लेडी-ओरियेंटेड चित्रपट

पिशी अबोली's picture
पिशी अबोली in जनातलं, मनातलं
23 Jul 2017 - 9:44 pm

सेन्सॉर बोर्ड जेव्हा एखाद्या चित्रपटाची जातीने जबाबदारी घेऊन प्रसिद्धी करतं, तेव्हा एरवी कुठेतरी फेस्टिवल्समध्ये वगैरे अडकून पडू शकला असता असा चित्रपटही जवळच्या थियेटरला लागला का, हे आवर्जून बघितलं जातं. तसा तो बघितला, आणि ‘फिलिंग फास्ट’ असल्याने लगेच तिकीट घेऊन टाकलं. तरीही चित्रपटगृहात एवढी गर्दी असेल असं वाटलं नव्हतं.. पूर्ण भरलेल्या चित्रपटगृहात ‘ए’ रेटिंगवाला ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ बघण्याचं धाडस केलं, तर आता लिहिण्याचंही करूनच टाकावं म्हणते.

एका वाक्यात कथा सांगायची, तर चार स्त्रियांना वेगवेगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्यातून आलेलं आत्मभान हा या चित्रपटाचा विषय. आयुष्याच्या छोट्या छोट्या आनंदांना मुकलेल्या स्त्रियांना त्यांना झेपेल एवढीच बंडखोरी करताना जी धाप लागते, त्याचं स्त्री-मुक्तीचा, नीतीमत्तेचा किंवा इतर कसलाही आव न आणता केलेलं हे चित्रण आहे. ही बंडखोरी त्या इतक्या जीव ओतून करतात, की त्यामुळे त्यातील सर्व दुहेरी अर्थाचे संवाद, रेटिंग सार्थ ठरवणारी दृश्यं, समाजाच्या दृष्टीने चुकीचं ठरणारं वागणं, या सगळ्यांसकट हे चित्रण अतिशय निरागस(हो, निरागस) ठरतं.

तर या चौघींच्या कथांना पार्श्वभूमी देणारी एक कथा, म्हणजे यातील एक पात्र ‘बुवाजी’ चोरून चोरून वाचते ती ‘लिपस्टिकवाले सपने’ ही कादंबरी, आणि त्यातली रोझीची गोष्ट. बुवाजी म्हणजे टिपिकल खडूस आणि मायाळू वाडा-मालकीण. फक्त या लिपस्टिकवाल्या स्वप्नांच्या आवडीची एक वाईट खोड सोडली, तर व्यवस्थित संस्कारी आजी कशी असली पाहिजे, तशी म्हातारी. वाडा पाडू न देणारी, मुलं सांभाळणारी बुवाजी जेव्हा तिला एका प्रसंगाने स्वतःतल्या रोझीचा साक्षात्कार होतो, तेव्हा लपून-छपून मोहरायला लागते. मॉल या शब्दालाही ‘माल’ म्हणणारी बुवाजी एक मोठीच धाडसी गोष्ट घेण्यासाठी मॉलमध्ये जाते, तेव्हाचं एक दृश्य खूपच गोड आहे. एस्केलेटरवर पहिल्यांदाच चढून उभं रहायची तिला सगळ्यांप्रमाणेच भरपूर भीती वाटत असते. तेव्हा एक छोटा शाळेच्या मुलींचा (बहुधा अंध) ग्रुप एकमेकींचा हात पकडून एकेका येणाऱ्या पायरीवर चढत जातो, आणि त्यातील शेवटची मुलगी जो हात पुढे करते, तो हात पकडून त्यांच्याइतक्याच निरागस चेहऱ्याची बुवाजी त्यावर चढते. तिला येणारा सगळा नवीन अनुभव जरी फार प्रौढ असला, तरी त्याबद्दलचं तिचं कुतूहल अगदी बालसुलभ आहे, हे खूप सुंदर रंगलेलं आहे.

