मुंबई नेव्हर सेटल्स

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
3 Sep 2017 - 12:08 am
गाभा: 

ब्लॉग दुवा: http://www.apurvaoka.com/2017/09/mumbai-spirit-monsoon.html

"काहीही म्हण हं, मुंबई नेव्हर स्टॉप्स"
"काहीही म्हण हं, मुंबईच्या स्पिरिटला तोड नाही"
"काहीही म्हण हं, अशा वेळी माणुसकी दिसते"

असे संवाद गेले दोन दिवस ऐकायला येतायत, आणि प्रश्न पडतायत की, हे 'काहीही' जे आहे ते कधी म्हणायचं?, 'अशी वेळ' नसते तेंव्हा कुठे जातं हे 'स्पिरिट'? आणि शुड मुंबई नेव्हर स्टॉप? सोशल मिडिया वरच्या असंख्य संदेशांनी डोकं भंडावून सोडलं होतं. एक तर साचलेल्या पाण्याचे फोटो, व्हिडियो, किंवा मदतीसाठी संपर्क, किंवा मग हे असले 'स्पिरिट' आणि 'माणुसकी' वाले अलंकारिक संदेश.

संकट आलं की मदत करतात लोक एकमेकाला, चांगलीच गोष्ट आहे. हेही खरं की मुंबईत प्रकर्षाने हे जाणवतं. त्याबद्द्ल सलामच, पण या स्पिरिटच्या पडद्यामागे प्रशासन आणि जनता या दोघांच्या चुका किती काळ लपवायच्या? किती वेळ फसवायचं स्वतःला? लोकांनी मदत केली त्यांचा चांगुलपणा आहेच, पण ही परिस्थिती का आली? दर पावसाळ्यात किमान एकदा तरी रेल्वे बंद पडते. भारतातील सर्वाधिक कर भरणा-या शहरांपैकी एक असूनही मुंबईने अशा खालच्या दर्जाच्या पायाभूत सुविधा किती काळ गोड मानायच्या हा प्रश्न आहे.

एक संदेश आला 'आज सगळे मुंबईकर झाले'. अनेक लोकांच्या फेसबुक ट्विटरवरही असं काहीसं पोस्ट होताना दिसलं. काही नेते मंडळी सुद्धा या 'मुंबईकराचं' तोंड भरून कौतुक करत होती. आज 'मुंबईकर' म्हणून गौरवणारे हेच नंतर या मुंबईकराला जाती, धर्म, भाषा, आर्थिक दर्जा, राजकीय भूमिका या गोष्टींमधे विभागतात हे मात्र लोकांच्या लक्षात आलेलं दिसत नव्हतं. मुंबई स्पिरिट, मुंबई स्पिरिट म्हणून अगदी ऊर भरून येत होता लोकांचा अभिमानाने.

हे स्पिरिट राजकीय पक्षांना धारेवर धरण्यात मात्र मागे पडतं. इतरवेळी श्रेय लाटणारे राजकीय पक्ष अशा संकटांच्या वेळी ब्लेम गेम चालू करतात. एकमेकांवर शेरे, आरोप; आणि सामान्य नागरीक सोसतोय. पुन्हा वेड्या आशेवर मतदान करतोय. मुंबईकर पटकन विसरतो बाबा सगळं. मोठा दोष आहे त्याच्यातला. पाणी तुंबल्याच्या दुसर्‍याच दिवसापासून नवे संदेश येऊ लागतात. मुंबई नेव्हर स्टॉप्स. येरे माझ्या मागल्या! म्हणजे तुम्ही कशाही सुविधा द्याव्या, कसेही रस्ते द्यावे, कितीही कर लावावा, आमचा नित्यक्रम अबाधित. खड्डे म्हणा, रेल्वेतली गर्दी म्हणा, रस्त्यावरचे फेरीवाले, हे सगळं सगळं त्या नेव्हर स्टॉप्स च्या बुलडोझर ने दडपलं जातं आणि मुंबईतले लोक गर्दीतून, घाणीतून वाट काढत पुढे चालायला लागतात.

