विंचवाचं बिऱ्हाड

shrivallabh Panchpor's picture
shrivallabh Panchpor in दिवाळी अंक
20 Oct 2017 - 12:00 am

(प्रयोगासाठी लेखकाची पूर्वपरवानगी आवश्यक आणि डी आर एम नंबर आवश्यक.)

१.
(रंगमंचावर एका उंच ठिकाणी एक मध्यमवर्गीय माणूस - वय अंदाजे ३५ - उभा आहे. तो काहीतरी विचार करतोय आणि त्याचा विचार पक्का झाल्यावर तो उंच ठिकाणावरून उडी मारतो. त्याच वेळी त्याची बायको घरात दचकून जागी होते.)
बायको :- ( घाबरून ) अहो.........
मुलगी :- काय झालं आई? .......

२.
(घरमालकाचा मुलगा घरात बसला आहे. ज्या माणसाने उंच ठिकाणावरून उडी मारली, तो विंगेमधून प्रवेश करतो. हातात एक नोटिस.)
घरमालक :- वाचली नोटिस?
माधव :- हो...... पण.....
घरमालक :- आता पण बीण काही नाही. आज तारीख काय आहे ?
माधव :- चार.
घरमालक :- मला नोटिसमध्ये म्हटल्याप्रमाणे एकतर भाडेवाढ द्या, नाहीतर पुढच्या महिन्याच्या ३ तारखेपर्यंत घर खाली करून द्या.
माधव :- अहो, एवढी भाडेवाढ अचानक कशी काय परवडणार आहे?
घ.मा. :- ते मला काही सांगू नका हो....... आणि real estateमध्ये सध्या काय चालू आहे, हे मी तुम्हाला वेगळं सांगायचं का? भाडं वाढवून द्यायचे नसेल, तर घर खाली करायचं ... कळलं का? काय म्हणतोय मी? कळलं का?
माधव :- भाडे करार तुमच्या वडिलांसोबत झाला होता. एकदा त्यांच्याशी मला बोलायचं आहे.
घ.मा. :- हे पहा, तुम्ही सभ्य माणूस आहात, म्हणून सभ्यपणे सांगतोय. आणि माझ्या वडिलांचं म्हणाल, तर त्यांचे सगळे आर्थिक व्यवहार मीच पाहतो आता. तशी power of attorney दिली आहे मला. तुम्ही घर खाली करा हो.... मला जास्त बोलायला लावू नका.
माधव :- अहो अशी अचानक भाडेवाढ नाही जमणार. आणि एका महिन्यात दुसरं घर तरी कुठे शोधू मी..? माझ्या मुलीची शाळाही जवळ आहे........ please असं करू नका.... मी देईन भाडेवाढ.... पण तुम्ही मागितलेली भाडेवाढ जरा जास्त आहे.
घ.मा. :- मला घर खाली करायचे दुसरे पर्यायही माहीत आहेत. (चिडून ) तुमच्या मुलीची शाळा जवळ असू देत नाही तर मसण..... तुम्ही घर खाली करा हो...... ३० दिवस आहेत तुमच्याकडे. किती ?
माधव :- ३० दिवस....
घ.मा. :- येतो मी......
(जातो. घरमालकाचा मुलगा जात असताना अश्विनी येते.. )
अश्विनी :- हा घरमालकाचा मुलगा कशाला आला होता या वेळी?
माधव :- नोटिस द्यायला आला होता.
अश्विनी :- कसली नोटिस?
माधव :- भाडं वाढवून द्या, नाहीतर घर सोडा. हे घे, वाच.
अश्विनी :- वेडबीड लागलं आहे का? आता ४ महिन्यांपूर्वीच तर आलो ना आपण, आणि आता लगचे भाडेवाढ? आणि आपण करार त्यांच्या वडिलांबरोबर केला होता ना? हा कोण आला नोटिस देणारा?
माधव :- power of attorney दिली आहे म्हणाला त्यांच्या वडिलांनी. काही नाही गं, दुसरा कोणीतरी मिळाला असणार जास्त भाडं देणारा...
