क्रॉस सबसिडी

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
5 Sep 2017 - 11:31 am

क्रॉस सबसिडी

काल सकाळी सकाळी एक रुग्ण आला होता. खाऊन पिऊन सुखी दिसत होता.गळयात, हातात सोन्याच्या साखळ्या. वय वर्षे २८. इकडे दुखतंय तिकडे दुखतंय. सोनोग्राफी केली तेंव्हा अति दारू पिण्यामुळे यकृतात चरबी भरलेली दिसत होती. आतड्याला सूज आलेली दिसली त्यांना सांगितले हे बाहेर खाण्यामुळे तुम्हाला अन्न विष बाधा झाली आहे. त्यावर ते म्हणाले अहो मी रोजच बाहेर खातो. (व्यवसायाने बिल्डर आहे. मुंबईत पनवेल मध्ये वडिलोपार्जित भरपूर मालमत्ता आहे. ) कुठे खाल्ल्यामुळे झाली ते सांगता येईल का? मी म्हणालो असं कसं सांगणार? बाकी काही नव्हतं.
जाताना विचारलं "कन्सेशन" किती? मी थंडपणे सांगितलं मी "कन्सेशन" देत नाही.

हा गेल्यावर दुसरी एक मुलगी आली. वय वर्ष २४. चेहरा पार सुकलेला आणि पोट मोठं झालेलं. हि एका डॉक्टरांकडे स्वागत सहायिका म्हणून काम करते. एक मोठी फाईल घेऊन आली होती. त्यात के इ एम रुग्णालयात चालू असलेल्या उपचारांचे बाड होते. काळजीपूर्वक वाचून काढले त्यात संधिवाताचा एक प्रकार (SLE systemic lupus erythematosus) यामुळे तिची मूत्रपिंडे काम करत नव्हती. सोनोग्राफीला घेतले तर यकृत आकुंचन पावलेले आणि पोटात भरपूर पाणी झालेलं.( लिव्हर सिऱ्होसिस). मूत्रपिंडे सुद्धा आकुंचन पावलेली. ओटीपोट पाहण्याअगोदर तिला विचारले लग्न झालंय का? ती उत्साहात म्हणाली लग्न ठरलंय. पोट सुजलंय ते कमी झालं कि लग्न करायचंय. मी काय बोलणार? तिला रिपोर्ट दिला. माझ्या स्वागत साहायिकेने सांगितलं कि ती काम करते त्या डॉक्टरांनी जास्तीत जास्त सवलत द्यायला सांगितली आहे. मी म्हणालो तिचे काहीच पैसे घेऊ नको. त्या मुलीने हसून धन्यवाद दिले मी हि हसून साजरे केले. यापेक्षा जास्त काय करू शकणार होतो मी.

