निरभ्र आकाशातील ' मृग नक्षत्र'

ओरायन's picture
ओरायन in जनातलं, मनातलं
12 Sep 2017 - 11:17 am

'ओरायन ' म्हणजे खगोलीय भाषेत काय ?

आपणांस माहित असेल कि जागतिक मान्यतेनुसार एकूण ८८ तारकासमूह (Constellation)आहेत.
जगात वेगवगेळ्या पुरातन संस्कृतीमध्ये, (जसे ग्रीक, प्राचीन सुमेरियन, चिनी, भारतीय) अनेक तारकांचा बनलेल्या समूहाला वेगवेगळी नावे आहेत. तसेच त्यांची संख्या वेगवेगळी आहे. शिवाय तारकासमूहांतील ताऱ्यांची संख्या पण कमीअधिक आहे. आपल्याकडे नाही कां २७ नक्षत्रे आहेत ?

आता सर्वाना मान्य होतील व जे सर्वसमावेशक असतील, असे तारकासमूह करण्याची वेळ आली होती. कारण सोईसाठी व सहजतेसाठी जगभर खगोलीय भाषा एकच हवी. या कामी अमेरिकन व युरोपीय खगोल संस्था यांनी पुढाकार घेतला व १९२२ ला तारकासमूहांची (Constellation) नवीन यादी तयार केली.

आज International Astronomical Union (IAU, जागतिक खगोलीय संस्था), ८८ तारकासमूहांना मान्यता देते. या मध्ये जी नावे तारकासमूहांना देण्यात आली आहेत त्याच्यावर अर्थातच ग्रीक, लॅटिन नावांचा पगडा जास्त होता. तेथील दंतकथेनुसार नावे देण्यात आली. यामध्ये दंतकथेतील प्राणी, माणसे यांची नावे आहेत.

आता 'ORION CONSTELLATION ' याविषयी....

'Orion Constellation ' म्हणजे आपल्याकडील 'मृग नक्षत्र'. 'Orion' याचा मराठीत उच्चार 'ओरायन' असाच होतो. परंतु बरेच जण ओरिओन किंवा ओरिन असा चुकीचा करतात. या तारकासमूहास रात्रीच्या निरभ्र आकाशात ओळखायला एकदम सोपे. आकाशनिरक्षण व अभ्यास करताना, सुरूवात, शक्यतो इथून करतात. 'ओरायन' हा शब्द, दंतकथेवरुन आला आहे. ओरायन नावाचा शक्तिमान व मायावी शिकारी होता.

आता हा ओळखायचा कसा ? १३ ते १७ डिसेंबर च्या दरम्यान, रात्री १२ च्या सुमारास गच्चीवर, माळ्यावर जावे. २-३ मिनिटे डोळे मिटून पाठीवर पडून रहा. (डोळे मिटायचे यासाठी कि आपण एकदम उजेडातून अंधारात येत आहोत. डोळ्यांना काळोख्या वातावरणाशी समरस होण्यासाठी काही वेळ द्यावा लागेल). आता तुम्ही पाठीवर पडून आकाशाकडे बरोबर वर बघत आहात. आकाश निरभ्र आहे. डोळ्याच्या एकदम समोर, एका डोळ्यावर दोन बोटे (अंगठ्याशेजारील) ठेवा. बास, ही दोन बोटे मिळून जो भाग होतो, तेवढाच आपला 'निरीक्षण पट्टा' (Viewing Area ). आता या पट्ट्यात तुम्हांला ४ तारे मिळून एक जवळपास चोकोनी आकार दिसेल. यातील दोन तारे ठळक दिसतील व दोन तुलनेत मंद. शिवाय, या चौकोनाच्या आत तीन तारे ओळीत दिसतील. हा झाला 'ओरायन बेल्ट' (ओरायन याने परिधान केलेला पट्टा ). या बेल्ट खाली व चौकोनाच्या आत अजून काही बेल्ट कडे दिशा करून तारे दिसतील. हे आहे नवीन ताऱ्यांचे 'प्रसूतिगृह'. म्हणजे इथे नवीन तारे जन्माला येतात. खगोलीय भाषेत याला ' M-४२' या नावाने ओळखतात.

