गावात पहिली लुना

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
15 Aug 2017 - 5:18 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

मी चौथी पाचवीत असेल तेव्हाची गोष्ट. गावात ज्यांच्या जवळ सायकल, हाताला हँडो शँडो घड्याळ आणि घरात फिलिप्सचा रेडिओ तो माणूस श्रीमंत असल्याचे समजले जायचे. रेडिओचा शबनमसारखा लांबलचक पट्टा खांद्याला अडकवून गाणे ऐकत मळ्यात जाणारे लोक पहायला मिळायचे. मळ्यात बारे देताना विविध भारतीवरचे गाणे ऐकणारे सालदारही कुठे कुठे पहायला मिळायचे.
अशाच दिवसात माझ्या वडील बहिणीचे लग्न ठरले आणि हुंड्यात कबूल केल्याप्रमाणे दाजींना फिलिप्सचा रेडीओ द्यायचा होता म्हणून आण्णांनी सटाण्याहून दोन मसाल्यांवर चालणारा नवा करकरीत रेडीओ आणला. त्यावेळी लग्नातल्या हुंड्यात हँडोशँडो घड्याळ, फिलिप्सचा रेडीओ आणि सायकल देण्याची श्रीमंत पध्दत होती. घड्याळ आणि रेडिओच्या बाबतीत कंपनीबद्दल जागृत राहणारे लोक मात्र सायकलीच्या कंपनीबद्दल इतके जागृत नव्हते. (नंतर नंतर अॅटलस म्हणायला लागले.)
आमच्या घरी नवा करकरीत रेडीओ येताच त्याला पहायला आजूबाजूच्या लोकांची गर्दी झाली. बहिणीला देण्यासाठी का होईना पण आमच्या घरी आलेला गल्लीतला हा एकुलता एक रेडीओ. घरात रेडीओ वाजू लागला की शेजारचे लोक रेडीओ ऐकायला येऊन बसायचे. वसंत, गोटू, सोमा, नामा, दत्तू, दिगू, भगवान ह्या थोराड मुलांसोबत लग्न झालेले लोकही असत. आण्णा एखादे मराठी नाहीतर हिंदी स्टेशन लावून रेडीओ स्टुलावर ठेऊन द्यायचे. आज टीव्हीसमोर कार्यक्रम बघायला जसे आपण बसतो तसे आम्ही सर्वजण रेडीओसमोर जमिनीवर सवरून बसायचो. गाणे चालू असताना आपापसात गप्पा सुरू असायच्या. रेडीओवरचे गाणे संपून निवेदन सुरू झाले की बोलत असलेल्याला दुसरा म्हणे, ‘थांबरे, तो रेडूतला माणूस काय सांगस पाह्य. आयक ना.’
खांद्याला रेडीओ आणि हाताला घड्याळ असलेले लोक गावातून मळ्यातून दिसू लागले असले तरी गावातील रहदारी पायी पायी अथवा बैलगाडीने चालत असे. कुठे कुठे सायकलींचे अप्रूप दिसत असले तरी त्या खूप तुरळक लोकांकडे होत्या. अशा दिवसात आमच्या गावातील बुधा मास्तरने गावात चक्क लुना आणून गावाला जबरदस्त सुखाचा धक्का दिला.
मरगळलेल्या आख्या गावाला एकदम जीव आला. जिकडे तिकडे बुधामास्तरच्या लुनाबद्दल चर्चा होऊ लागली. बुधा मास्तरची लुना त्यांच्या घराजवळ जाऊन ‘सोता’ आपल्या डोळ्यांनी पाहून आलेले मुलं, लुना न पाहिलेल्या मुलांना लुनाचे वर्णन सांगत. लुना बद्दल ऐकून लुना न पाहिलेले मुलं बुधामास्तरच्या घराकडे लुना पाहण्यासाठी जात. लुनाला हात लावून पहात. बुधा मास्तरने गावात लुना आणल्यापासून गावात चावडीवर, ग्रामपंचायतीजवळ, शाळेत, गुखडीत, नदीवर धुणी धुवायच्या जागी, ओट्याओट्यावर, खळ्यात, मळ्यात सर्वत्र बुधा मास्तरच्या लुनाबद्दल चर्चा होत होती.
