सासुलीचा योगी श्री सावत्या

Primary tabs

रुस्तुम's picture
रुस्तुम in दिवाळी अंक
18 Oct 2017 - 12:00 am

header
"लाह्या व्हाया, लाह्या व्हाया!!!"असा काहीसा आवाज बसमध्ये ऐकायला आला की आम्हास समजायचे बेलापूर आलेले आहे आणि पाच एक मिनिटात ऑफिसमध्ये पोहोचणार, किंवा अचानक रेड्याचा आवाज ऐकायला यायला लागला की आम्हास समजायचे आता पांडवकडा आलाय आणि मग आम्ही आमची झोप आवरायला लागायचो.असले उद्योग कोण करणार? सावत्याच. आमचे बसमधले घड्याळच म्हणा. फक्त यांत्रिक घड्याळ आणि हे मानवी घड्याळ ह्यातला फरक असा की ह्याचा आवाज ऐकला की आमच्या चेहऱ्यावर हास्याची एक लकेर नकळत उमटायची.

सावत्याची आणि माझी ओळख गेल्या दोन-अडीच वर्षातीलच आणि तशीही अनवधानानेच झालेली.... माझ्यावर leadपणाची नवीन वस्त्रे चढवण्यात आली होती आणि त्या प्रोजेक्टची सुरुवात होती. चांडेल नावाचा सिव्हिलमधला एक designer, त्याचे माझ्याविषयी फार चांगले मत होते. (वास्तविक सिव्हिल आणि माझे डिपार्टमेंट एकमेकांना पाण्यात बघतात.) पण तो त्याच्या डिपार्टमेंटमध्ये नवीन होता आणि तिथे त्याला फारशी कोणाची मदत मिळायची नाही बहुधा. तर त्याच सुमारास हा सावत्याही रुजू झाला आणि त्या चांडेलने सावत्याशी माझी ओळख करून दिली. सुरुवातीला मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचो, कारण तो चांडेल मला 'सर' म्हणायचा, माझ्या टीममधले बाकीचेही आणि हा सावत्या मात्र चक्क अरे तुरे. नाही म्हटले तरी जो काही खरा-खोटा, फुकाचा अहंकार होता तो त्यामुळे डिवचला गेला होता. त्याला गावावरून येऊन बहुधा फार महिने उलटले नव्हते. गावचा अघळपघळपणा त्याच्या वागण्याबोलण्यात असायचा आणि मग आपोआप अशा लोकांना आपण परीटघडीचे लोक सहसा जवळ उभे करीत नाही, त्यातलाच तो प्रकार. त्याला फार जाणवू दिले नाही, पण त्यातलेच. त्यात पुन्हा तो बसमध्ये पाठी येऊन बसायला लागला आणि माझ्या आधीच्या स्टॉपवर चढायचा आणि माझी नेहमीची जागा बळकावायचा. मग मला खिडकीसाठी लोकांच्या मिनतवाऱ्या काढाव्या लागायच्या. आता तो आणखीनच डोक्यात गेला होता. पण एकदा संध्याकाळी बसमधून येताना work pressureविषयी आमची चर्चासत्रे घडत होती आणि खूप शॉट लागला होता डोक्याला! तेव्हा मध्ये पडून सावत्याने फारच करमणूक केली आणि वातावरण निवळले. मग जरा जाणीव झाली की सावत्या हे रसायन काही वेगळे आहे. मग त्या रसायनाचे पृथक्करण करून गुणधर्म जाणून घ्यावेसे वाटू लागले. माझे पृथक्करण सांगते - एकदम पारदर्शक माणूस. आत एक बाहेर एक असे असणे शक्यच नाही. आणि सदानकदा हसरा चेहरा. त्याच्याबरोबर असताना dull वाटणारच नाही आणि म्हणून कदाचित माणसांचा त्याच्याभोवती गराडा आढळून येईल. एक उत्तम कलाकार, उत्तम वक्ता. सगळे गुणधर्म मांडायचे तर कदाचित ग्रंथ लिहावा लागेल, पण आवर्जून सांगायचे म्हणजे उपमा देण्याच्या बाबतीत तर त्याचा हात कोणी ही धरू शकत नाही. कोटीच्या बाबतीत तो थोडा कमी आहे.. पण राहिला असता थोडे दिवस माझ्याबरोबर, तर तेही शिकला असता ;). त्याची बडबड ऐकली म्हणजे माणूस उदास राहूच शकत नाही. अचानक आपल्यातही ऊर्जा येते. ऊर्जेचा स्रोतच जणू !!!!

