हॅना आरेण्ट आणि हुकुमाची ताबेदारी (Obedience To Authority)

Primary tabs

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
3 Aug 2017 - 9:50 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

एखाद्या चित्रपटाचे परीक्षण लिहिताना आपण दोन प्रकारे ते काम करू शकतो
१. त्या चित्रपटाची कथा, त्यातली कला, दिग्दर्शन, त्यातल्या नटांचे अभिनय इ. ह्यांचे विश्लेषण, रसग्रहण किंवा अगदी चिरफाडही आणि
२. त्या चित्रपटात आलेल्या विषय वस्तूचे, मांडलेल्या विचार, तत्वज्ञानाचे - ऐतिहासिक, सामाजिक. धार्मिक किंवा तदनुषंगिक इतर प्रकारे विश्लेषण.
पण कधी कधी काही चित्रपट असा एखादा विषय, तत्वज्ञान किंवा विचार घेऊन येतात कि त्याबद्दल बोलताना, लिहिताना, विचार करताना तो मूळ चित्रपट आणि त्यातला प्रतिपाद्य विषय ह्याना वेगळेच वळण लागते.त्यामुळे मग ते चित्रपटाचे परीक्षण राहत नाही

हॅना आरेण्ट हा चित्रपट असाच आहे
म्हणजे रूढ अर्थाने पाहू जाता हा चित्रपट नाझी राजवटीत ज्यू लोकांचे जे अनन्वित हाल झाले, छळ झाले, हत्याकांड झाले त्याला जबाबदार असलेल्या लोकांपैकी एक अडोल्फ आईशमन ह्याच्या खटल्यामुळे विचारात पडून काही नवीन सिद्धांत मांडणार्या एका बाईचा संघर्ष आहे. आहे पण ह्या विषयावर आलेल्या ‘शिंडलर्स लिस्ट’, ‘द पियानिस्ट’ किंवा अगदी प्रदीर्घ अशा ‘न्युरेम्बर्ग’ ह्या चित्रपटासारखा मात्र तो नाही. ह्या चित्रपटात काय घडते ते थोडक्यात सांगून मग ह्या चित्रपटात नक्की काय सांगायचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्यावर माझ्या आकलनाप्रमाणे प्रकाश टाकायचा प्रयत्न करतो.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच म्हणजे अगदी अजून नावं दाखवली जातायत तेव्हाच, रात्रीच्या वेळी एका निर्मनुष्य , सुनसान रस्त्यावरून चाललेल्या एका वृद्धशा माणसाला काही तरुण जबरदस्तीने उचलून, एका ट्रक मध्ये घालून त्याचे अपहरण करून नेताना दाखवली आहेत. हाच तो कुप्रसिद्ध नाझी क्रूरकर्मा अडोल्फ आईशमन. त्याला उचलून नेणारे असतात इस्रायलच्या जगप्रसिद्ध गुप्तचर संस्था मोसाद चे गुप्तचर. सगळ्या जगभरात लवकरच इस्रायलचे पंतप्रधान डेविड बेन गुरियन हे अडोल्फ आईशमानला अर्जेन्तिनात पकडल्याचे आणि त्याच्यावर इस्रायलच्या न्यायालयात खटला चालवणार असल्याचे जाहीर करतात. अमेरिकेच्या ‘न्यू यार्कर’ ह्या प्रसिद्ध दैनिकाच्या संपादकाला पत्र लिहून हॅना आरेण्ट आपल्याला ह्या खटल्याचे वार्तांकन करण्यासाठी जेरुसलेम-इस्रायलला पाठवण्याची विनंती करणारे पत्र लिहिते. हॅना ही जन्माने एक ज्यू. १९३३ साली जर्मन गुप्त पोलीस-गेस्टापोनी अटक केल्यावर, मोठ्या शिताफीने जर्मनीतून निसटून अमेरिकेत गेलेली. पुढे प्राध्यापिका - लेखिका - तत्त्वज्ञ म्हणून भरपूर मान्यता पावलेली कर्तबगार, निर्भीड स्त्री. तिची विनंती मान्य होऊन ती जेरुसलेमला येते. संपूर्ण खटला ती बारकाईने आणि शांतपणे बघते. तिथेच तिला तिचा जुना मित्र कूर्त ब्लूमफिल्ड भेटतो. दोघांमध्ये आईशमन, खटला आणि त्याने केलेलं ज्यूंचे हत्याकांड ह्या निमित्ताने चर्चाही होते. हळू हळू तिला आईशमन बाबत एक वेगळीच गोष्ट जाणवू लागते.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

तिला जाणवते कि आइशमन हा खरेतर एक फडतूस, क्षुद्र असामाणूस म्हणून देखील अस्तित्वात नाही.त्याला स्वत:च्या अस्तित्वाची जाणीवच नाही. एखाद्या य:कश्चित किटकालाही त्याच्या पेक्षा अधिक स्वत:बद्दल जाणीव असेल.पण आदेश, व्यवस्था, कर्तव्य, निष्ठा, आज्ञाधारकत्व असल्या पोकळ कल्पनांच्या आहारी जाऊन, वरिष्ठांच्या आज्ञेबरहुकूम वाट्टेल ते करायला तयार होणारा. स्वतंत्र विचार करणं हे जे माणूसपणाचं लक्षण तेच सोडून दिलेला असा तो जंतू आहे. मात्र इतका क्षुद्र माणूस हाती अधिकार आल्यावर किती पराकोटीचा सैतानीपणा करतो हे पाहून, त्या क्रौर्याच्या मूर्तिमंत साक्षात्कारानं ती चरकते.. तिला जाणवते कि आईशमनच्या मनात ज्यु बद्दल द्वेष नाही तो फक्त ज्यांची चाकरी करतो ( किंवा करीत होता) त्याचा तो निष्ठावंत चाकर आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी तो ब्रह्मवाक्य म्हणून मानतो, करतो....थोडे ओळखीचे वाटते हे? ज्या गोष्टीवर, तत्वज्ञानावर आपली अनन्य श्रद्धा आहे त्या साठी मरायला-मारायला तयार होणारे मानव समूह इतिहासाला (आणि वर्तमानालाही ) नवखे नाहीत. सर्वसमावेशक(totalitarian) विचारप्रणाली माणसाच्या व्यक्तीमत्वाचा, सद्सद विवेकबुद्धीचा ताबा घेते, आणि या भांडवलावर मग असलं भयानक हत्याकांड घडतं. फक्त हिटलर सारख्या एखाद्या माणसाच्या सैतानी मेंदूवर त्याची जबाबदारी ढकलून आपण निर्दोष ठरू शकणार नाही, हे ती ठामपणे आणि जाहीरपणे लिहिते - मांडते.त्याच बरोबर तत्कालीन ज्यू नेत्यांनी घेतलेली प्राय: गप्प बसायची, बोटचेपी भूमिका हीदेखिल ह्या नृशंस हत्याकांडाला कारणीभूत ठरल्याचे ती ठासून सांगते. अर्थातच त्यामुळे आईशमनवर असलेली पापाची, हत्याकांडाची जबाबदारी ती कमी करायचा प्रयत्न करते आहे असा त्याचा अर्थ घेतला जातो. समाजमान्य-लोकप्रिय सत्याहून निराळं काही बोलणारी, लोकसंतापाला न जुमानणारी, 'उद्धट', 'भावनाशून्य', 'उलट्या काळजाची', 'बेईमान' अशा अनेक शेलक्या विशेषणांनी तिची संभावना झाली नसती, तरच नवल. अगदी जवळचे मित्र, गुरुस्थानी असलेले सुहृद, विद्यार्थी - चाहते - वाचक, अशा अनेक बाजूंनी तिच्यावर हल्ला होतो. लोकांमध्ये विशेषत: ज्यू लोकात संतापाचे उद्रेक होतात.पण लोकांच्या संतापाचे, टीकेचे हल्ले झेलूनही ती आपल्या मतावर ठाम राहते.पण म्हणून ती विचलित होत नाही असे चित्रपट दाखवत नाही. ती या हल्ल्यांनी घायाळ होते. दुखावली जाते. पण विचाराची कास मात्र सोडत नाही. "स्वत: विचार करणं, निष्कर्ष काढण आणि त्याबरहुकूम मत बनवणं हेच जिवंत असण्याचं, माणूस असण्याचं सर्वांत मोठं लक्षण आहे." हे ती बजावून सांगते.विवेक,सद्सद्विवेक बुद्धीची साथ सोडली तर माणसांची फक्त जनावरं नाही बनत, तर ती एका मोठाल्या यंत्रातली गिअर व्हील्स किंवा स्पेअर पार्टस बनून जातात – संवेदनाहीन, विचारशून्य. पडेल ते काम गप गुमान करणारी. यंत्राला आणि त्यातल्या स्पेअर पार्टसला कुठे भावना विचार असतात!

