‘सलाफी’इझम – आक्रमक इस्लाम की तात्विक इस्लाम?

रणभोर's picture
रणभोर in काथ्याकूट
10 Sep 2017 - 6:27 pm
गाभा: 

२०१४ च्या जून मध्ये पूर्वीच्या इस्लामिक स्टेट नावाच्या एका संघटनेनी ‘अबू बक्र अल-बगदादी’ याच्या नेतृत्वाखाली इराक आणि सीरियाच्या मोठ्या प्रदेशावर खिलाफत स्थापन केली. सुरवातीच्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी अमेरिकी शास्त्रांच्या आधारे विजयसुद्धा मिळवले. जगातली दोन मोठ्या खनिज तेलाच्या विहिरी त्यांच्या ताब्यात होत्या. मोठ्या प्रमाणावर बिगर मुसलमानांच्या कत्तली, धर्मांतरं, बलात्कार त्यांनी केले. ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरीया’ने स्थापन केलेली खिलाफत हा जगासमोरचा एक मोठा प्रश्न बनला होता. आता अमेरिका, सिरीया, तुर्कस्तान, रशिया आणि अन्य देशांच्या मदतीने आयसीसचा प्रभाव कमी करत करत ती खिलाफत नष्ट करण्याचे प्रयन्त यशस्वी होताना दिसत आहेत. ती आनंदाचीच गोष्ट आहे. पण अल कायदा किंवा आयसीसच्या पूर्वीच्या अतिरेकी संघटना आणि आयसीस यातला एक मुख्य फरक असा आहे की, आयसीसला अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी इराक सिरीया मधून प्रशिक्षित झालेला दहशतवादी अमेरिकेत पाठवावा लागत नाही. अमेरिकेतलाच एक माणूस गोळीबार करतो, खून पडतो आणि त्याची जबाबदारी आयसीस स्वीकारते. युरोपात झालेले अनेक हल्ले हेच सांगतात. आयसीसचा खूप मोठा धोका युरोपीय आणि अमेरिकन पत्रकार आणि अभ्यासकांनी ओळखला आणि त्यांचा अभ्यास सुरु झाला. नियतकालिकातून लेख सुरु झाले, शेकड्यांनी पुस्तकं प्रकाशित झाली. भारतात त्याबाबतीत उदासीनता होती.

जसा आयसीसच्या अर्थकारण, ब्रेनवॉशींग, इतिहास अशा अभ्यास सुरु झाला तेव्हाच आयसीसचे प्रेरणा स्थान नेमके काय आहे, असा सुद्धा अभ्यास सुरु झाला. अनेक नियतकालिकांनी, वृत्तपत्रांनी आयसीसचे मूळ सलाफी पंथात आहे असे दिले. अनेक अर्थानी ते योग्य आहे. पण ‘सलाफी’ म्हणजे काय हे सांगण्यात अनेकांनी घोडचूक केलेली आहे. यातून फॉरेन अफेअर्स सुद्धा सुटलेले नाहीत. त्यांच्याबरोबर न्यूयॉर्क टाईम्स, द इकोनॉमिस्ट पर्यंत सगळे फसलेले आहेत. आणि मी इतका मोठा क्लेम कश्याच्या आधारे करतो आहे हे पुढे मी सांगणार आहेच. त्यासाठी ‘सलाफी’इझम म्हणजे काय, सुरवात कुठे झाली इथपासून सर्व मी सांगणे गरजेचे आहे.

‘सलाफी’म्हणेज मूळ शांततावादी इस्लामचा चुकीचा अन्वयार्थ लावलेला आक्रमक आणि जिहादी पंथ इतकी ‘सलाफीइझम’ ची बोळवण अनेकांनी केली आहे. सलाफीइझमच्या थोडंस खोलात शिरून विचार करणे गरजेचे आहे. ‘सलाफ’ या मूळ अरेबिक शब्दाचा अर्थ ‘अनुयानी’ किंवा ‘सहकारी’ असा होतो. ‘सलाफ’ हा प्रेषित मुहंमद पैगंबर यांच्या हादीसमध्ये अनेकदा येतो. अर्थात तो थेट ‘सलाफ’ असा शब्द असेल असे नाही. ‘सलाफ’ हा शब्द हादीसमध्ये प्रेषित पैगंबरयांचे ‘अनुयायी’ किंवा ‘सहकारी’ या अर्थाने वापरला गेला आहे. असे सहकारी ज्यांना प्रेशितांबरोबर वावरण्याची संधी मिळाली होती, प्रेशितांबरोबर बोलण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे प्रेषित पैगंबर यांच्यानंतर इस्लामचे आकलन त्यांचे अचूक असले पाहिजे असे गृहीत धरले आहे. प्रेषितांनी सुद्धा एका हादीसमध्ये असे सांगितले आहे कि, माझ्या पिढीची माणसं ही बेस्ट आहेत, त्यांच्यानंतर येणारी पिढी ही तितकीच बेस्ट आहे, आणि त्यानंतर येणारी पिढी’सुद्धा. सहिह बुखारी (हादीस क्रमांक – ६४२९, २६५२) यांनी दोन ठिकाणी हे हादीस नोंदवलं आहे. प्रेषित ज्या पिढीचे होते ती पिढी धरून येणाऱ्या तीन पिढ्या ही पृथ्वीवरची बेस्ट ‘सर्वोत्कृष्ट’ माणसं असणार आहेत असं प्रेषितांनी नोंदवून ठेवलं आहे. (The best people are those of my century (generation), and then those who will come after them [the next century (generation)], and then those who will come after them [i.e., the next century) (generation)) (हे ते मूळ हादिस मधील वाक्य आहे) या तीन पिढ्यांच्या माणसांना ‘सलाफ’ म्हणतात. शिवाय सलाफ म्हणजे अनुयायी असा प्रेषितांच्या तोंडून झालेला उच्चार सुद्धा सहिह बुखारी यांनीच नोंदवून ठेवला आहे. बुखारी यांनी नोंदवलेलं हादीस (क्रमांक – ६२८५ आणि ६२८६) त्यात प्रेषित म्हणतात ‘So, be afraid of Allah, and be patient, for I am the best predecessor (salaf) for you (in the Hereafter).

