भुकेले आणि माजलेले

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
18 Jul 2017 - 12:09 pm

प्रसंग पहिला :

परगावचा मुक्काम संपवून मी ट्रेनने माझ्या गावी परत येतोय. प्रवास अगदी शेवटच्या टप्प्यात आलाय. आमची ट्रेन आता प्लॅटफॉर्म मिळण्याची वाट पाहत स्टेशनच्या ‘आउटर’ ला थांबली आहे. गाडी जरा जास्तच रखडल्याने प्रवासी चुळबूळ करताहेत. मी कंटाळून खिडकीतून बाहेर पाहत असताना अचानक एका दृश्याने माझे लक्ष वेधून घेतले.

पलीकडच्या रिकाम्या रुळांदरम्यान ढीगभर अन्न टाकून दिलेले होते अन ते अन्न एक माणूस खाली बसून अधाशीपणे खात होता. दोन-तीन रंगांचे भात त्यामध्ये दिसत होते. कदाचित ते रेल्वेच्या खानपान सेवेतील उरलेले वा लोकांनी टाकून दिलेले पदार्थ असू शकतील. त्या कंगाल माणसाकडे पाहताच त्याचा ‘भिकारी’ हा दर्जा लगेच लक्षात आला. त्याच्या चिवडून बकाबका खाण्याच्या पद्धतीवरून तो बराच काळ उपाशी असणार हेही जाणवले. आता तो माणूस जिथे बसला होता तिथेच आजूबाजूला जुन्या-नव्या मानवी व प्राण्यांच्या विष्ठा विखुरलेल्या असणार होत्या. परंतु, त्याची भूक एवढी तीव्र असणार की असले स्वच्छतेचे विचार करणे त्याला परवडणारे नव्हते. ते दृश्य बघून अगदी गलबलून आले.

तेवढ्यात आमच्या गाडीने मोठ्ठा हॉर्न दिला व ती पुढे सरकली. त्या दहा मिनिटांमध्ये मनात असंख्य विचारांचे काहूर माजले. ते केविलवाणे दृश्य मनातून जाता जात नव्हते. ‘‘का अशी वेळ येते एखाद्यावर’’ हा विचार माझ्या मनाला अक्षरशः कुरतडत होता.

प्रसंग दुसरा :
सुमारे तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. शनिवारची रात्र होती. त्या शहरातील एक प्रथितयश डॉक्टर त्यांच्या पत्नी व दोन मुलींसह एका प्रतिष्ठीत रेस्तराँमध्ये जेवायला आले होते. त्यांच्या आठवडाभरातील कामाच्या व्यापानंतरचे हे विरंगुळ्याचे क्षण होते. रेस्तराँमध्ये मंद प्रकाश पसरला होता. चित्तवृत्ती फुलवणारे संगीत चालू होते आणि झकपक गणवेशातील कर्मचाऱ्यांची लगबग दिसत होती. डॉक्टर नुकतीच वयाची चाळीशी ओलांडलेले, तर त्यांच्या मुली या शालेय वयातील. आता हे कुटुंब एका टेबलावर स्थिरावले. तेथे वेटर येताच त्यांनी सूप व ‘स्टार्टर’ ची ऑर्डर दिली.

‘स्टार्टर’ हे मुख्य जेवणाआधीचे अल्पखाद्य असते याची जाणीव अद्याप त्या खादाड मुलींना नसावी. त्यामुळे, आई-वडिलांचा विरोध असतानाही त्या नावाखाली तब्बल चार प्लेट्सची ऑर्डर दिली जाते. ते पदार्थ येतात. खाणे सुरू झाल्यावर थोड्याच वेळांत त्यांच्या टेबलावर नजर टाकता हे स्पष्ट होते की त्या पदार्थांपैकी निम्मा भाग तरी खाऊन संपणार नाही. त्यावर मुलींचे आईवडील त्यांना रागावतात. पण, त्याचा फारसा परिणाम होत नाही. आता मुख्य जेवणाची ऑर्डर दिली जाते. पुन्हा एकदा मुलींचा हावरेपणा आवरणे आईवडिलांना जड जाते. वेटर जेवण आणून ठेवतो. थोड्या वेळातच अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा निम्मे पदार्थ पानात शिल्लक राहणार हे दिसू लागते.

