रुक्मिनि म्हणे

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
29 Aug 2017 - 2:50 pm

१९८८ मध्ये श्री. चंद्रकांत काळे यांनी शब्दवेध या संस्थेची स्थापना केली. शब्द व स्वर यांचे वेड असलेल्या माणसांनी एकत्र येऊन पहिला कार्यक्रम केला तो "अमृतगाथा " संतांनी भक्तीरचना रचल्या; त्यातील लोकसंगीताशी नाळ असलेल्या काही रचना एकत्र करून.सुरवात केली. पुढे त्यांनी कै. ग्रेस यांच्या कवितांवर सांजवेळ, प्रीतरंग, शेवंतीचे बन, आख्यान तुकोबाराय असे मराठी कवितांवरचे कार्यक्रम सादर केले. आंतरभारतीचा कार्यक्रम म्हणून गुरूवर्य रविंद्रनाथ टागोर यांच्या कवितांचे भाषांतर व "नाटक्याचे तारे " हा कै. पटवर्धन लिखित १९०५ साली लिहलेल्या तत्कालीन नाटकांवरच्या बहारदार टिपणांचे सादरीकरण असे मनोरंजक प्रयोगही आम्ही पाहिले, चुकलो, ऐकले. शेवंतीचे बनमध्ये निरनिराळ्या बोलीभाषेतल्या लोककविता होत्या तर प्रीतरंगमध्ये नामांकित कवींच्या प्रेमकविता.
आज शेवंतीच्या बनातील एक लोककविता बघू व पुढे प्रीतरंग मधील माझ्या आवडत्या कविता.

"अन्नपूर्णा" या लेखात आपण पाहिले की देव हा केवळ आकाशाकडे तोंड करून करुणेची भीक मागावयाची "चीज" नव्हे. तो तर आपला सखा असतो, शेजारीही असतो. आपल्या भावभावना त्याच्या कुटुंबात तशाच तीव्रतेने असतात. नवरा शेजारीणीकडे जरा जास्तच लक्ष देतो आहे असे वाटले तर बायको अकांडतांडव करते तर मग रुक्मिणीला जर काही संशय आला तर तिने कां फटाके फोडू नयेत ? ऐका तर पंढरपूरचे नाट्य

रुक्मिनी विचारति देवा जनीचं काय नातं ?
विठ्ठल सांगेयतो पाखरू वस्तीला आल होत !!

जनामाय धुणं धुती विठ्ठल खडकावरती उभा
दोघांच्या गं पिरतीनं खळालली चंद्रभागा !
चंद्रभागेच्या पाण्याला झाली जनाई घाबरी
सावळा पांडुरंग घेतो आडव्या घागरी !!

रुक्मिनी म्हणति गेली देवाची अक्कल
सोडून शालजोडी घेतो जनाईची वाकळ !
रुक्मिनी म्हनिते देवा फराळाचं केलं
देवाला गे आवडल जनाईचे ताक शिळं !!

रुक्मिनी म्हणते देवा तुम्हासी लाज थोडी
जनाईच्या मंदिरात वाकळाची काय गोडी !
रुक्माई म्हणे मी करिते पुंजा पाती
मंदिरात जनाई कशाला एवढ्या राती !!

विठ्ठलाच्या पाया रुक्मिनी लाविति दही
खर सांगा वो देवा जना तुमची कोन व्हावी
विठ्ठल देव म्हणे नको रुकमाई रागे भरू
नेणती गं बाय माझी जनी धर्माचं लेकरू !!

(पुंजा पांती.. पुजा साहित्याची जुळवाजुळव)