थेट ‘सलाफ’ या शब्दाशिवाय सुद्धा अनेक ठिकाणी या अर्थाने हा शब्द वापरला गेला आहे, असे इस्लामी पंडित सांगतात. त्याचे संदर्भ हे हादीस मध्येच सापडतात. सुन्नी मुसलमान हे हादिस सर्वात पवित्र मानतात असे एकूण सहा संकलक आहेत. ज्यांनी प्रेषितांच्या कृती आणि उक्ती अतिशय परिश्रमपूर्वक गोळा केल्या आणि त्यांचे संकलन केले. त्यामध्ये सहिह बुखारी, सहीह मुस्लीम, अबू दावूद, जमी अत-त्रीमिधी, इब्न मजह आणि सुन्ना अन निसाई. या सहांपैकी जमी अत-त्रीमिधी आणि इब्न मजह यांनी नोंदवलेले काही हादीस मुद्दाम वाचण्यासारखे आहेत. प्रेषित मुहंमद सांगतात कि, ‘ज्यू धर्मात पुढे ७१ पंथ पडले, तसेच ख्रिश्चनांनमध्ये ७२ पंथ पडले. तसेच इस्लाममध्ये सुद्धा ७३ पंथ पडणार आहे’ (जमी अत-त्रीमिधी हादीस क्रमांक – २६४०) पण याबद्दल केवळ या एकमेव हादीस वाचून आकलन होणार नाही. इब्न मजह यांनी या प्रकारचे दोन हादीस नोंदवलेले आहे (क्रमांक – ३९९१ आणि ३९९२) त्यात प्रेषित सांगतात, ‘ज्यू धर्मात पुढे ७१ पंथ पडले, तसेच ख्रिश्चनांनमध्ये ७२ पंथ पडले. तसेच इस्लाममध्ये सुद्धा ७३ पंथ पडणार आहेत. त्यापैकी ७२ पंथाचे लोक नरकात जातील. अर्थात ते तिथे (नरकात) कायम राहणार नाहीत. पण एकच पंथ प्रेषितांच्या बरोबर थेट स्वर्गात जाईल’ इतर ७२ पंथाचे लोक नरकात जाऊन यातना भोगून पापक्षालन झाल्यानंतर स्वर्गात जातील. जो एक पंथ थेट स्वर्गात जाईल त्याला हादीस मध्ये ‘the main body’ ऑफ इस्लाम असे म्हणलेले आहे. अनेक इस्लामी पंडित एकमताने या ‘the main body’ ऑफ इस्लाम’ चा अर्थ ‘सलाफ’ असा लावतात.

‘सलाफी’ हा इझम होण्याची कारणं मात्र वेगळी आहेत. इसविसन १२५८ मध्ये मंगोल टोळ्यांनी बगदाद येथे असलेली अब्बासी खिलाफत नष्ट केली. त्याच्या पाच वर्षानंतर आताच्या तुर्कस्तानच्या दक्षिण टोकाचे गाव हर्रान येथे जन्म झाला ‘इब्न तामिया’याचा. शरियाचे अन्वयार्थ लावणाऱ्या ज्या चार परंपरा आहे त्यापैकी एक हंबाली पंथाचा हा एक मोठा विचारवंत होऊन गेला. मंगोल टोळ्यांमुळे इस्लामी राज्याची नासधूस झाली होती. आणि पुन्हा एकदा इस्लामच्या आदर्श तत्वावर राज्य उभे करायचे असल्यास काय केले पाहिजे, याचा विचार करून त्याने काही मार्गदर्शक तत्व मांडून दिली. ती साधारणपणे ‘कुराण आणि हादिस’ चा शब्दशः अन्वयार्थ लावण्याची पद्धत होती. आणि आदर्श इस्लामी राज्य म्हणजे जे प्रेषितांनी निर्माण केलं, शरियतनुसार चालणारं, हादीस आणि कुराण नुसार चालणारे राज्य हेच खरं इस्लामी राज्य हा साधा विचार त्याने मांडला. त्याच्या विचारात कुठेही ‘सलाफीइझम’ असा शब्द नाही. पण आधुनिक मुस्लीम पंडित ‘इब्न तामिया’ला सलाफीइझमचा प्रणेता मानतात. ‘सलाफ’ हा शब्द राजकीय चळवळीच्या दृष्टीनी प्रथम पॅन इस्लामी चळवळीचा प्रणेता ‘जमाल उद दीन अफगाणी’ याचा शिष्य ‘मुहंमद अब्दूह’ याने वापरला. पण हादीस मध्ये आणि इस्लामी प्रार्थमिक साहित्यात हा शब्द आधीपासून दिसतोच. इब्न तामिया याने लिहिलेल्या ‘मजमू अल फतवा’ या ग्रंथात तो लिहितो, ‘सलाफी धर्म तुम्ही निवडलात तर कोणीही तुमच्यावर टीका करणार नाही, कारण तो धर्म उद्दात्त धेय्यासाठी असेल. सलाफी धर्म हा सत्याशिवाय (मूळ इस्लामच्या संदेशापेक्षा) वेगळा असा नाहीच आहे.’ मुहंमद बीन अब्दुल वहाब लिहितो, ‘We are, and praise be to Allaah, followers and not innovators. We are followers of the Book and Sunnah and of the Righteous Salaf of this Ummah’