डॉक्टर व त्यांच्या पत्नीने मागवलेल्या अन्नाला यथाशक्ती न्याय दिलेला असतो; पण केवळ मुलींच्या हट्टामुळे मागवलेले गरजेपेक्षाचे जास्त अन्न आता उरत होते. ते बघून हे दांपत्य खरोखर अस्वस्थ झाले. त्या दोघांना अन्न टाकणे ही कल्पनाही सहन होणारी नव्हती. मुली मात्र त्याबाबत बेफिकीर होत्या. एव्हाना ताटातले अन्न संपत नसतानाही त्या दोघी यानंतर ‘ज्यूस का आईसक्रिम’ मागवायचे याची चर्चा करू लागल्या. किंबहुना अशा उच्चभ्रू रेस्तराँमध्ये असेच वागायचे असते, ‘अन्न टाकले तर त्यात काय एवढे’ असे भाव त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

रेस्तराँमधील इतर टेबलांवरसुद्धा थोड्याफार फरकाने अशीच स्थिती होती. काहीतरी अन्न टाकल्याशिवाय ‘पार्टी’ साजरी झालेली नव्हती. अशा टाकलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे हा तेथील कर्मचाऱ्यांच्या रोजच्या कामातील अप्रिय पण अटळ भाग होता. तेव्हा आता हे कुटुंब उठेल व आपल्याला ते टेबल स्वच्छ करायचेय या प्रतिक्षेत तिथले नोकर होते. परंतु, आता त्या टेबलावर एक अनपेक्षित प्रकार घडला.

आपल्या मुलींवर क्रुद्ध झालेल्या डॉक्टरांनी ‘डेझर्ट’ ची ऑर्डर निक्षून थांबवली. एवढेच नाही, तर पानात उरलेले सर्व अन्न अजिबात टाकता येणार नाही असे मुलींना खडसावून सांगितले. मग डॉक्टरांनी वेटरला बोलावले व ते उरलेले सर्व अन्न ‘पार्सल’ करून देण्यास सांगितले. वेटर त्यांच्या या पवित्र्याने अवाक झाला. त्याने त्यांच्या आज्ञेचे पालन करायचे ठरवले. खरे तर आतापर्यंत त्या रेस्तराँमध्ये असा प्रकार घडला नव्हता. त्याकाळी (म्हणजे सुमारे ३० वर्षांपूर्वी) अशा उरलेल्या अन्नाचे पार्सल करायची पद्धत रुळलेली नव्हती. अखेर कशाबशा प्लास्टिकच्या पिशव्या जमवून वेटरने ते पार्सल केले. आता डॉक्टरांचे कुटुंब ते पार्सल घेऊन निघाले. ते बाहेर पडत असताना तेथील सर्व कर्मचारी डॉक्टरांकडे कौतुकाने व आश्चर्याने बघत राहिले.

प्रसंग तिसरा :

संध्याकाळची वेळ. छान वारे सुटलेले. एका शहरातील उपनगराचा भाग. छोट्या-मोठ्या दुकानांच्या गर्दीत रस्त्यावर एक वडापावची गाडी उभी आहे. या तळणीतल्या वड्यांचा खमंग वास दरवळतो आहे. तिथेच एक बसण्यासाठी कट्टा आहे. त्यावर बसून काही ज्येष्ठ नागरिक निवांत गप्पा मारताहेत. एवढ्यात आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधून घेतले जाते एका माणसाकडून. तो माणूस कळकट कपड्यांमध्ये आहे आणि चालता चालता काकुळतीने म्हणतोय, ‘’ओ दादा, ओ भाऊ, गावाकडून आलोय, दोन दिस उपाशी हाये, पोटात अन्नाचा कण नाही. लई भूक लागलीय हो. द्या कुणीतरी धा रुपये तरी.” त्याचे लक्ष तिथल्या वडापावच्या गाडीवर आहे आणि ‘’वडापाव दहा रुपये” ही त्या वडेवाल्याची आरोळी त्याने ऐकलेली आहे. त्याच्या चेहऱ्यावरून तो खूप भुकेला वाटतोय. तो जीवाच्या आकांताने भीक मागतोय – फक्त दहा रुपयांची. एकीकडे त्या गाडीच्या बाजूने त्याच्या येरझाऱ्या चालू आहेत.

