अनवट किल्ले १७: गुरुचरित्राचा दाखला , महिपालगड(Mahipalgad )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
24 Aug 2017 - 11:19 am

काही किल्ल्यांची नावेच त्याचे प्राचिनत्व स्पष्ट करतात. असाच एक बेळगावजवळचा किल्ला "महिपालगड". प्राचीन काळात महिपाल नावाच्या राजाने हा किल्ला बांधला असे स्थानिक लोक सांगतात. सभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. महिपाल गडाखालील वैजनाथ देवालय पाहता, हा गड प्राचिन आहे याची साक्ष पटते. तसेच ब्रिटीश काळात गडावरील लोकांचा लढाऊ बाणा लक्षात घेऊन, त्यांच्यासाठी लष्करात राखीव जागा ठेवल्या जात, हे लक्षात घेता या गडाचे लष्करी महत्व मोठे होते यात शंका नाही. औरंगजेबाच्या वावटळीत काकतीचा देसाई आणि हुक्केरीचा देसाई अलगोंडा यांनी मोगलातर्फे या भागातील किल्ले ताब्यात घेतले होते, त्यात कदाचित हा असेल.
ईथे जायचे म्हणजे दोन मार्ग आहेत.
१ ) बेळगाव- सावंतवाडी रस्त्यावर शिनोळी नावाचे गाव आहे. इथुन देवरेवाडी नावाच्या गावाकडे रस्ता जातो. हाच डांबरी रस्ता पुढे थेट गडावर जातो. शिवाय जाता जाता आरोग्यभवानी , वैजनाथाचे मंदिर व कार्तिकस्वामी गुंफा पहायला मिळते. बेळगाववरून गडावर यायला बससेवा आहेत. या बसेसच्या वेळा सकाळी ८.३०, १०.०० ( देवरेवाडी),१२.००, २.००( देवरेवाडी), ४.००, ७.००, ९.००( मुक्कामी). स्वताची गाडी असेल तर कोल्हापुर- बेळगाव रस्त्यावर यमनापुर गावातून थेट चंदगड रस्त्याला लागायचे आणि वर सांगितल्याप्रमाणे शिनोळी मार्गे गडावर.
२ ) दुसरा मार्ग म्हणजे गडहिंगलजमार्गे कोवाड ते थेट महिपालगड असा आहे. पण कच्चा रस्ता आणि वैजनाथाचे मंदिर दुसर्‍या बाजुला राहिल्यामुळे हा मार्ग सोयीचा नाही.
mhp1
महिपालगड परिसराचा नकाशा
मी बेळगाव परिसरातील गड पहायचे ठरविले. आधी हुन्नुरगड पाहून बेळगाव गाठले. तिथला भुईकोट पाहून दुसर्‍या दिवशी महिपालगडाचा प्लॅन केला. पण दुसरा दिवस रंगपंचमीचा होता. त्यामुळे बससेवा बंद केली गेली. सहाजीकच एस.टी.ने शिनोळी गाठले. इथे देवरेवाडीपर्यंत जाण्यासाठी काहीही मिळणार नाही हे समजल्यानंतर लेफ्ट-राईट शिवाय पर्याय नव्हता. चलो देवरेवाडी. चालत निघाल्यानंतर बरेच लष्करी ट्रक ये जा करीत होते. महिपालगडाच्या शेजारच्या पठारावर हे लष्करी जवान प्रस्तरारोहणाचा व ईतर काही साहसी गोष्टींचा सराव करतात असे समजले. वाटेत दुतर्फा स्टीलचे कारखाने दिसत होते.
mhp2
समोर आडव्या भिंतीसारखा पसरलेला महिपालगड दिसत होता.
गावात रंगपंचमीचा यथेच्छ धुडगुस चालु होता. त्यामुळे गावाच्या आधीच उजव्या बाजुच्या शेताडीत घुसलो आणि एक देउळ दिसले त्याच्या दिशेने चालु लागलो.
mhp29
एक सुंदर गजाननाची मुर्ती असलेले मंदिर पाहून डांबरी रस्ता गाठला. थोडा चढ चढल्याबरोबर एक मंदिराचे संकुल सामोरे आले.
हे होते वैजनाथ व आरोग्यभवानीचे मंदिर. श्री गुरु चरित्राच्या १४ व्या अध्यायात या स्थानाचा दक्षिणेतील महाक्षेत्र असा उल्लेख आहे. दत्त संप्रदायात नरसिंह सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या ठिकाणांमधे औदुंबर, नरसोबावाडी आणि गानगापूर या ठिकाणांचा प्रामुख्याने समावेश होतो. गुरुचरित्रात उल्लेख असणार्या ठिकाणांमधे गुप्तरुपाने गुरुंचे वास्तव्य जेथे १२ वर्षे होते ते हेच ठिकाण.
गुरुचरित्र पाठ करताना आज अनेक वर्षे त्यात पुढिल श्लोक वाचनात येई.
ऐसेपरी सांगोनी !! श्रीगुरु निघाले तेथोनी !!
जेथे असे आरोग्यभवानी !! वैजनाथ महाक्षेत्र !! (अध्याय १४)
आज पर्यंत हे ठिकाण म्हणजे परळी वैजनाथ असावे असेच वाटत होते. परंतु नरसिंह सरस्वतींचे जीवन कार्य व वास्तव्य असणार्या ठिकाणांशी स्थान समिपता, प्राचिनता तसेच उल्लेखित आरोग्यभवानी देवीचे मंदिर ( परिसर दुर्मिळ वनौषधीसाठी देखील प्रसिद्ध आहे )आणि तेथील दत्त पादुकांचे स्थान इ. पाहतामात्र हे वर उल्लेख केलेले ठिकाणच असावे असे वाटते.
mhp3
मुख्य मंदिर ११ व्या शतकात बांधलेले आहे. प्रवेशद्वारातच एक शिलालेख आहे.
mhp4
मंदिरासमोर सुंदर नंदी आहे.
mhp5
गाभार्‍यात भव्य शिवलिंग आहे.
mhp6
वैजनाथ मंदिराला जोडून बाजूला आरोग्य भवानीचे मंदिर आहे.
mhp7
ही आरोग्य भवानी अष्टभूजा आहे.भक्तांच्या आरोग्य विषयक कामना आरोग्यभवानी पुर्ण करते. मुर्ती दोन हात उंचीची अष्ट्भुजारुप आहे, तसेच चेहर्यावरील भाव थोडेसे उग्र आहेत. दोन्ही मंदिरे चालुक्य शैलीत आहेत.
mhp8
मंदिरातील खांब अत्यंत आकर्षक व घाटदार आहेत.
mhp9

