चेलिया

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
13 Aug 2017 - 11:18 pm

चेलिया
परवा रात्री माझी मुलगी बँकॉक वरून आपल्या मामा कडून परत येत होती तिला आणायला मी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेलो होतो. विमान पोहोचे पर्यंत तेथे काय करायचे म्हणून सहारला वळायच्या रस्त्यावर गाडी उभी केली आणि समोर असलेल्या हॉटेलात कॉफी प्यावी म्हणून गेलो. तेथे असलेल्या पेनिन्सुला आणि पर्शियन दरबार या तारांकित हॉटेलच्या शेजारी असलेले एक छोटेसे हॉटेल म्हणजे हॉटेल न्यू एअरपोर्ट.
सौ. बरोबर होती तिला घेऊन या हॉटेलात शिरलो. गल्ल्यावर एक मुसलमान मालक होता त्याने हसून स्वागत केले.
पहिल्यांदा कॉफी प्यावी असा विचार होता पण समोरची फळे पाहून एक मोसंबीचा रस प्यावासा वाटला म्हणून तो मागवला. दाट आणि रुचकर असा मोसंब्यांचा रस पिऊन मन तृप्त झाले. तेथील वेटर आम्हाला अजून हा पदार्थ घ्या, तो पदार्थ घ्य,, असा आग्रह करत होता. मेनूकार्ड पण हे भले मोठे होते आणि जागेच्या मानाने दर अतिशय किफायतशीर होते. जेवण झाले आणि मोसंबीचा रसही पिऊन झाला असतानाही बायकोने फ्रुट सॅलड विथ आईस्क्रीम मागवले. ते एका भल्या मोठ्या काचेच्या बाउल मध्ये आले. फोटो खाली दिला आहे.
.
किंमत १४५ रुपये फक्त
खरं तर एवढ्या मोठ्या भांड्यातील फ्रुट सॅलड म्हणजे माझे अक्खे जेवणच होईल असे होते. आंब्याच्या रसात आणि कस्टर्ड मध्ये फळांचे तुकडे ज्यात चिबूड चिकू सफरचंद पेअर आणि बिया नसलेले कलिंगड होते. वर क्रीमची पेरणी त्यावर ड्राय फ्रुट्स टूटीफ्रूटी व्हॅनिला आईस्क्रीम आणि वर चेरी. हे सर्व खात असताना त्या मालकाशी गप्पा मारल्या. त्यांच्या मेनू कार्डात लखनौ पासून हैदराबाद पर्यंत सर्व ठिकाणचे पदार्थ होते पावभाजी पासूनमुघलाई लखनवी हैदराबादी चायनीज कॉंटिनेंटल असा भरगच्च मेनू होता. वेटर पासून मालकापर्यंत सर्व जण अतिशय अगत्यशील होते. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी हॉटेल रात्री अडीच पर्यंत चालू असते.
उस्मानभाईना (मालक) विचारले तुम्ही लखनौचे का?
त्यावर उस्मानभाई म्हणाले कि आम्ही चेलिया समाज गुजरातच्या पालनपुरचे. हा समाज कोणता याची मला काहीही माहिती नव्हती. ते म्हणाले साहेब आमच्या समाजाची मुंबई पासून गुजरात पर्यंत असंख्य हॉटेले आहेत. मुंबई अहमदाबाद महामार्गावर दर दोन चार किमी अंतरावर आमच्याच लोकांची हॉटेले आहेत.
या चेलिया समाजाबद्दल मला बरीच उत्सुकता लागून राहिली होती. मी त्याना अजून प्रश्न विचारले त्याची त्याने प्रांजळपणे उत्तरे दिली. ती अशी