त्याच्याकडे सांगण्यासारखे किस्से बरेच असायचे. त्यातून हा कलाकार माणूस, त्यामुळे तो हातवारे करून विलक्षण रितीने रंगवून सांगायचा. (थोडक्यात, भूमिकेत शिरला की आवरणे कठीण जायचे). त्या किश्श्यांपैकी दशावतारी नाटकात घडलेले, 'अवंती पुरी नगरीतील राजाचा' आणि 'ठो' हे किस्से आठवले तर अजूनही हसून दमछाक होते. त्याच्या किश्श्यांमुळे सावत्या एकदम प्रसिद्ध झाला आणि हळूहळू तर आख्खी बस सावत्याचे किस्से ऐकण्यास पाठी गर्दी करू लागली. सावत्याकडचे किस्से हळूहळू संपत आले आणि आमची आणखीची भूक काही मिटत नव्हती. मग आम्ही काही न काही (म्हणजे मी, पाटील आणि गिरीश नामक व्यक्तिमत्त्व) कारण काढून किंवा काही विषय काढून सावत्याला गिऱ्हाईक करू लागलो . ९५-९६% हा खेळीमेळीने समोर जायचा आणि आमचा १ तासाचा कंटाळवाणा प्रवास सुखकारक व्हायचा.

रडण्याचा आणि दारुड्याचा अभिनय तर हुकमी. एकदा असेच आम्ही barbeque nationमध्ये जिभेचे चोचले पुरवायला गेलो होतो. तेव्हा इतर कोणाचा तरी वाढदिवस असावा आणि त्यांनी केक कापल्यावर barbeque nationवाल्यांनी 'Happy Birthday to you' हे गाणे वाजवले आणि हा भाई अचानक देहभान आणि जागा विसरून नाचायला लागला. लोकांना वाटले, दारूचा अंमल चढला असावा म्हणून विचित्र आणि सहानुभूतीपूर्वक नजरेने लोक त्याच्याकडे आणि कोणत्या ग्रूपबरोबर आलाय म्हणून आमच्याकडे पाहायला लागले आणि आम्हास एकदम मेल्याहून मेल्यासारखे झाले. ते बेअरिंग त्याने शेवटपर्यंत कायम ठेवले आणि ते एवढे हुबेहूब वाटले होते की आम्ही हॉटेलच्या खाली बिल भरून येणार्‍यांची वाट पाहत होतो; एक जोडपे बिल भरून खाली आले आणि त्यातल्या बाप्याला काही विसरल्याने परत वरती जावे लागले आणि तो खाली येईपर्यंत त्या बाईने सावत्याचा अभिनय पाहिला असावा. आम्हाला पास होताना ती बिचारी नवऱ्याला बिलगून आणि सावत्याकडे तुच्छतापूर्वक कटाक्ष टाकून पाहत जात होती. माझी हसून हसून वाट लागली आणि जाऊन त्या बाईला सांगावेसे वाटले की "अहो, त्याने अजिबात घेतली नाहीये फक्त तो अभिनय करतोय." आयुष्यभर हा प्रसंग विसरू शकत नाही.