तुम्हांला रात्री १२ वाजता तारे बघण्याची वेळ योग्य वाटत नसेल तर , नंतर पुढील महिन्यात म्हणजे जानेवारी १३ ते १७ दरम्यान हेच तारकासमूह तुम्ही रात्री १० वाजता त्याच ठिकाणी बघु शकता (म्हणजे डोक्याच्या बरोबर वर). त्यापुढील महिन्यात, फेब्रुवारी १३ ते १७ तारखेदरम्यान रात्री ८ वाजता. याला कारण म्हणजे एखादा तारा आदल्या दिवशीच्या वेळेपेक्षा साधारण ४ मिनिटे उशिरा उगवतो. महिन्याला २ तास होतात. ह्या वेळा आपण साधारण धरलेल्या आहेत. अचूक वेळा वेगळ्या आहेत.

बाकी तुम्ही गुगल करा ओरायन म्हणून, तुम्हाला त्याचा फोटो दिसेल. तो तुम्हांला निरीक्षणापूर्वी नक्कीच उपयोगी पडेल.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

12 Sep 2017 - 12:15 pm | सस्नेह

फोटो द्या की ओ.

कंजूस's picture

12 Sep 2017 - 12:23 pm | कंजूस

चित्रं हवंच.

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Sep 2017 - 1:07 pm | ज्ञानोबाचे पैजार

मृग नक्षत्र हे ओळखायला अतिशय सोपे नक्षत्र आहे. रात्रीच्या भटकंतीत दिशा समजण्यासाठी सुध्द्दा याचा बराच उपयोग होतो. कारण वर्षातील बहुतांश वेळेला हे नक्षत्र आकाशात दिसत रहाते.

यातला नक्षत्रा मधला व्याधाचा तारा उगवताना पहाणे ही तर एक पर्वणीच आहे. निरभ्र आकाशात व्याध उगवताना सतत रंग बदलताना आपल्याला दिसतो. हे दृष्य अत्यंत मनोवेधक असते.

मृगनक्षत्राच्याच पुढच्या बाजुला (म्हणजे पश्चिमेच्या बाजुला) कृत्तिका नक्षत्र हा तारका समुह दिसतो तो निरभ्र आकाशात न्यहाळणे हा पण एक आनंददायी कार्यक्रम असतो कारण नुसत्या डोळ्यांना हा तारका समुह एखाद्या छोट्या ढगासारखा दिसतो पण दुर्बीणीचा वापर करुन पाहिले असता त्यातले अनेक तारे दिसू लागतात. आणि जितके जास्त लक्षपूर्वक आपण पहात जाउ तेवढे जास्त तारे या समुहा मधे दिसू लागतात.

पैजारबुवा,

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Sep 2017 - 2:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर माहितीपूर्ण लेख. जरा अजून तपशील व चित्रे असती तर जास्त मजा आली असती.

चित्रे (जालावरून साभार)...


मृग (ओरायन कॉन्स्टेलेशन) मानचित्र


मृगाचे आकाशातले डोळे अथवा सामान्य दुर्बिणीने होणारे दर्शन


मध्यम ताकदीच्या दुर्बिणीने दिसणारे मृगनक्षत्र आणि त्याचा परिसर


नासाच्या स्पिट्झर इन्फ्रारेड अवकाश दुर्बिणीने टिपलेले मृगनक्षत्र आणि त्याच्या बाजूचा तार्‍यांना जन्म देणारा नभमंडळखंड


इसपूर्व ५,००० ते इस ५,००० या कालखंडात मृगनक्षत्रातील तार्‍यांची बदलत गेलेली/जाणारी स्थिती

मृग नक्षत्रातील ओरायन तेजोमेघ नुसत्या डोळ्यांनीही दिसू शकणारा एकमेव तेजोमेघ आहे. अर्थात त्यासाठी जिथे कुठलेही प्रदूषण नाही अशा अमावास्येच्या गडद अंधार असलेल्या रात्री जायला हवे.

क्रॅब नेब्युला बद्दल अजून सांगा की.