mhp10

mhp12
मंदिराच्या मागे चवदार पाण्याचे घडीव दगडाने बांधलेले पवित्र कुंड आहे. वैजनाथ हे सार्‍या पंचक्रोशीचे तीर्थस्थळ आहे. आजुबाजुला असलेल्या जंगलातील विपुल औषधी वनस्पतींमुळे हा वैद्यनाथ ईथे विराजमान आहे अशी गावकर्‍यांची श्रध्दा. या सर्व मंदिर परिसराचे व्यवस्थापन कोल्हापुरच्या आंबाबाई देवस्थान समितीमार्फत केले जाते. या परिसरात मुक्कामासाठी धर्मशाळाही बांधलेली आहे. महाशिवरात्रीला व चौथ्या श्रावणी सोमवारी इथे यात्रा असते.
हि मंदिरे पाहून झाली कि पुढे निघायचे दहा-पंधरा मिनीटे चालीवर थोडी सपाटी येते. इथे डाव्या हाताला डोंगराच्या अर्ध्या उंचीवर गुहा पहायला मिळते. तिथवर जाणारी पायवाट हि दिसते. हिला "कार्तिकस्वामी गुंफा" म्हणतात. का? कोणास ठावूक?
mhp11
मात्र हि नैसर्गिक गुंफा आवर्जुन पहाण्याजोगी आहे. आत थंडावा असतो. हिला उजव्या हाताला एक फाटा फुटला आहे. इथे मातीमधेच कोरलेल्या पायर्‍या डावीकडे वळून खाली उतरतात. बर्‍याचदा या पायर्‍यावर ओल असते, जपुन उतरायचे. या पुर्ण वाटेमधे मिट्ट काळोख आहे, त्यामुळे बॅटरी किंवा मेणबत्ती आवश्यकच. थोडे खाली उतरल्यानंतर समोर गार ठणक पाण्याचे कुंड दिसते. इथे उतरल्यानंतर घसरुन पडु नये यासाठी फांद्या कापून आडव्या लावल्या आहेत. हे पाणी पिण्याजोगे आहे असे म्हणले जाते. मला मात्र रंग मातकट वाटला. एक अनोखी साहसाची प्रचिती हि गुहा पाहुन येते.
यानंतर पुन्हा डांबरी सडकेवर येउन मोठा वळसा घालून गडावर जाता येत. ज्याना बसने यावयाचे आहे, त्यानी आधी गड पाहून घ्यावा आणि उतरताना हि दोन्ही ठिकाणे निंवातपणे पहाता येतात. मी मात्र तंगडतोड वाचविण्यासाठी एक झाडीतला शॉर्ट्कट पकडला आणि थेट गडाच्या प्रवेशद्वारापाशीच दाखल झालो. तिथे महिपालगड या गावचे सरपंच बसले होते. त्यांनी अनोळखी व्यक्ती पाहून मला थांबवले आणि सगळी चौकशी केली. दोन दिवस आधी गडावर दरोड्याचा प्रयत्न झाला होता म्हणे, म्हणुन हि खबरदारी.
mhp13
महिपालगड किल्ल्याचा नकाशा
या ठिकाणीच गडाचा बसस्टॉप आहे व प्राथमिक शाळाही आहे.इथे काही तटबंदीचे अवशेष व शीळा दिसतात. त्यांना गावकरी "गौळ देव" म्हणतात.
mhp14
गड म्हणला कि शिवाजी राजांचा पुतळा पाहिजेच आणि इथेही अश्वारुढ पुतळा आहे. हा पुतळा पाहून पुढे निघालो तो एक खोल विहीर दिसली.गडावरची बच्चे कंपनी पाणी भरायला आली होती. सहज डोकावून बघितले तर बर्‍याच प्लॅस्टिकच्या घागरी विहीरीच्या पाण्यात गुलाबजाम पाकात डुंबाव्यात तश्या तरंगत होत्या. त्याचे कारण त्या मुलांना विचारले तर, विहीर खोल आहे आणि तांब्या पितळेच्या घागरीने पाणी काढायला गेले तर दोर सटकला तर घागर बुडते. म्हणून रहिवाश्यानी प्लॅस्टीकच्या घागरी वापरायला सुरु केल्या म्हणजे जरी घागरी निसट्ल्या तरी नुकसान नको.
mhp15
गडाच्या दक्षिण दिशेच्या तटबंदीकडून गडफेरीला सुरवात केली.
