घरामध्ये असावे, घर एक छान

Primary tabs

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
14 Jul 2017 - 7:26 pm

घराची संकल्पना खरच किती छान आहे! बाह्य जगातील कटाकटींपासून मुक्त अशी स्वत:ची आरामशीर जागा. अगदी आदिम मानवापासून आजवर घर हा आपल्या सामाजिक व्यवस्थेचा केंद्रबिंदू झालेला आहे. आदिम काळातील गरजांमधून पुरुषप्रधान संस्कृतीचा समाजात घट्ट पगडा बसला. या व्यवस्थेत अगदी आजवर अनेक स्त्रियांनी अन्याय व अत्याचार सोसले. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार वाढला. त्यातून अन्याय विरुद्ध लढण्याची जागरूकता आली. प्रत्येक देशात समाज सुधारक पुढे आले. स्त्री जागृती, स्त्री सबलीकरण अशा संकल्पना अमलात आणणे ही काळाची गरज बनली. स्त्रियांवर अन्याय होऊ नाही या दृष्टीने कायदे देखील बनविले गेले. या सगळ्यांचा परिणाम म्हणून सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर स्त्रिया दिसू लागल्या. राजकारणात नेतेपदावर, उद्योगांचे मालक म्हणून, इतर सर्व क्षेत्रात चमकून पुरुषांची बरोबरी आणि त्यांच्या दोन पाऊले पुढे देखील राहू लागल्या.
..
या सामाजिक बदलाचा परिणाम अर्थातच घर या संस्थेवर झाला. घर फक्त स्त्रीनेच चालवायचे हा आग्रह जाऊन बरोबरीने बाहेरची आणि घराची जबाबदारी वाटून घेणे ही काळाची गरज बनली. असे जरी असले, तरी समाज नेहमी बहू आयामी असतो, एकसंध मुळीच नव्हे. त्यानुसार प्रत्येक घराघरात, प्रत्येकाच्या समज-उमज मध्ये तफावत असणारच. काही सुशिक्षित कुटुंबे, घर कसे, आणि कोणी, किती चालवायचे या वादळी प्रश्नांची आपापली उत्तरे शोधू लागली. समाज अनेक नवीन भस्मासुरांशी झगडू लागला..... घटस्फोट... एक पालकी मुले... काँट्रॅक्ट मॅरेज.... अनेक कुटुंबांवर त्यातील कोवळ्या मुलांवर या वावटळीचे खोल परिणाम झाले.
..
अशाच एका कुटुंबाची दुर्देवी कहाणी “तिचा उंबरठा” या अत्यंत प्रभावकारक चित्रपटात पहायला मिळाली. तेजस्विनी पंडीत आणि चिन्मय मांडलेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आहे. प्रदीप घोणशीकर दिग्दर्शित, जयंत पवार यांच्या समर्थ कथेवर आधारित. यातील नायक नायिका दोघेही सुशिक्षित, आणि सुखवस्तू आहेत. नायक पारंपारिक पती प्रमाणे उद्योग धंदा सांभाळणारा म्हणजे ब्रेड-विनर आणि त्याची पत्नी घराकडे बघण्यात खूष असलेली पारंपारिक भारतीय स्त्रि. त्यांना पाच वर्षाची एक गोड मुलगी आहे. नायकाची आई त्यांच्याजवळ राहते. सासू सुनेत अतिशय चांगले संबंध आहेत. नवरा बायकोमध्ये प्रेम आहे. अगदी आदर्श सुखी कुटुंबच म्हणाना! नायिकेने घर अगदी उत्कृष्टपणे सांभाळले आहे. तिने उभारलेल्या घराचा तिला अत्यंत अभिमान आणि प्रेम आहे. लग्नानंतरची पहिली सहा सात स्वपाळू वर्षे या उभारणीत आनंदात निघून जातात.
..
