मुंबईतील पुनर्विकास आणि वाढती लोकसंख्या

सौन्दर्य's picture
सौन्दर्य in काथ्याकूट
30 Sep 2017 - 1:45 am
गाभा: 

मी जन्माने आणि शिक्षणाने मुंबईकर. आयुष्याची जवळजवळ तीस वर्षे मुंबईतच काढली. पुढे नोकरी निमित्ते गुजरातला जावे लागले आणि सध्या मुक्काम परदेशात. घर, मित्रपरिवार, आणि नातेवाईक मुंबईतच असल्यामुळे तीन एक वर्षातून एक फेरी तरी मुंबईला होतेच. ह्या अनेक वर्षाच्या काळात मुंबईतील गर्दी ही नेहेमी वाढतानाच पाहिली. मुंबईतील गिरण्या बंद झाल्या, अनेक सरकारी आणि प्रायव्हेट कार्यालये, घाऊक मंडया, पोर्ट, कारखाने, मुंबई युनिवर्सिटीचे काही भाग, दक्षिण मुंबईतून बांद्रा, नवी मुंबई वगैरे परिसरात स्थलांतरित होताना पाहिली. अनेक नवीन उड्डाणपूल बनले, बांद्रा-वरळी लिंक पूल बनला, अनेक नवीन रेल्वेलाईन्स जोडल्या गेल्या, पण ह्यामुळे गर्दी काही कमी झालेली दिसली नाही.

गेल्या काही वर्षात मुंबईती शेकड्यांनी री-डेव्हलपमेंट प्रोजेक्ट पास झाले, अनेक पूर्ण झाले, लोकं परत राहायला आली, काही दुर्दैवाने अजून अपूर्ण राहिले आहेत. पण ह्या सर्व पुनर्विकासामुळे एक गोष्ट घडली आणि ती म्हणजे ज्या जुन्या इमारतीत वीस एक कुटुंबे राहत होती तेथे आता चाळीस कुटुंबे राहायला लागली आहेत. जुन्या बिल्डींगचा पुनर्विकास होताना ही जी अधिकची वीस कुटुंबे राहायला आली तोच बिल्डर्सचा फायदा होता.

पण एक महत्त्वाचा प्रश्न येथे उद्भवतो तो म्हणजे ज्या पटीने अश्या पुनर्विकासीत इमारतीत आधीच्यापेक्षा दुप्पट कुटुंबे राहायला आली त्या मानाने त्या इमारतीच्या आसपास मुलभूत सुविधा दुप्पट किंवा निदान पन्नास टक्क्याने तरी वाढल्या का ? पिण्याचे पाणी पुरविण्यात येणाऱ्या पाईपांची क्षमता, सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारांची क्षमता, त्या इमारतीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची रुंदी, वीज, टेलीफोन, इंटरनेट, पुरविण्यासाठीची क्षमता, फायरब्रिगेड, अँब्युलन्स वगैरे साठी लागणाऱ्या जागेची गरज, वाहने पार्क करण्यासाठीची जागा, ह्या सर्व गोष्टी ह्या दुप्पट कुटुंबांसाठी पुरेश्या आहेत का ? ह्या शिवाय, शाळा, हॉस्पिटल्स, दुकाने, वाहतुकीची साधने, जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि न्याय यंत्रणा, करमणुकीसाठीची सोय, वगैरे गोष्टी पुरेश्या प्रमाणात वाढल्या आहेत का ? पुनर्विकासासाठी परवानगी देताना, संबधित खाते ह्या सर्व गोष्टींचा विचार करूनच अशी परवानगी देत असावी असं वाटतं.