यानंतरची रुग्ण. असेच पोटात पाणी झालेले. चेहरा त्रासलेला. तिच्याबरोबर तिची वहिनी आलेली. सोनोग्राफी सुरुवात करतानाच लक्षात आले कि हिला बीजांड कोषाचा कर्क रोग(ovarian cancer) आहे. मी विचारलं अगोदर काही उपचार केले आहेत का? यावर रुग्ण काहीच बोलली नाही. वहिनी म्हणाली अगोदरची फाईल आहे. फाईल पहिली. कर्करोगाचे निदान अगोदरच झालेले होते. मुंबईतील प्रथितयश डॉक्टरांचे अहवालही होते. दोन केमोथेरपीचे डोसहि झाले होते. पुढे काहीच नाही. मी सोनोग्राफी करता करता विचारलं कि पुढचे डोस का दिले नाहीत. वहिनीने खूण केली. मी गप्प बसलो.
बाहेर आल्यावर रुग्ण बाथरूम मध्ये गेली आहे हे बघून वहिनीला विचारले काय झाले. त्यावर त्या म्हणाल्या दोन केमोचे डोस झाल्यावर हिने तुम्ही "मला मारायलाच इथे आणलंय" म्हणून आरडा ओरडा सुरु केला. रुग्णाचे लग्न झालेले नव्हते. तिची नोकरी होती आणि वेगळी स्वतःच्या (वडिलोपार्जित) घरात राहत होती. भाऊ लग्न करून वेगळा राहत होता आणि दोन केमोचे डोस( मोठ्या रुग्णालयात व्यवस्थित इलाज चालू होता) झाल्यावर तुम्हाला वडिलांचे घर हवंय म्हणून "मला मारायला निघालात" असे तिने आरोप सुरु केले. त्यानंतर तिला मनोविकार तज्ज्ञांच्या सल्ल्याने ठाण्याच्या रुग्णालयात हलवले होते. पॅरानॉईड स्किझोफ्रेनिया आणि (परसिक्युटरी डिल्युजनल डिसऑर्डर) म्हणून निदान होऊन उपचार चालू होते. तीन महिन्यांनी सुधारल्यावर डिस्चार्ज मिळाला. सोनोग्राफी मध्ये रोग बळावलेला दिसत होता.वहिनीला तसे सांगितले. आता परत उपचार "कसे चालू करायचे" या विवंचनेत वहिनी होती. वहिनींना सांगितले कि घर बळकावण्यासाठी तुम्ही तिच्यावर उपचार करत आहात असे आरोप झाले तरी उपचार करावेच लागतील अन्यथा रोग फार लवकर हाताबाहेर जाईल. रुग्ण संशयाने आमच्याकडे पाहत होता आणि वहिनी हिचे उपचार कसे करायचे याच्या विवंचनेत.

चौथा रुग्ण वय वर्षे ३७. ऍक्युट पॅनक्रिऍटायटिस( स्वादुपिंडाला सूज आलेली). नाशिकला सिटी स्कॅन झाल्यावर स्वादुपिंडाला सूज आलेली समजली मुंबईत लीलावती रुग्णालयात दहा दिवस भरती होऊन रजा मिळाली होती आता १५ दिवसांनी सद्य स्थिती काय आहे हे समजण्यासाठी परत सोनोग्राफी सांगितलेली. रुग्णाची माहिती काढल्यावर दारूमुळे स्वादुपिंडाला सूज आलेली समजली.सोनोग्राफी करताना यकृताला सूज येऊन त्यात चरबी भरलेली दिसत होती. स्वादुपिंडाचे सूज कमी होत होती. रुग्ण खाऊन पिऊन सुखी. नाशिकला ८० एकर बागायती जमीन स्वतःचा ट्रान्स्पोर्टचा धंदा. त्याला स्पष्टपणे सांगितलॆ कि "परत दारू प्यायलात आणि स्वादुपिंडाचा दाह झाला तर त्यातून जिवंत बाहेर पडण्याची शक्यता फारतर ५० %.
परत दारु प्यायची असेल तर (माझ्या भिंतीवरील श्री गजाननाची मोठी तसबीर दाखवून) एवढा मोठा फोटो काढून ठेवा. केंव्हा भिंतीवर टांगायला लागेल सांगता येणार नाही.
रुग्ण मग सिगरेट प्यायलेली चालेल का? नॉनव्हेज खायचं कि नाही. मी म्हणाली सिगरेट प्यायलात तर स्वादुपिंडाची सूज उतरायला फार वेळ लागेल. नॉनव्हेज खायला हरकत नाही पण तेलकट आणि अति मसालेदार नको. तंदुरी सारखं भाजून थोडासा मसाला लावून चालेल. रुग्ण म्हणतो सर नॉनव्हेज खाल्ला कि सिगारेट प्यावीशी वाटते. मी परत फोटो कडे बोट दाखवलं आणि म्हणालो फोटो काढायची तयारी ठेवा.
जाताना रुग्ण विचारतो सर "कन्सेशन" नाही का?
काय बोलायचं? मी थंडपणे सांगितलं मी "कन्सेशन" देत नाही.
सर्व रुग्ण गेल्यावर माझ्या स्वागत सहायिकेने हिशेब दिला तर या रुग्णाला तिने ३०० रुपये जास्त लावलेले. मी तिला विचारलं अग कन्सेशन तर नाहीच, तू त्याला ३०० रुपये जास्त बिल लावलेस? त्यावर ती म्हणाली, सर तुम्ही त्याला २५ मिनिटं शांतपणे सर्व समजावून सांगितलं लिलावतीच्या डॉक्टरांनी दहा दिवस मिळून पण एवढा वेळ दिला नव्हता (असे रुग्णाच्या बरोबर आलेल्या नातेवाइकानेच सांगितले होते) आणि तेथे याने साडेतीन लाख रुपये बिल भरलं एक शब्द न बोलता. गडगंज पैसे आहेत त्याच्या कडे.
मी तिला म्हणालो लीलावती किती बिल घेते त्याच्याशी आपल्याला काय करायचंय? आपण स्वतःशी प्रामाणिक असावं.
त्यावर ती म्हणाली सर सकाळी त्या मुलीला तुम्ही "फुकट" सोनोग्राफी करून दिलीत तिचे थोडेसे पैसे याने दिले (क्रॉस सबसिडी) तर काय बिघडलं?

