मुंबई ते कन्याकुमारी सायकल मोहीम....२० वर्षांपूर्वी

सावत्या's picture
सावत्या in भटकंती
29 Sep 2017 - 2:25 pm

मिपाकरांच्या विविध सायकल मोहीम वाचून खरंतरं खूप आधीचं धागा काढायचं ठरवलं होतं. पण या ना त्या कारणाने राहून जायचं. पण मोदक यांच्या बाईक सवारीमध्ये कन्याकुमारी वाचलं आणि थोडासा (बराचसा) भूतकाळात गेलो.

साधारण १९९७ ला नुकतंच कॉलेज संपलं होतं आणि मी बेकार बसलो होतो घरी. नाही म्हणायला १५-२० दिवसांचे १-२ जॉब्स केलेत पण नीट काही जमलं नाही. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्या दरम्यान माझ्या कॉलेज मधल्या ज्युनिअरचा फोन आला. ते ७-८ जण मिळून मुंबई ते कन्याकुमारी 19 दिवसांची सायकल मोहीम करणार होते जानेवारीमध्ये . येणार का म्हणून विचारलं. मी सहज हो म्हटलं. खरी पंचायत पुढे होती. माझ्याकडे सायकलचं नव्हती आणि घरून परवानगी मिळणं शक्य नव्हतं कारण प्रवास बराच मोठा आणि खूप दिवसांचा होता. आईतर तयारच नव्हती. पण बाबांना विचारलं आणि त्यांनी सहज परवानगी दिली. सायकल कुठे आहे आणि खर्चाचं काय असं विचारल्यावर "स्पॉन्सर्स" देणार आहेत म्हणून मी थाप पण मारली. पण सायकल पैदा करणं जरा मुश्किल होतं. एकतर मी बेकार असल्यानं माझ्याकडे सायकल विकत घ्यायला पैसे नव्हते. मग शाळेतल्या एका खास मित्राला पटवलं आणि त्याची " फ्लाईंग पिजन " सायकल मिळवली. पण जायच्या आणि यायच्या खर्चाचा प्रश्न होता. तोपर्यंत कॉलेजच्या जुनिअर्स ने पैसे जमवायला सुरवात केली होती. काहीजण पावती पुस्तक छापून पैसे गोळा करत होते. मग आम्ही काही कंपन्यांना स्पॉन्सरशिपसाठी भेटायचं ठरवलं. खरंतरं काही प्लांनिंगचं केलं नव्हतं. २० वर्षांपूर्वी आम्ही एकदमच नवशिके होतो. त्यातून जुनिअर्स ने कॉलेजमध्ये प्रोफेसर्स किंवा स्टाफ ला काहीच सांगितलं नव्हतं. आपापल्या कुवतीनुसार प्रयत्न चालू होते. बरं कंपन्यांकडे स्पॉन्सरशिपसाठी गेल्यावर काय सांगायचं याची पण कल्पना नव्हती. आम्ही काहीतरी १ टेबल बनवलं होतं आणि त्यात रेट्स दिले होते. माझी मावशी इंडियन ऑइल मध्ये कामाला होती, मग तिच्या रेफ्रन्सने मार्केटिंग वाल्याला भेटलो. त्याने विचारलं तुमच्या या रेट्स मध्ये काय काय समावेश आहे . बॅनर्स आणि स्पॉन्सरशिप सर्व एकत्र आहेत कि कंपनीने फक्त बॅनर्सचे बनवून द्यायचे आणि पैसे पण द्यायचे. आम्ही त त प प करत बसलो. तो समजून गेला. काहीच मिळालं नाही. नंतर काकांच्या ओळखीने फिलिप्स कंपनीत गेलो तर तिथे फक्त टी शर्ट्स देऊन बोळवण झाली. मग काही मित्राच्या ओळखीने मुंबई भाजप प्रदेश अध्यक्षांचं लेटर मिळालं त्यात महाराष्टात भाजपच्या कोणत्याही शाखेत रात्री झोपायची सोय होईल असं लिहून दिल होतं. असंच १ लेटर मुंबई पोलिसांकडून मिळालं. त्यात विविध पोलीस स्टेशन्सना मदत करण्याबद्दल लिहिलं होतं. हे सगळं चालू असताना प्रॅक्टिस पण चालू होती. सकाळी लवकर उठून सायकल चालवत शिवाजी पार्क मैदानात जायचं. नंतर शिवाजी पार्क मैदानाला धावत २-३ राउंड्स मारायचे, मग सायकलने ४-५ राऊंड्स. थोड्या दिवसांनी हळूहळू चेंबूर आणि नंतर वाशी पर्यंत जायला सुरवात केली. मित्रपण आपापल्या परीने प्रॅक्टिस करत होते. पण पैशांचं गणित काही जमत नव्हतं. कॉलेज पूर्ण झालेला मी एकटाच होता पण बेकार आणि बाकी सगळे तर लास्ट इयरला होते. मग कोणाच्यातरी सल्ल्याने " जायंट्स इंटरनॅशनल मुंबई" यांना भेटलो आणि त्यांचा बॅनर लावून सायकलिंग करण्यासाठी थोडेफार पैसे मिळाले. पण ते खूपच कमी होते. मुंबई महानगर पालिकेकडेपण गेलो तर त्यांनी पोलिओ आणि एड्स जनजागृती चे बॅनर्स दिले गावात वाटायला. सरते शेवटी कॉलेजमध्ये प्रोफेसर्सना सांगितलं. मग त्यांनी आम्हाला कॉलेज ट्रस्टकडे पाठवलं. खरंतर आम्ही अगोदरच कॉलेज ट्रस्टकडे जायला हवं होतं. आमच्या कॉलेज ट्रस्टच्या बऱ्याच संस्था मुंबईत आहेत. अगदी शाळेपासून मेडिकल इंजिनीरिंग मॅनॅजमेण्ट कॉलेजेसपर्यंत. पण तो पर्यंत बराच उशीर झाला होता. जायंट्स इंटरनॅशनलचे टी शर्ट्स, बॅनर्स रेडी झाले होते आणि मग कॉलेज ट्रस्टचा इगो पण हर्ट झाला आणि आम्हाला हात हलवत परत यायला लागलं. एवढं होऊन पण आमचा उत्साह कायम होता आणि त्यापेक्षा उत्साह कायम होता तो कॉलेज मधल्या सहकाऱ्यांचा. आपले सहकारी काहीतरी भव्य दिव्य करतात आहेत असं त्यांना वाटायचं. एवढ्या सगळ्या तुटपुंज्या तयारी वर आमची सायकल मोहीम सुरु होणार होती.
हे सगळं लिहीत असताना मला २० वर्षांपूर्वीचे आठवण शक्यच नाही.त्यामुळे प्रत्येक दिवशी आम्ही काय प्रवास केला, काय घडामोडी झाल्या, काय अनुभव आले याचे तपशीलवार डिटेल्स देणं मला जमणार नाही. त्यामुळे सायकल मोहिमेचे वर्णन कमी आणि बाकीचा फाफटपसारा जास्त असं काहीस झालंय. मला आता नक्की तारीखपण आठवत नाही पण बहुतेक रविवार होता. मुंबईतल्या मरिन लाईन्स जवळच्या सेंट झेवियर कॉलेजमध्ये एका छोटेखानी समारंभात आम्हाला जायंट्स इंटरनॅशनलचे टी शर्ट्स देण्यात आले आणि फ्लॅग ऑफ करण्यात आला. सभारंभाला कॉलेजचे प्रिन्सिपॉल आणि जायंट्स इंटरनॅशनलचे इतर सदस्य होते.माझे कॉलेजचे मित्र मात्र मोठ्या संख्यने उपस्थित होते. माझ्या आठवणीप्रमाणे शायना एन सी (नाना चुडासामा) पण आल्या होत्या. माझे बाबापण आले होते.