ते दृश्य पाहून कट्ट्यावरच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये जरा अस्वस्थता आली. त्यांच्या गप्पा जरा बाजूला ठेवून ते त्या माणसाबद्दल चर्चा करू लागले. त्यांच्यात थोडेफार संवाद झडले ते असे :
‘’जाऊ द्या हो, नका लक्ष देऊ त्याच्याकडे. जाईल निघून जरा वेळाने’’,
‘’आता भीक मागायची म्हटली की दोन दिवसांच्या उपाशीपणाची कथा सांगणारच की हो तो’’,
‘’अहो, कष्ट नाही केले की हे वेळ येते माणसावर. मग भीक मागणे हा सगळ्यात सोपा धंदा.’’

त्या माणसाच्या येरझाऱ्या आणि आर्त स्वरातले भीक मागणे सुरूच आहे. अखेर, त्या ज्येष्ठांपैकी एकांना राहवत नाही. भीक देणे हे त्यांना तत्वतः मान्य नाहीये. पण, आता ते जागेवरून उठतात. झपाटल्यासारखे त्या भिकाऱ्याजवळ जातात. थोड्याशा चढ्या आवाजात ते त्याला हाक मारतात आणि वडापावच्या गाडीजवळ बोलावतात. आता ते खिशातून दहाची नोट काढतात व ती त्या गाडीवाल्याला देउन त्याला त्या भिकाऱ्याला एक वडापाव द्यायला सांगतात. त्यानुसार कृती होते. मग तो भिकारी वडापाववर अक्षरशः तुटून पडतो व दोन मिनिटात तो फस्त करतो. त्या गृहस्थांना समाधान वाटते. ते भिकाऱ्याकडे अधिक लक्ष न देता शांतपणे चालू लागतात.

प्रसंग चौथा( व शेवटचा) :

शहरातील एका शानदार मंगल कार्यालयात लग्नसोहळा चालू होता. त्यात भोजनाची पंगत बसली होती. त्यामध्ये माझ्या शेजारी एक उच्चशिक्षित व्यावसायिक गृहस्थ बसलेले होते. आमच्याकडे येणारा प्रत्येक वाढपी हा ‘वाढू का’ असे विचारूनच वाढत होता. माझ्या शेजारचे ते गृहस्थ त्याला दरवेळी ‘वाढा’ असेच म्हणत होते. याउलट मी मात्र, मी जेवढे खाऊ शकणार होतो तेवढेच वाढायला लावले.

थोड्या वेळांत माझे जेवण संपत आले व माझे ताट स्वच्छ दिसू लागले. त्या गृहस्थांचे ताट मात्र अजून तुडुंब भरलेले दिसत होते. वाढलेले सर्व पदार्थ ते खाऊन संपवू शकणार नाहीत हे आता स्पष्ट होते. एकदम ते मंद स्मित करीत माझ्या ताटाकडे पाहत मला म्हणाले, ‘’तुम्ही ताट किती स्वच्छ केले आहे ते दाखविता आहात काय?’’ त्यावर मी जोरकसपणे ‘’हो’’ म्हणालो आणि नंतर माझ्या ताटातील सर्व अन्न संपवून उठलो. मी हात धुउन परत येताना पाहिले की ते गृहस्थ आता उठले होते व त्यांनी ताटात अनेक पदार्थ टाकून दिले होते. त्यामध्ये किमती गोड पदार्थही होते.