अश्विनी :- म्हणून आधीच्या भाडेकरूला हाकलायचं? शी... मला असल्या माणसांचा खूप राग येतो. आणि तुमचापण.
माधव :- माझा?
अश्विनी :- नाहीतर काय..... नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसले असणार तुम्ही... एक शब्द तोंडातून फुटला असेल तर शपथ ... मीच घरात असायला हवं होतं.
माधव :- मीच घरात असायला काय हवं होतं? आणि तुला असं का वाटतंय मी बोललो नाही म्हणून? मी सगळं सांगितलं त्याला. आपल्या सुमीची शाळा इथून जवळ आहे. पुढल्या वर्षी भाडेवाढ करून देऊ. माझी आर्थिक परीस्थिती बेताची आहे.... सगळं सांगितलं. पण त्याचं एक ना दोन.... धमकी देऊन गेला तो.... मला घर खाली करून घ्यायचे दुसरे पर्यायपण माहीत आहेत म्हणून..
अश्विनी :- आणि तुम्ही घाबरलात. तुमच्या भितरेपणाचा सगळे फायदा घेतात. काय करायचं आहे? काही विचार केला आहे का?
माधव :- दुसरं भाड्याचं घर बघायला लागू आपण. याच एरियामध्ये बघू. म्हणजे सुमीच्या शाळेचा प्रश्न येणार नाही.
अश्विनी :- मला हे बिलकुल मान्य नाहीये. सतत टांगती तलवार घेऊन जगायचं आहे का आपण? आणि पुढला घरमालकही आपल्याला घरातून हाकलणार नाही कशावरून?
माधव :- मग काय करू मी? दुसरा काही पर्याय आहे का आपल्यापुढे? का आपलं सामान रस्त्यावर यायची वाट पाहायची आहे?
अश्विनी :- आपण गेल्या आठवड्यात ती जाहिरात पहिली होती ना. स्वस्त घर योजना...... सरकारची सबसिडी....... त्याची चौकशी करायची का?
माधव :- मी तुला तेव्हाच सांगितलं होतं... स्वस्तबिस्त असं काही नसतं. ड्रामा असतो सगळा. जाहिरातीचा भपकेबाजपणा असतो. अशी स्वस्त घरं मिळत असती ना, तर जगात सगळ्यांचीच घरं झाली असती.
अश्विनी :- ते मला काही माहीत नाही. आणि चौकशी करून यायला काय हरकत आहे?
माधव :- ज्या गावाला जायचंच नाहीये, त्या गावाची बस पकडण्यात काय अर्थ आहे? आणि DOWN PAYMENTचं काय करणार आहोत आपण? सुमीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसे जमवता जमवता नाकी नऊ येतंय.
अश्विनी :- अहो, माझे लग्नातले दागिने मोडू हवे तर. नाहीतरी ते रोज घालून कुठे मिरवतो आपण? आणि मी पार्ट टाइम नोकरी करते.
माधव :- आणि सुमीकडे कोण लक्ष देणार? सध्या पेपरमध्ये उलटसुलट वाचयला आणि ऐकायला कमी मिळतं का?
अश्विनी :- हे पहा, हा भितरेपणा सोडा आता आणि मी या वेळेस गेले तर स्वत:च्या हक्काच्या घरात जाणार आहे, जिथून मला कोणी 'जा' म्हणणार नाही. तुम्ही विचार करा आणि निर्णय घ्या. मी सुमीला क्लासमधून आणायला जात आहे. कळतंय का मी काय म्हणते आहे ते?
माधव :- बघू. घेऊ निर्णय लवकरच.
३.
(ऑफिस)
मॅनेजर :- हे काय? तुम्ही अजून काळे यांचं स्टेटमेंट दिलं नाही? काल सांगितलं होतं तुम्हाला.
माधव :- सॉरी सर.. दोन मिनिटांत देतो.
मॅनेजर :- हे बघा, मला कामं वेळच्या वेळी व्हायला हवी आहेत.
माधव :- हो सर...

