ध्यान

Primary tabs

सौन्दर्य's picture
सौन्दर्य in जनातलं, मनातलं
14 Jul 2017 - 2:56 am

‘ध्यान'
नववीच्या वर्गात असताना एका नवीन मुलाने आमच्या वर्गात प्रवेश घेतला होता. कोकणातल्या कोणत्यातरी गावाहून तो पहिल्यांदाच मुंबईला आला होता. नाव किशोर तेली. उंचीने आमच्या वर्गात तो सर्वात बुटका होता, इतका की वर्गातल्या मुलीही त्याच्याहून उंच होत्या. वर्ण सावळ्याची गडद छटा, शरीराने किंचित स्थूल, युनिफॉर्म अंगाला अगदी घट्ट बसलेला, केस बारीक कापलेले आणि कोळसा घासल्यासारखे काळे कुळकुळीत. तो फारसा कधी हसायचा नाही पण हसल्यावर त्याचे पांढरेशुभ्र दात उठून दिसायचे. वर्गात त्याच्या बरोबर एकाच बाकावर बसणाऱ्या विद्यार्थ्याशिवाय तो इतर कोणाशी फारसा बोलायचा देखील नाही, अगदीच शांत असायचा. थोडक्यात आमच्यासारख्या शाळेतल्या सिनियर आणि खोडकर मुलांसाठी तो एक ‘ध्यान'च होता.

वर्गात शिक्षक नसताना दंगा करण्यात आम्ही सर्वात पुढे. आणि शिंगं फुटायला लागल्यामुळे अभ्यासापेक्षा मुलींकडेच जरा जास्त लक्ष जायला लागलं होतं. येनकेन प्रकरणे मुलींवर इम्प्रेशन पाडायची एकही संधी आम्ही जाऊ देत नव्हतो पण हा मात्र सदा सन्यस्त, त्यामुळे टिंगलटवाळी करण्यासाठी तो एक नेहेमीचा बकरा होता. शाळेत नवीन असल्यामुळे म्हणा किंवा त्याच्या शरीरयष्टीमुळे म्हणा तो आमच्या नादी लागत नसे. अगदीच कोणी अंगाशी आलं तर त्याला हसून टाळत असे. थोडक्यात म्हणजे ‘अरेला, कारे ?’ म्हणण्याऱ्यातला तो नसल्यामुळे हळूहळू आमचे देखील त्याच्याकडे दुर्लक्ष व्ह्यायला लागले.

बघता बघता त्रैमासिक परीक्षा आली आणि वर्गातल्या सर्व मुलांनाच नव्हे तर शिक्षकांना देखील एक धक्का बसला. किशोर तेली हा वर्गात पहिला आला होता. बहुतेक सर्व विषयांत तोच टॉपर ठरला होता. गावाहून पहिल्यांदाच मुंबईला आलेल्या एका मुलाने, वर्गातल्या पुराणिक, जोशी, नायक, नेने, वैद्य वगैरे नेहेमी पहिल्या पाचात येणाऱ्या मुलांना धक्काच दिला होता. (सोहोनी हे नेहेमी विसाच्या पुढे येणारे असल्यामुळे त्यांना तो धक्का बसला नाही, पण ते असो.) त्या एका निकालाने संपूर्ण वर्गाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून गेला. पुढे सहामाही परीक्षेत देखील तोच पहिला आला आणि वार्षिक परीक्षेत देखील त्याने आपला नंबर सोडला नाही. शाळेच्या प्रबोधिनीमध्ये त्याचेच नाव सर्वत्र झळकू लागले.

