आई , समजूत आणि वास्तव

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
18 Sep 2017 - 11:44 am
गाभा: 

'आई' या रोलचे व्यक्तिरेखेचे महत्व सजीवांमध्ये आणि मानवात विशेष आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या समाजात महत्व एकसारखे असले तरी 'आई' ही व्यक्तीरेखा वेगवेगळ्या पद्धतीने रंगविलेली असेल, त्या प्रमाणे त्यात्या समाजातील 'आई' या प्रतिमेच्या समजूती रूढ असतील. भारतात ईश्वरासही स्त्री रूपात पहाता येते म्हणून तो/ती आई ह्या एका समजूतीचा प्रभाव भारतीयांवर आहेच-गुरुलाही अप्रत्यक्ष हा मान पोहोचतोच. दुसरे प्रत्येक चांगल्या गोष्टीत देवोभव म्हणत इश्वरी आधार शोधणारा भारतीय आईतही देव शोधतो. तिसरे तो पृथ्वीत आई शोधतो, चौथे आईत पृथ्वीही शोधतो, पाचवे माते समानतेची जागा पत्नी नसलेल्या प्रत्येक स्त्रीस मिळू शकतेच त्या शिवाय आई प्रत्यक्षात नसेल तर ती जबाबदारी मावशी, ताई, वहिनी किंवा अगदी आजी क्वचित आत्याअशा रोलवरही येताना दिसते.

आई हे पात्र क्वचितच नकारात्म्क रंगवलेले दिसते त्यात सावत्र आई या रोलचा समावेश आहे .

आता चर्चेसाठी माझे काही प्रश्न.

१) तुम्हाला स्वतःला काही प्रश्न सुचतात का सुचत असतील तर नेमके कोणते ?
२) वर वर्णीलेल्या रोल मध्ये काल परत्वे आज काय फरक पडला आहे ? जर फरक पडला असेल तर तो योग्य की अयोग्य आणि का ?
२) आदर्शवादाच्या दृष्टीने पुर्वी केवळ पौराणिक कथातून येणारा आईचा रोल ते चित्रपट ते टिव्ही सिरीअल आणि बाकी साहित्य यात कोणते सातत्य टिकून आहे आणि कोणते बदल काळाच्या प्रवाहात झाले आहेत असे तुम्हाला वाटते.
३) वर्तमान सामाजिक समजुतीत तुम्हाला यथा योग्य वाटतात की बदल व्हावे वाटतात बदल व्हावे वाटत असेल तर कोणते बदल व्हावे असे वाटते आणि का ?
४) आईच्या अनुपस्थितीत आई समान रोल निभावणारी मावशी, ताई, वहिनी किंवा अगदी आजी क्वचित आत्या ही नाती काळाच्या ओघात आजही तशीच आहेत का? तुम्ह आजच्या काळात कुठे पाहिली अथवा अनुभवली आहेत का ?
५) स्वतःच्या प्रतिमेतील किंवा सामाजिक समजूतील आई आणि प्रत्यक्ष आई यात काही फरक पडत असेल तर तो तुम्ही स्विकारता की नाकारता ? आणि स्विकारण्याची अथवा नाकारण्याची आपली प्रक्रीय कशी असते. स्वतः च्या बद्दल तटस्थतेने लिहिणे सहाजिकपणे कठीणच इतरांची अथवा चित्रपट टिव्ही सिरीअल अथवा साहित्यातील उदाहरणे दिलीत तरीही चालेल.
६) तुम्हाला अथवा तुमच्या परिचितांना सावत्र आई असण्याचा अनुभव आहे का ? आणि साहित्य चित्रपट टिव्ही सिरीअल मध्ये रंगवलेली सावत्र आई आणि प्रत्यक्षातील सावत्र आई यात दिसणारे/अनुभवलेले ठळक साम्य आणि फरक कोणते ?
७) आई हि प्रथमतः स्त्री आहे आणि तीला देवी म्हणण्यापेक्षा स्त्री म्हणून स्विकारावे अशी एक स्त्रीवादी भूमिका दिसते या स्त्रीवादी भूमिकेकडे तुम्ही कसे पहाता.

अजून बरेच प्रश्न जोडेन -त्यात सावत्र आईचा रंगवलेला रोल व वास्तव अनुभव; आणि वास्तव, (विधवा-घट्स्फोटीत-परित्यक्ता-घटस्फोट घेऊ इच्छित) आईच्या पुर्नविवाहाबद्दलच्या समजूतींचा विचार असेही मुद्देही असू शकतील पण तो पर्यंत चर्चा चालू होऊन जाऊ द्या.

