पाटील मालक

Primary tabs

मोदक's picture
मोदक in दिवाळी अंक
20 Oct 2017 - 12:00 am

पाटील मालक.

".....या माणसाने एकही सल्ला न देता किंवा एका पैशाचीही मदत न करता मला अनेक गोष्टी शिकवल्या !" असे मी एखाद्याविषयी म्हणालो तर नक्कीच विचारात पडाल की याने नक्की काय केले असेल?
..विचारलं तर मलाही नीट सांगता येणार नाही, पण ओळख झाल्यापासून अवघ्या एक-दीड वर्षांतच या व्यक्तीने कांहीही न बोलता माझ्यावर प्रचंड प्रभाव टाकला.. आणि आज ओळख होऊन बारा तेरा वर्षे सहज झाली असावीत. आजही तो प्रभाव कमी झाला नाहीये.

त्या दिवसात मी कॉलेज करून पार्ट टाईम जॉब करत असे. संध्याकाळी ७ वाजता ऑफिसची वेळ संपली की आंम्ही सहा सात जण एकेठिकाणी जमत असू. एक एक करत सहा ते सात जण आपआपली कामे आवरून तिथे भेटायचे हा रोजचा शिरस्ता. मी त्या ग्रुपमध्ये वाट चुकून आल्यासारखा दिसत असेन कारण तेथील प्रत्येकजण वयाने माझ्यापेक्षा मोठा, व्यवस्थित बस्तान बसलेले त्यांचे व्यवसाय, एक जण मुख्याध्यापक तर एक जण चक्क स्वत:चा ट्रक चालवायचे. अशा वेगवेगळ्या लोकांमध्ये मी शाळकरी मुलासारखाच, पण दोस्ताना असा की, मला वयाच्या फरकाची कधीच कुणी जाणीव करून दिली नाही.
तिथेच माझी मालकांशी ओळख झाली. पाटील मालक याच मित्रपरिवारामध्ये होते. त्यांच्या शेतावरचे लोक त्यांना मालक म्हणायचे म्हणून मी मजेने मालक म्हणत गेलो आणि नंतर त्यांचे तेच नांव रूढ झाले.
मालकांची आणि माझी घनिष्ठ मैत्री, पण 'माझा मित्र' अशी त्यांची ओळख करून देऊ शकत नाही कारण आमच्या वयात २५/२६ वर्षांचा फरक आहे ! नाते अगदी मैत्री म्हणावे असेही नाही. वयाच्या फरकामुळे मी त्यांच्याकडे, एक वडीलधारे सल्लागार, अशा दृष्टीकोनातूनच बघत होतो. त्यांनीही ही भूमीका पुरेपूर निभावली.

मालक खानदानी रईस. घरची बक्कळ शेती. यांच्या एकट्याच्या शेतीतील ऊसावर आमच्या गावातला एक मोठा कारखाना तीन दिवस चालतो..! मोठा वाडा, ट्रॅक्टर, जनावरे वगैरे व्याप होता. यांचे जमीनदारी घराणे आणि राजकारण या गोष्टीही एकमेकांमध्ये गुंफलेल्या. त्यामुळे निवडणुका हा जिव्हाळ्याचा विषय.
आम्हाला सर्वसाधारणपणे आवडणार्‍या साहित्य, वाचन, पुस्तक, कविता वगैरे गोष्टींशी यांचा फारसा संबंध आला नाही. पण म्हणून आमच्या चर्चा सुरू असल्या की मुद्दाम विषयांतर करणे किंवा "कसल्या ह्या चर्चा?" हा प्रकारही नाही. मुळात हा माणूस बोलायला नाखूश. शब्द कमीत कमी वापरणे हा खाक्या. शेती, बांधकाम, गाड्या वगैरे त्यांच्या आवडीचे विषय सुरू झाले तरी, अगदी नाईलाज झाला तरच बोलणार. अन्यथा त्यांना काय म्हणायचे आहे ते त्यांच्या चेहर्‍याकडे बघून समजून घ्यायचे.
बोलण्याच्या बाबतीत मितभाषी असले तरी त्यांच्या एकंदर देहबोलीमध्ये जरब असे. पुलंनी रंगवलेल्या रावसाहेबांच्या तोंडातून शिव्या आणि व्यक्तीमत्वातून सर्व प्रकारची व्यसने बाजूला काढली की पाटील मालक तयार होतील.