‘सलाफीइझम’ म्हणजे प्रेषित पैगंबर, कुराण, हादीस आणि प्रेषितांचे जवळचे सहकारी यांच्या तत्त्वांनुसार राज्य चालावे असा आग्रह धरणारी राजकीय चळवळ आहे. ‘इब्न तामिया’ याला सलाफीइझमचा प्रणेता मानतात. परंतु त्याची तात्विक मांडणी केली आहे अठराव्या शतकातील इस्लामी धर्मसुधारक ‘मुहंमद बीन अब्दुल वहाब’. त्याची मांडणी वेगळी नाही, इब्न तामियाप्रमाणेच त्याने मांडणी केली आहे. आज ज्याला वहाबीइझम म्हणून ओळखले जाते त्याची सुरवात या मुहंमद बीन अब्दुल वहाब’ याने केलेली आहे. आज ज्याला वहाबीझम म्हणले जाते त्यात आणि सलाफीझम म्हंटले जाते त्यात फारसा फरक नाही. या वहाबनेच ‘मुहंमद बीन सौद’ याच्या बरोबरीने पहिल्या सौदी स्टेटची स्थापना केली होती. मुहंमद बीन सौद हाच पहिल्या सौदी राज्याचा राजा बनला. सौदी अरेबियाच्या सर्व धार्मिक मांडणीमागे सर्व तात्विक पाठबळ मुहंमद बीन अब्दुल वहाब’ याचे आहे.

मी सुरवातीला सांगितले की ‘सलाफी’ म्हणेज नेमकं काय हे समजावून सांगण्यात सर्व मोठी नियतकालिकं फसलेली आहेत. ते सांगतात की, सलाफी हे इस्लामचे विकृत आक्रमक स्वरूप आहे. पण तुम्ही इब्न तामिया, मुहंमद हयात इब्न इब्राहीम अल सिंधी, इब्न अल कयीमीन, मुहंमद बीन अब्दुल वहाब हे सलाफी किंवा वहाबी पंथाचे संस्थापक लोकं आहेत. त्यांची मांडणी बघा, आदर्श इस्लामी राज्य हे प्रेषितांचे हादीस, कुराण, आणि प्रेषितांचे सहकारी (सलाफ) यांच्यानुसार चालणारे असेल अशीच मांडणी ते करतात. सगळेच बिगर इस्लामी पंडित सुद्धा हीच मांडणी करतात. ही चुकीची मांडणी आहे असं मला वाटत. सर्व नियतकालिकं ‘सलाफी’ इस्लामवर टीका करताना हे विसरतात कि प्रेषित स्वतःला सलाफ म्हणवून घेत असत. त्यामुळे अनेक अर्थांनी ‘सलाफीइझम’ ही संकल्पना आधुनिक काळाचं आपत्य आहे असं समजण्याचं कारण नाही.

फ्रंटलाईन सारख्या आघाडीच्या आणि प्रतिष्ठित मध्यमानेसुद्धा ‘सलाफ’ या शब्दाचा अर्थ ‘the ancient one’ असा लिहिलेला आहे. याचे अर्थ दोन होतात. एक अरबी लिपी आणि भाषा यांचे आकलन चुकलेलं आहे, किंवा ‘सलाफ’ ही संकल्पना फक्त अल कायदा आणि तत्सम इस्लामी दहशतवादी संघटना यांचा अभ्यास करून त्यांनी अभ्यासलेली आहे. एका मर्यादित दृष्टीने अभ्यास केल्यामुळे ही आकालानातली मर्यादा अनेक माध्यमांना पडलेली आहे. एक असा अभ्यासाचा नवा मार्ग विचारात घेता येऊ शकतो का, असा मला प्रश्न विचारायचा आहे. की इस्लामचा अभ्यास करताना प्रत्येक संकल्पनेला इस्लामी धर्मशास्त्रात आधार आहे का, हे पहिले पाहिजे. म्हणजे अभ्यासाचे एकाच वेळी दोन मार्ग समोर येतात. एक आज मुसलमान लोक कसे वागतात आणि दोन धर्म त्याबद्दल काय सांगतो. ‘सलाफ’चेच उदाहरण आपण घेऊ. आज सलाफी म्हणून आपण ज्याला ओळखतो त्याला धर्मात काही आधार आहे का? याचं उत्तर वरच्या परिच्छेदात दिलेलं आहे. आता ‘सलाफ’ या बद्दल लोकं काय विचार करतात. या पैकी ‘लोकं’ कसा विचार करतात याची अनेक अर्थानी उत्तरं फ्रंटलाईन, फॉरेन अफेअर्स, द इकॉनॉमिस्ट, न्यूयॉर्क टाईम्स सारख्या दर्जेदार माध्यमांनी दिलेली आहेत. त्या विशिष्ट संकल्पनेला धर्मात आधार आहे का, याचा आता शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे असं मला वाटत.