मास्तर नोकरीच्या गावाकडून लुना चालवणे शिकून आले होते, म्हणून गावात येताना ते पहिल्यांदा लुनावर बसून लुना चालवतच गावात आले. हे पहिले दृश्य ज्यांनी पाहिले ते स्वत:ला कृतकृत्य समजत होते. लुनाजवळ गर्दी झाली की मास्तर शाळेतल्या मुलांना शिकवतात तसे लुनाबद्दल माहिती देत:
सायकल जशी पायंडल मारून चालवावी लागते तसे लुनाचे नाही. लुनाला इंजिन असते. इंजिन चालू होण्यासाठी ह्या टाकीत पेट्रोल भरावे लागते. मळ्यातल्या किर्लोस्कर इंजिनला आपण घासतेल भरतो ना तसे. पेट्रोल राकेलपेक्षा महाग असते. पण पेट्रोल परवडले नाही तर लुना राकेलवरपण चालते. त्यामुळे इंजिन लवकर खराब होते. टाकीतले पेट्रोल नाहीतर राकेल संपले तर ही लुना सायकलसारखी पायंडल मारून पण चालवता येते. ही माहिती बुधा मास्तरकडून ऐकून लोक इतर मुलांना सांगत. जसे काही ते कंपनीकडून प्रचारक नेमले गेले होते.
गावातले गडी माणसं बुधा मास्तरच्या गल्लीत जावून लुना पाहून येत असले तरी गावातल्या बायाबापड्या, थोराड मुली यांना तसे जाता येत नव्हते, म्हणून बुधा मास्तरच्या लुनाचा दूरून आवाज ऐकू आला की घरादारातून बाया-बापड्या ओट्याओट्यावर येऊन रस्त्याने पळणार्‍या लुनाचे दर्शन घेत. बाया, स्वैंपाक करायचं सोडून, भांडे घासायचं सोडून, जेवणाच्या ताटावरून उठून, सगळेजणं हातातले कामं टाकून, म्हातारे आणि पोरंसोर बुधा मास्तरची लुना पहायला बाहेर निघत. आजही खेड्यात आकाशात विमान दिसलं की लोकं, पोरंसोरं, बायाबापड्या जसे विमान पहायला बाहेर निघतात, तसेच चित्र त्यावेळच्या विरगावात बुधा मास्तरची लुना पाहण्यासाठी दिसत असे.
बुधा मास्तरलाही आपण हिरो झाल्यासारखे वाटायचे. लुनाबरोबर लोक आपल्यालाही पाहतात हा आनंद त्यांच्या चेहर्‍यावरून ओसंडून वहायचा. बुधा मास्तर लुनावरून केव्हा ह्या गल्लीतून तर केव्हा त्या गल्लीतून, केव्हा या बोळीतून तर केव्हा त्या बोळीतून आपली लुना भिन्नाट चालवून आणि लुनाच्या पायंडलवर ठेवलेले पाय- एक वर तर दुसरा खाली अशा स्थितीत इकडून तिकडे फिरवतांना दिसे. गावात लुना फिरवून झाले की बुधा मास्तर घर ते मळा अशा चकरा सुरू करायचे.
पण एका दिवशी लुनाच्या टाकीतले पेट्रोल-रॉकेल संपले की मशीन बिघडले ते बुधा मास्तरलाच माहीत, पण मळ्यातून घरी येताना लुना गाव येण्याच्या आत बंद पडली. म्हणून बुधा मास्तर लुनाला पायंडल मारत मळ्यातून गावात प्रवेश करते झाले. मशिन बंद म्हणून लुनाचा भुर्रर्र असा आवाज नाही. आवाज नाही म्हणून कोणी लुना पहायला घराबाहेर पडले नाही. नेमके गावात प्रवेश करतानाच बुधा मास्तर पायंडल मारून मारून थकून गेले. मग लुनावरून उतरून गावातून लुना लोटत लोटत घराकडे नेऊ लागले. बुधा मास्तर घामाघूम झाले होते. मध्येच कोणीतरी विचारलं, काय झालं मास्तर? बुधा मास्तर घाम पुसत म्हणाले, ‘तिनी मायनी बंद पडी गयी रे भो.’
गावात आज पुष्कळ मोटारसायकली आहेत. (आणि फोर व्हीलरही.) पण गावात पहिली वहिली मोटरसायकल (नव्हे लुना, हो तेच ते) आणायचा मान आजूनही बुधा मास्तरांनाच दिला जातोय.
(या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

– डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

हेहेहेहे, हेन्री सँडोझ चे हँडोशँडो... भारीय

पैसा's picture

15 Aug 2017 - 5:48 pm | पैसा

मस्त लिहिलंय!

मराठी कथालेखक's picture

15 Aug 2017 - 6:11 pm | मराठी कथालेखक

ही किती सालची गोष्ट ?
लूना येण्याआधी गावात मोटरबाईक नव्हती ?? बुलेट, राजदूत, येझडी यातलं काहीच नाही ?

मार्मिक गोडसे's picture

15 Aug 2017 - 9:36 pm | मार्मिक गोडसे

कुठे कुठे सायकलींचे अप्रूप दिसत असले तरी त्या खूप तुरळक लोकांकडे होत्या. अशा दिवसात आमच्या गावातील बुधा मास्तरने गावात चक्क लुना आणून गावाला जबरदस्त सुखाचा धक्का दिला.
तुम्ही म्हणता त्या गाड्या असत्या तर असा धक्का बसला नसता.(हे लेखक महाशय शक्यतो उत्तर देत नाहीत)
मजा आली वाचताना.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Aug 2017 - 6:55 pm | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद.

1975 च्या आसपासची गोष्ट. गावात कधीमधी गाडी दिसायची. पण गावात येणार्‍या पाहुण्या लोकांची. पण गावातली ही पहिली गाडी.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Aug 2017 - 6:14 pm | अमरेंद्र बाहुबली

मजा ऊनी

धर्मराजमुटके's picture

15 Aug 2017 - 6:37 pm | धर्मराजमुटके

मस्तच !

जव्हेरगंज's picture

15 Aug 2017 - 7:01 pm | जव्हेरगंज

मस्तच!!

चांदणे संदीप's picture

16 Aug 2017 - 7:50 am | चांदणे संदीप

मस्तच लिहिलंय!
जर्रा फ्यान्टसी टाकून मास्तरांच्या लुनावर एखाद्या मुलीला बसवून तिला चारेक हजाराची मदत वैग्रे केली असती तर मास्तर अजरामर जाहले अस्ते!

Sandy

धर्मराजमुटके's picture

17 Aug 2017 - 10:02 am | धर्मराजमुटके

कशाला कशाला ? लुनावाले ब्रह्मे अगोदरच अजरामर झाले आहेत ना ?

मराठी_माणूस's picture

16 Aug 2017 - 11:41 am | मराठी_माणूस

दोन मसाल्यांवर चालणारा नवा करकरीत रेडीओ

बॅटरी साठी मसाला शब्द फारा दिवसांनी वाचनात आला.

ज्योति अळवणी's picture

16 Aug 2017 - 4:34 pm | ज्योति अळवणी

मस्त. आवडली लेखनशैली

सिरुसेरि's picture

16 Aug 2017 - 5:56 pm | सिरुसेरि

छान आठवणी

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Aug 2017 - 6:52 pm | डॉ. सुधीर राजार...

आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे.

शलभ's picture

16 Aug 2017 - 9:53 pm | शलभ

चल मेरी लुना.. :)

रुपी's picture

17 Aug 2017 - 1:01 am | रुपी

मस्त लिहिलंय!