एक अ(भू)विस्मरणीय सामना

१००मित्र's picture
१००मित्र in जनातलं, मनातलं
25 Aug 2017 - 9:20 am

एक थरारक सामना

श्री लंका- भारत दरम्यानची दुसरा वन डे सामना जर कुणी पहिला असेल, तर तो नक्की हेच म्हणेल. म्हणजे जवळ-जवळ हातातून गेलेला सामना पुन्हा हातात आणायचा, तोही एक हाती , फारफार तर एक-दोघांनी , असं ह्या सामन्यात २दा पाहायला मिळालं. सामना तसा टिपिकल एक दिवसीय अटीतटीचा न होताही दीर्घकाळ राहिलेला थरार, टिच्चून केलेली गोलंदाजी; गोलंदाजी अशा प्रकारे होत नसताना आणि असताना खालावलेलं किंवा उंचावलेलं संघाचं मनोबल (जे क्षेत्ररक्षण करताना स्पष्ट जाणवत होतं) ह्या अगदी खास बाबी ह्या सामन्यात पहावयाला मिळाल्या.

विराट ने नाणेफेक जिंकून (मला वाटतं यात तो खूप सुदैवी ठरलाय) श्रीलंकेला फलंदाजी दिली. सुरुवात छान झाली. पुन्हा एकदा , बढती मिळालेला डीकवेला हा यष्टीरक्षक-फलंदाज उत्तम खेळूनही मोठा स्कोर नाही करू शकला. लक्षात असू द्या – कसोटी मालिकेत फक्त हाच फलंदाज प्रत्येक सामन्यात चमकलाय. तो, सिरीवर्धन आणि कपुगेदरा ह्या तिघांचा अपवाद सोडता, कुणीच फलंदाजीत चमकले नाही.परिणामी २३० (पावसामुळे सुधारित लक्ष्य) भारतापुढे ठेवलं गेलं. बुमारा ने ४ तर चहल (हा कसोटीत का नव्हत कोण जाणे) ह्या लेग स्पिनर ने २ असे बळी मिळविले.

खणखणीत सुरुवात

रोहित-शिखर जोडीने धडाकेबाज सुरुवात केली. प्रचंड तोड फोड न करताही ६-७ च्या सरासरीने , फक्त योग्य संधी साधत धावा कशा करता येतात, ह्याचा जणू काही एक वस्तुपाठच. तरीही मला नेहमी वाटत आलंय की रोहित शर्माने त्याच्या temparament वर थोडं काम करायलाच हवंय. “आज स्वारी जरा विशेष फॉर्म मध्ये दिसतीये” म्हणता म्हणता हा विकेट टाकून मोकळा झालेला असतो. पलीकडच्या शिखर धवन कडून तरी शिकेल अशी अपेक्षा. आज शिखरचं अर्ध शतक थोडक्यात हुकलं. पण एकंदरीत त्याचा धावा घ्यायचा सपाटा पहिला की मात्र कौतुक वाटल्याखेरीज राहवत नाही. भारतीय संघ म्हटला, की ,प्रतिस्पर्ध्यांच्या मनात विराट बरोबर शिखर च्या नावानेही धडकी भारत असणार! तर ह्या जोडीने १०० ची भागीदारी करून दिली. त्यावेळी अनेक श्रीलंकन चाहते सामना सोडून गेले असणार!

आणि धनंजय चा “अखिल” भारत संघाला दणका!

म्हटल्याप्रमाणे “वेल-सेट” रोहित चा बळी अकिला दनंजया अर्थात अखिल धनंजय ने मिळविला आणि ह्या मधल्या काळात (फक्त ३च षटकांत) त्याने ३ प्रमुख फलंदाज – केदार जाधव,विराट कोहली,के एल राहुल हे त्रिफळा चीत करून परत धाडले. केवळ अप्रतीम असे हे तीनही चेंडू होते. अजय जडेजा म्हणाल्याप्रमाणे हे सर्व त्या चेंडूच्या हवेतल्या उंचीला चकले (बीट झाले). हल्ली बेदी-प्रसन्ना-शेन वॉर्न सारखी उंची जास्त मंडळी देत नाहीत- मर्यादित षटकांच्या सामन्यात तर नाहीच नाही. त्या पार्श्व भूमीवर आणि भारत अत्यंत भक्कम पणे खेळत असतानादेखील अकिला ने घेतलेल्या जोखमीबद्दल व स्वत:च्या गोलंदाजीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्याचे मनापासून कौतुक ! तर हे ४ जण बाद केलेच. हार्दिक पंड्या सुधा ह्या उंचीला सपशेल फसला. अकिला ने त्याचा चांगला अभ्यास केलेला दिसला. त्याला अकिला ने क्रीज बाहेर आमंत्रित केलं , हा हुकला आणि डीकवेला ने उरलेलं काम सराईतपणे पणे केलं. हार्दिक अत्यंत गुणी आणि जिगरबाज आहे, जोडीला थोडा आणखी संयम असता , तर त्याने इतकी षटकं लंकेला टाकायला नसती लावली. असो. त्यानंतर अक्षर पटेल काही वेळ टिकला , पण अशाच एका सुंदर चेंडूवर तो पायचीत झाला. उंच्यापुऱ्या फलंदाजाला थोडा खाली राहिलेला चेंडू खेळायला त्रास होतो; असंच काहीसं, गेल्या सामन्याच्या स्टार - अक्षर बाबतीत घडलं आणि परिणामी भारत ७ बाद १३१.