आता कहाणीत ट्विस्ट येतो. पती अचानक एके मध्यरात्री कामावरून आल्यावर पत्नीला घटस्फोट मागतो. मी तुझ्याबरोबर सुखी नाही, ही त्याची तक्रार असते. वरवर सगळे आलबेल आहे. दृष्ट लागण्यासारखे कुटुंब आहे. त्याचे बाहेर काही सिरीयस प्रकरण असावे असे देखील दाखविले नाही. हां, एक मैत्रीण असते, तिचा सहवास त्याला आवडत असतो. पण तोवर तरी त्यांच्यात फक्त मैत्रीचेच संबंध असतात. प्रेयसी-प्रियकर असे नाते नसते. मग तो घटस्फोटाची मागणी कां करतो? तो सुखी कां नसतो? काय म्हणालात? सेक्सच्या बाबतीत असमाधानी? नाही, तसेही काही नाही. त्यांचे सेक्स लाईफ चार चौघांसारखेच सामान्य असावे असे अप्रत्यक्षपणे दर्शविले आहे. Nothing fantastic, and apparently nothing lacking as well.
..
तरीही त्याचे म्हणणे की बायको त्याच्या सुखाचा विचारच करीत नाही. त्याला काय हवे आहे हे तिच्या गावीही नसते. ती फक्त घरात, मुलीत, तिच्या उंबरठ्यात खूष असते. आणि अर्थात पती देखील तिच्या घराचा एक अविभाज्य भाग असतोच की! घटस्फोटाची मागणी ऐकून तिला प्रचंड धक्का बसतो. ती म्हणते, अरे हे सुखी घर मी तुझ्यासाठीच जपते आहे नां? तुझ्यासाठी, मुलीसाठी, तुझ्या आईसाठीच मी हे सगळे करत आहे नां? आधी तुझा पगार अपुरा होता, तेव्हा पैनपैची बचत करून मी घर चालविले. आज आपले बरे चालले आहे. तरी मी कधी उधळपट्टी केली नाही. अवाजवी मागण्या केल्या नाहीत. माझ्या सासू बरोबर मी सुखाने रहाते आहे. तुला हवे नको बघते, हे सगळे तुझ्या घरासाठीच नां?
..
तो म्हणतो, हे सगळे तू माझ्या साठी नव्हे, तुझ्या घरासाठी करते आहेस. मी म्हणजे तुझ्यासाठी फक्त एक पैसे कमावण्याचे मशीन आहे. ही मशीन म्हणजे मी, तुझ्यासाठी या घराचा फक्त एक भाग आहे. केवळ पैसे छापणारी मशीन. मला माझ्या आकांक्षा समजणारी, माझ्या भावना वाटून घेणारी एक मैत्रीण, एक सहचारी हवी आहे. माझ्या गरजा काय, मला काय हवे, कशाने मी सुखी होईल याची तुला काळजी तर नाहीच. पण असे काही माझे प्रश्न असू शकतील, हे आज मी इतके स्पष्ट सांगून देखील तुला भावतच नाही. हा उंबरठा हेच केवळ तुझे जग राहिले आहे.
..
ती म्हणते, हे आजवर कां नाही बोललास? इतका टोकाचा निर्णय घेण्याआधी सांगितले असतेस तर मी तुला हवे ते सुख दिले असते. मी घराकडे बघण्याचे सोडून करियर करावे असे तुझे म्हणणे आहे कां? त्याचे उत्तर निराशेचे होते. तो म्हणाला, तू करियर करावे किंवा नाही हा एकदम वेगळा मुद्दा आहे. ते तूच ठरवायचे आहे. तुझे करियर करणे, ना करणे याचा माझ्या दु:खाशी विशेष संबंध नाही. माझ्या मुलीचा जन्म झाल्यापासून तुझे संपूर्ण जग, आपली मुलगी हा तुझ्या सुखाचा केंद्रबिंदू झाली. त्याआधी मी त्यां जागी होतो. मुलगी झाल्यापासून पाच सहा वर्षे मी माझी केंद्रस्थानी असलेली कौतुकाची जागा मला मिळावी म्हणून अनेक प्रयत्न केले. तुला वेगवेगळ्या रीतींनी सांगून पहिले. पण तुझे घर, तुझा उंबरठा यात मी महत्वाचा नाहीच. तू फक्त तुझ्या घराची, तुझ्या मुलीचीच बनून राहिलीस. माझे तुझ्या आयुष्यात पैशाशिवाय काहीच महत्व नाही. मला घटस्फोटच हवा.
..