अन्न टाकणे हा प्रतिष्ठेचा एक निकष मानणारे ते महाशय बघून मला मनस्वी चीड आली. तसेच त्या क्षणी आपण याबाबत काहीही करू शकत नाही याचा विषाद वाटला. समाजातील अशा मस्तवाल लोकांचा बंदोबस्त कसा करावा याचा विचार करत मी कार्यालयाबाहेर पडलो. जेवणाची पंगत असो वा बफे पद्धत, असे अन्न टाकणारे अनेक मुजोर आपल्याला सदैव दिसतात खरे.

तात्पर्य: एकजण अन्न टाकणारा आणि दुसरा ते लवून भजून खाणारा. पहिल्याच्या दृष्टीने दुसरा हा टिंगलीचा विषय, तर दुसऱ्याच्या दृष्टीने पहिला हा चीड आणणारा विषय.

... अन्न – माणसाची जगण्यासाठीची मूलभूत गरज. ते अन्न काहीही करून मिळवलेच पाहिजे याची जाणीव करून देणारी संवेदना म्हणजे भूक.
समाजातील बहुतेक लोक कष्ट करून अन्न मिळवतात आणि आपली भूक भागवतात. त्यामुळे त्यांना अन्नाची किंमत समजलेली असते. ते नेहेमी अन्न लवून भजूनच खातात.

काही लोकांच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी असते. त्यांना अन्न मिळवण्यासाठी कष्ट नाही केले तरी चालणार असते. त्यांची भूक भागवण्याची सोय एकतर त्यांच्या पूर्वजांनी करून ठेवलेली असते किंवा, दुसऱ्याचे शोषण करून स्वतःची पोटे भरण्यात हे लोक तरबेज असतात. सुबत्तेतून आलेला माज त्यांच्यामध्ये अगदी भिनलेला असतो. अशा लोकांमधूनच मग निर्माण होतात अन्न टाकणारे मुजोर. भुकेची वेदना कधीही न जाणवलेली ही माणसे. त्यांना अन्नाची किंमत ती काय कळणार?

या दोघांशिवाय तिसरा एक वर्ग समाजात असतो. हे लोक अन्न मिळवण्यासाठी कष्ट व धडपड करण्याऐवजी भिकारी होण्याचा सोपा पर्याय निवडतात. तेव्हा या लोकांना फुकट मिळेल तेवढेच व वाट्टेल तसले अन्न खाण्याची वेळ येते. त्यांच्या सततच्या भुकेल्या अवस्थेला ते स्वतःच जबाबदार असतात. ‘ज्याचे हात काम करतात तो कधीही उपाशी राहत नाही’ या वास्तवाचा त्यांना बहुधा विसर पडलेला असतो.

विष्ठेने बरबटलेले अन्न चिवडून खाणारा भिकारी, काबाडकष्ट करुनही अर्धपोटी असलेली माणसे, मुक्तहस्ते अन्नाची नासाडी करणारी आणि ते टाकण्यात प्रतिष्ठा मानणारी माणसे यांसारखी दृश्ये आपल्या अवतीभवती वारंवार दिसतात. ही सगळीच दृश्ये व्यथित करणारी. ही दृश्ये आपल्याला ‘समाजातील आर्थिक विषमता व वाढती दरी’ यांसारख्या जडभारी विधानांचा अर्थ अगदी स्पष्ट करून सांगतात. एवढेच नाही, तर या वास्तवाची प्रखर जाणीव करून देतात.

एखाद्या माणसाच्या भिकारी होण्याला नक्की जबाबदार कोण? फक्त तो स्वतः की आपण सगळेच? उत्तर देणे अवघड आहे. पण, काही मुद्दे अगदी स्पष्ट व स्वच्छ दिसतात :
१. माणसाने कोणतेही काम हलके न मानता वाटेल त्या कष्टांची तयारी दाखवली तर त्याची भूक भागण्याइतके अन्न त्याला जरूर मिळते.
२. ज्या लोकांना अन्न, वस्त्र, निवारा आणि कित्येक सुखसोयी या विनासायास मिळाल्या आहेत, त्यांनी निदान अन्न टाकण्याचा माज तरी करू नये ही अपेक्षा.
३. आपली भूक भागण्यामागे आपण सोडून इतर अनेकांचे कष्टही कारणीभूत असतात, ही जाणीव सर्वांना असणे हेही महत्वाचे.

