अभेद्य राजगड व वाघरु , एक अनुभव

हेमंत ववले's picture
हेमंत ववले in भटकंती
21 Aug 2017 - 12:14 pm

"राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करु?काय त्या किल्ल्याची उंची, काय त्याचा विस्तार! जणू काही आकाशच पसरले होते. त्याचे टोक पाहून छाती दडपे. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत असावा. त्या भागात सापांचा सुळसुळाट होता. जिकडे तिकडे निरनिराळ्या प्रकारचे हिंस पशू दिसत. त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले. राजगड किल्ला म्हणजे डोंगराची रांग त्याचा घेर बारा कोसांचा त्याला सगळीकडून वेढा घालणे कठीण होते",
महेमद हाशीम खालीखान.
मुरुंबदेवाचा डोंगर
पुर्वी मुरुंबदेवाचा डोंगर ह्या नावाने ओळख असलेल्या एका तीन पंख असलेल्या ह्या डोंगरास शिवाजी महाराजांनी, वाढीव बांधकाम करुन, स्वराज्याची राजधानीचा गड म्हणुन "राजगड" असे नाव ठेवणे म्हणजे शिवाजी राजांच्या पारखी नजरेचा एक नमुनाच आहे.
राजगडाचे काही सर्वोत्कृष्ट फोटोज पाहण्यासाठी लेखाच्या शेवट दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

मी राजगड अनेक वर्षांनी चढत होतो. आता वाहतुकीच्या अनेक सुविधा निर्माण झाल्या आहेत. मी पहील्यांदा राजगडावर आलो होतो तेव्हा आम्हाला वाहतुकीसाठी एकच पर्याय होता, व तो म्हणजे राज्य परीवहन मंडळाची लाल गाडी, होय एस.टी. एस. टी. च्या मदतीने आम्ही पुर्वी अनेक पदभ्रमणाच्या मोहीमा केल्या. व त्यात एक गम्मत असायची, की जी सध्याच्या वाहतुकीच्या अनेक सुविधांमध्ये मिळत नाही. ती गम्मत अशी की, आम्ही कोणत्याही गडाच्या एका दिशेने गडावर चढायचो व गड पाहुन, त्यावरील वास्तु अवशेषांचा अभ्यास करुन, गडाच्या दुस-या बाजुने खाली उतरुन एखाद्या दुस-या गडाकडे किंवा गावाकडे निघायचो.

यावेळी देखील आम्ही असाच अनुभव पुन्हा घ्यायचे ठरवले. आम्ही एक खासगी वाहतुक सेवा पुरवणा-या , वेल्ह्यातील स्थानिक व्यक्तिची गाडी भाडेतत्वावर घेतली. गुंजवणी गावात, आम्ही गाडीतुन उतरलो व आमचे गंतव्य ठरवले , ते म्हणजे आळु दरवाज्याने राजगड-तोरणा धारेने चालत जाऊन लागणारी , महादेव कोळ्यांची एक वस्ती जोरकर वाडी.
आमची गाडी आम्हाला जोरकरवाडीमध्ये न्यायला येणार होती.

पदभ्रमणास सुरुवात
आम्ही किला चढायला सुरुवात केली. सुवेळामाचीच्या खाली उतरलेल्या दांडाच्या खालच्या उतारावर घनदाट वाढलेले जंगल लक्ष वेधुन घेत होते. मी तोरणा नेहमीच पाहतो, व तोरण्याच्या बाबतीत "जंगलाचा अभाव" ही खंत राजगडावर मला दिसली नाही. व मी काहीस सुखावलो. जस जसे आम्ही पदमावती माचीच्या दिशेने , चढत होतो, तसतसे , डावीकडे सुवेळामाची चे नेढे, मोठे झाल्यासारखे भासत होते. मधुनच ढग येऊन नेढं व सगळी सुवेळा माची ढगात नाहीशी होत होती. आम्ही किल्ला तर चढत होतो पण किल्ला, म्हणजे पदमावती माची , बालेकिल्ला काही दिसत नव्हते. कारण राजगडाने देखील फेटा बांधलेला होता. मधुनच दिसणारी सुवेळा माचीच काय ती आम्ही राजगडावरच चढत आहोत याची जाणीव करुन द्यायची. अन्यथा हा प्रवास, म्हणजे, स्वर्गारोहणापेक्षा वेगळे काही नव्हते आम्हासाठी. चोर दरवाज्याच्या खालच्या दांडाने आम्ही चढत होतो.