या नंतरची कथा ही स्त्री सबलीकरण, स्त्रीमुक्ती या कोनांतून फिरते. नायिका पतीला घटस्फोट देत नाहीच, उलट त्याच्याच घरातून त्याला हाकलून देते. त्याची मैत्रिण त्याची प्रेयसी होते व तो तिच्या घरी राहतो. नायिका लहान मुलगी, सासू, व लग्न न झालेल्या नंणदेला बरोबर घेऊन आहे त्याच घरात रहाते. ती single parent व ex सासू-नंणदेची काळजी घेणारी यशस्वी गृहिणी बनते. नायकाचे जीवन मात्र भकास आणि निराशेने भरलेले होऊन एकाकी अवस्थेत पोहोचते.
..
या चित्रपटाची कथा सविस्तर सांगणे हा या लेखाचा उद्देश नाही. चित्रपट तुम्ही न चुकता पडद्यावर पहाच. लेखकाने आजच्या काळानुसार स्त्री मुक्तीचा प्रसार हा उद्देश ठेवून, पिडीत नायिका स्वबळाने परिस्थितीवर कशी मात करते हे दाखविले आहे. त्याबद्दल देखील मला काहीच आक्षेप नाही. ते बरोबरच आहे.
..
माझा सगळ्यात मोठा आक्षेप हा, की नायकाचा जो मुद्दा आहे, त्याचे कोणीच समर्थन केले नाही किंवा नुसते तोंडदेखले देखील त्याचे दु:ख समजून घेतले नाही. त्याच्या घराच्या ज्या कल्पना होत्या, त्या बायकोने पूर्ण केल्या नाहीत. त्याला पत्नी नव्हे, एक सहचारी हवी होती. आपण ज्या घरात कुटुंबासोबत राहतो, त्याच्या गाभाऱ्यात एक अतिशय खाजगी असे पती पत्नीचे छान घर असते. त्यात फक्त ती आणि तो असतात. त्यांच्या एकमेकांकडून फक्त एवढ्याच अपेक्षा असतात की फक्त एकमेकांना समजून हवे ते सुख द्यावे. मग ते सेक्सच्या बाबतीत असो, भावनात्मक एकोपा असो, किंवा रोजच्या जगण्यातील क्षुल्लक गरजा असोत. बाहेरील घरात राहतांना ते दोघे पूर्ण कुटुंबाचे. गाभाऱ्यात राहताना ते दोघे फक्त एकमेकांचे. अशी भावनांची आणि वेळेची वाटणी करावी लागते हे पत्नी म्हणून नायिकेला उमगलेच नव्हते. सुखी संसारासाठी तशी वाटणी आवश्यक असते हे त्याने सांगून देखील, तिने फक्त तिचा उंबरठा वाचविण्याचा मार्ग पत्करला. त्याकरता पतीला घराबाहेर काढून त्याच्या आयुष्याचा सर्वनाश होऊ देणे तिने स्विकारले.
..
स्त्री मुक्तीच्या काळात पुरुषाची हीच खरी शोकांतिका आहे. जीवाला जीव, भावनेला भावना देणारी खरी मैत्रीण लग्न न करता मिळणे तर अशक्य आहेच. संसार मांडून आलेली पत्नी ही त्याची खरी मैत्रीण होईल हे देखील आजच्या स्त्री स्वातंत्र्याच्या भ्रामक जगात अतिशय दुर्मिळ नशीबवानाला मिळत असावे! दुर्दैव हे, की पुरुषांच्या या समस्येवर दोन अश्रू देखील ढाळायला कोणी मिळणार नाहीत. अगदी पुरुष सुद्धा नाही अश्रू ढाळणार. मला खात्री आहे की बहुतेक पुरुष देखील नायकाची शोकांतिका बघून हसतील आणि म्हणतील..”पागल आहे साला. बायकोला मरू दे नां तिकडे तिच्या उंबरठ्यात! तुला काय कमी आहे, मस्त रोज नवी मैत्रीण घुमव. मजा कर... जो पर्यंत तुझ्याकडे पैसा आहे, तोवर तुला खूष ठेवणाऱ्यां सहचारींची कधीच कमी भासणार नाही!”
..
सुखी घराच्या आत मधले छानसे घर, दोघांचा खाजगी सुखी गाभारा देतेय कां हो कोणी? एका तुफानाला सुखी गाभारा देतेय कां हो कोणी?.......

