विक्री पश्चात सेवा आणि त्रास

जेडी's picture
जेडी in काथ्याकूट
21 Aug 2017 - 3:19 pm
गाभा: 

आजकाल विक्री पश्चात सेवा असे काही शिल्लक आहे का हो ? कोणतीही वस्तू घ्या , जोपर्यंत पैसे विक्रेत्याच्या हातात पडत नाहीत तोपर्यंत त्यांच्या मुखात साखर पेरलेली असते . जेंव्हा का पैसे त्यांच्या खिशात पडले कि त्यांची तोंडे झालीच वाकडी . सेवा देण्याचा नुसता बहाणा करतात. हे अगदी सर्व क्षेत्राला लागू होतंय . अगदी छोट्या सेवांपासून मोठ्या सेवापर्यंत . बिल्डर तर याचे सर्वात उत्तम उदाहरण आहेत . सेवेची दोन वर्षे बिल्डर आज करतो उद्या करतो म्हणून घालवतात मग म्हणतात दोन वर्षापर्यंतच सर्विस द्यायची असे तुमच्या कागदपत्रात लिहिलंय. मग ते घर गळायला लागूदे किंवा सर्व नळ , स्विच खराब होवूदेत . बिल्डरांच्या इतकी (म्हणजे त्यांच्या ऑफिसात बसलेल्या माणसांची ) निरडावलेली कातडी गेंड्याची पण नसेल.

तेच जिम चे , पर्सनल ट्रेनर च्या किमती अव्वाच्या सव्वा असतात आणि त्यांच्या जवळ उपलब्ध असणारी साधने तर विचारायलाच नको , त्यातली कमीतकमी रोज एक मशीन तरी बिघडलेलेच असते . पुन्हा तो ट्रेनर जिम सोडून गेला तर आपल्याला वाली नाहीच . पैसे आदीच वर्षाचे घेतलेले असतात मग बाकीच्या प्रशासनाला काही देणे घेणे नसते . दुसरा ट्रेनर घ्या नाहीतर येऊ नका त्यांना काहीही फरक पडत नसतो .इति जिम पुराण ...

पाणी म्हणजे जीवन , त्यात रिस्क घ्यायला नको म्हणून आपण पाणी शुद्ध करणाऱ्या मशीनबद्दल सहज चौकशी करतो. सेल्समन टाय , सूट , बूट घालून येतो . मशीनची माहिती देतो . तुमचे बजेट विचारतो , पाणी बोअर चे का कार्पोरेशन चे विचारतो . स्वतः फक्त पाणी चेक करतो पण त्यात काय बघतो हे सांगत नाही. आपण सांगितलेल्या उत्तराप्रमाणे तो हे मशीन घ्या सुचवतो . पण पाण्याचा टीडीएस किती आहे , तो तुम्हाला किती कमी करायचा आहे आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला कोणते मशीन घेणे इष्ट ठरेल असे सांगणे त्याच्या गावीही नसते . शिवाय तुम्हाला पाणी पुरवणारा माणूस कसा कार्पोरेशनचेच पाणी बाटलीत भरून तुमची फसवणूक करतोय हे तो सांगायला विसरत नाही . सर्व ऐकून आपण थोडीफार खोलात माहिती विचारलीच तर काहीतरी थातुर मातुर सांगून ते मशीन गळ्यात मारण्याचे कसब त्याला मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात शिकवलेले असतेच . तो त्याचा पुरेपूर उपयोग करतो . आपण चेक जमा करोपर्यंत तो अगदी आपल्याशी गोडीगुलाबीने बोलतो . मशीन यायला पुढचे चारपाच दिवस आपण त्याला फॉलोअप करायचा , मग तो आज येईल , उद्या येईल, इकडे अडकलय , तिकडे अडकलय असे सांगत राहतो. यथावकाश मशीन लावणारा येतो , तो लावतो . तो स्वतःच पाणी चेक करतो. आपण विचारलेच तर ७०-८० टीडीएस येतोय , अजून कमी येईल असे बिनधिक्कत सांगतो . आपण उत्साहाने पाणी पिऊन बघतो . अरेच्चा पाण्याची चव तर बोअरच्याच पाण्यासारखी लागतिय मग पुन्हा त्या सेल्समनला फॉलोअप . त्याची टीडीएस कमी येईल हो ह्याची ग्वाही . आपण दोन दिवस वाट पाहून खुप कारवादलो कि त्याची कंप्लेंट करा अशी माहिती देणे . मग कंपनीचा माणूस येऊन चेक करायला अजून दोन दिवस .पुन्हा हे बदल, ते बदल असे करत करत मग तो सांगतो कि , मशीन बिघडलेले आहे , ५००+ टीडीएस येतोय . (आदींच्या मशीन बसवणाऱ्याने आपल्याला ७०-८० टीडीएस येतोय ये बिन्धिक्कत खोटं सांगितलेले असते ). मग पुन्हा नवीन मशीनसाठी कंपनीला रिक्वेस्ट . आता पुनः कमीतकमी आठ दिवस ते मशीन येत नाही. ते येते, ते हि आपला तोंड फुटेस्तोवर फॉलोप घेऊन सेल्समन ला शिव्या घातल्यावर.

