सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा म्हणजे गरुडाचे घरटे आहे

हेमंत ववले's picture
हेमंत ववले in भटकंती
15 Sep 2017 - 11:28 am

"सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा म्हणजे गरुडाचे घरटे आहे",

..ब्रिटीश वकील, जेम्स डगलस ने तोरण्याविषयी काढलेले उदगार

मागच्या वर्षी २१ वर्षांनी तोरण्यावर पुन्हा जाण्याची संधी मिळाली. २१ वर्षापुर्वी सपकाळ सर, आनंद पाळंदे काका, धावडे सर, घावरे सर, प्रमोद मांडे काका आदी जाणकार मंडळींसोबत वयाच्या १६ व्या वर्षी तोरण्यावर गेलो होतो. या ज्येष्ट लोकांसोबत आणखीही बरेच किल्ले , डोंगर द-या भटकण्याचे भाग्य मिळाले. यांनी नुसतेच किल्ले दाखवले नाहीत तर किल्ल्यांकडे पाहण्याचा एक दृष्टीकोन सुध्दा दिला.
पाळंदे काकांचे पुस्तकातील एका वाक्याने मनात कायचे घर केले आहे. निसर्गातुन चालताना पावलाच्या ठश्याशिवाय मागे काही ठेवु नका व सुखद आठवणी वाचुन काही नेऊ नका"

निसर्गशाळे सोबत आलेले ट्रेकर्स आणि मी
निसर्गशाळे सोबत आलेले ट्रेकर्स आणि मी

आपल्या ऐतिहासिक वास्तु म्हणजे आपली साम्स्कृतिक धरोहर आहेत. त्यांचे जतन झाले पाहीजे. त्यांचा अभ्यास झाला पाहीजे. नवनवीन पिढ्यांना या वारश्याविषयी नीट माहीती करुन दिली गेली पाहीजे. व आणखी महत्वाचे म्हणजे या वास्तुंविषयी गर्हनीय भाव जनलोकांत निर्माण केला पाहीजे. हे आणि असे ही बरेच संस्कार वरील मंडळींनी बोलुन नव्हे तर त्यांच्या कृतीतुन आमच्या सारख्या अनेकांच्या मनावर केले आहेत.

परवाच्या तोरणा भेटीत वरील "दुर्गसंस्काराचा" -हास होत असलेला प्रकर्षाने जाणवला. सलग तीन दिवस सुट्ट्या, वाहनांच्या सुविधा, इत्यादी गोष्टींमुळे किल्ले पाहणे हा संस्कार न राहता तो आता फक्त "सहल", "मजा" व विरंगुळा राहीलेला आहे असेच खेदाने म्हणावे लागते. काही गोष्टी जाणवल्या त्यावर जाणकारांनी, दुर्ग प्रेमींनी, दुर्ग संवर्धकांनी अवश्य चिंतन करावे...

आम्ही किल्यावर जाण्यासाठी निघालो खरे पण वेल्हे गावात, पोहोचल्यावर समजले की किल्याच्या अर्ध्याअधिक चढाईपर्यन्त डांबरी व कॉम्क्रीट चा रस्ता झाला आहे. असेच मुळशीतील घनगडावर देखील झाले आहे. अशाप्रकारे रस्ते करण्यामुळे अनेकांची सुविधा होते हे खरे पण श्रम कमी झाल्याने, ज्यांना इतिहासातील "ती" ला पहीली वेलांटी की दुसरी वेलांटी हे देखील माहीत नाही अशा अनेक हवश्या, गवश्या व नवश्यांना किल्ल्यावर पोहोचणे सुलभ झालेले आहे. ज्यांना निसर्ग शिष्टाचार, नेचर इटीकेट्स माहीत नाहीत अशा हजारो लोकांना सहज पणे इथे पोहोचता येते. किल्ले सर्वांनीच पहावेत, पण जर किल्ल्यांचे किल्लेपण , पावित्र्य जर अशा लोकांच्या येण्याने नष्ट होणार असेल तर अशा लोकांनी किल्ल्यावर न आलेलेच बरे. अगदी साध्या गोष्टींचे दुर्ग संस्कार, निसर्गसंस्कार यांवर झालेले नसतात हे या ट्रेक वेळी जाणवले.