सलाफीझम, वहाबीझम यांच्या तात्विक मांडणीत आणि आदर्श इस्लामी राज्याच्या तात्विक मांडणीत फरक आहे का? असला तर काय आहे, असा एकदा विचार करून बघा .. इथे वहाबीझम आणि सलाफीझम म्हणजे लोकं कशी मांडणी करतात असा अर्थ अभिप्रेत आहे. त्याच्याबरोबर आदर्श इस्लामी राज्य म्हणजे धर्माची मांडणी कशी आहे असा अर्थ अभिप्रेत आहे.

- मुकुल रणभोर ©
- mukulranbhor.blogspot.in
- http://aksharmaifal.com/

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

10 Sep 2017 - 7:18 pm | गामा पैलवान

रणभोर,

लेख आवडला. माहितीपूर्ण आहे.

एक प्रश्न मला नेहमी पडंत आलेला आहे. तो म्हणजे इस्लामी राज्य म्हणजे नेमके काय. इस्लामची निर्मिती राज्य चालवण्यासाठी झालेली नाही. ती साधना करून स्वर्गात जाण्यासाठी झालेली आहे. त्यामुळे इस्लामिक स्टेट ही पूर्णपणे निरर्थक संकल्पना आहे.

भले महामद प्रेषितांना अपेक्षित पद्धतीने राज्य चालवलं तरी त्यात इस्लामी काहीही नसणारे. फारतर ते इस्लामानुकूल राज्य असू शकेल. राजनीती व प्रशासन ( = डिप्लोमसी अँड स्टेटक्राफ्ट) हा इस्लामचा गड कधीच नव्हता. त्यामुळे इस्लामिक राज्याच्या नावाखाली कोणीही काहीही ठोकून देतो आणि लोकांना ते खरं वाटतं.

आज इस्लामिक राज्यात मुस्लिमांनी कसं वागावं यावर फारशी चर्चा नाही. याचं कारण म्हणजे महामद प्रेषितांच्या काळी जन्मास आलेली मदिनेची सनद होय. हिच्यात मारामारी थांबवून सलोखा निर्माण करायच्या सूचना आहेत. या सनदेतलं सर्वात महत्त्वाचं कलम म्हणजे महामद प्रेषित हे सर्व निवाड्यांचे लवाद (वा न्यायाधीश) असून त्यांचा निवडा अंतिम व सर्वांवर बंधनकारक असेल.

इथवर ठीक आहे. आता समस्या अशी आहे की प्रेषित महामदांनी स्वत:च सांगितलंय की माझी पहिली पिढी ते माझ्यापासून तिसऱ्या पिढीपर्यंत सर्वोत्तम मुस्लिम जन्मास येतील. याचा साधा सोपा अर्थ असा की नंतरच्या पिढ्यांत कोणी लायक न्यायाधीश नसेल. ही मादिनेच्या सनदेची मृत्युघंटाच नव्हे काय? इस्लामिक राज्य हेही यामुळेच निरर्थक ठरतं.

आ.न.,
-गा.पै.

आनन्दा's picture

11 Sep 2017 - 8:08 am | आनन्दा

इस्लामची निर्मिती राज्य चालवण्यासाठी झालेली नाही. ती साधना करून स्वर्गात जाण्यासाठी झालेली आहे.

या वाक्यातच विरोधाभास आहे असे वाटते... इतर सर्व पंथांमध्ये राजसत्ता आणि धर्मसत्ता वेगळ्या असणे शक्य असेल, पण इस्लामसारख्या पंथामध्ये जिथे प्रेषिताने स्वतःच लढाया करून, जिंकून, हरून दाखवल्या तिथे यात राजकारण आणि धर्मकारण वेगळे असते असे म्हणण्यात काय अर्थ आहे?
माझ्याकडे संदर्भ नाहीत, पण इस्लामच्या श्रुती/स्म्रुती म्हणजे कुराण हदीस आणि शरिया यामधील बर्‍याच गोष्टी स्वतः पैगंबर राजासदृश पदावर असताना केलेले निवाडे आहेत.
कदाचित तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा असेल की इस्लाममध्ये इस्लामचे राज्य स्थापन करणे हीच साधना आहे आणि तोच स्वर्गात जायचा मार्ग आहे. तसे असेल तर ते मात्र खरे.

माहितगार's picture

10 Sep 2017 - 7:52 pm | माहितगार

...त्या विशिष्ट संकल्पनेला धर्मात आधार आहे का...

असला तर काय आणि नसला तर काय ?

आनन्दा's picture

11 Sep 2017 - 8:53 am | आनन्दा

सलाफीझम, वहाबीझम यांच्या तात्विक मांडणीत आणि आदर्श इस्लामी राज्याच्या तात्विक मांडणीत फरक आहे का?