त्याकाळच्या जगभरातल्या ज्युन्प्रती असलेली सहानुभूती आणि अनुकम्पेची भावना आणि अमेरिकेतल्या ताकदवान ज्यू लॉबीची पार्श्वभूमीवर लक्षात घेतली, तर तिला झालेल्या विरोधाची धार आपल्याला कळू शकेल.
बार्बरा सुकोवा या जर्मन नटीनं हॅनाचं काम सुरेख केलं आहे. लोक हॅनाला नाझीधार्जिणी, ज्यू द्रोही म्हणू लागल्यावर ती तिच्या विद्यार्थ्यासमोर एका व्याख्यानातून/ परिसंवादातून आपली भूमिका पुन्हा मांडते. ह्या प्रसंगात बार्बराने जीव ओतून अभिनय केला आहे. बोलायच्या सुरुवातीला तिच्या मनात थोडी चलबिचल सुरू असलेली जाणवते.आधीच ती सिगारेट पेटवते "आज सुरुवातीलाच सिगारेट शिलगावतेय, समजून घ्या," असं ती म्हणते त्यातून हीच तिच्या मनातली कालवाकालव दिसते. जगभरातली सगळी न्यायालय माणसावरती खटले चालवून न्याय करतात, पण एखादा आरोपी जर आपण आपले मनुष्यत्व हरवून बसलो आहे/ होतो असे म्हणत असेल आणि जर ते सिद्ध झाले असेल तर...तर मग काय करायचे? वेडे मानसिक संतुलन हरवलेले लोक अशावेळी सुटतात पण मनुष्यत्व हरवण्याचा हा एकाच मार्ग आहे का? आईशमान सारखा मानसिक संतुलन शाबूत असलेला माणूस जेव्हा आपण फक्त एखाद्या यंत्र मानवाप्रमाणे कर्तव्य बुद्धीने हे करत होतो असे म्हणतो तेव्हा काय करायचे?ती आईशमानला निर्दोष मानत नाही पण त्यांनी केलेल्या , घडवून आणलेल्या हत्याकांडा इतकीच किंवा त्याहून काकणभर जास्तच भयानक गोष्ट हि आहे कि त्याने स्वत:च्या माणूसपणाची सगळी लक्षणे सिस्टीम पुढे उतरून ठेवली. त्या अर्थी पूर्ण तो सिस्टमला पूर्णपणे शरण गेला. आपले म्हणणे मांडून झाल्यावर ती परत एकदा सिगारेट पेटवते पण ह्या वेळी शांतपणे, मनावरचे ओझे उतरल्याच्या, कृतकृत्य झाल्याच्या भावनेने. (अर्थात याने सगळ्यांचे समाधान होत नाही. आजही तिच्या बद्दल विरोधी लिहिणारे बोलणारे लोक आहेतच.)
इथे चित्रपट संपतो. हा काही फार नाट्यमय रोमहर्षक असा चित्रपट नाही पण मागे एका लेखात म्हटल्याप्रमाणे केवळ मनोरंजन हे जर चित्रपटाचे मुख्य उद्दिष्ट मानले तर कुठलाही तद्दन गल्लाभरू सिनेमा चांगला असू शकतो. तसा तो खिडकीवर मोठा गल्ला जमा करून सिद्ध करत असतोच आणि याच कारणावरून बहुसंख्य सिने-निर्माते अशाच प्रकारचे सिनेमे बनवत असतात. पण म्हणून अशा सिनेमांना आपण हिट-गाजलेले, चाललेले सिनेमे म्हणतो, चांगले म्हणतोच असे नाही. चांगला सिनेमा हिट असो नसो एक गोष्ट खरी कि त्याने उत्तम मनोरंजन केलेच पाहिजे. पण मला असं वाटतं कि तेवढेच पुरेसे नाही. तुम्ही तो सिनेमा संपवून थेटरातून बाहेर पडताना सिनेमा डोक्यात घेऊन बाहेर पडला पाहिजेत. हा चित्रपट पाहून झाल्यावर केवळ तो डोक्यात फिरत राहत नाही तर इतर अनेक प्रश्न उभे करतो.

प्रश्न फक्त एकट्या दुकट्या हिटलर किंवा स्टालिनचा नाही. हा नरसंहार त्यांनी एकट्यानी घडवून नाही आणला तसा ते घडवून आणू शकलेही नसते. आईशमन्सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याची फौज उभी करून त्यांच्या कडून हे काम त्यानी करून घेतले. ह्यातले बरीच माणसे कुटुंबवत्सल, स्वत:च्या बायको मुलांवर अगदी घरातल्या कुत्र्या मांजरावर सुद्धा प्रेम करणारी होती, काही हळवी संवेदनशील, काही तर कलाकारही होती. पण निरपराध लोकांवर बंदुकीच्या फैरी झाडताना, त्यांना विषारी वायुच्या कोठड्यात ढकलताना ह्या सहृदय माणसांचे हात पाय कापत नसत.समोर उभ्या असलेल्या लोकात स्त्रिया मुलं गर्भार बाया अपंग सर्व प्रकारचे लोक आहेत तरी त्यांना त्याचा फरक पडत नसे. हे कसे शक्य आहे? ती केवळ आज्ञा पाळणारी, विचार न करणारी, हुकुमाचे ताबेदार माणसं होती ती असे म्हणून समाधान कसे होणार? जितके ह्या विषयावरचे चित्रपट डोक्युमेंटरीज, पहात होतो तितका हा प्रश्न अधिकच सतावू लागे.म्हणून बरीच शोधाशोध केल्यावर कळले कि ह्या हॅना आरेण्ट नावाच्या बाई मुळे आणि तिच्या ह्या धक्कादायक मांडणीमुळे, असाच प्रश्न पडून अमेरिकेतल्या येल युनिवर्सिटीचा मानसशास्त्राचा प्राध्यापक स्टेनले मिल्ग्राम हा असा एक प्रयोग करायला उद्युक्त झाला कि ज्याचे निष्कर्ष त्याच्या सकट सगळ्यांनाच धक्कादायक ठरले. अनेक वेळा हा प्रयोग केला गेला, अनेक प्रकारे केला गेला, पुढे अनेक जणांनी निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या देशात, विद्यापीठात ह्याचे प्रयोग केले पण निष्कर्ष तेच आले. काय होता तो प्रयोग? आणि त्याचे निष्कर्ष ...

हुकुमाची ताबेदारी (Obedience To Authority)
स्टेनले मिल्ग्राम

न्युरेम्बर्ग खटल्याच्या वेळी देखील अनेक नाझी क्रूरकर्म्यानी आपण फक्त वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत असल्याचे सांगितले होते. हा युक्तिवाद किंवा पळवाट न्यायालयात टिकणार नाही हे माहिती असून देखील.आता ही हॅना आरेण्ट सुद्धा असलेच काही म्हणत होती. पण ती तर आरोपी नव्हती कि त्यांची वकीलही नव्हती त्यांच्याशी सहानुभूती असलेली कुणी हितसंबंधीय ती नव्हती उलट असली तर त्यांच्या अत्याचाराची झळ बसलेली एक होती.
मग हे काय गौड बंगाल आहे. ह्याचा सोक्ष मोक्ष लावायचा निर्धार ह्या येल युनिवर्सीटीच्या मानसशास्त्राच्या प्राध्यापकाने लावायचे ठरवले.
ह्या प्रयोगात तीन लोक सामील होत असत. एक जण तर स्वत: प्रयोग करणारा निरीक्षकच असे, एक शिक्षक आणि एक विद्यार्थी. ह्यातला विद्यार्थी हा निरीक्षकाचा मदतनिसच असे पण शिक्षक झालेल्या स्वयंसेवकाला ते माहिती नसे.म्हणजे शिक्षक हाच खरा अभ्यासाकरता निवडला गेलेला असे. तर ह्यात शिक्षकाला एक प्रश्नावली दिली जात असे आणि त्याची उत्तरेही असत. जो विद्यार्थी आहे, तो शिक्षकाला दिसणार नाही पण त्याचा आवाज ऐकू येईल असा शेजारील खोलीत बसलेला असे.शिक्षकाने एक एक प्रश्न त्याला विचारायचा आणि जर विद्यार्थ्याने उत्तर चुकीचे दिले तर सामोर असलेल्या टेबलावरचे बटन दाबायचे. म्हणजे त्या विद्यार्थ्याला विजेचा शॉक बसत असे.हळू हळू ह्या शॉकचे प्रमाण वाढत नेले जाई. शॉकचा झटका वाढत जाई तसतसा विद्यार्थी आरडा ओरडा करे, किंकाळ्या ठोके ते अगदी शिक्षकाला तसे न करण्यासाठी गयावया करीत असे,अगदी रडत भेकत असे.(प्रत्यक्षात त्याला काहीही शॉक वगैरे दिला जात नसे तो फक्त नाटक करीत असे पण शिक्षकाला वाटे कि त्याला खरेच यातना होताहेत.)
अपेक्षा आणि वास्तव
ह्यात भाग घेतेलेले सर्व अगदी सर्व सामान्य लोक असत अगदी आपल्या सारखे. मग आपल्याला वाटेल कि त्या सर्वसामान्य माणसाने पहिल्यांदाच विद्यार्थ्याची किंकाळी ऐकली कि तो प्रयोग थांबवायला सांगत असेल.आपण जर त्या शिक्षकाच्या जागी असू तर नक्की हेच करू नाही का. (हा! एक सांगायचे राहिले, त्या शिक्षकाला प्रयोग सुरु होण्यापूर्वी सांगितले जात असे कि काय वाट्टेल ते झाले, ह्या प्रयोगात विद्यार्थ्याला गंभीर इजा झाली किंवा अगदी त्याचा मृत्यू जरी झाला तरी त्याची जबाबदारी पूर्णपणे निरीक्षकाची असेल, शिक्षकाची नाही.) एका वेळीहा प्रयोग अनेक शिक्षकांवर केला जात असे. पण पहिल्या किंकाळीलाच प्रयोग थांबवून बाहेर पडणाऱ्याची संख्या शेकडा फक्त १-३ असे. मिल्ग्रम्च्या मते हे प्रमाण खरेतर प्रयोग पूर्ण करणाऱ्या लोकांचे असायला हवे. अनेक जण विद्यार्थ्यांच्या किंकाळ्या ऐकून काळजी व्यक्त करीत, खरेच अशा यातना द्यायची गरज आहे का? म्हणून विचारत. पण ६० – ६५ % लोक कोणताही आक्षेप न घेता प्रयोग पुढे चालू ठेवत. जे लोक आक्षेप घेत, काळजी व्यक्त करत, ह्या शॉकची गरज आहे का म्हणून विचारत त्यांना खालील प्रकारे सांगितले जात असे.
१. कृपया प्रश्न विचारू नका, प्रयोग पुढे सुरु ठेवा
२. तुम्ही हा प्रयोग पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे.
३. तुम्ही साथ नाही दिली तर प्रयोग पूर्ण होऊ शकत नाही.