रुक्मिणी सुरवात तर, सगळ्या बायका करतात त्याप्रमाणे, अगदी साळसूदपणे, जणुकाही सहजपणे प्रश्न विचारत आहे असा आव आणून, करते " ही जनी, हिचे आणि तुमचे काय नाते हो ? " आता विठ्ठल हा पूर्वाश्रमीचा गोकुळातला कृष्ण, प्रत्येक गोपी त्याला विचारणारच की ’राधा तुझी कोण ? तर हा प्रश्न त्याला काही नविन नव्हताच. पण सुरवातच आहे म्हाणून तो मुद्दामच खवचट उत्तर देतो. "पाखरू वस्तीला आलं होत" आता पाहुणे रात्रीला वस्तीला येतात हे ठीक हो पण इथे पाखरू म्हणावयाची गरज होती काय ?
जनी चंद्रभागेवर धुण धूत असतांना हा विठ्ठल, अठ्ठावीस युगे पायाखाली असलेली वीट सोडून तीरावरील खडकावर उभा आहे हे काय रुकमाईच्या नजरतून सुटलं असणार ? ह्या दोघांच्या पिरतीने चंद्रभागा खळाळणार असेल तर रखुमाई खवळणाराच की हो ! त्यात हा नुसता उभा राहिला आहे असे नाही. तिच्या घागरीही भरून देतो आहे. नदीवर पाणी भरतांना घागर आडवी करूनच पाणी भरावे लागते आणि चंद्रभागा तर खळालली आहे म्हणजे पाण्याच्या जोराने घागर हातातून सुटली तर काय ह्या भीतीने जनी घाबरीघुबरी झाली आहे. अशा वेळी स्वत: घागरी भरणे हे विठूला भागच आहे; काय करणार बिचारा !
आता रुक्माईचा पारा चढू लागलेला असतो. ती देवाची अक्कल काढते व त्याला "तुम्हासी लाज थोडी " असे सुनवावयास कमी करत नाही. दिवसाभरात भक्तांच्या गर्दीत विठ्ठल थोडे दुर्लक्षच करतो पण रात्री झोपावयाच्या वेळीही, पायांना दही लावतांना ( आपल्याकडे लोणी लावावयाची पद्धत होती पण लोकगीतात दह्यावर भागवले आहे) रुक्मिणीचा राग गेलेला नाही हे पाहून विठ्ठल आता रखमाईचीच समजूत घालत आहे, म्हणतो "रुकमाई असा राग धरू नकोस, अगं, ही अजाण जनी म्हणजे माझे धर्माचे लेकरू आहे " पहिल्या कडव्यातले "पाखरू" आता "लेकरू" झाले आहे !

ही सुरेख रचना श्री.चंद्रकांत काळे यांनी अप्रतिम गाईली आहे. आता हे गाणे (फोटोप्रमाणे) मिपा वर कसे द्यावयाचे हे माहीत नसल्याने श्री. आदूबाळ यांना विचारले. त्यांनी तातडीने सांगितले soundcloud किंवा mediafire वर upload करा व लिन्क paste करा आता दोन्ही ठिकाणी अपलोड केले पण लिन्क देणे काही जमत नाही. बघू. पुण्यात कोणी गुरू भेटला तर आपल्या आनंदात भर घालता येईल.

"शब्दवेध" ने "प्रीतरंग" या कार्यक्रमात १८ कवींच्या ४३ कविता सादर केल्या होत्या. त्यात आमच्या ओळखीची ( ज्यांच्या २५-३० कविता पाठ ते ओळखीचे ! ) वसंत-विन्दा-मंगेश, महानोर, इन्दिरा संत बोरकर ही होतीच. असा विचार आहे कीं त्याच्या कविताही इथे द्याव्यात. जरासा फरक एवढाच की मला या कविता का आवडतात हे सांगत बसावया ऐवजी मिपा मधील रसिक व कवी-कवीयत्री यांनीच ह्या किमान पन्नास वर्षे झालेल्या कविता आजही तितक्याच "ताज्या" वाटतात का ? हे आता मला सांगावे.
शरद

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

पैसा's picture

30 Aug 2017 - 12:33 am | पैसा

रसग्रहण आवडले

सुरेख लिहिले आहे. लोक-कविता आवडली. अजून असे काही लिहा, ही विनंती.

सतिश गावडे's picture

8 Oct 2017 - 12:27 pm | सतिश गावडे

कविता आणि रसग्रहण आवडले.

"रुक्मिनि म्हणे" वाचल्यावर मला लगेच आठवले ते आम्ही लहानपणी भजनात तारस्वरात ओरडत असू ते पद:

चंद्रभागेला पूर आला, पाणी लागले पायरीला
रुक्मिनि म्हणे अहो विठ्ठला, पुंडलीक आपला बुडाला

पिलीयन रायडर's picture

10 Oct 2017 - 7:41 am | पिलीयन रायडर

शेवंतीचे बन हा कार्यक्रमच फार सुंदर आहे. त्यातलं हे गाणं माझंही फार आवडतं आहे.

प्रीतरंग सुद्धा आहे का तुमच्याकडे? त्यात "कळते मज सारे.." किंवा "छे ग आता कशी रहावी.." किंवा "डाळींबीच्या डहाळीशी.." ह्या कविता फार सुंदर गायल्या होत्या. मला हव्या आहेत केव्हापासून..

शरद's picture

11 Oct 2017 - 6:25 am | शरद

कसे पपाठता येईल सांगा.
शरद