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

5 Sep 2017 - 11:57 am | धर्मराजमुटके

सुरस अनुभव.

जिथे जास्तीत जास्त लोकांशी भिडण्याचा अनुभव येतो तिथे अनेक प्रकारचे अनुभव जमा होतात. एक व्यावसायिक म्हणून मला नेहमीच घरगुती / किरकोळ ग्राहकांशी व्यवसाय करण्याचा मनस्वी कंटाळा आहे.

किरकोळ ग्राहक म्हणून आणि कॉर्पोरेट ग्राहक म्हणून एकाच व्यक्तीचे वर्तन अतिशय वेगवेगळे असते. खरेदी करणारा नेहमीच सवलत मागत असतो. मी तर गमतीने नेहमी म्हणतो की तुम्ही पर्चेस डिपार्टमेंट वाल्याला एखादेवेळी शुन्य रुपये कोटेशन दिले तरी तरी तो विचारेल याच्यात अजुन काही डिस्काऊंट होईल काय ?

मार्मिक गोडसे's picture

5 Sep 2017 - 11:58 am | मार्मिक गोडसे

योग्य तेच केलं.
फोटोची कल्पना आवडली.

Nitin Palkar's picture

5 Sep 2017 - 1:12 pm | Nitin Palkar

तुमच्या स्वागत सहायिकेचं कौतुक आणि तुमचं अभिनंदन!

+१०० . बाकी तुम्हाला असे चमत्कारीक अनुभव रोजच येत असतील .

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Sep 2017 - 2:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोचक अनुभव !

माझ स्वतःचा असाच काहीसा अनुभव आहे. जितका रुग्ण / ग्राहक श्रीमंत तेवढा त्याचा डिसकाऊंट मागण्याकडे जास्त कल असतो आणि / किंवा बिल वेळेवर फेडणे जरासे कठीणच असते आणि तेही कटकट व गुर्मी करत केले जाते (मी काय कुढे पळून चाललो की काय, देईन थोड्या दिवसांनी). हाच माणूस मॉलमध्ये घासाघीस करत नाही आणि बड्या रेस्तराँमध्ये आले ते बिल भरून परत वर शेखी मारण्यासाठी भरभक्कम टीप देण्यात मोठेपणा मानतो.

त्याविरुद्ध, गरीबाला, सर्वसाधारणपणे डिसकाऊंट मागायला फार कुचमुचल्यासारखे होते. आणि त्याने उधारी केलीच तर ती न चुकता वेळेवर चुकती केली जाते... त्यात थोडासा उशीर झाला तर त्याला मेल्याहून मेल्यासारखे होते.

अजया's picture

5 Sep 2017 - 4:01 pm | अजया

हा नेहमीचा अनुभव आहे. माझ्या प्रॅक्टिसमध्ये अनेकदा आॅलमोस्ट रोज हे करावेच लागते.
तसंच सर्वसाधारण पेशंट आधी येऊन ट्रीटमेंटला किती खर्च लागेल अंदाज घेतात. मग तयारीने येतात. वरचे साखळ्या टाइप लोक आमच्या भागात नेहमीचेच. ते अंदाज न विचारता हे करा ते करा सुरु करतात आणि बिल द्यायच्या वेळी रडारड, कन्सेशन. जवळचे लेडिज बार यांच्या कृपेने भरलेले असायचे तेव्हा तिथे कोण द्यायचं यांना कन्सेशन तेच जाणे. अशा लोकांचे कन्सेशन त्यांना सुरूवातीलाच खर्च सांगून एका गरीबाचे त्यात कन्सेशन काढुन मग द्यावे लागते!