राजगडाचे नेधे मागे ढगात दिसेनासे झाले आहे

उभी चढण थोड्या वेळासाठी, आडवी होते. त्या पठाराच्या उजवीकडच्या दांडावर मला एक राबता असलेला वाडा दिसला. हा वाडा म्हणजे शनिवार वाड्यासारखा, किंवा कोणत्याही सरदाराचा वाडा नव्हता. हा रावता वाडा म्हणजे मावळी धनगर ज्ञातीच्या , लोकांच्या गाई गुरांस बाधण्याचा गोठा होय. अशा जंगलात असलेल्या गोठ्यास आज ही स्थानिक लोक वाडा असेच म्हणतात. वाडा उजवीकडे हळु हळु खाली जात होता. व आकाराने लहान होत होता. तस तसा मला गोनिदांचा सोपान दरडीगा (दरडीगे वाडीचा धनगर) आठवु लागला. गोनिदांनी रगवलेला बाबुदा, हानुवती , यसुदी, वयनी, दरडीगा धनगर आणि बाबुदाचे अनामिक प्रेम म्हणजे वाघरु. एकेक पात्र डोळ्यासमोरुन जात होते. व जणु सोपान दरडीगाच त्याच्या त्या वाड्यात गायी-गुर कोंबताना मला भासु लागला. किल्ला जीवंत होतोय अस काहीस जाणवु लागल. गोनिदांची सगळी पात्र किल्ल्यावर राबती आहेत की अस वाटु लागल. ओर दरवाजच्या खालच्या कड्याला असलेल्या पाण्याच्या टाक्याच्या कडेला बसुन , घामाघुम झालेला बाबुदा मला दिसला. व थकलेल्या मला, हाताने इशारा करुन , टाक्याकडे बोलावतो आहे असे भासु लागले.
आम्ही देखील तिथेच वाहत्या पाण्याने आमची तहान भागवली व पुढया उभ्या चढाईला सुरुवात केली. वनविभाग व पुरातत्व खात्याने सध्या त्या उभ्या निसरड्या पाय वाटेला आधारासाठी खांब आणि भक्कम रेलींग केले आहे. हे आधार नसतील तर काय बिशाद कुणाही ऐ-या गै-याची चोरवाटेने किल्ल्यात प्रवेश करायची? आणि अशीच अवस्था किल्यावर येणा-या सगळ्याच पायवाटांची आहे. म्हणुनच महमद हाशीम खलीखानाला ह्या किल्ल्याला चहुंगाने वेढा देणे अशक्यप्राय वाटले यात नवल ते काय?

आता आम्ही चोरदरवाज्यातुन वाकुन गडावर पाऊल ठेवले. समोर लालतोंडी माकड आमच्या स्वागताला तयारच होती. अनेकदा काही हौशे गवशे नौशे, गडावर येताना भरपुर खाद्यपदार्थ आणतात, व खाली उतरताना ते शिल्लक राहीलेले असतील तर, किंवा अतिउत्साहापोटी ह्या माकडांना ते खाद्य पदार्थ खाण्यासाठी टाकतात. जंगली माकडांना, ह्या शहरी माकडांनी टाकलेला तो माकडमेवा खुप आवडतो, व अशा अनेक शहरी माकडांमुळे, ही लाअलतोंडी माकडांनी मात्र, आलेल्या प्रत्येक पर्यटकाने त्यांना बिस्कीटे वगेरे खायला दिल्याशिवाय पुढे जायचे नाही, असा अलिखित नियमच बनवुन टाकला आहे. व ते प्रत्येक पर्यटकाकडे आशाळभुत नजरेने पाहत राहतात. त्यातच पर्यटकांमध्ये कुणी एकटा दुकटा व्यक्ति ,बाई बापडी, पोर सोर दिसली तर आशाळभुत नजर लोप पाऊन , हिसकावुन घेण्यासाठी माकडांचा कळप माणसावर तुटुन पडतो व हातातील पिशवी घेउनच पसार होतो.(थोडक्यात काय तर माणसे किल्यावर जाऊन माकडचाळे करतात, तर माकडे किल्यावार माणुसचाळे करीतात )

