निलपक्षी

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
29 Jul 2017 - 11:37 pm

सगळे रंग विरळ होत होत सर्वत्र शुभ्रतेची चादर समोर पसरत होती, वेडावाकडा मार्ग तुडवत पुढे पुढे जात राहिलो, अनंत अडथळे बाजूला सारत. मनात प्रश्न नाहित ना कुठले विचार. प्रत्येक जिवाला उपजतच ज्ञान होते की, श्वेतवाळवंटाच्या राज्यात कुठेतरी एक झरा आहे, ज्याचे अमृतमय पाणी अक्षय आनंद देतं, चिरंजीवीत्व देतं. हा शोध माझा नाही आहे. प्रत्येक जीव ते अमृत मिळवण्याचा अनंतकाळापासून प्रयत्न करत आहे, अगदी पहिला एकपेशीय जीव ते स्वतंत्र बुद्धी असलेला हा मानव! सर्वांनीच याचा शोध घेतला, घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून निष्पन्न काय झाले माहिती नाही, पण एका गुणसुत्रातून दुसऱ्या गुणसूत्रात ही लालसा जीवागणिक पसरत गेली. या अक्षय आनंदाच्या शोधात अनेक जीव काळाचे अन्न ठरले आणि त्यांचे अस्तित्व देखील लोप पावले. तरी येणारा प्रत्येक नवा जीव हा शोध घेत राहिला.
पूर्णत: श्वेतकणाच्या राज्यात प्रवेश करता झालो आहे; शेवटचा लाल ठिपका ही आता मागे चालला असे जाणवताच क्षणभर थबकलो. आधारास्तव एक अधांतरी लटकत असलेला तंतु पकडून थांबलो, आता हा शेवटचा आधार. येथे पर्यंत माझा अनेकवेळा प्रवास झाला आहे, येथून पुढे काय याची पुसट का होईना कल्पना आहे. तोच समोरील शुभ्रवलायांकित पसरलेल्या श्वेत वाळवंटातून खूप आतून आवाज आला "अजून काही पाऊले, मग तुझ्या हाती असेल अक्षय आनंद देण्याऱ्या अमृतमय झर्याचे अमुल्य जल. चार पाऊले!.."

पहिले पाऊल, टाकण्यासाठी मी अधीर झालो व मी येथे पर्यंत पोचलो याचा कुठेतरी हर्ष मनात दाटून आला आणि एक स्मितरेषा मुखावर झळकली. त्याक्षणी ज्या लाल ठिपक्याला पहात मी विसावलो होतो, तो कणाकणानी श्वेत होऊ लागला. शेवटचा रंग देखील आता श्वेतमय झाला होता. ज्या तंतुचा आधार घेऊन मी विसावलो होतो, तो तंतु हातातून अदृश्य झाला होता, आता चोहीबाजूला, दोन्ही टोकांना, वर-खाली शुभ्र आणि फक्त शुभ्र ह्या एकाच रंगाचे अस्तित्त्व होते.

मागे जेव्हा या पायरीवर पोचलो होतो, तेव्हा येथे मला एक नीलपक्षी दिसला होता, क्षणभरच. त्याच्या चोचेत एक रक्तमय लाल असलेला एक तंतु होता.. आणि तो माझ्याकडे आश्वासक पहात अत्यंत वेगाने श्वेत आभाळ छेदत या श्वेतवाळवंटातून बाहेर निघू पहात होता, थोड्या वेळाने तो नीलपक्षी गेला, आणि त्याच वेगाने खाली आला, पण निर्जीव होऊन. मी जेथे उभा होतो अगदी तेथेच पडला, श्वेतकणांच्या ढिगामध्ये! त्याच्या चोचीत तो रक्तमय लाल तंतु नव्हता, त्याच्या चेहरयावर अत्यंत सुखाचे भाव होते... आणि अचानक श्वेतरंगात पुन्हा लाल ठिपके वाढू लागले व माझ्याही नकळत मी मागे मागे ओढला गेलो.

खूप वेळ गेला, पुन्हा एकदा नीलपक्षी येईल आणि परत मला मागे घेऊन जाईल की काय? मी त्याची वाट पाहतो आहे? तो यावा असे वाटत आहे की? तो येऊ नये असे वाटत आहे? थोड्या काळापूर्वी कोणताच प्रश्न मनात नसताना हे नवप्रश्नाचे वादळ अचानक का निर्माण झाले असावे? सर्व जाणिवा ह्या आपल्या स्वनिर्मित असतात, आपण कोणीतरी, कोणासाठी तरी आखून दिलेल्या चौकटीमध्ये स्वत:च बंधिस्त होतो व कालानंतराने स्वत:च ती चौकट तोडू पाहतो तेव्हा असे प्रश्न निर्माण होऊ लागतात. मागे आलेला नीलपक्षी काय, झराजवळ जो कोणी बसला आहे जो मला बोलवत आहे तो काय व मी काय? आम्ही सर्वजण कुठल्याश्या अनामिक आशेने बांधले गेलो आहोत. स्वत:हून मागे फिरण्याची माझी शक्ती देखील नाही आहे, ना मला ती मुभा. नीलपक्षी येईल न येईल हे ती ललाटश्लोक लिहणारी माया जाणो! पण आता पर्याय म्हणून माझ्या हाती आहेच काय पुढे जाणे सोडून?