एवढे करून आपले नशीब फळफळले असे अजिबात समजायचे नाही , कारण महिन्याभरातच मशीन लाल लाईट दाखवते . आपण कंप्लेंट रिक्वेस्ट पाठवायची मग तो येतो पुन्हा मेम्ब्रेन बदलायला लागेल अजून काय बदलायला लागेल असे सांगतो त्याची किंमत जवळपास २५००+८५० असते . ३३००रुपयात किती पाणी विकत आले असते ? पण आता हात चोळण्याशिवाय काहीही हाती नसते . १८००० ची मशीन तुम्हाला कशी स्वस्तात आहे हे तो कसे पटवून देतो हे आठवून आपण सेल्समनला फोन केल्यावर तो म्हणतो, तुमच्या इथले पाणी खूपच खराब आहे हो. ... इति पाण्याची मशीन ...

अशीच गत त्या यामाहाच्या फज २५ ची , एवढी किंमत देऊन ऍक्सेसरीज काय मिळतील विचारल्यावर - गार्ड, कव्हर आणि कायकाय मिळेल म्हणाला पण पैसे मिळाल्यावर ऍक्सेसरीज मिळतच नाहीत म्हणे . खूप फॉलोप करून , भांडून झाल्यावर ती बाई म्हणे कोणी सांगितले तुम्हाला ऍक्सेसरीज मिळतील, आमचे मालक आता चेन्नईला गेलेत त्यांना विचारून सांगतो आणि काय काय बरळायला लागली . शेवटी यामा कंपनी कडे तक्रार करून झाल्यावर तिने कोठून तरी लोकल मार्केट मधून गार्ड बसवून दिले , बाकी गेले ....

असेच त्या इनडोअर फर्निचर वाल्याने पण बेड दिला पण त्याच्या आतला प्लाय तद्दन टुकार आणि हलक्या प्रतीचा होता . घरात फर्निचर आल्यावर तो म्हणे असाच आलाय कंपनीकडून . दुसरा बदलून नवीनच बेड द्या तरीही नाही ... अजून अशी खूप उदाहरणे आहेत ,त्यात प्रामुख्याने ब्रॉडबँड सर्विसेस आणि अशी बरीच उदाहरणे देता येतील , ह्यावर काय उपाय आहे - ग्राहक पंचायतीकडे जाणे हा उपाय आहे पण वेळ कोणाला आहे ते सर्व करायला ? वैताग आलाय नुसता ... ह्या सर्व विक्रेत्यांना लगाम लावायला नक्की कोणते उपाय करायला हवेत ?

प्रतिक्रिया

मोदक's picture

21 Aug 2017 - 7:16 pm | मोदक

मी एक सांगू का?

जगातले सगळे जण आपल्याला फसवायला बसले आहेत - हे डोक्यात पक्के ठेवा. मगच कोणताही व्यवहार करा.