आई प्रत्यक्षात कशीही असो ती गोड मानून घेण्याशिवाय पर्याय नसतो, आणि भारतीय समाज सहसा तेवढी मूभा त्यांच्या मुलांना देताना दिसतो. या रोलचे गोडगोड चित्रिकरण नेहमीच अनुभवत आणि त्यात सहभागी होत असतो. ते ही हवेच पण काळाच्या ओघात अधे मधे मनमोकळी चिकित्साही होणे जरुरी असते अशा चिकित्सेच्या दृष्टीने काढलेला हा धागा. विचारलेले प्रश्न उदाहरणा दाखल विचारलेले आहेत अनुषंगिक इतर प्रश्नांची चर्चा करण्यास हरकत नाही. चर्चा सहभागासाठी आभार

प्रतिक्रिया

धाग्यास काही प्रतिसाद मिळावेत या अपेक्षेने धागा वर काढून, अजून एक प्रयत्न करुन पहातो.

पैसा's picture

24 Apr 2018 - 12:01 pm | पैसा

हा धागा पाहिलाच नव्हता. काळाबरोबर अाईच्या भूमिकेत (भावनिक) फार काही बदल झालाय असे जाणवत नाही. प्रत्येक बाईच्या स्वभावातला मूळ गुणधर्म जो काय असेल त्याप्रमाणे जरा कमी जास्त होते. पण basic instinct ज्याला म्हणतात ती प्राण्यांमध्ये असते तशीच माणसात असते. ताण वाढले, प्रश्न वाढले त्याला प्रत्येक बाई आपल्या capacity प्रमाणे सामोरी जाते. मुलांचे हाल करणे वगैरे अपवादाने घडत असतेच तसे अगदी हिंदी सिनेमातली देवी स्वरूप आई क्वचितच प्रत्यक्षात सापडेल. बहुसंख्य आया या २ टोकाच्या मध्याजवळ जरा उजव्या डाव्या बाजूला कुठेतरी असतात.

सावत्र आईबद्दल बोलायचे तर माझ्या आईची आई ही तिची सावत्र आई होती. पण नात्याने तिची मावशी होती म्हणून असेल किंवा काही, पण आम्हाला कधी काही फरक जाणवला नाही. तिच्या शेवटच्या दिवसात ती आईकडेच राहत होती. तेव्हा ती, आई किंवा आईच्या बहिणी यांनाही काही विशेष वाटले नाही. एका चुलत मावशीच्या अकाली निधनानंतर तिच्या नवऱ्याने दुसरे लग्न केले. तेव्हा मावशीची मुले १२ व १० वयाची होती. त्यांनी व इतरांनीही या दुसऱ्या पत्नीला छान स्वीकारले. त्यांचे कुटुंब असे जरा वेगळे आहे असे कोणाला संशय सुद्धा येणार नाही. छळ करणारी सावत्र आई सामान्य कुटुंबात सहसा
बघायला मिळत नसेल असे मला वाटते.

अगदी अशातच एका जुन्या पणजोबां कालिन जमिनदार पणआजोबांचा किस्सा एकण्यास मिळाला. त्या आधी एकुलत्या एक असलेल्या जमिनदारपणजोबांची आई दगावल्या नंतर खापरपणजोबाने आणखी एक लग्न केले आणि त्यांना मुले झाली . आणिसारी मुले लहान असतानाच जमिनदार खापरपणजोबा दगावले. सावत्र आई कडुन छळ झाला अथवा मनात नुसताच राग होता माहित नाही . पहिल्या क्रमांकाचे जमिनदार पणजोबा घरातुन बाहेर पडले कोर्ट कज्जे करुन तेव्हाच्या हिंदू कायद्याने काय स्वतंत्र जमिनदारी हिस्सा मिळवायचा तो मिळवला - या एकल्या जमिनदार आजोबांच लग्न होऊन मुले झाली अन बायको दगावली - आता हे जमिनदार पणजोबा जी मुलगी आवडली (त्याकाळात बालविवाह ) त्यांच्याकडे कळेल हे पहात , जमिनदार असल्यामुळे बरेच पालक प्रस्ताव घेऊन येत , प्रस्ताव घेऊन आलेले एकदा दिवाण खान्यात आले की हे जमिनदार महाशय त्या अतिथींवर जाम भडकत , माझ्या पोरांना तुमची पोरगी सावत्र आई म्हणून सुचवण्याची हिम्मत होतेच कशी असा आरडा ओरडा करत सुरक्षा रक्षकांकरवी घालवून लावत . :) सांगण्याचा मुद्दा सावत्र आई बद्दलचा त्यांचा अनुभव असेल किंवा परसीव्ह्ड इम्प्रेशन असेल त्यांचे वागणे विक्षीप्त झालेले होते.