Monkeys
आम्हाला भेटलेले माकडांचे टोळके

चोरदरवाज्यातुन किल्ल्यावर चढले की समोरच पदमावती तलाव दिसतो. तलाव चांगला औरस अौरस आहे, तलावाच्या भिंती अजुनही शाबुत आहेत. तलावाच्या समोरच , म्हणजे चोरदरवाज्यातुन किल्ल्यावर प्रवेशते झाले की लगेचच, उजवीकडे चिलखती बुरुजाच्या सताठ देवळ्या दिसतात. ह्या देवळ्यांमध्ये उभे राहुन, गुंजवणीच्या दाम्डावर टेहळणी करता येते. तसेच चुकुन एखादा शत्रु खालची खडी चढण, चढुन येणाचा प्रयत्न करतोय असे दिसले की ह्याच देवळ्यांमधुन भाले, धोंडे, तीर आदींचा वर्षाव त्यांच्या वर केला जाई. शाइस्ता खान राजांस मारण्या किंवा धरण्यासाठी, विडा उचलुन आला. तेव्हा पुनवडी बेचिराख करण्याचे स्वपच जणु उराशी बाळगुन आला होता. मावळ पट्टा, वतनदा-या, गावे, खेडी पाडी, किल्ले, देवळे वाटेत जे जे लागेल ते सर्व उध्वस्त करीत खान रयतेचे हालहाल करीत होता . त्यानंतर अफझलखानाच्या स्वारीच्या वेळी देखील म्लेच्छ टोळ्या हिरडस मावळ व गुंजण मावळात हाहाकर करण्यासाठी धुडगुस घालीत . धर्मांध राक्षसांनी बाया बापड्या भ्रष्टविल्या, गावेच्या गावे मारली गेली, काही देशमुखांना जबरी मुसलमान केले गेले, काहींना वतने सोडुन पळवुन लावले तर काहींची चामडी सोलण्यात आली. शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये अनेक किल्ले स्वराज्यात सामील झाले व पुन्हा गनिमाने हस्तगत केले . राहीला तो फक्त राजगड. तीच अवस्था पुढे मिर्झा राजे जयसिंगाच्या आक्रमणावेळी झाली. राजगड काही कधी पडला नाही. राजगड अभेद्य राहीला त्याचे कारणच आहे राजगडाच्या तीन माच्या व त्यावरील चिलखती तटबंदी व चिलखती बुरुज. दुहेरी तटबंदी , दोनही तटांच्या मधुन दोन अडीच मीटरची वाट, भुयारी परकोट, दिंडे, दगडी सोपान, हे सगळे अचंबीत करणारे आहे. प्रत्येक माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे. या भुयारातून बाहेरील तटबंदीकडे येण्यासाठी दिंडांची व्यवस्था केलेली आहे. एवढे सगळे असताना हा किल्ला पडेलच कसा? शिवाजी महाराजांची पारखी नजर, संभ्याव्य धोके ताडण्याची क्षमता व त्यासाठी किल्ला बांधणी मध्ये केलेला विश्वविक्रम हे वर्तमानात आपणास थक्क केल्यावाचुन राहात नाही.


