Ugly- सगळे प्रश्न सोडवूनहि अनेक प्रश्न विचारणारा चित्रपट!

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
21 Aug 2017 - 6:47 am

शिरीष कणेकर फिल्लमबाजी मध्ये एक गोष्ट सांगायचे. “नाटकाचा/ चित्रपटाचा एक साधा नियम आहे. पहिल्या अंकात किंवा सुरुवातीला भिंतीवर बंदूक दाखवली तर नाटक/ चित्रपट संपेपर्यंत तिचा बार उडालाच पाहिजे...” म्हणजे थोडक्यात काय तर नाटक, चित्रपटात दाखवल्या गेलेल्या प्रत्येक दृष्याची, धाग्याची कथेशी संगती अखेर पर्यंत तरी जुळलीच पाहिजे. सगळी कोडी सुटली पाहिजेत. असा हा अलिखित नियम. तो न पाळणारे ते ढिसाळ, निष्काळजी दिग्दर्शक किंवा लेखक...
आता मनोरंजन हे जर चित्रपटाचे मुख्य उद्दिष्ट मानले तर कुठलाही तद्दन गल्लाभरू सिनेमा चांगला असू शकतो. तसा तो खिडकीवर मोठा गल्ला जमा करून सिद्ध करत असतोच आणि याच कारणावरून बहुसंख्य सिने-निर्माते अशाच प्रकारचे सिनेमे बनवत असतात. पण म्हणून अशा सिनेमांना आपण हिट-गाजलेले, चाललेले सिनेमे म्हणतो, चांगले म्हणतोच असे नाही. चांगला सिनेमा हिट असो नसो एक गोष्ट खरी कि त्याने उत्तम मनोरंजन केलेच पाहिजे. पण मला असं वाटतं कि तेवढेच पुरेसे नाही. तुम्ही तो सिनेमा संपवून थेटरातून बाहेर पडताना सिनेमा डोक्यात घेऊन बाहेर पडला पाहिजेत. सिनेमा चांगला कॉमेडी असेल तर नंतर बराच वेळ त्यातल्या गोष्टी मनातल्यामनात आठवून हसू फुटलं पाहिजे. किंवा मर्डर मिस्टरी असेल तर नंतर आपण गुन्ह्याचे धागे दोरे जुळवत बसलो पाहिजे उदाहरणार्थ गुलझारचा अंगूर हा (संजीव कुमार, देवेन वर्मा ने काम केलेला) किंवा "अंदाज अपना अपना"(आमिर खान, सलमान खान चा) हे असे चांगले कॉमेडी सिनेमे होते . तसाच नुकताच येउन गेलेला "दृश्यम " हा असाच उत्तम मर्डर मिस्टरी होता.
काल परवाच यु-ट्यूब वर सर्फ करताना अचानक “Ugly” हा अनुराग कश्यप चा चित्रपट पहिला.पहिले ५-१० मिनिट उत्सुकतेने पहिला आणि लगेच बंद करून ठरवले कि आज शांत पणे हा बघायचाच. तो पर्यंत गुगल वर माहिती काढली तेव्हा कळले कि हा चित्रपट भारतातल्या थेटरात नाही फारसा आला, तरी चांगलाच नावाजला गेलेला चित्रपट आहे. कान्स फिल्म फेस्टिवल मध्य standing ovation मिळालेला हा चित्रपट आहे. पण ह्या चित्रपटाची आणखी एक स्मृती म्हणजे मागे जेव्हा कोर्टाने सिनेमात धुम्रपान करताना कोणी दिसत असेल तर खाली “smoking is injurious to health.” असा वैधानिक इशारा दाखवलाच पाहिजे असे सांगितले होते. ह्या आदेशाला अनुराग कश्यप ने आव्हान दिले होते ते ह्याच चित्रपटासाठी. अर्थात त्यामुळेच तो भारतात उशिरा प्रदर्शित झाला. भारतातली तर त्याची कमाई यथा तथाच होती( असणारच! बरोबर त्याच सुमारास PK रिलीज झाला होता) लोकांच्या फारसा काही आज तो लक्षात नाही ..असो, तर कथा सांगायची म्हटली तर हा एक रहस्यपट आहे. एका कली नावाच्या १० वर्षाच्या मुलीच्या संभावित अपहारणाभोवती हि कथा फिरते. कथा वेगवान पद्धतीने दाखवली असली तरी आपल्याला
