श्रीगणेश लेखमाला: समारोप

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
5 Sep 2017 - 10:28 am

नमस्कार मंडळी,

येणार येणार म्हणून वर्षभर आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत असतो ते गणराय आले, वाजत गाजत आले, या उत्सवी धामधुमीत दहा-बारा दिवस कुठे निघून गेले आणि बाप्पांचा निरोप घ्यायची वेळ कधी जवळ आली, कळलेही नाही. गणेशोत्सवाच्या काळात आपल्या घरांसारखंच पूर्ण शहरात, सगळ्या वातावरणातच एक भारलेपण, मंतरलेपण जाणवत असतं. आपलंच शहर तेव्हा ओळखू न येण्याइतपत बदललेलं दिसतं. अर्थात त्यात आता अफाट गर्दी, बेसुमार ट्रॅफिक इ. गोष्टींचीही भर पडत असते, पण त्याला इलाज नाही, गणेशोत्सवाचं स्वरूप दिवसेंदिवस पालटत चाललं आहे, त्यात चांगल्याबरोबर वाईटही आलंच. असो.

बाप्पांना निरोप द्यायचा हा जो क्षण असतो, तो मात्र फार वाईट असतो. विसर्जन करून घरी येतांनाच मनात एक सुनेपण भरून येत असतं. घरी आल्यावर सजवलेला रिकामा देव्हारा पाहून ते आणखीनच दाटून येतं. अर्थात बाप्पा जातात ते पुढच्या वर्षी असाच आनंद सर्वांना सढळ हस्ते वाटायला परत येण्यासाठी, हे लक्षात ठेवून मनाचं समाधान करून घ्यायचं इतकंच आपल्या हातात.

गणेशोत्सवासोबतच श्रीगणेश लेखमालेचाही समारोप करण्याची वेळ आली आहे. लेखमालेसाठी आवर्जून लेख देणाऱ्या सर्व लेखकांचे परत एकदा मनःपूर्वक आभार, वेळात वेळ काढून लेखमालेतील तसेच इतरही उपक्रमांतील लेख प्रकाशित केल्याबद्दल मालकांचे आभार. तसेच आपण सर्वांनी लेखांना, लेखकांना दिलेल्या अमूल्य अभिप्रायांसाठी अनेक धन्यवाद. या वेळचे बहुतांश लेख कुणा मान्यवर, सिद्धहस्त लेखकांचे नसून सामान्य वाचक/लेखकांकडून आलेले होते, हे एक विशेष. जास्तीत जास्त लोकांना/वाचकांना लिहितं करण्याच्या मिपा धोरणाला यामुळे चालना मिळाली, ही एक चांगली गोष्ट.

या वेळी साहित्य संपादक म्हणून थोडं मनोगत आपल्यासमोर मांडावंसं वाटतंय. ही लेखमाला हा नवीन सा.सं.मं.चा कोणताही मोठा उपक्रम चालवण्याचा पहिलाच अनुभव. किंबहुना यापुढील उपक्रम ही त्यांची सुरुवातच असणार आहे. या सुरुवातीच्या काळात काही कसर राहून गेल्यास, काही चुका झाल्यास आपण सर्व जण सांभाळून घ्याल याची खातरी आहे. चुकतमाकत, अनुभवांतून शिकत आपल्यापर्यंत उत्तमोत्तम साहित्य पोहोचवण्याचा आमचा प्रयास कायमच असेल. आपल्या सूचनांचं आणि टीकेचंही कायम स्वागत आहे. त्यातूनच कुठे सुधारणेस वाव आहे, तेही आम्हाला कळतं. लवकरच आणखी नवनवीन विविध उपक्रम घेऊन आपल्यासमोर हजर असू आणि आपण त्यांसही असेच भरभरून प्रतिसाद द्याल, ही आशा आहे, तरी आपल्या संयमासाठी आणि प्रोत्साहनासाठी पुन्हा एकदा धन्यवाद.