तुम्हाला काय वाटते?

प्रकटनविचारसमाज

प्रतिक्रिया

येथे खरेतर दोन वेगवेगळ्या अपेक्षांचा संघर्ष असतो. पत्नी ही सहचारिणी, मैत्रीण असावी, तिने आपल्याला समजून घ्यावे, असे वाटणे ही एक, आणि पत्नीने आदर्श गृहिणी बनून घर सांभाळावे, सर्वांशी सलोख्याचे संबंध राखावेत ही दुसरी अपेक्षा. ह्या दोन अपेक्षांमध्ये ताळमेळ घालताना पतिपत्नी - दोहोंचाही गोंधळ उडू शकतो. त्यात भारतात लग्न झालेल्या जोडप्याकडून इतर नातेवाईकांच्या आणि समाजाच्या बरेचदा अवास्तव, स्वप्नाळू म्हणता येतील अशा अपेक्षा असतात. त्यांना त्यांच्यासाठी आवश्यक असणारी 'स्पेस' द्यायला कोणी तयार नसतात. तेव्हा भारतीय विवाहसंस्थेत आणि विशेषतः एकत्र कुटुंबपद्धतीत पती आणि पत्नी, दोघांचीही कुचंबणा होऊ शकते.

पत्नीच्या तिच्या आयुष्याबद्दल स्वतःच्या एक व्यक्ती म्हणून स्वतंत्र काय अपेक्षा असतात हे नवऱ्याने जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.

उपाशी बोका's picture

15 Jul 2017 - 2:56 am | उपाशी बोका

चित्रपट रोचक वाटत आहे, पण तो बघितल्यावरच मत देता येईल. तुमच्या रसग्रहणामुळे नक्कीच बघणार, हे मात्र नक्की.

स्त्री मुक्तीच्या काळात पुरुषाची हीच खरी शोकांतिका आहे. दुर्दैव हे, की पुरुषांच्या या समस्येवर दोन अश्रू देखील ढाळायला कोणी मिळणार नाहीत. - ही शक्यता मान्य आहे. अशी वस्तुस्थिती पण माहीत आहे.

पण.....

स्त्री मुक्तीच्या काळात पुरुषाची हीच खरी शोकांतिका आहे. जीवाला जीव, भावनेला भावना देणारी खरी मैत्रीण लग्न न करता मिळणे तर अशक्य आहेच. संसार मांडून आलेली पत्नी ही त्याची खरी मैत्रीण होईल हे देखील आजच्या स्त्री स्वातंत्र्याच्या भ्रामक जगात अतिशय दुर्मिळ नशीबवानाला मिळत असावे!

हे मात्र अजिबात पटले नाही.

यशोधरा's picture

15 Jul 2017 - 3:06 am | यशोधरा

जीवाला जीव, भावनेला भावना देणारी खरी मैत्रीण लग्न न करता मिळणे तर अशक्य आहेच. संसार मांडून आलेली पत्नी ही त्याची खरी मैत्रीण होईल हे देखील आजच्या स्त्री स्वातंत्र्याच्या भ्रामक जगात अतिशय दुर्मिळ नशीबवानाला मिळत असावे!