पुढच्या वर्षी आमचा संपूर्ण वर्ग दहावीत म्हणजेच नवीन SSCत आला. आता तेलीकडून सर्व शिक्षकवर्गाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. तो बोर्डात, शाळेचे नाव गुणवत्ता यादीत झळकवणार वगैरे चर्चा सुरु झाल्या. दहावीत, आम्हाला इतर विषयांबरोबर ‘टायपिंग’ हा एक ऐच्छिक विषय होता. ह्या विषयांत मार्क न देता ग्रेड दिली जात असे आणि परीक्षा शाळेतच होणार असल्यामुळे बहुतेक सर्वाना ‘A’ किंवा ‘B’ मिळणार ह्याची खात्रीच असे. थोडक्यात हा काही फार गंभीरतेने घेण्यासारखा विषयही नव्हता. शाळेत पंचवीस एक टाईपरायटर्स होते व त्यावर आठवड्यातून एकदा आम्हाला सराव करायला मिळायचा. बहुतेक सर्व टाईपरायटर्स जुनेच असल्यामुळे अर्ध्याहून अधिक नेहेमीच नादुरुस्त असायचे त्यामुळे टायपिंग शिकवणारे सर आम्हाला फारसे कधी सराव करायची सक्ती करायचे नाही. थोडक्यात त्यात सर्वच ऐच्छिक होते. त्रैमासिक परीक्षेत टायपिंग समाविष्ट नव्हते मात्र सहामाही परीक्षेत टायपिंगची परीक्षा घेतली गेली आणि त्यात हा किशोर तेली नापास झाला. नेहेमीप्रमाणे तो इतर विषयांत सर्वात जास्त मार्क मिळवून पुढेच होता पण टायपिंगमध्ये नापास झाल्यामुळे त्याचा पहिला नंबर हुकला होता.

वर्ग शिक्षकांनी सगळ्यांना प्रगती पुस्तके वाटली आणि आपापल्या पालकांकडून त्यावर सही आणायला सांगितली. हळूहळू सर्वच मुलांनी आपापली प्रगती पुस्तके आणून दिली पण तेलीने मात्र आपले प्रगती पुस्तक आणून दिले नाही. वर्ग शिक्षक रोज त्याला आठवण करायचे व हा रोज “उद्या आणून देतो” म्हणून वेळ मारून न्यायचा. असेच काही दिवस गेले आणि मग मात्र एके दिवशी गुरुजींनी त्याला वर्गातून बाहेर काढले आणि “आत्ताच्या आत्ता पालकांची सही घेऊन ये” म्हणून घरी पाठवले. तेली त्या दिवशी काही शाळेत परत आला नाही आणि त्यानंतर तो कधीच शाळेत आला नाही.

मग हळूहळू बातम्या येऊ लागल्या. तेली गावाहून आपल्या काकांकडे, मुंबईला पुढील शिक्षण घेण्यासाठी आला होता. त्याच्या घरची गरिबी असल्यामुळे, काकांकडे पडेल ते काम करून शाळेत येत होता. जात्याच हुशार असल्यामुळे घरची सर्व कामे आटोपून, चुलत भावंडांना शिकवून, तो शाळेत येत असे. त्याचे काका फारसे शिकलेले नव्हते आणि काकू फार कजाग होती. तिला हा पुतण्या आपल्याकडे राहायला आलेला फारसं आवडलं नव्हतं. त्यामुळे फुकटचा गडी मिळाल्यासारखं ती त्याला राबवून घेत असे, प्रसंगी मारहाण करीत असे आणि उपाशीही ठेवत असे. फक्त शिकण्याच्या जिद्दीने तो टिकाव धरून होता. टायपिंग सारख्या ऐच्छिक विषयात तो नापास झाला होता ज्यामुळे त्याचा नंबर घसरला होता. प्रगती पुस्तकातील लाल रेष त्याला आपल्या काका-काकुंपुढे सही घेण्यासाठी उभं राहायची हिम्मत होऊ देत नव्हती. ज्या दिवशी गुरुजींनी त्याला वर्गाबाहेर काढलं तो तडक गावी आपल्या घरी, आई-वडिलांकडे निघून गेला. त्यानंतर तो परत आलाच नाही. पुढे त्याचे काय झाले हे आजपर्यंत आम्हाला कळले नाही.

आजही ‘ध्यान' हा शब्द कानी पडल्याबरोबर दोनच चेहरे डोळ्यासमोर उभे राहतात. एक ‘सावळ्या विठोबाचे सुंदर ते ध्यान’ आणि दुसरे आमच्या प्रचंड बुद्धिमान वर्ग मित्राचे ‘सावळे ते ध्यान'.

अनुभवकथा

प्रतिक्रिया

विनिता००२'s picture

14 Jul 2017 - 10:49 am | विनिता००२

वाईट वाटले वाचून! अशी किती गुणी मुले शिक्षणापासून वंचित रहात असतील.