राजगडापासुन तोरण्याकडे येताना तोरण्याचे असे दर्शन घडते
राजगडापासुन तोरण्याकडे येताना तोरण्याचे असे दर्शन घडते

उदा - किल्ला किंवा कोणताही डोंगरावर चढताना किंवा उतरताना आपले दोन्ही हात मोकळे असावयास हवेत. त्यामुळे नैसर्गिक रीत्या शरीराचे संतुलन होण्यास मदत होते. कित्येक लोक किल्ला चढताना किंवा उतरताना एका हातात पाण्याची बाटली व दुस-या हातात "जीव गेलेली काठी" घेऊन दिसले. ब-याच लोकांना मी समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला पण माझ्यासारख्याचे ऐकेल तो धाडसी तरूण कसला, ह्या आविर्भावात हे लोक चढत किंवा उतरत होते. (त्यात तोरणा तर गरुडाचे घरटे आहे, पुण्यातील सर्वात उंच किल्ला व पर्वत सुध्दा)...

किल्ला चढताना एका हातात ज्या पाण्याने भरलेल्या प्लास्टीकच्या बाटल्या असतात त्या, बाटलीतील पाणी संपल्यावर वाटेवरच टाकणे, किंवा किल्ल्यावर कुठे ही टाकणे ही कृती इतकी सामान्य झाली आहे की लोक हे देखील विसरले आहेत की ही विकृती आहे. असेच प्लास्टीक पिशव्यांच्या बाबतीत. बिन्नीच्या दरवाज्याने आत जातान, देवळीतच पडलेला प्लास्टीकच्या बाटल्यांचा खच/ढिग च स्वागत करतो, त्यातच वर चढुन आलेला बहादराच्या हाती जर मोकळी बाटली असेल तर त्याला कुणीही न सांगता तो निर्लज्ज पणे तिथेच हातातील बाटली टाकुन मोकळा होतो. प्लास्टीक च्या पिशव्या, थर्माकोलच्या जेवणाच्या खरकाट्या पत्रवाळ्या, तंबाखुच्या मोकळ्या पुड्या, प्लास्टीकचे ग्लास...अरे काय हा कर्म दरीद्रीपणा. शिवाजी महाराजांच्या इतक्या महान ऐतिहासिक वारश्यास ह्या लोकांनी कचराकुंडी करुन टाकावे यास कर्मदरीद्री पणा नाही म्हणायचे तर आणखी काय?

किल्ला चढताना, किंवा उतरताना, अति उत्साहाच्या भरात, हे नवशे, गवशे, हवशे इतक्या मोठमोठ्या आवाजात किंचाळतात की जणु असे किंचाळल्याने त्यांना कुणीतरी शाबासकी देणार आहे. निसर्गाच्या अविरत अशा शांततेमध्ये देखील एक संगीत आहे. पक्षांची किलकील, उन्मत्त वा-याचा गोंगावणारा आवाज, अधुन मधुन येणारे प्राण्याचे, माकडांचे, भेकरांचे , मोरांचे आवाज.. वा-यामुळे सळसळणा-या गवताचा, झाडांच्या पानांचा आवाज, हे सगळे आपणास निसर्गातील सांमजस्य, हार्मनी चे दर्शन घडवतात. आणि आपण निसर्गात जाऊन काय करतो तर या सगळ्या हार्मनी मध्ये विरजन घालुन ही हार्मनी नासवतो. आपण एक दिवस तिकडे जातो व आरडाओरड करुन तेथील परीस्थितीकीस उध्द्वस्त करतो. कुणी दिला आपणास अधिकार निसर्गातील , तिथे वास्तव्यास असणा-या प्राणीमात्रांच्या , निसर्गघटकांच्या एकतानतेस नष्ट करण्याचा?

किल्ल्यावर जाणे म्हणजे जत्रा आहे काय?
साधारणतः कोणताही किल्ला पाहायचाअसेल तर जास्तीत जास्त किती सदस्य असावेत तुमच्या समुहामध्ये? ५, १० जास्तीत जास्त १५..त्यापुढे जर सदस्य संख्या गेली तर तुमचे दुर्गदर्शन होणार नाही, ती जत्रा होईल. परवा असाच एक १५० लोकांचा ग्रुप किल्ला पाहायला आला. या ग्रुपचे काही सदस्य किल्ला चढत असतानाच काही सदस्य किल्ला उतरत होते. कुठे आहे "टीम वर्क". सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा देखील संस्कार निसर्ग पर्यटनामधुन झाला पाहीजे. सदस्य मागे पुढे होणे म्हणजे फार गंभीर बाब आहे. जी निसर्गाच्या रौद्र रुपाच्या दर्शना्साठी आपणास वाट मोकळी करुन देते. अवघड, अपरीचीत वाटा, तीन चारशे फुट खोल अशा द-या, यात जर तुमच्या ग्रुप मधील कुणी भोवळ येऊन, चक्कर येऊन, किंवा हाता पायाला जखम होऊन पडला तर, त्याचे परीणाम अति भयंकर होतात. प्रसंगी जीव ही गेले आहेत, तेही तोरणा किल्ल्यावरच.
एवढ्या मोठ्या संख्येने किल्ल्यावर जाणे म्हणजे सोबत तेवढाच कचरा घेऊन जाणे होय. पायथ्याशी असलेल्या गावातुन हॉटेल वाल्याला या १५० लोकांच्या जेवणाची ऑर्डर होती. यासाठी तयार जेवण किल्ल्यावर घेऊन जाणारे काही लोक ही दिसले, की जे जेवणाची पोती, अक्षरक्षः पोती, डोक्यावर घेऊन चढत होती. या लोकांनी किल्ल्यावर बराच कचरा केला. आरडाओरड, बीभत्स गाणी, नाच...अरेरे..अशोभनीय असे हे वर्तन पाहुन खरच राग येत होता, पण नाइलाज होता..कुणी ही ऐकण्यच्या मनस्थितीते नव्हते. अगतिकता.