King Shivaji with his companions

आम्ही पद्मावती मंदीरात पोटपुजा केली. हे तसे पाहीले तर प्राचीन मंदीर. शेकडी उन्हाळे पावसाळे अंगावर झेललेले. त्यामुळे मुळ मंदीर कधीच पडले. आम्ही २० वर्षापुर्वी आलो होतो तेव्हा दगडमातीच्या भींती व त्यावर गंजलेले लोखंडी पत्रे अशी अवस्था होती या मंदीराची. त्यातही वारा आला की ह्या पत्र्यांचा एखाद दुसरा कोपरा वा-यासोबत हेलकावे खात कचकच आवाज करायचा. २००२ साली पुरातत्व खात्याने, किल्ला संवर्धानाचे काम हाती घेतले, त्यात सर्वप्रथम ह्या मंदीराचे काम करण्यात आले. पद्मावती देवीची गाभा-यातील मुर्ती आणि तशीच आणखी एक मुर्ती गाभा-याच्या बाहेर, उजवीकडे आहे. दोन्ही कदाचित एकाच देवतेच्या मुर्ती असाव्यात, व त्यांचा कालखंड जास्तीतजस्त शंभरेक वर्षापुर्वीपेक्षा जास्त नसावा असा अंदाज त्या मुर्तींच्या घडवण्याच्या पध्दतीवरुन जाणवतो. आमची पोटपुजा सुरु होईस्तोवर आमचे काही सहकारी अद्याप मंदीरात यायचे होते. व ते सगळे अमराठी होते. मी सोडुन फक्त दोघेजणच मराठी भाषिक होते. संधीचा फायदा घेत, थोड्या वेळासाठी का होईना मी पद्मावती मंदीरात, वाघरु मधील एका प्रसंगाचे , कादंबरी वाचन केले. मंदीरात अन्य मराठी भाषिक पर्यटक, ट्रेकर्स, तसेच वेल्ह्यातील जोशी काका, व नुकतेच काशी विश्वेश्वरास जाऊन आलेले पाली गावातील शिंदे काका की होते. माझे कादंबरी वाचनाचा छोटेखाणी कार्यक्र्म झाल्यावर, हे लोक स्वतःहुन कादंबरी वाचन आवडले असे सांगण्यास आले. तोवर आमचे सहकारी देखील येऊन बसले होते, आम्ही आमच्या खाण्यावर ताव मारला. शिंदेकाकां नी काशी विश्वेश्वराहुन आणलेला प्रसाद ही खाउन आम्ही आमच्या पुढच्या टप्प्याकडे निघालो.

राजगडावरचा राजवाडा कसा असेल? किमान चार एकर सपाट पठारावर पसलेला राजवाडा, मागे भले मोठे अंगण, परसबाग, त्याच्या ही मागे, शौचालये. राजवाड्याला सुध्दा स्वतःची तटबंदी होती. व तिचे अवशेष आजही दिसत आहेत. ही तटबंदी चे बांधकाम सगळे मातीच्या भाजलेल्या विटांमध्ये केलेले आहे. ते शाबुत आहे. (ह्या राजवाड्याचे थ्री मॉडेलींग कुणीतरी करायला हवे.)

अंबरखान्यापाशी पोहोचल्यावर मला पुन्हा हानुवती (बाबुदाचा जावई) आठवला. अंबरखान्याचे पुढे ढालकाठी कडे , हानुवतीचे एक लाडके झाड रुखाचे झाड होते. व त्याच रुखाच्या झाडावर मचाण बांधुन पुण्याहुन कलेक्टरनी पाठवलेल्या रावसाहेबाने वाघराची शिकार करायचा अयशस्वी प्रयत्न केला होता. हानुवती खुप वाईट वाटले होते.ते झाडे काही दिसले नाही. पण ढालकाठीच्या दिशेने एका मोकळ्या मैदाना, ते झाड , ती मचाण, आणि मचाणी वर बंदुक ताणुन , नेम धरुन बसलेला तो राव साहेब ब खालती , गवत, फांद्या यांचा झोल करुन अवघडुन बसलेला हानुवती व मारती दरडीगा, असे चित्र मी मनातमनात रंगवीत रंगवीतच संजीवनी माचीच्या दिशेने निघालो.

सुरुवातीस वाट चुकलो, आम्ही संजीवनी ऐवजी पाली दरवाज्याशी जाऊन पोहोचलो. तेवढ्यात मागुन वेल्ह्यातले जोशी आणि पालीलते शिंदे येताना दिसले. त्यांनी मग सांगितले की निशाणा वरुन बालेकिल्ल्याकडे जा, व पुढे बालेकिल्ला डाव्या हातस ठेवुन उजवीकडे चालायला लागा. बालेकिल्ल्याच्या वर जाऊन किल्ला मी पुर्वी पाहीला आहेच. पण बालेकिल्ला च्या पायथ्यातुन, अक्षरक्षः पायथ्यातुन ही वाट संजीवनी माचीकडे जाते. डावीकडे बालेकिल्ल्याचा तो ठोकळा व त्यावरुन वाअहणारे जलप्रपात, त्या ओल्या झालेल्या कातळाला नटवणारी विविध शेवाळ सदृश्य वनस्पती, हे सगळे विलोभनीय होते. बालेकिल्ला थोडा मागे पडल्यावर मग प्रवास सुरु होतो, ढगांतुन चालण्याचा. आम्ही निघालो पुढे संजीवनी माचीच्या दिशेने.