कॉलेजच्या वयात असताना डोक्यात अनेक विषय असतात. जगाचा फारसा अनुभव नसतो. कांहीतरी वेगळे करायची खुमखुमी असते, अनेक प्रश्न पडत असतात. अशा मनस्थितीत मी त्यांच्याशी गप्पा मारत असे. गप्पा म्हणजे मी एकटाच बोलणार, ते शांतपणे सगळे ऐकून घेणार आणि फक्त "चल" म्हणणार किंवा मी बोलत असलेली एखादी गोष्ट मान्य नसेल तर एकदाच "नाही" असे मानेने नकार देणार.
"चल" म्हटल्यानंतर, त्यांच्या गाडीला किक मारायची इतकेच मी डोक्यात ठेवले होते. सुरूवातीला "कुठे जायचे?" वगैरे (त्यांच्या दृष्टीने) फालतू प्रश्न मी विचारत असे, नंतर नंतर तेही बंद केले. त्यांच्या या "चल" नंतर आंम्ही बाहेर पडत असू. मग एकतर माझ्या प्रश्नाचे उत्तर शोधणे किंवा त्यांचे एखादे काम आवरणे असे ठरून गेल्यासारखे होते. या "चल" नंतर आंम्ही काय काय उद्योग केले होते.. !
.. ऐन भरात आलेले पीक बघण्यासाठी शेतात जाणे, वीटभट्ट्यांना भेटी देणे, जवळचे एखादे खेडेगांव गाठून नदीतून उपसा होणारी वाळू बघणे, गोबरगॅस प्लँट बघणे, पावसाळ्यात नदीचा पूर बघायला जाणे, त्यांच्या एखाद्या नातेवाईकाकडे जेवायला जाणे असे अत्यंत अनपेक्षित कांहीतरी सामोरे येत असे. माझी कामे म्हणजे कॉलेज किंवा क्वचित सरकारी कचेरीतली कामे असत. त्यावेळी त्यांना फक्त कामाचे स्वरूप सांगायचे, ते शांतपणे एक फोन नंबर देत असत आणि "माझे नांव सांग" इतकेच बोलत. फक्त त्यांच्या नांवावर अनेक कामे लीलया होतात हा अनुभवही अनेकवेळा घेऊन झाला.

