श्रीगणेश लेखमाला : लेख क्र. ९ : एका बापाचा जन्म

दशानन's picture
दशानन in लेखमाला
3 Sep 2017 - 10:02 am

लहान मुले आवडणे व आपले एक लहान मूल असणे यात जास्त फरक असेल असे मला तरी मागील वर्षापर्यँत वाटत नव्हते. पण मागील वर्षाच्या सुरुवातीलाच सौने शक्यता व्यक्त केली व पुढे काही दिवसांत खातरीलायक बातमी दिली की मी बाबा आणि ती आई होणार आहे. “अरे वा, छान छान” असे कौतुक इत्यादी करून मोकळा झालो, पण आतून हादरलो होतो... अनपेक्षित असे काहीतरी आयुष्यात घडत होते आणि पहिल्यांदा! आनंदी होतो का? हो निश्चित, खूप खूप. मनात खूप मोठे काहूर उठले होते, उत्सुकता होती, तसेच एक अनामिक भीतीदेखील. अशी बातमी मला काही वर्षांपूर्वीदेखील मिळाली होती, तो आनंद फक्त महिनाभर टिकला होता. मनात नको नको ते विचार येत-जात होते. नेमके अशा वेळी सर्व मित्रमंडळी दुरावलेली, दुखावलेली होती माझ्याकडून. माझ्या घरी तसेही थोड्या जुन्या विचारांची आई व आम्ही नवरा-बायको! सासर संवाद उत्तम आहे, पण स्थान, अंतर हा मोठा विषय होता. शेवटी आठवडाभर कसाबसा काढला व एके दिवशी मनात ठरवले - जे होईल, त्याला सामोरे जायचे, जमत नाही तर शिकायचे, पण सर्व आपणच बघायचे, जेवढे शक्य होईल तेवढे.. यानंतर प्रवास सुरू झाला... बाबा बनण्याचा.

सौ बोलता बोलता म्हणाली, “तुला काय वाटतं काय होईल? मुलगा की मुलगी?” एक क्षणही वाया न घालवता मी उत्तर दिले, "मुलगी आणि मी नाव शोधतोयदेखील." ती मुलाचे नाव शोधत राहिली व मी मुलीचे. पुढील दोन आठवड्यांत, ‘अजून’ भूतलावर न आलेल्या माझ्या अपत्याचे नाव ठरवले ‘ईवा’ आणि मला मुलगीच होईल यावर माझा ठाम विश्वास होता, म्हणून त्याच दिवशी त्या नावाचा आधार घेऊन दोन डोमेन बुक केली. बायकोला काहीच टेन्शन दिसत नव्हते. त्या येणाऱ्या बाळासह ती तिचे ‘अस्तित्व’ व्यवस्थित एन्जॉय करत होती, नेहमीप्रमाणे कामावर जात होती सकाळी ९ ते संध्याकाळी ७.३०! मी मात्र दिवसभर घरी. मला तसेही काही खास टेन्शन नव्हते व काळजीदेखील. गर्भवती ती होती, मी नाही ना! माझा उत्साह फक्त आणि फक्त ९ महिन्यांनंतर बाळ आल्यावर काय काय करायचे यातच गुंतला होता.. व घरात बाळाची दोन-तीन पोस्टर लावणे एवढाच.

चौथ्या महिन्याची सुरुवात. मंगळवार रात्री, अंदाजे एक वाजता... बाथरूममधून बायको आवाज देत आहे असा भास झाला. पण काही क्षणात जाणवले की ती खरेच आवाज देत आहे. धडपडत पळालो आणि बाथरूममध्ये पाहिले... आणि तेथेच थिजलो! बाथरूममध्ये भरपूर रक्त सांडले होते. बायको कण्हत होती. मी असा शून्यात गेलेला पाहून तिने परत जोरात आवाज दिला. मी तिला कसेबसे बाहेर घेऊन आलो बेडवर आणि एक न संपणारी रात्र सुरू झाली. ती रडत होती, नेमके काय झाले आहे हे माहीत नव्हते. एवढ्या रात्री ना डॉक्टर भेटणार, ना आपल्याकडे वाहन. मी रडण्याच्या पलीकडे गेलो, तिला धीर देत बसून राहिलो. सकाळ झाल्या झाल्या डॉक्टरकडे धाव घेतली. ते सात-आठ तास मी कधीच विसरू शकणार नाही. बायकोच्या टेस्ट झाल्या, सोनोग्राफी झाली व डॉक्टर मला म्हणाली, “८ दिवस फुल बेड रेस्ट आणि पूर्ण काळजी घ्या. नशीबवान आहात. गर्भ सुरक्षित आहे...!”