असो, तर आमची सायकल मोहीम सुरु झाली. माझ्या आठवणीप्रमाणे आम्ही पूर्वीचा नॅशनल हायवे १७ (सध्याचा ६६) ने प्रवास करणार होतो. मुंबई, कोकण, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू असा प्रवास होता. माझ्यासहित एकाच घरं कोकणात असल्याने १९ दिवसांचा प्रवास थोडा वाढला. तुम्हाला खरं वाटणार नाही पण मुंबई गेल्यानंतर आमचा बहुतेकवेळा रात्रीचा मुक्काम हा पोलीस स्टेशन्समध्येच झाला अगदी कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये देखील. मुंबई पोलिसांनी दिलेल्या लेटरचा खूपच फायदा झाला. १-२ दिवस आम्ही लोकल एस टी स्टँड्स वर झोपून काढले. खरंतरं मी तेंव्हा रोजनिशी लिहायचं ठरवलं होतं पण आम्ही एवढे दमायचो कि नंतर लिहायचं त्राणच नसायचे. आता वाटतं लिहिली असती तर बरं झालं असतं,आयुष्यभराची आठवण राहिली असती. २० वर्षांपूर्वी सोशल मीडिया, चेपू, असले काही प्रकार नसल्याने अपडेट हा प्रकारचं नव्हता. कर्नाटकपर्यंत आम्हाला काही विशेष अडचण आली नाही कारण हिंदी बऱ्यापैकी समजत होती स्थानिकांना. खरी पंचायत झाली ती केरळात आणि तामिळनाडूत. केरळात रमजानमुळे दिवसभर हॉटेल्स बंद. त्यामुळे जेवण सहज मिळायचं नाही. एकदा केरळात आम्ही उसाचा रस आणि पाव खाऊन दिवस काढला. दरमजल करत आम्ही कन्याकुमारीला पोहोचलो.आमच्या वेळापत्रकाप्रमाणे आम्ही नागरकॉइल इथून मुंबईला परत येणार होतो. पण हाय .... आमच्या टीम मेम्बरच नागरकॉइल स्टेशनच्या स्टेशनमास्टरशी भांडन झालं... का .. तर त्याला हिंदी येत नव्हतं.. आणि टीम लीडरच म्हणणं होतं भारतात राहून हिंदी येत न्हाई न्हणजे काय... मग आम्ही कन्याकुमारी एक्सप्रेसने कन्याकुमारी ते मुंबई असा ४८ तासांचा प्रवास केला. आमच्या सायकल्स साधारण १५ दिवसांनी माल डब्यातून आल्या. आमच्या मुंबई ते कन्याकुमारी प्रवासाची सांगता झाली.

