मादाम तुसॉ ह्यांना पत्र

सरनौबत's picture
सरनौबत in जनातलं, मनातलं
30 Jul 2017 - 11:46 am

माननीय व्यवस्थापक,
मादाम तुसॉ वॅक्स म्यूझियम,
मुक्काम पोस्ट लंडन

पत्र लिहिणेस कारण कि परवाची बातमी. तुम्ही आमच्या अतिशय लाडक्या मधुबाला चा मेणाचा पुतळा बनवणार आहात म्हणे! साक्षात विधात्याला पुन्हा इतकी सुंदर स्त्री घडवणे जमले नाही. त्याने माधुरी बनवून पाहिली, गेला बाजार कतरीना देखील केली. पण मधुबाला ची सर काही त्यांना आली नाही.

तुम्ही देखील आत्तापर्यंत अतीव सुंदर पुतळे घडवले. इतके हुबेहूब कि बघणाऱ्यांचा 'पुतळा' झाला. मात्र भारतीयांचे पुतळे तुम्हांला म्हणावे तसे जमले नाहीत बुवा. बच्चन कुटुंबियांवर तुमचा इतका राग का? अमिताभचा पुतळा एखाद्या उर्दू शायर / गज़ल गायकासारखा दिसतो. ऐश्वर्या बच्चन देखील उपासमारीमुळे खंगलेली राखी सावंत वाटते अशी आमची 'राय' आहे. तेंडुलकर चा पुतळा पाहून त्याच्या हातातली बॅट काढून स्वतःच्या (खरं तर तुमच्या!) डोक्यात घालावीशी वाटली.

नाही म्हणायला सलमान चा पुतळा बरा जमलाय. अभिनय करताना देखील त्याच्या चेहेऱ्यावरची रेष हलत नाही. त्यामुळे असा कृत्रिम चेहरा बनवणे सोपे झाले असावे. तुम्ही उदय चोप्रा, सुनील शेट्टी, भारत भूषण आदींचे पुतळे बनवून पहा - उत्तम जमतील असा आमचा अंदाज आहे.
तुम्ही ह्रितिक रोशन चा पुतळा बनवला. मात्र गेली ४० वर्षे उत्तम अभिनय करणाऱ्या अनिल कपूर चा का नाही बनवला? अनिल कपूर चे waxing करण्यात सगळं मेण संपेल कि काय अशी भीती वाटली का?

नाही म्हणलं तरी आमचं देखील मेणाचं नॉलेज अगदी कमी नाही बरं का. चिऊ-काऊ च्या गोष्टीत मेणाचं घर लहानपणापासून ऐकलंय. पावसाळ्यात ते वाहून जात नाही इतपत माहिती आम्हाला आहे. MSEB च्या कृपेने अनेकदा लाईट जायचे तेव्हा अनेक मेणबत्त्या पेटवल्या आहेत. आता इन्व्हर्टर आल्याने मेणबत्त्या वापरात नाहीत. म्हणून वाढदिवसाच्या वेळी मुद्दाम अंधार करून केक वरच्या मेणबत्त्या गेली अनेक वर्षे फुंकतोय.

पुनःश्च एकदा विनंती आहे कि आमच्या मधुबालाचं सौन्दर्य मेणातून साकारण्याचा नाद 'अच्छा जी में हारी ' म्हणून सोडून द्या. जिवंत लोकांची काटेकोर मापे घेऊन अनेक पुतळे जमले नाहीत. तर आता मधुबाला चा पुतळा आता बनवायचे नसते धंदे कोणी सांगितले?
इतकी विनवणी करूनही तुम्ही ऐकणार नाही हे माहिती आहे. 'ऐकावे जनाचे, करावे मेणाचे' हे तुमचे धोरण आहे. त्यामुळे तुमच्या ह्या अवघड कार्यास शुभेच्छा. मधुबालाचे मूर्तिमंत सौन्दर्य त्यात पुरेपूर उतरो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुतळा 'मेणासारखा आणि मनासारखा' बनल्यास तो कृपया वेगळ्या रूम मध्ये ठेवा. नाहीतर त्या सौन्दर्यापुढे इतर पुतळे वितळून थिजून जातील.......