राजगडाची भव्यता
राजगड किती मोठा आहे? याचे अनुमान वाचुन कळने थोडे अवघडच आहे. तरीही एक दाखला देतो. संजीवनी माचीचाच.ह्या माचीची एकूण लांबी अडीच कि.मी. आहे. ही माची सुद्धा ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. पहिला टप्पा खाली उतरून उत्तरेकडे वळून तटालागत थोडे मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरूज लागतात. या तिन्ही बुरुजांवर शिवाजीच्या काळात प्रचंड मोठा तोफा असाव्यात. या माचीवर अनेक पाण्याची टाकी आहेत. या माचीला एकूण १९ बुरूज आहेत. माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे. या भुयारातून बाहेरील तटबंदीकडे येण्यासाठी दिंडांची व्यवस्था केलेली आहे. संजीवनी माचीवर आळू दरवाजानेसुद्धा येता येते. आळू दरवाज्यापासून राजगडाची वैशिष्ट्य असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते. दोन्ही तटांमधील अंतर अर्धा-पाऊण मीटर असून खोली सुमारे ६ ते ७ मीटर आहे. या भागात बुरुजांच्या चिलखतात उतरण्यासाठी पायऱ्यांच्या दिंडा आहेत. तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदीमध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेच यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे.

Sanjeevani Machi
संजीवनी माचीचा एका वेगळ्या कोनातुन

तर अशा ह्या संजीवनी माचीवर कधी डावेकडुन ढग येत तर उजवीकडुन येत. क्षणात तोरण्याच्या दिशेचा दांड दिसायचा तर क्षणात नाहीसा व्हायचा. जागोजाग रानडुकराने रान खोदलेले दिसत होते.आमचे गंतव्य अद्याप दुर होते. आम्हाला अजुन संजीवनी माचीच्या निम्म्यात पोहोचुन आळु दरवाज्याने खाली उतरुन माचीच्या तळातुन तोरण्याकडे निघायचे होते. आमच्या सोबत चालणारे तसे नवखे होते, त्यामुळे चालीचा वेग म्हणाव तेवढा नव्हता.
सर्वांना किल्ला, किल्ल्यावरुन दिसणा-या डोंगररांगा, उतार, द-या खुप आवडले. खुप साजरे वाटले. ते साजरे वाटणे तिथवरच होते जोपर्यंत हे सगळे दुर होते. आळु दरवाज्याने खाली उतरल्यावर, तिरप्या होत गेलेल्या वाटेने उतरणे तसे अवघड नाही. पण तुम्ही जर नवखे असाल व तुमच्या सोबत कुणी जाणकार नसेल तर अशा वाटेने चालणे म्हणजे एक भयंकर अग्नीदिव्यच आहे. ह्या दिव्व्यातुन सुखरुप बाहेर पडलात तर मग "दुरुन डोंगर साजरे" या म्हणीच्या अर्थाचा उलगडा होतो.
Rajgad Torna Ridge
The pathway to Torna from Rajgad
जेव्हा आम्ही संजीवनीच्या मुख्य बुरुजाच्या तळापासुन तोरण्याच्या दिशेला निघालो तेव्हा, अचानक मला यसुदीच्या गायी-गुर वळण्याच्या आरोळ्या ऐकु आल्या. मी मागे वळुन पाहील. बुरुजावर कुणीच नव्हत. पण आरोळ्या तश्याच चालु होत्या. एकेक पाऊल पुढे जात होतो तशी संजीवनीमाचीचा बुरुज लहान लहान होताना दिसत होत. तश्या त्या आरोळ्यासुध्दा ऐकु येईनाशा झाल्या.