आमचे लोक अतिशय मेहनती प्रामाणिक आहेत पण शिकलेले नाहीत. बहुसंख्य हॉटेले हि समाजातील लोकांच्या पैशावरच उभी राहिलेली आहेत. कोणताही लेखी करार नसताना हि बहुसंख्य हॉटेल व्यवस्थित चालू असून त्यात फसवाफसवी किंवा पैसे बुडवणे अजिबात होत नाही. खेड्यातील लोक सुद्धा आपले पैसे हॉटेलच्या धंद्यात टाकून त्यातून उत्पन्न आणि रोजगार मिळवतात. कुणीही हॉटेल चालू करायचे म्हणाला आणि पैसे नसले तरी समाजातील श्रीमंत लोक त्या हॉटेलात भागीदारी पत्करून त्याला भांडवलाची मदत करतात. धंद्यात मेहनत खूप आहे पण कष्ट करायची तयारी असेल तर त्याचे फळ तुम्हाला अल्ला देतोच.
आमच्या समाजातील गरीब मुलेच आमच्याकडे वेटर म्हणून कामाला येतात. येथे सर्व काम शिकून एक दिवस आपले स्वतःचे हॉटेल उभे करायचे हे स्वप्न घेऊन. अशाच मुलांनी आता महाराष्ट्र कर्नाटक पासून केरळ पर्यंत हॉटेले उभी केली आहेत. गुजरात मध्ये तर अनेक हॉटेलस शुद्ध शाकाहारी आहेत. जेथे जशी सेवा पाहिजे तशी आम्ही पुरवतो. आम्ही आमच्या हॉटेलात बीफ ठेवतच नाही. आमचा समाज हा शिया मुसलमान शाखेच्या मोमीन जमातीत मोडतो. साधारणपणे लग्नं जमातीतच होतात. आमचे लोक फारसे शिकत नाहीत हि खंतहि त्यानी बोलून दाखवली कारण अशिक्षित म्हणून सरकार दरबारी फार नाडले जातो आणि जेथे तेथे कोणत्याही परवान्यासाठी सरकारी अधिकारी सारखे पैसे मागतात पण आजचे नवीन तरुण शिकायला लागले आहेत हि एक समाधानाची बाब आहे.
जालावर खोदकाम करताना या समाजाबद्दल एक दुवा सापडला. आणि त्यात आश्चर्य म्हणजे उस्मानभाई सांगत होते तीच माहिती मिळाली. जाणकार हा दुवा वाचू शकतात. आपल्या देशाच्या विविधतेमधील हा एक समाज ज्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही त्याबद्दल माहिती व्हावी म्हणून हा लेख लिहिला आहे.
http://indiatoday.intoday.in/story/chelia-muslims-of-north-gujarat-becom...
जाता जाता -- कट्टा करण्यासाठी हि एक अतिशय उत्तम जागा आहे. मुंबई पुण्यातून आपण आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी फार लवकर निघतो आणि मग विमानतळावर पोहोचल्यावर काय करायचे हा एक मोठा प्रश्न पडतो. हे हॉटेल केवळ अर्ध्या किमी अंतरावर आहे त्यामुळे देशाबाहेर जाताना किंवा येताना कट्टा करण्यासाठी अतिशय उपयुक्त जागा आहे. शिवाय तेथील साकीनाक्याच्या रहदारीची कटकट टाळायची असेल तर मुंबईच्या लोकांना अंधेरी किंवा घाटकोपर हुन मेट्रोने येता येईल. हे हॉटेल मेट्रो स्थानकाच्या समोरच आहे.