कुठेही त्याना आदेश दिला जात नसे, सक्ती केली जात नसे किंवा धमकावले जात नसे आणि तीन वेळा विनंती करूनही जर त्यांनी थांबायचीच इच्छा व्यक्त केली तर प्रयोग थांबवला जात असे.पण तरीही फक्त ५-६% लोक प्रयोग थांबवत बाकीचे प्रयोग पूर्ण करत असत.
निष्कर्ष –
सर्वसामान्य माणसं जर त्यांच्यावर परिणामांची जबाबदारी टाकली नाही तर जो परिणामांची जबाबदारी घेत असेल त्याच्या आज्ञांचे शब्दश: पालन करीत, त्यांचा विवेक, सद्सद विवेक बुद्धी त्याच्या आड येत नसे. आश्चर्य म्हणजे ह्या प्रयोगात स्त्रियाही सामील केल्या गेल्या आणि पुरुष आणि स्त्रीयामध्ये काहीही फरक सापडला नाही.
आपण असे का आहोत? मिल्ग्राम ह्याने निष्कर्ष काढला कि माणूस लाखो वर्षापासून उत्क्रान्त होता असताना समूहाच्या नेत्याची आज्ञा पाळणे हा त्याचा सहजभाव (instinct) बनला आहे. समूहाच्या नेत्याचे( alpha male) न ऐकणे, समूहातून वेगळे होणे, बहिष्कृत होणे म्हणजे मृत्यू हे समीकरण पिढ्यानपिढ्या भिनले आहे, पुढे ही असुरक्षिततेची, समुहात सामावून घेतले जाण्याची भावना इतकी प्रबळ होते कि त्यापुढे क्रूर वर्तन, स्वत:च्या सदसद्विवेकाशी प्रतारणा, स्वजातीयांतल्या दुबळ्या घटकांवर अत्याचार करतना त्याला काही वाटत नाही.
सर्व प्रकारच्या विचारधारा मग त्या धर्म असो वा साम्यावादा सारखे सामाजिक विचार असो त्यांना मुळ धरायला निष्ठावंत कार्यकर्त्यांची गरज असते आणि त्या विचारधारा जितक्या अधिक कठोरपणे माणसांच्या कृती नियंत्रित करत असतील, आणि त्यांच्या कल्याणाची,सुरक्षेची हमी जितक्या जोरदार पाने देत असतील तितक्या त्या जास्त लोकप्रिय होतात.
(आपल्या कडच्या जातिव्यवस्थेच्या इतकी वर्षे टिकून राहण्याच्या, रुजण्याच्या यशाचे स्पष्टीकरण कदाचित ह्याप्रकारे होऊ शकेल. अजून तसा प्रयत्न कुणी केल्याचे मला माहिती नाही.)

माणूस इतक्या सहजपणे आपले माणूसपण हरवून बसू शकतो नव्हे हरवतोच. तसे इतिहासात अनेक वेळा झालेले. वर्तमानातही ते घडताना आपण पाहतोच आहे. त्याचा दोष देण्यासाठी संबंधित धर्म ग्रंथ किंवा विचारधारा, तत्वज्ञानाला जबाबदार धरले जाते. त्या दृष्टीने संशोधन केले जाते पण ह्यात सामील असलेला अत्यंत महत्वाचा घटक- अनुयायी माणूस त्याकडे फारसे कुणी लक्ष दिले नव्हते.त्याच्या मूक संमतीशिवाय, आणि सक्रीय सह्भागाशिवाय हे काहीही घडणे शक्य नाही ही बाब कुणी लक्षात घेतलीच नव्हती.
त्या अनुयायी असलेल्या माणसाची मनोभूमिका, कारण मीमांसा शोधण्याच्या दृष्टीने शास्त्रशुद्ध प्रयत्न १९६२ साली प्रथम सुरु झाले आणि त्यामागची प्रेरणा ठरली “हॅना आरेण्ट.”
---आदित्य

हॅना आरेण्ट. चित्रपटाची माहिती
• दिग्दर्शक: मार्गारेटं फॉन ट्रोटा
• कलाकार: बार्बरा सुकोवा, जेनेट मॅकटीअर, क्लाउस पोल, निकोलस वूडंसन, ऍक्सेल मिल्बर्ग
• भाषा: जर्मन
• प्रदर्शन वर्ष: २०१३
• निर्माता देश: जर्मनी
• तिच्या शेवटच्या भाषणाची(इंग्लिश) यु ट्यूब लिंक-संपूर्ण चित्रपट free viewing मध्ये उपलब्ध नाही.
https://www.youtube.com/watch?v=wmBSIQ1lkOA
तिच्या मुलाखतीची लिंक(original)
https://www.youtube.com/watch?v=dsoImQfVsO4

समीक्षालेखमांडणी

प्रतिक्रिया

लेखातले विश्लेषण आवडले. विचारप्रवर्तक.

पिशी अबोली's picture

3 Aug 2017 - 11:14 pm | पिशी अबोली

फारच विचारप्रवर्तक लेख. धन्यवाद!

आनंदयात्री's picture

4 Aug 2017 - 2:27 am | आनंदयात्री

चित्रपटाची ओळख आणि त्याला धरून केलेले Obedience To Authority या कल्पनेचे विवेचन माहितीपूर्ण आहे. आवडले. हाती सापडलेल्या चोराला चान्स मिळेल त्याने फटके देण्यापासून ते आजकालच्या Internet vigilantism पर्यंतच्या सामूहिक उन्मादांची मुळेही यापेक्षा थोड्या वेगळ्या पण shared responsibility मुळे परिणामांची जबाबदारी नसल्याच्या भावनेनेच होत असावी असे वाटले. खरोखरच विचारप्रवर्तक अश्या लेखाबद्दल धन्यवाद.

पिलीयन रायडर's picture

4 Aug 2017 - 3:48 am | पिलीयन रायडर

फारच सुंदर लेख. खास करुन तुम्ही त्या प्रयोगाबद्दल लिहीले आहे ते वाचुन खुपच धक्का बसला. इतक्या कमी लोकांनी प्रयोग थांबवला ह्यावर विश्वास बसत नाही अजुनही. समजा माझ्याकडे पर्यायच नाहीये तर कदाचित मी हे असे होणे समजु शकते. पण आपण केवळ एका प्रयोगाचा भाग आहोत आणि तो नाही जरी पुर्ण झाला तरी काही बिघडत नाही हे माहिती असताना लोकांनी असं का केलं असेल? मला जगात शक्यतो संवेदनाशील माणसं जास्त आहेत असं वाटायचं. तुम्ही दिलेलं जातीव्यवस्थेचं उदाहरणही अगदी योग्य आहे. त्यातही अनेकांना कुणावर तरी अन्याय होत आहे, माणसांना यातना होत आहेत हे प्रत्यक्ष पहावं लागलं असेलच, तरीही मूकसंमती असल्याप्रमाणे समाज शांत होता. अर्थात त्यातही आपल्यालाच वाळीत टाकलं जाईल ही भीती असेलच. अशी कोणतीही भीती मनात नसतानाही त्या प्रयोगात मात्र लोकांनी माघार का घेतली नसेल?

अवांतर - आजच एक बातमी वाचली की अमेरिकेत एका मुलीला (वय १७) तिच्या मित्राला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल शिक्षा झाली आहे. ह्यात त्या मुलीने मित्राला केलेले मेसेजेस सुद्धा दिलेत. ते वाचताना असाच धक्का बसतो कारण त्यात आधी ती त्याला आत्महत्या करु नकोस असं म्हणते, पण पुढे जाऊन तिच त्याला स्वत:ला संपव म्हणुन अक्षरशः मागे लागते. आधी काही दिवस तो बिचकला. तेव्हा ती त्याच्यावर भयंकर वैतागली. तुझ्याच्याने काही होऊच शकत नाही हे ही म्हणाली. मग त्याला आई-वडीलांची काळजी वाटायला लागली तर तिने त्याला हे ही पटवुन दिले की कसे ते ह्यातुन बाहेर पडतीलच आणि ती स्वतः त्यांना मदत करेल. शेवटच्या दिवशी तर त्याला "केलीस तर आत्ता ताबडतोब आत्महत्या कर, उद्या काही तुझ्याचाने होणार नाही" असे म्हणुन आत्महत्या करायला "पाठवले."