डॉ सुहास म्हात्रे , आपण जोडलेल्या माहितीपूर्वक चित्रांबद्दल धन्यवाद. मी फोटो कसे जोडायचे हे अजुन माहिती करून घेत आहे. परंतु आपण दिलेले फोटोज जास्त योग्य आहेत.
पैजारबुवा , प्रचेतस आभारी आहे.
तर आता व्याधाचा विषय निघाला म्हणून सांगतो कि व्याध हा तारा ओरायन तारकासमुहाचा भाग नाही. तो वेगळ्या तारकासमुहात आहे. ज्याचे नाव आहे 'CANIS MAJOR ' Constellation. मराठीत नाव क्लिष्ट आहे. ... बृहदलुब्धक. व्याध मुळात एक तारा नसून जोडतारा आहे. आपल्या सूर्यापेक्षा मोठा आहे. व्याध तारा हा पृथ्वीवरून दिसणाऱ्या ताऱ्यांमधील सर्वात ठळक तारा आहे, पैजारबुवांनी वर्णन केल्याप्रमाणे त्याचे उगवणे लोभस असते.
व्याधाला ' डॉग स्टार ' किंवा SIRIUS (मराठीत , सिरिअस किंवा सायरस ) या नावांनी ओळखतात.
ओरायन बेल्ट मधून ( ३ ओळीतील तारे एका कल्पित रेषेने जोडायचे व ती रेष तशीच पुढे वाढवायची) सरळ बघितले तर काही अंतरावर हा तेजस्वी व्याध तारा दिसतो. हा डॉग स्टार ओरायनचा पाठलाग करत असतो. म्हणजेच तो ओरायनच्या मागोमाग असतो.
एस, क्रॅब नेब्युला म्हणजे एक प्रकारे ( ज्याला 'सुपरनोव्हा' म्हणतात) स्फोट झालेल्या ताऱ्याचे राहिलेले भग्न अवशेष आहेत, एवढेच मला माहित आहे. क्रॅब नेब्युला याला M१ ह्या नावाने पण ओळखतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Sep 2017 - 2:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

खालील माहिती फोटो मिपावर टाकण्यासाठी उपयोगी पडेल :

१. मिपावर फोटो टाकण्याची कृती

२. गुगल फोटोवरचे फोटो/अल्बमला पब्लिक अ‍ॅक्सेस देण्याची कृती :

अ) प्रथम मिपावर टाकायचे फोटो एक स्वतंत्र अल्बममध्ये एकत्र करा. असे केल्याने तुमचे इतर फोटोंना चुकून पब्लिक अ‍ॅक्सेस मिळणे टाळता येईल.

आ) अल्बम उघडा ठेवून त्याच्या "टायटल बारमध्ये (वरची पट्टी)" उजव्या बाजूला असलेल्या आयकॉन्सपैकी "शेअर" आयकॉन निवडा.

इ) दिसणार्‍या विंडोमधे तळाला दिसणार्‍या आयकॉन्सपैकी "गुगल+" हा आयकॉन निवडा

ई) त्यानंतर दिसणार्‍या विंडोतिल "CONTINUE TO GOOGLE+" हा पर्याय निवडा.

उ) त्यानंतर दिसणार्‍या विंडोच्या (१) तळात तुमच्या निवडलेल्या अल्बमचे नाव दिसेल (खात्री करा) व (२) मथळ्यात बहुदा खाली दाखवल्याप्रमाणे निळ्या रंगात "पब्लिक" हा पर्याय दिसेल.

"पब्लिक" पर्याय न दिसल्यास तेथे दिसत असलेल्या पर्यायावर क्लिक करा --> सर्व उपलब्ध पर्यायांची यादी दिसेल, त्यातला हवा तो पर्याय (इथे "पब्लिक" पर्याय) निवडा.

झाले काम ! जरा किचकट प्रकार आहे. पण इतर अनेक सोईसवलतींमुळे मला व्यक्तिगतरित्या गुगलफोटो जास्त उपयोगी अ‍ॅप वाटते.