अरे विसरलो .. या सायकल मोहिमेचा खरा उद्देश होता पोलिओ, कॅन्सर आणि एड्स जनजागृती. मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेले पोलिओचे आणि एड्स जनजागृतीचे पोस्टर्स आम्ही महाराष्ट्रात वाटले . कोकणातल्या शाळांमध्ये भाषण ठोकली. कर्नाटकातल्या शाळांमध्ये समजणाऱ्या हिंदीत विद्यार्थ्यांना पोलिओ, कॅन्सर आणि एड्स जनजागृती महत्व समजावलं. केरळ आणि तामिळनाडूत मात्र भाषेच्या मर्यादेमुळे आम्हीजास्त काही समजाऊ शकलो नाही. या प्रवासात आम्ही बऱ्याच ड्रायव्हर्स आणि त्यांच्या हेल्पर्सना भेटलो. बहुतांशी ते पंजाब हरियाणा या पट्ट्यातले होते. आपल्या कुटुंबापासून महिनोन्महिने दूर राहत होते. नैतिकतेचि कोणतीही भाषणं न ठोकता निरोध वापरणे किती महत्वाचे हे त्यांना पटवून दिलं. या मोहिमेदरम्यान ५ राज्यांचा प्रवास झाला, तिथल्या लोकांचं राहणीमान, त्यांची संस्कृती यांची ओळख झाली. स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेता आला.
अर्थातच टीम म्हटलं कि थोडेफार रुसवे फुगवे असणारच. थोडीफार बाचाबाची, हमरातुमरी, किरकोळ अपघात सोडता मोहीम बऱ्यापैकी सुरळीत झाली. सायकलिंग वेळापत्रक जॅम असल्याने विशेष काही बघता आला नाही. टीम लीडरने कोडॅक कॅमेरा आणला होता त्याने आम्ही काही फोटो घेतले होते. बऱ्याच वर्षांनी तो भेटला असताना त्याला फोटोबद्दल विचारलं पण त्याच्या घराच्या शिफ्टिंगमध्ये ते हरवले असं समजलं. त्यामुळे मोहिमेची विशेष अशी आठवण शिल्लक राहिली नाही. मोहिमेनंतर काही दिवसांनी कॉलेजने आमचा सत्कार केला होता. तोपर्यंत मी नवीन नोकरीत रुजू झालो होतो त्यामुळे मला त्या समारंभाला देखील जात आले नाही. कॉलेजने दिलेलं पदक आणि ट्रॉफी पण नंतर कुठेतरी हरवली.
नंतर पुढे पुढे नोकरी, नोकरीतील बदल यात सायकल मागे पडली. पुढे मी नवीन बाईक घेतली. बऱ्याच मित्रांकडे पण बाइक्स होत्या पण बाईकवरून अशी मोहीम काही जुळून आली नाही. नोकरी निमित्त अबू धाबीला आल्यावर तर ६-७ वर्ष सायकलिंग बंदच झालं. ऑफिस ते घर १००-१२० च्या वेगाने २० मिनिटात गाठणाऱ्या एसयूव्हीची भुरळ पडली. त्यातून एवढ्या भरधाव वेगाने मोटारी धावणाऱ्या रस्त्यांवर सायकलिंग करायची डेरिंग पण होत नव्हती. तरीपण सायकल काही डोक्यातून जात नव्हती. त्यातून मिपाकरांच्या मोहिमेवरील धाग्यांमुळे परत सायकलिंग चालू करावं असं वाटायचं. एप्रिलमध्ये माझ्या ऑफिसामधल्या मित्राने १ बातमी दिली. अबूधाबीपासून साधारणतः ३५ किलोमीटर्स "यास आयलंड"वर फॉर्म्युला १ ट्रॅक आहे. फॉर्म्युला १ ची रेस नसताना तिथे यास मरिना सर्किटवर "स्टार्ट यास" आणि "ट्रेन यास" असे सर्वांसाठी. तर "गो यास" खास स्त्रियांसाठी, सायकलिंग इव्हेंट असतात. मी सध्या या दोन इव्हेंटसाठी रेजिस्ट्रेशन करून रविवार आणि मंगळवारी सायकलिंग करतोय. इथे तुम्हाला स्वतःची सायकल नसेल तर ऑर्गनायझर्स सायकल आणि हेल्मेट् उपलब्ध करून देतात. फॉर्म्युला १ ट्रॅकचा एक राऊंड साधारणतः ५ किलोमीटर्सचा आहे. २ राऊंडने सुरवात करून हळू हळू मी ५ राऊंड्स पर्यंत पोहोचलोय. अर्थातच सलग ५ राऊंड्स काही जमत नाहीत. त्यातून गरम हवामानामुळे खूपच दमछाक होते. पण आता हळूहळू हवामान बदलायला लागलय. पुढच्या महिन्यापासून तापमान पण कमी होईल. बरीच युरोपिअन आणि अमेरिकन मंडळी, त्यांची बायकामुले आपापली सायकल आणि हेल्मेट, ग्लोव्हस घेऊन येतात. त्यांच्या सायकल्स पण वजनाने हलक्या पण मजबूत असतात. त्यांचा स्टॅमिना पण जबरदस्त आहे. सलग ८ ते १० राऊंड्स सहज मारतात.
खरतर मला सायकल्समधलं काहीच कळत नाही. स्ट्रीट बाईक, माउंटन बाईक, रेसिंग बायसिकल, हायब्रीड बायसिकल हे प्रकार इथे आल्यावर समजायला लागले. मिपाकरांच्या धाग्यातून बरीच माहिती देखील मिळत आहे. मार्चच्या दरम्यान परत भारतात स्थायिक व्हायचं ठरवलंय. मग मात्र परत सायकल मोहीम करायची इच्छा आहे. बघू कसं जमतंय ते.. तोपर्यंत मिपाकरांना त्याच्या सायकल आणि बाईक मोहिमेसाठी शुभेच्छा!!!!