तिला काय मिळणार होते असे करुन?

वर वर अत्यंत साधी दिसणारी माणसं आहेत ही.. ते जास्त भयानक आहे...

मिल्ग्राम ह्याने निष्कर्ष काढला कि माणूस लाखो वर्षापासून उत्क्रान्त होता असताना समूहाच्या नेत्याची आज्ञा पाळणे हा त्याचा सहजभाव (instinct) बनला आहे. समूहाच्या नेत्याचे( alpha male) न ऐकणे, समूहातून वेगळे होणे, बहिष्कृत होणे म्हणजे मृत्यू हे समीकरण पिढ्यानपिढ्या भिनले आहे, पुढे ही असुरक्षिततेची, समुहात सामावून घेतले जाण्याची भावना इतकी प्रबळ होते कि त्यापुढे क्रूर वर्तन, स्वत:च्या सदसद्विवेकाशी प्रतारणा, स्वजातीयांतल्या दुबळ्या घटकांवर अत्याचार करतना त्याला काही वाटत नाही.

समूह चांगला असेल तर ठीक (उदा. जनहितार्थ काम करणाऱ्या लोकांचा समूह) पण समूहाची प्रेरणा वाईट असेल तर ते एकट्यादुकट्या वाईट माणसापेक्षा जास्त हानिकारक ठरते. म्हणूनच जेवढे शक्य होईल तेवढे एखाद्या समुहापासून दूर राहिले पाहिजे, म्हणजे स्वत:ला एकाच समूहात जास्त गुंतवू नका. मग हे समूह धर्माधारित असोत, जातीधारीत किंवा राजकीय किंवा अजून कोणते ..

पैलवान's picture

4 Aug 2017 - 8:56 am | पैलवान

असा विचार कधी केला नव्हता, खरं तर असं काही असतं हेच माहिती नव्हतं.
आनंदयात्री यांनी वर लिहिल्याप्रमाणे
सामूहिक उन्मादांची मुळेही यापेक्षा थोड्या वेगळ्या पण shared responsibility मुळे परिणामांची जबाबदारी नसल्याच्या भावनेनेच होत असावी असे वाटले

पिशी अबोली's picture

4 Aug 2017 - 9:11 am | पिशी अबोली

बोकाभाऊंच्या 'अंधारक्षण' या मालिकेची आठवण झाली. दुसऱ्या महायुद्धातील अत्याचार करणाऱ्या लोकांच्या मुलाखतींचा स्वैर अनुवाद होता. हुकुमाचे ताबेदार हा एक भाग त्यात होताच, पण असं आठवतं की ज्यांच्यावर अत्याचार करायचे आहेत, ते लोक आपल्या वंशापेक्षा अतिशय तुच्छ आहेत, असा काहीसा यातील बऱ्याच जणांचा ठाम विश्वास होता. ब्रेन वॉशिंग म्हणा..

दशानन's picture

4 Aug 2017 - 9:15 am | दशानन

चित्रपट पहावाच लागेल...
अप्रतिम लेख, आवडला आहे व लिंक शेअर करतोय.

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Aug 2017 - 10:08 am | ज्ञानोबाचे पैजार

....थोडे ओळखीचे वाटते हे?

हे वाचताना अनेक प्रसंग, बातम्या डोळ्या समोरुन तरळून गेल्या.

आपण यंत्रमानव बनवण्यात आपले श्रम उगाच वाया घालवतो आहे. त्याची खरोखर काही गरज नाही असे लेख वाचल्यावर विशेषतः त्या प्रयोगाचे निश्र्कर्ष वाचल्यावर वाटले.

सध्या ऑनलाईन गेम मधे सुरु असलेला "ब्लु व्हेल" हा देखील याच प्रकारचा खेळ असावा असे वाटले. या मधे खेळाडुला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले जाते असे वाचण्यात आले आहे.

पैजारबुवा,

मराठी_माणूस's picture

4 Aug 2017 - 11:04 am | मराठी_माणूस

काही राजकीय पक्षां मधे , "हाय कमांड" च्या आज्ञा पाळल्या जातात, कींवा , "त्यांची" मर्जी असणे हीच जीवनाची इती कर्तव्यता आहे असे समजणे, त्यात धन्यता मानणे तो साधारण हाच प्रकार असावा .

स्वधर्म's picture

4 Aug 2017 - 12:16 pm | स्वधर्म

याविषयी ‘अाजचा सुधारक’ मध्ये दोन भागात अतिशय विस्तृत माहिती वाचली होती, त्याची अाठवण झाली. वर अत्रे म्हणतात ते पटले. कोणत्याही समूहाचा भाग होणे, शरण जाणे हे माणूसपणाचा शेवट करू शकते. चांगल्या परिक्षणाबरोबरच विचारप्रवर्तक लेखाबद्दल धन्यवाद.

पद्मावति's picture

4 Aug 2017 - 12:19 pm | पद्मावति

उत्तम लेख.

गामा पैलवान's picture

4 Aug 2017 - 1:03 pm | गामा पैलवान

आदित्य कोरडे,

उत्तम लेख. त्यात वर्णिलेली परिस्थिती रोचक आहे. भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांविरुद्ध घातपाती कृत्ये केली होती. विशेषत: क्रांतिसिंह नाना पाटलांनी सातारा भागात प्रतिसरकार स्थापन केलं होतं तिथे संशयितांची सर्रास मुंडकी उडवली जायची. इथेही हुकुमाच्या ताबेदारीचा नियम लागू करावा काय?

आ.न.,
-गा.पै.

जयंत कुलकर्णी's picture

4 Aug 2017 - 2:07 pm | जयंत कुलकर्णी

आपल्याला जे पटते तेच करण्यास अतोनात धैर्य लागते. अर्थात अशीही माणसे होऊन गेली आहेत. अशाच एका माणसासाठी "हॅक्सॉ रिज'' हा मेल गिबसन यांचा चित्रपट जरूर बघावा

मार्मिक गोडसे's picture

4 Aug 2017 - 2:54 pm | मार्मिक गोडसे

रोचक माहीती.

प्रयोगातून माघर न घेणार्‍या लोकांबद्दल पिराताईंनी विचारलेल्या प्रश्नाचाही शोध घेणे आवश्यक आहे.