ज्या दिवशी या पृथ्वीतलावरील उपलब्ध अन्न हे मानवासहित सर्वच प्राणिमात्रांची भूक भागवून सर्वांना तृप्त ठेवेल तो अर्थातच सुवर्णदिन असेल.
*********************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी ( 'भूक' या नावाने) : ‘अंतर्नाद’ मासिक.)

समाजलेख

प्रतिक्रिया

विशुमित's picture

18 Jul 2017 - 4:00 pm | विशुमित

छान लिहलंय..!!
लेख आवडला..!!

सिरुसेरि's picture

18 Jul 2017 - 4:03 pm | सिरुसेरि

मोठा गंभीर प्रश्न आहे . +१००

अनुप ढेरे's picture

18 Jul 2017 - 4:15 pm | अनुप ढेरे

याच लेखावर पलिकडे चर्चा झालेली आहे.

http://www.aisiakshare.com/node/5929

नितीन थत्ते यांनी एक गंमतशीर प्रश्न उपस्थित केला होता.

माझा एक मित्र रोज हजार बैठका मारतो. मग भूक लागली म्हणून १५ पोळ्या खातो.

ही अन्नाची नासाडी म्हणाता येईल का?

आदिजोशी's picture

18 Jul 2017 - 6:34 pm | आदिजोशी

ईकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे करण्याचे प्रयोजन समजले नाही. तिथे चर्चा झाली म्हणून इथे होऊ नये का?

अप्पा जोगळेकर's picture

18 Jul 2017 - 6:38 pm | अप्पा जोगळेकर

याच लेखावर पलिकडे चर्चा झालेली आहे.
हो. आणि नेहमी प्रमाणेच सरळ सोप्या तथ्यांची उगाचच बिनडोक चिरफाड झालेली आहे.

रेवती's picture

18 Jul 2017 - 5:29 pm | रेवती

लेखन आवडले.

कुमार१'s picture

18 Jul 2017 - 6:03 pm | कुमार१

विषुमित व रेवती ,आभार. अनुप, माझ्या मते ती नासाडी नाही

आपल्याला जर शालेय शिक्षण आठवत असेल तर जरा मागे वळून पाहूया ... आम्ही लहान होतो तेव्हा मला आठवतंय एक आम्हाला धडा होता ... अन्नाच्या वाया जाणाऱ्या दाण्यावरून ... त्यामध्ये लहान नातवाला आजोबा सांगतात जर तू एक दाना वाया घालवलास आणि तुझ्याप्रमाणं देशातील प्रत्येक व्यक्तीने अस्संच एकेक दाना वाया घालवला तर किती नुकसान होईल ? याची महती.... तो धडा आणि तो धडा काकुळतीने शिकवणाऱ्या आमच्या किल्लेदार बाई ... यांची आठवण तरळून गेली तुमचा लेख वाचल्यानंतर .... तुम्हाला सांगतो .. तो धडा आमच्या ग्रुपमध्ये एक महान संदेश देऊन गेला होता .. आम्ही सर्व मुले ..जवळजवळ महिनाभर तरी तो कटाक्ष नेमाने पळत होतो ... आजही कदाचित त्याचेच भान असेल म्हणून मीदेखील अन्नाची महती जाणतो .. असे नाही कि काही वाया जाताच नाही ... जे पण दिवसाकाठी उरते ते नेमाने गायीला किंवा समुद्रामधील माश्याना अगदी प्रेमाने खायला घालतो ... एकंदरीत तुमची उदाहरणे ( ज्वलंत ) मला फार आवडली .. माझी रास्त अपेक्षा हीच असेल कि निदान माझ्या मुलांनी तरी जेवण वाया घालवू नये .. मंडळ आभारी आहे .. एका ज्वलंत पण उपेक्षित विषयाला हात घातल्याबद्दल .....