प्रतिक्रिया

झकास लेख आहे हो, मस्त आठवणी लिहिल्यात.

अभिजीत अवलिया's picture

29 Sep 2017 - 4:59 pm | अभिजीत अवलिया

तेव्हा रोजनिशी लिहिली असती तर आज वाचायला, मिपावर अनुभव मांंडायला खूप मजा आली असती.
बाकी लिहीलेले आवडलेच.

एस's picture

29 Sep 2017 - 5:05 pm | एस

खूपच भारी!

उपाशी बोका's picture

29 Sep 2017 - 5:36 pm | उपाशी बोका

रोजनिशी नसली तरी तुमच्या आठवणी भारी आहेत. तुमच्या आगामी सायकल मोहिमेलापण शुभेच्छा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Sep 2017 - 8:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं आठवणी !

कंजूस's picture

30 Sep 2017 - 4:59 am | कंजूस

काय छान माहिती आहे. फोटो नसल्याचंही जाणवलं नाही. सायकलसवारांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे राहायचे कुठे आणि भरधाव वाहनांशी स्पर्धा.
आटोपशिर लेखन आवडलं

भ ट क्या खे ड वा ला's picture

30 Sep 2017 - 12:59 pm | भ ट क्या खे ड वा ला

पुन्हा सुरु कराच सायकलिंग .. लय मजा येत्ये हो

प्रविन ९'s picture

1 Oct 2017 - 4:00 am | प्रविन ९

खुप छान आठवणी आणि लेख पण....

दो-पहिया's picture

1 Oct 2017 - 9:31 am | दो-पहिया

पूर्वीच्या सिंगल स्पीड सायकलवरून इतका प्रवास करणं म्हणजे महानच

जुइ's picture

3 Oct 2017 - 3:43 am | जुइ

इतक्या वर्षापूर्वी प्रदिर्घ पल्याचे सायकलिंग केले मोठी गोष्ट आहे.

वाह! मस्त सफर आणि लेखही आवडला

सुबोध खरे's picture

4 Oct 2017 - 7:04 pm | सुबोध खरे

रोजनिशी नसली किंवा फोटो नसले तरीही अशा जगावेगळ्या गोष्टी आयुष्यभर पुरतील अशा आठवणी आणि अनुभव मात्र देऊन जातात.
केवळ स्मरणशक्तीच्या जोरावर बऱ्यापैकी लिहिलंय.
+१