प्राणिमात्रांविषयी त्याचे प्रेम तर एवढे अफाट आहे की त्याचे वर्णन करायला शब्द नाहीत. खासकरून त्याच्या गावच्या घराच्या आसपास किंवा त्यांचे पाळीव प्राणी ह्यांच्याविषयी. म्हणजे गाई- म्हशी, रेडे, कुत्रे इत्यादी इत्यादी. ह्यातल्या कुठल्याही प्राण्याला लांबून पाहूनच तो त्यांना काय झालेय किंवा त्यांचा मूड काय आहे वगैरे व्यवस्थित सांगू शकतो. आमच्या ऑफिसच्या जवळच एक टपरी आहे चहाची. तिथे आम्ही कधी चहा प्यायला गेलो की आजूबाजूचे कुत्रे जमा होतात सावत्याच्या भोवताली (म्हणजे ते भूतदया अंगात भिनवलेले गुज्जू, बिस्कीट घेऊन आले की जसे जमतात, तशातला प्रकार नाही बरं का). प्राण्यांना म्हणे sixth sense असतो. त्या sixth senseमुळेच असेल कदाचित, त्यांना त्यांचा स्वामीच आल्यासारखे वाटत असावे ... म्हणूनच आम्हीही सावत्याला 'दत्तगुरू' म्हणतो. सध्या तो मोरोक्कोला गेलाय. त्याला तिथल्या सगळ्याच गोष्टी आवडल्या असणार आणि तिथे तो रुळलाही व्यवस्थित, पण तिथली एक गोष्ट त्याला खटकतेय (तो बोलला नाही कोणाला, पण मला नक्की माहितेय) की तिथे त्याचे सवंगडी नाहीत. त्यांचा तिथे मुक्त वावर नाही. पण नक्कीच तो पुष्पकमधील कमल हसनप्रमाणे त्यांचे आवाज ऐकत असणार आणि दर्शन घेत असणार.

आम्ही त्याला परोपरीने समजावून सांगतो की त्याचे क्षेत्र चुकलेय .बरेचसे वेगवेगळे optionही सुचवतो, पण तो त्याला आमची नेहमीची फालतूगिरी समजतो आणि सोडून देतो. ओमानला आल्यापासून मी मिस करत असलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे सावत्या आणि इतर BAGPACKERSबरोबर केलेली धमाल. बाकीच्या सगळ्यांना प्रत्येक भेटीत भेटणं शक्य झालेय, पण सावत्या महाराजांचे काही न काही कारणाने अजून दर्शन झालेले नाही आणि पुढील भेटीतही होईल असे वाटत नाही.

सूर्याचे वर्णन काजवा काय करणार? काजव्याचा प्रकाश लिहून लिहून कमी होत चाललाय, म्हणून इथेच आटोपते घेतो.

सावत्या महाराजांना ह्याच शुभेच्छा की बेलापूर - jacobsप्रमाणे मोरोक्को - Jacobsमध्येही सावत्या महाराज प्रसिद्धीस पावतील. आता त्यांच्यातील मोठेपणास अनुसरून ते म्हणतील की "आता तू नाही, मग मला प्रसिद्धी कोण देणार?" पण त्यास माझे इतुकेच म्हणणे आहे की 'हिऱ्याची चकाकी काही लपून राहत नाही'.

footar

कथा

प्रतिक्रिया

जुइ's picture

18 Oct 2017 - 8:26 am | जुइ

लेख आवडला. थोडा अजून विस्तृत असतात तर चांगले वाटले असते.

रुस्तुम's picture

23 Oct 2017 - 11:58 am | रुस्तुम

धन्यवाद

लिहिण्यासारखं खुप आहे पण महारथी टायपिंगची फार सवय नसल्याने आवरतं घेतलं

गुल्लू दादा's picture

18 Oct 2017 - 8:38 am | गुल्लू दादा

छान लिहिले आहे. लेख आवडला. अजून किस्से टाकायला हवे होते.

टवाळ कार्टा's picture

18 Oct 2017 - 12:27 pm | टवाळ कार्टा

+१

जेम्स वांड's picture

18 Oct 2017 - 9:01 am | जेम्स वांड

आवडलं!