विचार करायला फारसा वेळ न देता घटनाबरोबर फरफटत नेणारा हा चित्रपट नाही. अनुराग जाणून बुजून पोलीस चौकशांमधून चालणारे रटाळ, कंटाळवाणे पंचनामे दाखवतो. पोलीस नावाच्या(माणूस नसावे अशा वाटणाऱ्या) प्राण्याच्या चित्रात तपशीलवार रंग भरत जातो. गरीब ते निम्न मध्यम वर्गीयांची कळाहीन घरं, घरांतल्या मोर्‍या, स्वैपाकघरं आणि बेडरुम्स. अगदी उच्चभ्रू वर्गातले लोकही घरात आपणा-सर्वसामान्य माणसांप्रमाणेच राहतात. तसेच कपडे वगैरे घालतात( सिरीयल मधल्यासारखे नाही, कायम मेकपचे रोगण, आणि भरजरी कपडे 24X7) गटारं-नाले-ट्रॅफिक-फेरीवाले आणि लोकल ट्रेन्स. हे सगळ घेऊन, एकाच वेळी अनेक चेहरे घेऊन समोर येणारं मुंबई शहर. एक माणसासारखं गुंतागुंतीच व्यक्तिमत्व घेऊन ते आपल्यासमोर येत...त्याच्या चेहेऱ्यावर अनेक सुरकुत्या, व्रण, डाग आणि तरीही काही तरी मोहक आणि हिडीस असं एकाच वेळी आहे. मुख्य म्हणजे ते धडधडणारं जिवंत शहर वाटतं... या शहराच्या पार्श्वभूमीवर आपल्याला कलीची आई शालिनी (तेजस्विनी कोल्हापुरे) दिसते. चार भिंतीत बंदिस्त झालेली, टीव्ही-मेकप-फोनपलीकडे आयुष्य न उरलेली, मुलीतही फारसा रस नसलेली ही बाई. तिचा सध्याचा नवरा (रोनित रॉय) पोलिसात मोठ्या पदावर आहे. कलीचा बाप, त्याचा शालिनी बरोबर घटस्फोट झालाय, (राहुल भट) तिला दर आठवड्याला भेटायला नेणारा अपयशी होतकरू नट. त्याच्यासोबत गेलेली कली गाडीतून दिवसाढवळ्या बेपत्ता होते. एखाद्या ’सर्वसामान्य’ मूल हरवण्याच्या केसकडे करावं तितपत दुर्लक्ष याही केसकडे करणारे पोलीस जागे होतात, ते तिचा सावत्र बाप कोण आहे ते कळल्यावर. यंत्रणा वेग घेते. आणि यच्चयावत सगळ्या लोकांची डोकी आपापल्या स्वार्थाच्या दिशांनी चालू लागतात. कलीचा सावत्र बाप. कलीचा सख्खा बाप. बापाचा संशयास्पद मित्र (विनीत कुमार सिंग). बापाची मादक प्रेयसी (राखी मल्होत्रा). प्रेयसीचा निकामी नवरा. कलीचा भणंग मामा (सिद्धान्त कपूर). पात्रांचे कडवट भूतकाळ. त्यांच्यातलं नासून गेलेलं माणूसपण. अहंकारांचे तिढे. आणि न सापडणारी कली .हे इतक गुंतागुंतीच आहे कि मला तरी ते इथे उलगडून सांगणं अवघड आहे.त्याकरता तुम्ही चित्रपटा बघाच...चित्रपट संपायला आला तरी कली सापडायची काही चिन्ह दिसत नाहीत...आपल्याला सवय असते ना हळू हळू गुंता सुटत चालल्याची, ओझ उतरत चालल्याची. तसे आपण हि हळू हळू RELAX होऊ लागतो....पण तसे होत नाही. कली सापडण्याची शक्यता धूसर होऊ लागते, जीवाची तगमग वाढते आणि अखेरीस कली सापडते, कलीला पळवणारा गुन्हेगार कोण या प्रश्नाचं उत्तरही मिळतं. पण त्याच बरोबर उत्तराच्या फोलपणानं आपल्याला सटपटायला होतं.