सहकारी :- काय रे साहेबाच्या सारख्या शिव्या खात असतो?
शिपाई :- अहो साहेब, हे गेले दोन दिवस असंच करत आहेत. लक्षच नाही यांचं. परवा कोण ते देसाईंचं स्टेटमेंट द्या म्हणाले साहेब, तर यांनी सुर्वे यांचं स्टेटमेंट दिलं. आता देसाई आणि सुर्वे हे पुण्यातले आंबेवाले आहेत एवढं सोडलं, तर काही संबध आहे का?
सहकारी :- ए, तू जा. आणि दोन चहा घेऊन ये. उगाच बडबड करू नकोस. आणि ती काळेंची फाइलपण आण. काय झालं वाडेकर, एनी प्रॉब्लेम?
माधव :- हो...... म्हणजे नाही....
सहकारी :- काय हो-नाही? माणसाने कसं घडाघडा बोलावं. काय झालं? बायकोबरोबर भांडण झालं का?
माधव :- नाही.....
सहकरी :- मग?
माधव :- घरमालकाचा मुलगा आला होता... नोटिस दिली आहे.
सहकारी :- कसली नोटिस?
माधव :- भाडेवाढ करा, नाहीतर पुढल्या महिन्यात घर सोडा......
सहकारी :- च्यायला..... चल, नडायचं का?
माधव :- नाही, नको.
सहकारी :- घातलीस शेपूट.....
माधव :- घर खाली करा नाहीतर मला दुसरे पर्यायपण माहीत आहेत अशी धमकी देऊन गेलाय.
सहकारी :- काय मोगलाई आहे का ?
माधव :- पण रामराज्यही नाहीये.
सहकारी :- अरे नसू देत. कायद्याचं राज्य तर आहे... आपण वकील गाठू या.
शिपाई :- (चहा आणि फाइल घेऊन येतो.) काय झालं साहेब?
सहकारी :- ए, जरा थांब ना. बोलतोय ना मी...
माधव :- नाही, वकील नको....
सहकारी :- बरं, मग दुसरं भाड्याचं घर बघायचं का? माझ्या ओळीखीत एक एजंट आहे.
माधव :- बायको मागे लागली आहे. त्या कोण त्या बिल्डरची स्वस्त घर योजना आहे म्हणून......
सहकारी :- अरे, बायकोचं कुठे ऐकतोस? या बायकांना काय कळतं?
शिपाई :- साहेब, तुम्ही करा बुक. चांगली स्कीम आहे म्हणे. माझ्या शेजारच्यांनीपण बुकिंग केलंय.. ६ महिन्यांत ताबा मिळणार आहे. आणि ताबा मिळेपर्यंत हप्ता बिल्डरच भरणार आहे.
सहकारी :- तू बुकिंग केलं आहेस का? मग कशाला बडबड करतोस? आणि तुला सांगतो, भाडेकरू हा राजा असतो राजा. एवढे सहज नाही हाकलता येत घरातून. त्यातून कॉर्पोरेशन tax, सोसायटी वर्गणी सगळं मालक भरतो. आपण राजासारखं राहायचं. मी ५००० ते ६०००मध्ये तुला दुसरं भाड्याचं घर पाहून देतो.
मॅनेजर :- अरे, अजून स्टेटमेंट आलं नाही? काय चाललं आहे? किती वेळा एक एक गोष्ट सांगायची मी?
सहकारी :- सर, याचा जरा प्रोब्लेम झाला आहे.....
मॅनेजर :- काय झालंय?
सहकारी :- त्यांना मालकाने.....
मॅनेजर :- त्यांना बोलता येतं..
माधव :- घरमालकाने नोटिस दिली आहे - भाडेवाढ कर, नाहीतर घर सोड म्हणून. त्याचंच टेन्शन आहे.
मॅनेजर :- वाडेकर, शांत व्हा. काहीतरी मार्ग निघेलच.
सहकारी :- मी तेच म्हंटलं याला. दुसरं भाड्याचं घर पाहू म्हणून.
माधव :- नाही, पण बायको म्हणते आहे... की ती स्वस्त घर योजना आहे ना, त्यात आपलं स्वत:चं घर घेऊ म्हणून.
मॅनेजर :- असं कोण म्हणतं? बायको?
माधव :- हो...
मॅनेजर :- अरे, मग बरोबरच बोलते ती. हे बघ, बायकोचं नेहमी ऐकायचं असते. आणि मला सांगा, आता धाडस नाही केलं, तर कधी करणार? हेच तर वय असतें. तू कर धाडस. होईल सगळं नीट. चला, कामाला लागा. आणि आता तरी स्टेटमेंट पाठवा लवकर.
माधव :- हो सर. सर..... ऑफिसमधून कर्ज मिळेल ना?
मॅनेजर : बघू रे, नको काळजी करूस.
शिपाई :- बघा, मी बोललो नव्हतो?
सहकारी :- अरे, साहेब त्याच्या जागी. तू ऐक माझं. स्वस्तबिस्त घर नसतं. आणि तो फ्रॉड निघाला, तर? तुला हवं तेवढं कर्ज नाही दिलं, तर? कुठे भानगडीत पडतोस याच्या....... कळतंय का मी काय सांगतोय ते?
माधव :- सरांना सांग, मी काळेकडून राहिलेले पैसे वसूल करूनच अपडेटेड स्टेटमेंट देतो.