श्रीगणेश लेखमालेचा आरंभ एका गीतातील ओळींसह केला होता, तसेच समारोपही या काही मनस्वी शब्दांसह..
(शब्दश्रेय: संत तुकाराम, क्षितिज पटवर्धन)

सावलीची आस ना, कोवळेसे ऊन मी
सूर नाही संगती, एक तरीही धून मी

ज्यात डोकावेन मी, ते मनाचे बिंब मी
जन्म हेलावेल हा, ते उसासे चिंब मी

नाव नाही ज्यास काही, तो अनोखा रंग मी
जो पुरेल जन्म सारा, तो सोबतीचा चंग मी

मीची मज व्यालो, पोटा आपुलिया आलो..

काळजात करुणेचा, उसळलेला डोंब मी
हर क्षणाला कल्पनेचा, जन्मलेला कोंब मी

शोधताना वाट माझी, होत माझा त्रास मी
मोजताना श्वास माझे, अंतरीचे हास्य मी

मीची मज व्यालो, पोटा आपुलिया आलो..
दोन्हीकडे पाहे, तुका आहे तैसा आहे.

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

5 Sep 2017 - 11:11 am | तुषार काळभोर

आयुष्यातील चढउतार, अचानक येणारी संकटं यांना खंबीरपणे तोंड देऊन त्यातून उभं राहणं, तेही असं की ते पुर्ण नवं आयुष्य वाटावं!!
सर्वच लेख हे मनाला उभारी देणारे , इतरांना प्रेरणादायी ठरतील असे, अशा परिस्थितीत काय करावं आणि काय करू नये हे शिकवणारे आहेत...

लेखमालेचा विषय कदाचित सुरूवातीला थोडा संभ्रम निर्माण करणारा वाटला असेल, पण एकूण लेखमाला उत्तम झाली. आयोजकांचं विशेष अभिनंदन!

(अवांतर : गणेशोत्सवापूर्वी काही फ्लेक्स पाहिले होते "आतुरता आगमनाची", तसे आता " आतुरता दिवाळी अंकाच्या आगमनाची!!")

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Sep 2017 - 3:51 pm | ज्ञानोबाचे पैजार

या मधे लिहिले गेलेले सगळे लेख वाचले आणि आवडलेही. प्रत्येकाने अतिशय मनापासून लिहिले. आणि त्याच मुळे ते थेट काळजाला जाउन भिडले.

या लेखमालेच्या निमित्ताने मा.प., पैलवान, बाजीप्रभु, ज्योती अलवनी, दशानन या परिचित लेखकांचा एक वेगळा पैलू समोर आला.

तर नवल, अनिवासी, किसन वासेकर असे नव्या दमाचे लेखकही मिळाले

हेच या मालिकेचे खरे यश आहे,

आता प्रतिक्षा दिवाळीची....

पैजारबुवा,

समारोपाचे लेखन वाचले आणि खरच गणपती विसर्जनाचा फील आला.
लेखमालेचा प्रयत्न स्तूत्य होता हे आवर्जून सांगते.
आपल्याकडून कळत नकळत झालेल्या चुकांचा दणका बसला की सुधारणा आलीच. इलाज नाही. अनेक गोष्टी शिकत, सुधारत जाण्याच्या प्रवासात शब्दात पकडण्यात अवघड असलेली स्थित्यंतरे होतात. काही दिसून येतात, सांगता येतात तर काही कुटुंबाच्या सिमेपलिकडे न जाण्याची मर्यादा घालतात. यातूनही लेखकांनी अनुभव पोहोचवण्याचा केलेला प्रयत्न आवडला. समारोपाच्या ओळींचे गीत अनेकदा ऐकले आहे व आवडले, पटले आहे.