a

फक्त राजकारण्यांचा दोष नव्हे बरं का. हेच ते नेव्हर स्टॉप्स वाले मुंबईकर पुन्हा जिथे तिथे कचरा टाकतात कारण 'सगळेच टाकतात', भरमसाट प्लॅस्टिक वापरतात कारण 'एकाने न वापरून काय होणार आहे?', त्याचं वर्गीकरण करत नाहीत, कारण 'एवढं कोण करत बसणार?'. इतर किरकोळ नियमांचं घाऊक उल्लंघनही आलंच. एकमेकांना संकटकाळी घरी जागा देणारे दुसर्‍या दिवशी चुकून एखाद्याचा पाय पायावर पडला तरी त्याला शिव्या देतात. अनोळखी माणसाला लिफ्ट देणारे अँब्युलन्सलाही जागा देत नाहीत, जरा समोरची गाडी थांबली की हॉर्न वाजवून कलकलाट करतात. स्पिरिट आहे. मी स्वतः रोज किमान एक दोघांना कचरा टाकताना थांबवून सांगतो, पण चांगल्या घरातल्या, सुशिक्षितांचं असंस्कृत वागण्यातलं सातत्य बघून थक्क व्हायला होतं.

मागे अनिल बोकील एकदा म्हणाले होते की भारतीयांचा खरा स्वभाव हा अडचणीच्या समयी दिसतो आणि या उलट बाहेरच्या देशात असतं. आपण अडचणीच्या वेळी संस्कृती दाखवतो, तिथे विकृती दिसते. बीबीसी च्या एका बातमीनुसार, हूस्टन मधे आत्ता पूर आला असता रात्री कर्फ्यू लावण्यात आलाय कारण लूटमारीच्या घटना होऊ नयेत. आनंद महिंद्रांचं त्यावरचं उत्तरही भारतीयांच्या, मुंबईकरांच्या अशा वेळच्या सुसंस्कृतपणाचं कौतुक करणारं आहे, त्याला रियल नेचर म्हणणारं आहे. पण मग एक दोन दिवसात दिसणारी संस्कृती हा मूळ स्वभाव मानायचा का? आणि बाकी वेळी जो बेदरकार, बेजबाबदार पणा दिसतो तो फसवा म्हणायचा? बोकीलांचं मत जरी सुखावणारं असलं तरी ते सत्य नाही असं म्हणायला वाव आहे.

आपत्ती सगळीकडे येऊ शकतात. पण अमेरिकेसारख्या देशात आपत्ती येणं ही शक्यता मान्य करून त्याचं निवारण करण्यासाठी एक पद्धत तयार असते. फ्लोरिडातलं वादळ चार दिवस आधीच कळतं, लोकं सुरक्षित ठिकाणी जातात, प्रशासन सज्ज असतं, सगळं पद्धतशीर. जपानमधल्या भूकंपांचंही तसंच. तिथे तर डिस्टर्बिंग पिक्चर्स बातम्यांमधे दाखवायलाही बंदी असते असं ऐकलं. आणि ती बंदी पाळलीही जाते हे विशेष.

b

मुंबईतही पाऊस प्रचंड होतो हे ठाऊक आहे, मान्य आहे. तरीही प्रत्येकवेळी शासन गडबडतं. २००५ च्या प्रलयाला आज १२ वर्ष होऊन गेली, २००५ च्या एक तृतियांश पाऊस काल पडला, तरीही चित्र तसंच होतं. रस्ते तुंबले, रेल्वे बंद, सगळं तसंच. १२ वर्षात काहीच सुधारणा होऊ नये? आणि मग या कामासाठी असलेल्या हजारो कोटींच्या निधीचा व्यय नेमका कुठे होतो? विचार करण्याची गरज आहे.

