सेकंड लाईफ - भाग ७

अक्षरमित्र's picture
अक्षरमित्र in जनातलं, मनातलं
5 Sep 2017 - 1:55 pm

पुर्वीचे भाग :
सेकंड लाईफ
सेकंड लाईफ - भाग २
सेकंड लाईफ - भाग ३
सेकंड लाईफ - भाग ४
सेकंड लाईफ - भाग ५
सेकंड लाईफ - भाग ६
-------------------------------------------------------------------------------------------------

दुसर्‍या दिवशी सकाळी ऑफीसला गेलो. नेहमीची कामे चालू होती पण कलर प्रिंटरचा जुगाड होत नसल्यामुळे मी अस्वस्थ होतो. लंच टाईमनंतर मात्र अपेक्षित संधी चालून आली. आज नेमका एम.डी. साहेबांच्या ऑफीसच्या कलर प्रिंटरमधे कागद अडकला होता. आज आमच्या टीममधील प्रिंटर स्पेशालिस्ट आलेला नव्हता. आणि एम.डीं. च्या केबिनमधे जायची ज्युनियर पोरांची टाप नव्हती. त्यामुळे शेवटी माझ्याच गळ्यात तो कॉल पडला. 'उप्परवाला जब भी देता, देता कागज फाड के !' अशी नवकविता मनातल्या मनात रचून मी कॉल अटेंड करायला गेलो. प्रिंटरमधे एक कागद अडकून पडला होता. साहेबांनी त्याला जोर लावून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्या प्रयत्नात त्या कागदाचे अजुनच बारीक बारीक तुकडे होऊन रोलरमधे अडकले होते. मी थोडावेळ निरिक्षण करणे, कागदाचे तुकडे काढण्याचा अयशस्वी प्रयत्न करणे असे करुन वेळ घालवला. नंतर साहेबांना सांगीतले, 'सर, कागदाचे लहान लहान तुकडे अगदी आतपर्यंत गेलेत. प्रिंटर खोलावा लागेल. इथेच खोलला तर बराच वेळ लागेल शिवाय तुमच्या डेस्कवर शाई वगैरे पडेल. त्यापेक्षा मी ह्याला सर्विस डेस्कवर नेऊन व्यवस्थित काम करुन थोड्या वेळात परत घेऊन येतो. साहेबांनी मान डोलावल्यावर प्रिंटर माझ्या डेस्कवर घेऊन आलो. नंतर रोलर वगैरे खोलून कागदाचे कपटे काढले, टोनर स्वच्छ केले आणि कोलीन वगैरे मारुन प्रिंटर अगदी स्वच्छ करुन घेतला. एवढे करेपर्यंत ५ वाजत आले होते. एम.डीं. च्या पी.ए. ला फोन केला की प्रिंटर रेडी झाला आहे पण थोडा वेळ टेस्टींगसाठी ठेऊन घेतो. आता असेही ऑफीस सुटायचा टाईम झाला आहे. सकाळी सर यायच्या आत प्रिंटर आणून लावतो. पी.ए. ने होकार दिला. साधारण ६.३० पर्यंत सगळी मंडळी निघून गेली.

काल बरीच मेहनत करुन बनविलेली मार्क शीट प्रिंट करुन बघीतली. हुबेहुब झाली होती. मात्र तरी बारकाईने पाहिल्यास दोन तीन ठिकाणी अजुन सफाईदार कामाची आवश्यकता होती असे वाटल्याने परत थोडेसे काम करुन परत प्रिंट बघीतली. आता कुठे मनासारखी प्रिंट आली होती. नंतर अजुन अर्धा एक तास खपून एक वीज बिल, शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी कागद बनविले. नंतर त्यांच्या आणि वडगावच्या वास्तव्याच्या दाखल्याच्या झेरॉक्स काढल्या. आता दुसर्‍या अवतारकार्यासाठी बर्‍याच प्रमाणात तयारी झाली होती. मात्र ही सगळी थिअरी होती. प्रॅक्टीकल अजुन बाकी होते. आता कागदपत्रांची चाचणी घ्यायची वेळ आली होती. मात्र कागदपत्रांची चाचणी घ्यायची तर अधल्यामधल्या दिवशी घ्यावी लागणार होती. शनिवार रविवार ची वेळ त्यासाठी योग्य नव्हती. शेवटी शुक्रवार ची रजा टाकून मी पुढील प्रयोग करायचे ठरवले.