मी टाकलेला निःश्वास मलादेखील स्पष्ट ऐकू आला होता. मनाला खूप खूप समाधान लाभलेले होते. जे घडले होते, त्यातून एक धडा शिकलो होतो - आई होणे ही फक्त तिची जबाबदारी नाहीये, ती आई व्हावी हे पाहणे ही तिच्याएवढीच किंवा तिच्यापेक्षा जास्त माझीदेखील जबाबदारी आहे. घरात धूळ खात पडलेला संगणक सुरू केला व शोध चालू केला गुगलवर... आईची काय काळजी घ्यावी प्रत्येक दिवशी व प्रत्येक आठवड्यात, पुढील अनेक आठवड्यांसाठी जोपर्यंत बाळ सुखरूप बाहेर येत नाही तोपर्यंत. शेकडो वेबसाइट्स पालथ्या घातल्या, शेकडो ग्रूप्स, मिळेल तिकडून माहिती गोळा करत गेलो, एका जागी साठवत गेलो. बायकोची काळजी कशी घ्यावी, तिचे जेवण, खानपान, पाणी, मॉलिश, औषधे, सोनोग्राफी याचे एक टेबल तयार केले व घरात काम करायचे एक टेबल तयार केले. कामाची वाटणी करून घेतली दोघांनी व संध्याकाळच्या जेवणाची जबाबदारी माझ्या आईने घेतली.

माझ्याकडे मी मोठी कामे ठेवून घेतली होती – उदा., पिण्याचे पाणी खालून भरणे, कपडे धुणे, भांडी घासणे इत्यादी. हळूहळू यूट्यूब पाहून ज्यूस तयार करणे, हलकाफुलका नाश्ता व बायकोला आवश्यक ती सर्व जीवनसत्त्वे कशी मिळतील त्यानुसार रोजचे जेवण काय असावे याचे प्लानिंग सुरू केले. सुरुवातीला खूप अवघड गेले. आधीच ‘बायको काम करते व हा घरी बसून खातो’ इत्यादी गल्लीतील बायकांचे टोमणे कानावर येऊन गेले होते, पण आता टोमणे आणखीनच विखारी होत होते. भांडी घासतो, बायकोचे कपडे धुतो इत्यादी. पण सर्वाकडे दुर्लक्ष केले व बायकोने जमले तसा त्याचा समाचार घेतला. शेवटी आगरी आहे ना ती!

असेच एक दिवस रात्री जेवणानंतर आम्ही बोलत बसलो होतो, तेव्हा पहिल्यांदा बाळाने हालचाल केली व आईला बाळाचा धक्का जाणवला. थोडा कान लावल्यावर मलाही जाणवला. परत गुगलबाबाला शरण गेलो व कळले की दोन मोबाइल प्रणाली आहेत - एक बेबीबंप आणि किक काउंट! बेबीबंप तर अफलातून ऍप आहे. मला असा एक साथीदार मिळाला होता, जो जवळपास ९०% बरोबर अशी माझ्या बाळाच्या प्रगतीची माहिती देत होता. आज बाळ किती वजनाचे असेल, बाळाची उंची किती असेल, बाळाचे कोणकोणते अवयव पूर्ण निर्माण झाले आहेत किंवा होत आहेत अशा अनंत गोष्टी त्यातून मला समजत गेल्या. सातव्या महिन्यातील सोनोग्राफीनंतर बाळ व्यवस्थित व हेल्दी आहे हे समजले व त्याची आईदेखील.

यानंतर सुरू झाला शेवटचा टप्पा. सातव्या महिन्याच्या शेवटी बायको ऑफिसमधून सुट्टी घेऊन माहेरी निघून गेली व मी पूर्ण घरात एकटा. आम्ही दोघे फोनवर बोलून बोलणार किती? एक दिवस ती बोलता बोलता म्हणाली, "बाबा, बाळाची जबाबदारी तुलाच घ्यायची आहे, मी सकाळी ऑफिसला जाईन व रात्री परत येईन. बघ बाबा कसे करणार आहेस ते." गेल्या चार-पाच महिन्यांत हा विषयच माझ्या डोक्यात आला नव्हता.. बाळ माझ्याकडे राहणार आहे! परत गुगलबाबा व यूट्यूब यांच्या दारी पोहोचलो. जगात पहिल्यांदा डोळे उघडणाऱ्या त्या बालकाला / बाळाला काय हवे असते यापासून काय काय करावे व करू नये याची परत टेबल्स तयार केली. त्याचे कपडे, साबण, पावडर, औषधे, डोस... आणि शू-शी साफ करणे! अमर्याद उत्साहाने सर्व काही शिकत गेलो, अगदी एक एक गोष्टीबाबत.