आदित्य कोरडे यांची मांडणी नेहमीच अभ्यासू आणि अतिशय मुद्देसूद असते, पण सध्याला ते बाजूला ठेऊ. लेखात मनुष्याच्या ज्या विचारहिनतेवर भाष्य झालं आहे तोच परिणाम या लेखानं देखिल साधला आहे कि काय अशी (आणि माझ्याच खालिल मुद्द्यांतल्या विरोधातली!) कबुली देऊन मी टिका करायला चालू करतो.
===============================
जवळजवळ प्रत्येक व्यक्तिला सामाजिक, राजकीय व्यवस्थेच्या आणि स्वतःच्या रिलेटिव शक्तीचं आकलन असतं. व्यवस्थेतल्या त्रुटी, उणिवा जाणवत असतात. व्यवस्थेकडून होणार्‍या कायदेशीर आणि कायदाबाह्य गुन्ह्यांची, अन्यायांची आणि क्रौयांची कल्पना असते. हे सगळं त्याचं प्रत्यक्ष अनुभवविश्व असतं. काही प्रमाणात कधी कधी व्यक्ति अशा पापांचा लाभार्थी देखिल असते. पण याचा अर्थ कितपत खेचता येतो?
व्यक्ति सहसा जे समाजमान्य आहे ते करतो. सैनिक शत्रूचे मुडदे पाडतो ते याच तत्त्वावर. हे क्रूर आहेच पण शत्रू ही संकल्पनाच अर्थहीन आहे का? मग शत्रू ही संकल्पना हाताळणारा तो अल्फा मेल आणि त्याचे ऐकणारे ते सैनिक हे बुद्धिभ्रष्ट, बुद्धिहिन, विवेकहिन आहेत असे म्हणावे का? ज्यावेळेस दोन अत्यंत प्रोफेशनल फौजांचे युद्ध होत असेल तेव्हाही?
मनुष्य हा समाजशील, समाजप्रेमी प्राणी आहे कि व्यवस्थाप्रेमी? मूळात व्यवस्था आणि समाज एकमेकांपासून वेगळे काढायचे कसे? म्हणजे व्यवस्थेशी निष्ठ न राहता समाजावर प्रेम कसे करायचे? मनुष्याचा विवेक ही अत्यंत सुंदर गोष्ट आहे. तो नेहमी जागृत असतो. याला अनंत कारणांनी बरेच लोक अपवाद निघतात मात्र अख्ख्या मानवजातीवर विवेकहिनतेचा सर्रास आरोप होऊ शकत नाही.
====================================
मनुष्याचा विवेक हायजॅक करता येतो. आणि अगदी मास स्केलवर देखिल करता येतो. हॅना म्हणते कि हा माणूस ज्यूंचा द्वेष करत नाही. बरोबर आहे. कसा करेल. जे मनुष्यच नाहीत त्यांचा द्वेष कसा आणि का करायचा? इतिहास असा आहे कि आज आपण होमो सेपियन ही स्पेसिज हे अंतिम वर्गीकरण मानतो. तेव्हा वंश हे नवाविष्कृत शास्त्रीय अंतिम वर्गीकरण होते. आणि ज्यूंचा वंश संपण्याच्या लायकीचा होता. (इतर अन्यही बरेच वंश संपवले गेले पण त्याचा इतका ब्रभा झाला नाही. आपण जो धर्म विवेकहिनता आणतो असा जाता जाता अस्पष्ट उल्लेख केला आहे, तो या सर्व वंशांना ख्रिश्चन बनवू म्हणत असे.) ज्यू स्त्रीयांवर बलात्कार देखिल करायचे नाहीत वा संमतीने संबंध ठेवायचे नाहीत (अन्य युरोपियन स्त्रीयांवर चालतील) अशी त्या काळात जर्मन सरकारची अधिकृत निती होती. तो एकूण प्रकारच विज्ञानाने डोके हायजॅक केल्याचा काळ होता. हार्वर्डमधे कवटीची मापे घेऊन (आणि मुलाखत न घेता) प्रवेश देणारी शास्त्रीय मंडळी असेल तर दुसरं काय होणार? दिग्दर्शकाने चित्रपटाच्या एक अत्यंत महत्त्वाच्या अंगाचा अभ्यासच केलेला नाही आणि मानसशास्त्रीय निष्कर्ष काढले आहेत.
अनेकदा संपूर्णजात अशा मशिनेशन्सला बळी पडते. पण हे बळी पडणं झालं. फसवलं जाणं झालं. मूळ विवेक मरणं नव्हे.
आई बाळाच्या अंगात तिच्या प्रत्यक्ष सुई टोचलं जाणं सहन करते, पण ते क्रौय कसं होईल? इंजेक्शन हे काहीतरी चांगलं आहे हा इतका दृढ (आणि खरा देखिल) समज आहे कि ती ते होऊ देते. तिला इम्म्यूनिटीमधलं स्वतःला फार काही कळत नाही. सर्वसाधारणपणे लोक करतात ते योग्यच असावं असं ती मानते. योग्यतेच्या आग्रहाचा
मनुष्याचा पिंड मजबूत असतो.
सार्‍या मानुष्यिक व्यवस्था अंततः माणसाच्या जागृत आणि न फसलेल्या किंवा भोळसटपणामुळे हायजॅक झालेल्या किंवा किमान उद्दिष्टापुरता मनातल्या मनात शुद्ध असलेल्या विवेकाच्या सेवेसाठी राबत असतात. कोण्या एका कालखंडात व्यवस्थांचा कणा असलेल्या ईश्वर आणि धर्म या संकल्पना अचानक टाकून देऊन नवी व्यवस्था आणायच्या गोंधळाच्या काळात असे हायजॅकींगचे प्रकार जास्त झाले तर विवेकपालनाच्या जागी व्यवस्थापालन ही मनुष्याची आंतरिक उर्मी आहे असे होत नाही.
============================================
असले मानसशास्त्रीय निष्कर्ष काढायची झालेली घाई वा असले उठपटांग निष्कर्ष अजून एक बाब हायलाईट करून जाते. ती म्हणजे मूळात मानवात ईश्वरदत्त असं काही सौंदर्य वा चांगुलपण वा माणुसकी नाही असं नव्या व्यवस्थेचं गृहितक. मग एक उत्क्रांत रेणूसंच, संगणक म्हणून काहीही अनुमान बांधा. धाग्यात उत्क्रांतीचा उल्लेख केला आहे. अहो, उत्क्रांती हे सिडोसायन्स आहे, तिचं उपयोजन इतक्यात आपल्याच मानसिकतेचा अभ्यास करून मोकळं व्हावं असं करायला अजून अवकाश आहे.
============================================
धाग्यातला प्रयोग आणि त्याचं अनुमान देखिल हास्यास्पद आहे. कोणत्या कायद्यानुसार प्रयोगातले "शिक्षित" प्राध्यापक विद्यार्थी मेला तर सुटणार होते? कोणत्याही खेळामधे प्रायोजक स्वत:च्या मर्जीप्रमाणे काहीही रिस्क्स घेऊ शकत नाही. अन्य खेळाडू (प्रोफेसर) कोणी (विद्यार्थि) मेला तर सह आरोपी होणारच. विद्यार्थ्यांना (एका अज्ञात महान उद्दिष्टिसाठी केलेल्या) प्रयोगाचेवेळि तात्कालिक त्रास द्यायचा का नाही इतकंच त्यांना ठरवायचं असेल. बहुतेक अर्ध्या प्रोफेसर्सना तर बटन दाबायच्या आणि किंचाळायच्या वेळांच्या फरकामुळेच आनंद आला असेल. उत्तर चुकलं तर वाढत्या क्रमानं शॉक देऊन आपलं मार्केट नष्ट करायला प्रोफेसर्स इतके मूर्ख आहेत?

हतोळकरांचा प्रसाद's picture

22 Aug 2017 - 6:52 pm | हतोळकरांचा प्रसाद

आदित्य कोरडे आणि अजो....क्या बात!! उत्तम लेख आणि त्यावर तितकाच दणकट प्रतिसाद!

स्मिता.'s picture

4 Aug 2017 - 5:58 pm | स्मिता.

चित्रपटाचा परिचय आणि त्यावरचे विश्लेषण आवडले.

प्रयोगाचा भाग मात्र काही पटला नाही. माझं स्वतःचं अगदी प्रामाणीक मत असं की जर मला माहिती असेल की मी केवळ एका प्रयोगाचा भाग आहे (समूहाच्या नेत्याची आज्ञा नव्हे) आणि माझ्यावर कसलीही जबाबदारी नाही तरी केवळ एका प्रयोगाकरता कोण्या व्यक्तिला मी यातना देवू शकणार नाही. मला वाटतं आपल्या आजूबाजूची बरीचशी लोकं अशीच असावीत. समाजातले बहुतेक गुन्हेदेखील काहितरी कारणावरून होत असतात. मानसीक संतुलन शाबूत असलेले लोक उगाच कोणावरही अत्याचार करत नसावेत.

आदित्य कोरडे's picture

5 Aug 2017 - 7:22 am | आदित्य कोरडे

तुम्ही ज्या प्रकारच्या अपेक्षा व्यक्त केल्यात तशाच अगदी मिल्ग्राम ला देखील होत्या पण प्रत्यक्ष प्रयोगातून मिळालेले निस्ज्कर्ष धक्कादायक होते, हे प्रयोग अनेक वेळा अनेक ठिकाणी केले गेले . बरेच तज्ञलोक आजही त्या निष्कर्षाला मानत नाहीत ,तेव्हाही मानीत नव्हते त्यांनी स्वत: प्रयोग केले परंतु त्या सगळ्यांचे निष्कर्ष कमी अधिक फरकाने मिल्ग्राम्च्या निष्कर्षाला पूरक असेच होते. १९६२ पर्यंत अशा प्रकारे अनुयायांच्या मनोवृत्तीचे विश्लेषण करायचा कुणी प्रयत्न केला नव्हता . पण ह्या दृष्टीकोनातुनाही ही संशोधन करणे आवश्यक आहे हे अधोरेखित झाले.

स्मिता.'s picture

6 Aug 2017 - 2:09 am | स्मिता.

हे खरे असेल तर मात्र एकंदरीत फार भयावह आहे. आपण असे क्रूर वागण्याची शक्यताच मला सहन होत नाही.

सौन्दर्य's picture

4 Aug 2017 - 10:57 pm | सौन्दर्य

छान परीक्षण.

"सर्वसामान्य माणसं जर त्यांच्यावर परिणामांची जबाबदारी टाकली नाही तर जो परिणामांची जबाबदारी घेत असेल त्याच्या आज्ञांचे शब्दश: पालन करीत, त्यांचा विवेक, सद्सद विवेक बुद्धी त्याच्या आड येत नसे." हे वाक्य एकदम पटलं. ह्यावरून काही घटना, उदाहरणे आठवली.

१) सती प्रथेच्या काळात सती जाणाऱ्या (?) स्त्रीला, चर (मोठा खड्डा) खणून त्यात चिता पेटवून, चितेवर बसायला लावीत. चर अश्यासाठी की आगीच्या दाहाने होरपळल्यावर देखील तिला चितेवरून बाहेर येता येऊ नये, म्हणून. एव्हढ असूनही जर ती बाहेर यायचा प्रयत्न करू लागली तर मोठमोठे बांबू, काठ्या घेऊन तिला पुन्हा आत ढकलणारे तेथे असंत. बाजूला मोठ मोठे ढोल, नगारे वाजवणारे असंत, का तर तिच्या किंकाळ्या ऐकू यायला नकोत म्हणून. एव्हढी क्रूरता कोण आणि कशी करू शकत असेल ? चितेच्या आसापास त्या दुर्दैवी स्त्रीचे आप्त-स्वकीय असणारंच, मग ते हे सर्व कसे खपवून घेत ? त्यामागचे उत्तर 'मी त्याला जबाबदार नाही' हेच असावे असे मला वाटते. एकदा का 'धर्म, प्रथा, चालीरीती' ह्यांच्या अंगावर जबाबदारी टाकली की आपण नामा निराळे. पुन्हा जर एखाद्या स्त्रीला सती जाण्यास प्रवृत्त नाही केले तर समाज पुरुषांची भीती, समाजातून बहिष्कृत होण्याची भीती. त्यामळे 'मेल अल्फा'च्या इच्छेप्रमाणे त्यांचे वागणे होत असावे.