विशेष सुचना : पब्लिक शेअर केलेल्या अल्बममध्ये नवीन फोटो वाढविल्यास तो परत एकदा पब्लिक शेअर करावा. अन्यथा "जुने फोटो दिसतात पण नवीन फोटो दिसत नाहीत" असे होण्याची शक्यता आहे.

मस्त माहिती.. सुंदर पद्धतीने सांगताय.. मला आकाश दर्शन करायला आवडते पण लक्षात काही रहात नाही.. ह्यावर अजून लेख येउद्या

लाल गेंडा's picture

14 Sep 2017 - 4:08 pm | लाल गेंडा

जर वर टाकलेली gif बघितली तर तिथे एक शिकारी दिसतो. ग्रीक पुराणातल्या कथेनुसार हा शिकारी राजाच्या पोरींना पळवायला आला होता. त्या राजकुमारी मग आकाशात जाऊन लपल्या, त्या बैलाच्या वशींडात. ते म्हणजे कृत्तिका नक्षत्र. हा बैल त्या राजकुमारींना वाचवायला शिकार्यावर चाल करून जातोय अस भासत आकाशात.
त्या राजकुमारीची ग्रीक पुरणकथेत नाव नाहीत पण मराठीत त्यांना नलयंती, दमयंती, चिपूंनीका आणि काही अजून (जी मला आता आठवत नाहीयेत) अशी नाव आहेत.
निरभ्र आकाशात कृत्तिकेमध्ये किती तारे दिसतात याची पैज लागते आकाश दर्शनाच्या सत्रात. कोणाला 5, कोणाला 7 तर कोणाला 11 दिसतात. पण खरं 9 तारे आहेत.
महत्वाचं म्हणजे ते तारे एका ठिकाणी नाहीत परंतु आपल्या line of sight मध्ये एकाच ठिकाणी दिसतात.
असो. बोलायला गेलं तर या सगळ्या कथेत रोहिणी नक्षत्र पण येत आणि बृहदलुब्धक, लघुलुब्धक असे दोन कुत्रेपण येतात.

आपल्या हिंदू पुराणानुसार कृतिका नक्षत्रात ६ तारका असतात. शंकराचा पुत्र "कार्तिकेय" हा तारकासुराचा काळ असल्याने तारकासुर त्याला मारण्यासाठी टपलेला होता. तारकासुरापासुन बाळ कार्तिकेयाचे रक्षण करण्यासाठी नक्षत्रमंडलातल्या या ६ बहिणींनी त्याचा आईसारखा सांभाळ केला होता, म्हणूनच त्याला कार्तिकेय असे म्हणतात.(कृत्तिकांचा मुलगा म्हणून कार्तिकेय)

व्याध आणि मृगनक्षत्राची देखील एक कथा आहे, जी महाशिवरात्रीशी निगडीत आहे. एक शिकारी दिवसभर शिकारीसाठी जंगलात भटकतो पण शिकार न मिळाल्याने तळ्याच्या काठी एका बेलाच्या झाडावर चढून सावजाची वाट पाहत बसतो.
मध्यरात्रीनंतर एक हरिणी तळ्यावर पाणी प्यायला येते, तिला मारण्यासाठी तो बाण सोडणार तेव्हा ती हरिणी सांगते "मी गर्भवती आहे आणि प्रसुतीची वेळ जवळ आली आहे. आता मला मारलेस तर दोन जीवांचा बळी जाईल, तेव्हा आता मला सोड. मी घरी जाऊन बाळाला जन्म देऊन येते, मग तू मला मार". पारधी तिला सोडतो आणि दुसर्‍या शिकारीची वाट पाहत बसतो. वेळ जावा म्हणून शिव शिव म्हणत झाडाची पाने तोडून खाली टाकत असतो.
पुन्हा एक हरिणी येते, तिला पारधी मारणार तोच ती "मी घरी जाऊन बाळांना दूध पाजवून येते मग तू मला मार" असे सांगून निघून जाते.
नंतर हरिण येते ते सांगते "मला माझ्या कुटुंबाला शेवटचे भेटून येऊ दे, मग तू मला मार", यानंतर अजुन एक हरिण येते ते पण असेच काही कारण देऊन निघून जाते.