एकदा माझ्या दाताचे कांम निघाले, डॉक्टर ओळखीचेच. नवीन नवीन दवाखाना होता. त्या डॉक्टरांकडे यांनी दोनच महिन्यांपूर्वी रूट कॅनलचे काम केले होते पण नेमके शेवटच्या सिटींग नंतर कॅप नीट बसत नव्हती. फक्त कॅपसाठी तीन चार सिटींग झाल्या आणि नंतर यांनी दुसरे डॉक्टर पकडून कॅप बसवून घेतली. माझे काम सुरू असताना डॉक्टरांनी विषय काढला, "तुमचे मित्र पाटील साहेब परत आले नाहीत" मी कांहीतरी थातूर मातूर कारण देऊन वेळ मारून नेली. संध्याकाळी भेट झाल्यावर त्यांना सांगितले की डॉक्टर असे असे म्हणत आहेत. "त्याला सांग कॅप बसवता येत नाही म्हणून आलो नाही" असे उत्तर मिळाले.
मी अवाक्.. "मी असले कांही सांगणार नाही" असे म्हटल्यावर "त्याला हेच सांगायचे आणि असेच सांगायचे" असा मलाच दम मिळाला. माझ्या पुढच्या सिटींग नंतर डॉक्टरांनी पुन्हा विषय काढल्यावर "सोडा हो.. कशाला पाटलांच्या नादाला लागताय.." असे बोलल्यावर ते डॉक्टर माझ्यावरच उखडले आणि उगाच वाद घालू लागले.. मग मी "तुम्ही कॅप नीट बसवली नाही" वगैरे बोलल्यावर डॉक्टर वैतागून म्हणाले की "त्यांना सांगा ट्रीटमेंटचे पैसे परत घेऊन जावा"
"आंम्ही असले उद्योग करत नाही" असे मीही त्या डॉक्टरांना सुनावले.
पुढच्या सिटींगला पुन्हा हाच प्रकार.. मी म्हणतोय "कशाला प्रकरण वाढवताय?" डॉक्टर म्हणाले की "अहो खरंच सांगतोय, पैसे घेऊन जावा म्हणावं - मला काम जमले नांही ना..? मग मी का त्या कामाचे पैसे घेऊ..?" मी त्यावेळी "नक्की ना..?" असे विचारून खात्री करून घेतली व 'एकदम तत्ववादी डॉक्टर दिसतोय' असे मनात म्हणून "पैसे न्यायला येतो" बोलून निरोप घेतला.
"डॉक्टरांनी उगाच प्रकरण वाढवले आहे तर आता आपण पण पैसे सोडायचे नाहीत" हे मी मालकांच्या तोंडून ऐकले आणि मी उगाचच या प्रकरणात मध्ये अडकलो असा विचार डोकावला. पण आता पर्याय नव्हता.
पुढच्या आठवड्यात झालेला प्रकार आयुष्यात कधी विसरणार नाही.
दुर्दैवाने (!) डॉक्टर त्यांच्या दवाखान्याबाहेरच भेटले. डॉक्टरांनी पैशाबाबत माझ्यासमोरच सपशेल घुमजाव केले. मालकांनी फुल्ल आवाज सोडून (पण एकही शिवी न देता) डॉक्टरांचा उद्धार केला, डॉक्टरांच्या मदतीला त्यांच्या आजुबाजूची लोकं आली. "ही काय बोलायची पध्द्त आहे का?" टाईप वाक्ये कानावर पडू लागली. आंम्ही दोघेच आहोत म्हणून मालकांनी कुणालातरी फोन केला आणि "पोरं घेऊन ये रे" असा हुकूम सोडला. बघता बघता चौकात गर्दी जमा झाली आणि पोरांनी डॉक्टरांच्या बाजूने आमच्यावर गुरकवणार्‍या लोकांना "दुकानात जाऊन बसा" असे शांतपणे सांगितले. शेवटी डॉक्टरांनी चूक कबूल केली आणि प्रकरण मिटले.
यानंतर साधारण आठवडाभराने पैसे घेऊन डॉक्टर स्वत: आंम्हाला भेटायला आल्यावर मात्र, "पैसे नकोत आता आम्हाला" असे सांगून मालकांनी त्यांना वाटेला लावले !

एकदा रविवारी सकाळी मालकांचा फोन, "कुठंय साहेब..? बाहेर या"
मी घरातून बाहेर पडताच समोर कुठलीतरी कार घेऊन हे थांबले होते. तेच "चल" कानांवर पडले आणि गाडी सुरू झाली. थोड्या वेळाने कळाले की आंम्ही त्यांच्या मित्राच्या बंगल्यासाठी मार्बल व ग्रॅनाईट बघायला कोल्हापूरला चाललो होतो.
बंगला तिसर्‍याचा, ग्रॅनाईट पसंत करणार मी आणि पैसे देणारे पाटील मालक. असा अजब व्यवहार होता. "तुम्ही पैसे का देताय?" असे विचारल्यावर, उत्तर ... "त्याने आपल्या अडचणीच्या वेळी मदत केली होती"..!

मधेच मी पार्ट टाईम जॉब मध्ये गॅप घेतला होता तेंव्हा तर त्यांच्यासोबत रोजच कुठे ना कुठे भटकत असे. त्याच दरम्यान त्यांनी सहज बदल म्हणून पॉवर स्टिअरींगचे ट्रक घेऊन मालवाहतुकीचे कराड-कोल्हापूर असे आटोपशीर काँट्रॅक्टही मिळवले होते त्यामुळे अगदीच कुठे गेलो नाही तर त्यांच्यासोबत ट्रकमध्ये बसून जाणे होत होतेच.
एकदा आईने अत्यंत काळजीने "अहो जरा मोदकला सांगा, ट्रकमध्ये बसून फिरत असतो, ट्रकवाले काय चांगले असतात काय?" असे त्यांनाच सांगून मला सपशेल कानकोंडे केले होते. त्यावर त्यांनी हसत हसत, "अहो, मीच असतो बरोबर, नका काळजी करू" असे सांगितले !

नंतर मी नोकरीसाठी पुण्याला आल्यानंतर कांही महिने फक्त फोनवर संपर्क राहिला आणि मी घरी गेलो की त्यांच्याकडे चक्कर ठरलेली असे.