नोकरी धंद्या निमित्त पुण्याअत आलेले काही हिन्दी भाषिक तरुण सुध्दा दिसले. ज्यांना फक्त ट्रेकींग करायचे होते. त्यांना ना धड शिवाजी राजे माहीत,, न तोरण्याचा इतिहास. मी काही ग्रुप्सना जमेल तसे माहीती सांगण्याचा पर्यत्न केला त्यांना तो आवडला ही. यातील बरेच लोक निसर्गाप्रती संवेदन असलेले जाणवले. त्यांचा सर्व कचरा ते पुन्हा त्यांच्याच बॅगांमध्ये ठेवीत होते. मी त्यांचे कौतुक केले.

या सर्व निराशेच्या गर्तेत एक आशेचा किरण ही दिसला..
मला शिवणे, पुणे येथील एक तरुणांचा ग्रुप भेटला. त्यातील एकाने मला ओळखले. व दोन मिनिटे त्यांच्या गप्पा मारता आल्या. हे १५-२० तरुण गेली बरीच वर्षे न चुकता १४-१५ ऑगस्ट ला तोरणा किल्ल्यावर येतात व ध्वजवंदन करुन किल्ला सफाईचे काम निरपेक्ष हेतुंने करतात. यातील "आदेश पायगुडे" या तरूणास मी ओळखतो, म्हणुन फक्त त्याचाच नामोल्लेख करीत आहे. अशा तरुणांना प्रोत्साहन व सहकार्य करणे हे आपण सर्वांनी केले पाहीजे.

गड स्वच्छतेचे काम करताना कार्यकर्ते
गड स्वच्छतेचे काम करताना कार्यकर्ते

किल्ला म्हणजे नुसती सहल नाही, किल्ला म्हणजे अखंड प्रेरणास्त्रोत आहे.
हे प्रेरणास्त्रोत स्वच्छ, सुंदर व पवित्र राहावयास हवेत. त्यासाठी सर्वांनी आत्मपरीक्षणासोबतच कृतीशील होणे गरजेचे आहे

टिप - तोरणा राजगडाचे काही अप्रतिम अजोड अतिसुंदर मनमोहम नयनरम्य फोटो पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

http://nisargshala.in/rajgad-trek-camping-near-pune/

प्रतिक्रिया

उपेक्षित's picture

15 Sep 2017 - 1:27 pm | उपेक्षित

खरय तुमचे इथले विखी भाऊ आणि दुर्गविहारी यावर जास्त अधिकारवाणीने सांगू शकतील अजून....

बाकी संदेश पायगुडे आणि मंडळाचे विशेष कौतुक त्यांच्या मोहिमेबद्दल.

सिरुसेरि's picture

15 Sep 2017 - 1:29 pm | सिरुसेरि

खुप छान , तळमळीची माहिती

महाराष्ट्रात किल्ल्यांची पाहणी, देखभाल आणी डागडुजी करणार्या संस्थांची एकत्रित माहिती कुठे मिळू शकेल?
थोडक्यात, दुर्गसंवर्धन करणार्या संस्था

हेमंत ववले's picture

15 Sep 2017 - 7:02 pm | हेमंत ववले

माझ्या माहीतीमध्ये एक जण आहे , त्यांच्या शी बोलुन या बाबतीत अधिक माहीती मिळाल्यास इथे देईल मी आपणास....