परंतू पहाटे हे चारही मृग दिलेल्या वचनानुसार शिकार्‍याजवळ येतात. आधी मला मार, ह्याला सोड कारण (तिला नवजात बाळ आहे/ कुटुंबातला प्रमुख आहे/लहान दुध पिती मुले आहेत वगैरे) शिकारीदेखील प्राण्यांमधला धर्म पाहून गहिवरतो आणि हातातून बाण दूर फेकतो.

तो दिवस महाशिवरात्रीचा असतो. दिवसभर आणि रात्रीसुद्धा काहीही न खाल्ल्याने शिकार्‍याला उपास घडलेला असतो, शिवाय रात्रभर शिकारीसाठी जागरण, विरंगुळा म्हणून शिवशिव म्हणत टाकलेली पाने खाली शिवलिंगावर पडलेली असतात. नकळत का होईना पण महाशिवरात्रीचे व्रत झाल्याने शिकार्‍याला कैलासातून विमान येते.

हा शिकारी म्हणजे व्याध तारा, हे चार मृग म्हणजे मृग नक्षत्राचे ४ तारे आणि व्याधाचा बाण म्हणजे बेल्ट ऑफ ओरायन.

लाल गेंडा's picture

15 Sep 2017 - 4:18 pm | लाल गेंडा

हि कथा माहीत नव्हती बुआ , धन्यवाद !!!

धन्यवाद , डॉ सुहास म्हात्रे ! आपण चांगली माहिती दिली फोटो अपलोड करण्याविषयी.
एक फोटो अपलोड करत आहे , मला तर तो दिसत नाहीये. फक्त लिंक ऍड्रेस दिसत आहे. त्यावर तो लांबी व रुंदी विचारत आहे. १:१ असे' बाय डिफॉल्ट' घेत नाही असे दिसतंय . बघू ,'ट्रायल अँड एरर' जमायला लागेल असे वाटते.
शलभ, आभारी आहे.
लाल गेंडा , परिंदा , तुम्ही दंतकथा व पुराणातील चांगली नवीन माहिती देत आहेत.

निरभ्र आकाशात कृत्तिकेमध्ये किती तारे दिसतात याची पैज लागते आकाश दर्शनाच्या सत्रात. कोणाला 5, कोणाला 7 तर कोणाला 11 दिसतात. पण खरं 9 तारे आहेत.
-- ह्यातील ७ हा आकडा प्रामुख्याने प्रसिद्ध आहे. याला 'Pleiades' / Seven Sisters / M-४५ अश्या वेगवेळ्या नावांनी संबोधतात.

https://photos.google.com/share/AF1QipM4hj3-usUtYOpYFWDQoE95NXHhRDO0i-pX...

लाल गेंडा's picture

15 Sep 2017 - 4:18 pm | लाल गेंडा

मान्य , अंक चुकले माझे लिहिताना, धन्यवाद !

ओरायन's picture

16 Sep 2017 - 12:31 am | ओरायन

लाल गेंडा, आपण देत असलेली माहिती योग्चच आहे. मला त्यात चुकीचे काही वाटत नाही.मी केवळ सेव्हन सिस्टर या प्रचलित नावाने ७ या आकड्याचे महत्व सांगितले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Sep 2017 - 9:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा पहा, तुम्ही दिलेला दुवा वापरून टाकलेले तुमचे चित्र... छान दिसते आहे. width="300" टाकली आहे आणि height रिकामी ठेवली आहे.

उंची व रुंदी ही पिक्सेलमधे टाकायची असते... त्याचे एकमेकाशी (१ : १) प्रमाण नव्हे.

चित्रासाठी उत्तम उंची अथवा रुंदी कशी निवडायची त्याचे तपशील वर दिलेल्या दुव्यात आहेत.