मुंबई शहराच्या पायाभूत सुविधांची क्षमता इतकी लोकसंख्या हाताळण्याची नव्हे. आणि आपल्या देशात इतक्या सचोटीने सरकार कामही करत नाही की असं असूनही उत्तम सुविधा राखल्या, दिल्या जाऊ शकतील. लोकसंख्येची वाढ चालूच आहे. प्रगतीच्या नावाखाली बेछूट काँक्रिटीकरणाची वाढ, हरितक्षेत्रातली घट हे ज्या वेगाने चालवलंय ते बघता परिस्थिती काही फार सुधारेल असं दिसत नाही. इतका पाऊस होण्याची ही दुसरी वेळ, धोक्याची दुसरी घंटा होती. तिसरी होऊन पडदा पडायच्या आत हा 'खेळ' बंद व्हायला हवा. अन्यथा सामान्यांच्या आयुष्याचं 'नाटक' होईल.

c

तेंव्हा स्पिरिट आणि माणुसकी असली तरी तिचं अत्यंतिक कौतुक नको. आणि ते स्पिरिट संकट संपता 'उडूनही' जायला नको. आपली जबाबदारी प्रत्येक नागरिकाने ओळखायला हवी, आणि जे झटकतायत त्यांनाही ती जाणवून द्यायला हवी. उत्तम दर्जाच्या सोयी सुविधा हा मुंबईकराचा हक्क आहे, आणि तो त्याने मागायला हवा, आग्रहाने. मुंबई नेव्हर स्टॉप्स सोबतच आता मुंबई नेव्हर सेटल्स ही आपली ओळख व्हायला हवी.

जर याच विषयावरचा इंग्रजी लेख वाचायचा असेल तरः http://www.apurvaoka.com/2017/09/mumbai-rain-flood-spirit-humanity.html

प्रतिक्रिया

रेवती's picture

3 Sep 2017 - 5:05 am | रेवती

बरोबर आहे तुमचे म्हणणे.

वेल्लाभट's picture

3 Sep 2017 - 8:21 am | वेल्लाभट

धन्यवाद

रुपी's picture

3 Sep 2017 - 5:24 am | रुपी

खरं आहे.
अगदी कळकळीने लिहिलंय.

वेल्लाभट's picture

3 Sep 2017 - 8:21 am | वेल्लाभट

धन्यवाद

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

3 Sep 2017 - 6:30 am | योगेश लक्ष्मण बोरोले

व्यवस्थित लिहीलेत. आता तरी परीणामकारक व दिर्घकालिन उपाययोजना करायला हव्यात. सर्वात महत्वाचे म्हणजे, मुंबई स्पिरीट हे आपात्कालिन स्थितीतच न दिसता, दैनंदिन व्यवहारातुन, नियम काटेकोरपणे पाळुन व पर्यावरणाची काळजी घेउन समोर आले पाहिजे.

वेल्लाभट's picture

3 Sep 2017 - 8:20 am | वेल्लाभट

खरं आहे तुमचं ! जागरुकता अत्यन्त गरजेची आहे आणि ती शिक्षणातून निर्माण होणं सर्वोत्तम. पण तो एक वेगळाच विषय आहे.

:)

पिलीयन रायडर's picture

3 Sep 2017 - 8:33 am | पिलीयन रायडर

डॉ. दीपक अमरापूरकर हयांची बातमी वाचल्यापासूनतर फार अस्वस्थ आहे..

तू जे लिहिलं आहेस ते सगळं खरंय, पण काही बदल होईल अशी आशा मला तरी वाटत नाही.

भारतीयांची चलता है मनोवृत्ती फार बेक्कार आहे.

वेल्लाभट's picture

3 Sep 2017 - 10:00 am | वेल्लाभट

मनापासून विचाराल तर मलाही वाटत नाही यात बदल होईल. झाला तर वाईटाकडेच नेईल. मेंदू नसलेली शरीरं वावरतात इकडे आताशा.