इस्लामच्या मूळ मांडणीतच जर दारुल इस्लाम, दारुल हब वगैरे संकल्पना असतील तर मग तो पंथ वहाबी आहे की सलाफी आहे याने काय फरक पडतो? इस्लाममध्ये सूफी सोडल्यास दुसरा मवाळ पंथ माझ्या वाचनात नाही.

मुळात आदर्श इस्लामी राज्य म्हणजे काय? इस्लामी "आदर्श राज्य" की "आदर्श इस्लामी" राज्य? या दोन्ही वेगळ्या कल्पना आहेत. आदर्श राज्य कल्याणकारी असते, त्यामध्ये ते कोणत्या धर्माचे आहे याचा फारसा संबंध नसतो. तर "आदर्श इस्लामी" राज्य हे इस्लामच्या मूलभूत संकल्पना अंमलात आणण्याचा प्रयत्न करणारे राज्य असते. मुळात ज्या धर्मात न्यायशास्त्राच्या दृष्टीने देखील पैगंबराचा शब्दच अंतिम मानला जातो, आणि ज्या धर्माच्या दैनंदिन व्यवहाराच्या बाबतीत देखील पैगंबराने अपरिवर्तनीय नियम घालून दिलेले आहेत (पर्सनल लॉ) तिथे प्रश्न फक्त लोक त्या नियमांचा अर्थ कसा लावतात हाच असतो.

तसे म्हटले तर प्रत्येक धर्मात त्यांच्या धर्मग्रंथांचे सोयिस्कर अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जातोच, पण अब्राहमिक धर्मांमध्ये ज्याप्रमाणे प्रेषिताचे वाक्य म्हणजे अंतिम शब्द मानले जाते त्याप्रमाणे इतर धर्मांमध्ये मानले जात नाही, आणि हाच मूलभूत फरक आहे. आता आपण वर म्हटल्याप्रमाणे इस्लाममध्ये ७३ पंथ होतील असे प्रेषिताने सांगितले, त्यातले ७२ नरकात आणि ७३ वा स्वर्गात जाईल अशी मांडणी आहे. जर थोडी शोधाशोध केली तर नक्कीच असे दिसेल की प्रत्येक पंथाचे तत्वज्ञान आपण ते ७३ वे आहोत याच गृहितकावर आधारलेले असेल. आणि प्रत्येक पंथ असेच म्हणेल की आपणच खरे प्रेषिताचे वारसदार आहोत.

मुळात प्रश्न इस्लाम ज्या परिस्थितीत निर्माण झाला त्या परिस्थितीत आहे. सततचे युध्यमान जीवन, कोणतेही नियम नसलेले आयुष्य आणि अत्यंत अनिश्चित असलेले भविष्य या काळात एक स्थिर समाजाची उभारणी करण्याच्या दिशेने प्रेषिताने मार्गक्रमणा केली. कदाचित त्या काळाला अनुसरून अनुयायी मिळवण्यासाठी त्याला स्वतःला प्रेषित म्हणून जाहीर करावे लागले असेल, पण मुळात परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे अनेक ठिकाणी त्याला वेगवेगळे, प्रसंगी विरोधाभासी नियम करावे लागले. (भगवान श्री़कृष्णाच्या आयुष्यात देखील असा विरोधाभास आपल्याला आढळून येईल, पण मांडणी वेगळी असल्यामुळे गीतेचे रूपांतर कुराणात झाले नाही. असो)
तर विषय असा आहे, की तत्कालीन परिस्थिती विचारात घेता मुळात ३-४ पिढ्यांच्या पुढे विचार करणेच अस्थानी होते, किंबहुना आपण पुढची लढाई कशी जिंकायची हाच तेव्हाचा मुख्य प्रश्न असावा. आणि लढाई हरलो तर हा आपण उभा केलेला स्थिर समाज नष्ट होइल ही भीती असणारच, त्यामुळे अधिकाधिक लोकांनी युध्यमान रहावे यासाठी इस्लामचे राज्य ही संकल्पना आली. (आठवा "हतो वा प्राप्यसि स्वर्गं").

मग प्रश्न कुठे निर्माण झाला?
एकदा आपण प्रेषित म्हणून जाहीर केल्यानंतर त्याच्या प्रत्येक कृतीला दैवी स्पर्श झाला. तो होणे साहजिकच होते... पण त्यात माझ्या नंतर दुसरा प्रेषित होनार नाही, आणि माझे प्रत्येक वाक्य म्हण्जे साक्षात ईश्वराचा शब्द, ही पाचर ठरली. त्याने कोणत्याही पंथाला असलेले परिवर्तनीय स्वरूप काढून इस्लामला गोळीबंद धर्म बनवले. असा एक धर्म की जो प्रेषिताबाहेर जऊ शकत नाही.

आता या पार्श्वभूमीवर विचार केला, तर इस्लाममध्ये किंवा पैगंबराच्या अनुयायांमध्ये जो क्रूरपणा दिसतो तो कदाचित त्या काळाच्या कसोटीवर मवाळपणा देखील असेल. (रेफरन्ससाठी समकालीन मनुस्मृती घ्या, किंवा शैव वैष्णव वाद घ्या, आणि शंकराचार्यांनी काढलेला मध्यममार्ग घ्या). परंतु इस्लामच्या गोळीबंद स्वरूपामुळे त्यामध्ये कालानुरूप बदल होणे अशक्य झाले. आणि शिक्षणाच्या अभावामुळे वेगळा विचार करणे देखील थांबले. त्यामुळे ते अजूनदेखील एका मध्ययुगीन समाजजीवनाची स्वप्न पाहत आहेत.