जसे जसे पुढे जाऊ लागलो, तसे तसे एक एक श्वेतकिरण बाण माझ्या शक्तीहिन, जर्जर शरीरात प्रवेश करू लागले. मस्तकाच्या दारी कोणीतरी पोचले होते. आठवणीचे पदर दूर करत करत कोणीतरी खूप खोलवर माझ्या मनाच्या डोहात प्रवेश करू पहात होते, फक्त जाणिवा होत होत्या, पण ती क्रिया थांबवणे माझ्या शक्तीच्या देखील बाहेर होते. आतील विश्वात चाललेला गरादोळ मी एका क्षणी विसरलो जेव्हा एक निर्वाज्य हसू कानावर आले. या दुर्गम्य अश्या श्वेतवाळवंटात माझ्या शिवाय अजून कोण आहे? हा प्रश्न निर्माण होऊ पर्यंत, माझ्या बाजूला सुवर्णगरुड येऊन बसला.

"बस थोडा वेळ. विश्रांती घे." सुवर्णगरुड अधिकार वाणीने बोलता झाला. "तुझ्या सारखे अनंत जीव येथे पोचतात, मनात आशा घेऊन. आयुष्यभर निरर्थक काहीतरी शोधत. कोणी मुल्यवान खडे शोधत, कोणी मुल्यवान धातू शोधत, कोणी सुख शोधत, कोणी 'तो' शोधत. मानवी जीवनाची ही शोकांकिका म्हणावी का? जन्मल्या क्षणापासून, अगदी गर्भात बीजारोपण झाल्यापासून तुम्ही शोध चक्रात गोल गोल फिरू लागता ते अगदी मृत्यूच्या राज्यात प्रवेशकर्ते होऊन ही तुमचा शोध थांबत नाही." दूरवर नजर गाढीत तो पुन्हा बोलू लागला " हो, या श्वेतवाळवंटात तो झरा आहे. सत्य आहे."

त्याच्याकडे पहात मी म्हणालो "तो, बोलवणारा आवाज तुमचाच होता?" सुवर्णगरुड माझ्याकडे पहात म्हणाला "हो, ते माझे नियित कार्य आहे. पण कोणाला द्यावे कोणाला नाही हे ठरवण्याचा हक्क देखील दैवयोगे माझ्याकडे आहे. येथून काहीच अंतरावर तो झरा आहे. घेऊन जाईन मी तुला तिकडे, पण! त्या आधी तूला काही सांगावे असे वाटले म्हणून मी येथे आलो आहे. तू शेवटचा लाल ठिपका पाहिला आहेस, तो लाल ठिपका तुझी जीवन लालसा होती. तू ज्या आधारे उभा होतास तो तंतु तुझी तुझ्या विश्वाशी जोडणारी नाळ होती, आणि राहता राहिला प्रश्न श्वेत कण यांचा! हे श्वेत आहेत हे तुझे गृहितीक आहे, मुळात आता येथे कोणताच रंग नाही आहे. तू मला देखील सुवर्ण स्वरुपात पाहतो आहेस पण मी अस्तित्वातच नाही आहे. या सर्वांमध्ये तुझा नसलेला मात्र फक्त तुझ्यासाठी आपला जीव धोक्यात घालणारा तो नीलपक्षी मात्र खरा आहे, प्रार्थना कर तो नीलपक्षी पुन्हा यावा..."

"का माझा मोहभंग केलास?" मी खिन्न आवाजात बोललो "हे सर्व मला माहिती होते, असे नाही पण असे कदाचित असू शकेल अशी एक शक्यता मी गृहीत धरुन होतो पण त्याच सोबत हे सर्व खोटे असेल व दिसत असलेले सर्व खरे देखील असेल अशी एक आशा देखील मनात होती. तू कोण आहेस माहिती आहे सुवर्णगरुडा? माझ्या स्वप्नाचे मूर्तस्वरुप! तू देखील माझाच कण आहेस. तू जे सत्य सांगत आहेस त्याचे कारण देखील आता मला ज्ञात आहे, मी तेथे, त्या झर्याजवळ पोचल्या क्षणी सर्वात प्रथम तुझे अस्तित्व शून्य होईल. कारण जेथे माझेच अस्तित्व नसेल तेथे माझी स्वप्ने कशी तगतिल? "

सुवर्णगरुड माझ्याकडे पहात स्मितहास्य करत म्हणाला "मला माझ्या अस्तित्वाची चिंता नाही आहे, पण तुझे अस्तित्व संपेल याची भीती आहे. चिरंजीवीत्व असे काही नसते. अमरत्व हा एक असा आरसा आहे जो काळ थांबवतो व आपण स्व बिंब पाहण्यात गुंग होऊन जातो, कालांतराने त्या आरश्याचा पारा उडू लागतो व त्याच सोबत अमरत्वाची नकली पापुद्रे देखील. त्या नंतर पहिल्यांदा होणारे आपले आपल्याला खरे दर्शन एवढे भयावह असते की, आपण स्व इच्छेने मृत्यू मागू लागतो पण तो अधिकार आपण आधीच मोहापायी गमवलेला असतो."

