कोलाज

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in दिवाळी अंक
21 Oct 2017 - 12:00 am


फार पूर्वी नव्वदीच्या सुरूवातीला दूरदर्शनवर 'नुक्कड' नावाची हिंदी मालिका लागायची. बहुरंगी आणि बहुढंगी असलेली पात्रं आणि त्यांच्या रोजच्या जगण्याभोवती गुंफलेली कथा यामुळे नुक्कड मालिका लहानपणी आवर्जून पाहायचो. आता पटकन डोळ्यासमोर येणारी नावं म्हणजे गुरू, गणपत हवालदार, अट्टल दारूड्या असलेला खोपडी, कादरभाई, तो पानवाला, ही आणि यातली सगळी पात्रं या मालिकेच्या निमित्ताने माझ्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनली होती. त्यावेळी कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की, खर्‍या आयुष्यात रोजच्या जगण्याचा भाग म्हणून अशा अनेक व्यक्ती आणि वल्ली माझ्या आयुष्यात मला भेटतील.
कालांतराने ही मालिका संपली आणि ही सगळी पात्र काही काळ विस्मृतीत निघून गेली. पण काही काळानं, शाळेतलं प्राथमिक शिक्षण संपता संपता, अशाच एका गजबजलेल्या नाक्याचा मी अविभाज्य भाग कधी बनलो हेही कळलं नाही !
नोकरीला राजीनामा देऊन बाबांनी शहरातल्या एका आडबाजूच्या नाक्यावर लहानसे हॉटेल सुरू केले होते. सकाळचं कॉलेज सुटलं की वयाने मोठा असलेला भाऊही त्यांच्या मदतीसाठी रोज जायचा, म्हणून मग शाळा शिकत असलो तरी कधी कधी सुट्टीच्या दिवसांत बाबांना मदत म्हणून मी त्यांच्यासोबत हट्टाने जायला सुरूवात केली होती. हट्टाने यासाठी कारण तिथे येणारे एकापेक्षा एक इरसाल नमुने आणि त्यांच्या गमती जमती मला पाहायला आवडत असत.
अगदी नाक्यावरच असणार्‍या आमच्या हॉटेलात नाना प्रकारची लोक येत आणि त्यांच्याही नकळत मला त्यांची निरीक्षणं करायला आवडे. अगदी काल परवा पाहिलेल्या एखाद्या चित्रपटासारख्या त्यातील काही व्यक्ती आणि प्रसंग अजूनही मनावर कोरले गेले आहेत..
साऊथवरून मोठ्या हॉटेलात शेफची नोकरी मिळेल या आशेने आलेला, पण दुर्दैवाने पानाची गादी चालवत असलेला जया पानवाला. तृतीयपंथी असल्यामुळे लोकांच्या कायम थट्टेचा आणि चेष्टेचा विषय असलेला पद्या. घरदार वैगेरे सगळं जुगारावर उधळून सदासर्वकाळ नशेतच वावरणारा अट्टला दारूडा शंकर्‍या. ग्रॅज्युएट होऊनही नाक्यावर दादागिरी करून नाक्यावरच्या छोट्या दुकानदारांकडून हप्ते गोळा करणारा नित्या उर्फ नितिन. जेव्हा पाहावं तेव्हा खराट्याच्या काड्यांनी ताशा वाजवण्याचा अभिनय करणारा वेडसर नान्या. नाक्यावर येताच सगळ्यांच्या नजरा खिळवून ठेवणारी बारबाला अंजू. चरसी, दारूडे, जुगारी ज्याला पाहून पॅन्टमध्येच फळाफळा मुतायचे असा नाक्यावरच्या चौकीतला धिप्पाड हवालदार लारा.