खरे म्हणजे मला वाटले होते की मिपावर चिञ जोडतांना ( आपण सर्व काहीतरी वेगळा शब्द वापरता, चिञ डकवणे? असो, होप, मला पण हळुहळु मिपाची परिभाषा येईल.)ते आहे त्या आकारात बाय डिफाल्ट घेईल. बादवे, आपल्या चिञ आकार माहितीबद्दल ,डॉ.सुहास म्हाञे यांचे आभार.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Sep 2017 - 10:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

चित्रासाठी उत्तम उंची अथवा रुंदी कशी निवडायची

लेखात चित्राचा योग्य आकार ठरवताना अगोदरच्या एका प्रतिसादात दिलेल्या मिपावर चित्रे टाकण्याची कृती या दुव्यातल्या ५ ते ७ व्या परिच्छेदांत दिलेली कृती वापरा...

५. दिसू लागलेल्या Insert/edit image टेक्ट बॉक्स मध्ये खालीलप्रमाणे माहिती भरा:

......अ) Insert Image मध्ये वर कॉपी केलेली युआर एल पेस्ट करा (Ctrl + V)

......आ) Width X Height: कोरे ठेवा.

......इ) Alternate Text: इथे तुम्हाला हवे ते चित्राचे नाव टाका अथवा फक्त एकदा स्पेसबार दाबून एक स्पेस टाका.

६. OK बटन दाबल्यावर टेक्ट बॉक्समध्ये त्या चित्राचा कोड दिसू लागेल.

७. चित्र "पूर्वपरिक्षण" करुन पहा :

......अ) चित्र लेखनाच्या चौकटीत योग्य जागी दिसत असल्यास टाकलेला कोड योग्य आहे.

......आ) चित्र लेखनचौकटीबाहेर जात असल्यास आणि/किंवा उजव्या बाजूच्या मिपासंबधीच्या माहितीवर आक्रमण करत असल्यास Width मध्ये ६६० ते ३०० यामधला एक पर्याय वापरून "पूर्वपरिक्षण" करुन पहा व योग्य तो पर्याय स्विकारा. सर्वसाधारणपणे आडव्या (लॅड्स्केप) चित्रांना ६०० ते ६६० व उभ्या (पोर्ट्रेट) चित्रांना ३०० ते ४५० Width योग्य होते.

......इ) Height नेहमीच कोरी ठेवा. मिपा तुम्ही स्विकारलेल्या Width ला योग्य ती Height वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवते. (अंदाजे Height टाकण्याच्या प्रयत्नात बहुदा चित्र वेडेवाकडे दिसते, तेव्हा ते टाळा.)

=======

अवांतर : t + r = त्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Sep 2017 - 10:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

तसेच...

आपण टाकलेले (प्रसिद्ध केलेले) चित्र मिपावर इतरांना दिसते आहे की नाही याची स्वतःच खात्री करण्यासाठी,

१. ज्या मूळ आप्लिकेशनमध्ये (उदा : गुगलफोटो) चित्रे आहेत त्या आप्लिकेशनमधून लॉगआऊट व्हा. गुगलफोटोच्या संदर्भात गुगलफोटो, जीमेल, गुगल+ यापैकी ज्यामध्ये लॉगइन केले आहे त्या सर्व आप्लिकेशनमधून लॉगआऊट होणे जरूर आहे.

२. त्यानंतर, तुमचे चित्र असलेले मिपाचे पान रिफ्रेश करा. (फारच सावधगिरी बाळगायची असेल तर तुमच्या धाग्यावरून दुसरा धाग्यावर जाऊन परत आपल्या धाग्यावर या.)

चित्र योग्य प्रकारे टाकले असेल तर चित्र दिसेल... अन्यथा चित्र न दिसता त्या जागी एरर मेसेज दिसेल. असा एरर मेसेज दिसला तर मात्र सर्वसाधारण हक्क असलेल्या सभासदाला स्वतः काही बदल करता येत नाही. अश्या परिस्थितीत...

अ) आपली चित्रे "पब्लिक शेअर" केली आहेत याची खात्री करा.
आणि नंतर
आ) साहित्य संपादक किंवा संपादकांची मदत घ्या.

ओरायन's picture

20 Sep 2017 - 9:43 am | ओरायन

समग्र व उपयुक्त माहिती. धन्यवाद डॉ सुहास म्हात्रे .

अमितदादा's picture

20 Sep 2017 - 12:00 pm | अमितदादा

तुमचे दोन्ही लेख वाचले। खूप माहिती मिळतेय अजून लिहा।