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

अरे वा! हॉटेल तर उत्तम असावे हे दिसतेच आहे. चेलिया लोकांबद्दल प्रथमच वाचतो आहे. धन्यवाद डॉक या लेखाबद्दल.

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Aug 2017 - 11:57 pm | अमरेंद्र बाहुबली

छान

माम्लेदारचा पन्खा's picture

14 Aug 2017 - 12:10 am | माम्लेदारचा पन्खा

जागेची नोंद करुन घेण्यात आलेली आहे . . . . .

भित्रा ससा's picture

14 Aug 2017 - 12:34 am | भित्रा ससा

http://hindimedia.in/mumbai-ahmedabad-highway-true-vegetarian-hotels/ ह्यांच्याया हॉटेल बद्दल ही माहिती वाचण्यात आली

ज्योति अळवणी's picture

14 Aug 2017 - 2:11 am | ज्योति अळवणी

चांगली माहिती. हॉटेल मध्ये जाऊन बघायला हवे

रेवती's picture

14 Aug 2017 - 4:20 am | रेवती

अरे वा! बरं झालं समजलं या उपहारगृहाबद्दल.
धन्यवाद.

राघवेंद्र's picture

14 Aug 2017 - 5:43 am | राघवेंद्र

काय आठवण काढलीत. मस्त आहे हे हॉटेल. एअरपोर्ट ला जायच्या अगोदर इथे जेऊन जात असे.

अत्रे's picture

14 Aug 2017 - 6:11 am | अत्रे

छान अनुभव.

मध्यंतरी मी नेट वर वाचले होते की भारतात कोणतेही हॉटेल काढताना स्थानिक नगरसेवकला विशिष्ट टक्के (10%) भागीदारी द्यावी लागते (अर्थातच इल्लिगल). हे कितपत खरे आहे? आणि खरे असेल तर मग यांना हॉटेल काढणे कसे परवडते?

अभ्या..'s picture

14 Aug 2017 - 9:19 am | अभ्या..

सगळीकडेच असे काही नसते, टक्केवारी तर बिलकुल नसते. लोकांना सांभाळायची कला असेल तर पैसे लागत नाहीत.
पैसे टाकायचे असतात पण ते काही वेगळे लोक असतात. त्यालाही आपला धंदा अन तडजोडी कारणीभूत असतो.

माहितीसाठी धन्यवाद. (बादवे मी ऐकीव माहिती इथे वाचली होती https://goo.gl/KV4A4K )

My brother tried to open a Chinese fast food franchise that was popular in USA in India. His investment was 2 crore for one location with possible plans to expand it. He also calculated bribes of around 50 lakhs. Local mla took 10 % share in business with promise to run business seamlessly. Later after giving bribes to all departments , when it came to minister, he went over the board and demanded a 30% share or 50 lakh first bribe. Restaurant business run on 10% margin if it gathers good customer base.If in the first year itself you end up paying bribes and with no funding to sustain the business you will end up in loss. He gave up his plans.

तुम्ही म्हणता तसे असेल तर चांगलेच आहे. आमच्यासारख्या सामान्य जॉब करणाऱ्या लोकांना वाटते की धंदा म्हटले की भ्रष्टाचार/ फुकटची भागीदारी आलीच. अधिकाधिक व्यावसायिक लोकांनी याबाबद्दल लिहिले तर लोकांमधले गैरसमज दूर होतील.

सुबोध खरे's picture

14 Aug 2017 - 10:54 am | सुबोध खरे

हॉटेल चालवायचे तर राजकारणी आणि पोलीस यांचे हप्ते द्यावेच लागतात,. त्यातून बार असेल तर अबकारी अधिकारी इतका त्रास देतात की सचोटीने व्यवसाय करणे अशक्य आहे. दर वर्षी दारूचं परवाना नूतनीकरण करावा लागतो. ,या सर्वांच्या चेल्या चमच्याना फुकट खाऊ पिऊ घालावं लागतं.