अभ्या..'s picture

5 Sep 2017 - 4:22 pm | अभ्या..

छान निभावली आहे लेखमाला.
अनवट विषयापासून ते नवनवीन लेखकांकडून लिहुन घेण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. संपादकीय संस्करण म्हणाले तर ते काही महत्त्वाची गोष्ट नव्हती. किंबहुना आधीच्या लेखमालात दोनवेळा लिहिले त्यावेळी जाणवले नाही. त्यापेक्षा उत्साह आणि कोणी आपल्यातले लिहितेय ही भावना कायम ठेवून ही लेखमाला पूर्णत्त्वास नेली याबद्दल सर्वच नूतन साहित्य संपादकांचे अभिनंदन. नीलमोहर, पद्माक्का, जव्हेरभाव आणि पैलवानदादा ह्यासारख्या नव्या दमाच्या संपादकांचे विशेष कौतुक. सुधांशूदा, एसदा आणि अर्थात आदूबाळाचे नेहमीच कौतुक करायचे तर कीती?
येत्या कालावधीत नवनवीन उपक्रम घडोत, त्यांना पूर्णपणे सहकार्य मिपाकर आणि आमच्याकडून मिळेलच.
कायम शुभेच्छा तर आहेतच.

सस्नेह's picture

5 Sep 2017 - 4:28 pm | सस्नेह

यथोचित समारोप.
रेवती म्हणते तसा प्रयत्न चांगला होता. आणि काही निवडक लेखही उत्तम आहेत. तथापि ही एक उत्सवी मालिका आहे, हे समजून विषय घेतला असता तर आणखी चांगली होऊ शकली असती.
चुकतात सगळेच. परंतु जनरली काही ज्येष्ठांशी सल्लामसलत केली तर चुका टाळता येतात. मिपावर आजवर पुष्कळ उपक्रम झाले. अगदी अजयाचा बोली भाषा आणि स्रुजा- पिराचा 'गोष्ट तशी..' हाही या प्रकारचा पहिलाच प्रयत्न होता. परंतु त्यात नवखेपणा किंवा चुका दिसल्या नाहीत, उलट प्रचंड यशस्वी आणि वाखाणण्यासारखे हे उपक्रम होते.
असो. दिवाळी अंकात चित्र वेगळे दिसावे ही अपेक्षा आणि शुभेच्छा !

यशोधरा's picture

5 Sep 2017 - 5:40 pm | यशोधरा

उत्तम पार पडली गणेशलेखमाला. वर मिपाकरांनी म्हटल्याप्रमाणे नवीन लेखकांचा सहभाग हे ह्या मालिकेचे मुख्य यश. त्याबद्दल सासंचे खास अभिनंदन!
पाठ थोपटून घ्या हो सा सं :)

बाकी प्रत्येक लेखमालिकेला काही ना काही तीट लागतेच, मात्र तीट लागल्याने बाळाचे रुपडे अधिक गोजिरवाणे दिसते हे विसरु नका सा सं. ;)

पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुढील कामासाठी शुभेच्छा.

Ranapratap's picture

5 Sep 2017 - 8:21 pm | Ranapratap

अशा प्रकारचे उपक्रम मि. पा. नेहमी हवेत.

मृत्युन्जय's picture

5 Sep 2017 - 9:07 pm | मृत्युन्जय

उत्तम झाली लेखमाला.

गणपती विघ्नहर्ता आहे. या पार्श्वभूमीवर आयुष्यात अचानक आलेल्या विघ्नांचे हरण करण्याचे सामर्थ्य त्या गजाननानेच सर्व सहभागी लेखकांना दिले असे वाटते आहे. त्यामुळे लेखमाले चा आगळा वेगळा विषय अगदी सार्थ ठरला.

मिपावर यापुर्वीही अनेक लेखमाला आल्या . सर्वच साजिर्‍या होत्या. ही लेखमाला देखील अशीच सुंदर झाली.

नव्या विचार्‍यांच्या ताज्या कल्पनांमधुन नव नविन विषय / विचार सुचतात त्यामुळेच ही लेखमाला सुंदर होउ शकली

सर्व लेखकांचे, वाचकांचे, प्रतिसादकांचे, मिपाव्यवस्थापनाचे, लेखमालेसाठी झटणाऱ्या सर्व सासंचे मनःपूर्वक आभार!