मुंबईत आसपास पाहताना मात्र खरी परिस्थिती फारशी समाधानकारक दिसत नाही. रस्ते तेच आणि तेव्हढेच, तेही अतिक्रमणामुळे व्यापलेले, पुनर्विकास करताना जमिनीखालील पाण्याच्या आणि सांडपाण्याच्या पाईपलाईन्सची क्षमता वाढवताना मी पाहिलेली नाही. तीच गत इतर मुलभूत सुविधांची. मुंबईत कार्स आणि मोटरसायकल, स्कूटर्सची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे, त्यामुळे त्यांच्या पार्किगची एक मोठी समस्या आ वासून उभी आहे. शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल, सिनेमा-नाट्यगृहे, सगळीकडेच प्रवेश मिळविण्यासाठी मारामारी करावी लागते आहे. गर्दी वाढतच आहे आणि डोक्यावर छप्पर घेणं सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचं होत चाललंय. जीवनमान धकाधकीचे आणि अस्थिर होत चाललंय.

पण ह्या सर्वांहून जास्त भयावह अशी एक समस्या मुंबईसमोर उभी ठाकू शकते आणि ती म्हणजे Eemergency Evacuation (आपत्कालीन सुटका – चपखल शब्द नाही आठवत). रस्ते तेच आणि तेव्हढेच आणि लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेय. देव न करो पण जर तशीच काही परिस्थिती उद्भवली तर मुंबईतील एव्हढी मोठी जनसंख्या कशी व कोठून सुखरूप ठिकाणी हलवणार ? मुंबई हे एक बेट आहे व ते दक्षिणोत्तर पसरले आहे. मुंबईतून बाहेर पडण्यासाठी वसईचा पूल, ठाणे येथील दोन पूल व नवी मुंबईला जोडणारा एक पूल एव्हढेच भूमार्ग आहेत. जलमार्गाने बाहेर पडण्यासाठी आवश्यक तेव्हढी जलसेवा उपलब्ध नाहीच. हवाईमार्ग हा सगळ्यांनाच परवडेल असा नाही. आपत्कालीन परिस्थीतीत सरकार तो पर्याय देखील वापरेलच पण तो कितीसा वेगवान व पुरेसा असेल हे सर्वश्रुत आहे.

हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे कालची परळ-एल्फिन्स्टनरोड वरील रेल्वे पुल दुर्घटना. सद्य माहितीनुसार पुलाचा काही भाग कोसळतोय ह्या नुसत्या अफवेने घबराट पसरली व २२ मृत व बरेच जखमी झाल्याचे कळते. मुंबईतल्या फक्त एका पुलावर, अफवेमुळे असे काही घडू शकत असेल तर एखाद्या मोठ्या अफवेमुळे किंवा खरोखरीच्या अस्मानी-सुलतानी संकटामुळे काय घडू शकेल ह्याची नुसती कल्पना केली तरी पुरे.

१९९४ साली जेव्हा गुजरातच्या सुरत शहरात प्लेगचा प्रादुर्भाव झाल्याच्या शंकेने जवळजवळ दोन लाख लोकांनी सुरत सोडले त्यावेळी मी बडोद्याला मार्केटिंग क्षेत्रात होतो. सुरतहून निघणारे रस्ते, रेल्वेज हे सगळे घरदार सोडून निघणाऱ्या लोकांनी भरले होते. प्लेगच्या संभाव्य लागणीच्या भीतीने, इतर शहरातील लोकं, ह्या सुरतमधील लोकांना आपल्या घरात, सोसायटीत येऊ देत नव्हते. हॉटेल्स, लॉज वगैरे देखील त्यांना थारा देत नव्हते. अशी कित्येक कुटुंबे रस्त्यावर गाडीत, ट्रकमध्ये, बसमध्ये राहिली होती. टेट्रासायक्लीनने प्लेग बरा होतो असा समज सगळीकडे पसरल्यामुळे केमिस्टच्या दुकानाबाहेर प्रचंड मोठ्या रांगा लागल्या. त्याचे रेशनिंग, काळाबाजार सुरु झाला. सगळीकडे एक अनिश्चितता पसरली होती, माणुसकी अभावानेच दिसत होती. त्यातल्या त्यात सुखाची गोष्ट ही होती की सुरत शहर कमीत कमी तीन बाजूने भूमार्गाने जोडलेले असल्यामुळे जे शहर सोडून जाऊ इच्छित होते ते अगदी पायी देखील निघून जाऊ शकले.