सौरा's picture

14 Jul 2017 - 11:09 am | सौरा

:-(((

ज्योति अलवनि's picture

14 Jul 2017 - 1:10 pm | ज्योति अलवनि

Ohh.. अस नको होतं व्हायला. त्याने जर शिक्षकांना कल्पना दिली असती तर कदाचित त्याला पुढे शिकता आलं ही असत

एस's picture

14 Jul 2017 - 1:15 pm | एस

वाचून हळहळलो.

'Full many a flower is born to blush unseen
And wastes its fragrance on desert bear...
Full many a gem of purest rays serene
The dark unfathomed caves of ocean bear...'

सौरा's picture

14 Jul 2017 - 1:32 pm | सौरा

किती सुंदर ओळी.. अगदी चित्रदर्शी पण विदारक..

अनन्त्_यात्री's picture

14 Jul 2017 - 4:14 pm | अनन्त्_यात्री

And wastes its fragrance on desert AIR....

सिरुसेरि's picture

14 Jul 2017 - 1:53 pm | सिरुसेरि

इतर सर्व विषयांत पहिला येणारा मुलगा टायपिंगमधे कसा नापास झाला हे समजले नाही .

मोदक's picture

14 Jul 2017 - 4:20 pm | मोदक

+१

पिशी अबोली's picture

14 Jul 2017 - 4:20 pm | पिशी अबोली

इतकं वाईट वाटलं वाचून! पण बोर्डात येईल अशी ज्याच्याकडून अपेक्षा होती, आणि जो कधी कुणाच्या अध्यात मध्यात नव्हता, तो अशी टाळाटाळ का करतोय हे कुणालाही विचारावंसं वाटलं नाही हे दुर्दैव आहे.. :(

प्रीत-मोहर's picture

14 Jul 2017 - 4:39 pm | प्रीत-मोहर

इतक्या सिन्सियर मुलाबद्दल कुणालाच काहीच वाटलं कस नाही?

ज्योति अलवनि's picture

14 Jul 2017 - 7:15 pm | ज्योति अलवनि

नवीन SSC म्हणजे खूप पूर्वी का? साधारण कोणतं साल असावं? कदाचित त्यावेळी मुलांच्या मागे लागण आणि करियर चर्चा वगैरे प्रकार नसतील. शिकून नोकरीला लागण आणि त्यातल्या त्यात सरकारी किंवा बँकेतली नोकरी इतकाच विचार असायचा अस मला वाटतं

सौन्दर्य's picture

14 Jul 2017 - 9:49 pm | सौन्दर्य

ही १९७६ सालातील घटना आहे. नवीन 'एस एस सी'चे ते दुसरेच वर्ष होते. आमची शाळा फार चांगली होती शिक्षकही फार चांगले होते. कदाचित त्याने स्व:ताची परिस्थिती शिक्षकांना अथवा एखाद्या मित्राला सांगितली असती, तरी चित्र वेगळे झाले असते. मी लेखात म्हंटल्याप्रमाणे टायपिंग हा एक ऐच्छिक विषय होता, शाळेत तो शिकविण्याची म्हणावी तशी सोय नव्हती. पुन्हा परीक्षा शाळेतच होणार होती त्यामुळे त्या विषयाकडे फारसे सिरीयसली आम्ही पाहिले नव्हते. माझ्या मते टायपिंग हा थोडा टेक्निकल विषय असल्यामुळे तेली तो कदाचित आत्मसात नसेल करू शकला. नववीतल्या त्या वयात एखाद्या नवीन आलेल्या अबोल मुलाशी संवाद साधून त्याची परिस्थिती जाणून घ्यायची प्रगल्भता आमच्यात नव्हत असेच खेदाने म्हणावे लागेल.

पण ह्या धड्याने पुढील आयुष्यात स्व:ताहून इतरांना मदत करायची संधी कधीच सोडली नाही.

उपाशी बोका's picture

15 Jul 2017 - 3:08 am | उपाशी बोका

चटका लावणारे लिहिले आहे. अगदी डोळ्यासमोर उभे राहिले.

पण ह्या धड्याने पुढील आयुष्यात स्व:ताहून इतरांना मदत करायची संधी कधीच सोडली नाही. हॅट्स ऑफ टू यू सर.

यशोधरा's picture

15 Jul 2017 - 3:14 am | यशोधरा

वाईट वाटले वाचून..

रुपी's picture

15 Jul 2017 - 5:29 am | रुपी

:(