ह्या चित्रपटात भरपूर मराठी लोक आहेत आणि सगळ्या लोकांची कामं जबरदस्त आहेत.पण सगळ्यात भाव खाऊन जातो गिरीश कुलकर्णीचा इन्स्पेक्टर जाधव... सुरुवातीला या केसकडे नेहमीच्या कोडगेपणाने बघणारा इन्स्पेक्टर ते केसमध्ये गुंतत गेलेला इन्स्पेक्टर जाधव त्यानं छान रंगवला आहे.ह्या एका पात्रालाच अनेक मुखवटे ह्या चित्रपटात नाहीत. बाकी सगळे, अगदी मुलीची आई, तिचे आई-बाप भाऊ विद्यमान नवरा ते माजी नवरा, त्याचा मित्र आणि प्रेयसी सगळे अनेक मुखवटे घालून वावरतात आणि जसा जसा एका एक मुखवटा उतरत जातो तसे त्यांचे आतले काळे हिडीस, घाणेरडा वास मारणारे अंतरंग दिसू लागते.
एक साधी मुलीच्या अपहरणाची केस हो! पण मग एकेकाचे एकमेकांबद्दलचे संशय, मत्सर, सूड, असूया त्याबरोबर स्वार्थ, स्वत:ची पोळी शेकून घेण्याचा, दुसऱ्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न, असे निरनिराळे भाव लोकांच्या वागणुकीतून डोकावायला लागतात. कुणीही अगदी मुलीचे आई बाप, मामा कुणीही ह्यातून सुटत नाहीत आणि शेवटी मग व्हायचे तेच होते ह्या सगळ्या नकारात्मक भावनांमुळे, वृत्तींमुळे निरागसता निष्पापपणा कोमेजतो, बळी जातो. त्यानन्तर त्यांना जाणवत राहते की ह्या सगळ्याची खरच काहीही गरज नव्हती,आपण योग्य आणि सरळ पर्याय निवडले असते तर काहीतरी चांगले झाले असते. पण ती असते पश्चात बुद्धी ,विफल पश्चात बुद्धी...
विजय तेंडूलकरांनी लिहिलेल्या गिधाडे,शांतता कोर्ट चालू आहे, सखाराम बाइंडर ह्या नाटकांच्या संहिता वाचून असाच माझा थरकाप उडाला होता. मी फार लहान असेन जेव्हा त्यांचे प्रयोग होत असत त्यामुळे मी ही नाटकं पाहिलेली नाहीत पण नुसते वाचूनच प्रश्न पडला होता खरेच माणसे अशी वागत असतील? इतकी आपमतलबी, प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारी अप्पलपोटी माणसे असू शकतील? काय उपयोग अशा वागण्याचा?हल्ली हल्ली रेणुका शहाणे , सयाजी शिंदे, चिन्मयी सुमित आनंद इंगळे वगैरेंनी हि नाटकं परत केली आहेत आणि त्यांच्या विडीयो सीडी उपलब्ध आहेत असे कळले पण पहायचा योग अजून आला नाही असो...
हा चित्रपट पाहूनही असे अनेक प्रश्न उभे राहतात. शिरीष कणेकर म्हटले त्याप्रमाणे लाक्षणिक अर्थाने प्रत्येक बंदुकीचा बार उडतो, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळते खरे पण ....उत्तराचे अर्थहीनत्व जाणवून उदास व्हायला होतं. आवर्जून हा चित्रपट बघा. पण हे प्रश्न डोक्याला भुंगा लावतील, मुंग्या आणतील...तरीही बघा कारण कधी कधी मेंदूला अशा मुंग्या आलेल्या बऱ्या. नाहीका!
जाता जाता आणखी एक, ह्या चित्रपटात जवळपास प्रत्येक जण सिगारेट ओढतो. दर पाच मिनिटाला कुणीतरी सिगारेट ओढतोच, (अर्थात कायद्याप्रमाणे त्याबरोबर वैधानिक इशाराही येतो ...)आपण रोज हजारो लोकांना सिगारेट विडी ओढताना बघतो तेव्हा कुठे असतो हा वैधानिक इशारा. पण कोर्टाच्या बुद्धीपुढे (आणि निर्णयापुढे) काय तर्क चालणार. अनुराग कश्यप इतका पुणेरी असेल असे वाटले नव्हते.
असो, चित्रपटची इतर माहिती खाली दिलेली आहे आणि लिंक ही दिली आहे आवर्जून, वेळ काढून बघाच...त्रास होईल कदाचित पण पश्चात्ताप नाही होणार...खात्रीने सांगतो.
---आदित्य