यथावकाश त्यांच्या पुण्यातल्या दौर्‍यांच्यावेळी आमची भेट होऊ लागली. पुण्यात ते आले की तेच चिरपरिचित "कुठंय साहेब..?" फोनमधून ऐकू येऊ लागले.
तो शनिवार आणि रविवार पण असाच धक्कादायक होता. शुक्रवारीच त्यांचा फोन आला. त्यांची एक बहिण आणि तिच्या तीन मैत्रिणी कोणत्यातरी स्पर्धा परिक्षेसाठी शनिवार-रविवारी पुण्यात येणार होते. "त्यांच्यासाठी रूम बुक कर" असा हुकूम आला. मी दोन रूम बुक केल्या आणि स्वारगेटला त्यांना घ्यायला गेलो. तिथे यांचा लवाजमा उतरला. त्या चार मुलींसाठी सोबत म्हणून त्यांचे भाऊ / दाजी असे आणखी पांच कार्यकर्ते आले होते. मी हैराण झालो. मी त्यांना तिथेच स्वच्छ शब्दात सांगितले की मी इतक्या लोकांची सोय केलेली नाही, फक्त मुलींची आणि तुमची सोय केली आहे. यावर, "ते त्यांचे ते बघूदेत आपण ठरल्यासारखीच सोय बघायची आहे" असा त्यांनी मला दिलासा दिला.
आंम्ही स्वारगेटहून डेक्कनला सगळा लवाजमा घेऊन येईपर्यंत त्यांच्या ओळखीच्या कुणीतरी एक दुचाकी आणून हजर केली. त्या दिवशी रात्री पर्यंत आंम्ही परिक्षा केंद्र कुठे कुठे आहेत ते बघून ठेवले. आंम्ही तिथे नसताना त्या मुलींनी मुक्काम केलेल्या हॉटेलबाहेर दोन जण "कांही हवे नको बघायला (!) “ थांबले होते !
दुसर्‍या दिवशी त्या मुली आणि त्यांचे सोबत असलेले भाऊ नि दाजी मंडळी जिकडे तिकडे रवाना झाले. नंतर परिक्षेच्या आधी दीड तास आंम्ही दोघेजण सर्व परिक्षार्थी आपआपल्या ठिकाणी बसले आहेत की नांही हे बघणे आणि "सगळे ठीक आहे ना..?" असे विचारण्यासाठी प्रत्येक परिक्षा केंद्राला भेटी दिल्या होत्या.
ते निघताना, "इतके घोळ घालायची काय गरज होती, मुली काय परदेशात चालल्या होत्या का..?" असे मी माफक कुरकुरून पाहिले, यावर "पाटलांचे काम असेच असते, आपण डोके चालवायचे नांही, भावकी असते" असे सांगून मालकांनी माझी समजूत घातली !

आणखी एकदा असाच शनिवारी सकाळी सकाळी फोन , "कुठंय साहेब..? अमुक अमुक ठिकाणी या.."
मी यांना भेटायचे म्हणून गोल गळ्याचा घरातील टीशर्ट घालून जांभया देत देत तिथे पोचलो तर सगळे पांढर्‍या कपड्यातले लोकं दिसत होते आणि त्यांच्यात मी म्हणजे "एखादी गाडी वाट चुकेल पण ट्रेन वाट कशी चुकेल..?" असा प्रश्न पडण्या इतका वेगळा दिसत होतो. पुढच्या १५ मिनीटात मी पुण्यातल्या एका अग्रगण्य शिक्षण संस्थेच्या प्रिन्सिपलच्या केबीनमध्ये होतो. आणि काम काय..? कांही नांही. "चार दिवस याच लोकांबरोबर चहा पीत होतो.. आज इकडे होतो म्हणून तुला बोलावले" असे उत्तर. प्रिन्सिपल साहेब बाकीच्या मंडळींशी बोलत होते, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या संदर्भात प्रश्नोत्तरे चालली होती, हशे उसळत होते आणि आंम्ही दोघे त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून चहा पीत गप्पा मारत बसलो होतो !