आमच्या सोबत दोन काटक फिरस्ते(तेच ते माझे कांदबरी वाचनाचे दोनच श्रोते) देखील होते. अजित आणि मनदीप. त्यांनी सगळी संजीवनी माची पायाखाली घातली. दुहेरी तटबंदीमधुन चालुन देखील आले. व माझ्या सुचनेप्रमाणे खुलसीच्या खिंडीकडे पुढे निघाले देखील. बाकीच्या सदस्यांना "दुरुन डोंगर साजरे" या म्हणीचा अर्थ समजावत समजावत आम्ही खिंडीत मजल दरमजल करीत पोहोचलो.
http://nisargshala.in/undefeated-rajgad-torna-camping-near-pune/

हेमंत ववले,
निसर्गशाळा, पुणे
http://nisargshala.in

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

21 Aug 2017 - 6:30 pm | दुर्गविहारी

मस्तच लिहीलय. वाघरू आणि त्या तिथे रुखातळी अश्या दोन पुस्तकांचे एकत्रित पुस्तक आता काढलय. माझ्याकडे ते आहे पण अजून वाचलेले नाही. आता नक्कीच वाचणार. गो.नि.दा. अफाट लिहीतात. कोणत्याही दुर्गभटका ते लिखाण वाचून प्रेमात पडेल. दुर्गभ्रमणगाथाची किती पारायणे झाली त्याला गणती नाही. या हनुवतीची मुले सध्या गडावर ताक विकतात. मागे त्यांना भेटलो होतो. मध्यतंरी वीणा देव यांच्या पुढाकाराने राजमाचीवर पहिले दुर्ग संमेलन झाले होते, त्यावेळी ह्या गोनिदांच्या कांदबरीतील पात्रांना बोलावून त्यांचा सत्कार केला होता.
बाकी गडावरची माकडे धोकादायक. त्यांना खायला घालण्याच्या सवयीने आपण त्यांना खंडणीखोर करतोय असे माझे मत. काही किस्से सांगतो. मध्यंतरी 'गिरीं'चे दर्शन घडविणारा हा जुना ट्रेकिंगग्रुप एन पावसाळ्यात २०० ( हो, दोनशे) जणांना तोरण्यावर घेउन गेला होता. कल्पना करा, तोरण्यासारखे एरवी चढायला अवघड असणार्‍या रॉकपॅचवर पावसाळ्यात चढाई करणे, ते सुध्दा बरेच नवखे लोक असताना म्हणजे जीवावरचा खेळ. सुदैवानेच काही अपघात झाला नाही. पण उतरत असताना एका ट्रेकरने खाउन झालेल्या कचर्‍याची पिशवी तिथे टाकून न देता स्वताबरोबर घेतली आणि सॅकमधे न ठेवता सॅकला मागे बांधली. वरुन पडणारा पाउस, घसरडा झालेला रस्ता त्यात एका माकडाला खाण्याचा वास लागला आणि ते त्या ट्रेकरजवळ जाउन हिसकाहिसकी करु लागले, सुदैवाने पातळ प्लॅस्टिकची बॅग फाटली आणि त्या माकडाने पळवली व संभाव्य अपघात टळला. उगाच हनुमानाचा अवतार वगैरे न मानता माकडांपासून दुरच राहिलेले चांगले.
मला माकडांचे अजुनही काही थरारक अनुभव आले, पण घाग्याचा विषय तो नाही म्हणून लिहीत नाही.
ईतिहासाची माहिती लिहीताना थोडी काळजी घ्यायला पाहिजे असे मला वाटते.

शाइस्ता खान राजांस मारण्या किंवा धरण्यासाठी, विडा उचलुन आला. दक्षिण मावळ, वतनदा-या, गावे, खेडी पाडी, किल्ले, देवळे वाटेत जे जे लागेल ते सर्व उध्वस्त करीत खान प्रतापगडाच्या दिशेने निघाला. त्याने एक पलटन वर हिरडस मावळ व गुंजण मावळात हाहाकर करण्यासाठी धाडली. ४ एक हजार ह्शम असलेल्या ह्या खानाच्या सैन्याने सगळीकडे अक्षरक्षः हाहाकार केला. गावेच्या गावे मारली गेली, काही देशमुखांना जबरी मुसलमान केले गेले, काहींना वतने सोडुन पळवुन लावले तर काहींची चामडी सोलण्यात आली. बघता बघता रोहीडा गेला, शिरवळचा किल्ला गेला, सिंहगड गेला, चाकण गेला, पुनवडी गेले, घनगड गेला. राहीला तो फक्त राजगड.

