स्वच्छ भारत!

Primary tabs

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
12 Jul 2017 - 10:39 am

बेस्टची एक खच्चून भरलेली बस. पुरुष प्रवासी पॅसेजमधेही उभे आहेत. महिलांसाठी राखीव बाकडी मात्र, एका महिला प्रवाशासाठी पूर्ण बाकडे अशा हिशेबाने भरलेले! लक्षपूर्वक ध्यान दिले, तर जवळपास प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर, पुरुष प्रवाशांना खुन्नस दिल्याचा भाव दिसतोय!
अचानक पावसाची सणसणीत सर आल्याने खिडक्यांच्या काटा फटाफट खाली ओढल्या जातात, आणि पावसामुळे ट्रॅफिकही जॅम होते. गाडी जागेवरच! दोनच मिनिटांत उकाड्याने गर्दी कासावीस होऊ लागते. घामाच्या धारा सुरू होतात.
अशा वेळी अस्वस्थता येते. चीडचीड होते. गर्दीतल्या कुणाचा स्पर्शही नकोसा वाटू लागतो, आणि, आपण असे हाल सोसत असताना दुसरं कुणी मात्र आराम एन्जाॅय करतोय हे पाहणे तर आणखीनच बेचैन करणारे असते!
अशाच वातावरणात, एका बाकड्यावर ऐसपैस बसलेल्या त्या महिलेने पर्स उघडली. कंगवा काढला. केस मोकळे करून मनसोक्त मान हलवली. एखाद्या मोराने पिसारा फुलवून थिरकवावा, तसे आपले केस मान हलवूनच फुलविले आणि भरलेल्या बसमध्ये, स्वमग्नपणे, आत्मानंदी टाळी लागल्याच्या पारमार्थिक आनंदात, केस विंचरण्याचा सोहळा सुरू झाला... केसातून फिरणारा कंगवा बाहेर आला, की त्यात अडकलेली गुंतवळ बोटाने सोडवून केसांना अलगदपणे बसमध्येच सीटखाली सोडणे सुरू झाले.
डोईवरून निरोप घेतलेल्या केसांची गुंतवळ एकत्र केली तर बचकाभर तरी होईल, असे ते ऐतिहासिक दृश्य पाहणाऱ्या प्रत्येक प्रवाशास वाटत असावे, हे त्यांच्या मळमळलेल्या चेहऱ्यांवरच दिसत होते.
पण महिलांशी भांडण काढणे बरे नाही, असा विचारही बहुधा प्रत्येकजण करत असावा.
ती महिला मात्र, आसपासची तमा न करता, बसला कचराकुंडी समजून केसांची गुंतवळ अर्पण करतच होती.
.... रस्त्याकडेच्या एका भिंतीवर स्वच्छ भारतच्या जाहीरातीचे भलेमोठे पोस्टर दिसत होते. त्यावर मोदींचं चित्र पाहून एक प्रवासी उखडला.
'ये आदमी क्या घंटा करेगा स्वच्छ भारत?' तो जोरात बोलला.
गर्दीकडे लक्षही न देता आत्मग्नपणे केस विंचरणाऱ्या त्या महिलेने कंगव्यातला अखेरचा पुंजका सीटखाली सोडला, आणि केस पुन्हा बांधून ती नीटनेटकी झाली!
स्वच्छ!!

प्रकटनविचारमुक्तक

प्रतिक्रिया

विशुमित's picture

12 Jul 2017 - 11:01 am | विशुमित

शेंगांची फोलपटे, चिप्स ची मोकळी पाकिटे, नाकातला मेकुड आणि कुजकट हवा हळूच सोडण्याचं आपल्या लोकांचं कसब जगाच्या पाठीवर शोधून सापडणार नाही.
हडपसर-फुरसुंगी येथे राहणाऱ्या सुशिक्षित लोकांच्या सदनिकांच्या गेट समोरच्या चौकात कचरा टाकण्याच्या स्पर्धाचे स्टार स्पोर्ट्स ने हक्क विकत घेतले पाहिजेत.

ज्योति अलवनि's picture

12 Jul 2017 - 11:57 am | ज्योति अलवनि

+1

मनिमौ's picture

12 Jul 2017 - 12:12 pm | मनिमौ

हातभार लाऊ शकतो. मला जर कुणी रेल्वे डब्यात कचरा करताना दिसला तर ऊठून त्या प्रवाशाला नीट सांगून येते. बहुतेक वेळा लोक ऐकतात असा अनुभव आहे. . पण मला एक प्रश्न पडलाय की बसमधे असलेअसलेल50_60 प्रवाशांकडून एकानेही त्या बाईला फटकारल नाही.?

विशुमित's picture

12 Jul 2017 - 12:33 pm | विशुमित

<<<पण मला एक प्रश्न पडलाय की बसमधे असलेअसलेल50_60 प्रवाशांकडून एकानेही त्या बाईला फटकारल नाही.?>>
==>> कचरा इतरत्र टाकू/करू नये असे जाऊन सांगायला, लोक काय बोळ्याने दूध पितात का?

जेम्स वांड's picture

12 Jul 2017 - 12:22 pm | जेम्स वांड

जाऊ द्या हो, बाईमाणसाला काही बोलू नये हेच खरे, बरे केलेत गप बसलात, उगा आपल्या उमेदवारीमुळे आपल्यावरच अनास्था प्रसंग ओढवुन घेण्यात काही पॉईंट नसतो.

कायदा ते समाज, करुणा ते मदत फक्त स्त्रियांसाठी असते, फॉर द एम्पॉवर्ड जेंडर.