असे फसवणारे लोक मला एक दोन भेटले आहेत. त्यांना समोरासमोर आणि फोनवर बिन्धास्त शिव्याही दिल्या आहेत. पण ते निर्लज्ज असतात. त्यांना एक कस्टमर गटवल्याशी मतलब असतो.

साधी गोष्ट आहे.. आपण फोन केला की समोरच्याने फोन उचलावा ही अपेक्षा असते. हे सेल्सवाले काम झाले की फोन उचलणे बंद करतात आणि आपण गॅसवर.. यावर उतारा म्हणून मी आधीच त्यांना सांगतो की असले उद्योग करायचे नाहीत आणि करणार असलात तर मी प्रॉडक्ट घेणार नाही. ते नाहीच म्हणतील पण फोन उचलणे टाळले तर आपण त्याच्या मॅनेजरला झापू शकतो.

मला माहिती आहे की सेल्स आणि आफ्टरसेल्स हे वेगवेगळ्या जगात राहून काम करतात आणि त्यांचा एकमेकांशी संबंध नसतो. पण आपण सेल्सच्या दरम्यान काळजी घेतली की आपले आयुष्य थोडेफार सुसह्य होते.

किती शिव्या दयायच्या?मनस्ताप पैसे गेल्याचा , वेळ गेल्याचा ... सोपेपणाने त्यांची जिरवता येत नाही हीच गोची आहे...

सुबोध खरे's picture

21 Aug 2017 - 8:20 pm | सुबोध खरे

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विक्रेता जे काही सांगेल ते त्याच्याकडून लिहून घ्यायचे. आणि लिहून द्यायला नकार देणाऱ्या विक्रेत्याला बाहेरचा रस्ता दाखवायचा. दुर्दैवाने एवढे सगळे करूनही काही असे प्रसंग येतात कि चांगले चालणारे यंत्र बिघडते तेंव्हा हा मनःस्ताप होतोच.

लिहुन घेणे हा मस्त मार्ग

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Aug 2017 - 9:03 pm | अमरेंद्र बाहुबली

मला वाटतं महागड्या वस्तू घेतांना कोणीतरी ओळखीचा मध्यस्थ ठेवावा.आपला मित्र , नातेवाईक यांच्या सल्ल्याने त्यांच्या ओळखीच्या ठिकाणाहून वस्तू घ्याव्या. त्यामुळे एक विश्वासार्हता नीर्माण होते.

अभिदेश's picture

21 Aug 2017 - 9:06 pm | अभिदेश

म्हणजे भविष्यात त्यांच्या नावाने खडे फोडता येतात.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Aug 2017 - 10:16 pm | अमरेंद्र बाहुबली

त्या भितीने तरी स्वत:च वजन वापरून रिप्लेसमेंट वैगेरे करून देतात. आणी आपल्याला एक आधार तरी असतो. एकटा माणूस अशा लोकांशी लढताणा खचून जातो.

मध्यस्त मिळणे जरा अवघड वाटतेय.. पण प्रयत्न नक्कीच करेन

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Aug 2017 - 1:19 pm | अमरेंद्र बाहुबली

मध्यस्थ कोणी ना कोणी असतोच. आपण जी वस्तू घ्यायला जातोय ती आधीच कोणीतरी घेतलेली असू शकते. त्यामुळे मध्यस्त हा भेटतोच. आणी त्याचा त्या कंपनीचा व वस्तू चाअभ्यास ही झालेला असतो. तो आपल्या आयत्या कामात येतो. त्यामुळे हा मार्ग सहजसोपा आहे. कमीपणा वाटू न देता मध्यस्त मिळवणे अवघड नाही असे मला वाटते.

सतिश गावडे's picture

21 Aug 2017 - 9:24 pm | सतिश गावडे

प्रामाणिकपणा हा भारतीय व्यावसायिकांत अभावानेच सापडतो. एकदा का तुम्ही त्यांना पैसे दिलेत की तुम्हाला हिंग लावूनही कुणी विचारत नाही.