खाऊन माजा टाकून नको असे घरचे म्हणत. पानात एक घास जरी राह्यला तरी वस्सकन अंगावर यायचे घरातले लोक. त्यामुळे जेवढं हवंय तेवढंच पानात घ्यायची सवय आपसूकच लागली आहे. दुसरे टाकतात तेव्हा वाईट वाटतं, जवळचे असतील तर सांगूनसुद्धा बघतो. बाकी नासाडी सप्लाय चेनमध्ये जितकी होते, तितकी एंड कस्टमरपाशी होत नाही, त्यामुळे तिथे उपाय करण्याची अधिक गरज आहे.

वकील साहेब's picture

14 Feb 2019 - 1:55 pm | वकील साहेब

आमचेही घरचे आम्हाला "खाऊन माजावं पण टाकून माजू नये" अस म्हणत असत. आणि आम्ही कधी खूपच खोडकरपणा केला की, घरचे आम्हाला "खाऊन खाऊन माजलेत अस म्हणायचे."

सुबोध खरे's picture

18 Jul 2017 - 6:37 pm | सुबोध खरे

आपण यथेष्ट जेवणे
उरले अन्न वाटणे
परंतु वाया दवडणे
हा धर्म नव्हे !!
संत श्री रामदास

सिद्धेश्वर, मनापासून आभार !

सौन्दर्य's picture

18 Jul 2017 - 8:06 pm | सौन्दर्य

आम्ही लहान असताना वडिलांची कडक आज्ञा होती, जेऊन झाल्यावर जेवणाचे ताट एकदम स्वच्छ दिसले पाहिजे. इतके स्वच्छ की त्यात आधी कोणी जेवले आहे की नाही अशी शंका यावी. हीच सवय आम्ही आमच्या मुलांना लावली आणि आज आमच्या घरी कोणीही ताटात अन्न टाकत नाही. अनेकदा काही कारणांनी राहून गेलेले (शिळे) अन्न देखील आधी संपवतो नंतरच ताज्या अन्नाकडे वळतो. "अन्न हे पूर्णब्रह्म" हेच सत्य आहे.

सुबोध खरे's picture

18 Jul 2017 - 8:43 pm | सुबोध खरे

बुफे मध्ये परत रांगेत उभे राहायला लागू नये म्हणून बरेच लोक सर्व पदार्थ एकावर एक ढीग करून रचतात आणि मग त्यातील न आवडणारे पदार्थ/ अति जास्त घेतल्यामुळे नकोसे झालेले पदार्थ तसेच टाकून दिले जातात. चार पाच वर्षाच्या मुलाला हट्ट म्हणून एक वेगळे ताट घेतात आणि त्यातील तीन चतुर्थांश पदार्थ तसेच कचऱ्याच्या टोपलीत जातात. अशी अन्नाची नासाडी बघवत नाही म्हणून मी सहसा लग्नाला/ तत्सम समारंभाला जेवण सुरु झाले कि सर्वात पहिल्यांदा ताट घेऊन चवीपुरते पदार्थ घेतो. ( त्यातच माझे पोट भरून जाते) आणि स्वच्छ केलेले ताट तेथे ठेवलेल्या टोपल्यात ठेवतो.( सर्वात आधी आणि कमी जेवणारा मीच असतो बहुधा). यामुळे त्या टोपल्यात वाया जाणारे पदार्थ पाहायची वेळ येत नाही. हॉटेलात गेलो तर नेहमीच आमचे पदार्थ उरतात ते सरळ बांधून द्या म्हणून मी कितीही उच्चभरू हॉटेल असेल तरी बांधून घरी घेऊन येतो. शांतपणे दुसऱ्या दिवशी त्याचा परत आस्वाद घेता येतो.
मुलांना सुद्धा हीच शिकवण आहे.

Nitin Palkar's picture

18 Jul 2017 - 9:50 pm | Nitin Palkar

सुंदर लेख, खूप महत्वाच्या विषयावर सुरेख लेखन. अतिशय साधी, सोपी आणि त्यामुळेच मनाला भावणारी भाषा.

