विश्वामित्र- क्षत्रिय ते ब्राह्मण

Primary tabs

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
15 Jul 2017 - 6:07 pm

विश्वामित्र- क्षत्रिय ते ब्राह्मण

श्री. माहितगार यांच्या एका धाग्यात विश्वामित्राचा उल्लेख आला होता. याची कथा सगळ्यांना माहीत असेलच असे नाही. मनोरंजक आहे. प्राचिन काळी वर्ण बदलता येत होते याची ही कहांणी. गोष्ट विश्वामित्राच्या आधीच्या पिढीपासून सुरू होते.
ऋचीक हा विद्वान ब्रह्मर्षी त्याचे लग्न गाधी या क्षत्रिय राजाची मुलगी सत्यवती हिच्याशी झाले. पतिपरायण सत्यवतीवर प्रसन्न होवून ऋचीकाने तिला वर मागावयास सांगितले. ही गोष्ट सत्यवतीने आपल्या आईला सांगितली. आई म्हणाली ’तुझे पती महान तपस्वी व समर्थ आहेत. त्यांच्या कृपेने मलाही पुत्रलाभ व्हावा अशी तू त्यांना विनंती कर." सत्यवतीने ही गोष्ट ऋचीकाला सांगतली. त्याने ते मान्य केले. ते म्हणाले " मी तुझ्याकरिता आणि तुझ्या आईकरिता दोन चरू तयार करतो. तुझा तू व आईचा आईने सेवन केला की तुम्हाला गुणवान पुत्र मिळतील." पुढे आईच्या मनात विकल्प आला व तिने मुलीला चरू अदलाबदल करू असे सांगितले. सत्यवतीला ते मान्य झाले व त्यांनी तसे केले पुढे दोघीही गर्भवती राहिल्या आणि ते तपसामर्थ्याने ऋचीकाला समजले. तो खिन्नतेने सत्यवतीला म्हणाला " मी तुझ्या चरूत ब्राह्मतेज घातले होते दुसर्‍यात प्रखर क्षात्रतेज. तू विश्वात विख्यात अशा ब्राह्मणाला जन्म देशील व तुझी आई सर्वश्रेष्ठ अश क्षत्रियाला. तुम्ही चरू बदलला आता तुझी आई श्रेठ ब्राह्मणाला जन्म देईल व उग्र कर्म करंणारा क्षत्रिय तुझ्या पोटी जन्म घेईल." सत्यवतीला धक्का बसला व ती मुर्छितच झाली. शुद्धीवर आल्यावर तिने करुणा भाकली की ’ आपण श्रेष्ठ ब्रह्मर्षी आहात व मी आपली पत्नी आहे. माझ्या पोटी क्षत्रिय पुत्र जन्माला येऊ नये. माझा नातू उग्रकर्मा क्षत्रिय स्वभावाचा असेल तरी चालेल. एवढी भिक्षा मला घाला." ऋचीकाला पत्नीची दया येऊन त्याने "असेच होईल" असा वर दिला. गाधी राजाला झालेला पुत्र म्हणजे ब्रह्मवादी विश्वामित्र व सत्यवतीच्या पोटी महर्षी जमदग्नी. जमदग्नीचा मुलगा म्हणजे सर्व क्षत्रियांचा संहार करणारा परशुराम
ही झाली विश्वामित्राच्या जन्माची कहाणी. आता.आपण मुख्य कहाणीकडे वळू.
गाधीनंतर विश्वामित्र राजा झाला. त्याने पुष्कळ वर्षे राज्य चालवून पृथ्वीचे परिपालन केले. एकदा हा महातेजस्वी राजा सैन्य बरोबर घेऊन प्रुथ्वीपर्यटन करू लागला असता वसिष्ठमुनींच्या आश्रमापाशी आला. त्याने विनयाने मुनींना प्रणाम केला. एकमेकांचे कुशल विचारल्यानंतर वसिष्ठमुनींनी त्याला भोजनाचा आग्रह केला. प्रचंड सेनेला भोजन देण्याबद्दल आश्रमात कसे शक्य होणार या बद्दल शंका असल्याने प्रथम आढेवेढे घेतले. पण विश्वामित्राने नंतर कबूल केले.
वसिष्ठांकडे कामधेनूची मुलगी, शबला, होती. तिला सांगितल्यावर तिने सर्वांच्या भोजनाची उत्तम व्यवस्था केली.
विश्वामित्राला ती आवडली व त्याने तिच्या बदल्यात एक लक्ष गायी देतो असे सांगितले. वसिष्टानी नाकारले.विश्वामित्राने देऊ केलेली इतर प्रचंड धनही त्यांनी नाकारले. तेव्ह विश्वामित्राने गायीला बलात्काराने न्यावयाचे ठरविले. तेव्हा शबलेने स्वत: सैन्य निर्माण करून विश्वामित्राच्या सैन्याचा व त्याचा पराभव केला.