दुसरी रेहाना तर कॉलेजवयीन मुलगी. बुरखे शिवून उदरनिर्वाह करणाऱ्या आणि अतिशय कडक घरातल्या मुलीची मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यावर तिथल्या हाय-फाय वातावरणात मिसळून जावं, यासाठीची तीव्र इच्छा तिला बरंच काही करायला भाग पाडते. कोणत्याही घरात आपली कॉलेजमधली मुलगी हे असलं सगळं करते, हे अजिबातच मान्यच होणार नाही असे उद्योग ही मायली सायरसची फॅन करते. घरी येऊन बुरखे शिवायच्या कामात मदत करणारी ही कॉलेजकन्यका त्या बुरख्याचा आणि एकूणच पूर्ण कपड्यांचा कल्पनाशक्तीने चांगलाच वापर करते. कॉलेज वातावरणाची भुरळ पडून वाहवत गेलेल्या मुलीचं काय होईल, याबद्दल सतत भीतीही वाटते आणि वाईटही वाटतं.

लीला म्हणजे तर खरीखुरी ‘वाया गेलेली’ मुलगी. बॉयफ्रेंड सोबत पळून जाण्याचे प्लान्स करणारी ही पार्लरवाली कशाची काही पत्रास ठेवत नाही खरी, पण आईच्या आग्रहास्तव दुसऱ्या मुलासोबत अत्यंत अनिच्छेने साखरपुड्याला उभी राहते. आईच्या दृष्टीने अतिशय योग्य असा होणारा नवरा, आणि सगळं ज्याच्यावर उधळून दिलं तो बॉयफ्रेंड या कात्रीत स्वतःला सापडून घेणारी लीला बघताना ‘असंच पाहिजे हिला’ असं पांढरपेशा प्रेक्षकी मनात आलं, तरी ते परतवते यातच काय ते आलं.

शेवटी राहते ती शिरीन. सौदीला राहून वर्षातून दोन आठवडे वगैरे येणाऱ्या नवऱ्याच्या हक्क गाजवण्याने तीन मुलं, अनेक अबॉर्शन्स आणि खरंखुरं संसारात अडकलेलं आयुष्य जगणाऱ्या शिरीनला नवऱ्याला नाही म्हणायचं स्वातंत्र्य नाहीये. पण रेहानाप्रमाणे बुरख्याआडचं स्वातंत्र्य तिनेही शोधून काढलंय. तिचा मोकळा श्वास तीही सेल्सगर्लचं दुहेरी आयुष्य जगून घेते. या नोकरीच्या ठिकाणी तिला नवीन संधी चालून येते, तेव्हा तिच्या स्वप्नांना पंख फुटतात. तिच्या बाबतीत खऱ्याखुऱ्या होणाऱ्या मुस्कटदाबीमधून शिरीनचं स्वप्न आहे, ते फक्त जगायचं.

या चौघींची स्वप्नं त्यांच्या त्यांच्या बौद्धिक कुवतीप्रमाणे आणि वयाप्रमाणे अगदी अति-सामान्य, म्हटलंच तर चावट-वात्रट-चवचाल-उथळ वगैरे आहेत. त्यासाठी जे मार्ग त्या काढतात, ते काही स्पृहणीय म्हणण्याजोगे मुळीच नाहीत. स्पृहणीय एकच आहे, की या स्त्रिया ज्या गोष्टी करतात, त्याचे परिणाम व्हायला लागल्यावर सहजपणे स्वीकारतात. आपल्या स्वप्नांची किंमत मोजावी लागू शकते, याची जाणीव चौघींनाही आहे. संदेश असा म्हणाल, तर हा एकच-जी स्वप्नं बघता त्यांचे परिणामही स्वीकारा. चौकटी मोडल्यावर काही काळाने चौकटी पुन्हा आधीपेक्षा गळा आवळून उरावर बसतीलच, हे माहीत असून या चौघी त्या तात्पुरत्या तोडण्याची मजा चाखून बघतात. चित्रपट पूर्णपणे त्या चौघींचा आहे. समाजाला दांभिक वगैरे ठरवण्याचा अट्टाहास नाही. पण ‘लेडी-ओरीयेंटेड’ स्वप्नं दाखवणारा हा निरागस सामिष चित्रपट उदात्त नाही, म्हणून त्याच्याकडे दुर्लक्षच करावं असं थोडंच आहे?

