माझे जिम चे प्रयोग ... जिम मधली गाणी

अमर विश्वास's picture
अमर विश्वास in जनातलं, मनातलं
20 Sep 2017 - 3:28 pm

आज सकाळी जिम मध्ये एक जबरदस्त गाणे ऐकले ...
अर्थात जिम मध्ये कुठली गाणी व का लावतात हा एक वेगळा संशोधनाचा मुद्दा आहे ... बहुदा सकाळी लवकर अर्धवट झोपेत व्यायामासाठी येणाऱ्यांना जागे ठेवणे या एकाच शुद्ध हेतूने हा गाण्यांचा उपक्रम चालत असावा ...
तर आज कुल डाऊन करत असताना ते मंजुळ सूर कानावर पडले (आदळले??? )... काय अर्थपूर्ण शब्द होते .. He is most wanted मुंडा ... आधी तर मला मुंडा च्या ऐवजी गुंडा असेच ऐकू आले ... अर्थात त्याने फारसा फरक पडला नसता .. तर हे असे अर्थपूर्ण शब्द त्यालाच साजेशी चाल .. आणि मागे वाजणारा (गडगडणारा?) वाद्यवृंद ... इतका चपखल कि शब्द पण नीट ऐकू येऊ नयेत ... (तसही मुंडा .. गुंडा ऐकल्याने काय फरक पडणार होता ?)
त्यातून त्या गाण्यात most wanted .. सबसे ज्यादा ..... अशी छान छान भाषंतरेही होती ... भाषांतर असावे तर असे ... नाहीतर आमचा संदीप.. नुसतीच मौनाची भाषांतरे करत बसला होता .. असे कधी असते का?
पूर्वी गाण्यात मेलडी वगैरे असायची म्हणे ... आता मेलडी फक्त चॉकलेट मध्ये असते ... मेलडी खाओ .. खुद जान जाओ ...

___________________________________________________________________________________________________

जिम मधली गाणी .. भाग २
मुळात हा दुसरा भाग लिहायचा काही प्लॅन नव्हता .. पण हे गाणे ऐकून राहवले नाही ..
तरीही विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही ... च्या चालीवर ...
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सकाळी उठलो ... जिम चे शूज सॅक मध्ये भरले .. सॅक खांद्यावर घेऊन चालू लागलो ....
जिम मध्ये पोचलो .. आणि खाडकन डोळे उघडले. उरली सुरली झोप केंव्हाच पळून गेली .. कारण तेच ... ढिनच्यॅक म्युझिक ...
पूर्वी काकड आरतीत शंख / घंटा याच कारणासाठी वाजवत असतील का ?
अशी आमची काकड आरती झाल्यावर ट्रेडमिल वर पळू लागलो .. म्हणजे खरे तर ट्रेडमिल चा पट्टा जोरात घुमत (फिरत) असतो ... आपण फक्त एकाजागी उभे राहायचा प्रयत्न करायचा
या सगळ्या गडबडीत अचानक कानावर ओळखीचे सूर (चाल) पडले ... पण गाणं ओळखीचं नव्हतो ... नीट ऐकल्यावर लक्षात आलं .. हे तर हवा हवा ऐ हवा खुशबू लुटा दे ... सारखे होते .... हवा हवा .. हे आमच्या कॉलेज च्या वेळचे एकदम हिट्ट गाणे ... त्यातले "जरा उसका पता दे। मैं उससे मिलूँगा। . एक बार मिलादे " हे शब्द तर प्रत्येकाला आपले वाटणारे.. (असं जेनेरिक लिहिलं कि फार डिटेल्स द्यावे लागत नाहीत )
या गाण्यातील तिसऱ्या कडव्याच्या सुरवातीला एक बोन्गो/कोन्गो चा तुकडा आहे... तो म्हणजे या गाण्याचा हाय पॉईंट ...
अर्थात आत्ता जिम मध्ये जे गाणे(?) चालू होते ते मूळ गाण्याची नीट कॉपी सुद्धा नव्हती .. यालाच इन्स्पायर होणे म्हणत असतील का ?
तरीही मी कुतूहलाने तिसऱ्या कडव्याच्या प्रतीक्षेत होतो ...
प्रसंग तसा बाकाच होता .. कारण तो ट्रेडमिलचा पट्टा आता चांगलाच रंगात आला होता .. त्याच्यावर एका जागी उभं राहण्याची कसरत करत गाण्याची कडवी मोजणं खायचं काम नाही (उगाच नाही जिम वाले डाएट पण करायला सांगतात ) .. त्यातून तो गायक एकाच सुरात रेकत होता .. आणि त्याबरोबच वाद्यवृंद ... क्या कहेने ... वाद्यमेळ त्या गायकाला साथ करत होता कि त्याच्यावर मात करत होता तेच काळात नव्हतं ... पुन्हा पहिल्या ओळी पासून शेवटपर्यंत वाद्य सारखीच वाजत (किंचाळत) होती ... या लोकांनी फक्त एकच कडवं रेकॉर्ड करून तेच रिपीट मोड मध्ये लावलं का अशी शंका यावी ... (नशीब रिपीट मोड मध्ये लावलं .. रँडम मोड मध्ये लावलं असत तर? मला बेल्टवर उभे राहण्याऐवजी थयथयाट करावा लागला असता )
या सगळ्या गडबडीत गाणे संपले .. बहुदा तीन कडवी झाली असावीत ... पायाखालचा बेल्ट तसाच बेलगाम घुमत होता ... पण तो बोन्गो/कोन्गो चा तुकडा काही ऐकायला आलाच नाही ...
तेंव्हा माझ्या दर्दी मित्रांनो .. या नव्या हवा हवा गाण्यात तो बोन्गो/कोन्गो चा तुकडा आहे का हो ? कारण हे गाणे परत ऐकायची माझ्यात ताकद नाही

कथालेख