भारतीय कम्पण्यांचे कस्टमर केअर हा खुप मोठा विनोद आहे. एक तर त्यांचे फोन लागत नाहीत, लागले तर कुणी उचलत नाही आणि उचलले तर कुणी व्यवस्थित बोलत नाही. तुमचे नशीब जोरावर असले आणि तुम्ही हे सारे टप्पे ओलांडलेत तरी एकदा त्यांनी तक्रार नोंदवून घेतली की पुढच्या प्रत्येक कॉलला ते एकच रेकॉर्ड वाजवतात, "हमने आपकी कम्प्लेन्ट ली है" त्यातून ही कम्प्लेन्ट इंटरनेट , फोन सारख्या सुविधेची असेल तर हे महान लोक काहीही काम न करता काहीतरी थातूरमातूर रिझोलुशन देऊन परस्पर तिकीट क्लोज करतात आपल्याशी एका अक्षराने न बोलता.

असो. कुणीतरी म्हटलंच आहे, सौ मे से अस्सी बेईमान फिर भी...

जेडी's picture

22 Aug 2017 - 12:32 pm | जेडी

अगदी खरय

अप्पा जोगळेकर's picture

22 Aug 2017 - 1:29 pm | अप्पा जोगळेकर

प्रामाणिकपणा हा भारतीय व्यावसायिकांत अभावानेच सापडतो.
हे जरा अतिच धाडसी विधान नाही का ?

सतिश गावडे's picture

22 Aug 2017 - 1:48 pm | सतिश गावडे

माझं विधान माझ्या आजवरच्या अनुभवांवर आधारीत आहे. तुमचे अनुभव कदाचित चांगले असतील त्यामुळे माझे विधान तुम्हाला अतिच धाडसी विधान वाटू शकते.

अभ्या..'s picture

25 Aug 2017 - 10:36 am | अभ्या..

प्रामाणिकपणा हा भारतीय व्यावसायिकांत अभावानेच सापडतो.

व्यावसायिकाने नोकरीला ठेवलेल्या नोकरांबद्दल आपले काय मत आहे गावडे सर?
त्यापेक्षा आपण ह्या वाक्यातला व्यावसायीक हा शब्द काढला तरी फारसा फरक पडणार नाहीच आहे.

ही कम्प्लेन्ट इंटरनेट , फोन सारख्या सुविधेची असेल तर हे महान लोक काहीही काम न करता काहीतरी थातूरमातूर रिझोलुशन देऊन परस्पर तिकीट क्लोज करतात आपल्याशी एका अक्षराने न बोलता.
>>
अगदी अगदी!! एस बी आय च्या बाबतीत हा अनुभव अनेकदा आला आहे. जेव्हा टिकीट ब्रांच मॅनेजर कडे जायचे तेव्हा तो परस्पर क्लोज करायचा. एकदा त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून सम्ज दिली तर पुढच्यावेळी "प्लीज मीट." एवढासा मेल पाठवून टिकीट क्लोज केले.

अप्पा जोगळेकर's picture

22 Aug 2017 - 1:27 pm | अप्पा जोगळेकर

मी आजवर एलजी, पॅनासॉनिक (ही बहुधा जपानी कंपनी आहे), युरेका फोर्ब्ज, डी. एस. कुलकर्णी हा बिलडर (तोच ज्याच्या लबाडीचे किस्से सर्वत्र उघडकीस येत आहेत,
मायक्रोमॅक्स, लावा, लिनोव्हो (चायनीज), अशियन पेंट्स यांच्या विक्री पश्चात सेवा वापरल्या.
माझा अनुभव सगळ्याच कंपन्यांबाबत चांगला आहे. कदाचित नशीबाचा भाग असेल.
पूर्वी टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज वगैरे खराब निघाले तर डीलर चे उंबरठे झिजवावे लागत. त्यापेक्षा आताच्या सेवा पुष्कळच चांगल्या आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Aug 2017 - 2:02 pm | अमरेंद्र बाहुबली