सोमनाथ खांदवे's picture

18 Jul 2017 - 10:42 pm | सोमनाथ खांदवे

ज्या प्रमाणे आपल्या आकाशगंगे सारख्या शेकडो आकाशगंगा या अतंराळ मध्ये आहेत तर मग देव आहे कुठे ? नसलेला देव त्याला कुठल्या कर्मा ची फळे भिकारी ला भोगायला लावत असतो ? फक्त भारतातच विष्ठे शेजारी बका बका भात खाणारे व पंच पक्वान्न वाया घलावणारी माणस का सर्रास दिसतात ?

सोमनाथ खांदवे's picture

18 Jul 2017 - 10:43 pm | सोमनाथ खांदवे

ज्या प्रमाणे आपल्या आकाशगंगे सारख्या शेकडो आकाशगंगा या अतंराळ मध्ये आहेत तर मग देव आहे कुठे ? नसलेला देव त्याला कुठल्या कर्मा ची फळे भिकारी ला भोगायला लावत असतो ? फक्त भारतातच विष्ठे शेजारी बका बका भात खाणारे व पंच पक्वान्न वाया घलावणारी माणस का सर्रास दिसतात ?

रुपी's picture

19 Jul 2017 - 12:21 am | रुपी

छान लिहिलंय.
आपल्या ताटात जे अन्न आहे त्यासाठी किती लोकांनी किती मेहनत घेतली आहे हेही लक्ष्यात घ्यायला हवे.

सर्व प्रतिसाद कांचे आभार . तुम्हाला हा विषय महत्वाचा वाटला याचा आनंद आहे

( बातमी : सकाळ , १२/२/१९. https://www.esakal.com/marathwada/hungry-people-food-doctor-family-human...)

लातूरच्या डॉ. श्रद्धा निटुरे-पत्रिके, डॉ. गिरीश पत्रिके यांचा सुरेख उपक्रम. ते दोघे काही हॉटेल्समधील वाया जाणारे पण चांगले अन्न भुकेल्यांपर्यंत पोचवण्याचे कौतुकास्पद काम करीत आहेत.

त्रिवार अभिनंदन !!

वन's picture

12 Feb 2019 - 3:24 pm | वन

खूप छान कार्य.

वकील साहेब's picture

14 Feb 2019 - 1:59 pm | वकील साहेब

धान्य उन्हात वाळत घातले की सायंकाळी ते गोळा करतांना आई धान्याचा अगदी शेवटचा दाना देखील गोळा करायला सांगायची. म्हणायची की धान्याचा दाना आपल्याला अस म्हणत असतो की तू मला दाण्यात टाक तर मी तुला माणसात टाकील.

कुमार१'s picture

14 Feb 2019 - 3:32 pm | कुमार१

तू मला दाण्यात टाक तर मी तुला माणसात टाकील. >>>> +१११

कुमार१'s picture

20 Oct 2020 - 2:08 pm | कुमार१

‘भूकमुक्त जग’ असा ध्यास घेतलेल्या ‘जागतिक अन्न-अभियाना’ला २०२० या वर्षीचे शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक दिले आहे.

यासंदर्भातील एक चांगला लेख

कुमार१'s picture

9 Mar 2021 - 12:54 pm | कुमार१

चिंताजनक अहवाल

२०१९ मध्ये जगभरात ९३ कोटी टन अन्नाची नासाडी झाली .
यात विकसनशील देशही मागे नाहीत .

- सयुक्त राष्ट्रसंघ

https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/world-news/un-report...

विचार करायला लावणारा लेख...
काही लोक आहेत ज्यांना उष्ट टाकणं यात काहीच गैर वाटत नाही.मला वाटत याची मुळे म्हणजे लहानपणापासूनचे संस्कार आहे.आईने तिथेच कान ओढले पाहिजे.
तसं उपहारगृहात उष्ट टाकत नाही.पण पार्सलचा विचार केला नव्हता.. यापुढे करेन..मी म्हणते उपहारगृह मालकांनीच पार्सलसाठी इनसिस्ट केलं तर?शेवटी अन्नाचा आदर त्यांनाच अधिक असेल.