माम्लेदारचा पन्खा's picture

20 Oct 2017 - 1:24 pm | माम्लेदारचा पन्खा

आवडला सावत्या !

मी मागे एकदा जुन्या आॅफिसच्या माणसांशी बोलायचा कंटाळा आला होता म्हणून तीन दिवस घसा बसल्याचं नाटक केलं होतं ते आठवलं !!

पद्मावति's picture

20 Oct 2017 - 10:47 pm | पद्मावति

खुप मस्तं. सावत्या आवडला.

अमितदादा's picture

21 Oct 2017 - 1:01 am | अमितदादा

उत्तम लेख...काही लोक खरच अवलिया असतात ज्यांचा सहवास हवा हवा वाटतो. ते असे कसे हा प्रश्न कायम मनात राहतो उत्तर मात्र मिळत नाही.

एस's picture

21 Oct 2017 - 1:48 am | एस

लेख आवडला.

स्नेहांकिता's picture

21 Oct 2017 - 12:24 pm | स्नेहांकिता

भारी !

पैसा's picture

22 Oct 2017 - 8:44 pm | पैसा

आवडले, जरा अजून लिहायला हवे होते

रुस्तुम's picture

23 Oct 2017 - 12:00 pm | रुस्तुम

धन्यवाद

लिहिण्यासारखं खुप आहे पण मराठी टायपिंगची फार सवय नसल्याने आवरतं घेतलं

जागु's picture

23 Oct 2017 - 12:46 pm | जागु

छान आहे सावत्याची व्यक्तीरेखा.

नाखु's picture

24 Oct 2017 - 2:13 pm | नाखु

अफाट आहे
अणि त्या अफाट पणाला शब्दात अचूक मांडले आहे

रुस्तुम's picture

25 Oct 2017 - 3:12 pm | रुस्तुम

धन्यवाद मिपाकर

लेखाशी पूर्णपणे सहमत.... (रुस्तुम आपण म.गो. आहात का?)

पूर्वजन्मीची पुण्याई म्हणा किंवा आणखी काही सावत्या महाराजांचा सहवास (सहवास या शब्दाचा योग्य अर्थ घ्यावा :)) आम्हाला लाभला हे आमचे अहो भाग्य. २०१0 पासून ते आजतागायत अगदी मोरोक्कोत सुद्धा सावत्या महाराजांच्या सोबत असण्याने आपण एखाद्या वेगळ्याच विश्वात वावरत असल्याची जाणीव मला होत होती. कोणत्याही परिस्तिथीत या विश्वात दुःखाला म्हणा, उदासिनतेला म्हणा दूर दूरपर्यंत कुठेही थारा नसतो. असतो तो फक्त आनंद, उल्हास, हर्ष आणि खळखळून हास्य.
मी तर म्हणतो नैराश्य (depression) मध्ये गेलेल्या / असलेल्या व्यक्तीने बी+ ची लेक्चर ऐकण्यापेक्ष्या या व्यक्तीच्या सहवासात थोडा वेळ व्यतीत करावा.

रुस्तुम...काळजी नसावी सावत्या महाराजांच्या पद्स्पर्श्याने मोरोक्को ची धरती सुद्धा पावन झालेली आहे. मोरोक्को मध्ये अगदी थोड्या दिवसात मोरॉकॉन अरेबिक व फ्रेंच भाषा आत्मसात करून त्यांनी तिकडे सुद्धा आपली प्रवचने चालू केली आहेत आणि नेहमीप्रमाणे तेथे सुद्धा त्यांनी आपले भक्तगण निर्माण केले आहेत.

पु लं ना हि व्यक्ती सापडली असती तर नक्कीच 'व्यक्ती आणि वल्ली' मध्ये सावत्या महाराजांची वर्णी लागली असती.

रुस्तुम...किस्से येऊद्यात आणखी....

रुस्तुम's picture

16 Mar 2018 - 1:48 pm | रुस्तुम

धन्यवाद शशु..हो मी म. गो. .. आपण?