पिलीयन रायडर's picture

6 Sep 2017 - 3:25 am | पिलीयन रायडर

एक दोन लेख वगळता लेखमाला चांगली झाली. "फिरुनी पुन्हा जन्मलो मी" ह्या विषयावर खरोखर आयुष्य बदलणार्‍या घटना अपेक्षित होत्या. काही लेखांनी ती अपेक्षा पूर्ण केली, काहींनी नाही. पण एकंदरीत प्रयत्न चांगला होता. सामान्य मिपाकर लिहीते झाले हे चांगली गोष्ट असली तरी दर्जाच्या बाबतीत तडजोडीचे ते कारण किमान लेखमालेत असू नये ह्या मतावर मी अजूनही ठाम आहे.

विशेष कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं की विषयाला पहिल्या पासूनच विरोधी मतं मिळाली. पण सासंने विरोधही संयमित भाषेत हाताळला आणि उपक्रम तडीस नेला. एका उपक्रमात अनेकांची इतकी मतं येत असताना आपल्या विचारांवर ठाम रहाणं सर्वात जास्त आवश्यक असतं, ह्या टीमने तेच केलं. कदाचित म्हणूनच विरोधी मतं सुद्धा खुल्या मनाने मांडली गेली. अर्थात ह्या सासंमधल्या काही जणांनी आम्हाला "गोष्ट तशी.." च्या वेळेला प्रचंड मदत केलेली असल्याने त्यांच्याबद्दल थोडी अधिक आपुलकी वाटते. आणि त्यांच्या मॅच्युरिटीबद्दल खातरी असल्याने विरोधी मत मांडले. इतर कुणी त्यावर आपले वैयक्तिक अजेंडे राबवुन घेतलेही असतील, पण त्याची जबाबदारी आमचे मंडळ स्वीकारत नाही! सासंवर शंका घेण्याचा हेतू कधीही नव्हता. खफवर तसं स्वरुप जरी चर्चेला दिलं गेलं असलं तरी विषय केवळ १-२ लेखांपुरता होता.

ह्या लेखमालेत अजुन एक आवडलेली गोष्ट म्हणजे लेख कमी आले होते हे जाहीरपणे सांगुन दिवस भरण्याचा आटापिटा न करता लेखमाला ९ दिवसच चालवली. कधी कधी अवास्तव अट्टाहास उपक्रमांना घातक ठरतो. तो न केल्याबद्दल धन्यवाद!

नव्या दमाची नवी माणसं नवा विचार घेऊन येत आहेत आणि ठामपणे मांडत आहेत ही मिपासाठी महत्वाची गोष्ट आहे. ह्या टीमने इतर कुणाच्याही "मार्गदर्शना"खाली झाकोळून न जाता वाटचाल चालू ठेवावी. जेव्हा आपल्याला जे करायचं आहे तेच करण्याचं स्वातंत्र्य असतं तेव्हा उपक्रम यशस्वी होतात असा आमचा "गोष्ट तशी.." च्या वेळेचा अनुभव आहे. कुणाच्याही सल्ल्याची तेव्हा गरज नसते. ह्या सासंलाही तशी काही गरज आहे असे वाटत नाही.

दिवाळी अंकसुद्धा पठडीतली वाट सोडून नवीन प्रयोग करेल अशी ह्या टीमकडून अपेक्षा आहे. शुभेच्छा!

जितकी सहजसुंदर प्रस्तावना होती तितक्याच मनापासून आलेलं हे समारोपाचं निवेदन. साहित्य संपादकांच्या या नव्या चमुने आवाहनाच्या धाग्यापासून एक समंजस आणि प्रगल्भ टीमवर्कचं उत्तम प्रदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन.

यानिमित्ताने मला ही काही २ शब्द बोलायचे आहेत. खरडफळ्यावर मी आणि माझाबरोबर पिरा आणि आप्पांनी काही टिप्पणी केली होती. त्याला अनेकांनी आपापल्या मगदुराप्रमाणे ट्विस्ट दिला. म्हणुन या फोरम वर मला पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट करायची आहे.