सैन्य व पुत्र यांचा नाश झाल्याने हताश खालेला विश्वामित्र राजधानीला परतला. एका मुलाला गादीवर बसवू,न, क्षत्रधर्माने राज्य करावयास सांगून तो हिमालयात गेला. तेथे शंकराची आराधना करून त्याला प्रसन्न करून घेतले. तो शंकराला म्हणाला " हे भगवन, मला अंगे, प्रत्यंगे, मंत्र आणि रहस्य यां सहवर्त्रमान धनुर्वेद द्या. मला देव, दानव, महर्षी , गंधर्व, यक्ष आणि राक्षस यांच्यापाशी जी अस्त्रे असतील त्या सर्वांची स्फुर्ति होवो." "ठीक आहे" असे म्हणून महादेवांनी गमन केले.
"आता वसिष्ठांचा नाश झालाच " असे म्हणत तो आश्रमापाशी आला व त्याने अस्त्राने अश्रमाचा विध्वंस करावयास सुरवात केली. घाबरून शेकडो, मुनी, शिष्य पळापळ करू लगले व वसिष्ठ " घाबरू नका, मी विश्वामित्राचा नाश करतो "असे सांगत होते तरी पळून गेले व आश्रम क्षणार्धात ओसाड झाला. संतापून वसिष्ठ विश्वामित्राला म्हणाले, "मूढा, अनेक दिवसांपासून वृद्धिंगत केलेल्या आश्रमाचा तू नाश केलास, अरे घोरतपाने संपादन केलेल्या अस्त्रबळाचा तुझा गर्व नाहिसा करून टाकतो. तुझे .क्षत्रियबळ कोणीकडे आणि हे प्रचंड ब्रह्मबळ कोणीकडे ?" मग आपला ब्रह्मदंड उभारून उभ्या राहिलेल्या वसिष्ठांवर विश्वामित्राने आग्नेयास्त्र सोडले. पण ते त्या ब्रह्मदंडात विलीन झाले. मग चिडून विश्वामित्राने वारूण, रौद्र, ऐंद्र, मान्व, गांधर्व इत्यादी अनेक अस्त्रे सोडली पण त्यांचीही तीच गत झाली. शेवटी विश्वामित्राने ब्रह्मास्त्र सोडले पन तेही ब्रह्मदंडाने ग्रासून टाकले..,
अशा रीतीने वसिष्ठाने जेरीस आणून पराभूत केल्यावर सुस्कारा टाकून विश्वामित्र म्हणाला " धिक्कार असो या क्षात्रबळाला. एका ब्रह्मदंडाने माझी सर्व अस्त्रे व्यर्थ करून सोडली. तर आता मी ब्राह्मणत्व प्राप्त करण्यासाठी प्रचंड तप करितो."
विश्वामित्राच्या तपाचा प्रवास बराच विस्तृत आहे. प्रथम ब्रह्मदेव त्याला राजर्षी, नंतर महर्षी व शेवटी "ब्रह्मर्षी " म्हणतो. विश्वामित्राचे समाधान तेव्हड्याने झाले नाही. तो म्हणतो "वसिष्ठांनी हे कबूल करावे". त्या प्रमाणे वसिष्ठांनी म्हटल्यावर दोघांमधील वैर संपते.
मध्ये त्रिशंकु, शुन:शेप, मेनका यांच्या कथा आहेत. तपाच्या प्रभावाने नविन सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य मिळाले तरी इंद्रीयदमन व कामक्रोधावर विजय मिळेपर्यंत ब्रह्मर्षीपद मिळालेले नाही.
विश्वामित्र ब्राह्मणत्व कसे मिळवतो याची गोष्ट इथे संपते. पण सांप्रत आणखी एका वादाला तोंड फुटले होते. ही गोष्ट ब्राह्मण आणि क्षत्रिय यां वर्णाच्या वादाची आहे का ? यजन-याजन आदि ब्राह्मणांचे व्यवसाय इतरांना करावयास संमत्ती होती का ? भारताचार्य वैद्य यांच्या मते हा दोन वर्णातला वाद होता आणि तो विश्वामित्राने जिंकला. दुसरे मत हे दोहोंमधील वैयक्तिक भांडण होते व ते मिटलेही. विश्वामित्र रामाला मागावयास दशरथाकडे येतात तेव्हा दशरथ कांकू करू लागतो. तेव्हा वसिष्ठ त्याला विश्वामित्राची थोरवी सांगतात व रामाला त्यांच्या बरोबर गेल्यास फायदा होईल हेही सांगतात. तसेच या आधीही चंद्रवंशीय क्षत्रिय ब्राह्मण झाल्याची उदाहरणे आहेत.
शरद