४.
अश्विनी :- केलं बुकिंग?
माधव :- हो. आज जाऊन आलो त्यांच्या ऑफिसमध्ये.
अश्विनी :- चला, देवच पावला. मी आलेच देवापुढे साखर ठेवून. (साखर ठेवून परत बाहेर येते.) घ्या साखर.
माधव :- हं. बस गं जवळ..... (बायकोला शेजारी बसवतो.) मला कधीच वाटलं नव्हतं आपण घर घेऊ शकू म्हणून....
अश्विनी :- मला तर अजून स्वप्नच वाटत आहे. हक्काचं घर. थोडं लांब असलं, तरी कुठे बिघडलं..... पण त्या घरातून मला कोणीच बाहेर नाही काढू शकणार.
माधव :- वन बीएचकेचा फ्लॅट!
अश्विनी :- ए माधव......... आपण ना, घराला लस्टर कलर देऊ.. आणि मॅचिंग असे पडदे घेऊ.
माधव :- आणि इथे सोफा सेट....., समोर LED TV... मध्ये असा एक छोटासा टीपॉय.
अश्विनी :- स्वयंपाकघरात ट्रॉलीज...
माधव :- आणि बेडरूममध्ये...
अश्विनी :- (नवऱ्याच्या तोंडावर हात ठेवत) तुझं आपलं काहीतरीच.
माधव :- तू लाजलीस ना, की खूप सुंदर दिसतेस आशू!
अश्विनी :- आज किती दिवसांनी मला तू आशू म्हणालास रे, मध्या.
माधव :- हो ना. मी संध्याकाळी ऑफिसमधून दमून भागून येईन, इथे सुमी बसली असेल अभ्यास करत आणि तू मला चहा करून आणशील...... आपण मस्तपैकी टेरेसमध्ये चहा पीत बसू.
अश्विनी :- माझं स्वतःचं घर, आपलं घर. जिथे फक्त आणि फक्त माझा अधिकार असेल... घरातल्या छोटीतली छोटी गोष्ट माझ्या मनाने मला करता येईल. कोणी कोणी नाही विचारणार. माझा छोटासा संसार आणि माझं छोटंसं घर...
अश्विनी :- घर हे दोघांचं..
माधव :- दोघांनी सजवायचं.
अश्विनी :- घर हे आनंदाचं..
माधव :- गुलमोहरापरी बहरायचं..
अश्विनी :- घर हे आपलं
माधव :- हक्काने नांदायचं...
अश्विनी :- ए माधव, तुला आठवतो का रे....
माधव :- काय गं?
अश्विनी :- ( लाजत ) पाहण्याचा कार्यक्रम......

(flashback)
माधव :- तुम्हाला पुण्यास यायला आवडेल ना?
अश्विनी :- (दबक्या आवजात ) हो.
माधव :- तुम्हाला काही नाही विचारायचं?
अश्विनी :- तुमचं घर आहे का हो पुण्यात?

माधव :- चांगलं आठवतं आहे..... माझा चेहरा खूप पडला होता.
अश्विनी :- माहीत आहे. मला खरं तर ना, खूप हसू येत होतं त्या वेळी. कसला चेहरा पडला होता तुझा.
माधव :- काय गं आशू, माझ्याकडे घर नव्हतं, तरी झालीस तू लग्नाला तयार...
अश्विनी :- हं. घर काय? माणूस महत्त्वाचा. मला तू भावला होतास. आणि घराचं म्हणशील, तर आता तेरा वर्षांनी का होईना, होत आहे ना आपलं घर? ए मध्या, होईल ना सगळं नीट?
माधव :- का गं, तुला का असं वाटत आहे?
अश्विनी :- काही नाही रे, उगाच मनात आपली एक भीती.
माधव :- होईल गं. सगळं नीट होईल. नको काळजी करूस.
(दोघे एक गाणं गुणगुणतात.)