"आता माघारी जाण्यासाठी कुठे दरवाजा? आणि कोठे वाट!" मी थोडा अस्थिर होत, शरीरात ऊर्जा गोळा करत परत बोलता झालो "मी येथे प्रवेशकर्ता झालो तेव्हाच का नाही थांबवलेस मला तू?" सुवर्णगरुड माझ्याकडे केविलवाण्या नजरेने पहात म्हणाला "मी? मी प्रयत्न केलाच, पण माझ्यासोबत नीलपक्ष्याने देखील प्रयत्न केला पण तू येथे पोचल्याच्या अतीव समाधानात डोळे बंद करून उभा होतास.. तो लाल ठिपका.. असाच श्वेत झालेला तूला दिसला नाही, तर त्या मागे कारण तू नीलपक्ष्याकडे दुर्लक्ष केलेस हे आहे. प्रार्थना कर त्या नीलपक्ष्यास परत येण्याची, त्याच्या शिवाय तुझी येथून मुक्तता नाही...."

मस्तक गरगरत आहे, मी खोलवर कोठेतरी अज्ञात जागी कोसळत आहे, चोहीबाजूला अंधकार वेगाने वाढतो आहे वर शुभ्र आकाश हळुहळु लुप्त होत आहे, माझे डोळे बंद होत आहेत... एका क्षणी जिवाच्या आकांताने मी डोळे उघडले...

वर वितभर श्वेत प्रकाशाचे अस्तित्व दिसत होते, कोणत्याही क्षणी तेथे देखील अंधकार भरुन वाहणार होता, तोच... अत्यंत वेगाने नीलपक्षी पल्याड जाताना दिसला, त्याचे डोळे अश्वासनाने परिपूर्ण होते, धीर देत होते व त्याच्या चोचीत तो रक्तमय तंतु होता. दूर वरुन सुवर्णगरुडाचा क्षीण आवाज आला..."अजून काही क्षण..... तो आला आहे!"

कलाकथाआस्वादलेख

प्रतिक्रिया

एस's picture

29 Jul 2017 - 11:44 pm | एस

छानच लिहिलेय.

हे मागे लिहले होते कधीतरी, सहज जुने लेख चाळताना हा येथे नाही म्ह्णून प्रकाशित केला.

कपिलमुनी's picture

30 Jul 2017 - 12:17 am | कपिलमुनी

जी ए स्टाइल

दशानन's picture

15 May 2018 - 6:34 pm | दशानन

येस!

त्यांची स्वामी मला खूप भावते! असे देखील म्हणता येईल की त्यातूनच ही कथा देखील मला सापडली आहे.
पण सोबतच "पोस्टमन ईन दी माऊंटन" नावाचा अप्रतिम चित्रपट देखील याला कारणीभूत आहे.

सर्वांचे आभार.

पैसा's picture

31 Jul 2017 - 9:40 pm | पैसा

छान लिहिलय

हे त्यावेळी लिहले होते जेव्हा कुठल्याच प्रश्नाला उत्तर भेटत नव्हते व उत्तर भेटले तरी ते चुकीचेच ठरणार होते.. पण निलपक्षी असतो, फक्त त्याला शोधणे गरजेचे मग उत्तर पण भेटेल.
वाचकांचे खूप खूप आभार!

सस्नेह's picture

18 May 2018 - 2:18 am | सस्नेह

खूपच अॅबस्ट्रॅक्ट आहे !
जी ए आठवणे अपरिहार्य आहे.

सुधीर कांदळकर's picture

18 May 2018 - 9:54 am | सुधीर कांदळकर

वज्रकेस आठवला.

मस्त. मजा आली.

धन्यवाद.

पिवळा डांबिस's picture

22 May 2018 - 2:12 am | पिवळा डांबिस

शीर्षकात 'निलपक्षी' असा उल्लेख बघून 'पोकल बांबूचे फटके' मारायला लॉग इन केलं पण नंतर लिखाणात नीलपक्षी असा उल्लेख वाचला म्हणून राजा तू वाचलास. :)
लिखाण उत्तम आहे, आवडलं.
जियो..
फक्त आता बाल की खाल म्हणतात तसं, गुणसूत्राची संकल्पना आधुनिक आहे. तू ज्या काळातली म्हणून कथा लिहिली आहेस त्या काळात लोकांना ती ज्ञात असेल असं वाटत नाही.
अर्थात त्यामुळे बाकीच्या लेखनात फारसा फरक पडत नाही म्हणून बाल की खाल म्हंटलं.