मलाही आँनलाईआन शाँपींगचा चांगला अनुभव आलाय. मी शुज मागवले मला ते आवडले नाही. म्हणून मी परत पाठवले. शुजची कींमत मला परत पाठवण्यास आलेला खर्च सर्व त्या अँमेझाँन कंपनीने माझ्या अकाऊंट मध्ये पाठवला. तेही चक्क सहा दिवसांत. व काहीच झंझट नाही

अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट यांच्या खिशातुन काहीही जात नाही, ते सरळ डिलरला परत पाठवतात, डिलर ने खरेदी केलेली नसते, त्यांचे मार्जीन परत येणार्या मालावर असते... ते व्हेंडर कडुन वसुल करतात... तो खुप वेगळा विषय आहे

सुबोध खरे's picture

22 Aug 2017 - 7:34 pm | सुबोध खरे

ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्टच्या अनुभव अतिशय चांगला आहे
परंतु
नाईकी कंपनीचे स्पोर्ट शू कंपनीच्या फ्रँचाइजी कडून घेतले( हे दुकान दोन महिन्यांनी बंद झाले.) बुटाच्या सोलचे वेगवेगळे (चिकटवलेले) भाग तीन वेळा निघाले. पावसाळा म्हणून बूट ठेवून दिले होते आणि नंतर सारखा सोलचा कोणतातरी भाग निघतो म्हणून कंपनीच्या शो रुम मध्ये गेलो तर त्यांनी हा उत्पादनाचा दोष आहे हे मान्य करूनही ६ महिन्यानंतर कोणतीही तक्रार स्वीकारली जात नाही म्हणून सांगितले. मी दुरुस्तीचे पैसे देण्यास तयार असूनही कंपनीची पॉलिसी अशी आहे कि आम्ही बुटाची दुरुस्तीचं करत नाही. मी त्यांच्या वरिष्ठ मॅनेजरला विचारले कि एखाद्याचा उत्पादनाचा दोष ६ महिने एक दिवसांनी लक्षात आला तर काय? त्याने कंपनी पॉलिसी आहे कि आम्ही बूट दुरुस्त करतच नाही सहा महिन्याच्या आत असेल तरच दुसरा बूट देतो.
मग मी काय करू विचारले तर लोकल चर्मकाराकडून काम करून घ्या म्हणून सांगितले.
याहून उत्तम ग्राहक सेवा काय असेल?

अभिदेश's picture

22 Aug 2017 - 9:12 pm | अभिदेश

च्या किट बद्दल भारतीय क्रिकेट टीम ने तक्रार नोंदवली आहे. खराब दर्जाबद्दल. बघू आता त्यांना काय अनुभव येतो ते. :-)

सतिश गावडे's picture

22 Aug 2017 - 10:36 pm | सतिश गावडे

अमेझॉन ही भारतीय कंपनी नाही. त्यांचे गुणवत्तेचे स्वतःचे निकष आहेत.

फ्लिपकार्टचे दोन्ही संस्थापक अमेझॉनचे माजी कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांनी फ्लिपकार्टची स्थापना अमेझॉनचा आदर्श समोर ठेवून केली असणार हे साहजिक आहे.

रॉजरमूर's picture

24 Aug 2017 - 11:50 am | रॉजरमूर

ऑनलाईन खरेदी
हाच उत्तम पर्याय आहे सध्या हा सगळा डोक्याला ताप नको असेल तर .

माझा फोन 4G LTE आहे 4G VOLTE नाही, की ज्यामुळे थेट DIAL PAD वरून नंबर DIAL करता येईल. रिलायन्स जियो VOLTE सेवा पुरवते जेणेकरून MAIN AC ला TALKTIME BALANCE शिल्लक नसताना देखील DATA BALANCE वापरून फोन करता आणि घेता येतो.
आता जसं माझ्याकडे VOLTE नाही आणि ज्या ज्या लोकांकडे VOLTE नाही त्या लोकांसाठी जियो ने 4G VOICE नावाचं एक अॅप बनवलं आहे ज्याचा वापर करून फोन करता आणि घेता येतो.