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Sep 2017 - 8:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

यावर माझा उपाय :

मी माझ्या कन्सल्टेशनच्या नक्की केलेली किंमतीत, केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजू घटकांसाठी, त्याच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे, सवलत देतो असे सांगतो*. विशेषतः आपल्या श्रीमंतीची शेखी मारणार्‍यांना, आपली आर्थिक स्थिती दुर्बल आहे हे म्हणणे जर्राsssसे कठीणच जाते ;) मात्र, खरेच गरजू असल्याचा अंदाज आल्यास सवलत मागायची गरज पडू देत नाही.

यामुळे, कोणाला श्रीमंत आहे म्हणून जास्त चार्ज केले असे होत नाही आणि "स्वमताने" गरजूंना मदतही करता येते.

=======

* :
१. माझा अनुभव असा की उगाच सवलत मागणार्‍या श्रीमंत लोकांना 'वाचलेल्या पैश्यांपेक्षा' जास्त नशा, 'मी ते जबरदस्तीने उकळू शकतो' याची असते. त्या नशेच्या फुग्यातील हवा काढायला 'दुर्बल घटकांसाठी / गरजूंसाठी मदत' ही सुई रामबाण ठरते.

२. त्याचबरोबर मलाही 'माझे पैसे बुडाले' यापेक्षा कित्येक पट्टींनी जास्त रुखरूख 'कोणी ते माझ्याकडून जबरदस्तीने अथवा फसवणूकीने काढून घेतले' याची असते.

रोजच आयुष्याची वेगळी बाजू दाखवणारे लेखन.
आवडले.
तुमच्या स्वागत सहायिकेचा निर्णय आवडला.

मराठी कथालेखक's picture

5 Sep 2017 - 5:19 pm | मराठी कथालेखक

कन्सेशन देणे अथवा न देणे हा व्यावसायिकाचा स्वतःचा निर्णय आहे. पण समोरचा श्रीमंत आहे म्हणून जास्त पैसे चार्ज करणे पटत नाही.
जर तुम्ही नेहमीपेक्षा बराच जास्त वेळ कन्सल्टिंगसाठी दिला असेल तर त्याचे शुल्क वेगळ्या शीर्षकाखाली (डीप कन्सल्टिंग वगैरे) घ्यावे.
बाकी जर कुणाकडून जास्त पैसे घ्यायचेच असतील तर एक्स्प्रेस वा इलाईट (जलद/खास) सेवेचा पर्याय देवून जास्त शुल्क लावावे असे माझे मत आहे.
तुमच्यावर व्यक्तिश: टिपण्णी करायची नाही, पण एकूणच व्यावसायिकांना मी हे सुचवेन.