न्यायालय पालिकेविरुद्ध ची केस दाखल करून घ्यायलाच नकार देतं, can u imagine? शहाण्या माणसाला नक्की कळेल की न्यायालय कोण चालवतं ते

जेम्स वांड's picture

3 Sep 2017 - 11:23 am | जेम्स वांड

सहमत आहे, तुमची कळकळ तुमच्या लिखाणातून रीतसर पोचते आहे, सामाजिक स्वभावदोषांपैकी एक आहे भारतीयांचा निष्क्रियता, त्यात 'ठेविले अनंते' संस्कारांची भर. मुंबईचा हा प्रश्न लवकर धसास लागो ही गणरायाचरणी प्रार्थना

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

6 Sep 2017 - 12:06 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

योग्य मांडली आहेस रे वेल्ल्या. लोकल गाड्या,मुंबईकरांचा कथित सोशिकपणा,डबेवाले ह्यांचे प्रमाणाबाहेर झालेले कवतिक होत असते. मग मिडिया असो वा तुझे ते फोर्ब्स नियत्कालिक वा परदेशी चॅनेल्स. समोर बाँब फुटून माणसे मेली तरी मुंबईकर ८:४७ ची व्ही.टी. फास्ट पकडणारच ह्याचे कौतुक.

रामपुरी's picture

7 Sep 2017 - 10:53 pm | रामपुरी

" मग या कामासाठी असलेल्या हजारो कोटींच्या निधीचा व्यय नेमका कुठे होतो"
आता हे काय सांगायलाच पाहिजे? काहिही कामधंदा न करता परदेश वार्‍या, हेलिकॉप्टर मधून छायाचित्रण, नवीन बंगला इत्यादी गोष्टी काय फुकट येत नाहीत.

दूरदर्शन वर काही वर्षा पूर्वी एक जाहिरात यायची दोन टोमॅटो च्या बरणी मध्ये ३-४ टोमॅटो ठेवले तर सर्वच टोमॅटो चेपून खराब होतात अश्या आशयाच्या लोकसंख्या वाढी च्या जागृती विषयाची जाहिरात होती ती. तेच उदाहरण आता मुंबई च्या बाबतीत लागू होत आहे. तुम्ही शहरे किती पण vartically वाढू दिले तर अजून आपण गाळात खचतंच जाणार आहोत.
सरकार, न्यायालय, राज्यकर्ते, समाज यांनी किती पण चांगले कामे करून मुंबई आणि तत्सम शहराचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला तरी ते शक्य नाही, जो पर्यंत लोकसंख्या आटोक्यात येत नाही. लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर या पेक्षा जास्त गंभीर प्रश्न येणार आहेत.
या सर्व संस्था मूळ दुखणे बाजूला ठेवून वर वर मलमपट्टी करून काही दिवस दुखणे लांबवू शकतील पण दुखणे नाहीसे होणार नाही. त्या मुळे सर्वानी मूळ लोकसंख्या वाढीच्या प्रश्न कडे लक्ष देऊन यावर उपाय केला तर आपो आप सर्वे प्रश्न सुटतील. अन्यथा राजकारण आणि सरकार वर टीका, न्यायालये लढे, लेख यांनी काही सध्या होणार नाही.

हो पण फक्त प्रजननातून होणारी लोकसंख्या वाढ अडचण नाहीये, तिचं जे असंतुलित विभाजन झालंय ना, ती अडचण आहे. शहरांमधली आवक बंद्/नियंत्रित करणं अत्यंत गरजेचं आहे. शहरं म्हणजे, मुंबई, बंगळुरू, दिल्ली इ. लेखापुरतं म्हणायचं तर मुंबई.

मुंबईचा खचकोळ झालाय. अतिरेक.

मराठी_माणूस's picture

8 Sep 2017 - 2:50 pm | मराठी_माणूस

अगदी बरोबर. विकासाचे असंतुलन. प्रमुख कारण.
मुंबई सोडुन उर्वरीत महाराष्ट्राकडे दुर्लक्ष.