आता मुख्य प्रश्न - वहाबी भ्या किंवा सलाफी घ्या, कोणताही पंथ जेव्हढा मूळ इस्लामच्या जवळ जायचा प्रयत्न करेल तेव्हढा तो अधिकाधिक मध्ययुगीन कांळात जायला लागेल. त्यामुळे तो आजच्या काळाच्या कसोटीवर क्रूर वाटणारच. त्यामुळे सलाफी किंवा कोणताही पंथ घेतलात तरी त्याच्या आदर्श राज्याच्या कल्पना फार वेगळ्या असणार नाहीत. मुळात तुम्हीच वर म्हटल्याप्रमाणे

हादीस आणि कुराण नुसार चालणारे राज्य हेच खरं इस्लामी राज्य हा साधा विचार त्याने मांडला.

त्यांच्याकडे ऑपरेशनल मॅन्युअल आहे आणि हाच प्रोब्लेम आहे. त्यांचा विश्वास फिलॉसोफीपेक्षा लिखित मॅन्युअल वर आहे. इब्न तामिया ने अल्लाला अपेक्षित राज्य असा शब्दप्रयोग मांडलेला नाही, तर कुराण-हदीसला अपेक्षित राज्य असेच मांडणी केलेली आहे. जोपर्यंत इस्लाम कुराण-हदीसच्या पलिकडे जाऊन त्यांच्या ईश्वराला समजून घेण्याचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत कोणतेही नवीन पंथ येऊन उपयोग नाही असे माझे मत आहे. आणि आपण हा जास्ती क्रूर आहे की तो जास्त क्रूर आहे यावर चर्चा करण्यात देखील काही अर्थ नाही. सगळे कमीअधिक प्रमाणात सारखेच मध्ययुगीन असणार. त्यामुळे पाश्चात्य वृत्तपत्रांच्या मांडणीत देखील तपशीलाची चूक असली तरी आशयाची चूक फारशी असेल असे वाटत नाही. तुमच्या लेखातूनदेखील अर्थात तसे जाणवत नाही.

असो, टंकाळा आला.

माहितगार's picture

11 Sep 2017 - 12:57 pm | माहितगार

इस्लाममध्ये सूफी सोडल्यास दुसरा मवाळ पंथ माझ्या वाचनात नाही.

आपण कदाचित हा गूगल शोध अभ्यासला नसल्यास विचार करावा.

दुसर्‍या बाजूला येमेन आणि सौदीच्या बेचक्यात ओमान नावाच्या देशात 'ईबादी' पंथ प्रोटेस्टंटाप्रमाणे अंतर्गत बाबतीत कदाचित अधिक कट्टर असावा पण बाहेरच्या धर्मीयांशी कदाचित इतरपंथीयांपेक्षा अधिक मवाळ. सोबतच पहावे ओमान मध्ये इस्लाम आणि फ्रिडम ऑफ रिलीजन इन ओमान (इंग्लिश विकिपीडिया दुवे)

बाकी धागा लेखकाने इस्लामच्या काही वेगळ्या बाजूंची अभ्यासपूर्ण माहिती दिली चर्चेसाठी प्रश्न मांडले तरी त्यांना त्यावरून काय निष्कर्ष अभिप्रेत आहे किंवा च्चर्चेचा उद्देश निटसा स्पष्ट किमान मला तरी झाला नाही. आणि चर्चेत ते स्वतः सहभागी होणार की नाही हेही अद्याप स्पष्ट नाही.

आनन्दा's picture

11 Sep 2017 - 8:47 pm | आनन्दा

हं.. आता ते बघणे आले.
बाकी धागाकर्ते का गायब झाले कळले नाही. एव्हढा लेख लिहिलाय, आणि कधी नव्हे त्या प्रामाणिक प्रतिक्रिया येतायत, पण चर्चा पुढे न्यायला धागाकर्तेच नाहीत.

सुबोध खरे's picture

11 Sep 2017 - 10:13 am | सुबोध खरे

तुम्ही त्याला सलाफी म्हणा नाही तर वहाबी.
वाघ म्हटलं तरी होतो आणि वाघोबा म्हटलं तरी खातो.
चर्चा आणि काथ्याकूटमध्ये निष्पन्न काहीही होणार नाही.
मुळात इस्लाम या शब्दाचा अर्थच "अल्लाच्या (मर्जी) पुढे समर्पण".
एकदा समर्पण केले कि त्यामध्ये वाद उरतोच कुठे?

वेशीवरचा म्हसोबा's picture

11 Sep 2017 - 10:34 am | वेशीवरचा म्हसोबा

धार्मिक रुढींच्या बाबततीत असलं काही मुळ धर्मात नाही हो, लोक अर्थाचा अनर्थ करतात अशी मखलाशी काही चलाख लोक नेहमी करतात.
मात्र कालपरवापर्यंत इतर धर्मांच्या बाबतीत होणारा प्रकार आता हिंदू धर्माच्या बाबतीततही होऊ लागला आहे. काय तर म्हणे सतीची प्रथा ही हिंदू धर्माचा भाग नसून स्वार्थी लोकांचे पतीपश्चात विधवेलाही संपवून तिची संपत्ती हडप करण्याचे कारस्थान असे.