चित्रपटप्रकटन

प्रतिक्रिया

इडली डोसा's picture

23 Jul 2017 - 10:20 pm | इडली डोसा

छान ओळख

चौकटी मोडल्यावर काही काळाने चौकटी पुन्हा आधीपेक्षा गळा आवळून उरावर बसतीलच, हे माहीत असून या चौघी त्या तात्पुरत्या तोडण्याची मजा चाखून बघतात

या ओळी विशेष आवडल्या

खास पिशी-स्टाइल ओळख.

प्रीत-मोहर's picture

24 Jul 2017 - 11:59 am | प्रीत-मोहर

असेच म्हणते.

शेवटचा पॅरा खूप आवडला

ऋतु हिरवा's picture

23 Jul 2017 - 11:00 pm | ऋतु हिरवा

छान परीक्षण. सिनेमा बघायची इच्छा आहे. बघू कधी जमते

एकदम उठावदार शब्दात मांडलेलं परिक्षण आवडलं ...
चित्रपट खुप सार्‍या मैत्रिणी मिळुन ...पहायचा ठरवलाय ..
लेट्स सी

चित्रपटाची ओळख आवडली. पहायचाय पण जालावर आल्यानंतर.
चौकटी मोडल्यावर काही काळाने चौकटी पुन्हा आधीपेक्षा गळा आवळून उरावर बसतीलच,
सहमत.

यशोधरा's picture

24 Jul 2017 - 9:23 am | यशोधरा

छान लिहिलं आहे.

अत्रे's picture

24 Jul 2017 - 9:30 am | अत्रे

चित्रपट बघेन.

बादवे लेडी-ओरियेंटेड ला मराठीत स्त्री-प्रधान असे म्हणतात.

पिशी अबोली's picture

24 Jul 2017 - 12:58 pm | पिशी अबोली

एवढं मराठी मलाही येत असावं कदाचित. :)

इथे 'लेडी-ओरियेंटेड' शब्द वापरण्यास काही विशिष्ट कारण आहे. टंकायचा कंटाळा आलाय, गूगल करून बघू शकता.

अत्रे's picture

24 Jul 2017 - 1:14 pm | अत्रे
पिशी अबोली's picture

24 Jul 2017 - 1:16 pm | पिशी अबोली

:)

सानझरी's picture

24 Jul 2017 - 1:02 pm | सानझरी

छान लिहिलंयस गं!!

मंजूताई's picture

24 Jul 2017 - 1:55 pm | मंजूताई

पिशे, आवडलं गं! पहायचाय...

पद्मावति's picture

24 Jul 2017 - 2:47 pm | पद्मावति

सुंदर लिहिलंयस. खास पिशी टच.

पिशी अबोली's picture

24 Jul 2017 - 6:13 pm | पिशी अबोली

धन्यवाद सर्वांना. नक्की बघा चित्रपट..

विचित्रा's picture

25 Jul 2017 - 10:37 am | विचित्रा

ओळख आवडली.

पैसा's picture

25 Jul 2017 - 2:30 pm | पैसा

मस्त लिहिलंस. सिनेमा बघायचा आहे.

शब्दबम्बाळ's picture

25 Jul 2017 - 8:40 pm | शब्दबम्बाळ

मस्त परीक्षण! लिहिण्यात सहजता आहे तुमच्या...

दशानन's picture

25 Jul 2017 - 9:16 pm | दशानन

क्लास!

सस्नेह's picture

25 Jul 2017 - 9:45 pm | सस्नेह

छान परीक्षण!

पिशी अबोली's picture

26 Jul 2017 - 11:28 am | पिशी अबोली

धन्यवाद!