यु ट्यूब लिंक

https://www.youtube.com/watch?v=G5x0gIfzHuo&t=328s

• दिग्दर्शक: अनुराग कश्यप
• कलाकार: राहुल भट, रोनित रॉय, गिरीश कुलकर्णी, सिद्धान्त कपूर, तेजस्विनी कोल्हापुरे
• चित्रपटाचा वेळ: १२८ मिनिटे / २ तास ८ मिनिटे
• भाषा: हिंदी
(सौजन्य- गुगल)

चित्रपटविचार

प्रतिक्रिया

परदेशातल्या लोकांना अशी गरीबी वगैरे दाखवली की खुश असतात.
महालक्ष्मी पुलावर इकडचे गाइड लोक फारिन टुरिस्टांना आणतात. कशाला? खालच्या झोपडपट्टीचा बर्ड- आइ -व्ह्यु फोटो काढण्यासाठी.

पण ह्या चित्रपटाची आणखी एक स्मृती म्हणजे मागे जेव्हा कोर्टाने सिनेमात धुम्रपान करताना कोणी दिसत असेल तर खाली “smoking is injurious to health.” असा वैधानिक इशारा दाखवलाच पाहिजे असे सांगितले होते.

याला उत्तर म्हणून चित्रपटात प्रत्येक मारामारीच्या सीन ला - "fighting is injurious to health" आणि ट्राफिक च्या सीनला "polution is injurious to health" असे दाखवायला पाहिजे. खरंच एवढं कसं काय सुचलं नाही त्या कश्यपला!

शिरीष कणेकर फिल्लमबाजी मध्ये एक गोष्ट सांगायचे. “नाटकाचा/ चित्रपटाचा एक साधा नियम आहे. पहिल्या अंकात किंवा सुरुवातीला भिंतीवर बंदूक दाखवली तर नाटक/ चित्रपट संपेपर्यंत तिचा बार उडालाच पाहिजे...”

यावरून आठवले -

Chekhov's gun is a dramatic principle that states that every element in a story must be necessary, and irrelevant elements should be removed; elements should not appear to make "false promises" by never coming into play.

One must never place a loaded rifle on the stage if it isn't going to go off. It's wrong to make promises you don't mean to keep."

https://en.wikipedia.org/wiki/Chekhov%27s_gun
http://tvtropes.org/pmwiki/pmwiki.php/Main/ChekhovsGun

'अग्ली' एक थोर चित्रपट आहे. माणसाच्या आतल्या काळ्या बाजुला चिरून त्याचे पापुद्रे, पापुद्रे काढून दाखवतो प्रेक्षकाला.