आता काय..... “संपलंच” की !

भुवनेश्वर कुमार, बुमारा, चहल हे ३ फलंदाज राहिलेले. नाही म्हणायला पलीकडे धोनी हा मोठा अडथळा होता, पण हे ३ गोलंदाज पटकन बाद होतीलच की, असं श्रीलंकेच्या गोटात दिसत होतं. खास करून अंजेलो मॅथ्युज ने घेतलेला अप्रतीम झेल बघून असंच वाटायला लागलं होतं. शिवाय अकिला काही एकटा नव्हता; २९८ एक दिवसीय बळी ज्याच्या नावावर आहेत , असा प्रसिद्ध लसित मलिंगा सुद्धा होता. त्या जीवावरच दनंजयला शेवटी वापरू म्हणून थरंगा ने दुसरे गोलंदाज वापरायला घेतले, आणि भुवि-धोनी ह्या जगातल्या सर्वात थंड डोक्याच्या जोडीला स्थिरावायला वेळ मिळाला.

भुवनेश्वर चा अप्रतीम निश्चय

आपण एखाद्याच्या संयमाचं कौतुक करतो. प्रश्नच नाही, खूपच मोठ्ठा गुण आहे तो , परंतु हा संयम थोडा अधिक प्रखर होतो , जर एखाद्या निश्चयाचा तुम्हाला भक्कम आधार असेल तर. आपल्याला माहित नसतं ,पण हल्ली हे खेळाडू त्यांच्या खेळाचा , सामन्यांचा अतिशय बारकाईने अभ्यास करतात, धोरणे ठरवितात.आत्ताच २ कसोटी सामने जिंकल्यावर ३ रा सामना जिंकल्यावर “विक्रम” वगैरे होईल असं म्हटल्यावर विराट म्हणाला होता , की हे विक्रम खेळाडूंना जास्त “विचलित” करतात, त्यामुळे सेशन बाय सेशन असंच आमचं धोरण राहणार आहे! तर तसच ह्या वेळी जाणवलं. भुवि चा निश्चय , त्याला धोनी च्या धोरणाची साथ ( टप्प्या टप्प्या नुसार) हे सगळं काय जादू करू शकतात ते. १०० धावा , समोर ६ बळी (कसोटीत नव्हे बरं का) घेतलेला एक अत्यंत धोकादायक गोलंदाज, आणि स्वत: कसलेला फलंदाज नसणे , असं असूनही निश्चयचं बळ जर तुमच्या साथीला असेल, तर काय घडू शकत नाही ?

धोनी ... अर्थात “कृष्ण”

प्रथम “फक्त टिकून रहा” असा सल्ला देणारा धोनी भूवी सुंदर खेळतोय – तेही धोक्यातून थोडंसं बाहेर आल्यावरच- दुय्यम भूमिका घेतो आणि भूवी हातातून गेलेला सामना केवळ निश्चय , संयम, जिद्द आणि हिम्मत ह्याच्या आधारावर संघाला नाबाद १०० ची भागीदारी करून जिंकून देतो हे सर्व पाहणं , म्हणजे एक अप्रतीम योग. हा जणू काही त्या भुवनेश्वर रुपी अर्जुनाचा सारथी “कृष्ण”च !

त्यामुळे “सामन्याचा मानकरी” हा किताब जरी अकिला दनंजाया ला मिळाला असला , तरीही (कोठेही त्याला कमी न लेखता किंवा श्रेय हिरावून न घेता) माझ्यासाठी भुवनेश्वर कुमारच

टीप : धोनी च्या यष्टींवर चेंडू लागून देखील बेल्स पडल्या नाहीत , अर्थात “हिम्मत हो मर्दां तो ......

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

25 Aug 2017 - 12:30 pm | संजय पाटिल

छान समालोचन! मॅच बघायला मिळाली नाही.....

१००मित्र's picture

29 Aug 2017 - 4:35 pm | १००मित्र

धन्यवाद

अरे! जिंकलो की! सहा बळी गेल्यावर मी वाहिनी बदलून चक्क मराठी मालिका बघत बसलो. नंतर मध्यरात्री मोबाईलवर बातम्या पाहिल्या तर तीन गडी राखून भारताचा विजय! वा रे पठ्ठे...! लय भारी.