आणि हातावर पोट असूनही आपला रिक्षाचा धंदा सोडून दिवसच्या दिवस कसोटी क्रिकेटचे सामने आवर्जून पाहणारा क्रिकेटवेडा रामदास.
रामदास
या सगळ्या लोकांमध्ये माझ्या मनात ठसलेला अंत्यत इरसाल नमुना म्हणजे रिक्षावाला रामदास !!
ऐंशीच्या दशकात कधीतरी उत्तर प्रदेश सोडून पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी मुंबईत दाखल झालेला हा भैय्या म्हणजे एक अजब रसायन होतं. सकाळी शुचिर्भूत होऊन आला कि पेपरवाल्याच्या स्टॉलवरून नवभारत टाईम्स आणायचा आणि मग आमच्या हॉटेलसमोरील नाक्यावर किंवा कधी कधी हॉटेलमध्ये चहाचे घुटक्यांसोबत पनामा सिगरेटचे झुरके घेत क्रिकेटवरच्या गप्पा ठोकणे आणि जोडीने नवभारत टाईम्स वाचणे हा त्याचा नित्याचा दिनक्रम. मग उशीराने रिक्षा काढून दिवसभर ती चालवल्यानंतर रात्री ९-१० च्या सुमारास तो नाक्यावर परते, गप्पा मारण्यासाठी. गप्पाचे विषयही मर्यादितच पण त्यातही प्रामुख्याने भारतीय क्रिकेट, अजहरूद्दीन, सचिन तेंडूलकर यावर जास्त भर असे. कसोटी सामन्याच्या पाचही दिवस स्वतःचा धंदा बुडवून तो कधी त्याच्या कळकट रेडिओला चिकटलेला असायचा किंवा एखाद्या टीव्हीच्या दुकानासमोर ठाणं मांडून बसलेला असायचा. घरी बायका पोरांचे जेवणाचे हाल होत अगदी, पण हा मौला त्याच्या मस्तीतच मग्न असे.
आमच्या हॉटेलसमोरचा नाका म्हणजे रामदास सारख्या अनेक लोकांच गप्पा मारण्याचं, कुटाळक्या करण्याचं हक्काचं आश्रयस्थान. भारतीय क्रिकेट आणि त्यातही भारताचा कॅप्टन मोहम्मद अजहरूद्दीच्या फलंदाजीवर हा जौनपुरी भैय्या कमालीचा फिदा होता. अगदी डाय हार्ड फॅन! त्यातही एकदिवसीय क्रिकेटपेक्षा पाच दिवसाच्या पारंपारीक कसोटी क्रिकेटवर रामदासचा खूप जीव!!
१९९८ च्या रणरणत्या उन्हाळ्यात मार्क टेलरच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ बॉर्डर-गावसकर चषका-अंतर्गत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. तीन सामन्यांपैकी पहिल्या कसोटीत १७९ धावांनी विजय मिळवून भारताने मालिकेत आधीच आघाडी घेतली होती. अन दुसर्या कसोटीत कांगारूंना पहिल्या डावात २३३ धावात गुंडाळल्यानंतर भारताने धुवाँधार फलंदाजी केली होती. दुसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ३ गडी बाद ३६९ धावा केल्या होत्या. द्रविड अर्धशतक आणि अजहरूद्दीन नाबाद ९ धावा करून खेळपट्टीवर उभे होते.