हॉटेल चालवायचे तर राजकारणी आणि पोलीस यांचे हप्ते द्यावेच लागतात

हे सरसकट होत असेल तर याबद्दल कोणी ओपनली बोलत का नाही? आपल्या लोकांना मूग गिळून बसायची काय आवड आहे? (धाग्याचा विषय वेगळा आहे माहित आहे, कदाचित वेगळा धागा काढेन यावर)

तसा काही नसते. सरळ येऊन कुणीच हप्ते मागत नसते. जास्त वेळ हॉटेल चालू ठेवणे, बोर्डस, कामगार, एफडीए, जाहिराती, हिशोब, नोंदी, दर्जा अशा कित्येक गोष्टी व्यावसायिकाडून उन्नईस बिस होत असतात. ते सगळे सांभाळायचे तर मूळ व्यवसायाकडे दुर्लक्ष्य होते म्हणून हॉटेल व्यावसायिक हप्ते देतात. सगळेच नियम काटेकोरपणे पाळून हॉटेल व्यवसाय चालवणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे. त्यात गिर्हाईक आणि आरोग्य आणि त्यांची आवड अशा वैयक्तक गोष्टी महत्त्वाच्या असलेने त्याचा बॅलन्स साधताना बाकी गोष्टी दुर्लक्ष केल्या जातात अथवा पैसे देऊन गप्प केल्या जातात.

पैसा's picture

14 Aug 2017 - 9:19 am | पैसा

गुजराती लोक कोणत्याही धर्माचे असोत, धंदा उत्तम करतात. त्यांना शिक्षण उपलब्ध व्हायला हवे. मुस्लिम समाजात खरे तर थिअरीनुसार जाती नाहीत पण प्रत्यक्षात मात्र असतातच आणि त्याबाहेर कोणी जाऊ शकत नाहीत. धंद्यावर लक्ष केंद्रित असल्याने शिया मोमीन हे धार्मिकदृष्ट्या कट्टर नसतील असे वाटते.

मुंबईतल्या हॉटेलपर्यंत मी पोचायचे शक्यता कमी पण गुजरातमध्ये नक्कीच कधीतरी जाईन.

डॉक, लेख आवडला. मस्त लिहिलेय. अशा लोकांचे कौतुक वाटते.

एक वेगळीच माहिती मिळाली. छान लेख.

खेडूत's picture

14 Aug 2017 - 10:52 am | खेडूत

लेख आवडला.
लवकरच भेट द्यावी लगणार तिथे!

सिरुसेरि's picture

14 Aug 2017 - 11:35 am | सिरुसेरि

उपयुक्त माहिती . प्रतिसादही माहितीपुर्ण .

वरुण मोहिते's picture

14 Aug 2017 - 12:21 pm | वरुण मोहिते

मुंबईत जागा खाली करून देणे ,जागांवर कब्जा करणे ह्यात पण होती . शेवटी पठाणांना त्यांच्या त्रास होऊ लागला . कारण अतिशय चिवट जमात हि . कितीही धमक्यांना भीक घालायचे नाहीत . शेवटी पठाण आणि दाऊद यांची मदत घेऊन हाजी मस्तान ह्यांनी त्यांची हद्दी संपवली .

अभ्या..'s picture

14 Aug 2017 - 12:31 pm | अभ्या..

अशाच गुजरात मधून आलेल्या पारश्याच्या, दाऊदि बोहरांच्या त्यांच्या व्यवसायाशी असलेल्या अटचमेंट्स अतितीव्र असतात. त्यासाठी एक्स्ट्रीम लिमिट गाठतात ते. सोलापुरात अशाच एका बोहर्याच्या हॉटेलला खाली करायला रिव्हॉल्वर घेऊन आलेल्या डॉनला त्या म्हाताऱ्या बोहर्याने कानाखाली वाजवल्याचा किस्सा प्रचंड फेमस आहे. नावही टिपिकल. गुडलक.

मराठी_माणूस's picture

14 Aug 2017 - 2:58 pm | मराठी_माणूस

खुप दिवसांनी ह्या हॉटेलची आठवण झाली. हे तेच ना जे डफरीन चौक ते स्टेशन ह्या रस्त्यावर आहे ?

आदूबाळ's picture

14 Aug 2017 - 3:06 pm | आदूबाळ

सोलापुरात अशाच एका बोहर्याच्या हॉटेलला खाली करायला रिव्हॉल्वर घेऊन आलेल्या डॉनला त्या म्हाताऱ्या बोहर्याने कानाखाली वाजवल्याचा किस्सा प्रचंड फेमस आहे.