गुरुवारी रात्री पुन्हा घरी सांगून वडगावकडे जाणारी रातराणी पकडली. मात्र सकाळी वडगाव ला न उतरता , तालुक्याच्या ठिकाणी उतरलो. जनता सहकारी बँकेत गेलो आणि मला खाते एक बचत खाते उघडायचे आहे असे सांगीतले. तिथल्या कारकुनाने फॉर्म दिले भरायला. फॉर्म भरला, वडगावच्या वास्तव्याचा दाखला जोडला आणि पॅन नंबर द्यायच्या जागी फॉर्म ६० भरुन दिला. फॉर्मवर खाते उघडण्यासाठी बँकेच्या एखाद्या खातेदाराची शिफारस हवी होती. ती मिळणे अवघडच होते. त्यावर कारकुनाने खाते उघडावयास असमर्थता व्यक्त केली. मी मॅनेजरला भेटायचा आग्रह धरल्यावर त्याने मला कॅबिनचा रस्ता दाखवला. मॅनेजरला मी माझी अडचण सांगीतली आणि त्याने काही बोलायच्या आतच सांगीतले की मला ५ हजाराची एफ. डी. पण करायची आहे आणि लॉकर पण हवा आहे. ५ हजारच्या एफ.डी. चे नाव ऐकल्यावर मॅनेजरने आपले व्यावसायिक कौश्यल्य पणाला लावले, स्वतः शिफारसदाराच्या रकान्यात सही केली आणि फॉर्म ओके करुन दिला. वरुन चहा पण पाजला. तुमच्या भागात आमच्या कंपनीचे दोन-तीन प्रोजेक्ट येणार आहेत. तुमची सर्विस मला चांगली वाटली तर मी त्या प्रोजेक्टसाठीची खाती तुमच्याच बँकेत खोलायची शिफारस करेन असे देखील सांगीतले. यावर मॅनेजर साहेब एकदम खुश झाले. बचत खाते उघडले गेले. मात्र ५ हजार एफ डी मधे गुंतले. हरकत नाही. अशीही बचत होत नाहीच. ती या निमित्ताने होईल असा विचार करुन मी शांत राहिलो. बँकेच्या एका खात्यासरशी "दत्तु भाऊसाहेब पाटील' यांच्या जन्मावर शिक्कामोर्तब झाले होते. लॉकर मला पुढे बराच कामास येणार होता.

आपली सगळी नवी कागदपत्र या लॉकरमधे ठेवल्यामुळे मला सुरक्षितता लाभणार होती. आता पुढील योजना आखण्यास गती येणार होती. आता वडगावला न जाता इथेच एखादा लॉज बघावा आणि तपशीलांवर विचार करावा असे ठरवून मी शुक्रवार, शनिवार तालुक्याचे ठिकाण पाहणे, काही आराखडे ठरविणे यावर वेळ व्यतीत केला आणि रविवारी परत घरी आलो.

मधे परत तीन आठवड्यांचा वेळ गेला. आता परत एकदा वडगावची ट्रिप, बँकेत एखादे छोटे ट्रान्झॅक्शन करणे गरजेचे होते. न वापरली गेलेली खाती आणि जास्त देवघेव असलेली खाती बँकवाल्यांच्या डोळ्यावर येतात. त्यामुळे त्याची काळजी घेणे भाग होते. यावेळेस सोमवारची रजा टाकून मी पुन्हा तालुक्याच्या ठिकाणी गेलो. बँकेत ५०० रुपये जमा केले. लॉकरमधे काही वस्तू ठेवल्या. मॅनेजर साहेबांना सलाम करायला गेलो. आज सोमवार असला तरी शहराप्रमाणे इथे कामाचा जास्त ताण नव्हता. मॅनेजर देखिल गप्पा मारण्यास उत्सुक होते. कदाचित तो त्यांच्या व्यवसायाचा भाग असावा. इकडच्या तिकडच्या गप्पा केल्यावर मी त्यांना म्हणालो की मला इकडे कामासाठी वारंवार यावे लागणार आहे. त्यामुळे नेहमी लॉजवर उतरणे परवडणार नाही. तुम्ही इथे आजुबाजुला काही ओळख असेल तर एखादे घर भाड्याने मिळवून दिले तर फार मदत होईल. मॅनेजर साहेबांचाच एक मित्र हे काम करत असल्यामुळे त्यांनी तीन चार घरे दाखविण्याचे मान्य केले. मी परत २-३ आठवड्यांनी येऊन घर बघेन असे सांगून पुन्हा मुंबईस आलो.

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

5 Sep 2017 - 3:46 pm | योगी९००

आत्तापर्यंत प्रतिक्रिया दिली नव्हती. याच लेखाच्या शोधात होतो.

मस्त कथा आहे. थोडे मोठे भाग टाका. उत्सुकता फारच ताणली गेली आहे. पुढे काय काय तुम्ही करणार याचाच विचार करतोय.

अमरप्रेम's picture

5 Sep 2017 - 4:24 pm | अमरप्रेम

एकदम वर्षभराने ....

योगी९००'s picture

30 Nov 2018 - 9:22 am | योगी९००

एक छान उत्सुकता लावणार लेख ...पण सध्या अर्धवटच आहे.

श्वेता२४'s picture

30 Nov 2018 - 5:23 pm | श्वेता२४

टिचकी मारल्यावर मिपामुखपृष्ठावर जाते. त्यामुळे हा भाग वाचलाच नाही.