२) हे एक काही वर्षांपूर्वीचे उदाहरण - मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनवर एका पाकीटमाराला लोकांनी पकडले. त्याची झडती घेऊन देखील त्याच्याकडे काहीही सापडले नाही (पाकीट मारणारा एक असतो जो लगेच त्याच्या साथीदाराकडे ते पाकीट पास ऑन करतो) परंतु त्याला पकडणाऱ्या माणसाची खात्री होती की ह्यानेच पाकीट मारले आहे. लगेच आसपासची सगळीच माणसे त्या पाकीटमारावर तुटून पडली आणि त्याला बेशुद्ध पडेपर्यंत मारलं. तो जमिनीवर पडल्यावर देखील जाणारा येणारा त्याला लाथा मारीत होता मात्र पोलीस आल्यावर तेथे एकजण उभा राहिला नाही. जर तो पाकीटमार मेला असता तर इथे कोणा एकावर त्याचा आळ येण्यासारखा नव्हता त्यामुळे जो तो त्याला मारीत होता. ज्यावेळी जमाव दगडफेक करतो, जाळपोळ किंवा इतर हिंसा करतो त्यावेळी (पकडला गेला नाही तर) कोणा एकावर जबाबदारी येणार नसते. हे एक mob psychologyचे उदाहरण झाले. इथे देखील 'जबाबदारी' हा एक महत्त्वाचा घटक आसतो.

३) हल्ली जी एक राजकीय, सामाजिक आणि धार्मिक विचारधारा चालू आहे, ती जराही पटली नाही तरी त्या विचारधारे विरुध्द बोलण्याची, लिहिण्याची, किंवा कृती करण्याची लोकांची हिम्मत होत नाही. ह्या मागची काही कारणे म्हणजे "मला काय करायचंय ?" ही एक वृत्ती आणि दुसरे म्हणजे स्व:ताची तसेच स्वताच्या कुटुंबाची सुरक्षा आणि सुबत्ता ह्याची काळजी आणि तिसरे म्हणजे "माझ्या ह्या विचारांनी 'अल्फा मेल' ला काय वाटेल?" ही भीती.

अत्याचार करणारे आणि त्या अत्याचाराकडे काणाडोळा करणारे हे सारखेच दोषी असतात. थोडक्यात काय तर आदित्यजींने त्यांच्या लेखात मांडलेले मुद्दे हे कालातीत आहेत, हेच खरे.

arunjoshi123's picture

7 Aug 2017 - 11:49 am | arunjoshi123

एकदा का 'धर्म, प्रथा, चालीरीती' ह्यांच्या अंगावर जबाबदारी टाकली की आपण नामा निराळे. पुन्हा जर एखाद्या स्त्रीला सती जाण्यास प्रवृत्त नाही केले तर १. समाज पुरुषांची भीती, समाजातून बहिष्कृत होण्याची भीती. त्यामळे 'मेल अल्फा'च्या इच्छेप्रमाणे त्यांचे वागणे होत असावे.

डॉक्टर लोक रुग्णाचे शरीर चिरतात, मधले अवयव फाडतात, सुईने टाके घालतात नि शिवतात. हे सगळं गुंगी देऊन करतात. जर इमर्जन्सी असेल नि गुंगी देणारा डॉक्टर नसेल तर कधी कधी बिना गुंगीचं ऑपरेशन करावं लागतं. (माझ्या ओळखीच्या एका डॉक्टरानी काश्मिरमधे अक्षरशः सुजून बाहेर आलेल्या मेंदूला आत ढकलून बिनागुंगीचं ऑपरेशन केलं होतं. डॉक्टर असूनही त्यांना ते आठवताना शहारे येतात.). रुग्णाला या प्रसंगी भयंकर यातना होत असतात. माणसात ईंट्रिंसिकली (आंतरिकपणे?) खूप क्रौय आहे. अगदी सज्जन डॉक्टरांत (क्षमस्व, डॉक्टरांना हा क्रौर्य शब्द आवडणार नाही पण संदर्भच तसा आहे.) देखिल आहे. पण क्रौर्याचा वापर सत्कारणी होतो आहे ही मूलभूत भावना आवश्यक आहे तरच ते सामान्य माणसाला शक्य आहे. दिसायला क्रूर असलेल्या गोष्टी असायला पण क्रूर हव्यात.
२. सती देत नाहीत, सती जातात. सतीला जबरदस्ती करणे हा प्रकार फक्त काही ठिकाणी बंगालमधे होई त्यामागे मृत स्त्रीची संपत्ती लाटणे हा उद्देश असे. सती दक्षिण भारतीय ब्राह्मण आणि राजस्तानी राजपूत यांच्यात अल्पप्रमाणात असे. सती जायला प्रवृत्त करणे असा कोणता प्रकार नसे. जगभरच्या अनेक वंशांच्या लोकांना गुलाम बनवणार्‍या, विकणार्‍या, अमानवी जीवन जगायला लावणार्‍या, अमानवी यातना देणार्‍या आणि मनुष्यच नाहीत म्हणून हत्या करणार्‍या तसेच स्वतः विचहंट वैगेरे सतीपेक्षाही भयानक प्रकार करणार्‍या युरोपीय लोकांनी भारतीयांचा सांस्कृतिक गंड तोडण्यासाठी सती प्रथेचा प्रचंड ब्रभा केला. पण त्यानिमित्ताने का होईना ती कुरीती गेली. नगाडे वाजवणे आणि चर बनवणे हे अधिकच्या क्रौयाचं प्रतिक नाही, उलट मूळातल्या क्रौयाच्या रानटीपणावर घालायचा तो एक मुलामा आहे. पण यात अल्फा मेल कोण? केशवपन नावाची प्रथा होतीच, जी इतकी क्रूर नव्हती. तर हे समाज पुरुष सतीच जायला पाहिजे म्हणून वाळीत कसे टाकणार? रुढिंवर टिका करायची हौस वेगळी, ती हवी तेवढी भागवा, पण माणसात आंतरिक क्रौय आहे हे पटत नाही.
३. कर्नाटकातल्या एका पंथात प्राण स्वर्गात जावेत, इ इ करिता मृत्यूप्रसंगी (म्हणजे मरण्याअगोदरच) उभ्याने कवटी फोडून मारतात (अगोदर करायचे.). हा शंकराचार्य वा माधवाचार्य हा स्वतःच धार्मिक अल्फा मेला आहे.
==============================
जगत्कारण नक्की काय आहे याची कल्पना नसल्याने, वा खोटी कल्पना असल्याने अगदी भले भले कशावरही विश्वास ठेवतात. हा भ्रम सामाजिक स्वरुपाचा झाला तर तो दूर होईपर्यंत अख्खा समाज त्याला बळी पडतो. मनुष्याची आंतरिक उर्मि सद्वर्तनाची असते आणि क्रौर्याची भावना बरेचदा असली तरी सीमा असते.

अरुण जी, प्रतिसादाबद्दल आभार.
माझ्या प्रतिसादात देखील मी 'सती जाणे' हाच शब्दप्रयोग वापरला आहे, फक्त सती जाणारी स्त्री नेहेमीच स्व:ताच्या इच्छेने सती जात नसावी असे वाटते. पतीच्या मृत्यूनंतर सती जाण्यास तयार होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. १) पती निधनामुळे होणारे आत्यंतिक दु:ख, २) "आता आपले कसे होणार ?" ही भीती ३) समाजाचा, आप्त-स्वकीयांचा दबाव (अल्फा मेल) ४) घराण्यातील प्रथा ५) धार्मिक चालीरीती ६) सतीचे उदात्तीकरण वगैरे. पती निधनाने होणारे दु:ख मोठे असले तरी निसर्ग नियमाप्रमाणे काही दिवसांनी त्या दु:खाची तीव्रता कमी कमी होत जाते. त्यामुळे क्षणैक भावनेतून सती जाण्यास एखादी स्त्री तयार जरी झाली तरी इतर अनेक कारणे तिला सती जाण्यास जास्त प्रवृत्त करीत असावीत. युरोपीय लोकांनी काय केले ह्यापेक्षा 'सतीची प्रथा' ही वाईट होती की नाही हे तपासणे जास्त महत्त्वाचे आहे. जिवंत व्यक्तीला पतीच्या चितेवर अग्नीदाह देणे हे कोणत्याही सुसंकृत समाजासाठी लांच्छनास्पद आहे.