आनन्दा's picture

13 Sep 2017 - 10:26 am | आनन्दा

हे थोडं अती होतंय..

प्रत्यक्षात हिंदू समाजात सतीप्रथेची कधीच सक्ती नव्हती. सती जाणे हे नेहमीच ऐच्छिक होते, किंबहुना ज्या स्त्रीवर संसाराची जबाबदारी आहे तिने सती जाण्याचा निषेध देखील केला गेला आहे. मराठीमधील गुरुचरित्रासारख्या सती प्रथेचे उदात्तीकरण करणार्‍या ग्रंथांमध्ये देखील सती जाणे बंधनकारक केलेले नाही. बाकीच्या गोष्टींचे सोडूनच द्या.
परंतु त्याचबरोबर सती प्रथा हिंदू धर्मात नव्हती असे म्हणणे देखील चुकीचे होते. सती हा हिंदू स्त्रियांसाठी नेहमीच एक पातिव्रत्याचा आदर्श होता. आणि सामान्य माणसे आदर्शांच्या आसपासदेखील जात नाहीत. त्यामुळे उच्च नैतिक अधिष्ठान वगैरे असणारे कदचित सती जात असतील, पण बालविवाह किंवा केशवपन या तुलनेत सतीप्रथा सौम्य होती.

कदाचित पुरोगाम्यांमधील समन्वयवादी मंडळींना असे वाटत असेल, कारण ब्राह्मणांना झोडायला हे बरे पडते, आणि ब्राह्मणांमधील नवपुरोगामी पण याला पटकन बळी पडतात, कारण त्यांच्या डोक्यावर त्या पापाचे ओझे पडत नाही, आणि आम्ही समाज म्हणून कसे सुसंस्कृत होतो हे सांगायला पण सोपे पडते. प्रत्यक्षात सर्व समाजांमध्ये कमी अधिक प्रमाणात अश्या गोष्टी होत्याच, त्यामुळे त्यांचा विपर्यास करून त्या नाकारण्यात काहीही अर्थ नाही.

गामा पैलवान's picture

11 Sep 2017 - 1:14 pm | गामा पैलवान

आनन्दा,

कदाचित तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा असेल की इस्लाममध्ये इस्लामचे राज्य स्थापन करणे हीच साधना आहे आणि तोच स्वर्गात जायचा मार्ग आहे. तसे असेल तर ते मात्र खरे.

माझं मत वेगळ्या शब्दांत स्पष्टपणे मांडतो.

इस्लाम म्हणजे साधना करून स्वर्गात जायचा मार्ग. याबद्दल कोणाचंच दुमत नाही. म्हणूनंच इस्लामचा लढायांशी आणि न्यायदानाशी थेट संबंध नाही. जरी प्रेषित महामदांना लवादकार्य व न्यायदान करावं लागलं, तरी ते इस्लामचं प्रमुख अंग नव्हे. कारण की जरी प्रेषित स्वत: लायक असले, तरी त्यांच्या नंतरची लोकं लायक नव्हती. नंतरची लोकं लायक नाहीत हे खुद्द प्रेषितांनीच सांगून ठेवलं आहे. त्यामुळे प्रेषित महामदांनी जरी तत्कालीन राज्य चालवलं असलं तरी आजच्या इस्लामचं ते काम नाही. बस एव्हढंच.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

11 Sep 2017 - 3:39 pm | माहितगार

इस्लाम म्हणजे साधना करून स्वर्गात जायचा मार्ग. याबद्दल कोणाचंच दुमत नाही.

'कोणाचंच' हा शब्द स्वतः एवजी अनवधानाने आलेला आहे का ? ईतर धर्मांचे धर्मगुरु आणि नास्तीक उपरोक्त गृहीतकाशी खरेच सहमत होतील असे वाटते का ? तसे झाले तर प्रश्नच मिटले.

ह.घ्या. छिद्रान्वेषणासाठी क्षमस्व

विशाखा पाटील's picture

11 Sep 2017 - 4:06 pm | विशाखा पाटील

सलाफीचा ‘ancient’ किंवा पूर्वज हा अर्थ लावला जातो, तो प्रेषित मुहंमद आणि त्यांच्या सुरुवातीच्या अनुयायांनी दिलेल्या शिकवणुकीनुसार चालणारा पंथ या अर्थाने. तसेच तो आक्रमक इस्लाम समजला जातो, कारण मध्ययुगीन काळातली व्यवस्था प्रस्थापित करण्याचा त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे धागालेखक म्हणतात तसा सरसकट चुकीचा अर्थ लावला जातोय असे वाटत नाही.
अरबस्तानात वहाब तसेच १९ व्या शतकाच्या शेवटी सैद जमलद्दीन अफगाणी यांनी सुरु केलेली चळवळ (अल मनार हे त्यांच्या विचारांचे प्रचार करणारे मासिक) आणि त्यातून २० व्या शतकाच्या सुरुवातीला इजिप्तमध्ये स्थापन झालेल्या मुस्लीम ब्रदरहूड संघटनेने सलाफी चळवळ पुढे चालू ठेवली. अल कैदा, किंवा अलीकडे उदयाला आलेल्या इसीससारख्या संघटना आपण सलाफी चळवळीचे पाईक असल्याचे सांगतात. शेवटी सर्वाना खलीफाचे राज्य आणायचे असते. नावात (संघटनांच्या) काय आहे...