मुंबईची दीड कोटीची जनता अशावेळी कुठे व कशी जाणार ?

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

30 Sep 2017 - 5:03 pm | आनन्दा

खरे आहे

मार्मिक गोडसे's picture

30 Sep 2017 - 5:18 pm | मार्मिक गोडसे

मुंबईच्या लोकल ट्रेनने बाहेर पडण्याचा मार्ग आहे की.

मार्मिक गोडसे's picture

30 Sep 2017 - 5:34 pm | मार्मिक गोडसे

सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी अजस्त्र Brimstowad प्रकल्प व १०० किमी बोगद्या द्वारे सुरक्षित पाणीपुरवठा हे दोन्ही प्रकल्प मुबईकरांची योग्य ती काळजी घेत आहेत.

सौन्दर्य's picture

30 Sep 2017 - 9:15 pm | सौन्दर्य

मार्मिक जी,

तुम्ही पुरविलेल्या माहितीबद्दल आभार. तरी देखील --

"मुंबईच्या लोकल ट्रेनने बाहेर पडण्याचा मार्ग आहे की." --- लोकल ट्रेन मधली गर्दी पाहता एकावेळी किती लोकं बाहेर पडू शकतील हा एक प्रश्नच आहे.

"सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी अजस्त्र Brimstowad प्रकल्प व १०० किमी बोगद्या द्वारे सुरक्षित पाणीपुरवठा हे दोन्ही प्रकल्प मुबईकरांची योग्य ती काळजी घेत आहेत." - उत्तम. तरी देखील मुसळधार पावसाने, मुंबईत आजही पाणी साचते, लोकल ट्रेन्स बंद पडतात ही वस्तुस्थिती आहे.

समुद्राची वाढती पातळी, त्सुनामी सारखा धोका, एखाद्या संभाव्य रोगाची लागण, भूकंप, युद्धजन्य परिस्थती सारख्या संकटांना तोंड देण्यासाठी मुंबई सज्ज नाही असं अजूनही वाटतं. आणि हे प्रकर्षाने वाटण्याचे कारण मुंबई हे एक बेट आहे हे आहे.

आणीबाणीच्या परिस्थितीत गर्दीचे मानसशास्त्र अगदी वेगळे असते हे आपण नुकत्याच घडलेल्या एल्फिन्स्टन-परळ पुलाच्या दुर्घटनेवरून पाहिलं आहेच.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

30 Sep 2017 - 9:21 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

योग्य मुद्दे मांडले आहेस रे. दक्षिण मुंबईत होणारी गर्दी कमी करण्यासाठी नवी मुंबई ७०च्या दशकात तयार करण्यात आली. त्यानंतर दक्षिण मुंबईत अधिक ईमारतींना,व्यवसायांना परवाने मिळणार नाहीत अशी अपेक्षा होती.पण झाले उलटेच. चौरस फुटांचे भाव वाढतच गेले. आणी शेवटी वांद्रे-वरळी सी-लिंक ही झाला. म्हणजे गर्दी/व्यवसाय दक्षिण मुंबईत व ईतरत्र मुंबईत वाढून अधिकाधिक महसूल कसा मिळेल हे स्थानिक व राज्य प्रशासनाने पाहिले. २००४ साली मुंबईचे शांघाय करण्याची घोषणा मनमोहन सिंगांनी केली. २००५ च्या जुलैच्या पावसाने ' मोठमोठ्या बाता मारण्याआधी मूलभूत सेवा-गटारे,सांडपाणे वगैरे सुधारा' हे दाखवून दिले. गेल्या महिन्यात त्याचीच पुनरावृत्ती झाली.
गर्दी,व्यवसाय दुसरीकडे हलवण्याची मनोवृत्ती तयार होत नाही तो पर्यंत हे चालूच राहणार असे आमचे मत.

मायला (माईला) एवढ्या चुका करताना प्रथमच पाहतोय ;)
काय आज पार्टी :P