तिसरा दिवस...
हाफ बाह्यांची कळकट्ट बनियन, कमरेभोवती लुंगी गुंडाळलेली, गालावर दाढीची खुटं वाढलेली, एका हातात टमरेल आणि दुसर्या हातात 'नवभारत टाईम्स' अशा अवतारात भर सकाळी रामदास आमच्या हॉटेलसमोर येऊन उभा राहिला होता. अनं आल्या आल्या माझ्यासमोर त्याने नेहमीप्रमाणे अजहरूद्दीनचे गोडवे गायला सुरूवात केली.
"अय पप्पू, देखना तुम ! आज अजहर सेंचुरी बनाकेही रहेगा. ओर इंडियाको जितायेगा भी !"
सकाळची वेळ. हॉटेल उघडल्यानंतर सकाळचा नाश्त्याचा मेनू पाहण्यासाठी बाबा आत भटारखान्यात गेले आणि मी गल्ल्याचा ताबा घेतला होता तोच हा अवलिया हॉटेलच्या दारात उभा ठाकला होता.
"अरे छोडो यार. तुम क्या कोई जोतिषी वैगेर हो क्या? जो इस मॅच का भविष्य जानते हो."आता मी रामदासची थट्टा सुरू केली होती. एव्हाना महाशय हॉटेलात शिरून त्याच्या नेहमीच्या जागेवर येऊन स्थानापन्न झाले होते. मला त्याची सवय माहित होती. "एक कडक स्पेशल चाय...रामदासके लिये" तो काही बोलायच्या आतच अशी ठेवणीतली आरोळी मारून मी पोर्याला त्याच्याकरता चहा आणायला सांगितला.
"अरे नही पप्पुवा, अभी पेहेले मॅचमे हाफ सेंचुरी बनाके, अभी फोरम मे आया है अजहर. और देखना वो मारकेही रहेगा !" अझरूद्दीनविषयी कमालीचा आत्मविश्वास त्याच्या वाक्यातून डोकावत होता.
"अच्छा !! ठिके ठिके. देखते है. वैसे घोडामैदान अब दूर नही."
तिसर्या दिवसाचा खेळ सुरू झाला. दणादण चौकार आणि षटकार लगावत मोहम्मद अजहरूद्दीनने नाबाद १६३ धावा ठोकल्या आणि आपल्या भक्ताचा विश्वास सार्थ ठरवला. अजहरच्या या दिडशतकी खेळीच्या साहाय्याने भारताने ऑस्ट्रेलियासमोर जिंकण्यासाठी ४०१ धावांचे अशक्यप्राय लक्ष ठेवले. मग त्यांच्या दुसर्या डावात कुंबळेने ५ विकेट घेत त्यांच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. परिणामी भारत तो सामना २१९ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.
तीन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी खिशात घातलेल्या भारतीय संघासाठी त्या संध्याकाळी रामदास आनंदाने बेभान होऊन नाक्यासमोर रस्त्यावर नाचला !!
....आणि त्याच वेळी झोपडीत एकाकी बसलेली त्याची बायको पोटच्या मुलांच्या खपाटीला गेलेल्या पोटात रात्रीचा घास कसा घालायचा हा प्रश्न सोडवण्याची खटपट करत होती !!
****************************