mhp25
खाली देवरेवाडी गाव दिसत होते. इथे एक खंदक आहे. पण बुजलेला. कदाचित हि चोरवाटही असेल. पण फार आत जाता येत नाही.
mhp16
गावकर्‍यांनी त्यांच्या गवताच्या पेंड्या ईथे रचल्या आहेत. बर्‍याच घरासमोर पाणी साठविण्याची दगडी भांडी दिसतात. गावकरी त्याचा उपयोगही करतात.
mhp26
या वाटेने चालताना आपल्याला बुरुज लागतो, त्याचे नाव "पायरी बुरुज". यानंतर आग्नेय टोकाशी पोहचल्यानंतर एक छोटे महादेव मंदिर आणि त्याच्या शेजारी चांगल्या अवस्थेतील बुरुज दिसतो. इथे ध्वजस्तंभही लावला आहे.
mhp17
या बुरुजाला "महादेव बुरुज" म्हणतात. याच्यावर चढायला पायर्‍याही आहेत. ईथे उभारले कि विस्तृत मुलुख दिसतो. रात्री बेळगाव शहराचे दिवेही दिसतात. नैऋत्येला टॉवरचा तुरा असलेला कलानिधीगड पटकन लक्ष वेधून घेतो. महिपालगडाची समुद्रसपाटीपासून उंची ३२२० फुट आहे साहजिकच ईथली हवाही बारा महिने प्रसन्न असते.
mhp18
यानंतर इशान्य टोकाशी अजून एक बुरुज उभा आहे, त्याला का कोण जाणे "जळका बुरुज" म्हणतात.
हा बुरुज पाहून तटबंदीच्या कडेकडेने निघालो.
mhp19
इथे एक दरवाजा दिसला, त्याला "गणेश दरवाजा" म्हणतात.
mhp27
याच्यावर सुंदर गणेश शिल्प आहे. यातुन खाली उतरणार्‍या वाटेने गेलो कि जांभ्या दगडात खोदुन काढलेल्या गुहा लागतात. थोडी पडझड झालेल्या ह्या खोल्या म्हणजे दारु कोठारे असावीत. ईथून पुर्वेला याच डोंगररांगेवर वसलेला गंधर्वगड दिसतो.
mhp20
हि कोठारे बघून जरा पुढे गेले कि उध्वस्त दरवाजा आहे तसेच तटबंदीचे अवशेष आहेत. इथेच एक खडक उभा आहे. एखाद्या चिलीमीसारखा त्याचा आकार आहे.ह्या दगडाशेजारुन उतरणारा रस्ता थेट कोवाडला जाते. जसा कलानिधीगडाला पु.लं.चा साहित्यिक संदर्भ आहे, तसाच महिपालगडालाही एका मोठ्या मराठी सारस्वताचा सहवास लाभला आहे. "श्रीमान योगी","स्वामी" अशी मौलिक साहित्यरत्ने देणारे रणजित देसाई कोवाडचे जहागिरदार. इथे त्यांचा वाडा आहे. त्यांचे सर्व साहित्य त्यांनी या वाड्यात बसूनच लिहीले.
आता बघायचा राहिला गडाचा बालेकिल्ल्याचा भाग.
mhp21
इथे या परिसरातील ईतर गडाप्रमाणेच प्रंचड खोल विहीर आहे. सुमारे ७० फुट लांब व ४० फुट रुंद विहीर डोळे फिरावी इतकी खोल आहे.
mhp22
या विहीराला खाली उतरायला पायर्‍या आहेत. या पायर्‍या उतरून गडावरच्या रहिवाशी महिला रोज पाणी भरतात.
mhp28
या विहीरी समोरचे अंबाबाईचे मंदिर आहे. हे मंदिर शिवरायांनी स्थापले असे ईथले गावकरी अभिमानाने सांगतात. मात्र मुर्ती आधुनिक वाटते. इथे माझी गडफेरी पुर्ण झाली. अर्थात परत जाण्यासाठी पुन्हा शिनोळी पर्यंत तंगडतोड करणे भागच होते.
मात्र वैजनाथ, आरोग्यभवानी सारखी देवालये, कार्तिकस्वामी गुंफेसारखे साहसाचे अनुभुती देणारे ठिकाण व एकंदरीत उध्वस्त एतिहासिक वास्तु असणारा जागता महिपालगड एकदातरी आवश्य पहायला हवा.