या लेखमालेचा विषय बघता तिला काही अंगभूत मर्यादा असणार होत्या आणि काही उपजत वैशिष्ट्यं पण असणार होती. या मर्यादा लक्षात घेऊन अनेकांनी आवाहनावर आपल्या मनातील शंका बोलून दाखवल्या. सासं मंडळाने त्या सामंजस्याने ऐकुन , त्याची दखल घेऊन त्याला यथोचित, यथाशक्ती उत्तरं दिली देखील. निम्मी लढाई त्यांनी तिथेच जिंकली ! आमच्यासारख्यांच्या या चमूकडुन असलेल्या अपेक्षा देखील त्यामुळे वाढल्या. प्रस्तावनेने त्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याची या सासंमं मध्ये ताकद आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. आता या नंतर चढत्या भाजणीने लेख येत जातील अशी आशा मनात होती, तसे ते सुरुवातीला आले देखील. सामान्यांच्या आयुष्यात कधीच महाभारत घडत नाही पण घडलेल्या सामान्य घटनाच पुरेसं ढवळुन टाकायला समर्थ असतात . लेखांमधुन या घटनांमधलं नाट्य कधी हलक्या फुलक्या तर कधी गंभीर अंगाने पुढे आलं. मात्र, सुरुवातीच्या लेखां नंतर आलेले काही विशिष्ट १-२ लेख या मालिकेत शोभुन दिसले नाहीत. लेखांमधलं कंटेंट आणि नाट्य दोन्ही कमी पडलं. यंदा लेख कमी आले होते , विसर्जनाच्या एक दोन दिवस आधी तसाही समारोप आला तर अजुन १-२ दिवस आधी समारोप करुन ही चाललं असतं असं माझं मत होतं, आहे. त्या १-२ लेखांसाठी आदरवाईज चांगल्या चाललेल्या एका धाडसी प्रयोगाला लांबवायचा आग्रह धरला नसता तरी चाललं असतं असं वाटलं.

आधी म्हणल्याप्रमाणे सुरुवातीपासून विरोधी मतांना देखील सामंजस्याने हाताळणार्‍या सासंना आपुलकीने सांगावंसं वाटलं आणि त्यांनी हे देखील संयमाने हाताळलं. हे सगळ्यांनाच जमत नाही.

पण, गल्लत कुठे झाली ते सांगते. आम्ही हे खफ वर बोललो आणि अनेकांना ती एक संधी वाटली !! ती संधी उपलब्ध करुन दिली असा जर कुणाचा आक्षेप असेल
तर त्याबद्दल मी व्यक्तिशः दिलगीर आहे. असं काही होईल असं वाटलं नव्हतं असं नाही पण इतक्या तीव्रतेने होईल असं वाटलं नव्हतं. काही गोष्टींची इथे फार दुर्दैवी सरमिसळ देखील झाली. कुणी आम्ही लेखकांना सांभाळुन घेत नाही असं सुचवलं तर कुणी काय ! यात लेख मालिकेचा नाही तर एक दोन लेखांचा आशय खटकला होता आणि सासंने निवडीचा अधिकार का वापरला नाही असं विचारावंसं वाटलं होतं, एवढंच.

याही धाग्यावर आलेले प्रतिसाद बुचकळ्यात टाकणारे आहेत. "गोष्ट..." चा आणि तथाकथित स्वयंघोषित ज्येष्ठांचा का ही ही संबंध नव्हता. ती यशस्वी मालिका जरी आम्हा दोघींच्या नावावर असली तरी श्रेय अनेकांचं आहे. काही आजी - माजी सासंचं यात घसघशीत योगदान आहे ( वेल्ला, एसभाऊ, आदुबाळ, कॅप्टन, पद्मावति , नुलकर काका ई.) - त्यांनी या ना त्या प्रकारे उत्तम सहकार्य केलेलं आहे, मुद्दाम श्रेयनामावली देते म्हणजे नेमके कोणते सासं यात संदिग्धता नको ! नीलकांतने आम्हाला फ्री हँड दिला होता आणि आम्ही ज्येष्ठ असं कुणाला मानत नसल्याने आमच्यावर नसती ओझी नव्हती.