पद्या
तिशीतला गोरागोमटा पद्या खरं तर नावालाच पुरुष होता, त्याचे बाकी हावभाव सगळे बायकांसारखेच! आपण धड पुरुषही नाही अन् बाईही नाही हे ज्या दिवशी त्याला कळलं, त्या दिवशी घरच्यांचा त्याग करून त्याने मुंबईचा रस्ता पकडला. सहसा लोकांमध्ये जाणं टाळणारा अबोल पद्या दिवसभर भाड्याने घेतलेल्या त्याच्या लहानश्शा गाळ्यात लता, किशोर, रफी यांची गाणी ऐकत आराम करायचा. एखाद्या रामबाण औषधासारखी या मंडळींची गाणी खोलवर झिरपलेल्या त्याच्या जखमेवर हळुवारपणे मलमपट्टी करण्याचं काम करत. संध्याकाळी झाली की सगळं आवरून कुठेतरी कामाला जायचा, ते पहाटे कधीतरी परत यायचा.

असा हा पद्या म्हणजेच प्रदीप आमच्या हॉटेलात आला की, नाक्यावरचे रिक्षावाले, हॉटेलातली पोरं, बाजूला असलेले पानवाले ही सगळी जमा व्हायची आणि त्याची मस्करी सुरू करायची. कुणी एखादा मुद्दाम डोळा मारत "और, फिर कल रात को क्या किया?" विचारून गडगडाटी हसायचं, तर कुणी जिभल्या चाटत त्याच्या पाठीवरून हात फिरवायचं, तर कुणी त्यांच्या पार्श्वभागावर मुद्दाम चापट मारायचं. लोकांच्या या किळसवाण्या थट्टेची, घाणेरड्या स्पर्शाची पद्याने सवय करून घेतली होती. तोही या सगळ्या गोष्टी हसण्यावारी घेऊन जाई आणि मुद्दाम लोचटासारखा वागे. इतरांशी तो कसाही वागत असला, तरी माझ्याशी तो प्रेमाने वागे. हॉटेलात आला की माझ्या शाळेची चौकशी करे, "नियमित अभ्यास करत जा रे" असं आवर्जून सांगताना शाळेत जायला न मिळाल्याची खंत त्याच्या बोलण्यातून डोकवत असे.

अशाच एका दुपारी, पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि खाली राखाडी रंगाची पॅन्ट, शर्टाची वरची दोन बटनं उघडी अशा अवतारात पद्या हॉटेलात जेवायला आला. वर्दळ तशी नव्हतीच, त्यामुळे मोठ्या भावाकडे गल्ल्याचा ताबा देऊन बाबा घरी आराम करायला निघून गेलेले. मान खाली घालून मुकाटपणे पद्या एका टेबलावर जेवायला बसला, तसं संज्या नावाचा रिक्षावाला हटकून त्याच्यासमोर येऊन बसला. पद्याच्या एकूण वागण्यावरून त्याचं काहीतरी बिनसलं असावं असं वाटतं होतं आणि म्हणूनच अगदी शांतपणे तो जेवत होता.

"क्या कर रहा है पद्या?" संज्याने मस्करीच्या मूडमध्ये पद्याला विचारलं.

"दिखता नय क्या, खाना खा रहा हू." मस्करीच्या मूडमध्ये नसलेल्या पद्याने अगदी शांतपणे त्याला उत्तर दिलं.

"वयसे आज शामको क्या कर रहा हे, आयेगा क्या पिच्चर देखने." पद्याच्या उघड्या असलेल्या शर्टाच्या बटनातून आत डोकावत संज्याची नजर काहीतरी शोधत होती.

"नय, मेरा मूड नईये बिल्कूलबी." समोर बसलेला माणूस आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतोय हे बहुदा पद्याला कळालं असावं.

"अरे बस क्या. चल ना. मै निकालताय ना तेरा टिकिट. तू कायको टेन्शन लेता." संज्याची नजर अजूनही पद्याच्या छातीवरून हटत नव्हती.

"ए क्या देखताय रे संज्या? मै क्या औरत नैय रे, जो मेरे छाती को देख रहा हे." "देखना है क्या..दिखावू शर्ट उतारके..हां..बोल देखना है क्या? स्साऽऽला हरामी कही का."पद्याचा आवाज अचानक वाढला. नेहमीच्या थट्टा मस्करीला वैतागून त्याच्या आत धुमसत असलेली आग बाहेर पडू पाहत होती.

पद्याला चिडलेलं पाहून मोठ्या भावाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, त्याच वेळी संज्याने तिथून हळूच काढता पाय घेतला आणि ते प्रकरण तेवढ्यावरच थांबलं खरं, पण मला मात्र वासनेने बरबटलेल्या आपल्या चेहर्‍यावर शालीनतेचे मुखवटे लावून फिरणारा माणूस किळसवाणाच वाटला. कालांतराने पद्याने भाड्याचा गाळा सोडला आणि त्याच्यासारख्या लोकांमध्ये राहण्यासाठी मुंब्र्याला राहण्यासाठी निघून गेला. लोकही हळूहळू त्याला विसरून गेले.