तुम्ही म्हणता तशी सावत्र आईसोबत व्यवस्थीत रुळलेली अनेक उदाहरणेही पाहिली पण भारतीय साहित्यातील खास करुन पौराणीक सावत्र आई हे नाते जास्त करुन नकारात्मक रंगवले गेले . यात ध्रूव बाळाची गोष्टी ते कैकै अशा अनेक कथा दिसतात. मुस्लिमांमध्येही अनेक विवाह होतात , पण कदाचित नात्यातल्या विवाहांचि संख्या असल्यामुळे असेल . त्याम्चे साहित्य फारसे वाचण्यात येत नाही पण सावत्र आई या विषयावर तक्रारवजा सूर फारसा वाचल्याचे आठवत नाही .

तसे काही अगदीच सक्खे सावत्र असा भेद जाणवत नाही. माझे एक मामा व एक मावशी सावत्र आहेत.(म्हनजे माझ्या आईचे सावत्र भावंडे) पण त्यांच्या मायेत फरक पडला नाहीये. उलट सक्ख्या मामापेक्षा तो जवळचा वाट्तो.
मात्र एका परिचिताच्या घरात दोन लहान मुलांच्या आईने सासु सुनाच्या भांडणात पेटवून आत्महत्या केली, सुनेला वाचवताना सासूही भाजली. दोघी एकदमच वारल्या. मग त्या माणसाने लहान मुलांना सांभाळण्यासाठी दुसरे लग्न केले. ती सावत्र आई पहिल्यांदा व्यवस्थित वागली पण तिला मूल झाले की आधीच्या दोन मुलांचा छळ सुरु झाला. तो अगदी बाहेरच्या माणसांना पण कळायचा. आधी थाटात राहिलेली ती मुले साध्या कपड्यात दाराबाहेर वडील कधी कामावरुन परत येतात ह्याची दीनवाणे वाट बघत बसलेली असायची. ती मुले अगदीच रोडावली २ वर्शात. त्यातल्या मोठ्या मुलीचे तर वयात आली की लगेच लग्न लावून दिले. नशीबाने तिचा छोटा भाऊ शिकून बाहेर गेला. त्यांचे चांगले झाले काळानुसार. पण त्या दोन्ही भावंडांनी आईवडीलांशी कायमचा संपर्क तोडला.

मातृत्व ही अत्यंत ओव्हररेटेड संकल्पना आहे. हे मला आजच वाटतंय असं नाही. आई होण्याआधी आणि नंतरही अनेकदा जाणवून गेलंय. मूल होत नाही म्हणून, मुलगाच होत नाही म्हणून छळ होणाऱ्या बायका अशावेळी डोळ्यासमोर येतात. ज्या क्षणी आपण बाईचं 'आई' झाल्यानंतरच प्रेम पुरुषाचा 'बाप' झाल्यानंतरच्या प्रेमापेक्षा अधिक उदात्त आणि श्रेष्ठ ठरवतो तिथेच समाज म्हणून आपण माती खाल्ली आहे. पालकत्वाचा बॅलन्स तिथेच गेलेला आहे. बाकी हॅप्पी मदर्स डे!
#mothersday
- मुक्ता चैतन्य

स्थैर्य ( सामाजिक,कौटुंबिक,आर्थिक) नष्ट होतय हे कोणत्याही आईला समजलं की वागण्यात दुरावा, चिडकेपणा, दुष्टपणा येतो. पण हे आजच घडत नाही.

श्वेता२४'s picture

16 May 2018 - 10:38 am | श्वेता२४

ज्या क्षणी आपण बाईचं 'आई' झाल्यानंतरच प्रेम पुरुषाचा 'बाप' झाल्यानंतरच्या प्रेमापेक्षा अधिक उदात्त आणि श्रेष्ठ ठरवतो तिथेच समाज म्हणून आपण माती खाल्ली आहे. पालकत्वाचा बॅलन्स तिथेच गेलेला आहे.

श्वेता२४'s picture

16 May 2018 - 10:41 am | श्वेता२४

कि आई या भूमिकेमुळे तिच्या माणूस म्हणून असणाऱ्या हक्कापासून तिला डावलल गेलं.

एमी's picture

6 Jun 2018 - 3:22 am | एमी

https://www.maayboli.com/node/41198 मराठी आंजावर पहिल्यांदाच 'रोचक' आई वाचली.