आपला कृपाभिलाषी,

सरनौबत

धोरणविचार

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Jul 2017 - 11:59 am | ज्ञानोबाचे पैजार

नाहीतर त्या सौन्दर्यापुढे इतर पुतळे वितळून थिजून जातील.

याच्याशी बाडीस..... पण

साक्षात विधात्याला पुन्हा इतकी सुंदर स्त्री घडवणे जमले नाही. त्याने माधुरी बनवून पाहिली, गेला बाजार कतरीना देखील केली. पण मधुबाला ची सर काही त्यांना आली नाही.

त्या कतरीनाला जरावेळा बाजूला ठेउ पण माधुरी बद्दल बोलायचे काम नाही. तलवारी काढल्या जातील.

पैजारबुवा,

सौन्दर्य's picture

31 Jul 2017 - 9:23 am | सौन्दर्य

"त्या कतरीनाला जरावेळा बाजूला ठेउ" कुणाच्या ? (हसून घ्या)
लेख मात्र एकदम छान. काही कोटया मस्तच.

आदूबाळ's picture

31 Jul 2017 - 9:50 am | आदूबाळ

मस्त लिहिलंय!

खेडूत's picture

31 Jul 2017 - 10:04 am | खेडूत

छान प्रासंगिक.
मधुबाला साकारणे महाकठीण, पण तरी त्यांना प्रयत्न करू द्यायला हवा. त्यातल्या त्यात तेच करू जाणोत.
तिकडे अनेक पुतळे गंडले आहेत, सर्वात वाईट इंदिरा गांधींचा झालाय!
(पत्र मात्र चुकीच्या पत्त्यावर लिहीलंय. मर्लिन एंटरटेनमेंट यांना लिहायला हवे.)

मराठी_माणूस's picture

31 Jul 2017 - 10:17 am | मराठी_माणूस

नाही म्हणायला सलमान चा पुतळा बरा जमलाय.

तुम्ही ( व्यवस्थापक,) गुन्हेगारांचे पण पुतळे बनवता का ?

रघुनाथ.केरकर's picture

31 Jul 2017 - 11:13 am | रघुनाथ.केरकर

छान लिहिलत.

पुंबा's picture

31 Jul 2017 - 11:28 am | पुंबा

अनिल कपूर चे waxing करण्यात सगळं मेण संपेल कि काय अशी भीती वाटली का?

हाहाहा.. खत्रा..

नि३सोलपुरकर's picture

31 Jul 2017 - 11:43 am | नि३सोलपुरकर

"अनिल कपूर चे waxing करण्यात सगळं मेण संपेल कि काय अशी भीती वाटली का?" ... लोल

'ऐकावे जनाचे, करावे मेणाचे' ..जबरदस्त

छान लिहिलत.

अनन्त अवधुत's picture

31 Jul 2017 - 1:00 pm | अनन्त अवधुत

'ऐकावे जनाचे, करावे मेणाचे' ..जबरी

माधुरीला यात ओढू नका. उगा वाद नको.

हा हा हा ! मस्तच लिहीलय. कोट्यातर जमून आल्यात.

ज्योति अळवणी's picture

31 Jul 2017 - 4:52 pm | ज्योति अळवणी

जबरी.... कोट्या चपखल. आवडला लेख

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jul 2017 - 10:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं लेख.

मात्र भारतीयांचे पुतळे तुम्हांला म्हणावे तसे जमले नाहीत बुवा. हजारदा बाडीस !

सरनौबत's picture

1 Aug 2017 - 11:16 am | सरनौबत

धन्यवाद. ही बाडीस काय भानगड आहे ते सांगा जरा. गुगल ने देखील हात टेकले ह्यापुढे

पद्मावति's picture

1 Aug 2017 - 12:07 pm | पद्मावति

बाडीस बाय डिफॉल्ट सहमत =))

पुतळा 'मेणासारखा आणि मनासारखा' बनल्यास तो कृपया वेगळ्या रूम मध्ये ठेवा. नाहीतर त्या सौन्दर्यापुढे इतर पुतळे वितळून थिजून जातील....... मस्तच!