नंतर एकदा पुण्यात आल्यानंतर "कुणासाठी तरी मार्बल आणायला राजस्थानात चाललो आहे, जाताजाता तुला भेटतोय" असे सांगून एका सोन्याने मढवलेल्या नेत्यासोबत भेटले.
एकदा कमांडर जीप घेऊन असेच चार पांच कार्यकर्ते घेऊन मोशीला किसान प्रदर्शन बघायला मला नेले होते.
दर वर्षी पंढरपूरच्या वारीमध्ये त्यांचे दोन टँकर आणि एक ट्रक सहभागी असतो. त्यांच्यासोबत एकदा टँकरमधून वारीही अनुभवली आहे !
अशा पुण्यात अनेक संस्मरणीय भेटी झाल्या आणि आणखीही होत राहतील....

"मालकांनी मला शिकवले" असे म्हणताना हे लक्षात येते की त्यांनी माझ्या अत्यंत अवखळ वयात सोबत राहून मला व्यसनांपासून ठेवले, अनेक वेगवेगळ्या लोकांच्या भेटी घडवल्या आणि ओळखी वाढायला मदत केली. मात्र हे करताना स्थानिक राजकारणाचा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली. मला दुचाकी चालवायला शिकवण्यापासून ते दुचाकीवरून लांब लांब अंतरे कापताना काय चुकते आहे ते स्वतः मागे बसून सांगितले. हे आणि अशा अनेक गोष्टी करताना चुकूनही कोणत्याही गोष्टीचा आव आणला नाही. गावाकडे भल्यामोठ्या वाड्यात रहाणारा हा माणूस; पुण्यात मी रहात होतो त्या छोट्याश्या कॉट बेसीसवरच्या खोलीतही तितक्याच सहजतेने राहिला. आहे हे असे आहे असा सरळसोट खाक्या !
कमी शब्दात प्रचंड बोलणारे अतिशय दुर्मिळ व्यक्तीमत्व, म्हणजे मालक !!.

अजुनही एखाद दिवशी, दिवसाच्या कोणत्याही वेळी फोन वाजतो.. मालकांचा आवाज येतो.. "कुठंय साहेब..?"
आणि आता कुठे ‘चलायचं’ आहे, याचा विचार करत मी बाहेर पडतो !!

कथा

प्रतिक्रिया

भ ट क्या खे ड वा ला's picture

20 Oct 2017 - 10:57 am | भ ट क्या खे ड वा ला

अजुन थोडे विस्तृत चालले असते ..
शब्द मर्यादा नव्हती ना ?

भ ट क्या खे ड वा ला's picture

20 Oct 2017 - 10:57 am | भ ट क्या खे ड वा ला

अजुन थोडे विस्तृत चालले असते ..
शब्द मर्यादा नव्हती ना ?

नाखु's picture

20 Oct 2017 - 11:12 am | नाखु

हात आखडता घेतला आहे का?

प्रास's picture

20 Oct 2017 - 11:40 am | प्रास

लिखाण छान जमलंय!
वाचक अधिक लिहावं असं म्हणत असेल तर ते लिखाण चांगलं झाल्याचंच लक्षण माना...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Oct 2017 - 11:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाटील आवडले. प्रसंगही मस्त आहेत. आणि लिहिलंही चांगलं.

-दिलीप बिरुटे

कविता१९७८'s picture

20 Oct 2017 - 11:49 am | कविता१९७८

छान लेखन अन व्यक्तिचित्रण

माम्लेदारचा पन्खा's picture

20 Oct 2017 - 1:04 pm | माम्लेदारचा पन्खा

आधी वाचल्यासारखं का वाटतं आहे ?

यांच्याविषयी कधी उल्लेख केला होता काय तुम्ही ?

आपण कोपरीत जेवण झाल्यावर पान खायला भेटायचो त्यावेळी हे किस्से सांगितले होते.

जगदाळे आणि फ्रिझ पेटल्याचे किस्से तू त्याच वेळी सांगितले होतेस.

माम्लेदारचा पन्खा's picture

20 Oct 2017 - 4:35 pm | माम्लेदारचा पन्खा

आता आठवलं . . . .

Ranapratap's picture

20 Oct 2017 - 4:18 pm | Ranapratap

आयुष्यात एक तरी पाटील जोडावा, कधी ना कधी उपयोगी पडतोच.

डॉ श्रीहास's picture

20 Oct 2017 - 5:51 pm | डॉ श्रीहास

मोदकराव.....

येऊ द्या अजून , तुम्ही ५-६ जणांचा उल्लेख केला लेखात सर्वांवर येऊ द्यात एक-एक लेख ... माणसं जोडली आहेत हो तुम्ही ... खरी कमाई !!