डॉक्टरने सांगितलेला दिवस आला व गेलादेखील. बाळ काही आलेच नाही. जाम वैतागलो होतो. सारखे फोन किती करायचे? म्हणून सरळ उठून सासुरवाडी गाठली. डॉक्टर म्हणाले, “कधीकधी पुढे-मागे होते. काळजी नको, सर्व काही उत्तम आहे.” मी परत पुण्याला आलो. पुढे सहा दिवसांनी संध्याकाळी बाळाने नॉर्मल एंट्री केली या जगात! मला त्याच क्षणी फोन आला व बातमी मिळाली - मुलगी झाली आहे :) माझी आई म्हणाली, “लक्ष्मी आली घरी, पण तुझे गुण घेऊन.. जसा तू कधी येणार हे नक्की नसते, तसेच हिचेपण आहे. लोकांची बाळे वेळेआधी येतात, नाहीतर एक-दोन दिवस इकडेतिकडे... ही सहा दिवस लेट आहे...!” मी म्हणालो, “ही नाही, तिचे नाव ‘ईवा’ आहे.

पहिल्यांदा जेव्हा तिला हातात घेतले, तेव्हा वरील सर्व काही डोळ्यासमोरून झर्रकन गेले.. आता लिहितानादेखील जाणवते की यात खास असे काहीच नाही, सर्वसाधारणतः प्रत्येकाच्या आयुष्यात असे दिवस येतात-जातात, यात काय एवढे? थोडा फरक आहे तो एवढाच.. एक वर्तुळ पूर्ण झाले होते. मी माझ्या सासरच्यांकडून त्यांची मुलगी पळवून आणली होती, त्यांना ईवाच्या रूपाने परत त्यांची मुलगी मिळाली आहे व तीदेखील अगदी चिमुकली, गोंडस अशी.

घरी गणपती येतात आमच्या. गणराया आमचे दैवत आहे आईचे, माझे, बायकोचे. पोरीचा पहिलाच गणपती. तिलाही गणराया आवडलेला दिसतो आहे मला. ते कसे समजले, ते नाही शब्दात मांडता येणार, पण.. मला जाणवले आहे. गणपती बुद्धीची देवता... त्याने बुद्धी दिली व फक्त एक मुलगा, नवरा म्हणून असलेला मी.. उत्तम बाबा झालो आहे. दहा महिन्यांची आहे ईवा, ती मला स्पष्ट बा-बा म्हणते. ते शब्द कानावर पडले ना.. शांती, सुख की अन्य काही माहीत नाही... पण मन एकदम भरून येते.. आणि हो आणखी एक झाले आहे - आता माझे डोळे भरून येत नाहीत नुसते, वाहतात... जेव्हा तिला डोसचे इंजेक्शन दिले जाते आणि ती टाहो फोडते... शक्य असते तर.... जाऊ दे. आता मी बाबा आहे!

आजही बाळ दिवसातील जास्तीत जास्त वेळ माझ्याकडे असते. आंघोळ घालण्यापासून, शी-शू साफ करणे, दूध, तिचे अन्न देणे, तिला झोपवणे हे मी करतोच करतो... खूप वेगळा आनंद मिळतो यातून. शक्यतो.. माझा आणखी एक फायदा होतो आहे, तिची प्रत्येक नव्याने करत असलेली हालचाल मी स्वतः पाहिली व शक्य तेव्हा रेकॉर्डही केली. मग तिचे पहिल्यांदा पालथे होणे असो, रांगणे असो, उभे राहण्याचा प्रयत्न करणे असो किंवा तिने नव्याने शिकलेला प्रत्येक शब्द तिच्या तोंडून ऐकणे असो... बाबा असणे म्हणजे काय हे आज समजले आहे, उमजले आहे.. आणि सर्वात महत्त्वाचे यातील सुख म्हणजे काय हे उमजले आहे!

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

10 Sep 2017 - 3:27 pm | गामा पैलवान

दशानन,

ईवलीशी ती ईवा का? मुलगी गोड आहे. लेखही मुलीसारखा गोड आहे! :-)

आ.न.,
-गा.पै.

हाहाहा! खरंच ईवलुशी आहे ती ;)

शिव कन्या's picture

12 Sep 2017 - 1:14 am | शिव कन्या

मनाला स्पर्श करुन गेला अनुभव.