****************************
सिंगर
त्याचं खरं नाव कोणालाच माहीत नव्हतं. नाक्यावरचे सगळे लोक त्याला 'सिंगर' म्हणूनच ओळखायहे. साधारण साडेपाच फुटाची उंची, केसांची आणि कपड्यांची ठेवण सिनेमातल्या हिरोंप्रमाणे, हसरा चेहरा, गोड बोलायचा सगळ्यांशी. वर्षातले काही महिने दुबईला कुठल्याशा एका रेस्टॉरंटमध्ये गायकाची नोकरी करणारा सिंगर, नाक्यावरचा एकमेव माणूस होता जो भारताच्या बाहेर जाऊन आला होता. 'मी दुबईला असतो' हे त्याच्या वागण्या-बोलण्यातूनही तो कायम समोरच्या माणसाला दाखवून द्यायची संधी तो केव्हाच सोडत नसे.

सिंगर म्हणजे जया पानवाल्याचं नेहमीचं गिर्‍हाइक! प्रत्येक वेळी आल्यावर तिथे उभे राहून गप्पा मारता मारता दोन-तीन पानं खायचा की गिळायचा हे ठाऊक नाही, पण त्यासोबतच दोन तीन घरी बांधून घरी न्यायचा. कमीत कमी चाळीस-पन्नास रुपये तरी होत असावेत, पण सिंगर एक छदामही द्यायचा नाही त्या खाल्लेल्या पानांचा आणि याचं मला कायम आश्चर्य वाटत राहायचं.

एका संध्याकाळी गल्ल्यावरचा फोन खणखणला

"अरे वो जयाको बुला ना फोनपे." पलीकडून सिंगर बोलत होता दुबईवरून..

"हां रूको.."म्हणत मी जया अण्णाला आवाज दिला "अण्णा, तुमारे लिए फोन हे शिंगरका."

तसं पळतच जया पानवाला गादी सोडून फोन उचलण्यासाठी आला.

"हा बोलो सिंगर."

"......"

"अरे नय नय, उसकी क्या जरूरत है."

"......"

"अरे नय भाय, नय चैय्ये, आपने फोन किया यादसे, येही काफीहे, कुच मत लाना."फोनवर जयाची नकारघंटा सुरूच होती.

"......"

"हां..हां..पक्का. कुच मत लाव." म्हणत फोन ठेवून दिला.

"अरे क्या हुवा जया.? क्या बोल रहा था सिंगर?" बांबानी चौकशी केली, तेव्हा जयाने सगळ्या गोष्टी विस्ताराने सांगितल्या.

"अरे क्या बोलू सेठ. वो सिंगरको लगता है हम लोग चुत्या है."

"हमेशा की तरह पुछ रहा था मुझे, कुछ लाना है क्या दुबईसे."

"अरे तो अच्छा है. बोलना था जो चीज चाहिये वो."

"अरे क्या खाक बोलू.? लेके आता है वहां से चीजे मुझे देने के लिए. पैसा देता हूं तो उस चीजका, तो नही लेता है, बोलता है गिफ्ट है तेरे लिए."

"अरे तो अच्छा है ना जया! बेचारा यादसे तेरे लिए गिफ्ट लेकर आता है दुबईसे."बाबांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.

"नय ना सेठ, ये हरामी सिंगर गिफ्ट लेके आता है साल में एक बार, लेकिन साल भर मेरे दुकानेपें फोकटमें पान खाके जाता है. एक रुप्या भी देता नय."

"उसके एक गिफ्टके पैसेसे मेरे यहाँसे खाके गये हुये पान का पैसाही ज्यादा होता, जो मुझे परवडता नय." सिंगरने खाल्लेल्या पानांचा वर्षाचा ताळेबंद जयाने एका वाक्यात बाबांपुढे मांडला आणि निरुत्तर झालेल्या बाबांमागे उभे असलेल्या मला त्याच्या नेहमी फुकट खाण्यामागचं गुपित कळलं होतं.