"नगाडे वाजवणे आणि चर बनवणे हे अधिकच्या क्रौयाचं प्रतिक नाही, उलट मूळातल्या क्रौयाच्या रानटीपणावर घालायचा तो एक मुलामा आहे." -
हे काही पटले नाही. सतीची प्रथा हेच एक क्रोर्य होते, आणि वरील गोष्टी ह्या, हे क्रौर्य दडपून टाकण्यासाठी केलेलं अधिकचं क्रौर्य आहे. त्यापेक्षा क्षणिक दु:खामुळे स्व:ताहून सती जाण्यास तयार होणाऱ्या स्त्रीस जर चितेतून बाहेर यायचे असेल तर तिला ती संधी देणे अधिक गरजेचं, सहानुभूती दर्शक ठरलं असतं. ते न करता ढोल, नगार्यांच्या आवाजात तिचा आक्रोश दडपून टाकणे, तिने बाहेर यायचा प्रयत्न केला तर तिला बांबूने पुन्हा आत ढकलणे ह्याला जर क्रौर्य म्हणत नसतील तर क्रौर्याच्या व्याख्याच बदलाव्या लागतील. ह्यात 'अल्फा मेल' म्हणजेच समाज, धार्मिक रूढी, चालीरीती वगैरे. सती जाणे तर राहूच द्या, साधे केशवपन नाही केले, लाल आलवण नाही नेसले किंवा इतर सामाजिक कार्यात भाग घेतला तर त्या स्त्रीची होणारी बेअब्रू, तिच्या संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकणे वगैरे ह्या विषयी खूप काही लिहिले गेले आहे.

"कर्नाटकातल्या एका पंथात प्राण स्वर्गात जावेत, इ इ करिता मृत्यूप्रसंगी (म्हणजे मरण्याअगोदरच) उभ्याने कवटी फोडून मारतात (अगोदर करायचे.)"
ह्याला आपण हत्या म्हणतो असं मला वाटतं. अजून आपण "इच्छामरण द्यावे की नाही" ह्यावर वादविवाद आणि चर्चा करीत असताना असे करणे हा देखील एक क्रौर्याचाच प्रकार होता, असे मला वाटते. डॉक्टर करीत असलेली शल्यक्रिया ही त्या रोग्याच्या भल्यासाठी केली जाते आणि बऱ्याच वेळा ते सिद्धही होते. परंतु धार्मिक रूढी, परंपरा, अंधश्रद्धा वगैरेमुळे करण्यात आलेल्या कृतींनी त्या व्यक्तीला अपेक्षित श्रेय प्राप्त झाले आहे हे कधीही सिद्ध झाले नाही.

"रुढिंवर टिका करायची हौस वेगळी, ती हवी तेवढी भागवा, पण माणसात आंतरिक क्रौय आहे हे पटत नाही."
मला येथे कोणत्याही प्रकारे रूढींवर टीका वगैरे करायची हौस नाही. (तशीही सतीची प्रथा आधी समाज सुधारकांनी, ब्रिटीशांनी आणि आपल्या सरकारने बंदच केली आहे) माणसात आंतरिक क्रोर्य हे असतेच, त्या क्रौर्याची जबाबदारी अंगावर पडली नाही तर ते अधिकच उफाळून निघते एव्हढेच मला म्हणायचे आहे. त्या दृष्टीने आदित्यजींच्या लेखाशी मी सहमत आहे.

रविकिरण फडके's picture

5 Aug 2017 - 4:54 pm | रविकिरण फडके

विचार करणे म्हणजे जे समोर दिसते आहे, ऐकू येते आहे, अनेक लोक सांगता आहेत, नाहीतर वर्तमानपत्रात छापून आलेले आहे, म्हणून ते खरेच आहे असे न मानता दुसरीही एक किंवा अनेक बाजू असेल / असतील ही शक्यता स्वीकारणे. नेमकी हीच गोष्ट खूपशा लोकांना करावयाची नसते. ह्यासाठी अनेक कारणे असतील; मानसिक आलस्य हे त्याचे प्रमुख कारण असावे (असे मला वाटते). विचारातून विचार निघतात. त्यातील बरेच त्रासदायक असू शकतात. त्यातून तात्कालिक हतबलताही येऊ शकते. म्हणून बहुधा माणसे विचार करायचेच सोडून देतात. मी विचार करून काय होणार, फक्त माझे प्रेशर वाढेल, असा सुद्न्य विचार करतात. त्यांचेही काय चूक म्हणा. मग सगळेच सोपे होऊन जाते ना.
हे आदित्य कोरडेंचे परीक्षण आणि एकूणच लिखाण खूप आवडले. फार दिवसांनी काही वेगळे वाचता आले. धन्यवाद, कोरडे. (की कोर्डे असे हवे? माफ करा चुकीचे लिहिले असेल तर.)

पैसा's picture

6 Aug 2017 - 9:29 pm | पैसा

परीक्षण आवडले. विचार करायला भाग पाडणारे आहे. अरुण जोशींचा प्रतिसादही मननीय आहे. मात्र झुंडीचा भाग झाल्यावर लोक अतर्क्य, अविश्वसनीय प्रकारे वागतात. आंतरजालावर समोरचा दिसत नसल्याने द मास्कमधल्यासारखी माणसाची विकृत बाजू अधिक ठळकपणे समोर येते याचा अनुभव आहे.

ब्लु व्हेल याबद्दल गेया काही दिवसात वाचून खूप अस्वस्थ व्हायला झाले होते. कोणीतरी अज्ञाताने दिलेल्या आज्ञा स्वतःला इजा पोचवणार्‍या असल्या तरी मुलं कशी ऐकतात हा प्रश्न पडला होता. काही प्रमाणात इथे त्याचे उत्तर आहे असे वाटते.

आज्ञाधारकपणा हा आपल्याकडे मोठा गुण समजला जात असतो, पण या विचाराला सुरुंग लावणारे असे काहीतरी इथे आहे. प्रत्येक ठिकाणी प्रश्न विचारायची सवय स्वतःला आणि मुलांना लावली पाहिजे.

आतिवास's picture

7 Aug 2017 - 10:34 am | आतिवास

चित्रपटाची ओळख आणि त्यानिमित्ताने केलेलं विचारमंथन आवडलं.
स्वत:ची विचार करण्याची क्षमता शाबूत ठेवण्यात अनेक अडचणी असतात. समाज विविध प्रकारे 'धोपटमार्गा सोडू नको' हे आपल्यावर बिंबवत असतोच.
शिवाय वेगळा विचार करण्याची एक अपरिहार्य किंमत असते - तो विचार वेगळा असला तरी योग्य आहे की अयोग्य हे काळ ठरवत असल्याने अपयशाचीही भीती असते.
तरी अनेक माणसं असा विचार करतात आणि तो किंमत मोजूनही मांडतात हे विशेष आहे.
एकांतिक व्हायचं नाही, समाजाशी नाळ जोडून राहायचं आणि तरीही आपली विचारक्षमता टिकवून ठेवायची ही एक तारेवरची कसरत आहे.

चित्रपट 'पाहण्याच्या यादीत' लिहून घेतला आहे.
या चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल आभार.

सौन्दर्य's picture

10 Aug 2017 - 10:32 pm | सौन्दर्य

अतिवास जी, तुमच्या खालील तिन्ही विधानांशी एकदम सहमत.
स्वताची विचार करण्याची क्षमता शाबूत ठेवण्यात अनेक अडचणी असतात.
शिवाय वेगळा विचार करण्याची एक अपरिहार्य किंमत असते - तो विचार वेगळा असला तरी योग्य आहे की अयोग्य हे काळ ठरवत असल्याने अपयशाचीही भीती असते.
एकांतिक व्हायचं नाही, समाजाशी नाळ जोडून राहायचं आणि तरीही आपली विचारक्षमता टिकवून ठेवायची ही एक तारेवरची कसरत आहे.

बहुतेक वेळा वरील प्रमाणे वेगळा विचार करणारी व्यक्ती ही हट्टी, दुराग्रही, निगेटिव्ह विचारसरणीची, नास्तिक (आणि हल्ली देशद्रोही) वगैरे ठरवली जाते. समाजाशी नाळ जोडून तर राहायचे आणि त्याच बरोबर एखाद्या विषयावर वेगळे विचार मांडायचे, ही खरोखरच तारेवरची कसरत आहे.

रघुनाथ.केरकर's picture

7 Aug 2017 - 1:22 pm | रघुनाथ.केरकर

माहीतीपर लेख आणी परिक्षण

दीपक११७७'s picture

7 Aug 2017 - 4:05 pm | दीपक११७७

छान लेख-माहीती

धन्यवाद

एकविरा's picture

10 Aug 2017 - 12:23 pm | एकविरा

परीक्षण आणि विचारमंथन छान . खूप दिवसानी डोक्याला ताप देणारा (विचारप्रवर्तक ) लेख वाचला .

दशानन's picture

10 Aug 2017 - 10:40 pm | दशानन

सलग दोन धाग्यावर मी हेच लिहतोय!
Inside each of us is a monster; inside each of us is a saint. The real question is which one we nurture the most, which one will smite the other.
- Jodi Picoult

आदित्य कोरडे हे एक अल्फा मेल म्हणता येतील का? तुम्ही एक विचार मांडावा नि सगळ्यांनी तो प्रभावित होऊन मान्य करावा अशी क्षमता असणं म्हणजेच अल्फा मेल असणं ना? या धाग्याच्या, लेखाच्या आणि प्रतिसादांच्या अनुषंगानं जर ते अल्फा मेल नाहीत तर का नाहीत? म्हणजे या केसचा नक्की काय फरक आहे? नेता नि अल्फा मेल यांत काय फरक आहे?
=================
(आदित्य साहेब, तुमचं उगं उदाहरण दिलं आहे.)

