

जुइ's picture

18 Oct 2017 - 12:39 am | जुइ

बबनच्या व्यक्तिरेखेचे चांगले चित्रण केले आहे. लेख आवडला.

टवाळ कार्टा's picture

18 Oct 2017 - 12:21 pm | टवाळ कार्टा

जब्रा

वकील साहेब's picture

18 Oct 2017 - 2:00 pm | वकील साहेब

मी आजवर लिहिलेली ही दुसरी कथा आहे. पहिली लिहून बारा वर्षे लोटलीत. ती कथा अगदीच सुमार होती. आत्ता ही थोड भीत भीतच लिहिलय. शब्दसम्राटांच्या या व्यासपीठावर आपली काय उगाच भाऊगर्दी अस वाटायच. पण तुमचे कौतुकाचे चार अभिप्राय वाचून मनाला एक उभारी आली. वाचण्यायोग्य आपणही काहीतरी लिहू शकतो याची खात्री पटली. पाठीवर पडलेल्या याच कौतुकाच्या चार थापांच्या जोरावर लिखाणात उत्तरोत्तर अजून सुधारणा करण्याचा मानस आहे. आणि तशी सुधारणा होईल अशी खात्रीही आहे. सर्वाचे मन:पूर्वक आभार.

इतके दवणीय लिहाल तर तिसरी कथा पडलीच म्हणून समजा..! ;)
असो, हे मजेने लिहिले आहे. चार मित्रांच्यात बोलतोय असे समजून लिहा. साहित्यमूल्य वगैरे गोष्टींचा विचार करू नका.

बबन म्हात्रे प्रभावीपणे उभा केला आहे.. पुढील लिखाणाला शुभेच्छा.

वरुण मोहिते's picture

18 Oct 2017 - 3:36 pm | वरुण मोहिते

जमलंय... अजून लिहीत राहा

अमित खोजे's picture

18 Oct 2017 - 8:56 pm | अमित खोजे

कुठेतरी वाचलेले आठवते. देवळात न जाता देवळाबाहेर उभ्या असलेल्या नास्तिकालाच खरा देव कळलेलं असतो. अश्या अर्थाचे काहीतरी ते वाक्य होते. अगदी तंतोतंत येथे बसते ते.

छान लिहिले आहे. लिहीत राहा. पुढील लेखनास शुभेच्छा.

ईश्वरदास's picture

18 Oct 2017 - 11:21 pm | ईश्वरदास

भारीय राव हे सायब.

सविता००१'s picture

19 Oct 2017 - 1:41 pm | सविता००१

मस्त आहे कथा.

मुक्त विहारि's picture

19 Oct 2017 - 5:16 pm | मुक्त विहारि

व्यक्तीचित्रण आवडले...

दुर्गविहारी's picture

20 Oct 2017 - 8:44 am | दुर्गविहारी

मस्तचं लिहीलयं भाउ तुम्ही !!! आता थांबु नका. लिहीते रहा. आणि हो माझी मागणी विसरू नका. तेवढे त्रिंबकगडावर सविस्तर लिहा. ;-)

वकील साहेब's picture

20 Oct 2017 - 1:01 pm | वकील साहेब

दुर्गविहारी साहेब धन्यवाद
होय, तुमची मागणी लक्षात आहे. लवकरच पूर्ण करू _/\_

मोहनराव's picture

20 Oct 2017 - 3:34 pm | मोहनराव

छान आहे कथा. आवडली

प्रमोद देर्देकर's picture

20 Oct 2017 - 6:49 pm | प्रमोद देर्देकर

मस्त लेखन आवडले.

नूतन सावंत's picture

20 Oct 2017 - 6:57 pm | नूतन सावंत

छान लिहिलं आहेत,पुलेशु.

स्नेहांकिता's picture

21 Oct 2017 - 12:16 pm | स्नेहांकिता

अचाट व्यक्तिमत्व आणि प्रभावी लेखन !

पैसा's picture

22 Oct 2017 - 8:43 pm | पैसा

आवडले

जागु's picture

23 Oct 2017 - 12:18 pm | जागु

बबन म्हात्रे ग्रेट.

खुप छान लिहीली आहे व्यक्तीरेखा.

mayu4u's picture

23 Oct 2017 - 1:01 pm | mayu4u

पु ले शु.

मित्रहो's picture

23 Oct 2017 - 6:50 pm | मित्रहो

बबन म्हात्रेंची विचार करण्याची पद्धत आवडली.

सौन्दर्य's picture

29 Oct 2017 - 3:59 am | सौन्दर्य

लेखातील आयडिया देखील एकदम मस्त व मनाला पटणारी आहे. पु ले शु.

वकील साहेब, जबरदस्त आहे व्यक्तिचित्र !
अगदी अर्क ! उत्सुकता शेवट पर्यंत जाम ताणली गेली की बबन आता काय करेल !
शेवटही विचार करायला लावणारा अन समर्पक !

(याच्या पाचवीला दाभोळकरांनीच याच्या डोक्यावर हात ठेवला होता की काय कोण जाणे? ))

:-) :-) :-)

चियर्स, वकिल साहेब, मजा आली बबन म्हात्रेला भेटायला !

पैलवान's picture

5 Nov 2017 - 10:23 pm | पैलवान

आणि लै इमोशनल होऊ नका कौतुकाने ;)
मिपा आपल्या घरासारखं आहे. सगळी फॉर्म्यालिटी सोडून द्या आणि अजून एक से एक कथा , व्यक्तिचित्रे, लेख, कविता, प्रवासवर्णने, जे असेल ते येउद्या!!!

वकील साहेब's picture

9 Nov 2017 - 12:57 pm | वकील साहेब

पैलवान साहेब लेखनाच्या सुरवातीच्या काळात अस व्हायचच नाही का ?
हो, अधिक लेखनाचा नक्की प्रयत्न करू

वकील साहेब's picture

14 Nov 2017 - 12:21 pm | वकील साहेब

सर्व मान्यवरांच्या उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल आभार _/\_