*****************************

१९९५ ते २००८ या तेरा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत रोजच्या जीवनाचा अविभाज्य अंग असलेला तो नाका माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय होता. भारतातल्या निरनिराळ्या शहरातून आलेले हे लोक, त्यांचे निरनिराळे स्वभाव, त्यांच्या रोजच्या जगण्याच्या पद्धती हे सगळं मला मनसोक्त अनुभवता आलं. शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या निमित्ताने या वर्तुळातून पडत असताना एक गोष्ट मात्र नक्की जाणवत होती, ते म्हणजे नाक्यावर या इरसाल वल्लींसोबत आयुष्यातली अगदी महत्त्वाची वर्षं घालवल्यानंतर त्यातून मिळालेल्या अनुभवांनी माझं आयुष्य आणखी समृद्ध झालं. या कडू-गोड आठवणींचा एक कप्पा कायम माझ्या हृदयात राहील. कालांतराने रस्ता रुंदीकरणात आमच्या हॉटेलची जागा गेली. मात्र तो नाका आणि तिथली ही सगळी पात्रं माझ्या स्मृतिपटलातल्या पुस्तकावर कायमची विराजमान झाली.

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

21 Oct 2017 - 12:49 pm | सस्नेह

भारी रंगवलीयेत पात्रे

यशोधरा's picture

21 Oct 2017 - 1:09 pm | यशोधरा

आवडलं.

छान लिहिलास रे किसना. मस्त मस्त

फार म्हणजे फारच मस्त..

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Oct 2017 - 9:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

लै भारी व्यक्तीचित्रे, किसनद्येवा !

पद्मावति's picture

21 Oct 2017 - 9:34 pm | पद्मावति

बड़े शहर की एक गली में बसा हुआ हैं नुक्कड़, नुक्कड़ के सारे बाशिंदे तकदिरों के फक्कड़...
अशी अफलातून कॅरेक्टर्स तुम्हाला वास्तविक आयुष्यात भेटली आणि व्यक्तीचित्रांचा हा इतका सुंदर कोलाज आम्हाला बघायला, वाचायला मिळाला. फारच आवडला लेख. एक्सलन्ट!

सविता००१'s picture

22 Oct 2017 - 12:08 am | सविता००१

मस्तच लिहिलंय. खूप आवडलं.

स्वाती दिनेश's picture

22 Oct 2017 - 3:28 pm | स्वाती दिनेश

मस्त लिहिलं आहे.. आवडलं.
स्वाती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Oct 2017 - 5:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्यक्तिचित्र झकास आली आहेत. रामदास, पद्या, सिंगर ही तिन्हीही माणसं आवडली.
लिहित राहा भो तुम्ही.

-दिलीप बिरुटे

बबन ताम्बे's picture

22 Oct 2017 - 5:38 pm | बबन ताम्बे

इरसाल नमुने !!

पैसा's picture

22 Oct 2017 - 8:51 pm | पैसा

आवडले, अजून थोडे हवे होते.

Ranapratap's picture

22 Oct 2017 - 9:45 pm | Ranapratap

किसन देवा आजून येऊ द्यात नाक्यावरच्या किस्से

आता सुरु झालं आणि आताच संपलं असं वाटलं.

mayu4u's picture

23 Oct 2017 - 5:25 pm | mayu4u

अजून लिहा. पु भा प्र.

मित्रहो's picture

24 Oct 2017 - 11:19 am | मित्रहो

तीनही व्यक्तीचित्रे मस्त. रामदास आणि पद्या थोडेसे गंभीर ढंगाने गेले. नाक्यावरील दुकान हे खरच वविध वल्लींचे आवडते ठिकाण असते. तिथे खूप प्रकारची माणसे सापडतात.

मारवा's picture

25 Oct 2017 - 8:36 am | मारवा

मस्त लेख
अजुन वाचायला आवडेल.

विनिता००२'s picture

25 Oct 2017 - 10:53 am | विनिता००२

अजून लिहा.

नाखु's picture

25 Oct 2017 - 12:00 pm | नाखु

भारीच लिखाण
अजुन काय चिजा असतील तर त्या काढा पोतडीतून,

इनिगोय's picture

25 Oct 2017 - 12:27 pm | इनिगोय

मस्तच! पानासारखीच रंगलीत वर्णनं!