अभिजीत अवलिया's picture

16 Aug 2017 - 10:03 am | अभिजीत अवलिया

अतिशय उत्तम लेख. पूर्णपणे पटला.
समूहाच्या किंवा एखाद्या विचाराच्या (धार्मिक किंवा राजकीय) आहारी जाऊन माणूस आपली सारासार विचार शक्ती हरवून बसू शकतो आणि त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात हे समोर आले.
आयसिस, बोको हराम, हिजबुल, जैश ए मोहम्मद, तालिबान सारख्या घातपाती दहशतवादी संघटना ह्या अशा एकाच प्रकारच्या विचाराने भारीत झालेल्या असतात. तुलनेत दुर्बल आणि निश:स्त्र लोकांवर अन्याय करणे, त्यांचा जीव घेणे आणि त्यासाठी प्रसंगी प्राणार्पण करणे ह्या संघटनेत काम करणाऱ्या दहशतवाद्यांना गैर वाटत नसावे ते ह्यामुळेच.

यासंदर्भात संशोधन १९६२ नाही तर खूप आधीपासून चालू आहे. एरिक फ्रॉम यांनी यासंदर्भात दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान पुस्तक लिहिले आहे. (fear of freedom). ज्यामध्ये सद्सद्विवेक बुद्धी गहाण ठेवणे याचे मानसशास्त्रीय विश्लेषण केले आहे.

हे पुस्तक नाझीवाद सर्वोच्च बिंदूला असताना लिहिले गेले आहे. फ्रॉम यांना जर्मनी सोडावा लागला. त्यातून त्यांना नाझीवाद का बोकाळतो याचे संशोधन करायला प्रेरणा मिळाली.

याचा अस्सल भारतीय आणि मराठमोळा संदर्भ म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला इशारा . "माणूस कितीही श्रेष्ठ असला तरी त्याच्या चरणी आपले स्वातंत्र्य गहाण ठेऊ नका."

आपलाच,
अभिजित तांबे

विशुमित's picture

16 Aug 2017 - 11:28 pm | विशुमित

"माणूस कितीही श्रेष्ठ असला तरी त्याच्या चरणी आपले स्वातंत्र्य गहाण ठेऊ नका."

+1

लेख आणि प्रतिसाद आवडले.

===
वरती इच्छामरणचा उल्लेख झाला आहे. तर http://www.dignitas.ch हे jfyi.

नावडती सरकारे आली कि मनुष्य प्राण्याचं वर्तनच मानसशास्त्राच्या चिकित्सेचा भाग बनतो.

अभिजित ताम्बे's picture

17 Aug 2017 - 5:40 pm | अभिजित ताम्बे

आवडते सरकार आले तरीसुद्धा चिकित्सा आवश्यक ठरते.

खुपच सुंदर लेख आणि विष्लेषण.

पगला गजोधर's picture

22 Aug 2017 - 9:36 am | पगला गजोधर

#ऑनर किलिंग #खाप #कुलकर्णी-हत्याकांड-कोल्हापुर

पित्याच्या आदेशावरुन आईचे शिर धड़ावेगळे करण्याची कृती समाजात मानसन्मानाचे कारण झाल्यामुळेच की काय,
.
.

समाजात आता, सो कॉल्ड इभ्रातिसाठी, वडिलधारया लोकांना, सख्या मुलीने जातीबाहेर लग्न केले, म्हणून तिला पति सकट ख़तम कर म्हणायाला, भावाला तसे करायला, जरासुद्धा हिचकिचाहट होत नसावी.

पगला गजोधर's picture

22 Aug 2017 - 12:01 pm | पगला गजोधर

निष्कर्ष –
सर्वसामान्य माणसं जर त्यांच्यावर परिणामांची जबाबदारी टाकली नाही तर जो परिणामांची जबाबदारी घेत असेल त्याच्या आज्ञांचे शब्दश: पालन करीत

श्रीभगवानुवाच |
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो, लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्त: |
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे, येऽवस्थिता: प्रत्यनीकेषु योधा: ||

भगवान बोलले, मीच घडवितो मीच मोडितो, तू जरी शत्रूचा वध नाही केला, तरी त्यांचा अंत पूर्वनियोजित आहे मजकडून,
( इथे "हुकुमाची ताबेदारी तुझी नाहीच, ती तुझी नव्हतीच कधीही" असं तर सजेस्ट होत नाहीये नं ? जाणकारांनी प्रकाश टाकावा )

द्रोणं च भीष्मं च जयद्रथंच, कर्णं तथान्यानपि योधवीरान् |
मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा, युध्यस्व जेतासि रणे सपत्नान् ||

माझ्याकडून आधीच अंत पावलेले द्रोण भीष्म जयद्रथ, यांचा वध करण्यास तू व्यथित होऊ नकोस.
( इथेही "हुकुमाची ताबेदारी तुझी नाहीच, ती तुझी नव्हतीच कधीही" असं तर सजेस्ट होत नाहीये नं ? जाणकारांनी प्रकाश टाकावा )

पगला गजोधर's picture

22 Aug 2017 - 12:04 pm | पगला गजोधर

निष्कर्ष –
सर्वसामान्य माणसं जर त्यांच्यावर परिणामांची जबाबदारी टाकली नाही तर जो परिणामांची जबाबदारी घेत असेल त्याच्या आज्ञांचे शब्दश: पालन करीत

श्रीभगवानुवाच |
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो, लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्त: |
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे, येऽवस्थिता: प्रत्यनीकेषु योधा: ||

भगवान बोलले, मीच घडवितो मीच मोडितो, तू जरी शत्रूचा वध नाही केला, तरी त्यांचा अंत पूर्वनियोजित आहे मजकडून,
( इथे "हुकुमाची ताबेदारी तुझी नाहीच, ती तुझी नव्हतीच कधीही" असं तर सजेस्ट होत नाहीये नं ? जाणकारांनी प्रकाश टाकावा )

द्रोणं च भीष्मं च जयद्रथंच, कर्णं तथान्यानपि योधवीरान् |
मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा, युध्यस्व जेतासि रणे सपत्नान् ||

माझ्याकडून आधीच अंत पावलेले द्रोण भीष्म जयद्रथ, यांचा वध करण्यास तू व्यथित होऊ नकोस.
( इथेही "हुकुमाची ताबेदारी तुझी नाहीच, ती तुझी नव्हतीच कधीही" असं तर सजेस्ट होत नाहीये नं ? जाणकारांनी प्रकाश टाकावा )

"हुकुमाची ताबेदारी तुझी नाहीच, ती तुझी नव्हतीच कधीही" असं तर सजेस्ट होत नाहीये नं ? जाणकारांनी प्रकाश टाकावा

धार्मिक लोकांना धर्मग्रंथांच्या व्याकरणाची इतकी व्यवस्थित माहीती असते हा पुरोगाम्यांनी चालवलेला अपप्रचार आहे.

माझीही शॅम्पेन's picture

22 Aug 2017 - 1:03 pm | माझीही शॅम्पेन

अप्रतिम धागा - विचारप्रवर्तक

गामा पैलवान's picture

22 Aug 2017 - 5:50 pm | गामा पैलवान

प.ग.,

१.

पित्याच्या आदेशावरुन आईचे शिर धड़ावेगळे करण्याची कृती समाजात मानसन्मानाचे कारण झाल्यामुळेच की काय,

पित्राज्ञेचं पालन केल्यावर वर म्हणून मातेस पुन्हा जिवंत करायला सांगितलं होतं परशुरामाने. संजीवनी विद्या अवगत असलेले पुरूष होते त्या काळी. हल्ली ही विद्या लुप्त झाल्याने हत्याकांडे घडतात.

२.

भगवान बोलले, मीच घडवितो मीच मोडितो, तू जरी शत्रूचा वध नाही केला, तरी त्यांचा अंत पूर्वनियोजित आहे मजकडून,
( इथे "हुकुमाची ताबेदारी तुझी नाहीच, ती तुझी नव्हतीच कधीही" असं तर सजेस्ट होत नाहीये नं ? जाणकारांनी प्रकाश टाकावा )

हुकुमाची ताबेदारी? कोण हुकूम सोडतंय? आणि कोणाला हुकूम करतंय? काही कळलं नाही. कृपया अधिक प्रकाश टाकणे.

३.

माझ्याकडून आधीच अंत पावलेले द्रोण भीष्म जयद्रथ, यांचा वध करण्यास तू व्यथित होऊ नकोस.
( इथेही "हुकुमाची ताबेदारी तुझी नाहीच, ती तुझी नव्हतीच कधीही" असं तर सजेस्ट होत नाहीये नं ? जाणकारांनी प्रकाश टाकावा )

हुकुमाची ताबेदारी? कोण हुकूम सोडतंय? आणि कोणाला हुकूम करतंय? काही कळलं नाही. कृपया अधिक प्रकाश टाकणे.