स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई!!

Primary tabs

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
12 Jul 2017 - 9:37 am

'लेप्टोस्पायरोसिस' या प्रसंगी जीवघेणा ठरणाऱ्या आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी काय करावे, काय करू नये, हे सांगणारी एक जाहिरात सध्या मुंबई महापालिकेतर्फे सिनेमागृहांमध्ये दाखविली जात आहे. गलिच्छ ठिकाणी साचलेल्या पाण्यात अनवाणी चालू नये, शेळ्या/गुरेढोरे/भटकी कुत्री/डुकरे यांच्या मलमूत्राचा पायाच्या जखमाशी संसर्ग टाळावा आदी सूचना मनावर ठसविण्यासाठी मुंबईतील कमालीच्या गलिच्छ ठिकाणांचे ठळक चित्रण या जाहीरातीत करण्यात आले आहे.

मुंबईत जागोजागी एवढा भीषण गलिच्छपणा साचला आहे, काही वस्त्यांमध्ये माणसे अक्षरश: नरकातले जीणे जगत आहेत, अनेक उकिरड्यांवर माणसे आणि प्राणी समान हक्कांच्या जाणीवेने वावरत आहेत, याची प्रखर जाणीव करून देणारी अनेक भडक दृश्ये या जाहीरातीत दिसतात.

एकूणच, सर्वसामान्य मुंबईकरांना किंवा मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना फारशी न दिसणारी, नजरेआडची किळसवाणी मुंबई या जाहिरातीमधून जगासमोर आणूनही, जाहिरातीचा शेवट मात्र, 'स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई' अशा अभिमानपूर्ण घोषणेने करण्यात आला आहे.

गलिच्छपणाची ढळढळीत चित्रे जिवंतपणे मांडूनही 'स्वच्छ आणि सुंदर' मुंबईचा खणखणीत नारा देण्याच्या या 'धाडसी' जाहिरातीबद्दल मुंबई महापालिकेचे अभिनंदन करावयास नको का?

प्रकटनविचारमुक्तक

प्रतिक्रिया

सौन्दर्य's picture

12 Jul 2017 - 9:54 am | सौन्दर्य

मी ही जाहिरात पाहिली नाही पण जवळजवळ एक कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मुंबईसारख्या एका लहानशा बेटावर स्वच्छता कशी साधायची, हाच एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

मराठी_माणूस's picture

12 Jul 2017 - 10:15 am | मराठी_माणूस

छे, हा तुमच्या पर्सेप्शन चा दोष आहे ज्या मुळे तुम्हाला फक्त मुंबईची वाइट बाजु दिसत आहे . (: ह. घ्या)

ज्योति अलवनि's picture

12 Jul 2017 - 11:52 am | ज्योति अलवनि

महानगरपालिकेने स्वच्छता करत राहायची आणि नागरिकांना घाण, कचरा करण्याचा अधिकार आहे असं नाही. मी अस मुळीच म्हणत नाही की महानगरपालिका फार चांगलं कासम करते आहे. पण आपण देखील प्रामाणिकपणे स्वतःलाच उत्तर देऊया की आपण किती स्वच्छता पाळतो? ओला आणि सुका कचरा किती जण आपल्या घरात वेगळा करतात? पालिका असा वेगळा कचरा गोळा करते की नाही ते नंतर बघू. आजवर घराच्या खिडकीतून कोणत्याही प्रकारचा कचरा कधीच बाहेर टाकलेला नाही असं म्हणणारे किती?

न्यायालयाने पाण्याच्या मोठ्या वाहिन्यांच्या बाजूने असणारी वस्ती हटवण्याची कार्यवाही करण्यास महानगरपालिका प्रशासनास सांगितले. त्याचा विरोध नेते मंडळी करत आहेत. त्याचे काय? बर, या लोकांचे पुनर्वसन कुठे आणि कसे करणार याबद्दल प्रशासन देखील काहीच बोलत नाहीत. असे अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे किमान कोणीतरी काहीतरी प्रयत्न करतेच आहे हे चांगलंच नव्हे का?

"न्यायालयाने पाण्याच्या मोठ्या वाहिन्यांच्या बाजूने असणारी वस्ती हटवण्याची कार्यवाही करण्यास महानगरपालिका प्रशासनास सांगितले. त्याचा विरोध नेते मंडळी करत आहेत. त्याचे काय? बर, या लोकांचे पुनर्वसन कुठे आणि कसे करणार याबद्दल प्रशासन देखील काहीच बोलत नाहीत."

ही वस्ती अनधिकृत असावी/आहे हे मी गृहीत धरतो. जी वस्तीच मुळी अनधिकृत आहे ती हटविण्यास विरोध का बरं असावा ? आणि ह्या अनधिकृत वस्तीचे पुनर्वसन देखील सरकारनेच/प्रशासनाने करावे ही अपेक्षा किती योग्य आहे ?

गामा पैलवान's picture

12 Jul 2017 - 12:20 pm | गामा पैलवान

ज्योति अलवनि,

पण आपण देखील प्रामाणिकपणे स्वतःलाच उत्तर देऊया की आपण किती स्वच्छता पाळतो? ओला आणि सुका कचरा किती जण आपल्या घरात वेगळा करतात?

असा विचार केल्याबद्दल आपलं अभिनंदन. मात्र असा विचार केवळ अधिकृतपणे राहणारे पांढरपेशेच करतात. याउलट बराचसा गलिच्छपणा अनधिकृत वस्त्यांमधून दिसून येतो.

आ.न.,
-गा.पै.

नेत्रेश's picture

13 Jul 2017 - 2:20 am | नेत्रेश

> असा विचार केवळ अधिकृतपणे राहणारे पांढरपेशेच करतात

सहमत आहे. पण ज्यांना उद्या काय खायचे व आज रात्री कुठे झोपायचे हा प्रश्ण आहे, ते स्वतःच्या किंवा परीसराच्या स्वच्छतेची कीती व कशी काळजी करणार?

विशुमित's picture

12 Jul 2017 - 12:46 pm | विशुमित

<<<<मात्र असा विचार केवळ अधिकृतपणे राहणारे पांढरपेशेच करतात>>>

==> थोडे सरकटीकरण होतंय. कचरा करण्यात पांढरपेशे (अधिकृत पणे राहणारे सुद्धा) पण खूप आघाडीवर आहेत हे माझे निरीक्षण आहे.

समाजात आणि सार्वजनिक ठिकाणी कसे वागायचे याचे ज्याला भान आहे तीच व्यक्ती असा विचार करू शकते हे माझे प्रामाणिक मत आहे.

तेजस आठवले's picture

12 Jul 2017 - 7:36 pm | तेजस आठवले

+1

ज्योति अलवनि's picture

12 Jul 2017 - 2:08 pm | ज्योति अलवनि

अगदी खरं