हा संदर्भ शाहिस्तेखानाचा आहे की अफजलखानाचा कारण शाहिस्तेमामांच्या स्वारीत चाकणचा संग्रामदुर्ग सोडला तर फार मोठा पराक्रम गाजवला नाही. आणि अफजलखानाने रोहिडा, घनगड घेतले नाहीत, तो वाईचा सुभेदार होता आणि त्याने वाईत मुक्काम केला होता. वाईत त्याचा वाडा होता ज्याचे अवशेष अजून आहेत. असो.
बाकी छान लिहीता आहात. पु.ले.शु.

मला माकडांचे अजुनही काही थरारक अनुभव आले, पण घाग्याचा विषय तो नाही म्हणून लिहीत नाही.

वेगळा धागा काढा पण नक्की लिहा.

वाईत नक्की कुठे आहेत अवशेष

दुर्गविहारी's picture

23 Aug 2017 - 11:03 am | दुर्गविहारी

वाईत नेमके कुठे हे मला सांगता येणार नाही, पण बहुधा मधली आळी असावी. ईथे कोणी मि.पा.कर वाईचे असेल तर त्यांनी अचुक माहिती द्यावी. पुढच्या महिन्यात घरच्याम्ना मेणवली दाखवायला जाणार आहे, त्यावेळी जमल्यास फोटो टाकेन.

वाईत अफझल खानाचा वाडा अशी कोणतीही वास्तू नाही.

मी 'त्या तिथे रुखातळी' याची पटकथा तयार केलेली.

अर्थात ती कथाच लहान असल्याने फार मोठी फिल्म होऊ शकणार नाही याची कायमच जाणीव होती. पण तिचं स्वरूप अशा पद्धतीने ठेवलं होतं कि अर्धा तासाची जरी फिल्म झाली तर अप्पांचा अंश त्यातून दिसत राहिला पाहिजे.

even मी आणि काही मित्र जाऊन 'शुटींग'साठी काही ठिकाणं सुद्धा पाहून आलो होतो. पण बजेट पुढे कोणाचेच काही चालेना. तेव्हा ती कथा बंद करून ठेवली ...

पैसा's picture

30 Aug 2017 - 11:01 pm | पैसा

कधीतरी पुरी होईल!

हेमंत ववले's picture

22 Aug 2017 - 11:17 am | हेमंत ववले

अफजलखानाविषयीच लिहायचे ते लिहिण्याच्या ओघात शास्ताखान लिहिले गेले. अशाच प्रकारे मार्गदर्शन करीत राहा.

अफझलखान असेल तरीही माहिती चुकीचीच आहे. कारण अफझलखानाने फक्त मंदिराना उपद्र्व दिला. तो आदिलशाही मुलुखातूनच आल्यामुळे किल्ले वगैरे पाडण्यचा प्रश्नच आला नाही. स्वताचेच किल्ले कोण पाडेल? असो. हि चुक लेखनाच्या भरात होउन जाते. पण लेखन झाल्यानंतर धागा पुन्हा एकदा तपासून पाहिला पाहिजे, बरेचदा ईथला संदर्भ वापरला जाउ शकतो. आधीच आपल्याइथे ईतिहासाविषयी अनास्था आहेच आणि अश्या काही संदर्भाने चुकीची माहिती पसरू नये यासाठीच सुचना केली. बाकी तुमचे लिखाण उत्तम आहेच.

राजगड हा राजारामाच्या मृत्यूनंतर औरंगझेब बादशाहने वेढा घालून घेतला. मराठ्यांनी शक्य तितका किल्ला लढवला आणि नंतर (बहुदा भली थोरली रक्कम घेऊन) ४ फेब्रुवारी १७०४ रोजी बादशाहला सोपवला. सुवेळा माचीच्या दिशेने खुद्द औरंझेबाचा तंबू होता.