नव्या दमाचे लोकं नव्या कल्पना घेऊन येतात त्या वेळेस, "होतं असं हरकत नाही पुढच्या वेळीस ज्येष्ठांना विचारा" वगैरे पेट्रनायझिंग विचार यावेत याचं सखेद आश्चर्य वाटलं आहे. शिवाय, यातुन जर "गोष्ट..." ही अशा ज्येष्ठांचा सल्ला घेऊन केली होती म्हणुन यशस्वी झाली असा काही गैरसमज असेल किंवा तसं सुचवायचं असेल तर तसं अजिबात नव्हतं हे इथेच क्लीअर केलेलं बरं . त्यामुळे ज्यांना ज्येष्ठ (?) लोकांविषयी काही बोलायचं असेल त्यांनी कृपया "गोष्ट..." ला बाजुला ठेवावे. मराठी आणि लेखन ही समान आवड घेऊन जमलेल्या लोकांमध्ये ज्येष्ठ कनिष्ठ कुठुन आलं देव जाणे. असो.

सासंमं, कृपया गैरसमज नसावा - पूर्वी प्रस्तावनेत म्हणल्याप्रमाणे तुम्ही घरची गडबड सांभाळुन देत असलेल्या योगदानाचं सार्थ कौतुक आणि जाणीव आहे. बाकी आमचा उद्देश्य वर स्पष्ट केला आहे, तरीही आमच्या खांद्यावर बंदुक मारलेल्यांना नकळत का होईना खांदा दिला याचं वाईट वाटतंय एवढंच सांगावंसं वाटतंय.

प्रचेतस's picture

6 Sep 2017 - 8:44 am | प्रचेतस

दोन तीन लेख सोडले ही तर ही लेखमाला 'गणेश लेखमाला' अशी वाटली नाही, बरेचसे लेख वैद्यकीय पार्श्वभूमीशी संबंधित वाटले. जरी ते स्वतंत्र लेख म्हणून चांगलेच असले तरीही लेखमालेतील लेख म्हणून ते फारसे रुचले नाहीत. कदाचित लेखमालेला विषयांत बद्ध केल्यामुळे असं झालं असावं असं मला वाटतं आणि ह्याचमुळे लेख कमी पडले असंही वाटतं.

या वेळचे बहुतांश लेख कुणा मान्यवर, सिद्धहस्त लेखकांचे नसून सामान्य वाचक/लेखकांकडून आलेले होते, हे एक विशेष.

सासंचं हे मत अजिबातच पटलं नाही. मिपावर सर्वच लेख हे मिपाकरांकडूनच येतात अगदी क्वचित काही अपवाद आहेत. ह्याआधीच्या अंकांतही आलेले लेख हे मिपाकरांचेच होते. त्यात सामान्य वाचक्/लेखक मिपाकर, सिद्धहस्त लेखक असं वर्गीकरण करणं आवडलं नाही.

अर्थात झालेल्या टिकेला सासंनी सकारात्मकरित्या घेतलं त्याबद्दल त्यांचे आभार. आता लवकरच मिपाचा दिवाळी अंक येईल. त्याची घोषणा आधीच व्हायला हवी होती. कारण आता तयारीला जेमतेम महिनाभरच राहिलेला आहे. दिवाळी अंकालाही कुठल्यातरी थीममध्ये बांधू नये असे मला प्रामाणिकपणे वाटते.

पुन्हा एकदा सर्व साहित्यसंपादकांचे आणि लेखमालेतील लेखकांचे आभार.

सुमीत भातखंडे's picture

6 Sep 2017 - 11:45 am | सुमीत भातखंडे

छान झाली लेखमाला.
साहित्यसंपादकांचे आणि लेखकांचे आभार.