१००मित्र's picture

29 Aug 2017 - 4:39 pm | १००मित्र

same with me !

श्रीगुरुजी's picture

25 Aug 2017 - 12:54 pm | श्रीगुरुजी

मस्त वर्णन! भारताचे ३ बाद झाल्यानंतरच्या चेंडूपासून संपूर्ण सामना शेवटपर्यंत बघितला. मजा आली. बर्‍याच दिवसांनी चेंडूला उंची देऊन फलंदाजांना चकविणारा गोलंदाज पहायला मिळाला. सध्याचे बहुतेक सर्व फिरकी गोलंदाज फ्लॅट चेंडू टाकतात. बळी मिळविण्यापेक्षा धावा रोखणे हाच त्यामागे उद्देश असतो. काही वर्षांपूर्वी रमेश पोवार चेंडूला भरपूर उंची देऊन चेंडू टाकायचा. परंतु त्याच्यानंतर तसे चेंडू टाकणारे फारसे कोणी आढळत नाही.

हो , t २० पासून तर गोलंदाज अधिकच बचावात्मक झालेत. नाही म्हणायला अश्विन जरा जरा उंची देतो; पण ठोकायला लागल्यावर स्वारी पुन्हा “flat” कडे वळते. जडेजा तर चक्क वेगवान (९० च्या वेगाने) ऑफ ब्रेक्सच टाकतो. इम्रान ताहीर आणि कुलदीप यादव मात्र थोडी उंची देतात. युजवेन्द्र चहल देत नाही.

दुर्गविहारी's picture

25 Aug 2017 - 1:11 pm | दुर्गविहारी

सामन्याचा लाईव्ह थरार तुम्ही धाग्यातुन आणलाय. अप्रतिम लिहीता.
बाकी पाकिस्तान विरुद्ध सामना हरणे आणि कुंबळे प्रकरण यामुळे उर्मटशिरोमणी कोहली डोक्यात गेलाय. त्यानंतर भारताचा एकही सामना पाहिला नाही.

हा हा हा.
काही काहींना विराट चा attitude जरा डोक्यात जातो हे खरंय. ते सोडलं, तर त्याचा सहकाऱ्यांवर असलेला विश्वास आणि त्याची प्रयोगांची तयारी मात्र (त्या सामन्यानंतर) पाहण्यासारखी आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2017 - 2:32 pm | अमरेंद्र बाहुबली

काही नाही हो सर्व सट्टेबाजांची कृपा! पैसे कमावण्यासाठी मँच निर्णायक क्षणी आणून फीरवायची व पैसे कमवायचे. भारत पाक मँच मध्ये जडेजाला 12 वा खेळाडू पाणी घेऊन येतो. व काहीतरी सांगतो. पुढच्याच बाँलला पांड्या रनआऊट. व्वा!!! जरा ईकडेही नजर फिरवा.
https://youtu.be/8IHAmkRHklU

श्रीगुरुजी's picture

25 Aug 2017 - 2:44 pm | श्रीगुरुजी

वाटच बघत होतो कधी सट्टेबाज येताहेत आणि कधी असल्या प्रतिक्रिया देतात याची.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2017 - 4:09 pm | अमरेंद्र बाहुबली

श्रीगुरूजी प्रतिसाद नीट वाचा. त्यात कुठेही भाजप वा मोदींवर टिका नाही.

फारएन्ड's picture

25 Aug 2017 - 4:12 pm | फारएन्ड

मस्त वर्णन. मी काल क्लिप्स पाहिल्या त्यात असे वाटले की किमान २-३ जण लेग स्पिन खेळायला गेले व गुगलीवर आउट झाले. फ्लाइट जाणवली नाही. पण आता परत पाहतो. कलकत्याला सचिन ने वॉर्न ला उडवला होता त्याची आठवण करून देणार्‍या विकेट्स होत्या. किंवा मोईन खान वाली.

हा धनंजय ऑफ स्पिन टाकतो , कि लेग ब्रेक, गुगली , कळतच नाही. पण त्याला जरा अति आत्मविश्वासात ठोकायला गेले इतकं खरं. फारसं टार्गेट नसतांना झालेल्या चुका.पुढच्याही सामन्यात हेच पाहिलं कि आपण !

सतिश म्हेत्रे's picture

25 Aug 2017 - 7:01 pm | सतिश म्हेत्रे

वर्णन मस्त आहे. सामना पाहायला मिलाला नाही याची खंत आहे.

त्याच्या पुढचा बघितलात ना ? कॉपी पेस्टच जवळपास. राहुल आणि जाधव ह्यांचं तंत्र सदोष !