परिक्षण फारच आवडले. अशीच लिहीत रहा.

विनिता००२'s picture

26 Jul 2017 - 4:31 pm | विनिता००२

बघेन
१८ वर्षाच्या मुलाबरोबर (स्वतःच्या ;) बघता येईल असा आहे का? की एकटीनेच बघावा :)

पिशी अबोली's picture

26 Jul 2017 - 5:54 pm | पिशी अबोली

खरं तर मैत्रिणींसोबत बघावा. तुमच्या घरात चांगलं मोकळं वातावरण असेल तर बघू शकता त्याच्यासोबत..

विनिता००२'s picture

27 Jul 2017 - 10:33 am | विनिता००२

ओके :)

मस्त लिहिलंय.. चित्रपटाची ओळख आवडली.

वरुण मोहिते's picture

27 Jul 2017 - 10:41 am | वरुण मोहिते

सिनेमा पाहायचा आहे .

सपे-पुणे-३०'s picture

28 Jul 2017 - 8:30 am | सपे-पुणे-३०

सुंदर परीक्षण! असे चित्रपट फार कमी बनवले जातात आणि त्याहून चित्रपट गृहात कमी प्रदर्शित होतात.

पिशी अबोली's picture

28 Jul 2017 - 3:49 pm | पिशी अबोली

धन्यवाद! :)

विखि's picture

31 Jul 2017 - 10:42 pm | विखि

परीक्षण आवडलं...

ओळख आवडली, मलाही बघायचा आहेच, पण बहुतेक जालावर आल्यावरच

इशा१२३'s picture

8 Aug 2017 - 12:22 pm | इशा१२३

उत्तम परीक्षण पिशे!आवडले.

इशा१२३'s picture

8 Aug 2017 - 12:25 pm | इशा१२३

उत्तम परीक्षण पिशे!आवडले.

एमी's picture

8 Aug 2017 - 8:32 pm | एमी

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10213670119210251&id=1322657... हे परीक्षण देखील छान लिहिले आहे.

भ ट क्या खे ड वा ला's picture

9 Aug 2017 - 2:34 pm | भ ट क्या खे ड वा ला

छान परीक्षण. सिनेमा बघायची इच्छा आहे. बघू कधी जमते

चौथा कोनाडा's picture

9 Aug 2017 - 5:18 pm | चौथा कोनाडा

अतिशय नेमकं सांगणारा लेख ! क्लासिक ! शेवटंचं वाक्य तर कळसच !

असे आडवाटेचे चित्रपट पाहण्याची आवड असल्यामुळं कालच्या विकांताला "बुरखा" थिएटरला जाउन आवर्जून पाहिला.
आता पर्यंत स्रीची अश्या प्रकारे घुसमट पहिल्यांदाच या सिनेमात पहिली. या सिनेमातल्या चारही कथा बधीर करणार्‍या !
निवडलेलं भोपाळ शहर अन पात्रांचा सामाजिक स्तर अगदी समर्पक !

असा चित्रपट काढणं अन प्रदर्शित करणं हे दिगदर्शक अन इतर सर्वांच मोठं धाडस आहे ! अगदी वाखाणण्या सारखं !

पिशी अबोली's picture

10 Aug 2017 - 11:15 am | पिशी अबोली

धन्यवाद!
ऍमीनी दिलेल्या लिंकमधलं परीक्षणही छान आहे.

सुबक ठेंगणी's picture

13 Oct 2017 - 1:46 pm | सुबक ठेंगणी

माझ्यामते "लिपस्टिकवाले सपने" मधलं शेवटचं वाक्य "खुषीयोंके बंद कमरे की चावी तो रोझी के अंदर ही थी|" हाच चित्रपटाचा संदेश आहे. चौकटी समाज नव्हे तर तुम्हीच स्वतःला घालून घेत असता. त्यामुळे त्या तोडून किंवा वाकवून बाहेर पडायचं की तिथेच झुरत राहायचं हीदेखील सर्वस्वी तुमचीच निवड असते.