श्रावणातल्या कहाण्या

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
2 Aug 2017 - 7:59 pm

लहानपणी श्रावणामध्ये दर रविवारी घरच्या देवांची पूजा झाल्यानंतर आजी आदित्यराणूबाईची कहाणी वाचायची. ही कहाणी ऐकायला  घरात असणाऱ्या सर्वांनी बसलच पाहिजे तिचा हा नियम होता. मी, भाऊ, बाबा, आई एवढेच नाही तर अगदी आमचे माळी मामा, ड्रायवर दुबेजी, घरी कामाला येणाऱ्या लक्ष्मीबाई सर्वांना हातावर तांदळाचे तीन दाणे घेऊन देवासमोर बसावे लागायचे. त्यावेळी काहीतरी वेगळं करतो आहोत म्हणून मस्त वाटायचं आम्हाला. मी आणि माझा भाऊ जसजसे मोठे झालो तसे ही कहाणी आम्ही आवडीने वाचायला लागलो होतो.

ही कहाणी म्हणजे मुळात सुर्यनारायणाची उपासना आहे. थोडक्यात सांगायची तर एका ब्राम्हणाच्या दोन उपवर कन्यांचे लग्न होत नसते; म्हणून तो दुःखी असतो. त्याला नागकन्या, देवकन्या एक व्रत सांगतात. ते व्रत तो ब्राम्हण करतो; त्यानंतर त्याच्या एका मुलीच लग्न राजाशी आणि दुसऱ्या मुलीच लग्न प्रधानाशी होत.नंतर ब्राम्हण मुलीचा समाचार घेण्यासाठी जातो. अगोदर राजाच्या राणीकडे जातो. तिला म्हणतो 'मला कहाणी सांगायची आहे ती तू ऐक.' पण 'राजा पारधीला जाणार आहे'; अस सांगून ती नाकारते. ब्राम्हण रागावून प्राधानाच्या राणीकडे जातो. तिथे तो कहाणी मनोभावे सांगतो आणि ती चीत्तभावे ऐकते. पुढे राजाची राणी दरिद्री होते आणि प्रधानाच्या राणीचं चांगलं होत. मग राजाच्या राणीची चारही मुलं एक एक करत मावशीकडे जातात. मावशीच्या घरी त्याचं चांगल आदरातिथ्य होतं. पण तिने दिलेले पैसे मात्र ती मुले स्वतःच्या घरी घेऊन जाऊ शकत नाहीत. शेवटी स्वतः राजाची राणी जाते बहिणीकडे. मग बहिण तिला रागावते आणि वडिलांनी केलेलं व्रत सांगते. पुढे राजाची राणी ते व्रत करते.... त्यावेळी ती कहाणी ऐकण्यासाठी मोळीविक्या, माळी, एक दु:खी म्हातारी, आणि एक विकलांग यांना बोलावते. कहाणी ऐकल्यानंतर हे सर्व देखील व्रत करतात आणि यासर्वांच भलं होत. 

मला वाटतं कितीतरी मोठा विचार त्या कथेत मांडला आहे या कहाणी मधून. देव आणि व्रत-वैकल्य सर्वांसाठीच सारखी असतात. देवपूजा ही कोणा एकाची मक्तेदारी नाही. 'तुम्ही जे काही कराल ते मनोभावे करा; म्हणजे त्याचं फळ तुम्हाला चांगलंच मिळेल'; हा विचार महत्वाचा. या कहाणीमुळे त्या शाळकरी वयातच मला हे स्पष्ट कळल होतं की कोणाच्या कामावरून किंवा जाती वरून स्पृश्य-अस्पृश्य ठरवणं चूक आहे.  एक मोठा विचार मनात रुजला होता त्या कोवळ्या वयात. 

आज मी कोणतीही कहाणी वाचत नाही किंवा कोणतही व्रत देखील करत नाही. मात्र श्रावण सुरु झाला की मला हमखास रविवारची आदित्याराणुबाईची कहाणी आठवते; आणि त्यातून जो विचार मनात रुजला आहे त्याचे समाधान वाटते. 

लेख

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

3 Aug 2017 - 8:06 am | प्रकाश घाटपांडे

कहाणीरुपाने समाजात काही निती नियम रुजवण्याचा प्रयत्न असायचा. कहाण्यात मानवी स्वभावांचे दर्शन घडते. इसापनीती मधे सुद्धा प्राणी बोलतात. त्यातूनही जगात घडणार्‍या गोष्टींचे दर्शन होते. काय करावे याचे मार्गदर्शनही मिळते.
खुलभर दुधाची कहाणी मला आठवते.

सौन्दर्य's picture

3 Aug 2017 - 8:47 am | सौन्दर्य

बाल वयात झालेले संस्कार नेहमीच कायम राहतात. कहाण्या, आजीच्या गोष्टी, शाळेतील धडे, इसापनीती वगैरे सारख्या गोष्टी ह्या मनावर चांगलेच परिणाम करतात. कालौघात काही काही गोष्टी कालबाह्य ठरतात तरी त्यांचे मनावर झालेले संस्कार कायमच राहतात. कहाण्या हा प्रकार लहानपणी ऐकायला आवडायचा कारण त्यातील भाषा वेगळी असायची. त्याची सुरवात 'आटपाट नगर होते' अशी असायची आणि शेवट 'अशी ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफल संपूर्ण' असा असायचा. कहाण्या ऐकायला आवडायच्या त्याचा मागचे एक कारण शेवटी नेहेमीपेक्षा वेगळे असे काहीतरी खायला (नैवेद्य) मिळायचे हे देखील असू शकते.

अवांतर : कहाण्या हा प्रकार कोणी लिहिला ह्या विषयी काही माहिती असेल तर वाचायला आवडेल.

आमच्या घरात कहाण्यांचं पुस्तक आहे. श्रावणातल्याच नव्हे तर सार्‍याच वर्षभरातील व्रतवैकल्यांच्या, सणांच्या कहाण्या यात आहेत. मी फार आवडीने त्या वाचायचो. चांगल्याच कल्पक कथा आहेत या. नैक्तिक वळण लावायचं हा उद्देश मात्र शैली अत्यंत रंजक.