पुंबा's picture

21 Aug 2017 - 12:17 pm | पुंबा

सगळे अनेक मुखवटे घालून वावरतात आणि जसा जसा एका एक मुखवटा उतरत जातो तसे त्यांचे आतले काळे हिडीस, घाणेरडा वास मारणारे अंतरंग दिसू लागते.

हेच सगळे असणारा धुडगुस हा मराठी चित्रपट देखिल बघाच.
परिक्षण खुप आवडले.

अनन्त अवधुत's picture

21 Aug 2017 - 7:59 pm | अनन्त अवधुत

आणि खतरनाक सिनेमा शेवटपर्यंत काय होईल हे लक्षात येत नाही.
जेव्हा लक्षात येते तेव्हा त्यातल्या प्रत्येक कॅरॅक्टरचा भयंकर राग येतो.
परीक्षण आवडले.

मीता's picture

21 Aug 2017 - 8:15 pm | मीता

परीक्षण आवडले .

चष्मेबद्दूर's picture

21 Aug 2017 - 8:38 pm | चष्मेबद्दूर

नक्कीच।.

विशुमित's picture

22 Aug 2017 - 12:38 am | विशुमित

आताच पाहिला...

खत्रूड सिनेमा आहे.
----------------
तो रोनित सुरवातीला त्या कास्टिंग वाल्याला पेकाटात लाथ घालतो आणि परत डोक्यात खुर्ची घालतो ना तो सीन खूप आवडला.
गिरीश भाऊ चा नादच नाई करायचा...

धन्यवाद कोरडे जी..!!

गम्मत-जम्मत's picture

22 Aug 2017 - 11:39 am | गम्मत-जम्मत

आजच बघते. परीक्षण मस्त झालंय.

पद्मावति's picture

22 Aug 2017 - 11:41 am | पद्मावति

परिक्षण आवडले.

प्रसाद_१९८२'s picture

22 Aug 2017 - 12:22 pm | प्रसाद_१९८२

दिलेला युट्युबच्या दुव्यावरुन चित्रपट काढुन टाकला आहे असे दिसते.

परिक्षण आवडले.

चांगले लिहिले आहे. चित्रपट पूर्वीच पाहिला आणि आवडला आहे.

तरीही काही तरी मोहक आणि हिडीस असं एकाच वेळी आहे.>> मोहक काहीच वाटले नाही. सगळे हिडीसच! ugly!

किंवा वरवर पाहता मोहक पण आतून हिडिस..

पियू परी's picture

22 Aug 2017 - 3:11 pm | पियू परी

हा चित्रपट पाहिला होता तेव्हापासून हे नाव ऐकले कि त्रास होतो. जेव्हा पहिल्यांदा पाहिला होता तेव्हा खरोखर बरेच दिवस डिस्टर्ब होते. अगदी 'या जगात कोणालाच कोणी वाली नाही' पासून 'मुले जन्माला घालणे अतीशय धोकादायक आहे' इथपर्यंत वाट्टेल ते विचार मनात यायचे. आता सावरले बरीचशी. पण चित्रपट हताश करतो.

कपिलमुनी's picture

22 Aug 2017 - 4:30 pm | कपिलमुनी

डिप्रेस्स करणारा चित्रपट अर्थात यातच त्याचा यश आहे.
डोक्याला फार शॉट बसतो

वाल्मिकी's picture

24 Aug 2017 - 12:21 am | वाल्मिकी

तू नळी वर एक कली कथा आहे ,कळीच्या जन्माचा ५ मिन एपिसोड नक्की बघा

प्रमोद देर्देकर's picture

24 Aug 2017 - 6:08 am | प्रमोद देर्देकर

मला मराठीतला चेकमेट चित्रपट कोणी समजावून सांगाल काय. ?
३ वेळा अर्धवट पहायला मिळालाय.
पण काय टोटल लागत नाहीये.

वाल्मिकी's picture

24 Aug 2017 - 1:58 pm | वाल्मिकी

फर्दिन खान चा एक खिलाडी एक हसीना बघा ,चेकमते च्या आधी आला होता ,कथानक एकाच आहे