लोल! ब्याकार इज्जत निघाली असेल डॉनची.

मार्मिक गोडसे's picture

14 Aug 2017 - 3:20 pm | मार्मिक गोडसे

मुन्नाभाई MBBS ची आठवण झाली

हा ना, पण बावाजी लैच टेरिफिक होता म्हणे. त्या डॉनचे नंतर लै ठिकाणी उठले बाजार पण बावाजीत दम जबरा. टिच्चुन टिकवला ती मोक्याची जागा.
नाहीतर कुठल्या बीरबारचा एन्टरन्स सुपरमार्केटमधुन असतो? इकडे तिकडे बायकामाणसे तेलंसाबणदूधआईस्क्रीम घेताना त्यांच्यामधुन बारला जाणेयेणे करायचे म्हणजे जाणाराच दचकायचा. पण अगदी फेमस बार, परफेक्ट चिल्ड बीअर अन नीट सर्व्हिसमुळे गुडलकचे लै चाहते होते. एकदाही गैरप्रकार नाही.
@ममा. तेच गुडलक. डफरीनचे कॅफे स्माईल पण तसेच फेमस होते म्हणे, पण बघायचा योग नै आला. बंद पडले :(

एमी's picture

14 Aug 2017 - 4:24 pm | एमी

बोहरा??
म्हातारा?? (आमचे पौगंडापूर्वीपासूनचे क्रश आहेत ओ ते तिन्ही भाऊ!! असे नका म्हणू :-()

एमी's picture

14 Aug 2017 - 12:25 pm | एमी

छान लेख.

मनिमौ's picture

14 Aug 2017 - 1:58 pm | मनिमौ

छान जमलाय. मी जागेची नोंद करून ठेवली आहे. नोव्हेंबर मधे मुंबईत आल्यावर नक्की जाणार

मार्मिक गोडसे's picture

14 Aug 2017 - 3:00 pm | मार्मिक गोडसे

उपयुक्त माहिती.
Venture Capital सारखा प्रकार आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Aug 2017 - 3:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

उपयोगी माहिती. नोंद करून ठेवली आहे. त्या भागात जाणे होईल तेव्हा जरूर भेट दिली जाईल.

हॅाटेलमध्ये जाण्याची शक्यता कमीच पण एक चौकसपणामुळे छान माहिती पुढे आली. माझा या लोकांशी संबंध वेगळ्या कारणासाठी आला.चावीची घड्याळ रिपेरिंग करताना स्पेअर पार्टस आणायला अब्दुल रेहमान स्ट्रीटवर दर चार दिवसांनी जात असे. सर्व दुकाने यांचीच. ओळखही झालेली. एकदा एक पत्ता मालकास विचारला तेव्हा त्याने मला आवर्जून सांगितले "उस बाजू कभीभी नही जाना."

लवकरात लवकर ह्या ठिकाणाला भेट देणार....

मराठी_माणूस's picture

14 Aug 2017 - 9:03 pm | मराठी_माणूस

फोटो दिसत नाही.

नोंद घेण्यात आलेली आहे. पुढील कट्टा ठरवू इथेच. :)

दिवाना हु's picture

15 Aug 2017 - 9:27 pm | दिवाना हु

फोटो दिसत नाही.हो

अजया's picture

15 Aug 2017 - 9:47 pm | अजया

परवाच जाणे होणार आहे एअरपोर्टवर. तेही जेवायच्या वेळात. अगदी योग्य वेळी माहिती मिळाली. एरवी आम्ही एअरपोर्टवर अमरेलीमध्ये जेवतो.

नंदन's picture

16 Aug 2017 - 12:15 pm | नंदन

लेख आवडला. जमेल तेव्हा जाऊन यायच्या यादीत या ठिकाणाची भर घातली आहे.