५.
सहकारी :- आम्हाला काय नुसते पेढे दिलेस. पार्टी कधी देणार आहेस ते सांग......
माधव :- अरे, देऊ की पार्टी. एकदा ताबा तर मिळू देत.
शिपाई :- साहेब, पार्टी मलापण हवी आहे. लई मस्त झालं बघा. घर बुक केलं ते. बरं झालं, यांचं ऐकलं नाही.
सहकारी :- पेढा मिळाला आहे ना? आणि मी आपलं प्रीकॉशन घे एवढंच सांगत होतो. बरं, लोन फाइल केलीस का तयार? साहेबांपुढे लवकर पुट अप कर, म्हणजे कर्ज लवकर सँक्शन होईल तुझं.
माधव :- कर्ज जास्त घ्यायची वेळ येणार नाही आता.
सहकारी :- का रे, लॉटरी लागली की काय?
माधव :- नाही रे.
सहकारी :- अरे, तू सगळं सेव्हिंग ओतलंस का त्या स्वस्त घरामध्ये? वेडाबिडा झालास का तू?
माधव :- काळजी करू नको रे.... कर्जाच्या हप्त्याचे पैसे वाचतील, परत करीन सेव्हिंग.
मॅनेजर :- वाडेकर, व्हॉट्स अ‍ॅपही पोस्ट आली आहे बघा.. कोण तो बिल्डर आहे ना, तो फ्रॉड निघाला म्हणे. अहो, ती सरकारी योजना नव्हती, असं आलंय यात. तुम्ही चौकशी केली होती ना?
सहकारी :- वाडेकर... अरे, नको काळजी करूस. खरी नसेल ती बातमी. अरे, आजकाल व्हॉट्स अ‍ॅपवर काहीही येतं. वाडेकर.... मी काय म्हणतोय.....
माधव :- मी येतो....

६.
अश्विनी :- अहो... पण तुम्ही काळजी करू नका. अहो, ऐकताय ना? अहो, मी तुमच्याशी बोलत आहे. हे बघा, आपण जाऊ दुसरीकडे राहायला. थोडं लांब असेल तरी चालेल. पण तुम्ही डगमगून जाऊ नका. अहो, ऐकताय ना.
माधव :- सगळं संपलंय.
अश्विनी :- काही संपलं नाहीये. थोडेफार पैसे गेले आपले. किती भरले होते? १०००० ना?
माधव :- सुमीच्या शिक्षणाचे पैसे आणि तुझे दागिने यामधून आलेले पैसे सगळे गुंतवले मी..... कमी कर्ज म्हणून....
अश्विनी :- अहो.... हे काय केलं तुम्ही? सगळे पैसे गुंतवलेत, मला न विचारता?
माधव :- हो.....
अश्विनी :- हो काय हो? अहो, सुमीच्या पैशांना हात लावायचा नव्हता, ठरलं होतं ना आपलं? अहो, आणि दागिने विकायच्या आधी मला का नाही सांगितलं?
माधव :- तूच म्हणली होतीस दागिने विकू म्हणून. आणि या सगळ्याला तू कारणीभूत आहेस. तरी तुला सांगत होतो, हे स्वस्तबिस्त घर असं काही नसतं म्हणून.
अश्विनी :- हे बघा, उगाच माझ्यावर खापर फोडू नका. मी फक्त चौकशी करायला सांगितली होती. आहे नाही ते सगळे पैसे घालायला नव्हते सांगितले.
माधव :- पण मी म्हणलो होतो ना, आपण दुसरं भाड्याचं घर पाहू म्हणून.... शी! आता सगळं संपलंय.. मीच मूर्ख, जे तुझं ऐकत बसलो...
अश्विनी :- माझ्यावर चिडचिड करू नका उगाच. चूक तुमची आहे.
माधव :- (ओरडतो.) हो, चूक माझी आहे. तुझं ऐकलं, ही चूकच केली. दागिने विकले - माझीच चूक, आणि सगळ्यात मोठी चूक - तुझ्याशी लग्न केलं. आता काय जीव देऊ का?
अश्विनी :- ओरडू नका. सुमी रडायला लागली बघा. (सुमीला जवळ घेते.)
(माधव चिडून घरातून जातो.)
अश्विनी :- अहो, कुठे निघालात?