दीड वर्षाच्या आत शंकराजी नारायण पंतसचिव याने १७०५ च्या जुलै मध्ये राजगड परत घेतला.

राजवाडा ४ एकर जागेवर नाही. राजगड हा प्रशस्त नसून तिथे जागा कमी असल्याने रायगडावर राजधानी हलवली असे काही लोक मानतात. राजवाडा आग लागून फार पूर्वीच जळाला (१७०० -१८०० च्या सुमारास) त्यामुळे त्याचे मॉडेल करणे अशक्य आहे - कल्पनेने काहीही काढता येईल पण मूळ काय असावे ते सांगणे अशक्य आहे.

शासनाने केलेल्या दुरुस्त्या अर्धवट आहेत - त्यातही सिमेंटचा वापर केल्याने त्या वास्तू काळाशी विपरीत अगदी नव्या आणि विजोड दिसतात (माझे मत). त्या पेक्षा आगाखान फौंडेशनने दिल्ली आणि हैदराबाद इथे उत्कृष्ट काम केले आहे.

हेमंत ववले's picture

28 Aug 2017 - 11:39 am | हेमंत ववले

Wada
सोबतच्या छायात्रित्रात वाड्याची दक्षिणेकडील तटबंदी दिसते आहे. व हे काम नक्कीच नवीन नाही. रायगडाच्या तुलतेत राजगडावर जागा कमी आहे हे नक्कीच पण वाडा भव्य व प्रशस्त होता यात तिळमात्र शंका नाही. वाड्याचे चौथरे , म्हणजे प्लिंथपर्यंतचे काम अगदी स्पष्ट दिसते आहे. व या वरुन कल्पनाचित्र नक्कीच रेखाटता येईल. असो, ज्याला हे कौशल्य येते त्याने कल्पना विलास करावा, अभ्यास करावा. आणि ही जागा अगदी ४ एकर जरी नसली तरी भव्य आहे एवढे मात्र नक्की. सोबत आणखी छयाचित्र जोडत आहे. त्यात वाड्याचे अवशेष दिसत आहेत. व या अवशेषांच्या पलीकडे विस्तीर्ण मैदान आहे. नेमका माझ्या कडे आता या मैदानाचा फोटो नाहीये.

पैसा's picture

22 Aug 2017 - 10:53 pm | पैसा

फोटो लिखाण छान आहे. फक्त इतिहासाबद्दल लिहिताना जरा चेक करून लिहा म्हणजे लिखाण निर्दोष होईल.

हेमंत ववले's picture

23 Aug 2017 - 5:41 pm | हेमंत ववले

मंडळी आपण केलेल्या सुचनांप्रमाणे लेखात योग्य ते बदल केले आहेत. धन्यवाद.

हेमंत ववले's picture

23 Aug 2017 - 5:41 pm | हेमंत ववले

मंडळी आपण केलेल्या सुचनांप्रमाणे लेखात योग्य ते बदल केले आहेत. धन्यवाद.

अजून एक. पाली दरवाज्याजवळ पद्मावती माचीवर एक शिलालेख आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्याचे वाचन झालेले नाही - कुणाला शक्य झाले तर त्यातून नवीन माहिती कळेल.

दुर्गविहारी's picture

27 Aug 2017 - 12:59 pm | दुर्गविहारी

तो लेख खुप अस्पष्ट झालाय त्यामुळे त्याचे वाचन अवघड आहे. पण श्री. महेश तेंडुलकर यांचे नुकतेच शिलालेख या विषयावर एक पुस्तक प्रसिध्द झालेले आहे, त्यात या विषयी काही आहे का, ते पहायला हवे.

महेश तेंडुलकरांशी एक वर्षांपूर्वी बोलणे झाले होते. तो शिलालेख अजूनहि वाचला गेलेला नाही.

शलभ's picture

27 Aug 2017 - 11:35 am | शलभ

मस्त फोटो..

ऋतु हिरवा's picture

30 Aug 2017 - 7:31 pm | ऋतु हिरवा

तीन पंखे असलेला डोंगर ... मी ही राजगडच्या प्रेमात आहे. राजगड तोरणा ट्रेक करायचे मनात आहे