सुबोध खरे's picture

5 Sep 2017 - 7:22 pm | सुबोध खरे

पण समोरचा श्रीमंत आहे म्हणून जास्त पैसे चार्ज करणे पटत नाही.
असे करणे मलाही पटत नाही.
समोरचा रुग्ण अमेरिकेतून आला आहे/ अमेरिकेला जाणार आहे म्हणून मी त्याला जास्त पैसे कधीच लावत नाही. ( असे डॉकटर मी पाहिले आहेत).
माझ्या मित्राच्या मुलीला ऑटिझम हा आजार आहे. तो अमेरिकेतून उयेथे आला असता कोण्या होमियोपॅथ कडे यावर औषध आहे म्हणून गेला होता. भागीदार त्याला फोनवर ५००० रुपये सांगितले आणि हा अमेरिकेत आहे म्हणून सल्ला मसलत झाल्यावर त्याला ४०,०००/- होतील म्हणून सांगितले. यावर त्याने त्या डॉक्टरांना आठवण करून दिली कि तुम्ही तर ५००० म्हणाला होतात. त्यावर ते डॉक्टर म्हणाले अहो तुम्ही डॉलर मध्ये कमावता तुम्हाला काय कमी आहे? यावर माझा मित्र म्हणाला कि डॉलर मध्ये कमावण्यासाठी आम्ही किती कष्ट करतो ते तुम्हाला काय माहित? तुम्हाला ५००० रुपयात औषध द्यायचे तर द्या नाहीतर राहू दे. यावर त्यांनी ५००० रुपये घेतले आणि औषध दिले.
पैसे गेल्याचे दुःख नसते तर "फसवले गेल्याचे" दुःख असते.
हे फसवले जाण्याचे दुःख काय आहे याचे एक साधे उदाहरण. मुंबईत रिक्षाचे किमान भाडे १८ रुपये आहे. रिक्षावाल्याने २० रुपये सांगितले तर २ रुपये तुम्हाला परवडत नाहीत असे नाही. पण फसवले गेल्याची भावना येते.
यामुळेच मी सर्वाना एकच दर लावतो आणि रुग्ण खरंच गरीब आहे असे वाटले तर सवलत देतो.(सांगताना मी कोणालाच सवलत देत नाही म्हणून स्पष्टपणे सांगतो).

मराठी कथालेखक's picture

5 Sep 2017 - 8:54 pm | मराठी कथालेखक

हीच गोष्ट पर्यटन खात्यानेही लक्षात घ्यायला हवी...
काही पर्यटन स्थळी भारतीय नागरिकांना पाच वा दहा रुपये शुल्क तर परदेशी पर्यटकांना शंभर रुपये शुल्क अशा पाट्या मी पाहिल्या आहेत. मला तरी हे चुकीचे वाटते. शिवाय अंमलबजावणीसाठी कुणी भारतीय पर्यटकांना भारतीयत्वाचा पुरावा मागत नाहीत म्हणजे त्वचेचा रंग बघून अंमलबजावणी केली जाते असे दिसते !!

तुम्हाला कान आणि डोळे उघडे ठेऊन वावरणारी स्वागत सहायिका लाभली आहे. :)

सुबोध खरे's picture

5 Sep 2017 - 8:33 pm | सुबोध खरे

हे मात्र खरं आहे. अतिशय कष्टाळू मुलगी आहे.

मृत्युन्जय's picture

5 Sep 2017 - 8:51 pm | मृत्युन्जय

डॉक तुम्हाला सहायिका भारी मिळाली आहे :)

त्यांच्या स्वागतिकेने त्यांच्याच गल्लीतल्या नेत्याला "बियर बार" वरून शाब्दिक मार दिलेला किस्सा अजरामर आहे. :))

पिलीयन रायडर's picture

6 Sep 2017 - 3:30 am | पिलीयन रायडर

कोणता रे?! अधुंकसं काही तरी आठवतंय.

पैसा's picture

5 Sep 2017 - 10:18 pm | पैसा

तुमचे अनुभव एकापेक्षा एक सुरस आणि चमत्कारिक असतात. तुमची असिस्टंट भारी हुषार आहे. आधीही दुसरा किस्सा वाचला आहे.

फी म्हणून भाजी मिळण्याचा अनुभव आपल्या मिपावरच्या डेंटिष्टीण बाई सांगतात. =)) आनंदी गोपाळ यांनीही अनेकदा चित्रविचित्र प्रकार मिपावर सांगितले आहेत. एकंदरीत डॉक्टरांसारखे अनेकविध अनुभव इतर कोणाला येत असतील असे वाटत नाही.

किस्से आवडले. अशाही प्रकारे समाजाचे देणे फेडता येऊ शकते हा विचार आवडला.

भंकस बाबा's picture

5 Sep 2017 - 11:29 pm | भंकस बाबा

असंच लिहीत रहा डॉक्टर

Ram ram's picture

6 Sep 2017 - 3:19 am | Ram ram

Aaplyasarkhe pramanik, swachh manache doctor mitra mipavar ahet he aamche bhagya. Thanks.