बदलाच्या गतिचे नवे नियम मांडणारा: 'न्युटन'

पुंबा's picture
पुंबा in जनातलं, मनातलं
23 Sep 2017 - 11:26 pm

भारत बदलतो आहे, सत्तर वर्षांच्या प्रवासात असंख्य खाचखळग्यांतून, काट्याकुट्यातून वाट काढताना, जुन्या समस्यांवर विजय मिळवत नव्या समस्यांना तोंड देताना सतत कात टाकून नविन रुपडे घेतोय. काही बदल इतके क्रांतीकारी की त्यांच्याशी जुळवून घ्यायलाच शक्तिचा अफाट व्यय होतो अन काही इतके धीमे की 'काही होतंच नाही' अशी निराशा व्हावी. कित्येक प्रामाणिक लोक व्यवस्थेला आव्हान देता देता थकून जाऊन परत व्यवस्थेचाच भाग होऊन राहतात अश्या वेळेला धीमी पण आश्वासक पावले टाकत काही शिलेदार मात्र आपल्या परीने लढत राहतात. न्युटन ही अश्याच एका शिलेदाराची कथा आहे.
१९५२ साली भारतात पहिली निवडणूक झाली. सुकुमार सेन यांच्यासारख्या तडफदार निवडणूक आयुक्ताच्या नेतृत्वाखाली जवळजवळ ५००० मतदारसंघातील १७.५ कोटी मतदारांनी लोकसभा/विधानसभेसाठी आपले प्रतिनीधी निवडले. तेव्हापासून गेली सत्तर वर्षे मतदान करण्याचा लोकांचा अधिकार त्यांना मिळावा अन संविधानविरोधी तत्वांना नाकारून लोकशाही व्यवस्थेत सामिल व्हावे यासाठी प्रयत्न होत आहेत. मतदान यंत्रे तर त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत पण कोणाला निवडावे हे कळण्यासाठी आधी ज्या मुलभूत क्षमता विकसीत व्हायला हव्या आहेत, अशिक्षितता, कुपोषण, अनारोग्य अश्या अनेक unfreedoms पासून मुक्ती व्हायला हवी आहे त्याचे काय? स्वनिर्णयाचे स्वातंत्र्य केवळ कागदावर आणि प्रत्यक्षात मात्र जल, जंगल, जमिन यावर अधिकार नाही. प्रश्न विचारण्याची ताकद अजून आली नाही. विद्रोहाचा आवाज दाबला गेला, त्यांच्या वतीने आवाज उठवण्याचे भासवणाऱ्यांनी देखिल त्यांचेच बळी घेतले. 'न्युटन' आपल्याला या चक्रव्युव्हातून बाहेर काढण्याचा एक मार्ग देतो. प्रामाणिकपणे, आपली कर्तव्ये पूर्ण करण्यानेच मोठे बदल घडतील. आजपर्यंत जे निद्रिस्त राहिले त्यांच्या पायात बळ येईल, नविन देश घडवण्यात ते देखिल हातभार लावतील, जिथे आपल्याच नागरिकांविरूद्ध बळाचा वापर अनावश्यक ठरेल, खरी लोकशाही स्थापित होईल असे भविष्य प्रत्यक्षात येईल. तिथपर्यंतच्या वाटेचा धांडोळा या चित्रपटात घेतला आहे.
नक्षलवाद- माओवाद, आदीवासींना मुख्य प्रवाहात आणण्यात आलेले अपयश, मतदान आणि लोकशाही यांतील परस्परसंबंध, संवैधानिक अधिकार अन हजारो वर्षांपासून चालत आलेलं जीणं यातील ट्रेड ऑफ अश्या अनेक मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या न्युटन मध्ये सगळ्यात जास्त भावतं काय तर फ्रेम अन फ्रेम मध्ये भरून राहिलेली सकारात्मकता. कुठेही आक्रस्ताळेपणा न करता संयतपणे विषयाची मांडणी करण्यात दिग्दर्शक तसेच लेखक अमीत मसुरकर पुर्णपणे यशस्वी झाले आहेत. प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावू इच्छिणाऱ्या एका साध्या मनाच्या अधिकाऱ्यावर येणारा दबाव आणि मतदानाचा निव्वळ बनाव करत कातडी बचावता येत असून सुद्धा तो त्या दबावाला कसा पुरून उरतो त्याची गोष्ट इतक्या साधेपणाने मांडणे हे थोर आहे. चुरचूरीत पण विलक्षण आशयपूर्ण संवाद या ड्रामेडीचा आत्मा आहेत आणि त्यासाठी संवादलेखकाला पैकीच्या पैकी गुण. राजकुमार राव हा ओम पुरी, मनोज वाजपेयी यांच्या लीगमधला अभिनेता आहे हे पुन्हा एकदा त्याने दणकेबाज अभिनयाने सिद्ध केलंय. रघुविर यादव अन पंकज त्रिपाठी हे कसलेले कलाकार या चित्रपटात अक्षरशः कमाल करतात. विशेषतः रघुवीर यादव जबरदस्त. संजय मिश्रा अतिशय कमी कालावधीसाठी पडद्यावर येतात मात्र छाप पाडतात. छायाचित्रण लाजवाब आहे आणि संगीत कथेला अतिशय पुरक. अतिशय गंभीर प्रसंग चालू असताना प्रेक्षकांचे हशे येणं आता सवयीचं झालं आहे पण खंत वाटतेच. जिथे अनुकंपा, करूणा, लाज अश्या भावना आल्या पाहिजेत तिथं हसू येतं ही असंवेदनशीलता टॉकिजमधल्या अंधारात अधिकच भेसूरपणे जाणवते. पण तेही ठीकच.
ऑस्कर मिळो न मिळो, परिस्थितीत बदल घडवून आणू इच्छिणाऱ्या न्युटनच्या पाठीवर थाप जरूर मिळाली पाहिजे. सर्वांनी हा चित्रपट अवश्य पहावा.

संस्कृतीसमाजजीवनमानचित्रपटआस्वादसमीक्षाशिफारस

प्रतिक्रिया

छान परीक्षण. चित्रपट पाहणार!

अमितदादा's picture

24 Sep 2017 - 12:17 am | अमितदादा

छान परीक्षण..पाहायला हवा चित्रपट. पण तुम्ही ही बातमी वाचली का ?
Exclusive: Is India's Oscar Entry Newton Copied? What The Director Says

पुंबा's picture

24 Sep 2017 - 7:24 pm | पुंबा

धन्यवाद एस, अमीतदादा..
न्युटनवरचा चोरीचा आळ गंभीर भासतोय खरं, पण मसुरकरांचं म्हणणं आहे की चित्रपट सिक्रेट बॅलटवरून प्रेरीत आजिबात नाही. सिक्रेट बॅलट युट्युबवर उपलब्ध आहे, तो बघून वरच्या लेखात ओसंडणारे कौतुक योग्य की अयोग्य ते ठरवेन. :-) :-))