या गडाबरोबरच संकेश्वर, गडहिंगलज, चंदगड परिसरातील आपली अनवट किल्ल्यांची भटकंती संपली. याशिवाय भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रात नसलेले बेळगाव परिसरातील बेळगावचा भुईकोट, हिडकल धरणाजवळचा हुन्नुरगड, सड्याचा किल्ला, राजहंसगड, भीमगड, चेन्नमा राणीचा कित्तुरचा भुईकोट असे बरेच किल्ले पहाण्यासारखे आहेत. त्यांच्याविषयी पुन्हा केव्हातरी.
या सर्व किल्ल्यांची माहिती मी जरी स्वतंत्र धाग्यात दिली असली तरी स्वताची गाडी असेल तर दोन दिवसात किंवा तीन दिवसात हे सर्व किल्ले पाहून होतात. एकंदर कलानिधीगड सोडला तर सर्व किल्ल्यांच्या माथ्यावर गाडी जाउ शकते, तसेच गाव वसलेले असल्याने मुक्कामाची किंवा खाण्यापिण्याची सोय होउ शकते. शिवाय सुखद वातावरणाने वर्षभरात केव्हाही हे गड पहाता येतात. अगदी उन्हाळ्याच्या काहिलीमुळे बाकी कुठे जाता येत नसेल तर "थंड आहे हवा, बहु बेळगावी" हे लक्षात घेउन इथल्या भटकंतिचा प्लॅन करायला हरकत नाही.
mhp24
संकेश्वर, गडहिंगलज, चंदगड परिसराचा नकाशा
सर्वांच्या सोयीसाठी मी हा प्लॅन साधारण कसा आखता येईल ते देतो. अर्थात स्वताच्या सोयीनुसार आणि सवडीनुसार यात बदल करता येतील.
"साधारण पहाटे किंवा सकाळी लवकर गडहिंगलजला पोहचेल अश्या बेताने निघायचे. इथे लॉज, हॉटेल अश्या सुविधा असल्याने इथेच आवरून सामानगड व परिसर बघायचा. सामानगड गाडीने फिरुन पहाता येत असल्याने फार वेळ लागत नाही. नेसरीचे प्रतापराव गुजरांचे स्मारक पाहून गाडीनेच गंधर्वगड गाठायचा. तासाभरात उतरुन चंदगड-हेरे मार्गे पारगडाला मुक्कामी जायचे, वेळ आणि ईच्छा असल्यास चंदगडचे ग्रामदैवत सिध्दनाथाचे मंदिर जरुर पहा.संध्याकाळी अंधार होण्याच्या आत पोहचलो तर ठिक नाहीतर सकाळी उठुन पारगड पहायचा. पारगडावरच नाष्टा करून इसापुर-हेरे फाटा-मोटणवाडी-पाटणे मार्गे कालिवडे गाव गाठायचे. गाडी गावातच कावून तीन तासात कलानिधीगड आटपायचा. तोफेचा माळ, चाळोबा हि ठिकाणे पहायची असतील तर गावातून वाटाड्या घेतलेला चांगला, म्हणजे वेळ वाचतो.हलकर्णी मार्गे सावंतवाडी-बेळगाव रस्ता गाठायचा. वाटेत एखाद्या ढाब्यावर जेवण उरकुन महिपालगड गाठायचा. गाडी गडावर जात असल्याने फारसा वेळ लागत नाही. संध्याकाळची कोवळी उन्हे पहात पुणे-बेंगळुरू हायवेला लागायचे. घरी परत.
एक दिवस जादाचा असल्यास तिलारी प्रकल्प, हत्तरगी जवळचा हुन्नुरगड व संकेश्वरजवळचा हरगापुर्/वल्लभगड हे पहाता येतील.
(टिपः- सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरून साभार)
संदर्भग्रंथः-
१ ) कोल्हापुर जिल्हा गॅझेटीयर
२ ) डोगंरयात्रा- आनंद पाळंदे
३ ) कोल्हापुर जिल्ह्याचे दुर्गवैभव- भगवान चिले
४ ) करवीर रियासत- स.मा.गर्गे
५ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६ ) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स