दुर्गविहारी's picture

15 Sep 2017 - 8:08 pm | दुर्गविहारी

अशी एकत्र माहीती मिळणे कठीण आहे. खरेतर सरकारनेच या संस्थाचा एकत्रित आढावा घेतला आणि त्यांना प्रोत्साहनपर काही स्पर्धा, बक्षिसे ठेवणे असे उपक्रम राबयला हवेत. बरेच जण स्वताच्या पदरचे पैसे आणि वेळ घालवून हा उपक्रम करतात. हाल्ली बर्‍याच संस्था आपल्याच गावाच्या परिसरात असणार्‍या गडकोटाची साफसफाईची मोहीम राबवतात.त्यामुळे अशा स्थानिक संस्था बाकीच्याना माहिती नसतात.
माझ्या माहितीतील काही संस्थाचे संकेतस्थळांचे पत्ते देतो.
ट्रेक क्षितीज
सह्याद्री प्रतिष्ठाण
दुर्गवीर
चक्रम हायकर्स
युथ हॉस्टेल

या व्यतिरीक्त अजून बर्‍याच संस्था आहेत, त्यांचा नामोल्लेख केवळ मला माहिती नाही म्हणून केलेला नाही. यात ईतरांनीही भर घालावी अशी अपेक्षा.
मी आणखी एक उपक्रम करतो आहे. घाग्याच्या विषयाशी अस्थानी वाटला तर धागाकर्त्याने मला माफ करावे. बर्‍याचदा आपण किल्ल्याच्या परिसरात गेल्यानंतर काही अडचणी येतात, पाहणे, रहाणे, खाण्यापिण्याची व्यवस्था . यासाठी किल्ले आणी तेथील स्थानिक गाईडचा मोबाईल क्रमांक यांची पि.डी.एफ. केली आहे. ज्यांना हवी त्यांनी व्य.नि. करावा आणि शक्य झाल्यास त्यात भर घालावी, जेणे करून सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल.

दुर्गविहारी's picture

15 Sep 2017 - 7:50 pm | दुर्गविहारी

हि तुमची खंत आणि कळकळ खरेच पोहचली. पण नाईलाज आहे. घाण करणारे हात खुप आणि सफाई करणारे हात कमी अशी परिस्थिती आहे खरी. वर गडाची साफसफाई आणि डागडूजी करणार्‍या संस्थाना आपले पुरातत्व खाते नोटीसा पाठविण्यात धन्यता मानते.
मला एका गोष्टीचे कायम आश्चर्य वाटते, परदेशात गेलेली मंडळी तिथे गेल्यानंतर तिथल्या पर्यटन्स्थळाच्या स्वच्छतेबध्द्ल ईतके कौतुक करतात, तिथे बसणार्‍या दंडाच्या भितीने शिस्तही पाळतात.मात्र भारतात उतरल्यानंतर विमानतळावरुन बाहेर आल्यानंतर ईथली हवा लागली कि तोच गलिच्छपणा पुन्हा सुरु. आपल्या देशातील मंदिरे, समुद्र किनारे,किल्ले हे परदेशासारखे असावेत असे का वाटत नाही?तेजस एक्प्रेसमधे स्क्रिन फोडणारी आणि नळ पळविणारी प्रवॄत्ती ईथेच का जन्म घेते?
बरं या लोकांना काही सांगायला जावे, तर यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जागे होते. स्वातंत्र्य पाहिजे , कर्तव्य नको अशी मानसिकता का? आज कुठेही गेले कि पिण्याच्या पाण्याच्या वाया गेलेल्या बाटल्यांचा खच, गुटख्याच्या पुड्या, सिगारेटची थोटके, पान, तंबाखू खाउन थुंकलेल्या भिंती, ऑईलपेंट्ने आणि खडूने नावे रंगविणारे तथाकथित प्रेमीयुगूले हे पाहून खिन्न वाटते. घाण करणार्या लोकांना शिक्षा म्हणून हे साफ करायला लावले पाहिजे,म्हणजे पुन्हा या चुका करताना विचार केला जाईल.
यासाठि कायदे असावेत, पण अंमलबजावणी होत नाही.अंमलबजावनीची वेळ आली कि आहेच कुठल्यातरी टिनपाट पुढार्‍याला फोन करणे. डॉल्बीच्या बाजूने उभारणारे आमचे तथाकथित आमदार नुकतेच पाहून झालेत. कुणाक्डून अपेक्षा करायची.
शेवटी या मातीच्या आणि राजांच्या प्रेमापोटी हे विचार बाजूला ढकलुन झोकून देउन काम करणार्‍या संस्था आहेत म्हणून आपण थोडी तरी चांगले होईल हि अपेक्षा ठेउ शकतो.