गामा पैलवान's picture

11 Sep 2017 - 5:00 pm | गामा पैलवान

माहितगार,

'कोणाचंच' हा शब्द स्वतः एवजी अनवधानाने आलेला आहे का ? ईतर धर्मांचे धर्मगुरु आणि नास्तीक उपरोक्त गृहीतकाशी खरेच सहमत होतील असे वाटते का ? तसे झाले तर प्रश्नच मिटले.

प्रश्नाबद्दल धन्यवाद! हे छिद्रान्वेषण नाही. :-)

थोड्या वेगळ्या शब्दांत मांडलेलं वाक्य असं होईल : इस्लाम म्हणजे साधना करून स्वर्गात जायचा मार्ग, याबद्दल कोणत्याही मोमिनांत दुमत नाही.

आ.न.,
-गा.पै.

जेम्स वांड's picture

11 Sep 2017 - 8:58 pm | जेम्स वांड

तुमचे प्रतिसाद खूप आवडले, कुठलाही अभिनिवेष न बाळगता इस्लामबद्दल एक वस्तुनिष्ठ प्रतिसाद खूप दिवसांनंतर वाचला. ब्लॅक अँड व्हाइट पेक्षा असं मांडलं की मस्त वाटतं. तुम्ही लेखन कंटाळा सोडून ह्या विषयावर साद्यांत लिहावे ही विनंती.

धन्यवाद. पण इस्लाम हा माझ्या अभ्यासाचा विषय नाही, तस्मात पास. कदाचित अजून ५ वर्षांनी लिहू शकेन.

जेम्स वांड's picture

12 Sep 2017 - 4:16 pm | जेम्स वांड

इतकं तपशीलवार लिहूनही,तुम्हाला अजून ५ वर्षे लागतील असे म्हणत असाल तर तुम्ही 'अभ्यास कसा असावा' हा नवीन वस्तुपाठच घालून दिलात असे समजतो. भरपूर शुभेच्छा.

गामा पैलवान's picture

12 Sep 2017 - 5:57 pm | गामा पैलवान

वेशीवरच्या म्हसोबा,

काय तर म्हणे सतीची प्रथा ही हिंदू धर्माचा भाग नसून स्वार्थी लोकांचे पतीपश्चात विधवेलाही संपवून तिची संपत्ती हडप करण्याचे कारस्थान असे.

हिंदूंच्या कुठल्या ग्रंथात विधवेने चितागमन करावं म्हणून लिहिलंय? उगीच काहीतरी ठोकून देताय होय. ती सर्वधर्मसमभावाप्रमाणे ही सतीप्रथेची धोंडही हिंदूंच्या गळ्यात कशासाठी?

आ.न.,
-गा.पै.

विषयांतराला हातभारतर होत नाही ना ?

ऋग्वेदांत सती प्रथेचा उल्लेख आहे आणि महिलेने सती जाऊ नये असा स्पष्ट सल्ला ऋग्वेद त्या सतीला देतो. स्मरणशक्ती साथ देत असेल तर "मृत्यूचे विश्व सोडून आपल्या जिवंत लोकांच्या जीवनात ये" असा तो सल्ला आहे.

सती प्रथा हि मानवी इतिहासांत अगदी जुनी प्रथा आहे. इजिप्त पासून चीन पर्यंत सगळीकडे ह्या प्रथेचा उल्लेख आहे. भारत सुद्धा एक फार जुनी संस्कृती असल्याने काही जाती अश्या प्रथेचे पालन करत होत्या पण सती घटना नगण्यच होत्या.

माहितगार's picture

12 Sep 2017 - 9:03 pm | माहितगार

पॉपकॉर्न घेऊन बसावयास हरकत नाही आता !

अत्रुप्त आत्मा's picture

16 Sep 2017 - 4:29 pm | अत्रुप्त आत्मा

@

सलाफीझम, वहाबीझम यांच्या तात्विक मांडणीत आणि आदर्श इस्लामी राज्याच्या तात्विक मांडणीत फरक आहे का?

››› मी माझा फ्लॅट वन बी. एच. के आहे. /वन के. बी. एच. आहे/वन के. एच. बी आहे..,असं तीन निरनिराळ्या पद्धतीनं म्हणालो, तर जो फरक पडेल, तेव्हढाच फरक तुम्ही म्हणताय त्या मांडणीत राहिल.

आपण हाताळलेल्या विषयाची माहिती माझ्यासाठी पूर्णत: नवीन आहे. धन्यवाद! इस्लामचा ही पुढे मागे अभ्यास करण्याची इच्छा आहे. तुमच्या या लेखानिमित्ताने ती इच्छा पुन्हा जागी झाली. छान लिहिलेत. विस्तारपूर्वक आणि यासम विषयावर अधिक खोलवर माहिती आपल्याकडून होईल यासाठी सदिच्छा!