प्रतिक्रिया

अतिशय उपयुक्त माहिती आणि फार छान वर्णन. ह्या लेखमालेतील सर्वच लेख संग्रही ठेवावेत असे आहेत. खूप खूप आभार!

(त्या मंदिरातले दगडी खांब असे रंगवलेले बघून विचित्र वाटले. मूळ दगडी शिल्पातले सौंदर्य ठेवायला हवे होते.)

दुर्गविहारी's picture

24 Aug 2017 - 9:15 pm | दुर्गविहारी

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. कोल्हापूर जिल्ह्यात अजून पन्हाळा , विशाळगड आणि पावनगड अश्या तीन किल्ल्यावर लिहीने बाकी आहे. पैकी पन्हाळा आणि विशाळगडवर पर्यटकांची गर्दी असते आणि त्यांची खुप माहिती उपलब्ध आहे, तरीही त्यावर लिहीन.
पावनगडाचा नकाशा मी काढलेला नव्हता, त्यामुळे पावनगडावर पुन्हा जाऊन येईन आणि मगच धागा टाकेन.
त्या मंदिरातील खांबाविषयी बोलायचे तर मंदिराची शोभा वाढविणे म्हणजे अविचाराने रंगकाम करणे हिच समजुत झाली आहे. केवळ ईथेच नाही तर रतनगडाच्या खालचे अम्रुतेश्वर ,पुरचे कुकडेश्वर, मावडीचे पांडेश्वर मंदिर या सर्व ठिकाणी हेच पहायला मिळते.

प्रचेतस's picture

24 Aug 2017 - 6:41 pm | प्रचेतस

कोल्हापूर परिसरातील ही किल्ल्यांची मालिका खूपच छान झाली. लिखाण अप्रतिम. परिसरातील किल्ल्यांचा नकाशाही सुरेख.

प्रचितगडाची वाट पाहातो आहे अजून.

दुर्गविहारी's picture

24 Aug 2017 - 8:23 pm | दुर्गविहारी

प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद ! येत्या आठवड्यात पावसाळी भटकंती मधे रायरेश्वरचा धागा टाकेन. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील किल्ल्यावर लिहीणार आहे. त्यात आधी बहादुरवाडी, विलासगडवरचा धागा आधी टाकणार होतो पण आता प्रचितगडच आधी टाकतो.

सुरेख लिहित आहात. ह्या सगळ्या लेखांची पीडीएफ बनवून इ-पुस्तक तरी तयार कराच.

दुर्गविहारी's picture

25 Aug 2017 - 1:02 pm | दुर्गविहारी

धन्यवाद. यावर नक्कीच विचार करेन.