चित्रपट पाहीन. रसग्रहण आवडले. वर कोट केलेली वाक्ये मलाही पटली नाहीत. निखळ मैत्री असू शकत नाही का? जरुर असू शकते. आणि पत्नी मैत्रीण का नाही बनू शकणार बरे?

उपाशी बोका's picture

15 Jul 2017 - 3:14 am | उपाशी बोका

पत्नी मैत्रीण का नाही बनू शकणार बरे?
अगदी अगदी. माझी बायको माझी चांगली मैत्रीण आहे. इतकेच काय लेखक महाशय, ती इतरांची पण/तुमची पण छान मैत्रीण बनेल याची खात्री आहे.

सौन्दर्य's picture

15 Jul 2017 - 10:32 am | सौन्दर्य

रसग्रहण छान केलं आहे.

मला असं वाटतं की पत्नीने एक बाजू अतिशय खंबीरपणे सांभाळली त्यामुळे पतीला संसारासाठी पैसे कमावून आणणे ह्या पलीकडे फारसे काही करावे लागले असेल असं वाटत नाही. जर पत्नीने संसार (उंबरठा) समर्थपणे सांभाळला नसता तर ह्याच पतीने त्या बाजूने देखील कटकट केली असती. "मी आपल्या संसारासाठी बाहेर राब राब राबतो आणि तू एक घर सांभाळू शकत नाही ?" वगैरे. आता एक बाजू सेफ झाल्यावर "माझी पत्नी म्हणून तुझ्याकडून अमुक अमुक अपेक्षा होती" असे म्हणणे बरोबर नाही. पुरुषाला एक सेफ घर हवं असतं आणि शक्य झालं तर एक मैत्रीणही, पण त्याच पुरुषाला, पत्नीला असलेला मित्र चालत नाही.

गामा पैलवान's picture

15 Jul 2017 - 1:44 pm | गामा पैलवान

अरुण मनोहर,

प्रस्तुत कथेतला नायक अपरिपक्व (म्हणजे एक नंबरचा झाम्या) आहे. एक बाई (=स्वत:ची बायको) धडपणे सांभाळता येत नाही आणि मोठमोठ्या गप्पा मारतोय. म्हणे मला कोणी समजून घेत नाही. ती मैत्रीण आहे ना समजून घ्यायला? मग चालू संसार कशाला विस्कटून टाकतोय? आणि मुलीचं काय? छोट्या मुलीला बाप नको का? बाई कशी वापरावी याची त्याला अक्कल नाही. He looks like an absentee father (=पोकळ बाप).

आ.न.,
-गा.पै.

पैसा's picture

21 Jul 2017 - 4:11 pm | पैसा

सिनेमा पाहीन. असा विचार कोणी भारतीय पुरुष करू शकतात हे लेखक दिग्दर्शकाला सुचणे विशेष आहे. शेकडा ९०-९५% आपली बायको ही आपल्या वडिलांच्या कुटुंबाचा एक्स्टेंडेड भाग आहे आणि त्यांना सुखसोयी पुरवण्यासाठी घरात आणलेली रोबोट आहे असाच विचार करताना दिसतात. किंबहुना नवरा बायकोचे काही स्वतंत्र जग असू शकते हे घरातल्या इतर मंडळीना पटत नाही. माझा मुलगा सुनेच्या ताब्यात गेला अशी सासूला भीती असते तर बायकोसाठी स्वतंत्र जागा आपल्या मनात आहे हे कळले तर आपल्या आईला काय वाटेल हा विचर नवरोबाच्या मनात असतो.

सगळ्या चॅनेलांवर चाललेल्या सिरियल्स नमुना म्हणून बघा. बाईचे लग्न नवर्‍याशी नव्हे तर अख्ख्या कुटुंबाशी लागलेले असते.

अजया's picture

21 Jul 2017 - 6:18 pm | अजया

पत्नी मैत्रीण बनू शकत नाही हे नाही पटले. सिनेमाची कथा आवडली. जगात अनंत प्रकारचे स्वभाव असतात. असे 'आहे मनोहर तरी 'लोक पण असणारच अर्थात.