७.
शिपाई :- साहेब, हा ५०० मीटरचा रूल गेला, ते लई मस्त झालं बघा... आता कुठल्यापण बारला बसा, काही प्रॉब्लेम नाही......
सहकरी :- अरे, विषय काय, तू बोलतोस काय? या वाडेकरने माझं ऐकलं असतं ना, तर ही वेळच आली नसती. वाडेकर, अरे काळजी करू नकोस. आणि काळजी करत असशील तर घे एक पेग.....
शिपाई :- अहो, कशाला त्यांना अजून बोलताय? त्यांनी धाडस तरी केलं.... नाहीतर तुम्ही.
सहकारी :- कसलं आलंय रे घंटा धाडस... तरी मी याला बोललो होतो, भाडेकरू राजा असतो म्हणून. आणखी एक बोललो होतो....... काय बरं? हां. बायकोचं कुठे ऐकतो म्हणून..... झाली ना माती?
शिपाई :- ओ वाडेकर साहेब, बोला काहीतरी. असं नुसतं बसून राहू नका. घेता एक पेग? काही होणार नाही. सगळम दु:ख विसरून जाल. आईका माझं.
सहकारी :- अरे, त्याला बायकोने सांगितलं आहे. दारू पिऊ नकोस म्हणून.....
शिपाई :- अहो साहेबम कशाला जखमावर मीठ चोळत आहात? वाडेकर साहेब, तुमच्या कष्टाचा पैसा आहे आणि कष्टाचा पैसा गेला की लई दु:ख होत बघा. घ्या एक पेग, काही नाही होणार.
सहकारी :- गेला, सगळा पैसा गेला...
(वाडेकर तडक उठून निघून जातो.)
सहकारी :- जीव बीव तर नाही देणार ना ...?

८.
(रंगमंचावर एका उंच ठिकाणी एक मध्यमवर्गीय माणूस, वय अंदाजे ३५, उभा आहे. तो काहीतरी विचार करतोय आणि त्याचा विचार पक्का झाल्यावर तो उंच ठिकाणावरून उडी मारतो. त्याच वेळी त्याची बायको घरात दचकून जागी होते.)
अश्विनी :- ( घाबरून ) अहो.........
मुलगी :- काय झालं आई?
अश्विनी :- अगं, बाबा अजून आले नाही आहेत. कुठे गेले असतील? माझा डोळा कधी लागला, तेच कळलं नाही मला.

अश्विनी :- (फोन लावते.) हॅलो, हां, सोमण का? मी अश्विनी वाडेकर बोलत आहे. नाही हो! हे आले नाही अजून. त्यांचा फोनही बंद आहे. हो, ठीक आहे. आले की कळवते तुम्हाला. ( फोन ठेवते.) बाप रे! आता कुठ शोधू यांना? शी, मला तर काही सुचतच नाहीये..
सुमी :- आई, नको काळजी करूस. येतील बाबा. कुठे कुठे जाणार नाहीत.
अश्विनी :- आणि नाही आले तर?
सुमी :- असं कशाला म्हणतेस आई? येतील ना!
(अश्विनी परत फोन लावते, पण लागत नाही. तेवढ्यात माधव येतो आणि अश्विनी पटकन त्याला बिलगते.)
माधव :- झालंय काय?
अश्विनी :- किती उशीर झाला?
माधव :- ते होय... अगं, पोलिसांकडे गेलो होतो.
अश्विनी :- पोलिसांकडे?
माधव :- तक्रार करायला. तुला काय झालं घाबरायला?
अश्विनी :- मग काय..
माधव :- तुला काय वाटलं, मी जीव दिला की काय.. .
अश्विनी :- चुकूनही तो शब्द काढू नका.
माधव :- अगं, नव्याने सुरू करू सगळं. नव्याने डाव मांडू. देशील ना मला साथ, जशी आतापर्यंत दिलीस, अगदी तशी? तुला खरं सांगतो आशू, एकदा मनात येऊन गेला विचार .... जीव देण्याचा.... पण या सुमीचा चेहरा समोर आला. जाणवलं मला की, माझं घर हे तुमच्यात आहे..... तू आणि ही सुमी हेच माझं घर. स्वतःचं घर मिळेल, नाही मिळणार... आणि तूच म्हणाली होतीस ना मला की तू भावला होतास, घर होईल तेव्हा होईल, नाही झालं तरी चालेल.... तोपर्यंत आहेच की आपलं विंचवाचं बिऱ्हाड!
(असं म्हणून अश्विनी आणि सुमी, दोघींनाही जवळ घेतो.)

समाप्त

प्रतिक्रिया

विनिता००२'s picture

23 Oct 2017 - 2:47 pm | विनिता००२

सकारात्मक शेवट!!
छान

पद्मावति's picture

23 Oct 2017 - 4:24 pm | पद्मावति

आवडले.