आता झालं असं की मी जेव्हा जेव्हा या अॅप चा वापर करून कॉल करायचो तेव्हा तेव्हा पहिल्यांदा 5 मिनिटांनी..नंतर 4 मिनिटांनी..नंतर 3 मिनिटांनी माझे कॉल आपोआप कट व्हायचे...मला वाटायचे की बाकीच्या कंपनी जसे की आयडिया, एअरटेल, वडाफोन ह्या मुद्दाम (व्यवसाईक शत्रुत्व असावं म्हणून..)माझे कॉल कट करत आहेत..सुरवातीला मी जाऊ दिलं..नंतर नंतर हे खूपदा व्हायला लागलं...आलेले कॉल सुध्दा कट व्हायला लागले..तरीही जियो वर माझा अंधविश्वास कायम...जियो च बेस्ट..बाकी वेस्ट..(जियो ची सेवा पैसे देऊन घेतली होती...99 अधिक 309.)

कहर त्या दिवशी झाला जेव्हा जियो नंबर वरून मला आलेले कॉल सुध्दा कट व्हायला लागले...महत्वाचे कॉल..बॉस चा कॉल पण 3 वेळा कट झाला..मग काय तळपायाची आग...!

तडक कॉल केला कस्टमर केअर ला..नेहमीची फालतुगिरी बडबड करून एकदाची त्यांनी तक्रार घेतली...पुढे काहीही नाही... मग शेवटी मेल केला रीतसर सगळं लिहून पाठवलं...अपेक्षेप्रमाणे काहीही झालं नाही..

दरम्यान त्यांनी मी जी तक्रार केली होती ती 3 दिवस ओपन ठेऊन परस्पर close करून टाकली..मला न सांगता आणि न विचारता..आणि त्या तक्रारीची दखलही न घेता...

वैतागून मी मेल केला...काहीही उत्तर नाही..2 दिवस वाट पाहिली..उत्तर नाही...त्यामुळे तोच मेल मी आणखी 2 वेळा त्याच आयडी ला फॉरवर्ड केला...तेव्हा कुठे पुढच्या 2 दिवसांनी मला एक महा विचित्र रिप्लाय आला..

"I am sorry to know that you are experiencing call drop issues at your location.

As per the update on your Service Request, your area is not yet covered by RF (Radio Frequency) coverage yet. Persisted issue will get resolved once it gets covered. .......(याचा कॉल कट होण्याशी काय संबंध???)..लागत च नसता कॉल तर गोष्ट वेगळी...

A new site has been planned at your location and it is expected to go on air in 90 days from the resolution date 02-AUG-2017.....(निव्वळ थापा असणार हे नक्की.... कळेलच की 90 दिवसांनी काय ते...)

Post this, you will be able to enjoy seamless connectivity and high data speeds at your location....(घंटा...)

Nevertheless, barring few locations, you can enjoy our services extensively elsewhere....(काहीही हा जियो...)

I also suggest you to update Jio4GVoice app as we keep on updating the app for better customer experience. Using an older version may hamper your overall calling experience.....( येईल तो update करूनही उपयोग शून्य)

I appreciate your patience and co-operation in this matter."

मी त्यांना सांगितलं पण की माझ्या राहण्याच्या भागातच नाही तर कोठेही गेलं तरी कॉल कट होतातच...पण काहीही उपयोग झाला नाही...

शेवटी ते कार्ड फेकून दिलं..पैसे अक्कलखाते गेले असे समजून आता एअरटेल वापरत आहे..

य आधी एकदा मी मला 4G speed मिळत नाही म्हणून कॉल केलेला..तक्रार दाखल करून घेऊन कस्टमर केअर ने कॉल ठेवला...नंतर माझ्या शहरातील च एका विचित्र माणसाने मला कॉल केला...मला म्हणाला तुमचा फोन भारतातील 4G बँड ना SUPPORT करत नाही त्यामुळे तुम्हाला SPEED मिळणार नाही कधीच...(निव्वळ थापा...)