स्वयंपाकातील आयुधं

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
22 Sep 2017 - 9:54 pm

खल आणि बत्ता करतात ठणाणा
आम्हाला काहीतरी काम सांगाना 
स्टोव्ह शेगडीला लागली घरघर
ग्यास सिलेंडर आला घरोघर
काड्याची पेटी हिरमसून बसली
लायटरने माझी जागा पटकावली
यांत्रिक युगाला झाली सुरवात
जुन्या बुढयाना करुया बाद
वीज नी यंत्रे रुसतात जेव्हा
जुने ते सोने म्हणतात तेव्हा

लहानपणीच हे बडबड गीत म्हणताना मजा यायची. तरीही त्यावेळच्या त्या स्वयंपाक घरातल्या आयुधांचे अनन्यसाधारण महत्व मान्य होतेच. मला अजूनही आठवत खास पाहुणे आले की माझी आई खास कॉफी करायची. त्यासाठी खल-बत्यातून मस्त वेलची कुटायची आणि खिसणीवर जायफळ खिसून ते त्या कॉफीच्या पाण्यात टाकायची. आमच्या लहानपणी सर्रास चहा-कॉफी मिळत नसे. पण ती खास कॉफी मात्र तिच्या मागे लागून हट्टाने मी मागून घेत असे. ती देखील हसत म्हणायची अग खल-बत्त्याची चव मिक्सरला नाही बाळा. तिच कथा पाट्या-वरवंट्याची. आई जेव्हा त्यावर चटणी वाटायला बसायची तेव्हा घराच्या कुठल्याही कोपऱ्यात असले तरी मला ते कळायचं. कारण वरवंटया सोबत तिच्या खळखळ वाजणाऱ्या बांगड्या आजच्या चटणीचा बेत कानात येऊन सांगायच्या आणि मग हळूहळू कोथिंबीर-मिर्चीचा तो खास संमिश्र वास संपूर्ण घरात भरून जायचा. 

शेगडीवर शिजवलेल्या पितळी डब्याच्या कुकरमधल्या वरण-भाताची चव तर अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. निवत आलेल्या निखाऱ्यात सारलेले एखाद-दोन कांदे-बटाटे आणि त्यांचा तो खरपूस वास. अहाहा! शेगडी वरच भाजलेलं वांग आणि मग खमंग फोडणी घातलेलं ते भरीत. व्वा!

घरात एक बसायचा ओटा होता. अगदी जुन्या styleचा. त्याच्या बाजूच्या मोरीला लागून (अलीकडे या मोरीला सिंक म्हणतात) रगडा होता. इडलीच पीठ त्यात वाटल जायचं. पुरणपोळीच्या पुरणाच पण हाताने चालवायच पुरण मशीन देखील होतं. त्या पुरणाची चव आणि मऊसूत इडलीच पीठ अजून आठवत. एक पाय मुडपून विळीच्या त्या छोट्याश्या पाटावर आई कशी बसायची याचा देखील नेहेमी मला प्रश्न पडायचा. पालेभाजी चिरतानाचा तो विशिष्ट आवाज आणि चिरलेल्या ताज्या भाजीचा वास अजूनही मनात रेंगाळतोय. गाजराच्या हलव्यासाठी खिसणीवर गाजरं खिसताना खिसून घेतलेली बोटं अजून आठवतात.

त्यावेळी आईचा स्वयंपाक म्हणजे कितीतरी तयारी असायची. बिचारी सारखी स्वयंपाक घरात अडकलेली असायची. ही सगळी जुनी यंत्र वापरायची मग ती धुवून निथळायला ठेवायची आणि मग आवरून ठेवायची. ही सगळी आयुधं हाताळायला तशी वजनदार  होती. त्यामुळे अनेकदा यासगळ्यासाठी मी आईला मदत करायचे. त्या मदतीच्या निमित्ताने मी स्वयंपाक घरात कायम रेंगाळायचे. त्यामुळे अगदी लहान असताना पासूनच माझी आणि आईची दोस्ति झाली. "तुला स्वयंपाक करायला शिकवते." असं मला कधी आई म्हणाली नाही. पण मी सगळच शिकले.... तिच्याशी गप्पा मारत आणि तिला करताना बघून.

आज मात्र माझ्या स्वयंपाक घरात शक्य ती सगळी मशीन्स आहेत. फूड प्रोसेसरमुळे तर अर्धी कामं अवघ्या काही मिनिटातच संपतात. त्यात स्वयंपाक घरात मदतीसाठी एक बाई आहेच. त्यामुळेच कदाचित माझ्या लेकींना स्वयंपाक घराकडे वळण्याची सवयच नाही. पास्ता, पिझा हौसेने करण्याऱ्या माझ्या लेकी "जरा पोळ्या कर"; म्हंटल तर "नाही येत ग." अस म्हणून पळतात; आणि मग मात्र माझ्या मनात आईशी स्वयंपाक घरात मारलेल्या गप्पा आणि मुद्दाम न शिकता-शिकवता यायला लागलेले सगळे पदार्थ रुंजी घालतात. 

संस्कृतीलेख