स्नेहांकिता's picture

20 Oct 2017 - 6:59 pm | स्नेहांकिता

अस्सल कोल्हापुरी नमुना !!

पाटिलसाहेबांना गरिबाचा राम राम . सुंदर लिखाण .
----"अहो जरा मोदकला सांगा, ट्रकमध्ये बसून फिरत असतो, ट्रकवाले काय चांगले असतात काय?" --- तुम्हाला घरातही मोदक म्हणतात हे वाचुन मजा वाटली .

सविता००१'s picture

22 Oct 2017 - 12:03 am | सविता००१

मस्त लिखाण.

अनामिक's picture

22 Oct 2017 - 12:02 pm | अनामिक

छान लेखन. आवडलं.

फ्रेनी's picture

22 Oct 2017 - 1:52 pm | फ्रेनी

छान लिहिलेय

नूतन सावंत's picture

22 Oct 2017 - 5:00 pm | नूतन सावंत

अशी व्यक्ती मित्र म्हणून भेटणे हे भाग्याचेच.पण खूप लहान वाटला लेख.

लाल टोपी's picture

23 Oct 2017 - 9:05 am | लाल टोपी

आवडले

mayu4u's picture

23 Oct 2017 - 5:17 pm | mayu4u

भटकंतीसोबत या लेखनप्रकारावर पण फोकस करा ही नम्र विनन्ती!

मित्रहो's picture

23 Oct 2017 - 7:35 pm | मित्रहो

आवडले. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तीशी मैत्री टिकवून ठेवणे यातच सर्व काही आले.

sagarpdy's picture

24 Oct 2017 - 10:23 am | sagarpdy

मस्त.

छान. शेवटच्या पॅरात सगळ व्यक्तिमत्व सामावल आहे.

उपेक्षित's picture

24 Oct 2017 - 7:57 pm | उपेक्षित

कूच जम्या नही मोदकभाऊ,

व्यक्तिचित्रात त्या व्यक्तीबद्दल सगळी माहिती/ तिचा बोलण्याचा लहेजा वगेरे पाहिजे पण इथे पाटील या व्यक्तिरेखेबद्दल खूपच कमी माहिती आणि प्रसंग आहेत आणि तुमचे स्वतः बद्दलचे प्रसंग आणि वाक्य जास्त आहेत.

असो जे वाटले ते अगदी स्पष्टपणे मांडले राग नसावा.

यश राज's picture

24 Oct 2017 - 8:35 pm | यश राज

छान लेखन

पाचोळ्यासारखं उडून जायच्या परिस्थितीत काही माणसं सोबत करत राहतात, धरून ठेवतात आणि नकळत जगणं मार्गी लावतात. पुढे केव्हातरी स्थिर झाल्यावर आपल्या वागण्यात त्यांची झाक दिसून येते आणि मग ते सगळं आपल्याला ज्या सहजतेने शिकवलं गेलं त्यासाठी आपलाच हेवा वाटत राहतो. मालक आवडलेत हेसांनल!!

लेख आणि हा प्रतिसाद आवडला.
पाटील मालक पण आवडले.

गामा पैलवान's picture

25 Oct 2017 - 10:47 pm | गामा पैलवान

उपेक्षित,

पण इथे पाटील या व्यक्तिरेखेबद्दल खूपच कमी माहिती आणि प्रसंग आहेत आणि तुमचे स्वतः बद्दलचे प्रसंग आणि वाक्य जास्त आहेत.

नेमकं हेच पाटील मालकांच्या व्यक्तिरेखेचं बलस्थान आहे. त्याच्याबद्दल भरभरून बोलावं असा हा माणूस नाही. त्याच्यामार्गे भरभरून बघावं/ऐकावं मात्र जरूर असा काहीसा हा माणूस वाटतोय. वर्णन वेगळं आणि वर्तन वेगळं.

आ.न.,
-गा.पै.

वरुण मोहिते's picture

26 Oct 2017 - 12:19 am | वरुण मोहिते

जमले आहे

जुइ's picture

26 Oct 2017 - 8:29 am | जुइ

पाटील यांचे व्यक्तिचित्रण चांगले केले आहे.

पाटीलभाऊ's picture

26 Oct 2017 - 12:35 pm | पाटीलभाऊ

आणि अनुभव.