माहितीवाङ्मय

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

15 Jul 2017 - 7:27 pm | जेम्स वांड

पुराणकथा म्हणून आवडली. :)

प्रतापराव's picture

15 Jul 2017 - 7:29 pm | प्रतापराव

अत्यंत माहितीपुर्ण धागा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jul 2017 - 9:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

जन्माने ठरणारी जातप्रथा साधारण २००० वर्षांपूर्वी आस्तित्वात आली असे जनुकशास्त्रिय पुरावे सांगतात. त्याअगोदर जात-वर्ण हे कर्माने ठरत असावे, याचा हा लोककथांतून पुढे आलेला पुरावा म्हणावा काय ? कथेतला बाकी तपशील, पिढी दरपिढी पुढे जाताना, कथेत वेळोवेळीच्या समाज व कथेकर्‍याच्या हितसंबंधांनुरुप मिसळलेला प्रतिभासंपन्न मसाला असावा... असे सगळ्याच प्राचीन साहित्याच्या बाबतीत झालेले आहे.

मूकवाचक's picture

16 Jul 2017 - 8:15 pm | मूकवाचक

कथेतला तपशील, पिढी दरपिढी पुढे जाताना, कथेत वेळोवेळीच्या समाज व कथेकर्‍याच्या हितसंबंधांनुरुप मिसळलेला प्रतिभासंपन्न मसाला असावा... असे सगळ्याच प्राचीन साहित्याच्या बाबतीत झालेले आहे.

+१

प्रसाद प्रसाद's picture

18 Jul 2017 - 2:41 pm | प्रसाद प्रसाद

जन्माने ठरणारी जातप्रथा साधारण २००० वर्षांपूर्वी आस्तित्वात आली असे जनुकशास्त्रिय पुरावे सांगतात.
ह्या विषयी फारशी माहिती नाही, कृपया अधिक विस्ताराने सांगाल का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jul 2017 - 9:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
श्रीनिवास टिळक's picture

15 Jul 2017 - 10:02 pm | श्रीनिवास टिळक

या विषयावर अधीश साठ्ये यांचे खालील महत्वाचे पुस्तक आंतरजालावर pdf प्रणालीत विनामूल्य उपलब्ध आहे

Adheesh Sathaye

श्रीनिवास टिळक's picture

15 Jul 2017 - 10:06 pm | श्रीनिवास टिळक

या विषयावर अधीश साठ्ये यांचे खालील महत्वाचे पुस्तक आंतरजालावर pdf प्रणालीत विनामूल्य उपलब्ध आहे
Adheesh Sathaye-- Crossing the Lines of Caste:
Visvamitra and the Construction of Brahmin Power in Hindu Mythology

ज्योति अलवनि's picture

16 Jul 2017 - 1:27 am | ज्योति अलवनि

कथा अगोदरच माहीत होती. पण तुम्ही ज्या मुद्याचा उहापोह केला आहे तो विचार मात्र मनात आला नव्हता.

प्रचेतस's picture

18 Jul 2017 - 9:21 am | प्रचेतस

लेखन आवडले.
दाशराज्ञ युद्धातले काही दाखले यायला हवे होते असे वाटले. अर्थात लेखाचा तो विषय नाही.

कुरुंदकरांनी मनुस्मृतीवरील भाषणांत चातुर्वण्याचा उत्तम उहापोह केलाय.

प्रसाद प्रसाद's picture

18 Jul 2017 - 2:44 pm | प्रसाद प्रसाद

कुरुंदकरांनी मनुस्मृतीवरील भाषणांत चातुर्वण्याचा उत्तम उहापोह केलाय.

याविषयी ऑनलाईन काही उपलब्ध आहे का? का कोणत्या पुस्तकाचा संदर्भ आहे. तसे असेल तर कृपया पुस्तकाचे नाव द्याल का?

प्रचेतस's picture

18 Jul 2017 - 3:54 pm | प्रचेतस

कुरुंदकरांची काही भाषणे उपलब्ध आहेत पण ती ऑनलाईन मिळतील का नाही याबाबतीत काही कल्पना नाही मात्र मनुस्मृतीवरील ३ भाषणे पुस्तकरुपाने उपलब्ध आहे.

त्यांचे मनुस्मृती हे पुस्तक येथे मिळेल.

http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=536582790575532...

प्रसाद प्रसाद's picture

18 Jul 2017 - 4:24 pm | प्रसाद प्रसाद

आभारी आहे.